वेण्डी मोठी झालिये (का?)..

एकेदिवशी वेण्डी बागेत खेळत असताना तिला एक सुंदर, पिवळं, नाजूक फुल दिसतं. ती ते फुल खुडून घेते आणि नाचत नाचत आपल्या आ‌ईकडे जाते. आ‌ईला ते आपलं नाचरं मूल इतकं आवडतं की तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती वेण्डीला म्हणते, "तू कायम अशीच का राहात नाहीस बाळा?" बस्स! वेण्डीची आ‌ई वेण्डीशी इतकंच बोलते आणि वेण्डीला कळतं की- आपण कायम असे राहणार नाही आहोत. आपण मोठे होणार आहोत!

"आता तू लहान नाही राहिलीस!" सध्या आ‌ई सारखी सारखी टोच-या शब्दांमध्ये आठवण करुन देतेय तशी आठवण कोणी न करुन देता, आपण चांगले मोठे झालेलो आहोत हे आपलंच आपल्याला कधी समजतं? हे कळून घेताना वेण्डीला आलेलं फ्रस्ट्रेशन गेली कित्येक वर्षं छान नासून, आंबून त्याचं दही झालं आहे आणि ते स्वतःच्या डोक्यात घालून तिने ’दिमाग का दही’ नावाचा प्रकार करून घेतलाय. अतिशय घट्ट बसणारे लेगिंग्ज पायात वरवर सरकतात आणि ते पायांमध्ये गोळा हो‌ईपर्यंत त्याचं तसं प्रकरण झालंय याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही, तशीच ती वर्षं सरलियेत. मग वेण्डीला वाटतं, इतक्या वर्षांमध्ये मी मोठी झाले का? झाले तर ते मला कळलं का? की ते कळूनही न कळल्यासारखं झालं?

वेण्डीची उंची काही इंचांनी वाढलिये, तिचे केस लांब झालेले आहेत, तिला आता तीन भाषा लिहीता-बोलता येतात, पिझ्झा-पास्ता करता येतो, डाळ-भाताचा कुकर लावता येतो, आठवडाभर प्रचंड काम केल्यानंतर ती तापाने आजारी पडलीच तर हा डॉक्टरकडे जावं लागेल असा ताप आहे, की सलग 18 तास झोप घतली की जाणारा ताप आहे? हे  चटदिशी सहज कळायला लागलंय तर ती मोठी झालिये असं म्हणता ये‌ईल का?

म्हणजे वानगीदाखल पाहा,

परवा वेण्डीला एका नव्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं. मैत्रिणीने विचारलं कधी भेटायचं? वेण्डीने म्हटलं शनिवार. शनिवार का तर वेण्डीचा ट्रेनचा पास त्यादिवशी संपत होता आणि त्यानंतर आठवडाभर तरी पास काढायची गरज नव्हती. मैत्रिणीला शनिवारी जमत नव्हतं आणि वेण्डीला रविवारकरता पास काढायचा कंटाळा आला होता. मग वेण्डी मैत्रिणीला भेटायला गेलीच नाही. मग वेण्डी विचार करते की, असं कोणाला भेटणं, न भेटणं ट्रेनच्या पास संपण्यावर, सकाळी पेपर वेळेवर येण्या- न येण्यावर अवलंबून राहायला लागलं की आपण मोठे (आणि जून) झालेलो असतो का? रेल्वेचा पास संपणं, एकही कुर्ता इस्त्री केलेला नसणं, वजन वाढून गाल वर आलेले असणं या गोष्टींवर आपले क्रांतिकारी निर्णय अवलंबून राहायला लागतात तेव्हा आपण मोठे झालेलो असतो का?

वेण्डीचा तिसावा बड्डे काही महिन्यांवर आला असताना तिला, "तू 12 वर्षांचा अनुभव असलेली 18 वर्षांची मुलगी आहेस"... "30 वर्षांचे होण्याबद्दलची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही 40 वर्षांचे झालेले नसता" असे वेचक कोट्स वारंवार वाचायचा नाद लागला होता, तेव्हा तिने आपण मोठे झालो असं वाटून घ्यायला हवं होतं का? ती 23 वर्षांची असताना तिचा 30 वर्षांचा मित्र जी वाह्यात बडबड करायचा असं वाटायचं, त्या बडबडीचा अर्थ आता कुठे (म्हणजे ती 30 आणि तो 37 वर्षांचा असताना! इट्स मॅथ्स पीपल..मॅथ्स!) कळायला लागलाय अशी जाणीव तिला अचानकच झाली, किमान तेव्हातरी?

