उत्तररात्र- २

-ए..

-..

-झोपलियेस का?

..

(तिला गदागदा हलवतो)
-SSS

-(तिला झोप लागलिये, पण गदागदा हलवण्याने दचकून उठते. काय चाललंय हे न कळल्यासारखी डोळ्यांची उघडझाप. आपण स्वप्नात नाही हे कळल्यावर डोळे गच्च मिटून खोल श्वास घेते आणि कूस बदलून त्याच्याकडे वळते) हं?

-मी विचारलं झोपलियेस का?

-तुझ्या या प्रश्नाला काहीतरी अर्थ आहे का?

-तुला नीट उत्तर देताच येत नाही का?

-एकदा हाक मारल्यानंतर माणूस ’ओ’ देत नाही तेव्हा तो झोपलाय हे तुला समजत नाही का?

-..

-बोल आता.

-..

-काय झालंय?

-काही नाही.

-हे बघ, आता मला झोपेतून उठवलंच आहेस तर बोल पटापट.

-..(मांडीवर उशी घेऊन हुप्प बसला आहे)

-(सुस्कारा सोडून) ठिकेय. मर्जी तुझी. मी थकलेय.. झोपतेय.

(ती कूस वळवून झोपणार इतक्यातच)
-मी तुला मघाशी किती कॉल केले. उचलले का नाहीस?

-(काहीही न कळल्यासारखी पाहात राहाते) अं? अरे, मी कलीग्जबरोबर डिनर घेत होते. फोन सायलण्टवर होता. मिस्ड कॉल पाहिले तेव्हा घरी येऊन पोहोचले होते. रात्रीचे 12.30 वाजतायेत अरे...ही काय यावर बोलण्याची वेळ आहे का?

-तू म्हणालीस बोल म्हणून बोललो.

-ते असलं वेडगळ काहीतरी असेल हे थोडीच माहित होतं मला?

-रात्रीचे 11 वाजत आले होते, मला तुझी चिंता वाटत होती हे वेडगळ का? आनंद आहे.

-मी उशीर होणार सांगीतलं होतं तुला. आणि काय रे, मी याआधी याहून उशीरा आलेय. तेव्हा तू छान जेवून बिवून तोंड उघडं टाकून झोपलेला असायचास. आताच तुला माझी इतकी चिंता का वाटायला लागलिये बरं?

-उं?

-नाही, म्हणजे, कॉल्सना उत्तर दिलं नाही म्हणून अस्वस्थ होण्या-यातला तू नाहीस. ते सोड, असे सारखे सारखे कॉल करण्या-यातला पण तू नाहीस. 

-(कान तिच्याकडे, मान खाली, बोटं एकमेकांमध्ये गच्च खुपसलेली)

-(ती उठून बसते आणि डोळे बारीक करुन त्याच्याकडे निरखून बघते. त्यानंतर अचानक काहीतरी समजल्यासारखी)नाऊ आय थिंक ऑफ इट..गेल्या दोन महिन्यांपासून तुझे हे असले काहीतरी वेडगळ प्रकार चालू आहेत.

-(थेट आरोपाने गडबडून)अं?

-तू मला ऑफिसला भेटायला काय यायला लागलायेस, मी बाहेर असताना फोन काय करायला लागलायेस, हा सगळा कार्यक्रम गेल्या दोन महिन्यांपासून चालूये, बरोबर बोलतेय ना मी?

-(तिला इतक्या लवकर या प्रकाराचा बोध होईल याची अजिबात कल्पना नसल्याने उत्तराची तयारी करुन ठेवलेली नाही. उसन्या अवसानाने) तुला काय म्हणायचंय?

-(तिच्या चेह-यावरचे त्रासिक भाव आता हळूहळू स्मितहास्यात बदलायला लागलेय) तुला चांगलंच माहित आहे मला काय म्हणायचंय ते.

-नाही..आय डोण्ट नो व्हॉट आर यू टॉकींग अबाऊट.

-तू इंग्लिशमध्ये सुरु झालास की तू काहीतरी लपवतोयेस हे मला लगेच समजतं हे तुला अजून ठाऊक नाही? सिरीयसली?

-..(तो गप्प)

-अरे सांग ना.. बोलशील तर कळेल ना मला.

