रे कहने, सुनने वाले मतवाले यार..


कोणाबद्दलही वाटणारं प्रेम, आकर्षण अतिशय जीवघेणं असतं.

एकतर ते आपल्याला केव्हा, कोणाबद्दल वाटेल याची काहीही शाश्वती नसते आणि ते कळतं तेही एखाद्या रँडम क्षणी अचानक कळतं. एखाद्या मनुष्यमात्रासोबत नातं तयार करण्याची प्रक्रीया म्हटली तर साधी, म्हटली तर गुंतागुंतीची असते आणि त्या गुंत्यामध्ये आणखी आपल्या इन्सिक्युरिटीज, मनात असलेल्या तरत-हेच्या भयांची भर पडते. हे प्रेम, आकर्षण वाटायला लागल्याक्षणीच आपल्या खूप आत-आत एका सूक्ष्म आवाजाने जन्म घेतलेला असतो आणि तो आपल्याला अथकपणे विचारत असतोः "खूप लहान आहे का ती?" "खूप मोठा आहे का तो?" "थोडा जास्तच उंच आहे, नाही का?" "तिला खळखळून हसता येत असेल का?" "आपण हे असं बोलूनच टाकलं तर ती प्रतिसाद दे‌ईल की, थेट झिडकारूनच टाकेल?" इ. कधीकधी टायमिंग चुकलं असं वाटत राहातं, मग आपण स्वतःलाच विचारतो, आपण जरा दोनेक वर्षं आधी का नाही भेटलो? आपल्याला पुन्हा भेटता ये‌ईल का? कितीही काहीही केलं तरी ते पुरेसं नाही, आपल्याकडे पुरेसा वेळ नाही असंच वाटत राहातं; पण, आपल्याला हवा असलेला क्षण आलाच की मग काय बोलावं, काय करावं हे सुचत नाही, जीव थोडाथोडा हो‌ऊन जातो. पण हे- म्हणजे झालंय ते असं झालंय आणि होतंय ते असं होतंय- हे सगळं आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर समजतं. आणि ब-याचदा आपण त्याबद्दल प्रत्यक्ष, थेट विचारायचं सोडून सा‌ईन्स दिसण्याची वाट पाहातो, एखादं वाक्यं अशाप्रकारेच का वापरलं असेल किंवा असंच का बोललं गेलं असेल, यातून काय सांगायचं असेल याचा काथ्याकूट करत बसतो. आपल्याला काय वाटतंय हे समोरच्याच्या कुवतीच्या भाषेमध्ये भाषांतरीत हो‌ऊन त्याच्यापर्यंत पोहोचेस्तोवर मधल्यामध्ये बरंच काही हरवून गेलेलं असतं आणि कोणाबद्दलही प्रेम, आकर्षण वाटणा-या बहुतेक सर्वांना हे मनातून माहित असतं.

ते हरवलेलं काहीतरी म्हणजे काय हे आपल्याला कधीच माहित नसतं, पण ते हरवलेलं असतं खास! अशा दुस-यापर्यंत पोहोचेपर्यंत मधल्यामध्ये हरवून गेलेल्या ख-याखु-या आणि अगदी मनापासून वाटण्याचा अर्थ शोधणारा चित्रपट म्हणजे सोफिया कोपोलाचा ’लॉस्ट इन ट्रान्सलेशन’!

तर,
’लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ टोकियोमध्ये घडतो. चित्रपटाची नायिका शार्लट आपल्या फोटोग्राफर नव-यासोबत त्याच्या असा‌ईमेण्टकरता टोकियोमध्ये आलिये. ती जेमतेम विशीतली, येल विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषय घे‌ऊन पदवीधर झालेली मुलगी आहे. सध्या ती काहीही करत नाहिये, म्हणजे तिला काय करायचंय हे तिला अद्याप कळलेलं नाहिये. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "शी इझ स्टक!". तिच्याकडे करण्यासारखं काही नसतंच म्हणून ती नव-यासोबत टोकियोला आलेली असते. नवरा दिवसभर कामात गुंग आणि रात्री थकून घोरत पडलेला आणि शार्लटसमोर दिवसच्या दिवस आ वासून पडलेले. ती आपला वेळ त्या मोठाल्या हॉटेल रूमला सजवण्यात, स्कार्फ विणण्यात घालवतेय आणि तिच्या आयुष्यातली पोकळी बौद्ध मंदिरांना भेटी देत, पुष्प प्रदर्शनांना भेटी देत भरण्याचा प्रयत्न करतेय. तिथेही आपण किती निरुद्देश आयुष्य जगत आहोत, आपण किती होपलेस आहोत याचा साक्षात्कार तिला पुनःपुन्हा होतोय.


मंदिरातल्या घंटानादाच्या आवर्तनांनी तुम्हाला थोडंफार का हो‌ईना शांत वाटलं पाहिजे, पाणी मारल्यासारखे विचार खाली बसले पाहिजेत, नवरा बाजूला असेल तर एकटं वाटायला नको, या एखाद्याच्या स्वतःकडून असलेल्या सर्वसामान्य अपेक्षा आहेत खरं तर! पण, तिला ते भिडत नाही, ते आतपर्यंत पोहोचत नाही. नवरा आणि तिच्यात जे काही घट्टमुट्ट होतं ते आता डायरीत ठेवलेल्या काही पोलोरॉ‌ईड शॉट्सच्या रूपातच उरलेलं आहे, आणि मला वाटतं, त्याने ती भेदरते! अनिश्चितता, असुरक्षितता भल्याभल्यांची गाळण उडवते. पण ती विचार करकरून इतकी थकलिये की तिला आता काही जाणवत नाही. ना वेदना, ना नैराश्य!  दुःखं आता साठवून ठेवायची नाही, नाहीतर ती आत साठून साठून आपल्याला सूज येते, आपण पोचे आलेल्या भांड्यासारखे चुरमडत जातो हे येलची तत्वज्ञानाची पदवीधर असलेल्या शार्लटला माहित असणारच. म्हणून मग ती एकदा आपल्या एका मैत्रिणीला कॉल करते, पण तिची मैत्रीण तिची ही तथाकथित अॅगनी ऐकून घ्यायला फारशी उत्सुक आहे असं दिसत नाही. "तुला खाता-पिता ही थेरं बरी सुचतात. इतका सोन्यासारखा नवरा आहे, तुला जपानला नेलंत, चांगलं फिर की, खा-पी, टुमटुमीत हो, जॅपनीज शिक, सुशी खा, स्टेक हा‌ऊसमध्ये जा‌ऊन ये, पण नाही, वाह्यात किटकिटी कुठली!" शार्लटच्या तथाकथित दुःखाविषयी जरासंही औत्सुक्य नसलेल्या तिच्या लॉरेन नामक मैत्रिणीने त्या रिसीव्हरमधून न बोललेलं बरंच काही वेगवेगळे शब्द लेवून आपल्यापर्यंत बरोब्बर पोहोचतं.

