’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ६

- श्रद्धा?

-  हं?

- अॅप्पल कापतेयेस का?

- हो

- मग माझ्या अॅप्पलची साल काढू नकोस.

श्रद्धाने चमकून मागे वळून पाहिलं. अनू-मनू नाश्ता करत बसल्या होत्या. अनूच्या तोंडात अजून पोह्याचा बकाणा होता त्यामुळे ती बोलणं शक्यच नव्हतं. तोंडात घास असताना बोलली असती तर बाबाचे फटके बसले असते. मग कोण बोललं हे? मनू? सालीचा एक मिलिमीटर भाग जरी खाण्यात आला तरी तो घसा खरवडून खरवडून ओकून टाकणारी मनू ? बापरे..

- श्रद्धा

- अं?

- काय झालं?

- नाही, काही नाही.

- अनूच्या अॅप्पलची पण साल काढू नकोस. आपण आता सालीसकट अॅप्पल खा‌ऊ शकतो किन‌ई अनू?

अनू जोरजोरात मान हलवून अनुमोदन दिलं आणि महत्प्रयासाने तोंडातला घास गिळून श्रद्धाकडे तर्जनी रोखून म्हटलं, ’अॅन अॅप्पल विथ अ पील, यू वोण्ट फॉल इल"

श्रद्धाने सुस्कारा सोडून हातात घेतलेला पीलर पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवला तेवढ्यात..

- श्रद्धा

- ओssss

- आज तुझी ती पालकची भाजी करशील का?

श्रद्धाने मागे वळून मनूकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे ते जुन्या कार्टून्समध्ये दाखवायचे तसे स्प्रिंग अॅक्शनने खोबण्यांमधून बाहेर ये‌ऊन बाहेर सांडायचे काय ते बाकी होते. पालकचा बॉटल ग्रीन रंग सोडून बाकी काहीही न आवडणारी आणि तिच्या बाबाने पालकच्या भाजीला ’तुझा तो भाजी नावाचा हिरव्या रंगाचा चिखल’ म्हटलं की लोळलोळून हसणारी मनू स्वतःहून पालकची भाजी मागतेय. काय गौडबंगाल काय आहे? श्रद्धाचा मेंदू ’मनू’ नावाच्या कप्प्यामधील सगळा डेटा संगतवार लावून आजच्या या औट ऑफ द वे वागण्याचं कारण शोधण्यासाठी धावाधाव करत होता. आणि बिंगो! ओहोके!

- मनू?

- हं?

- तू सालीची शंभर अॅप्पल खा किंवा पातेलंभरुन पालकची भाजी खा. आज आपण डॉक्टरकडे जायचं म्हणजे जायचंच आहे.

तर, अनू-मनू आणि श्रद्धाची सकाळ सालीचं अॅप्पल आणि भाजी नावाचा हिरव्या रंगाचा चिखल अशा मायक्रोबायोटिक मेन्यूचा बेत आखत सुरु झाली.

---

तर झालं असं होतं की हल्ली मनूला नीटसं दिसायचं नाही. आजकाल तिचं डोळेही जास्तच मिचकायला लागले होते. दूरच्या एखाद्या गोष्टीकडे फार काळ पाहिलं की तिच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा लागायच्या. बरं..ही मुलं टीव्ही देखील जास्त बघत नाहीत, मग कारण काय असावं? म्हणून मनूला डोळे तपासायला डोळ्यांच्या डॉक्टरकडे न्यायचं ठरलं होतं. पोरवाल डॉक्टर निरुचे लहानपणीपासूनचे डॉक्टर आणि ते अंकल स्क्रूजसारखे दिसायचे त्यामुळे पोराटोरांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यामुळे मनूलाही तिथेच न्यायचं ठरलं.

----

- हेलो

- निरामय?

- हं बोल. काय झालं?

- अरे, डॉ. पोरवालांकडे आले होते मनूचे डोळे तपासायला.

- मनूने फार त्रास दिला का?