-उम्म्....

-(ती धाडकन्)केतन आम्हाला जॉईन झाल्यापासून तुला माझी अचानक चिंता वाटायला लागलिये.. खरं ना?

-..(चेह-यावर धक्का स्पष्ट दिसतोय)

-सांग ना, तू माझ्या सगळ्या पुरुष सहका-यांना ओळखतोस, मी त्यांच्यासोबत कितीदा डिनरला गेलेय, पण तेव्हा तू असे कॉल केले नव्हतेस, तेव्हा तुला असं अपरात्री प्रश्नोत्तरांचं सेशन घेण्याचं ऑब्सेशन नव्हतं. पण, गेल्या दोन महिन्यात दर पंधरवड्याला हा कार्यक्रम होतोय. नक्की काय चाललंय?

-..

-बरं. सोड, आय विल कट द चेझ. मला सांग.. आर यू जलस ऑफ केतन?

-अं..?

-आर यू?

-(मनाचा हिय्या करुन आणि मग सुस्कारा सोडून) हो.

-(तिने विनोदाने विचारलं होतं, पण ते खरं आहे हे कळून धक्का बसलेला)काय?

-हो, मला केतनचा मत्सर वाटतो.

(त्याच्याकडे दोन क्षण निरखून पाहाते. कन्फेशन मोडमध्ये तो इतका विनोदी आणि गोड दिसतोय की तिला गदगदून हसायलाच यायला लागतं)

-(प्रचंड भडकून) हसण्यासारखं काये त्यात?

-(अजून हसतेच आहे) मला हसू का रडू हे कळत नव्हतं, पण हा प्रकार इतका वेडगळ आहे की मला हसायलाच आलं.

-काय, काय वेडगळ आहे त्यात?

-मी कायम, अष्टौप्रहर तुझे गुणगान गात फिरत असते ज्याच्या-त्याच्यासमोर, तू असा आणि तू तसा करत. आणि तू ..खाता-पिता कसला रे मत्सर वाटतो तुला?

-तुझ्याशी बोलून फायदा नाही. सोड, मी काही बोललो हे विसरुन जा. झोप तू.
(झोपायच्या तयारीत)

-अरे? असं कसं, असं कसं? सांग ना! मी गेल्या कित्येक दिवसांमध्ये इतकं हसलेले नाही. उठ!

-(उठून बसत, रागात) का? तुझा कट्टया जोक्स सांगून हसवत नाही का तुला?

-(हसण्याची पुन्हा एक उबळ येते) हो! सांगतो ना, पण काये, त्याचा चेहरा तुझ्याइतका विनोदी नाहीये, त्यामुळे तो पंच येत नाही.

-मला तो अजिबात आवडत नाही. आपण भेटलो की नेहमी आम्ही हे केलेलं, ते केलेलं सांगत बसतो.

-अरे तो खूप जुना मित्र आहे माझा. आम्ही माँटेसरीपासून नववीपर्यंत एकत्र होतो. त्यानंतर तो दिल्लीला गेला. आता तो परत आलाय, माझ्याच फिल्डमध्ये, माझ्याच कंपनीमध्ये आहे, आम्ही पुन्हा एकदा छान मित्र झालो आहोत. याउप्पर काही नाही. केतनवरुन इतकं अस्वस्थ होण्याचं तुला काही कारण नाही हे मी तुला सांगतेय, इतकं बस्स नाही का तुला? माझ्यावर इतका पण विश्वास नाही का?

-नाही, कारण ते नाहीये..

-मग? त्याला सांगू का की तुझ्यासमोर शाळेतलं काही बोलत जाऊ नकोस म्हणून?

-नाही, तसं नाही.

-मग तू तोंड उचकटून जरा सांग ना तुला काय खुपतंय ते.

-इतकंच की..

-काय?

-त्याच्याकडे तुझ्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्याकडे नाहीत. आणि त्या इतक्या आहेत की आय फील लॉस्ट.

-..

-केतनला जी तू ठाऊक आहेस ती मला ठाऊक नाहीस. तुझ्या आयुष्यातला तो कप्पा माझ्याकरिता नेहमीच अनोळखी राहणार. आणि त्या कट्टयाला लहानपणीची तू ही माहितियेस आणि आताची तू पण माहितियेस.