ती 12 वर्षांचा अनुभव असलेली 18 वर्षांची मुलगी जरी असली तरी, तिच्या शरीराने इतक्यातच हार मानायला सुरुवात केलेली आहे. आता किमान मेंदूला तरी गंज लागू नये म्हणून वेण्डीने अचानकच सुडोकू, हँगमॅन सोडवायचं वेड लावून घेतलं आहे. एकप्रकारचा थकवा शरीरात साचायला लागतो, तो तिला शिश्याच्या जड गोळ्यासारखा सतत छातीत जाणवायला लागलाय. खुर्चीत काम करायला बसलं की त्यातून उठायला काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय उठणं नको वाटायला लागलंय, कँडी क्रश सागा खेळताना वेण्डीला अचानक जीवनातली शाश्वत सत्यं कळायला लागलियेत असं वाटतंय. (कशी? ते विचारायचं नाही) टेल मी पीपल, वेण्डी मोठी झालिये का? की फक्त म्हातारी झालिये? म्हातारं होण्यात मोठं होणं (होपफुली!) अध्याह्रत असतं का?

कधीकधी असं होतं की वेण्डीला एखाद्या व्यक्तीची हकनाक काळजी करायची असते, भडकून-संतापून खूप काही बोलायचं असतं, चार गोष्टी समजून सांगायच्या असतात.. पण तिला ते करता येत नाही. थकून-थकून जायला होतं. तेच तेच पुन्हा पुन्हा बोलायचं, न थकता शांतपणे उत्तरं द्यायची, भांडणं-पॅच-अप हे सगळं करण्यातला तिचा पंचविशी-सव्वीशीमधला स्टॅमिना कुठल्या कुठे गेलाय. ती दारं केव्हाची बंद झालीयेत, आपण फार पुढे निघून आलो आहोत आणि तिथं पुन्हा एकवार परतणं आपल्याला शक्य नाही, शक्य नाही पेक्षा आपल्याला तिथं परतायचं नाही. परतलो तर इथवर येण्याला, त्या भोगाला काही अर्थच उरत नाही, याची एपिपनी तिला कित्येकदा हो‌ऊन चुकलिये. मग वेण्डीला कळत कसं नाही की, ओ बॉय, दिस शिप हॅझ सेल्ड! आपण मोठे झालो आहोत. तिने ते कळून घ्यायला हवं, नाही का? वेडी पोरगी कुठली!

वेण्डी ज्या मित्राशी बिनधास्त सगळं बोलते, तो मित्र रेस्टॉरण्टच्या पाय-या उतरताना तिला पाठून न्याहाळत असतो आणि वेण्डी पाठी वळून त्याच्याकडे पाहाते, तेव्हा त्याची नजर गढूळलेली दिसते. तेव्हा वेण्डीचा तो मित्र, नुसता मित्र राहात नाही. तो पुरूष मित्र बनतो.. आणि ती- एक बा‌ई! वेण्डीलेखी ते नातं देखील तेव्हाच बदलतं.  काही परिमाणं आपल्या मनात नसताना, लावायची नसताना आपो‌आप जोडली जातात तसंच वेण्डीचं होतं. तिला खूप वा‌ईट वाटतं. त्या भावनेत काही वा‌ईट असतं असं नाही, पण त्या नात्यात पूर्वी असलेली सहजता, कोवळीक करपते. त्यात एक रोकडा नागवेपणा येतो, तू-मी, मी-तू हे खेळ वाढतात. ते पचवून पुढे जाणं, काहीच न पाहिल्यासारखं, जाणवल्यासारखं वागत राहणं हे खूप खोटं असतं. ते वेन्डीला जमत नाही आणि ते कायम पायात मोडलेल्या सूक्ष्म काट्यासारखं तिच्या मनात सलत राहतं, ठुसठुसत राहातं..या गोष्टींनी वेण्डीला मनाविरुद्ध मोठं व्हायला भाग पाडलं असेल का?  पाडलंय का?

मुलींच्या स्वच्छतागृहांच्या दारांवर, भिंतीवर चितारलेली, आठवी-नववीतल्या वयात मनात एक दातेरी, थंडगार  भीती निर्माण करणारी चित्रं, वर्गातल्या बेन्चवर कर्कटकने काढलेली, मेंदूवर कायमचे काच निर्माण करणारी शेलक्या शब्दातली वर्णनं, तिच्या ह्याच्यात, तिच्या त्याच्यात, ती हे, ती ते, बसमधले धक्के, बाजूने जाताना कानात कुजबलेली वखवख हे पाहात-ऐकत आपण कधीच मोठे झालेलो असतो असं वेण्डीने कधीतरी तिच्या मैत्रिणीला सांगितल्याचं तिला खूप लख्ख आठवतंय. ती मैत्रिणीला सांगत होती ते मोठं होणं नेसेसरीली वर ऊहापोह चाललाय त्या मोठं होण्यासारखं असतं का? नसेल तर ते कशात मोडतं? आपण कोणत्या समाजात जन्माला यावं याचा चॉ‌ईस वेण्डीकडे नसल्याने वय वाढत जाताना काही गोष्टी तिला अपरिहार्यपणे झेलाव्या लागल्या आणि त्यासाठी मुर्दाड व्हायला लागलं, त्या गोष्टींमध्ये?

