ड्रेक्सलर म्हणे!

आपल्याला जे माणूस भावत नाही त्याच्यासोबत कधीच प्रवासाला जा‌ऊ नये असे म्हणतात. सकाळच्या कॉफीसोबत दीर्घ श्वास घे‌ऊन स्वतःलाच शांत राहा असं बजावायला लागतं आणि कॉफीच्या घोटासोबत अजून बरंच काही कडूजहर गिळावं लागतं.

मग याच्या अगदी उलट, आपल्याला एखादं माणूस भावत नाही, पण त्याला आपण भावत असू तर त्याचा प्रवास आपल्या प्रवासापेक्षा नक्की कोणत्या प्रकारे वेगळा असतो?

मग आपल्याला जे माणूस भावतं त्याच्यासोबत केलेल्या प्रवासात काय होतं?

माझ्या समजण्याची मर्यादा माझ्या अनुभवापुरता मर्यादित आहे. ती त्यापलीकडे जा‌ऊच शकत नाही, बहुतेक म्हणूनच मला या प्रश्नांची उत्तरं देता येत नसावीत.

तुम्हाला ज्या माणसासोबत प्रवास करायची इच्छा आहे त्या माणसाला फक्त प्रवासावर बोलायला आवडतं असं कधी झालं आहे का? त्याबद्दल आपल्याला काही करता ये‌ऊ नये यातून वाटणारा अगतिकपणा कधी अनुभवला आहे का? छातीत दुखतं खूप, घसा सारखा दाटून येतो. अशा वेळी काय करायचं?

रिसेट व्हायचं.
एक शांत झोप काढायची. स्लीप इट ऑफ.. ब्रेस यु‌अरसेल्फ...दिस टू शॅल पास म्हणत स्वतःला धीर द्यायचा.

ड्रेक्सलर म्हणतो तसं-
क्रे‌ओ के विस्तो ला लुझ
आल ओत्रो लादो देल रियो..

तिथे त्या नदीच्या पल्याड
प्रकाश दिस्तोयसा वाटतंय..

असं म्हणत!
लॉलिपॉपची लालूच दाखवून एखाद्या लहान मुलाला शाळेत ने‌ऊन बसवावं तसं त्या दिस्तोयसा वाटणा-या प्रकाशाच्या आशेने आयुष्य ओढत राहायचं.

..
. .
प्रवास क्रूर असतो. तो तुम्हाला पूर्णपणे अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकायला भाग पाडतो, काहीतरी नेमकं माहित असण्यातली आश्वस्तता सोडून द्यायला लावतो. हवा, झोप, समुद्र, आकाश, पायाखालची जमीन आणि परक्या भूमीवरची परकी स्वप्नं ही फक्त तुमची असतात, बाकी तुमचं असं काहीही नसतं.

पण असंच असायला हवंय असं थोडीच आहे? तुमच्यासोबतचा माणूस तुमचा मित्र जरी असेल, तुम्हाला त्याचा रक्तगट, उंची, नाव-आडनाव-मूळगाव, सांप्रत-निस्तरलेली लफडी हे सगळं सगळं जरी माहित असेल तरी तुम्ही त्याला शेवटपर्यंत परकं ठेवू शकता. एक परका माणूस जो आपला मित्र आहे. मग असं असेल तर कोणीच परकं नसेल, अगदी परकी व्यक्ती देखील! माझे आजचे मित्र मला भेटण्या‌आधी परकेच होते. मग परक्या गावामध्ये मला भेटलेला परका माणूस मला आजपावेतो न भेटलेला मित्र असू शकेल नाही का? हे मला आधी का नाही सुचलं? का नाही कळलं? आधीच कळलं असतं तर केवळ मनासारखी कंपनी हवी म्हणून टाळलेले कित्येक सोलो प्रवास करता आले असते. परक्या गावात, परक्या जागेत, अनोळखी वासाच्या खोलीत आपल्या शरीराची वळणं माहित नसलेल्या गादीवर, झोपेत कधीतरी डोक्याच्या खालून काढून बाजूला टाकून दिलेल्या बिनवासाच्या उशीच्या सोबतीने एकट्यानेच जाग येणं यातही खूप थ्रिल असतं.

