’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ५

"एय, हा तानसेन कोण होता?"

हा प्रश्न पाठीवर आदळला आणि श्रद्धाच्या हातातून प्लेट खालीच पडली एकदम! या घरात कोणीही, कधीही, अगदी काहीही विचारु शकतं. अगदी आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. गोष्टीत गुंगलेली मनू झोपेत चालल्यासारखी आली आणि विचारते काय, तर, "बाबा शिवाजी महाराजांसारखी दाढी-मिशी का नाही ठेवत?" काय सांगणार त्या पोरीला? तिला सांगणार? की बा‌ई, तुझ्या बापाने तोंडावर केस उगवायला लागल्यापासून कधी एक केसही ठेवलेला नाहीये. दिसला की काढलाच म्हणून समजा. त्यावर श्रद्धाने तिला सांगीतलं की, बाबाला दाढी-मिशीच येत नाही. झाडांना कसं पाणी घातलं तरच ती वाढतात, बाबा काही तसं पाणी वगैरे घालत नाही. मग मनूने आपल्या बाबाला खुर्चीत बसवून त्याच्या नाकाच्या खाली आणि संपूर्ण गालावर झारीने पाणी घातलेलं. मनूच ती, तिला नाही तरी कसं म्हणणार? बिचारा खुर्चीत बसून हा अभिषेक सहन करत होता आणि पुन्हा श्रद्धाकडे खा‌ऊ की गिळू या नजरेने बघणं आलंच. आणि आता हा प्रश्न!

शनिवारची दुपार, मस्त जेवणं झालेली, श्रद्धाला कधी नव्हे ती पेंग आलेली आणि मध्येच हा तानसेन उपटला. ही काय तानसेनबद्दल बोलायची वेळ आहे का? ती वळली आणि प्रश्नाचा व्हॉली भिरकावणारीकडे पाहिलं, तर अनू उभी! काय पण ध्यान! आर्मीचे लोक मेडल मिरवतात, ही पोरगी आंब्याच्या रसाचे डाग मिरवते. मँगो कलर ड्रेसवर जिथे पाहावं तिथे केसर आंब्याचे डाग पडलेले, ओठाच्या कडेला अजूनही आंब्याचा गर दिसत होता. कंबरेवर हात, कानशीलावर आंबे आलेले, त्यावर तिच्या बाबाने सकाळीच चंदन उगाळून लावलेलं, एकदम पंढरपूरचा सावळा विठोबा! आणि वर प्रश्नार्थक नजर आहेच. मनू तोंडासमोर धरलेल्या पुस्तकाच्या वरुन दोघींकडे पाहात होती.

"अनू, काय हे! तोंड धुवून ये. आणि तो फ्रॉक बदल आधी"

"पहिले सांग."

"शॅबी मुलगी, नाही सांगत जा."
ती वळली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्याच वेळात तिचा कुर्ता ओढला गेला.

"घे, बदलला फ्रॉक. आता सांग."

"दॅट्स बेटर. पहिले सांग, तुला तानसेनाची का भूक लागली एकदम!"

"हिहिहि.." (पलीकडच्या खुर्ची पुस्तक वाचत बसलेल्या मनूचं खुक्क!)"भूक नाही कै.. पा‌ऊस नाही ना पडतेय अजून."

का ही मुलगी कोड्यात बोलतेय? म-ला-झो-प-आ-लि-ये-गं-बा-ई-मु-द्दया-चं-बो-ल!

"पा‌ऊस?"

"हो, मोन्याने अकबर बिरबल नावाची सिरीयल बघितली बिग मॅजिकवर. त्यात म्हणे तानसेनाने काहीतरी गा‌ऊन पा‌ऊस पाडला."

"हो, राग मियाँमल्हार गायलेला त्याने."

"म्हणजे हे खरंय? "

"काय खरंय?"

"की त्याने गा‌ऊन पा‌ऊस पाडला?"

"अनू, सायन्समध्ये काय शिकवलंय विसरलीस का? गा‌ऊन पा‌ऊस पडायला लागला तर तुझा बाबा रोज सकाळी आंघोळीच्या वेळी पा‌ऊस पाडेल." (खुक्क!)

(अनू एकदम रागावून) "मग असं का दाखवलं सीरीयलमध्ये?"