शार्लट ही अशी, तर बॉब हॅरीस हा एकेकाळचा नावाजलेला, पण आता कारकीर्द उतरणीस अभिनेता आहे. सांतोरी नावाच्या व्हिस्कीची जाहिरात करायला तो नुकताच टोकियोमध्ये आलाय. खरंतर रात्रीच्या वेळचं झगमगणारं टोकियो म्हणजे एखाद्या परदेशी माणसाला डोळे मोठमोठाले करून पाहायला लावणारं.. पण बॉब टॅक्सीमध्ये झोपा काढतो आहे. बाहेर काय चाललं आहे किंवा आहे याबद्दलची संपूर्ण अनिच्छा त्याच्या एकंदर अवतारातून दिसते आहे. मध्येच तो जागा हो‌ऊन बाहेर पाहातो तेव्हा त्याला एका मोठ्या सा‌ईनबोर्डवर त्याचं भलंमोठ्ठं पोस्टर दिसतं. त्याला लोकं त्याला ओळखतात याची, त्याचा चेहरा कमर्शियल्स, पोस्टर्स, होर्डींग्सवर दिसण्याची  कधीचीच सवय हो‌ऊन गेलिये, आता वाटलंच तर ओशाळल्यासारखं जरुर वाटतं.

तो त्याच्या घरापासून दूर आलाय खरा, किमान त्याला असं वाटतंय खरं, पण इथेही घरापासून सुटका नाही हे त्याला हॉटेलच्या लॉबीत त्याची वाट पाहात असलेल्या फॅक्सवरूनच कळतं. तो त्याच्या मुलाचा बड्डे सपशेल विसरला आहे, पण डोण्ट वरी, तो समजून घे‌ईल अशा अर्थाचा तिरसट संदेश वाचून कदाचित त्याच्यातला असेल नसेल तितकाही उत्साह निघून जातो. तो इतका कंटाळलेला आहे की त्याला बघून कंटाळ्यालाही कंटाळा यावा. पण, असं असलं तरी, त्याच्या त्या प्रोप्रायटरी, बंदिस्त जगातलं अडकणंही त्याने आत खोलवर कुठेतरी मान्य केलेलं आहे असं वाटतं. त्यात, हे जसं आहे त्यापेक्षा वेगळं असू शकलं नसतं याचा स्वीकार आहे. असं असलं तर काय- आणि तसं असलं तर काय- मी काय होतो मीचा विचार नेसेसरीली नाहिये; पण, काय झालोय मी-चा विचार कुठेतरी आहेच. कदाचित त्या तुतानखामेनच्या थडग्यासारख्या भासणा-या अतिप्रचंड हॉटेलच्या बारमध्ये अनोळखी भाषेत बोलणा-या माणसांमध्ये बसून एकटयानेच भूतासारखं बसून, अनोळखी सुरावटींवर हिंदकळत व्हिस्की पिताना, ओळख-पाळख नसताना भस्सकन काहीही विचारून उत्तराची अपेक्षा ठेवणा-या चाहत्यांना तोंडाला ये‌ईल ते उत्तर देताना कदाचित त्याच्या डोक्यात हेच सुरु असेल.

बॉबचे डोळे मोठे मिश्कील आहेत. तो काहीही करताना अचानक टsssडाsss करत कोटातून ससा बाहेर काढून दाखवणारेय असं सदैव वाटत राहतं. म्हणजे हे तो करु शकला असता; पण, करत नाहीये, त्याला ते करायचं नाहिये, किंवा करायचा सरळ कंटाळाच आलाय हे पदोपदी, लख्खपणे जाणवत राहातं. चित्रपटभर तो पोकर फेस, मख्ख चेहरा घे‌ऊनच वावरतो. तो नेहमी बॉब हॅरीसच राहतो. तो कॅरी‌ओकी बारमध्ये इल्विस कोस्टेलोचं गाणं गातो तेव्हाही मख्खच असतो.


आता जपानमध्ये किती वाजलेत हे त्याच्या बायकोला माहित असणारच, पण तरीही रात्री अपरात्री त्याच्या रूममधला वॉर्डरोब त्याला कसा हवा आहे याबद्दल विचारणा करणारा फॅक्स पाठवणं, त्याच्या चार-पाच दिवसांच्या वास्तव्यातही फेडेक्सने बर्गंडी रंगांची कार्पेट सँपल्स पाठवणं यातून दिसणारा, त्याच्या बायकोच्या फोन कॉलमधला सौजन्याचा, आस्थेचा अभाव यातून त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आपल्या डोक्यात  नको नको त्या कल्पना येत राहतात. पण बॉब असा आहे तो का आहे याबद्दलचे तर्क-कुतर्क लढवायला ते पुरेसं आहे. पण हा पूर्ण चित्रपट त्यावर नाही, तो त्या चित्रपटाचा निव्वळ एक भाग आहे.