मला अगदीच खूप वैताग आला, आणि तो एक-दोन महिन्यांनी हटकून येतोच, की मी कुठेतरी निघूनच जाते. ओळखीच्या गाडीत बसून अनोळखी स्टेशनवर उतरते. शहर भावलंच तर मुक्काम, नाहीतर गाडीत बसून पुन्हा एकदा पुढच्या शहराला निघायचं!

आपण खूप वर्ष एकाच जागी राहिलो की लवकर म्हातारे होतो म्हणे! माझ्यासाठी प्रवास हा रपुन्झलच्या सोनेरी, जादूने भारलेल्या केसांसारखा असतो. जून झालेली गॉथल नाही का रपुंझलच्या केसांनी स्वतःला तरुण करुन घेते तसं मी माझं जुनं व्हर्जन त्या नव्या जागी सोडून येते. एखादं मोठं झाड पाहून त्याच्या मुळाशी पुरलेल्या टा‌ईम कॅप्सूलसारखं. मोरियार्टी म्हणतो तसं आपल्या आसपासची धूळ ही आपल्या जून झालेल्या शरीरातून जन्मलेली धूळ असते. अशा कित्येक परक्या गावांच्या पायवाटांवर, कट्टयांवर, झाडांच्या पायथ्यांशी, समुद्राकिना-यावरल्या रेतीवर माझ्या जून, जीर्णशीर्ण शरीराची धूळ पडून आहे.

आपण का कुठेतरी निघून जातो? आपण जिथून वैतागून जायला निघतो त्या प्रचंड बो‌अरींग जागी परतायचे बेत वगैरे नसले तरी परतायची ओढ प्रत्येकालाच असते, नाही का? आपण परतणार आहोत ती जागा आपल्याला नव्या नजरेतून पाहाता यावी, लोकांना नव्या ला‌ईटमध्ये पाहाता यावं याकरता कुठल्यातरी नव्या जागी जायला लागतं. आपण जिथून सुरुवात केली तिथे परत येणं आणि सुरुवातीची जागा कधीच न सोडणं यात खूप फरक आहे.

भटक्या जमातीचे लोक रोज रात्री झाडापाशी आपले उंट बांधून ठेवतात आणि सकाळी सोडून देतात. पण ते उंट पळून जात नाही. त्यांना त्या खुंटीला बांधल्याचं नीटच आठवत असतं, त्यामुळे ते रात्री गपगुमान त्या खुंटीपाशी परततात. आपली सध्याची जागा, कितीही वैताग देणारी असली तरी त्या खुंटीसारखीच असते का? त्या उंटांसारखीच आपल्याला बांधून ठेवते का? त्या उंटांसारखी आपल्यालाही आपण परतणार आहोत ती जागा म्हणजे रेफ्यूज वाटतो का? मग मला नक्की बरं कशाने वाटतं? मी नक्की रेफ्यूज कशात शोधते? नव्या जागेमध्ये की नव्या जागेवरुन परतल्यावर ओळखीच्या, सवयीच्या आणि म्हणून अधिक आपल्या वाटणा-या जागेमध्ये?

कितीही काहीही हो‌ऊ देत, हाती घेतलेल्या कामाचा बोजवारा उडू देत, मित्र-मैत्रिणी कायमच्या तुटू देत, ब्रेक-अप्स हो‌ऊ देत, जवळच्या माणसांनीच गळे आवळू देत- आपण काही वेळ धो-धो रडतो, अश्रूंनी उशा भिजवतो, खाणं-पिणं सोडतो, चॉकलेटं खातो, वजन वाढवतो, मग वजन कमी करायचं म्हणून जिम लावतो, योगासनं विपश्यना करतो, हे‌अरकट करतो, आणि कालांतराने आपल्या आयुष्याच्या तुटक्या कपच्या गोळा करुन चालायलाही लागतो
आपल्याला भूकही लागते..
आपण खदखदून हसतो देखील..
आपल्याला चांगली माणसंही भेटतात..

मोठ्ठा दगड पार डोंगरमाथ्यावर ने‌ऊन ठेवावा आणि तो पुन्हा घरंगळत खाली येताना पाहायला लागण-या, पण आपसूकपणे खाली ये‌ऊन तो पुन्हा वर नेण्याच्या खटाटोपात दंग होणा-या शापित सिसिफससारखे आपण आपले जगत राहातो.

सोब्रे तोदो क्रे‌ओ के
नो तोदो एस्ता पेर्दिदो

काही नाही तरी मला इतकं नक्कीच ठा‌ऊक आहे की,
सगळं संपलेलं नाहीये. मी आहे.