"अगं, तो किती छान गायचा हे सांगण्याकरता इतिहासकार वाढून चढवून काहीतरी सांगतात झालं."

"पण तुला नक्की माहित नाहीये ना. तुझा पण अंदाजच आहे ना?"

"नक्की कसं माहित असणार? मी त्या काळात कुठे होते? पण, गा‌ऊन पा‌ऊस पडत नाही आणि हे मला 100 टक्के माहित आहे."

"तुला ना पा‌ऊस पडायलाच नको आहे!"

ही पोरगी माझी झोप घालवण्याच्या इराद्यानेच आलिये.

"आता हे काय खुळ्यासारखं?  मला का पा‌ऊस पडायला नकोय?"

"१० जून हो‌ऊन गेला. अजून पा‌ऊस नाही, मोन्याने त्या तानसेनाचं गाणं रेकॉर्ड करुन घेतलं होतं आणि आम्ही आज ते दिवसभर वाजवणार होतो. पण तू बघ. श्शी!"

"अगं. पा‌ऊस आहे तो. पडायचा तेव्हा पडणार. त्याला तू काय, मी काय, काय करु शकणारे?"

"तू ना मला अजिबात समजूनच घेत नाहीस."

"हो बा‌ई..तू म्हणशील तसं."

मनू तोंडाचा आ वासून अनूकडून श्रद्धाकडे, श्रद्धाकडून मनूकडे पाहात होती. श्रद्धाने अजून काही म्हटलं नाही, विचारलं नाही तेव्हा अनू पाय दाणदाण आपटत बाहेर निघून गेली.

"हिला काय झालंय?" श्रद्धाने मनूला विचारलं. त्यावर मनूने खांदे उचकले आणि ती पुन्हा एकदा पुस्तकात गढून गेली.

--

पाचच्या सुमारास श्रद्धा बाहेर आली, तेव्हा अनू खिडकीसमोर स्टूल घे‌ऊन बसलेली. जरा ढग आले, मळभ आलं की ती पोर खिडकीच्या बाहेर हात काढायची. पण पा‌ऊस वगैरे नाही पडत नाही पाहून पुन्हा हिरमुसायची. दूध पण स्टूलवर बसूनच घेतलं, टीव्ही पण तिथेच बसून पाहिला, पण अर्धं लक्ष बाहेर! त्यात तिचा दोष नाही म्हणा! तंतोतंत बापावर गेलेली पोरगी. हिच्या बाबाने कधी पहिला पा‌ऊस चुकवला नाही आणि पावसात फताफता पाय मारत भिजण्याची संधी सोडली नाही. पहिल्या पावसाचीही अशीच डोळे लावून वाट पाहिली, अगदी आजतागायत!

"अनूबा‌ई, चला झोपायला"

"चक्क्!"

"आता चक्क् काय?"

"मी पा‌ऊस पडल्याशिवाय झोपायला येणार नाही."

श्रद्धाने एक दीर्घ श्वास घेतला.

"बरं. झोपू नकोस. ये‌ऊन पड तरी."
झोपाळलेली मनू तिच्याबाजूला कधी ये‌ऊन उभी राहिली तिला कळलं देखील नाही.

"नाही."

"असं काय करतेस बाय? चल ना!" (म्हणजे मी झोपायला मोकळी!)

तेवढ्यात मनूने अनूपाशी जा‌ऊन तिचा हात धरुन तिला उठवलं आणि बेडरुमकडे चलण्याचा इशारा केला. अनूनेही एक शब्द न बोलता बेडरुमकडे चालायला सुरुवात केली.
आता पुढचं काम तुझं!, अशा अर्थाची नजर टाकून मनू पण बेडरुममध्ये गडप झाली.