इतक्या दूर ये‌ऊनही बॉबची त्याच्या बंदिस्त जगापासून सुटका नाही आणि शार्लटचा नवरा तिच्या जवळ असूनही तिच्या जगापासून कोसो दूर आहे. बॉब पन्नाशीला आलाय आणि शार्लट विशीतली. शार्लट आणि बॉबमध्ये समान म्हणावी अशी एकच गोष्ट आहे. त्या दोघांनाही एकच प्रश्न पडलाय, आपलं आयुष्य कुठे चाल्लंय? म्हणजे ते कुठेतरी चाल्लंय असं तरी आहे का, की एकाच ठिकाणी साचून राहिलंय? त्या दोघांनाही झोप लागत नाही. परक्या ठिकाणी आहेत म्हणून की परक्या ठिकाणी ये‌ऊनही आपली कशाकशापासून सुटका नाहीच याच विचाराने? आज झोपायची भ्रांत आहे, आजची रात्र बारवर व्होडका टॉनिक आणि सांतोरी पीत काढली, उद्याचं काय? उद्याचा दिवस निभणार आहे की नाही असा जीवाला घोर? काय करावं? कुठे जावं? संपूर्ण दिवस आ वासून समोर पडलेला. शार्लट आणि बॉब आपापल्या पार्टनर्सपासून शारिरीकरित्या आणि मानसिकदृष्टयाही दुरावलेले आहेत. ते दोघेही आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल जराही समाधानी नाहीत, असलेच तर फार फार गोंधळलेले आहेत हा त्यांच्यातला समान दुवा आहे. शार्लट आणि बॉब दोघेही आपापल्या रूम्समध्ये, ब-याचदा आपल्या बेडवर असतात, तेव्हा त्या मोठाल्या रूममधलं त्यांचं एकाकीपण, त्यांचा प्रचंड कंटाळा, त्यावर काही करण्याची अनिच्छा हे सर्वकाही आपल्यापर्यंत फारसा प्रयत्न न करता आपसूक पोहोचतं.मग ते अगदी अचानकच एकमेकांना भेटतात, पूर्वीची ओळख नसताना बोलायलाही लागतात. तसं बघायला गेलं तर शार्लट आणि बॉब हे दोघेही एकमेकांना परके आहेत. पण कधीकधी एकटेपणात आपण परक्याशीच फार चांगलं आणि मोकळेपणी बोलू शकतो. तिथे आपल्याला जज केलं जाण्याची शक्यता कमी असते. त्या परक्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दलची गृहितकं नसतात, त्यामुळे,तिथे आपल्या चुका निर्ममपणे पॉ‌ईंट आ‌ऊट केल्या जात नाहीत, आपण अधिक खुलून, कुठलाही विधिनिषेध न बाळगता बोलू शकतो. पण असं एकाच परक्या माणसाशी बराच काळ मनातलं बोलता बोलता, असं खुलून बोलता बोलता एक टप्पा असा येतो की आपल्याला त्यांच्याबद्दलचे आणि त्यांना आपल्याबद्दलचे काही शोध लागतात आणि मग ती माणसं म्हणावी तितकी परकी उरत नाहीत. त्यांच्यातला तो परकेपणा केव्हाच मागे पडलेला असतो.

त्यांच्यामध्ये काही छानछान, अगदी खोल गर्भितार्थ असलेली बोलणी होतात असं मुळीच नाही किंवा ज्याच्याशी बोलू शकू असं कोणीतरी भेटल्यावर होतं तसं, "बाद मुद्दत के मिले हैं दिवाने, कहने सुनने को बहुत हैं अफसाने" असंही होत नाही. त्यांच्यामध्ये मुळात फार काही बोलणं होतंच नाही, त्यांच्यात काही होत असलंच तर कुठेतरी एकत्र जाणं-येणं आणि त्या जाण्या-येण्यातून त्यांच्यामध्ये शब्दांवाचून जे घडतं ते पाहाणं आहे.बोलताना सुद्धा ब-याचदा बॉबच बोलतो आणि त्यावरच्या शार्लटच्या प्रतिक्रिया देखील "ओ, दॅट्स बॅड", "आs, आय सी" इतक्या ढोबळ असतात. इथे प्रश्नाला उत्तर, मग नवा प्रश्न, मग त्याला जुनंच किंवा नवं उत्तर अशी परिस्थिती नाही. बॉबला स्वतःबद्दल प्रश्न पडत नाही, पण, शार्लटकडे बॉबला विचारण्याकरिता बरेच प्रश्न आहेत, पण मग त्याने दिलेल्या समजूतीच्या सल्ल्यावर तिच्याकडे "हं" शिवाय काही टिप्पणी नाही.

त्यांच्यातली संभाषणं लॅगसारखी आहेत. कॉल केल्यावर आपण बोललेलं काहीतरी समोरच्याला पाच सेकंदांनंतर ऐकायला जातं आणि समजतं तशी. त्यांना कसलीच घा‌ई नाही. वेळच वेळ आहे. जायचंय कुठे नाहीतरी! तो काहीतरी एक बोलतो आहे, त्यावर तिचं उत्तर अशी ही संभाषणं नव्हेत. त्यांच्यातली संभाषणं म्हणजे त्यांचे आपले स्वतःचे प्रोप्रायटरी मोनोलॉग्स आहेत. तिच्याकडे मुदलात बोलण्यासारखं काही नाही, पण त्याच्याकडे आहे. पण त्यालाही ते कोणाच्याही समोर बोलता येत नसावं कदाचित, म्हणून शार्लटसमोर.

तो शार्लटसोबत असतान उगाच तिच्या वयाचा हो‌ऊन बोलायचा प्रयत्न करत नाही. मुळातच बॉबकडे आयुष्याबद्दलचं काही सखोल तत्त्वज्ञान वगैरे आहे असं नाही, पण, आपण मोठे होत जातो तसे शहाणे, समंजस होत जातोच असं काही नसतं, फक्त जगणं आपल्याला अंगवळणी पडत जातं इतकं काय ते त्याला समजलंय आणि त्याच्या-शार्लटमध्ये होणा-या काही मोजक्या संभाषणांमध्ये तो तिला तेच सांगतो.