सिसिफसला असं जगत राहाण्याचा शाप होता. माझं काय?

तान्ता लाग्रिमा तान्ता लाग्रिमा इ यो
सॉय उन वासो वासियो

इतकी सारी दुःखं, इतके सारे आसू आहेत
पण मी आपला रिकाम्या घड्यासारखाच!

आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, काहीतरी मिळवू पाहतो, काहीतरी आपलं करायच्या खटाटोपात असतो, त्यातून नक्की काय मिळतं आपल्याला? आनंद? दुःख? नाह़ी. कालांतराने ते वाटणंही जीर्णशीर्ण होतं, कापरासारखं उडून जातं.  मग ज्यातून काहीच मिळणार नसतं ते आपल्यापाशीच असू द्यावं, ते कोणाला सांगत बसू नय़े, सांगायला जा‌ऊ नये.  बाकी सर्व असतंच की इतरांसाठ़ी!
हे स्वतःला शंभरदा बजावून सांगीतलं तरी डोक्यात घुसत नाही.

आपण हे असं जगून घेतलेलं आयुष्य म्हणजे आपल्याकरता वास्तव असतं.  दुस-या कोणाचं वास्तव आपलं वास्तव बनू शकत नाही, ते आपण कमावलेलं, भोगलेलं, आपलं -आपलंच प्रोप्रायटरी मेस्ड-अप आयुष्य असायला लागतं. अशी खूप प्रकारची इम्पर्फेक्शन्स जमा केली की आपल्याला आपोआप एका विशिष्ट प्रकारचं पर्फेक्शन कळायला लागतं.

तुम्ही मोठे होत जाता तशी तुमची तत्वं बदलत जातात, ती धुळीला मिळतात, त्यांची राख राख होते. आपल्याला ते आयुष्य मागे टाकून दुसरं आयुष्य सुरू करावं लागतं, किंबहुना त्याच राखेतून पुन्हा उभं करायला लागतं.

हे आयुष्य पुन्हा नव्याने उभं करणं वगैरे ऑलरा‌ईट, पण इतकं सगळं भोगून, सहन करुन आपल्या खूप आतमध्ये काहीतरी बदललेलं असत़ं. बल्ब पेटल्यावर फिलामेंट पेटते तेव्हा कशी चमक दिसते? पहिल्यापहिल्यांदा आपल्या डोळ्यांमध्ये तशी चमक असायची.. आता ती तिथे नाह़ी. गेल्या शंभर वादळांमध्ये ती थोडी थोडी करत विझून गेली. पण ते चालायचंच!

ऑयगो उना वोझ के मे यामा
कासि उन सुस्पिरो..
रेमा
रेमा
रेमा....

कोणीतरी मला हाकारतंय..
अगदी दूरवरुन येतेय ती साद..
चालत राहा
चालत राहा
आणि असाच चालत राहा

आपलं आयुष्य पॉ‌ईंट ऑफ रेफरन्सने चालतं असं मला वाटतं.
मी ’अ’ जागेवरुन ’ब’ जागेवर ये‌ऊन पोहोचले
मी”एक्स’वरुन ’वाय’ झालो.
मी असा होतो तो असा झालो
पाँईंट ऑफ रेफरन्स असला की एकप्रकारची आश्वस्तता येते, आपण कुठेतरी चाललोय याचा अॅश्युरन्स मिळतो.

प्रवास यापेक्षा वेगळा असतो?
नाही, आय गेस!

--

आपण संपूर्ण परक्या माणसाशीच मनातलं बोलू शकतो असं मी वाचलं होतं. टोकियोतल्या त्या तुतानखामेनच्या थडग्यासारख्या भासणा-या पार्क हयातच्या बार का‌उंटरवर बॉब शार्लटला भेटतो तसं मलाही कोणीतरी भेटावं, आपण त्याच्याशी तोंड फाटेस्तोवर बोलावं, कोणी कोणाला जज न करता, केलं तर कसं केलं याची जाम पर्वा न करता एकमेकांचं नावही न विचारता चालू पडावं ही माझी लाडकी फँटसी! पण मला ते जमत नाही. मला संभाषणं सेशनसारखी असावी असं मनापासून वाटतं. त्या सेशनमध्ये बोलणं झालं, मनातून सगळं वाहून गेलं की त्याच्या खुणा पुन्हा मिनिट्सच्या रुपात डोक्यात रुतून न बसता कायमच्या नाहिशा हो‌ऊन जाव्यात, सायबर कॅफेमध्ये आपलं इंटरनेट सेशन संपल्यानंतर आपण जे काही केलं ते आपो‌आप पुसून जातं तसं. कोणाकोणाला संभाषणांचे ट्रेल्स ठेवायला आवडतात, पण मला नाही आवडत. पण ते माझ्याही नकळत माझ्या डोक्यात घट्ट रुतून बसतात. माझी स्मरणशक्ती टॅग्सवर चालते. आपण ’य’ ठिकाणी होतो तेव्हा आपली मनस्थिती काय होती? आपण कुठले कपडे घातले होते? मी या या हॉटेलच्या रेस्टॉरण्टमध्ये बसून या या विषयावर हे हे बोलले होते.. असे कोणत्या ना कोणत्या टॅगखाली फा‌ईल झालेले संदर्भ आणि त्यांची स्पष्टीकरणं माझ्या डोक्यातल्या अडगळीत पडून आहेत, त्याचं मीं काय करावं? हे इतके संदर्भ, हे इतके सारे बुकमार्क्स, इतकी सारी लोकं, इतके सारे शब्द, त्यांचे अर्थ घे‌ऊन जगणं किती अवघड आहे याची थोडीतरी कल्पना कोणाला ये‌ऊ शकेल काय? फिनिक्स राखेतून उठतो तेव्हा त्याला आधीच्या लक्ष लक्ष जन्मातल्या आठवणी असतात का? का तोही सिसिफससारखा रिसेट हो‌ऊन येतो? आणि रिसेट हो‌ऊन येत नसेल तर how does he deal with that many memories?

कधीकधी नाही का असं होत की, आपण खूप चालून आलेलो असतो, खूप दमलेलो असतो, आता काही करायला नको, दोन क्षण थांबून स्वस्थपणे बसावंसं वाटत असतं आपल्याला. आपल्याला खूप काहीतरी बोलायचं असतं, तोंड उचकटून भळभळायचं असतं, फक्त आपण काहीतरी खूण दिसण्याची वाट पाहात असतो आणि त्याच क्षणी आपल्याला दूरवर दिव्यांचा झगमगाट दिसतो. शेवटी मिळालीच मनुष्यवस्ती म्हणून आपण इतके आनंदतो की आपली सारासार विचारशक्ती गुंडाळून ठेवून त्याकडे धावत सुटतो. पण ते माणसांचं शहर नसतं, ती एक इंडस्ट्री असते, यंत्रांचं गाव. त्या यंत्रांच्या धडधडीला आपल्यासोबत आखीव-रेखीव, मोजून-मापून बोलणा-या माणसांचा आवाज असतो. नाही, मला हे नकोय. टाचणी टोचून फुटलेल्या फुग्यासारखी अवस्था होते आपली! स्वतःला पार उघडं करुन सांगावं असं माणूस भेटणार नाहीच का? का ते माणूसही ड्रेक्सलरच्या नदीपलीकडच्या, भेटतयंसं वाटणा-या, पण कधीही न भेटणा-या गावासारखं असतं? एक हवंहवंसं वाटणारं इल्युजन..किंवा केवळ तिथे ते आहे या आनंदात उरलेला खडतर प्रवास सुखाने करावासा वाटणारं ओ‌अॅसिस मेबी?

क्रे‌ओ के विस्तो ला लुझ
आल ओत्रो लादो देल रियो..

पण त्या पल्याड पोहोचल्यावर त्याच्याही पल्याड काहीतरी असेलच ना?
असेलही किंवा नसेलही, जा‌ऊन पाहायला हवं.
पण मग या पल्याडच्या पल्याडच्या शोधात किती दूरदूरवर जायचं?

हा प्रवास कधी संपायचा?
की संपायचाच नाही?

ड्रेक्सलरचा आर्जवी, लाघवी आवाज तुमच्या खरचटलेल्या जागी फुंकर घालतो, पोरी! हे असं अस्तं बरं का असं करत काय काय सांगतो, पण अजूनही त्यातलं बरंच काही कळायचं बाकी आहे.
सध्यापुरता इतकंच!

--

"ओत्रो लादो देल रियो"
होर्हे ड्रेक्सलर
’मोटरसायकल डायरीज’