श्रद्धाचा मेंदू ब्लँक. आता अनूची समजूत कशी काढायची? लहान मूलय ते, खुळेपणा करायचंय. पण डोकं न सटकू देता ते करायचं म्हणजे महाकठीण काम. आजवर शिकून घेतलेला सगळा संयम पणाला लागायचा. पण आज तिची तयारीच नव्हती. गेल्या आठवड्याभरातला उष्मा, कामाचा डोंगर उपसताना, त्यात सुट्टयांमुळे मोकाट सुटलेल्या अनूच्या प्रश्नांच्या फ़ैरींना तोंड देताना ती थकून गेली होती. कधी अंथरुणाला पाठ टेकते असं झालं होतं. अशा मनःस्थितीत डॉ. फिलची भूमिका वठवायची म्हणजे तिला नको-नको झालं. मनस्तापात एखाद दुसरा उणा-दुणा शब्द जाणार, ती पोर उगीच दुखावणार. यांचा बाबा कसं करतो हे? लहान होता तेव्हा काडीची अक्कल नव्हती. पण कुठे गेला कुठेय हा?
इतके सगळे विचार करत ती बेडरुमजवळ आली आणि आतून अनूचा आवाज ऐकायला आला.

"तू का नाही आलीस मोन्याकडे?"

"मला नाही आवडत मोहनिशच्या घरी जायला. त्याची आ‌ई सारखी हजार प्रश्न विचारत असते."

"तू काय केलंस मग?"

"अनू, आज कीनै मी चतुर मुलांच्या छान छान गोष्टी वाचल्या"

"व्हॉट अ वेस्ट ऑफ टा‌ईम, तू चतुर थोडी आहेस?" (मनूने अनूच्या पाठीत बुक्का मारल्याचा आणि अनूचा खदखदा हसल्याचा आवाज)

"श्रद्धा अजून आली नाही. काय करतिये?"

"ती चिडलीये माझ्यावर. आजकाल सारखी चिडत असते. काहीही विचारा, जास्त बोलत नै, काय नै."

"ती किती काम करते बघतेस ना तू? थकलिये ती."

दाराच्या आडून हे संभाषण ऐकणा-या श्रद्धाच्या मनात मनूविषयी प्रेम दाटून आलं. ऊर भरुन येणं वगैरे यालाच म्हणतात का?

"हं."

"पण अनू, तू पण वेड्यासारखंच वागते कधीकधी. असं गाणं ऐकून पा‌ऊस पडतो का कधी? माधवी मिसने रेन सायकल समजवून दिलेलं ना? मग?"

"पण आम्ही ट्राय केली तर काय बिघडलं? बाबा म्हणतो ना, ट्राय ट्राय बट डोण्ट क्राय. पा‌ऊस पडत नाही म्हणून मला रडू येत होतं, मग हे करुन बघायचं ठरवलं."

"अनू, चल! आज मी तुला एक गोष्ट सांगते."

"चतुर मुलांची का?"

"हो, हो, चतुर मुलांची. मी नसेन चतुर, पण तू आहेस नं. मग तुला जास्त कळेल ती."

"बरं. शूट."

"तर या गोष्टीमध्ये एक श्रीमंत व्यापारी आहे. त्याला दोन मुलं असतात. अनिल आणि मनोज. अनिल मोठा, मनोज छोटा. त्या व्यापा-याने व्यापारात खूप पैसा कमावलेला असतो, पण आपल्या दोन मुलांपैकी कोणाकडे त्याचा ताबा द्यायचा हे त्याला कळत नसतं."

"ओके, त्याला विल करायचं असतं का?"

"हो, तसंच काहीतरी. तर तो एक युक्ती करतो. तो एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावतो आणि त्यांच्या हातावर मिरचीच्या बिया ठेवतो."

"बिया? ओके."

"हो. तो त्यांना सांगतो की, दोघांपैकी जो कोणी त्या झाडाला लवकरात लवकर मिरच्या आणून दाखवेल त्याच्या नावावर तो त्याची पूर्ण संपत्ती करेल."

"अनिल जातो आणि एक खड्डा खणून त्यात बी पेरतो. त्याला पाणी घालतो. एक आठवडा जातो, पण त्यांना रोपं काही येत नाही. खणलेल्या जागी बिया आहेत ना ते काढून बघतो, पुन्हा माती लोटतो. पुन्हा दोन दिवसांनी उतावळेपणाने पुन्हा खोदतो, पुन्हा माती लोटतो. रोपं काही येतच नाहीत वर."

अनूच उतावीळपणे काहीतरी बोलण्याचा आवाज, पण मनू तिच्याकडे दुर्लक्ष करुन गोष्ट पुढे दामटते.