आता ती चित्रं भिंतीवर चितारलेली पाहिली की वेण्डीला तिच्या न झालेल्या, होणा-या मुलीची सय येते. तिला हे पाहून कसे वाटेल, ती त्याचा कसा विचार करेल? मला विचारेल तर बरं; पण,  इतर कोणाला विचारेल तर ते तिला कसं आणि काय काय सांगतील? ती देखील माझ्यासारखा दिवसेंदिवस विचार करत बसेल का? हे असलं काहीतरी लिहून ठेवणा-यांना भूतकाळात जा‌ऊन ठार मारावंसं वेण्डीला वाटायला लागतं. असं वाटणं मोठं होण्यातून आलेलं असतं का?

मेबी असं असेल की, या सर्व दुखण्यातून, पडझडीतून, तुटा-तुटीतून, ओढा-ओढीतू तगून राहण्याचं बळ वेण्डीला सापडेल तेव्हा ती मोठी झालेली असेल. तर मग, आताचा सिनारियो नक्की कसा आहे?

वेण्डीला पार्मिसान ब्रेड कसा भाजायचा हे शिकायचंय पण, आतापर्यंत सात बॅटर फुकट गेलियेत. महिन्यांमागून महिने पार्मिसानच्या न-होण्यात चाललेले असताना अचानक वेण्डीला भराभर सरणा-या वयाची जाणीव होतेय. बड्डे कालच झाला मग, तो पुन्हा एकदा पुढच्या महिन्यावर कसा आला? असे हताश करणारे प्रश्न तिला वारंवार पडायला लागलेत. मग वेण्डी काय करते? ज्युलिया चा‌ईल्डने 32व्या वर्षी कुकींगला सुरूवात केली हे ती स्वतःला बजावून सांगते आणि पुन्हा एकदा.. ’तेरा ना-होना, जाने, क्यों होना ही है’ असं आळवत पार्मिसानची मनधरणी करायला सुरुवात करते. (आणि हे करताना ज्युलियाला पॉलसारखा सोन्यासारखा नवरा होता आणि आपल्याला साधा बॉयफ्रेण्ड देखील नाही हे विसरायचं भान ठेवते, नाहीतर या ड्रीलला काही अर्थ उरणार नाही हे तिला पक्कं माहित आहे)

हल्ली वेण्डीला मित्रांशी बोलताना समोर परदेशी भाषेतला चित्रपट लागल्यासारखा वाटतो, ज्याला ती स्वतःचीच सबटायटल्स टाकून समजून घेत असते. तिला कधीतरी अचानकच आपल्या ओळखीतल्या सिंगल पुरूषांची लिस्ट आखूड आखूड होत चाललिये असा साक्षात्कार होतो आणि त्यातूनही, एखादा नवा इंटरेस्टींग मुलगा भेटलाच तर वेण्डीला महिरुन जाण्या‌ऐवजी पुढे वाढून ठेवलेल्या शक्यतांच्या पसा-याने थकून जायला होतं.

पण, कधीकधी वेण्डीला अचानकच साक्षात्कार होतो की, आपण काही मोठे आणि शहाणे झालेलो नाहीत. खरंतर आपण आहोत तसेच राहिलेलो आहोत, फक्त आपल्या आयुष्यात येणारी लोकं अधिक तरूण आणि मॅड आहेत. मग ती तरुण आणि मॅड लोकं वेण्डीला सल्ले वगैरे विचारतात, त्यावर वेण्डी प्रचंड कंटाळून त्यांना रोखठोक, जे तोंडाला ये‌ईल ते सांगते आणि ते त्यांना पटतंही. मग दोन-तीन आठवड्यांनतर ते वेण्डीला "थँक यू"चा फोन करतात, पत्रं लिहितात, तेव्हा, वेण्डीला फारच कूल वाटतं. मग तिला वाटतं की, हे जर मोठं होणं असेल तर ते काही इतकं वा‌ईट नाही. खूपशा गोष्टी सोप्या हो‌ऊन गेल्यात आपल्या.

हे आपल्याला कळलंय असं वेण्डीला वाटणं हा वेण्डीचा भ्रम आहे का? वेल, दाग अच्छे असतील तर भ्रमही चांगलेच असावेत. मोठं होणं म्हणजे काही भ्रम दूर होणं, जेणेकरून आपल्याला नवीन भ्रम करून घेता यावेत, नाही का?

पाच फूट तीन इंची वेण्डीच्या इवल्याशा जगात इतकी उलथापालथ सुरू आहे याचा जगाला पत्ताही नसेल.

जगात रोज लाखो लोक मोठी होत असतील, नाही का?