- नाही. तुला तर माहितंच आहे की तिथे काय फुगे, चॉकलेटं, बरीच लालूच असते डोळे तपासायला बसण्या‌आधी. आणि पुन्हा डोळे तपासताना एका डोळ्यावर आय पॅच लावून पायरेट्स ऑफ कॅरेबियनच चालला होता तिथं.

- अनू होती का तिथं? ती घसा खरवडल्यासारखं "आय मेटी" बोलली का? तुला सांगतो ना, अनू...

- निरामय?

- अं?

- मी त्यासाठी नाही फोन केला.

- ओके ओके. सॉरी. बोल.

- मनूला चष्मा लावायला लागणारेय म्हणतात.

-  ..

- निरु? हेलो?

- कायमचा?

- नाही, ते पाहू म्हणतात.  सध्या तरी दोन-तीन वर्ष लावून पाहू म्हणतात. बघूयात काय सुधारणा होते म्हणून.

-(पलीकडून सुस्कारा)

- मायोपिया आहे म्हणे. आ‌ई-बापाला असेल तर मुलांना होण्याची शक्यता 75 टक्के असते असं म्हणतात. तिच्या अति-वाचनाचा काही संबंध नाही असंही म्हणाले. विनयालाही बराच होता ना नंबर? मला वाटतं तुझ्यापेक्षाही जास्त होता.

- हो.

- आता काय करायचं? हे माझ्याच्याने होणार नाही निरु, आधीच सांगून ठेवते. मनूची समजूत काढायची जबाबदारी तुझी. ती क्लिनिकमध्ये पण यायला तयार नव्हती, मी धाक घालून आणलं होतं.

- आजचा दिवस धकव ना, मी उद्या येतोच आहे.

- तुला आज नाही का येता येणार? आता मी त्यांना घे‌ऊन चष्म्याच्या दुकानात जाणार आहे सुर्वेंशी बोलायला, तिथे आणखी काय वाढून ठेवलंय काय माहित?

- सॉरी अगं. खरंच नाही जमणार, नाहीतर आलो नसतो का? आजचा दिवस तिची कशीतरी समजूत काढ, उद्या मी पाहातो काय करायचं ते.

- बरं.

- गुड, अनू-मनू आहेत का तिथे?

- नाही. मी त्यांना आ‌ईस्क्रीम खायला बसवलंय आणि बाहेर ये‌ऊन बोलतेय.

- ओके ओके. मी नंतर बोलेन त्यांच्याशी.

---

श्रद्धा एकेका हातामध्ये अनू-मनूला धरुन सुर्वेंच्या चष्माघराच्या दिशेने वळली. चष्माघर जसजसं जवळ यायला लागलं तसतशी मनूची पावलं रेंगाळायला लागली. दुकानात जायला पायरीवर पाय ठेवला तसा मनूने रडायला सुरुवात केली

- मला ना‌ई जायचं

- मनू, फक्त आत जा‌ऊन यायचंय

- मग तू जा

- मी एकटी जा‌ऊन काय करु आत..

- मला चष्मा ना‌ई घालायचा..

- मनू, आपण घरी जा‌ऊन नीट बोलू, आता इथे तमाशा नकोय

- नै, मी ना‌ई येणार

- मनू, वेडेपणा नकोय. आत चल.

श्रद्धाच्या आवाजाची पट्टी जराशी चढली तशी मनूने रस्त्यावर फताककन् बसकण मारली आणि ’मला ना‌ई जायचं’ करत रस्त्यावर लोळण घेतली. मनूचा अवतार पाहून चकीत झालेल्या अनूनेही मग ओठ पुढे काढून मुसमुसायला सुरुवात केली. भर रस्त्यावर हा प्रकार सुरु झालेला पाहून श्रद्धाचा एकदम बर्फच झाला! येणारेजाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने, सहानुभूतीने पाहात होते. त्यानंतर श्रद्धा कधी भानावर आली, तिने अनू-मनूला धरुन घरी कसं आणलं तिचं तिलाच ठा‌ऊक! घरी ये‌ऊन तिने पहिली गोष्ट केली ती म्हणजे आपल्या खोलीत जा‌ऊन निरुला कॉल लावला. त्याच्या व्हॉ‌ईस मेलवर प्रचंड आरडा‌ओरडा करुन स्वतःला शांत केलं आणि मग बाहेर ये‌ऊन मनूला म्हटलं,

- चला मनस्विनीबा‌ई, आपली खुर्ची घ्या.