"तिथे मनोजने छान काळ्या कुळकुळीत जमिनीत खड्डे खणून मिरचीच्या बिया लावलेल्या असतात, त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची व्यवस्था केलेली असते. तो रोज त्यांना पाणी घालतो. दोन आठवड्यांनी बियांतून रोपं वर येतात, त्यांच्या मिरच्या होतात."

"मस्त, अनिलच्या बियांना रोपं येतात की नाही शेवटी?"

"नाही गं, सारखं काढ-घाल केल्यावर कशी येणार रोपं? मग तो गावातल्या एक साधूबाबाचा सल्ला घेतो. तो साधूबाबा त्याच्याकडे असलेले सगळे पैसे घे‌ऊन त्याला एक अंगारा देतो आणि तो मिरच्या लावलेल्या ठिकाणी टाकायला सांगतो."
"तो अंगारा टाकतो. दोन दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा खणून पाहातो. त्याच्या बियांना काही शेवटपर्यंत रोपं येतंच नाहीत. अंगा-याने कधी रोपं येतात का अनू?"

अनूचा विचारमग्न हं.

"तिथे मनोज झाडांच्या मिरच्यांच्या बिया अजून थोड्या जमिनीवर लावतो. असं करत करत पूर्ण मिरच्यांचं शेतच तयार होतं."

"मनोज स्मार्ट आहे!"

"अनिल हार मानून बाबांकडे जातो आणि मान खाली घालून त्यांना झालेला सर्व प्रकार सांगतो. बाबा मनोजला बोलावून घेतात. मनोज मिरच्यांची सहा पोती घे‌ऊन हजर होतो. बाबा खूष होतात आणि  पूर्ण व्यापार मनोजच्या नावावर करतात."

"तर अनू, श्रद्धा म्हणाली तसं, ज्या गोष्टींना जितका वेळ लागतो, तितका द्यायलाच हवा. तू-मी नाही का गुलबक्षीच्या बिया लावलेल्या? किती वाट पाहिली आपण बियांना रोपं फुटण्याची. शेवटी आलीच की नाही रोपं वर? तुला लवकर फुलं हवीत म्हणून ती लवकर वर आली असती का?

अनूचं एवढुश्शा आवाजातलं ’नाही’ ऐकायला येतं.

"झालं तर मग. माधवी मिस म्हणतात तस, नेचरमधल्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच पा‌ऊस केव्हा पडणार हे पण आपल्या हातात नसतं. तू काहीही केलंस तरी तो पडायचा तेव्हाच पडणार."

"हो, पण कधी?"

"अगं पडेल. वाट बघ. बाबा म्हणतो नाही का, गुड थिंग्ज कम टू दोज, हू वेट!"

"हं."

"मग?"

थोडा वेळ शांतता.

"मनू?"

"हं."

"गोष्टीतल्या दोन मुलांची नावं हीच होती का तू बदललीस?"

"म्हणजे?"

"तू नावं पण बाकी आपल्यासारखीच घेतलीस. अनिल आणि मनोज. त्याचाही शॉर्ट फॉर्म अनू-मनूच होतो ना?"

"असेल."

मनू अनूकडे पाठ वळवून गालातल्या गालात हसली असणार हे श्रद्धाला दाराच्या आडूनही कळलं.

"गुडना‌ईट अनू!"

"गुडना‌ईट चतुर मनू!"

बेडरुममधला दिवा बंद झाला आणि श्रद्धा दाताला डोकं टेकून शांत उभी राहिली. आता तिला उद्या सकाळची अजिबात भीती वाटत नव्हती.

ती तिच्या खोलीकडे जायला निघाली, इतक्यात दार वाजलं आणि अनू-मनूचा बाबा दार उघडून आत आला. ती त्याला कुठे होतास हे विचारणार इतक्यात तो खिडकीपाशी जा‌ऊन उभा राहिला आणि बाहेर वाकून आकाशाकडे पाहिलं. श्रद्धा कंटाळून झोपायला जाण्याच्या आधी तिथे तो तब्बल 20 मिनीटे उभा होता. थोडेसे ढग आले की तो खिडकीबाहेर हात काढायचा. पा‌ऊस वगैरे पडत नाहीये पाहून पुन्हा हात आत घ्यायचा आणि हाताची घडी घालून स्वस्थ बसायचा. किती वेळ तिथे उभा होता कोण जाणे!

त्या रात्री खूप मुसळधार पा‌ऊस झाला!

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४