-

कधीकधी असं होतं नाही का, की तुम्ही त्याच त्याच माणसांना त्याच त्याच ठिकाणी पुनःपुन्हा पाहाता तरी प्रत्येक वेळी आपण नव्या माणसांना पाहातोय असं होतं. आपण शार्लटला पहिल्यांदा केव्हा आणि कसं पाहिलं हे बॉबला बारीकसारीक तपशीलासह माहित आहे, पण शार्लटकडे असलेली बॉबच्या पहिल्या भेटीची आठवण बॉबपेक्षा पूर्ण वेगळी आहे. प्रत्यक्ष भेटण्या‌आधी आपण बॉबला पाहिल्याचं शार्लटला अजिबात आठवत नाही.
पण कधीकधी असंही होतं की, दोन-तीन वर्षं (बॉबच्या केसमध्ये 25 वर्षं) एकाच माणसासोबत काढल्यानंतर एक क्षण असा येतो की तो आपल्याला तो संपूर्ण परका वाटतो. आपण त्याला ओळखूच शकत नाही. आपण काही एक-दोन वर्षांपूर्वी ज्याला भेटलो तो हाच माणूस असं मनाला बजावून सांगीतलं तरी समोर जे दिस्तंय आणि मन जे सांगू पाहातंय त्याचा मेळ बसत नाही, अशा वेळी काय करावं? बॉबची बायको लिडिया आणि शार्लटचा नवरा जॉन यांविषयी त्यांच्या पार्टनर्सना सध्या असं वाटतंय, त्यांना बॉब आणि शार्लटबद्दल नेमकं काय वाटतंय याचा ऊहापोह या चित्रपटात नाही.

अशारितीने ते अनाहूतपणे एकमेकांना भेटतात, चार-पाच दिवस एकमेकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जातात, थोडंफार बोलतात, त्यांच्या इन्सिक्युरिटिजना थोडीफार का हो‌ईना वाट करून देतात, पण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना अचानक उत्तरं मिळून गेली असं होत नाही, पण त्यांना एकमेकांना भेटायच्या आधी वाटत असतं त्याहून कितीतरी जास्त बरं वाटायला लागतं इतकं मात्र खरं. त्यांच्या खोलीचा गडदपणा शेवटी शेवटी जाणवण्या‌इ्तपत कमी झालेला जाणवतो त्यावरून त्यांच्या मनःस्थितीची कल्पना यावी. कशाच्यातरी शोधात असताना काहीतरी भलतंच मिळून जातं आणि ते जन्मभर पुरतं अशातलं ते काहीतरी बनतं.

कधीकधी नाही का असं होत की, आपल्याला खूप काही बोलायचं असतं, सांगायचं असतं, पण डोक्यात तयार होणा-या त्या सांगाव्याशा वाटण्याला नीट शब्दच मिळत नाहीत, आणि मिळालेच तरी ते ठार चुकीचे असतात. आपण ते कागदावर किंवा शब्दांमध्ये उतरवायचा प्रयत्न केलाच तर ते ’हेच म्हणायचं होतं’ असं न वाटता ’असंच काहीतरी म्हणायचं होतं’ असं वाटतं.आपण असं लिहिलं असतं, असं बोललो असतो म्हणजे जरा चांगलं कळलं असतं, जरा जास्त आत पोहोचलं असतं, थोडं कमी संदिग्ध झालं असतं असं राहून राहून वाटतं. त्यामुळे कधीकधी आपण पानच्या पान लिहिलेलं काहीतरी खोडून टाकतो, बोलायला जिभेवर आलेले शब्द मागच्या मागे गिळतो. आपल्या वाटण्याची ही फसलेली भाषांतरं आपल्या डोक्याच्या आत ठिकठिकाणी पडून असतात,पण मग काय करायचं? बोलायचंच नाही, सांगायचंच नाही? की त्या न-भाषांतरातूनही समोरच्याला नेमकं काय ते कळेल यावर भिस्त ठेवायची? बॉब आणि शार्लटमध्येही न-बोललेलं, न-समजलेलं बरंच काही आहे. आणखी काही वर्षांनी कदाचित ती एकमेकांना भेटतील तेव्हापर्यंत त्यांना ते समजलेलं असेल किंवा समजलेलं नसेलही.

लोकांच्या आयुष्यात तरत-हेचं वैचित्र्य असतं आणि या चित्रपटामध्ये त्या सगळ्याला वाव आहे; पण, वैचित्र्य का आहे, त्यापाठची कारणं वगैरे समजून घ्यायचा अट्टाहास मात्र नाही. ती दोघं जपानमध्ये मिसळून जातात असंही नव्हे. पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबासारखी दोघंही पाण्यात असूनही अलिप्त असतात. त्याच्या नजरेतलं जपान देखील त्रयस्थाच्या नजरेतून पाहिलेल्या जपानसारखं दिसतं.

आणि अशा रितीने मग येते निरोपाची वेळ. ती येणारच असते. केवळ काही कामानिमित्ताने परक्या शहरात आलेली दोन परकी माणसं कधीतरी परतून आपल्या देशाला जाणारच, नाही का?

हे आपल्यात जे काही आहे ते आपण जपानमध्ये, तेही एकाच हॉटेलमध्ये राहतो आहोत तोवरच टिकणारं आहे., हे काही प्रेम बिम नाही याचं भान त्या दोघांमध्ये प्रत्येक क्षणाला दिसतं. आणि त्याहून वेगळं काही वाटत असलंच तर ते का बोलायचं? जर आपण सातव्या दिवशी एकमेकांपासून दूरच जाणार आहोत तर?

बॉब आणि शार्लट टोकियो फिरतात, एकत्र व्हिडियो पार्लरमध्ये, अगदी स्ट्रिप क्लबमध्ये देखील जातात, मोठमोठाल्या डोळ्यांनी काचेबाहेरचं टोकियो पाहात रात्रीचे बेभान फिरतात. ही एका अर्थाने त्यांनी निरोपाची तयारी चालवलेली असते. निरोप घेतेवेळी खूप सा-या आठवणींच्या पुरवण्या असल्या की निरोप घेणं थोडंसं सुसह्य होतं. पण बॉब आणि शार्लट यांचा निरोप प्रचंड ऑकवर्ड आहे, बरंच काही बोलायचं राहून गेल्यासारखा आहे. ती दोघं निरोप घे‌ऊन दोन दिशांनी चालती होतात तेव्हा आपल्याला वाटतं, छे! काहीतरी चुकतंय. हे असं व्हायला नको होतं.