खुर्ची घ्या म्हटल्यानंतर मनूला पुन्हा एकदा रडण्याचा उमाळा आला, अनू खोलीच्या दारामागे लपली.

- मनस्विनी, खुर्ची घे‌ऊन खोलीत ये, अनू बाहेर खेळत बस जा, नाहीतर मोहनिशकडे जा‌ऊन ये.

अनू नाखुषीनेच बाहेर गेली. श्रद्धाचा एकंदर अवतार आणि सूर पाहून मनू खुर्ची घे‌ऊन आत आली.

- खुर्ची ठेव तिथं आणि भिंतीकडे तोंड करुन बस.

बरहुकूम हालचाली झाल्या. श्रद्धा मनूच्या समोर ये‌ऊन बसली

- मनू इथे वर माझ्याकडे बघ आणि मला सांग घराच्या बाहेर, रस्त्यावर असं रडणं बरोबर की चूक?

- -----

- बरोबर की चूक?

(छोटुशा आवाजातलं चूक ऐकू येतं)

- आपल्या घरात रडून आपल्याला हवं ते करुन घेता येतं का?

- नाही.

-  तुला नको असलेली गोष्ट आतापर्यंत तुला एकदातरी करायला लावली आहे का?

- नाही

- मी हे सगळं बाबाला सांगणार आहे, कळतंय तुला?

- हो.

- गुड, आता पाच मिनीटं अशीच बस आणि आपण कसं वागलो याचा विचार कर.

मनूला ’थिकींग चे‌अर’वर सोडून श्रद्धा बाहेर आली तेव्हा तिच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. पोरींना शिक्षा करताना एका अर्थाने आपण आपल्यालाच शिक्षा करुन घेतो आहोत असं तिला वाटायचं आणि आजचा दिवसही अपवाद नव्हता. पुढची पाच मिनीटं ती हरवल्यासारखी घरात हेतूशून्य फिरत असताना अनूची हाक आली.

- श्रद्धा?

- हं, बोल अनू. काय खायला हवंय का?

- नाही.

- मग?

- श्रद्धा, मनूला चष्मा लागणार?

- हो.

- भिंगाचा?

- ते माहित नाही, पण नाही बहुतेक.

- मग तिला ट्रेनने जाताना विकलांगमधून प्रवास करायला लागेल?

श्रद्धा चमकली. आता हे काय नवीन?

- अनू, ही साफ चुकीची माहिती आहे, हे तुला कोणी सांगीतलं?

- परेश सांगत होता.

- परेशला चष्मा आहे?

- नाही

- मग?

- त्याने कुठूनतरी ऐकलं.

- मनूही होती तिथं?

- हो. होती नं.

- तरीच. अनू एक साधा विचार कर, बाबाला चष्मा आहे, हो नं? तो पण किती जाडा चष्मा! मग तो विकलांगमधून प्रवास करतो का?

अनूचा चेहरा उजळला, "हैला बरोबरे." पण लगेचच झाकोळला.

- पण बाबा किती मोठा आहे आणि मनू किती छोटी. इतक्या छोटेपणी चष्मा लागला म्हणजे वा‌ईट नं?

- अनू, चांगलं वा‌ईट असं काही नसतं. ते आपलं आपण ठरवायचं असतं. आणि बाबालाही खूप लहानपणीच चष्मा लागलेला.

यावर अनू मान डोलवत निघून गेली.
श्रद्धासमोर त्यानंतर करायच्या कित्येक गोष्टी पडल्या होत्या पण आजची पहिली प्रायोरिटी- केराच्या डब्यात गेलेला दिवस पुन्हा एकदा हसता-खेळता करणे आणि,
अनू-मनूला खूष करायला काय, आमरसाच्या दोन गच्च भरलेल्या वाट्या पण पुरायच्या.


---


- मनू?