-..

-तुम्ही कंपनीत भेटता, बोलता, कधीकधी एकत्र डिनर घेता, तो तुला सोडायलाही येतो. आय डोण्ट माईंड दॅट, रिअली! मी तुझ्यावर संशयही घेत नाहीये.

-हो! ते मला माहि..

-पूर्ण ऐकून घे. माझा तुझ्यावर संशयही नाही, आणि तो कधी येणारही नाही. मला तुझ्याबद्दल 100 टक्के खात्री आहे. पण, आपण हे असे. रात्रीचे आणि वीकेण्ड्सना एकमेकांना भेटणार. त्यातही कधी तू उशीरा येतेस, कधी मी उशीरा येतो. केतनचं बोलणं ऐकल्यावर मी फक्त तू-मी असलेल्या आठवणी आठवायला सुरुवात केली आणि माझ्याकडे तुझ्या इतक्या कमी आठवणी आहेत की तो विचार केल्यावर मला भीतीच वाटली.

-कसली? नेमकी कसली भीती वाटली तुला?

-की आपल्याला एकमेकांसोबत न राहण्याचीच सवय तर नाही ना होऊन जाणार?

-..

-आणि मला ते नकोय. तो विचारही मला नकोसा वाटतो. खरंच.

-..

-तुझ्या-माझ्या ज्या काही आठवणी आहेत, त्या माझ्याकरिता प्रीश्यस आहेत. पण, या सिनारीयोमध्ये केतन आल्यानंतर आल्यानंतर मला त्या जास्त असायला हव्यात असं सारखं वाटायला लागलं. मनातल्या मनात कायम त्याच्याशी स्पर्धा सुरु झाली. मी खूप पथेटिक आहे, हो नं?

-नाही. काहीतरी बोलू नकोस.

-मग? बोल ना काहीतरी. 

-मला काय बोलावं तेच सुचत नाहीये. तू असा पण विचार करत असशील असं कधी डोक्यातच नाही आलं माझ्या. तू माझ्यापेक्षा खूप जास्त सिक्युअर इसम आहेस असंच वाटायचं मला. 

-वेल, मी नाहीये. मला भीती वाटतेय. तुला नाही का असं वाटलं कधी? आपण जास्त वेळ घालवावा, आपल्याकडे जास्तीत जास्त आठवणी असाव्यात असं? शेवटी आपण कोण आहोत हे त्यांच्यावरुनच ठरतं नं?

-..

-काय गं?

-नाहीआपण नेसेसरिली आपल्या आठवणींवरुन डिफ़ाईन होतो असं नाही वाटत मला.

-ओह!

-आणि तू हे जे आठवणींबद्दल बोलतो आहेस तसं मला नाही वाटलं कधी. वाटलंच तरी ते शक्य होईल की नाही याबद्दल मला शंकाच वाटते. 

-(तो गप्प)

-पण तू म्हणतोयेस त्या, म्हणजे एकमेकांसोबत कमी वेळ घालवतो, त्या सिनारीयोमध्येही आपल्यात जे काही आहे.. वेल, कसं सांगू, वुई डोण्ट फिट पर्फेक्टली, मे बी- बट, वुई फिट वेल इनफ. त्यामुळे, मी आपल्या बाबतीत खूप निर्धास्त आहे; आणि निर्धास्त असल्यामुळे मला या गोष्टीची चिंता कधी वाटली नाही, ऑनेस्टली!

-आय सी!

-हो. मला आपल्या आठवणींपेक्षा आपल्यात ही जी सॉलिड कम्फ़र्ट लेवल आहे ना ती खूप आवडते. मी तुझ्यासोबत आहे याचं कारण ते आहे.

-मस्ट बी नाईस! असं नेमकं माहित असणं आणि निर्धास्त होता येणं.

-वेल! मी ऑसम आहे हे तुला माहित नाही का?

-हो! ते बाकी खरंय.

-आता मात्र मी खरंच झोपते. आपण उद्या बोलू, हाफडे टाकेन उद्या. एकत्रच निघू.

-ओके!

(दोघेही झोपतात, दिवा मालवतो)
(एक दोन मिनीटं मिट्ट अंधार, पुन्हा दिवा चालू होतो)
-

-..

-sss

-(झोपाळलेल्या स्वरात)आता काये?

-आपण एकत्र, छान, ग्रेसफुली, आनंदात म्हातारे होऊ शकू का गं? तोपर्यंत माझ्यासोबत राहशील का?

-(चादर डोक्यावरुन घेत) हे रात्री अपरात्री बोलण्याचं ऑब्सेशन कमी केलंस तर बघू बाबा.

-ओके देन, आय वुईल ट्राय माय बेस्ट!

-..

-ए..

-..

-आपल्यात आता जे काही बोलणं झालं, ती पुढे जाऊन चांगली आठवण बनेल, नाही का? तुला काय वाटतं?

-..

-काय गं?

-..

-झोपली वाटतं. 
(तो दिवा घालवतो आणि दुस-याच क्षणी झोपी जातो. भिंतीवरचं घड्याळ आपली ताणलेली स्प्रिंग मोकळी करतं. आता पटापटा वाजू द्यायला हरकत नसते)

--


8 comments:

Nikhil Sheth said...

Mast

सोनाली नवांगुळ said...

मस्तच श्रद्धा...
खरंच, कधीकधी एखाद्या नात्यात का असुरक्षित वाटतं आणि कधीकधी का सुरक्षित वाटतं याचा तसा फारसा विचार मनाशी झालेला नव्हता... तू छान लिहिलंहेस. आपण मोठे होत जातो तसे किती माणसांना भेटतो, नवी नाती तयार होतात...कित्येक जुन्यांना वर्षानुवर्ष भेटत पण नाही, मात्र कधीतरी अचानकच एखादी अशी आठवण वर येते की जी आठवण आपल्याला आहे याचंच नवल वाटायला लागतं.
तू इतकं मनातलं लिहू शकतेस, तेही इतक्या कमी शब्दात, मत्सर वाटतो तुझ्याविषयी आणि प्रेमपण बहुतेक!

Shraddha Bhowad said...

निखिल,
’अल्पाक्षर रमणीयते’बद्दल पुन्हा एकदा थॅंक्स! :)

सोनाली,

बहुतेकांना माझ्याबद्दल निव्वळ कुतूहल वाटतं. आता उद्या पुण्याच्या जिजामाता उद्यानात कोआला बेअर आणून बसवलं तर बघणारा त्याच्याकडे कसा पाहिल तसं. त्या तुलनेत तुझ्या माझ्याबद्दल वाटणा-या बहुतेक, इम्प्रोबेबल प्रेमाबद्दल देखील मी खरंच खूप आभारी आहे. :)
बाकी नात्यांमध्ये ’कभी तुम नहीं थे, कभी हम नही थे’ करत ते चार पल गाठीशी जमा करण्याचाच प्रयत्न असतो. कोणी ती पुंजी जमवतो, तर कोणी.. वेल!
असो, छान वाटलं तुझी कमेण्ट वाचून.

-श्रद्धा

Ashwini said...

Its awesome....mast understanding ahe

Shraddha Bhowad said...

अश्विनी, ते जे काही आहे ते आवडलं याचा आनंद वाटला.

Yasmine said...

Shraddha, chhan! I enjoy reading your replies to comments too! :)

Shraddha Bhowad said...

लेमॉस मॅम,
रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. कमेण्ट्सना उत्तर द्यायला वेळ काढला गेलाच पाहिजे आणि त्याकरता कोणतेही एक्सक्युज दिले गेले नाही पाहिजे.
तुम्ही इतक्या कौतुकाने वाचता, आवडल्याचं कळवता तेव्हा मला मनाने पुन्हा एकदा व्हीसेटमध्ये गेल्यासारखं वाटतं. फ़नी! मला त्या त्या काळामध्ये जाता येतील अशी टाईम पोर्टल्स तयार करता आली तर मी पुन्हा एकदा सी.एसच्या तासांना बसेन.
पुन्हा रिप्लाय करायाल उशीर होणार नाही याची काळजी घेईन.
सध्या बाय,

श्रद्धा

Yasmine said...

श्रद्धा, किती गं छान लिहिणे सुचते तुला … सी.एस तूच मला आता शिकवावं असं वाटतं!

 
Designed by Lena