आपल्याला वाटतं ते बॉबलाही वाटतं कदाचित, म्हणून मग सर्वात शेवटी विमानतळाच्या वाटेवर असताना भर रस्त्यात गाडी थांबवून बॉब शार्लटला गाठतो आणि तिच्या कानात निरोपाचं काहीतरी बोलतो.ते का‌ए हे आपल्याला कळत नाही, अगदी शेवटपर्यंत कळत नाही, पण एव्हाना ती पात्रं इतकी खरीखुरी हो‌ऊन स्क्रीनवर उभी असतात की, टोकियोतल्या प्रचंड रहदारीच्या जागी भर रस्त्यात उभं राहून बोलणा-या बॉब आणि शार्लटचं  ते खाजगीपण आपण आपल्याही नकळत मान्य करुन टाकतो. पण, त्याचवेळी तो काय बोलला असेल याबद्दल तर्क-कुतर्क लढवायला लागतो. काय म्हटलं असेल त्याने? आय विल मिस यू? कदाचित लव्ह यू देखील? त्याने पुन्हा एकदा भेटण्याच्या शक्यता तयार केल्या का? त्यांच्यापलीकडे ती टोकियोतली गर्दी अनावर कोसळत असते. त्या दोघांना ’काहीतरी’ वाटत असतं याबद्दल त्या दोघांनाही संदेह उरलेला नसतो, पण आपलं ते ’काहीतरी’ वाटणं जसंच्या तसं शार्लटपर्यंत पोहोचेपर्यंत मधल्यामध्ये हरवून जाण्याचा धोका पत्करून बॉब ते शार्लटपर्यंत पोहोचवतो हे महत्त्वाचं! मग ते दोघे पुन्हा एकदा त्या गर्दीचा भाग हो‌ऊन जातात, एकट्या एकट्याने, पण चेह-यावर समाधान घे‌ऊन आपल्या वाटेने निघून जातात, पुढे कधीतरी पुन्हा एकमेकांना भेटेस्तोवर!

-

कोपोलाने ’लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ हा सिनेमा करायला टोकियो हे शहरच का निवडलं? रोम का नाही? टोकियोतला कंटाळा रोममधल्या कंटाळ्यापेक्षा किंवा टोकियोतलं एकटेपण रोममधल्या एकटेपणापेक्षा वेगळं असू शकलं असतं का? पौर्वात्य आणि पाश्चिमात्य एकटेपणामध्ये फरक असू शकला असता का?

टोकियो हे जगातलं सर्वाधिक घनतेचं शहर आहे. मग इतक्या सा-या गजबजीतलं, माणसांमधलं एकटेपण गडद करण्यासाठी का तिने टोकियोची निवड केली? बहुतेक, हो!

टोकियो  सदैव झगमगतं असतं, प्रकाशत असतं, इतकं की ते नि‌ऑन्स भक्ककन डोळ्यांमध्ये घुसतात. त्या शहरात बॉब आणि शार्लटला कोणी ओळखत नाही, ना ते कोणाला ओळखतात, आणि त्याने कोणाला फरक पडत असतो अशातलाही भाग नाही. पण या सगळ्यांतून ते एकमेकांना थोडेफार कळतात आणि त्यांना स्वतःबद्दलही थोडंफार कळलं असं वाटू लागतं हे ही नसे थोडके!

-

या सिनेमात पुढे जा‌ऊन शार्लट म्हणते तसं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात फोटोग्राफीचा एक टप्पा येतो. आपण घनचक्करसारखे आपल्या पायाचे, हाताच्या बोटांचे, केसांच्या बटांचे, डोळ्यांचे  फोटो काढत बसतो. शार्लटने बॉबला न सांगीतलेला, पण मला माहित असलेला आणखी एक टप्पा म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट मूडमध्ये कोणत्या ना कोणत्या चित्रातल्या मॉडेलसारखे, किंवा पिक्चरमधल्या हिरॉ‌ईन्ससारखे दिसतो असे वाटण्याचा टप्पा. उदा. ट्रेक गेल्यावर डोंगराच्या कडेला जा‌ऊन पाय पोटाशी घे‌ऊन, त्यांभोवती हात लपेटून गहन विचारात गढणे. मी शार्लटच्या वयाची असताना मी मान वळवल्यावर व्हेरमीरच्या गर्ल विथ द पर्ल इयरींगमधली मुलगी दिसते असं मला खात्रीने वाटायचं. आणखी काही मासले द्यायचे म्हटले तर आपल्याला विचारमग्न असताना एक खास पोझ घ्यायची, रडताना आक्रस्ताळेपणाने, धसमुसळ्यासारखं पालथ्या हाताने अश्रू न पुसता तर्जनीने नाजूकपणे अश्रू पुसायची, कॉफीचा पेला दोन्ही हातांनी धरून स्वप्नाळू डोळ्यांनी कॉफी प्यायची सवय लागते. (शार्लटला या सगळ्या सगळ्या सवयी आहेत) ही वेडं नंतर सरतात, पण ती असतात हे खरं! चित्रपट सुरू झाल्याझाल्या आपल्याला हॉटेल रूममध्ये कॅमे-याला पाठमो-या झोपलेल्या शार्लटचं दर्शन होतं.


शार्लटला सी-थ्रू पँटीमध्ये कुशीवर झोपलेलं पाहाणं मला माझ्या त्या वेडाची आठवण करून देतं. शार्लटची ही पोझ जॉन कासेरेच्या ’जुत्ता’ नामक चित्रासारखी आहे. ते चित्र म्हणजे अतिशय झिरझिरीत लाँजरी घातलेल्या एका बा‌ईचं पाठमोरं, कंबरेपासून खालच्या भागाचं तैलचित्र आहे.


शार्लटच्या बघण्यात ते कधीतरी आलेलं असणारच, किंवा तिच्या त्या हॉटेलच्या खोलीत लावलेल्या खूप सा-या पेन्टींगमध्येही असेल. तर, आपल्याला दिसणा-या शार्लटचा फक्त कंबरेपासूनचा खालचा भाग दिसतो आहे. ती सी-थ्रू पँटी इतकी झिरझिरीत आहे की कल्पनाशक्तीला काही वावच सोडलेला नाहीये. वरती तिने पावडर ब्ल्यू रंगाचं स्वेटर घातलं आहे. कदाचित तिने दोन्ही हात डाव्या गालाखाली घेतले असतील. कदाचित ती शून्यात पाहात पडली असेल. या पोझमध्ये कुठल्यातरी एकाच बिंदूत प्रचंड रस असल्यासारखं डोळे खिळवून आंधळ्यासारखं बघत बसली असेल. हा रडं आवरायचा अक्सीर इलाज आहे हा शोध मलाही विसाव्या-बाविसाव्या वर्षीच लागला होता.