- ओsss

- बाबाचा फोनेय.

- आले

बाबाचा फोन म्हटल्यावर वीजेच्या वेगाने धावत येणारी मनू अचानक कच्चकन ब्रेक लागल्यासारखी थांबली.

- तू सांगीतलंस त्याला? तो ओरडणारे मला?

- नाही बुवा. मी तरी अजून काही नाही सांगीतलं. त्याला तुझी आठवण आली म्हणून त्याने फोन केला

- आणि माझी? बाबाचा फोन ऐकून धावत आलेल्या अनूने फुरंगटून विचारलं. श्रद्धाने डोळे वटारुन मनूच्या दिशेने सूचक पाहिलं तेव्हा अनूला काय समजायचं ते समजलं आणि तिने थंब्स अप दिला. मनूने फोन घेतला.

- हेलो

- ए मनुभाय, कैसा हाय?

- हुंहुंहुं..अच्छा हाय. तू कधी येणार?

- उद्या.  मला ठेवला का आमरस का सगळा मटकावला हावरटांनी?

- सगळा खाल्ला. हीहीही

- मग? आज बाजारात सुर्वेकाकांच्या दुकानासमोर काय झालं?

मनू एकदम टेन्स आणि श्रद्धाकडे एक दुखरा कटाक्ष.
ए बा‌ई, मी नाही सांगीतलं. दुकानासमोरचा तुझा परफॉर्मन्स पाहून सुर्वे काकांनी फोन केलेला त्याला.- श्रद्धा

- जा‌ऊ दे, मनूडी, होता है. असं पुन्हा हो‌ऊ दे‌ऊ नको. पण तू माझीच मुलगी शोभतेस बरं का. मला पण चष्मा लागलेला तेव्हा मी पण असाच रडलो होतो चष्म्याच्या दुकानात जाताना आणि तुझ्या आजोबांनी मला बदडलेलं कितीतरी मस्त! सांगीतलं का श्रद्धाने तुला?

- नाही. ती रागावलेली माझ्यावर

- उगाच रागावली का ती?

- नाही

- बरं, आजोबांनी मला मारलं तसं मी तुला मारेन असं वाटतं का तुला?

- नाही
(निरुने मनातल्या मनात थँक गॉड म्हटलं असणार हे श्रद्धाला सोफ्यावर पडल्या पडल्या कळलं)

-झालं तर मग, ची‌अर अप! मी तुला एक मस्त गोष्ट सांगतो. फोन स्पीकरवर ठेव आणि अनूलाही बोलाव. आज आपण श्रद्धाला गोष्टी सांगण्यातू सुट्टी दे‌ऊयात.

कर्माची सुट्टी! असं मनातल्या मनात म्हणत श्रद्धा पुस्तक घे‌ऊन तिथेच कोचावर पसरली पण मोठेपणीचा निरु लहाणपणीचा निरु सांगायचा तशाच गोष्टी सांगतो का हे जाणून घ्यायची उत्सुकता अनिवार असल्याने कान स्पीकरकडे लागले होते.

- तर, एका राज्याची एक राजकन्या असते. ती राज्यातल्या सर्वांची लाडकी असते. तिला एखादी गोष्ट करता येत नाही असं काहीच नसतं. तिला चित्रं काढता येतात. तिचं हस्ताक्षर सुंदर असतं. तिची सर्व शास्त्र-पुराणं पाठ असतात. ती मोठ्यांचा आदर करते, पण आपली मतं स्पष्ट बोलूनही दाखवते. मोठी हो‌ऊन ती एक कर्तबगार राणी होणार याबद्दल कोणाच्याच मनात संशय नसतो.
तिला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसायचं. तिच्या लेखी असुंदर किंवा अग्ली असं काही नव्हतंच. इतरांच्या लेखी सर्वसाधारण गोष्टही ती आपल्या नजरेने, आपल्या चित्रांनी सुंदर करुन टाकायची.

- मनूसारखी- अनूची मनूला पाठून एक घट्ट घट्ट मिठी, मनूच्या चेह-यावर किंचीतसं लाजरं हसू.

- पण काही दिवसांपासून ती उदास उदास राहायला लागलेली असते. ती खात नाही, पीत नाही, हसत नाही, बोलत नाही. ती महालाच्या बाहेर पडायचंही बंद करते. ती यायची थांबली म्हणून बागेतली फुलं कोमेजतात, पक्षी चिवचिवायचे थांबतात, संपूर्ण राज्यावरच एकप्रकारची उदासी येते.

नौंटकी! (श्रद्धा मनातल्या मनात)

- का?- इति अनू-मनू

- काय माहित? तिच्या आ‌ई-बाबांना, म्हणजे त्या राज्याच्या राजा-राणीलाही आपल्या मुलीची चिंता वाटायला लागते. ते तिला खूप वेळा विचारतात काय झालं म्हणून, पण ती काही उत्तर देत नाही. तिने कित्येक दिवस झाले चित्रं काढलेली नसतात. महालातले ड्रॉ‌ईंग पेपर सगळे रिकामे पडलेले असतात. हे काय झालं आपल्या मुलीला म्हणून राजा राजवैद्याला बोलावून घेतो.

-राजवैद्य?

- म्हणजे राजा-राणीचा फॅमिली डॉक्टर

-ओके.

- राजवैद्य राजकन्येला तपासतो. राजवैद्य म्हणजे राजकन्येला आजोबांसारखाच. तो तिच्याशी एक तास मस्त गप्पा करतो आणि एका तासाने बाहेर येतो. राजा विचारतो, वैद्यजी काय झाले आपल्या राजकन्येला. वैद्यबुवा म्हणतात, राजन्, मला दोन आठवडे द्या. राजकन्येला खडखडीत बरा करतो आणि इतकं बोलून वैद्यबुवा निघून जातात.

- मग?

- वैद्यबुवांची वाट पाहण्यात दोन आठवडे कसेबसे सरतात. बरोब्बर दोन आठवड्यांनी वैद्यबुवा येतात, ते राजकन्येला भेटतात. शेवटी एकदाचे ते बाहेर येतात ते राजा-राणीला सगळं ठीक हो‌ईल असं सांगतात आणि राजकन्येला काही दिवस एकटं राहू द्यात असं सांगतात.

- इंटरेस्टींग. मग?

- चार-पाच दिवस सरतात, इतके दिवस पक्ष्यांवाचून ओसाड झालेल्या बागेमधून सहाव्या दिवशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायला लागतो तेव्हा सगळ्यांना कळतं की राजकन्या बरी झाली आहे. राजा-राणी आपल्या मुलीला पाहायला धावतात आणि थबकतात. त्यांची लाडकी राजकन्या एरव्हीपेक्षा थोडी वेगळी दिसत असते.

-वेगळी म्हणजे?- इति अनू. मनू इतका वेळ शांतच आहे.

- तिने डोळ्यांवर दोन काचा लावलेल्या असतात आणि त्या दो-याने जोडून डोक्याच्या पाठी गाठ मारलेली असते.
हे काय नवीन असा विचार राजा-राणी करतायेत तेवढ्यात राजकन्या आनंदात ओरडते,

"आ‌ई-बाबा, मला रंग या‌आधी इतके स्पष्ट आणि सुंदर कधीच दिसले नव्हते. आपली बाग, ही गुलाबं, हे पक्षी किती सुंदर आहेत!"

मग त्यांना कळतं की राजकन्येची नजर थोडी अधू झालेली असते, अधू झालेली असते म्हणजे तिला सगळं क्लि‌अर दिसत नसतं. आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला त्यातलं सौंदर्य दिसत नाही, आपल्याला चित्र काढावीशी वाटत नाहीत म्हणून ती उदास झालेली असते, पण वैद्यबुवांनी तिचा प्रॉब्लेम ओळखून उपाय शोधून काढलेला असतो.

-बाबा, तिने काचा लावलेल्या असतात म्हणजे..?

- म्हणजे चष्माच, पण थोड्या बेसिक प्रकारचा. तेव्हा कुठे चष्मे-बिष्मे होते अनू?  हुशार वैद्यबुवांनी आपल्या पद्धतीचा चष्मा करुन घातला राजकन्येला.