-

आणि आता युगानुयुगे चावून चोथा झालेला प्रश्न!
दोन माणसं कोणत्याही कारणांनी एकत्र येतात, एकत्र वेळ घालवतात, इंटिमेट म्हणावं असं वागतात, बोलतात तेव्हा त्यांच्यामध्ये सेक्शु‌अल टेन्शन, किमानपक्षी आकर्षण असतं का? माझं मत, हो असतं. त्याशिवाय आवडणं ही भावना पुढे जा‌ऊ शकत नाही. इट बर्न्स आ‌उट लेटर, पण ते असतं हे नाकारता येत नाही.

पण बॉब आणि शार्लटविषयी विचार केला तर मला वाटलं की, बॉब तिच्यामध्ये सेक्शु‌अली इंटरेस्टेड नाही. वाटलाच तर तिच्याबद्दलचा लोभ आहे. आय मीन कमॉन! आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तिच्यातल्या काही लकबी, काही लोभस फीचर्स आपल्या ध्यानात येतात की! आपण अगदीच त्या व्यक्तीवर जीव वगैरे जडवला नाही तरी, त्या व्यक्तीच्या काही लकबींवर आपलं मन जातंच की, लोभ जडतोच की! तसाच आयुष्याच्या धकाधकीत कुठल्यातरी टप्प्यावर शुष्क, कोरडा झालेला बॉबही गुलाबी केसांचा विग घातलेल्या, ’विंकींग ऍट यू’ म्हणत ’ब्रास इन पॉकेट ’गाणा-या शार्लटच्या त्या अनावर तारूण्याच्या ताजेपणाने पाणी शिंपडल्यासारखा ताजातवाना होतो. या चित्रपटात मला सर्वात आवडलेला एक प्रसंग आहे. कॅरी‌ओकी सेशननंतर शार्लट एकटीच, सर्वांपासून दूर  एका आतल्या खोलीत जा‌ऊन बसलेली असते. थोड्या वेळाने तिचा शोध घेत बॉब तिथे येतो, तिच्याबाजूला बसतो. खेटून नाही, पण पुरेशी जवळीक आहे. तो तिच्या हाती एक सिगरेट दे‌ऊ करतो. हे सर्व करताना शार्लट आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे एकटक पाहाते आहे. ती सिगरेट हातात घेते, एक पफ घेते आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. बॉब आपले दोन्ही हात उचलतो. आपल्याला वाटतं की तो तिच्या खांद्याभोवती हात टाकणार आणि तिला जवळ घेणार, तिलाही कदाचित असंच वाटलं असेल, पण त्या‌ऐवजी तो दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून गुडघ्यांवर ठेवतो. त्यावेळचं शार्लटच्या ओठांवर काही काळ रेंगाळलेलं हसू पाहाण्यासारखं आहे. ही एझ टोटली इन्फॅच्यु‌एटेड, पण त्याबद्दल काही करावं अशी परिस्थिती नाही याचं त्याला भान आहे, याची ती पावती आहे, आणि ते शार्लटला बरोब्बर समजलेलं आहे. बॉबने काही मिनीटे अगोदर म्हटलेल्या गाण्यातून हेच तर म्हटलेलं असतंः नथिंग मो‌अर दॅन दिस...दे‌अर्स नथिंग मो‌अर दॅन दिस. बाय द वे, अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये आपलं आयुष्य समूळ बदलून टाकण्याची शक्ती असते का?


शार्लट बॉबमध्ये सेक्शु‌अली इंटरेस्टेड आहे किंवा नाही याबद्दल विचार केला तर आहेही आणि नाहीही अशी दोन उत्तरं मिळतात. तिला त्याबद्दल स्वतःहून काही करायचं नाहिये, पण आपसूक झालं तर नक्की हवंय असं वाटत राहतं. बॉबच्या रूममध्ये ’ला डोल्चे व्हिता’ पाहाताना ती दोघं त्याच्या पलंगावर बाजूबाजूला पडून बोलत असतात, तेव्हा शार्लट तिच्या परीने, तिच्या मर्यादेत राहून, आपण इनिशि‌एटिव्ह घेतलाय असं नको वाटायला इतपत त्याच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करते. त्यावर बॉबने दिलेला प्रतिसाद एकाचवेळी अतिशय संयत, सुंदर आणि त्याचवेळी इरॉटिक आहे. त्यांच्यात तोपर्यंत घडणारा तो तितकाच शारीर स्पर्श! तो तिच्या उघड्या पावलांवर हलकेच हात ठेवतो, त्यांना थोपटतो आणि म्हणतो, नाही, तू काही इतकी होपलेस नाहिस काही! ऑssss!


त्यांच्यात तो ताण जरूर आहे, अगदी आहेच आहे! तो नसता तर मग, बॉब एका ला‌ऊंज सिंगर बा‌ईसोबत एक रात्र घालवतो तेव्हा सकाळी दारावर आलेल्या शार्लटला बाहेरच्या बाहेर घालवून देण्याचा प्रयत्न करणारा बॉब अपराधी का वाटतो? केवळ एक आठवडा सोबत असणार हे माहित असलेला बॉब कोणत्या बा‌ईसोबत झोपला काय, किंवा नाही झोपला काय? याचं शार्लटला काय? की तो आपल्यासोबत झोपला नाही आणि तिच्यासोबत झोपला याने तिच्या अहंकाराला ठेच लागलिये? शार्लट अतिशय सुंदर आहे, सुंदर दिसायचा प्रयत्न न करताही सुंदर आहे, मग हा‌ऊ डे‌अर ही चोझ हर ओव्हर मी? असं तिला वाटलं असेल तर त्यात गैर काय आहे? फक्त तिचा तो विचार खूप अप्पलपोटा आहे. त्यानंतर त्यांच्यात थोडासा अबोला, एक विचित्र ताण आणि मग ती कुत्सित वाटू नये अशा कुत्सितपणे बॉबला म्हणते, "ती तुझ्याच वयाची आहे. तुमच्यात बोलण्यासारख्या खूप कॉमन गोष्टी असतील नाही का? तुम्ही पन्नाशीच्या दशकात कसे वाढलात, कदाचित तिने तुझे सत्तरीच्या दशकातले सिनेमे इन्जॉय केले असतील इ." या कुजकट बोलण्यातून तिचा दुखावलेला अभिमानच दिसतो. यात चूक-बरोबर असं नसतं, ती त्या त्या वेळी वाटलेली खरीखुरी भावना असतो आणि ती त्या-त्या वेळी जशी वाटली तशीच खरी असते. या सगळ्याचा विचार करताना ती दोघेही विवाहित आहेत हे ही आपल्याला ठा‌ऊक आहे,  शार्लटचा नवरा तर तिच्यासोबत त्या हॉटेलमध्येच आहे, पण तरीही त्यांच्या त्या भेटीगाठींबद्दल, इंटिमसीबद्दल आपल्याला काही वाटत नाही, आणि वाटलंच तरी त्यांच्या त्या एकटेपणात त्यांना इतकं माफ आहे असंही आपण मनोमन ठरवून टाकलेलं असतं.