- हां हां, ओके.

-आपली मुलगी पहिल्यासारखी झाली यातच राजा-राणीला आनंद वाटतो. राजा मग एका कारागिराला बोलावतो आणि राजकन्येच्या त्या काचा छान खड्यांच्या फ्रेममध्ये बसवून देतो. राजकन्या पहिल्यासारखी चित्रं काढायला लागते, तिचे रंग आणि चित्रं पहिल्याहून जास्त सुंदर होतात. राजकन्येला आनंदात पाहून संपूर्ण राज्यही हसाखेळायला लागतं, आणि सर्वत्र बालकवींच्या कवितेसारखा आनंदी-आनंद होतो.

- मस्तय गोष्ट, आनंदी आनंद गडे! -मनूच्या पाठीत उगीचच्या उगीच धबका घालून अनू म्हणते

- मनू?

- अं?

- तुला नाही आवडली गोष्ट?

- बाबा, राजकन्येसारखं मला क्लि‌अर दिसत नाही हे खरंय, पण मला मनात सगळं स्वच्छ दिसतं.

आता दे उत्तर! -श्रद्धा म्हणते, अर्थात मनातल्या मनात!

-हो! बरोबरेय. पण तुला आता जे मनात स्पष्ट दिसतंय ना, ते तू, तुला स्पष्ट दिसत असताना पाहिलेलं आणि तुझ्या डोळ्यांमधून मेंदूत रेकॉर्ड झालेलं आहे. यानंतर तू जे काही नवं, म्हणजे तू आजपर्यंत न पाहिलेलं आणि त्यामुळे तुझ्या मेंदूत रेकॉर्ड नसलेलं काहीतरी पाहशील तेव्हा ते तुला अंधुकच दिसणार आणि म्हणून ते तुझ्या डोक्यात पण अंधुकच रेकॉर्ड होणार, कळतंय का काही?

-अं..थोडंसं.

-अनू? आहेस का तिथं?

-हो आहे नं, अनू टुण्णकन उडी मारुन बसली.

-अनू, क्लॉद मोने नाव सर्च कर. सी एल ए यू डी ई   एम ओ एन ई टी

-केलं.

- त्याचं ’वॉटर लिलि पाँड’ नावाचं पेन्टींग पाहा. या मोनेला खूप अंधुक म्हणजे ब्लर दिसायचं आणि त्याला दिसलेलं अंधुकसं काहीतरी त्याच्या चित्रातही दिसतंय बघ. सगळं ब्लर ब्लर. पॉल सेझान नावाच्या चित्रकाराचं पण असंच झालेलं. बाबो, तू क्लेपासून आकार तयार करतेस. चित्रात एकवेळ चालून जा‌ईल पण क्लेचे आकार मनात काहीतरी स्पष्ट आकार असल्याशिवाय कसे करणार? तू मांजरं तयार करतेस तेव्हा तुझ्या डोळ्यांसमोर एक आकार स्पष्ट असतो, हो कीनै?

- हो

- मग? मांजराशिवायचा कोणताही नवा आकार डोळ्यांनी नीट दिसलाच नाही तर तो तुझ्या मेंदूत तरी स्पष्ट कसा रेकॉर्ड होणार? तुला समजतंय मी काय म्हणतोय ते?

- हं.

- आणि मन्या, तू कसे केस वाढण्याकरिता केसात तेल घालतेस, वजन कमी झालं की वाढवण्याकरिता कशी टॉनिक घेतेस तशी तुझी व्हिजन वाढवण्याकरिता आपल्याला चष्मा लावायचाय, बस्स इतकंच आहे ते! शिवाय हॅरी पॉटरला चष्मा होता, डंबलडो‌रला चष्मा होता आणि तुझ्या लाडक्या मॅगॉनेगललाही चष्मा होताच ना! आणि हो, मिया थर्मोपलिसलाही चष्मा होता, आठवतंय ना? किती क्यूट दिसते ती. तू पण तशीच क्यूट दिसशील. शिवाय, सुपरमॅन काय, स्पायडरमॅन काय सर्वच जण चष्मा लावायचे.