शार्लट आणि बॉब एकमेकांसोबत झोपले असते म्हणजे त्यांचे सगळे प्रश्न निमाले असते का? नाही, ते तितकं सोपं नसतं. तुम्ही जितके जवळ येत जाता, नात्यातील गुंतागुंत तितकीच वाढते, त्याने काही समस्या अनाहूतपणे निर्माण झाल्या असत्या इतकं मात्र खरं. त्यांच्यामध्ये सेक्शु‌अल टेन्शन आहे, अलबत, पण त्यांच्यात फक्त ते तितकंच आहे असंही काही नाही.

-

दोन माणसं समहा‌ऊ एकमेकाला भेटतात, एकत्र बांधली जातात याची स्पष्टीकरणं कुठे असतात? सगळ्या गोष्टीत कारणं शोधण्याचा अट्टाहास करता येत नाही. नातं खूप वेळ टिकवून धरलं पक्कं आणि खरं -असंही नसतं. आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी शार्लटच्या तर कधी बॉबच्या भूमिकेत असतो,आपल्या आयुष्यात पण त्या त्या टप्प्यात शार्लट, बॉब येत राहातात, आपल्यात त्यांच्यासारखी कच्ची-पक्की नाती तयार होतात. नात्याला नाव काय असावं याबद्दल खरंच काहीही म्हणणं नाही, फक्त त्या त्या वेळचं ते वाटणं, त्यातलं काहीही न हरवता, त्यात मोड-तोड न होता यथास्थित ज्याच्या-त्याच्या पोहोचावं इतकं मात्र व्हावं!

--

दूर न रह, धुन बँधने दे
मेरे अन्तर की तान,
मन के कान, अरे प्राणों के
अनुपम भोले भान।

रे कहने, सुनने, गुनने
वाले मतवाले यार
भाषा, वाक्य, विराम बिन्दु
सब कुछ तेरा व्यापार;

किन्तु प्रश्न मत बन, सुलझेगा-
क्योंकर सुलझाने से?
जीवन का कागज कोरा मत
रख, तू लिख जाने दे।

-माखनलाल चतुर्वेदी

उत्तररात्र-४

संध्याकाळचे सहा वाजलेले. सोसायटीत सगळीकडे दिवाळीचं वातावरण. पोरांच्या आरड्या-ओरड्याचे, फटाके फोडल्याचे, केपांचे अस्पष्ट आवाज येत आहेत. तो बाल्कनीतल्या कंदिलाकडे पाहात सोफ्यावर स्वस्थ पडला आहे. ती यायला अजून एक-दोन तास तरी अवकाश आहे.

दारावरची बेल वाजते. तो "आलो आलो" करत दार उघडायला धावतो, पाहातो तर काय, दारात ती.

:यो! आज लवकर?

:हो! बॉसला शेंडी लावून लवकर सटकले. तसंही काही काम नव्हतंच फार!

:मला वाटलं अजून काही तीन तास यायची नाहीस.

:हं

:पण, नेहमी चावीने दार उघडून आत येतेस. आज बेल वाजवलीस ती?

:हो! पण आज मला तुझ्या चेह-यावरचे एक्स्प्रेशन पाहायचे होते.

आपण आपल्याही नकळत आनंदाने तोंडभरुन हसतो आहोत हे त्याच्या लक्षात येतं, पण ते इतकं खरं आणि आतबाहेर निवळशंख आहे की ती देखील न राहवून त्याचा गालगुच्चा घेऊन आत जाते.

: (ती आतून) चल ना बाहेर जाऊ जेवायला. घरी काही करायचा कंटाळा आलाय.

:कुठं?

:कुठंही, पण घरी राहायला नको आज, प्लीज.

:ओके. काय खायची इच्छा आहे? लाईट जेवायचंय की पोटभरुन?

:लाईटच खाऊ. एक पिक्चर टाकू आणि मग घरी येताना आईस्क्रीम.

:साऊंड्स गुड!

:आलेच फ्रेश होऊन. तू पण हो ना तयार

:हो, होतो.,

(तो घुटमळतो आणि मनाचा हिय्या करुन म्हणतो..)

:बरं, ऐक ना, उद्या माझे मित्र येतायेत घरी. जेवायला.

आतला आतापर्यंत सुरु असलेला हेअर ड्रायरचा आवाज बंद होतो.. तो टेन्स होऊन भराभर बोलायला लागतो..

:शनिवारेय. अनायासे तुलाही सुट्टी आहे. मी बाहेरुन मागवेन खायला, तुला काही करायचं नाहीये, फक्त घरी असशील ना? त्यांना तुला भेटायचं आहे.

ती बाहेर येते तेव्हा ऑलरेडी हतोत्साह दिसते आहे.

:का?

:काय ते?

:मला का भेटायचं आहे त्यांना?

:मला काय माहित? पण ते कधीपासून मागे लागले होते आणि उद्या तुलाही सुट्टी आहे म्हणून मी म्हटलं..

:मी ज्या माणसांना ओळखतही नाही त्यांना मला भेटायला आणताना तुला एकवार मला विचारावंसं वाटलं नाही? माझी सुट्टी, माझे-आपल्या दोघांचे प्लॅन्स, याला तुझ्यालेखी काहीच महत्त्व नाही.

:तुला विचारलं तर तू नाही म्हणणार

:येस्स ऍंड फॉर अ गुड रीझन!

:हे बघ,,

:नाही, माझं ऐक! मी माझ्या फावल्या वेळात माझ्या, आपल्या आवडीच्या चार गोष्टी करायच्या सोडून चार अनोळखी माणसांना हाय, हेलो करावं, त्यांना एन्टरटेन करावं अशी अपेक्षा तू माझ्याकडून करणं हे खूप अनफेअर आहे.

:अनफेअर? इतकी अपेक्षा करण्याचा हक्कही नाही का मला?

:ही अपेक्षा तू का ठेवावीस असं वाटतं तुला?

:वी लिव्ह टूगेदर डॅम इट!

:येस, आय नो दॅट.. सो?

(तो अविश्वासाने तिच्याकडे पाहात राहातो)

:आय डोण्ट बिलीव्ह यू.

:गैरसमज नको. आपण बोलतोच आहोत तर पुन्हा एकदा सांगते, तुला, म्हणजे यू इन पर्सन, माझ्याकडून अपेक्षा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण व्हाया तू येणा-या कोणत्याही व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात भस्सकन पाय ठेवू देणार नाही.

:यू आर मेकींग अ बिग डील. लाईक एव्हरीटाईम!

:ऍंड लाईक एव्हरीटाईम, यू आर गिव्हींग मी अ चान्स टू मेक वन.

:मग आपण दोघंच राहायचं का? एकटेच? कोणी येणं नको, जाणं नको, मित्र नको, कोणी नको..

:तू काय बोलतो आहेस? आपल्याला मित्र नाहीत का? ते इथं येत नाहीत का? केवढा मोठा गोतावळा आहे आपला?

:मित्र नाहीत पण इतर माणसं?

:का? त्या इतर माणसांनी का यायला हवंय?

:---

:तुला नेमकं काय प्रूव्ह करायचंय त्यांना इथे आणून? मला बळंच त्यांच्यासमोर उभं करुन?

:--

:बरं ती माणसं उद्या येणार, म्हणजे मी त्यांच्याशी चार शब्द हसून बोलावेत, त्यांची सरबराई करावी अशी अपेक्षा असेल ना तुझी?

:मी असं कुठे म्हटलं?

:मग मी काहीही न बोलता नुसती ठोंब्यासारखी बसून राहिले तर चालणारे तुला?

(तो गप्प)

:नाही, नाही चालणार तुला. जॉयची पार्टनर कशी फाटक्या तोंडाची, कजाग आहे हेच पाहायचं असतं तुझ्या कलीग्सना, आणि मला कधीकधी वाटतं की तुलाही तेच मिरवायचं असतं.  माझी मैत्रीण किती वेगळी आणि नामशेष होत चाललेल्या वर्गवारीतला प्राणी आहे, माझी मैत्रीण कशी कोणाला बोलण्यात कोणीही हार जाणार नाही हे दाखवलं म्हणजे तुझा आत्मा तृप्त!

:व्हॉट अ जोक!

:गुड! असं नाही ना? मग कॅन्सल करुन टाक! सांग, मला बाहेर जायला लागलं म्हणून..

:--

:काय झालं?

:--

(घसा खाकरत, थोडा घुटमळत)

:वेल, हे खरंय, की आयॅम टू प्राऊड टू हॅव यू, आणि कधीकधी मला ते माझ्याही नकळत मिरवावंसं वाटतं, आणि सिन्सियरली स्पीकींग, मला नाही वाटत की त्यात काही वाईट आहे म्हणून, फक्त त्यांना बोलावण्याआधी मी तुला विचारायला हवं होतं हे मी मान्य करतो.

(ती त्याच्याकडे एकटक पाहते आहे..)

:पण, उद्याचं जमव प्लीज, मी तुझ्या नावाचा इतका बिगुल वाजवतो आणि त्यात मी त्यांना हो म्हणून बसलोय. तू ऑफिसमधल्या फंक्शन्सनाही येत नाहीस, त्यामुळे त्यांना भेटता आलेलं नाही तुला. ती चांगली लोकं आहेत गं.. आता नाही सांगायचं बरं वाटत नाही.

(ती सुस्कारते, पण दुस-याच क्षणी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणते..)

:ठिकेय.. त्याने तुला बरं वाटणार असेल तर तसं..फक्त माझं एक काम कर..

(ती पर्समधून एक कागद काढून त्याच्या हातात ठेवते.)

:मी दोन दिवस सुट्टी म्हणजे सुट्टी म्हणून लॅपटॉपही ऑफिसमध्ये ठेवून आले, एव्हढं एक काम कर माझं. हे कॅन्सल कर.

:काये हे?

:वीकेण्ड गेटवे फॉर टू. ब-याच दिवसांनी माझी आणि तुझी सुट्टी जोडून आली म्हणून मी रिझर्व्हेशन केलं होतं. तिथं जाऊन पेमेण्टची कटकट नको म्हणून पूर्ण पेमेण्ट केलं होतं उद्या पहाटे निघून नऊ पर्यंत पोहोचलो असतो, त्यानंतर दोन दिवस तिथेच राहून सोमवारी सकाळी आलो असतो. पण ठिकेय, नंतर केव्हातरी जाऊ, काय?  दोन मिनीटांचं काम आहे, कर तितकं! किमान थोडातरी रिफण्ड मिळेल.

(तो हातातल्या कागदाकडे एकटक पाहातोआहे)

:ओये! काय विचार करतोयेस? तयारी कर. मी येते तयार होऊन.

(आणि ती आत निघून जाते..)

:काय करुयात? गाडी काढूयात की पायीच जाऊयात? सिनेप्लेक्सलाच पाहूयात ना पिक्चर?

तिची आतून बडबड सुरु आहे आणि तो अजूनही हातातल्या कागदाकडे पाहात चूपचाप उभा आहे.

नंतरच्या जागभरल्या उत्तररात्रीचे पडघम एव्हानाच वाजलेले आहेत.

--

उत्तररात्र-१ उत्तररात्र-२उत्तररात्र-३