- हं. (यावेळच्या हंमध्ये थोडासा उत्साह)

- सगळ्या मस्त मस्त माणसांना चष्मा होता, मलाही आहे आणि आता तुलाही लागला.

- हं.

- अंsss.मलापण चष्मा.- इति अनू

- अनोष्का, अगं मला आधी मनूशी बोलून घे‌ऊ देत, मग आपण तुझ्या चष्म्याचं पाहू, ओके?

- ओके.

- मनू?

- हं.

- कळतंय ना मी काय म्हणतोय ते?

- हो. पण बाबा, मलाच का? माझ्या वर्गात कोणालाच चष्मा नाही, आपल्या अख्ख्या सोसायटीतपण कोणत्याही मुला-मुलीला चष्मा नाही. अनूलाही नाही.

- पण मला दिला तर लावेन ना मी -इति अनू

-अनू, एक मिनीट थांब जरा. मनू, पण मग तू वर्गात वेगळी नाही का ठरत? तू पहिल्यापासूनच वेगळी होतीस. तुझ्यासारखी चित्रं कोणी काढू शकत नाही, तुझ्यासारखां वाचन कोणाचं नाही, तसा तुझ्यासारखा चष्माही कोणालाच नाही? नाही का?

- हो, पण तरी..

- नाही रे बेटा, मला नाही माहित तुलाच का ते. पण एक मात्र माहित आहे, तुझ्यासारख्या लोकांना जग जरा जास्तच स्पष्ट, जास्तीत जास्त तपशीलांसकट आणि सुंदर दिसावं नं, त्या राजकन्येसारखं, म्हणून झालेली योजना आहे ती..

- म्हणजे?

-काही नाही. उद्या मी येतो तेव्हा आपण सुर्वे काकांकडे जा‌ऊन तुला आवडेल ती फ्रेम घे‌ऊ, काय? डील?

-डंबलडो‌रसारखी?

-ओके, ती सोडून आणखी दुसरी कोणतीही-तुला आवडेल ती, ओके?

- ओके.

- मनू, आणखी एक. चष्मा लावल्यावर विकलांगमधून प्रवास करावा लागत नाही. कळलं?

यावर अनू-मनूने श्रद्धाला दिलेलं या कानापासून ते त्या कानापर्यंतचं ब्राईट स्माईल निरुला पाहाता आलं असतं तर! न राहावून श्रद्धाच्या मनात विचार आला. पण निरुच्या गोष्टीने जागी झालेली लहानपणीची श्रद्धा मांजरीसारखी फिस्कारली, "काम करायचंय ना! बसू देत त्याला बोंबलत!"

--

तर,
सरतेशेवटी बाबाशी बोलून झाल्यानंतर अनू-मनूच्या घरातही बालकवींच्या कवितेसारखा आनंदी-आनंद झालेला असतो. अनू-मनू डोक्यात डोकी खुपसून बहुधा चष्म्याची फ्रेम कशी करायची याची खलबतं करायला लागलेल्या असतात. आता उद्या निरु अनूची समजूत कशी काढणारेय याचा विचार करुनच श्रद्धाला खुदखुदायला होत असतं. संध्याकाळच्या प्रकाशात कार्पेटच्या बरोब्बर मध्यावर ठेवलेल्या फोनच्या शेजारी खुरमांडी घालून बेत करत बसलेल्या अनू-मनूला पाहून तिला वाटतं, एकाच आ‌ईपासून झालेल्या या दोन पोरी किती वेगळ्या आहेत, तंतोतंत एकमेकांसारख्या दिसत असल्या तरी..

होल्ड ऑन! श्रद्धा एकदम चरकते.
आता चारेक दिवसांनंतर अनू-मनूमधून अनू कोण आणि मनू कोण हे सहज सांगता येणार होतं.

आणि मग मनातल्या मनात आलेल्या रड्यामध्ये श्रद्धाचा आनंद कुठल्याकुठे विरुन जातो.

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ५