उत्तररात्र- २

-ए..

-..

-झोपलियेस का?

..

(तिला गदागदा हलवतो)
-एSSS

-(तिला झोप लागलिये, पण गदागदा हलवण्याने दचकून उठते. काय चाललंय हे न कळल्यासारखी डोळ्यांची उघडझाप. आपण स्वप्नात नाही हे कळल्यावर डोळे गच्च मिटून खोल श्वास घेते आणि कूस बदलून त्याच्याकडे वळते) हं?

-मी विचारलं झोपलियेस का?

-तुझ्या या प्रश्नाला काहीतरी अर्थ आहे का?

-तुला नीट उत्तर देताच येत नाही का?

-एकदा हाक मारल्यानंतर माणूस ’ओ’ देत नाही तेव्हा तो झोपलाय हे तुला समजत नाही का?

-..

-बोल आता.

-..

-काय झालंय?

-काही नाही.

-हे बघ, आता मला झोपेतून उठवलंच आहेस तर बोल पटापट.

-..(मांडीवर उशी घेऊन हुप्प बसला आहे)

-(सुस्कारा सोडून) ठिकेय. मर्जी तुझी. मी थकलेय.. झोपतेय.

(ती कूस वळवून झोपणार इतक्यातच)
-मी तुला मघाशी किती कॉल केले. उचलले का नाहीस?

-(काहीही न कळल्यासारखी पाहात राहाते) अं? अरे, मी कलीग्जबरोबर डिनर घेत होते. फोन सायलण्टवर होता. मिस्ड कॉल पाहिले तेव्हा घरी येऊन पोहोचले होते. रात्रीचे 12.30 वाजतायेत अरे...ही काय यावर बोलण्याची वेळ आहे का?

-तू म्हणालीस बोल म्हणून बोललो.

-ते असलं वेडगळ काहीतरी असेल हे थोडीच माहित होतं मला?

-रात्रीचे 11 वाजत आले होते, मला तुझी चिंता वाटत होती हे वेडगळ का? आनंद आहे.

-मी उशीर होणार सांगीतलं होतं तुला. आणि काय रे, मी याआधी याहून उशीरा आलेय. तेव्हा तू छान जेवून बिवून तोंड उघडं टाकून झोपलेला असायचास. आताच तुला माझी इतकी चिंता का वाटायला लागलिये बरं?

-उं?

-नाही, म्हणजे, कॉल्सना उत्तर दिलं नाही म्हणून अस्वस्थ होण्या-यातला तू नाहीस. ते सोड, असे सारखे सारखे कॉल करण्या-यातला पण तू नाहीस. 

-(कान तिच्याकडे, मान खाली, बोटं एकमेकांमध्ये गच्च खुपसलेली)

-(ती उठून बसते आणि डोळे बारीक करुन त्याच्याकडे निरखून बघते. त्यानंतर अचानक काहीतरी समजल्यासारखी)नाऊ आय थिंक ऑफ इट..गेल्या दोन महिन्यांपासून तुझे हे असले काहीतरी वेडगळ प्रकार चालू आहेत.

-(थेट आरोपाने गडबडून)अं?

-तू मला ऑफिसला भेटायला काय यायला लागलायेस, मी बाहेर असताना फोन काय करायला लागलायेस, हा सगळा कार्यक्रम गेल्या दोन महिन्यांपासून चालूये, बरोबर बोलतेय ना मी?

-(तिला इतक्या लवकर या प्रकाराचा बोध होईल याची अजिबात कल्पना नसल्याने उत्तराची तयारी करुन ठेवलेली नाही. उसन्या अवसानाने) तुला काय म्हणायचंय?

-(तिच्या चेह-यावरचे त्रासिक भाव आता हळूहळू स्मितहास्यात बदलायला लागलेय) तुला चांगलंच माहित आहे मला काय म्हणायचंय ते.

-नाही..आय डोण्ट नो व्हॉट आर यू टॉकींग अबाऊट.

-तू इंग्लिशमध्ये सुरु झालास की तू काहीतरी लपवतोयेस हे मला लगेच समजतं हे तुला अजून ठाऊक नाही? सिरीयसली?

-..(तो गप्प)

-अरे सांग ना.. बोलशील तर कळेल ना मला.

-उम्म्....

-(ती धाडकन्)केतन आम्हाला जॉईन झाल्यापासून तुला माझी अचानक चिंता वाटायला लागलिये.. खरं ना?

-..(चेह-यावर धक्का स्पष्ट दिसतोय)

-सांग ना, तू माझ्या सगळ्या पुरुष सहका-यांना ओळखतोस, मी त्यांच्यासोबत कितीदा डिनरला गेलेय, पण तेव्हा तू असे कॉल केले नव्हतेस, तेव्हा तुला असं अपरात्री प्रश्नोत्तरांचं सेशन घेण्याचं ऑब्सेशन नव्हतं. पण, गेल्या दोन महिन्यात दर पंधरवड्याला हा कार्यक्रम होतोय. नक्की काय चाललंय?

-..

-बरं. सोड, आय विल कट द चेझ. मला सांग.. आर यू जलस ऑफ केतन?

-अं..?

-आर यू?

-(मनाचा हिय्या करुन आणि मग सुस्कारा सोडून) हो.

-(तिने विनोदाने विचारलं होतं, पण ते खरं आहे हे कळून धक्का बसलेला)काय?

-हो, मला केतनचा मत्सर वाटतो.

(त्याच्याकडे दोन क्षण निरखून पाहाते. कन्फेशन मोडमध्ये तो इतका विनोदी आणि गोड दिसतोय की तिला गदगदून हसायलाच यायला लागतं)

-(प्रचंड भडकून) हसण्यासारखं काये त्यात?

-(अजून हसतेच आहे) मला हसू का रडू हे कळत नव्हतं, पण हा प्रकार इतका वेडगळ आहे की मला हसायलाच आलं.

-काय, काय वेडगळ आहे त्यात?

-मी कायम, अष्टौप्रहर तुझे गुणगान गात फिरत असते ज्याच्या-त्याच्यासमोर, तू असा आणि तू तसा करत. आणि तू ..खाता-पिता कसला रे मत्सर वाटतो तुला?

-तुझ्याशी बोलून फायदा नाही. सोड, मी काही बोललो हे विसरुन जा. झोप तू.
(झोपायच्या तयारीत)

-अरे? असं कसं, असं कसं? सांग ना! मी गेल्या कित्येक दिवसांमध्ये इतकं हसलेले नाही. उठ!

-(उठून बसत, रागात) का? तुझा कट्टया जोक्स सांगून हसवत नाही का तुला?

-(हसण्याची पुन्हा एक उबळ येते) हो! सांगतो ना, पण काये, त्याचा चेहरा तुझ्याइतका विनोदी नाहीये, त्यामुळे तो पंच येत नाही.

-मला तो अजिबात आवडत नाही. आपण भेटलो की नेहमी आम्ही हे केलेलं, ते केलेलं सांगत बसतो.

-अरे तो खूप जुना मित्र आहे माझा. आम्ही माँटेसरीपासून नववीपर्यंत एकत्र होतो. त्यानंतर तो दिल्लीला गेला. आता तो परत आलाय, माझ्याच फिल्डमध्ये, माझ्याच कंपनीमध्ये आहे, आम्ही पुन्हा एकदा छान मित्र झालो आहोत. याउप्पर काही नाही. केतनवरुन इतकं अस्वस्थ होण्याचं तुला काही कारण नाही हे मी तुला सांगतेय, इतकं बस्स नाही का तुला? माझ्यावर इतका पण विश्वास नाही का?

-नाही, कारण ते नाहीये..

-मग? त्याला सांगू का की तुझ्यासमोर शाळेतलं काही बोलत जाऊ नकोस म्हणून?

-नाही, तसं नाही.

-मग तू तोंड उचकटून जरा सांग ना तुला काय खुपतंय ते.

-इतकंच की..

-काय?

-त्याच्याकडे तुझ्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्याकडे नाहीत. आणि त्या इतक्या आहेत की आय फील लॉस्ट.

-..

-केतनला जी तू ठाऊक आहेस ती मला ठाऊक नाहीस. तुझ्या आयुष्यातला तो कप्पा माझ्याकरिता नेहमीच अनोळखी राहणार. आणि त्या कट्टयाला लहानपणीची तू ही माहितियेस आणि आताची तू पण माहितियेस.

-..

-तुम्ही कंपनीत भेटता, बोलता, कधीकधी एकत्र डिनर घेता, तो तुला सोडायलाही येतो. आय डोण्ट माईंड दॅट, रिअली! मी तुझ्यावर संशयही घेत नाहीये.

-हो! ते मला माहि..

-पूर्ण ऐकून घे. माझा तुझ्यावर संशयही नाही, आणि तो कधी येणारही नाही. मला तुझ्याबद्दल 100 टक्के खात्री आहे. पण, आपण हे असे. रात्रीचे आणि वीकेण्ड्सना एकमेकांना भेटणार. त्यातही कधी तू उशीरा येतेस, कधी मी उशीरा येतो. केतनचं बोलणं ऐकल्यावर मी फक्त तू-मी असलेल्या आठवणी आठवायला सुरुवात केली आणि माझ्याकडे तुझ्या इतक्या कमी आठवणी आहेत की तो विचार केल्यावर मला भीतीच वाटली.

-कसली? नेमकी कसली भीती वाटली तुला?

-की आपल्याला एकमेकांसोबत न राहण्याचीच सवय तर नाही ना होऊन जाणार?

-..

-आणि मला ते नकोय. तो विचारही मला नकोसा वाटतो. खरंच.

-..

-तुझ्या-माझ्या ज्या काही आठवणी आहेत, त्या माझ्याकरिता प्रीश्यस आहेत. पण, या सिनारीयोमध्ये केतन आल्यानंतर आल्यानंतर मला त्या जास्त असायला हव्यात असं सारखं वाटायला लागलं. मनातल्या मनात कायम त्याच्याशी स्पर्धा सुरु झाली. मी खूप पथेटिक आहे, हो नं?

-नाही. काहीतरी बोलू नकोस.

-मग? बोल ना काहीतरी. 

-मला काय बोलावं तेच सुचत नाहीये. तू असा पण विचार करत असशील असं कधी डोक्यातच नाही आलं माझ्या. तू माझ्यापेक्षा खूप जास्त सिक्युअर इसम आहेस असंच वाटायचं मला. 

-वेल, मी नाहीये. मला भीती वाटतेय. तुला नाही का असं वाटलं कधी? आपण जास्त वेळ घालवावा, आपल्याकडे जास्तीत जास्त आठवणी असाव्यात असं? शेवटी आपण कोण आहोत हे त्यांच्यावरुनच ठरतं नं?

-..

-काय गं?

-नाही, आपण नेसेसरिली आपल्या आठवणींवरुन डिफ़ाईन होतो असं नाही वाटत मला.

-ओह!

-आणि तू हे जे आठवणींबद्दल बोलतो आहेस तसं मला नाही वाटलं कधी. वाटलंच तरी ते शक्य होईल की नाही याबद्दल मला शंकाच वाटते. 

-(तो गप्प)

-पण तू म्हणतोयेस त्या, म्हणजे एकमेकांसोबत कमी वेळ घालवतो, त्या सिनारीयोमध्येही आपल्यात जे काही आहे.. वेल, कसं सांगू, वुई डोण्ट फिट पर्फेक्टली, मे बी- बट, वुई फिट वेल इनफ. त्यामुळे, मी आपल्या बाबतीत खूप निर्धास्त आहे; आणि निर्धास्त असल्यामुळे मला या गोष्टीची चिंता कधी वाटली नाही, ऑनेस्टली!

-आय सी!

-हो. मला आपल्या आठवणींपेक्षा आपल्यात ही जी सॉलिड कम्फ़र्ट लेवल आहे ना ती खूप आवडते. मी तुझ्यासोबत आहे याचं कारण ते आहे.

-मस्ट बी नाईस! असं नेमकं माहित असणं आणि निर्धास्त होता येणं.

-वेल! मी ऑसम आहे हे तुला माहित नाही का?

-हो! ते बाकी खरंय.

-आता मात्र मी खरंच झोपते. आपण उद्या बोलू, हाफडे टाकेन उद्या. एकत्रच निघू.

-ओके!

(दोघेही झोपतात, दिवा मालवतो)
(एक दोन मिनीटं मिट्ट अंधार, पुन्हा दिवा चालू होतो)
-ए

-..

-एsss

-(झोपाळलेल्या स्वरात)आता काये?

-आपण एकत्र, छान, ग्रेसफुली, आनंदात म्हातारे होऊ शकू का गं? तोपर्यंत माझ्यासोबत राहशील का?

-(चादर डोक्यावरुन घेत) हे रात्री अपरात्री बोलण्याचं ऑब्सेशन कमी केलंस तर बघू बाबा.

-ओके देन, आय वुईल ट्राय माय बेस्ट!

-..

-ए..

-..

-आपल्यात आता जे काही बोलणं झालं, ती पुढे जाऊन चांगली आठवण बनेल, नाही का? तुला काय वाटतं?

-..

-काय गं?

-..

-झोपली वाटतं. 
(तो दिवा घालवतो आणि दुस-याच क्षणी झोपी जातो. भिंतीवरचं घड्याळ आपली ताणलेली स्प्रिंग मोकळी करतं. आता पटापटा वाजू द्यायला हरकत नसते)

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ५

"एय, हा तानसेन कोण होता?"

हा प्रश्न पाठीवर आदळला आणि श्रद्धाच्या हातातून प्लेट खालीच पडली एकदम! या घरात कोणीही, कधीही, अगदी काहीही विचारु शकतं. अगदी आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. गोष्टीत गुंगलेली मनू झोपेत चालल्यासारखी आली आणि विचारते काय, तर, "बाबा शिवाजी महाराजांसारखी दाढी-मिशी का नाही ठेवत?" काय सांगणार त्या पोरीला? तिला सांगणार? की बा‌ई, तुझ्या बापाने तोंडावर केस उगवायला लागल्यापासून कधी एक केसही ठेवलेला नाहीये. दिसला की काढलाच म्हणून समजा. त्यावर श्रद्धाने तिला सांगीतलं की, बाबाला दाढी-मिशीच येत नाही. झाडांना कसं पाणी घातलं तरच ती वाढतात, बाबा काही तसं पाणी वगैरे घालत नाही. मग मनूने आपल्या बाबाला खुर्चीत बसवून त्याच्या नाकाच्या खाली आणि संपूर्ण गालावर झारीने पाणी घातलेलं. मनूच ती, तिला नाही तरी कसं म्हणणार? बिचारा खुर्चीत बसून हा अभिषेक सहन करत होता आणि पुन्हा श्रद्धाकडे खा‌ऊ की गिळू या नजरेने बघणं आलंच. आणि आता हा प्रश्न!

शनिवारची दुपार, मस्त जेवणं झालेली, श्रद्धाला कधी नव्हे ती पेंग आलेली आणि मध्येच हा तानसेन उपटला. ही काय तानसेनबद्दल बोलायची वेळ आहे का? ती वळली आणि प्रश्नाचा व्हॉली भिरकावणारीकडे पाहिलं, तर अनू उभी! काय पण ध्यान! आर्मीचे लोक मेडल मिरवतात, ही पोरगी आंब्याच्या रसाचे डाग मिरवते. मँगो कलर ड्रेसवर जिथे पाहावं तिथे केसर आंब्याचे डाग पडलेले, ओठाच्या कडेला अजूनही आंब्याचा गर दिसत होता. कंबरेवर हात, कानशीलावर आंबे आलेले, त्यावर तिच्या बाबाने सकाळीच चंदन उगाळून लावलेलं, एकदम पंढरपूरचा सावळा विठोबा! आणि वर प्रश्नार्थक नजर आहेच. मनू तोंडासमोर धरलेल्या पुस्तकाच्या वरुन दोघींकडे पाहात होती.

"अनू, काय हे! तोंड धुवून ये. आणि तो फ्रॉक बदल आधी"

"पहिले सांग."

"शॅबी मुलगी, नाही सांगत जा."
ती वळली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्याच वेळात तिचा कुर्ता ओढला गेला.

"घे, बदलला फ्रॉक. आता सांग."

"दॅट्स बेटर. पहिले सांग, तुला तानसेनाची का भूक लागली एकदम!"

"हिहिहि.." (पलीकडच्या खुर्ची पुस्तक वाचत बसलेल्या मनूचं खुक्क!)"भूक नाही कै.. पा‌ऊस नाही ना पडतेय अजून."

का ही मुलगी कोड्यात बोलतेय? म-ला-झो-प-आ-लि-ये-गं-बा-ई-मु-द्दया-चं-बो-ल!

"पा‌ऊस?"

"हो, मोन्याने अकबर बिरबल नावाची सिरीयल बघितली बिग मॅजिकवर. त्यात म्हणे तानसेनाने काहीतरी गा‌ऊन पा‌ऊस पाडला."

"हो, राग मियाँमल्हार गायलेला त्याने."

"म्हणजे हे खरंय? "

"काय खरंय?"

"की त्याने गा‌ऊन पा‌ऊस पाडला?"

"अनू, सायन्समध्ये काय शिकवलंय विसरलीस का? गा‌ऊन पा‌ऊस पडायला लागला तर तुझा बाबा रोज सकाळी आंघोळीच्या वेळी पा‌ऊस पाडेल." (खुक्क!)

(अनू एकदम रागावून) "मग असं का दाखवलं सीरीयलमध्ये?"

"अगं, तो किती छान गायचा हे सांगण्याकरता इतिहासकार वाढून चढवून काहीतरी सांगतात झालं."

"पण तुला नक्की माहित नाहीये ना. तुझा पण अंदाजच आहे ना?"

"नक्की कसं माहित असणार? मी त्या काळात कुठे होते? पण, गा‌ऊन पा‌ऊस पडत नाही आणि हे मला 100 टक्के माहित आहे."

"तुला ना पा‌ऊस पडायलाच नको आहे!"

ही पोरगी माझी झोप घालवण्याच्या इराद्यानेच आलिये.

"आता हे काय खुळ्यासारखं?  मला का पा‌ऊस पडायला नकोय?"

"१० जून हो‌ऊन गेला. अजून पा‌ऊस नाही, मोन्याने त्या तानसेनाचं गाणं रेकॉर्ड करुन घेतलं होतं आणि आम्ही आज ते दिवसभर वाजवणार होतो. पण तू बघ. श्शी!"

"अगं. पा‌ऊस आहे तो. पडायचा तेव्हा पडणार. त्याला तू काय, मी काय, काय करु शकणारे?"

"तू ना मला अजिबात समजूनच घेत नाहीस."

"हो बा‌ई..तू म्हणशील तसं."

मनू तोंडाचा आ वासून अनूकडून श्रद्धाकडे, श्रद्धाकडून मनूकडे पाहात होती. श्रद्धाने अजून काही म्हटलं नाही, विचारलं नाही तेव्हा अनू पाय दाणदाण आपटत बाहेर निघून गेली.

"हिला काय झालंय?" श्रद्धाने मनूला विचारलं. त्यावर मनूने खांदे उचकले आणि ती पुन्हा एकदा पुस्तकात गढून गेली.

--

पाचच्या सुमारास श्रद्धा बाहेर आली, तेव्हा अनू खिडकीसमोर स्टूल घे‌ऊन बसलेली. जरा ढग आले, मळभ आलं की ती पोर खिडकीच्या बाहेर हात काढायची. पण पा‌ऊस वगैरे नाही पडत नाही पाहून पुन्हा हिरमुसायची. दूध पण स्टूलवर बसूनच घेतलं, टीव्ही पण तिथेच बसून पाहिला, पण अर्धं लक्ष बाहेर! त्यात तिचा दोष नाही म्हणा! तंतोतंत बापावर गेलेली पोरगी. हिच्या बाबाने कधी पहिला पा‌ऊस चुकवला नाही आणि पावसात फताफता पाय मारत भिजण्याची संधी सोडली नाही. पहिल्या पावसाचीही अशीच डोळे लावून वाट पाहिली, अगदी आजतागायत!

"अनूबा‌ई, चला झोपायला"

"चक्क्!"

"आता चक्क् काय?"

"मी पा‌ऊस पडल्याशिवाय झोपायला येणार नाही."

श्रद्धाने एक दीर्घ श्वास घेतला.

"बरं. झोपू नकोस. ये‌ऊन पड तरी."
झोपाळलेली मनू तिच्याबाजूला कधी ये‌ऊन उभी राहिली तिला कळलं देखील नाही.

"नाही."

"असं काय करतेस बाय? चल ना!" (म्हणजे मी झोपायला मोकळी!)

तेवढ्यात मनूने अनूपाशी जा‌ऊन तिचा हात धरुन तिला उठवलं आणि बेडरुमकडे चलण्याचा इशारा केला. अनूनेही एक शब्द न बोलता बेडरुमकडे चालायला सुरुवात केली.
आता पुढचं काम तुझं!, अशा अर्थाची नजर टाकून मनू पण बेडरुममध्ये गडप झाली.

श्रद्धाचा मेंदू ब्लँक. आता अनूची समजूत कशी काढायची? लहान मूलय ते, खुळेपणा करायचंय. पण डोकं न सटकू देता ते करायचं म्हणजे महाकठीण काम. आजवर शिकून घेतलेला सगळा संयम पणाला लागायचा. पण आज तिची तयारीच नव्हती. गेल्या आठवड्याभरातला उष्मा, कामाचा डोंगर उपसताना, त्यात सुट्टयांमुळे मोकाट सुटलेल्या अनूच्या प्रश्नांच्या फ़ैरींना तोंड देताना ती थकून गेली होती. कधी अंथरुणाला पाठ टेकते असं झालं होतं. अशा मनःस्थितीत डॉ. फिलची भूमिका वठवायची म्हणजे तिला नको-नको झालं. मनस्तापात एखाद दुसरा उणा-दुणा शब्द जाणार, ती पोर उगीच दुखावणार. यांचा बाबा कसं करतो हे? लहान होता तेव्हा काडीची अक्कल नव्हती. पण कुठे गेला कुठेय हा?
इतके सगळे विचार करत ती बेडरुमजवळ आली आणि आतून अनूचा आवाज ऐकायला आला.

"तू का नाही आलीस मोन्याकडे?"

"मला नाही आवडत मोहनिशच्या घरी जायला. त्याची आ‌ई सारखी हजार प्रश्न विचारत असते."

"तू काय केलंस मग?"

"अनू, आज कीनै मी चतुर मुलांच्या छान छान गोष्टी वाचल्या"

"व्हॉट अ वेस्ट ऑफ टा‌ईम, तू चतुर थोडी आहेस?" (मनूने अनूच्या पाठीत बुक्का मारल्याचा आणि अनूचा खदखदा हसल्याचा आवाज)

"श्रद्धा अजून आली नाही. काय करतिये?"

"ती चिडलीये माझ्यावर. आजकाल सारखी चिडत असते. काहीही विचारा, जास्त बोलत नै, काय नै."

"ती किती काम करते बघतेस ना तू? थकलिये ती."

दाराच्या आडून हे संभाषण ऐकणा-या श्रद्धाच्या मनात मनूविषयी प्रेम दाटून आलं. ऊर भरुन येणं वगैरे यालाच म्हणतात का?

"हं."

"पण अनू, तू पण वेड्यासारखंच वागते कधीकधी. असं गाणं ऐकून पा‌ऊस पडतो का कधी? माधवी मिसने रेन सायकल समजवून दिलेलं ना? मग?"

"पण आम्ही ट्राय केली तर काय बिघडलं? बाबा म्हणतो ना, ट्राय ट्राय बट डोण्ट क्राय. पा‌ऊस पडत नाही म्हणून मला रडू येत होतं, मग हे करुन बघायचं ठरवलं."

"अनू, चल! आज मी तुला एक गोष्ट सांगते."

"चतुर मुलांची का?"

"हो, हो, चतुर मुलांची. मी नसेन चतुर, पण तू आहेस नं. मग तुला जास्त कळेल ती."

"बरं. शूट."

"तर या गोष्टीमध्ये एक श्रीमंत व्यापारी आहे. त्याला दोन मुलं असतात. अनिल आणि मनोज. अनिल मोठा, मनोज छोटा. त्या व्यापा-याने व्यापारात खूप पैसा कमावलेला असतो, पण आपल्या दोन मुलांपैकी कोणाकडे त्याचा ताबा द्यायचा हे त्याला कळत नसतं."

"ओके, त्याला विल करायचं असतं का?"

"हो, तसंच काहीतरी. तर तो एक युक्ती करतो. तो एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावतो आणि त्यांच्या हातावर मिरचीच्या बिया ठेवतो."

"बिया? ओके."

"हो. तो त्यांना सांगतो की, दोघांपैकी जो कोणी त्या झाडाला लवकरात लवकर मिरच्या आणून दाखवेल त्याच्या नावावर तो त्याची पूर्ण संपत्ती करेल."

"अनिल जातो आणि एक खड्डा खणून त्यात बी पेरतो. त्याला पाणी घालतो. एक आठवडा जातो, पण त्यांना रोपं काही येत नाही. खणलेल्या जागी बिया आहेत ना ते काढून बघतो, पुन्हा माती लोटतो. पुन्हा दोन दिवसांनी उतावळेपणाने पुन्हा खोदतो, पुन्हा माती लोटतो. रोपं काही येतच नाहीत वर."

अनूच उतावीळपणे काहीतरी बोलण्याचा आवाज, पण मनू तिच्याकडे दुर्लक्ष करुन गोष्ट पुढे दामटते.

"तिथे मनोजने छान काळ्या कुळकुळीत जमिनीत खड्डे खणून मिरचीच्या बिया लावलेल्या असतात, त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची व्यवस्था केलेली असते. तो रोज त्यांना पाणी घालतो. दोन आठवड्यांनी बियांतून रोपं वर येतात, त्यांच्या मिरच्या होतात."

"मस्त, अनिलच्या बियांना रोपं येतात की नाही शेवटी?"

"नाही गं, सारखं काढ-घाल केल्यावर कशी येणार रोपं? मग तो गावातल्या एक साधूबाबाचा सल्ला घेतो. तो साधूबाबा त्याच्याकडे असलेले सगळे पैसे घे‌ऊन त्याला एक अंगारा देतो आणि तो मिरच्या लावलेल्या ठिकाणी टाकायला सांगतो."
"तो अंगारा टाकतो. दोन दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा खणून पाहातो. त्याच्या बियांना काही शेवटपर्यंत रोपं येतंच नाहीत. अंगा-याने कधी रोपं येतात का अनू?"

अनूचा विचारमग्न हं.

"तिथे मनोज झाडांच्या मिरच्यांच्या बिया अजून थोड्या जमिनीवर लावतो. असं करत करत पूर्ण मिरच्यांचं शेतच तयार होतं."

"मनोज स्मार्ट आहे!"

"अनिल हार मानून बाबांकडे जातो आणि मान खाली घालून त्यांना झालेला सर्व प्रकार सांगतो. बाबा मनोजला बोलावून घेतात. मनोज मिरच्यांची सहा पोती घे‌ऊन हजर होतो. बाबा खूष होतात आणि  पूर्ण व्यापार मनोजच्या नावावर करतात."

"तर अनू, श्रद्धा म्हणाली तसं, ज्या गोष्टींना जितका वेळ लागतो, तितका द्यायलाच हवा. तू-मी नाही का गुलबक्षीच्या बिया लावलेल्या? किती वाट पाहिली आपण बियांना रोपं फुटण्याची. शेवटी आलीच की नाही रोपं वर? तुला लवकर फुलं हवीत म्हणून ती लवकर वर आली असती का?

अनूचं एवढुश्शा आवाजातलं ’नाही’ ऐकायला येतं.

"झालं तर मग. माधवी मिस म्हणतात तस, नेचरमधल्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच पा‌ऊस केव्हा पडणार हे पण आपल्या हातात नसतं. तू काहीही केलंस तरी तो पडायचा तेव्हाच पडणार."

"हो, पण कधी?"

"अगं पडेल. वाट बघ. बाबा म्हणतो नाही का, गुड थिंग्ज कम टू दोज, हू वेट!"

"हं."

"मग?"

थोडा वेळ शांतता.

"मनू?"

"हं."

"गोष्टीतल्या दोन मुलांची नावं हीच होती का तू बदललीस?"

"म्हणजे?"

"तू नावं पण बाकी आपल्यासारखीच घेतलीस. अनिल आणि मनोज. त्याचाही शॉर्ट फॉर्म अनू-मनूच होतो ना?"

"असेल."

मनू अनूकडे पाठ वळवून गालातल्या गालात हसली असणार हे श्रद्धाला दाराच्या आडूनही कळलं.

"गुडना‌ईट अनू!"

"गुडना‌ईट चतुर मनू!"

बेडरुममधला दिवा बंद झाला आणि श्रद्धा दाताला डोकं टेकून शांत उभी राहिली. आता तिला उद्या सकाळची अजिबात भीती वाटत नव्हती.

ती तिच्या खोलीकडे जायला निघाली, इतक्यात दार वाजलं आणि अनू-मनूचा बाबा दार उघडून आत आला. ती त्याला कुठे होतास हे विचारणार इतक्यात तो खिडकीपाशी जा‌ऊन उभा राहिला आणि बाहेर वाकून आकाशाकडे पाहिलं. श्रद्धा कंटाळून झोपायला जाण्याच्या आधी तिथे तो तब्बल 20 मिनीटे उभा होता. थोडेसे ढग आले की तो खिडकीबाहेर हात काढायचा. पा‌ऊस वगैरे पडत नाहीये पाहून पुन्हा हात आत घ्यायचा आणि हाताची घडी घालून स्वस्थ बसायचा. किती वेळ तिथे उभा होता कोण जाणे!

त्या रात्री खूप मुसळधार पा‌ऊस झाला!

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

लुईस चावेसच्या तीन कविता.

हल्लीच लुईस चावेस नावाचा कोस्टारीकन कवी वाचनात आला. फ़्रेम मागून फ़्रेम आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करण्याची आणि त्यातून एक विलक्षण त्रासदायक, आपल्या आत बरीच हलवाहलव करण्याची ताकद असलेलं चित्र आपल्यासमोर मांडण्याची या तरुण कवीची हातोटी वाचण्यासारखी आहे. त्याची एक कविता मला विशेषकरून भिडली. कवितेचं नाव आहे 'cualquiera', ज्याला अर्थ आहे- कोणीही ’य’ मुलगी; पण आपण तिला ’एक सामान्य मुलगी’ म्हणूयात.

Cualquiera- Luis Chaves

no sabe el nombre de la mayoria de las flores
olvida el de los heroes epicos
confunde olimpicamentela genealogia mitologica
habilidad nula para la musica, torpe para el color
no distingue aromas
y tiene un gusto mas bien ordinario
pero ciertas imagenes vuelven y vuelven
como si las sacara por la puerta
y regresaran por la ventana
una noche que atraviesa paredes
alguien toca piano en un cuarto vecino
una mujer habla sola en un rincon
entonces escribe para contradecirse

 "एक सामान्य मुलगी"- लुईस चावेस 

तिला काही फ़ुलांची नावे तोंडपाठ नाहीत 
तिला महाकाव्यांचे नायकही विसरायला झालेत 
पौराणिक वंशावळ विचारलीत तर काहीतरी भलतंच सांगेल 
संगीताचा कान नाही, रंगांची जाण नाही 
तिला गंधही कळत नाहीत. 
आणि तिला आवडतात त्या गोष्टी खूपच क्षुल्लकशा आहेत

पण काही प्रतिमा परततात, वारंवार 
जसं काही त्यांना दरवाजातून हाकलून लावलंय 
आणि त्या खिडकीतून पुन्हा आत यायला बघताएत 

(त्यातच तिला आठवते) 
भिंतीला भेदून जाणारी एक रात्र 
तिच्या बाजूच्या खोलीत कोणीतरी पियानो वाजवतंय 
एक बाई स्वत:शीच बोलत बसलिये एका कोप-यात 
मग, ती (जे आठवतंय त्याचं) खंडन करायला लिहीते

--

खिन्नता, वैफ़ल्य हा लुईस चावेसच्या कवितांचा गाभा आहे. त्याच्या कवितांमधली अतिशय संवेदनशील, विचारी, परिस्थितीचे टक्केटोणपे खाऊन स्वत:ला शहाणं बनायला भाग पाडणारी माणसं माझ्या-तुमच्यासारखीच असतात, ती आपल्या असण्यावर-नसण्यावर सतत प्रश्न उठवत असतात. जिवंत राहाणं आणि त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी असणं ही मनुष्या़ची आदिम प्रेरणा आहे. त्यासाठी कोणी चो-या करतं, कोणी बेमालुम दुस-यांना फ़सवतं तर कोणी स्वत:लाच बेमालुम फ़सवत राहातं

Oficio- Luis Chaves

un espejo con marco de bombillas.
el tocador revuelto en piladoras, cremas.
una jeringa.

un guante toma la esponja.
la desliza sobre piel blanca.
cada movimiento borra los sudores
de trompeta y cachetadas.
la esponja vuelve a su sitio.
adentro lleva la cara del payaso.
el ira el rostro recien salido del espejo.
tan contundamente alli como una fruta grotesca.

tensa el brazo hasta que salta una vena.
y maldice el disfraz.

पेशा- लुईस चावेस

दिव्यांच्या महिरपीचा आरसा
मेकअपच्या टेबलवर अस्ताव्यस्त पडलेल्या
गर्भनिरोधक गोळ्या, क्रीम आणि एक सीरींज

एक हात स्पंज उचलतो
सराईतपणे फिरतो गो-या चामडीवरुन
टिपला जातो आहे घाम
आघातांचा आणि खाल्लेल्या थपडांचा..
स्पंज येतो आपल्या मूळ जागी
त्यात साकळला आहे एक मुखवटा बतावणीचा
पाहतो आरशात दिसणा-या त्याच्या छबीकडे
निव्व्वळ कोडगी, रसरहित शुष्क फळासमान

मग करकचतो आपला दंड, नस टचटचून वर येईतो
आणि मुखवट्याला शिव्या घालत राहातो

--

कविता कधीही संपत नसते. कविता हे कवीचे रेकॉर्ड्स नव्हे, ती त्या रेकॉर्ड्सची त्या त्या वेळची इंटरप्रीटेशन्स असतात, ती नंतर बदलूही शकतात. आपण आपल्या आठवणींना (आठवणींना बरं- इंटरप्रीटेशन्सना नाही) काळानुसार बदलत जातो. त्यात आपल्या सोयीची स्पष्टीकरणं घालतो, प्रसंग पार वेडेवाकडे करुन सांगतो, काल्पनिक संवाद-प्रसंग त्यात घुसडतो. का? तर खूप दुखत असतं आत कधीकधी- ते जास्त दुखू नये म्हणून, रडणं कमी करता यावं म्हणून, आपल्या चुकांची आपल्यालाच लाज वाटते म्हणून..त्यात वाईट आहे का? वाटत नाही- कारण, हा कामूफ़्लाजचा प्रकार आहे. कामूफ़्लाज ही नैसर्गिक प्रेरणा आहे- कविता ही कवीची आयुष्यकथा असतेच पण, त्यातल्या फ़ूटनोट्स या आपल्या आपणच समजून घ्यायच्या असतात.

Alguien que me llama- Luis Chaves

todo lo que recuerdo es mentira
la silueta d me abuela en la manana.
tras el mar de sabanas humedas
tendidas en el patio

una carretera de conchas y caracoles
que se piedre bajo la espume del Pacifico.

mama asomada tras las cortinas.
como escondiendose de malas noticias.
las manos ansiosas sobre el delantal.

el olor a naranja entre las unas.
unos zapatos otropedicos debajo del sillon.
alguien que canta en otro idioma
y le entiendo.

la memoria se inventa episodios
para amortiguar los inevitables accesos de oscuridad.
camina una vida paralela que termina mas alla de la mia.

el presente es lo que sucede donde nunca estoy.
la lampara que fosilaza lo que escribo.
el insomnio que aprende a caminar sobre el fuego.

कोणीतरी बोलावतंय मला-

मला आठवतंय ते सगळं खोटं आहे
सकाळच्या वेळची आजीची सावली
ओल्याकंच चादरींच्या समुद्रावरुन
लांबच लांब अंगणात पसरलेली

शंख-शिंपल्यांची एक वाट
प्रशांत महासागराच्या फेनिल पाण्यात जाऊन लुप्त होणारी

पडद्याच्या पलीकडे दिसणारी माझी आई
पडद्याआडच्या वाईटापासून स्वत:ला कायम दडवत आलेली
तिचे चिंताग्रस्त हात एप्रनवर स्थिरावलेले

नखांमध्ये साचून राहिलेला संत्र्याचा वास
आरामखुर्चीखाली दिसणा-या ऑर्थोपेडीक वहाणा
जसं की, कोणीतरी गातंय वेगळ्याच भाषेत
आणि ते तंतोतंत समजतंय मला

आठवणी घडवतात एक घटनाक्रम
घेरुन येणा-या अपरिहार्य काळोखाला थोपवण्यासाठी
आठवणी चालतात माझ्यासोबत एक आरसा घेऊन
ज्यात माझ्या आयुष्याहून लांबचलांब समांतर आयुष्य दिसतं

वर्तमान म्हणजे काय, तर जे घडतंय, तिथे मी कधीच नसणं
माझ्या लिखाणाला चिरायू करणारा एक दिवा
आणि

वणव्यावर चालायची दीक्षा देणारी अनिद्रा.

--

आपणही असेच न-आठवणींनी नाडलेले नसतो का? मुखवट्याशी हाडवैर असूनही त्याला उरी-पोटी घेऊन हिंडत नसतो का? आपण असे असतो हे तरी पुरतं समजलेलं असतं का? असेलही-किंवा नसेलही. पण याच गोष्टी आपल्याला सावल्यांपासून दूर ठेवतात, स्वत:चा जीव घेण्यापासून थांबवतात, त्यामुळे, मी काय-तुम्ही काय-लुईस चावेस काय-त्यांच्यावर करायचं तितकं वेडं, अर्धवट प्रेम करतच राहतो. जेमतेम लाज राखणा-या धडुत्यावर एखाद्या असहाय्य बाईचं असेल तसं- आहे त्याची शरमही आहे, पण नसतं तर काय- हा विचार करुन त्यावेळेपुरता सुरक्षित वाटणंही आहे. 
तेव्हा, आदिओस आमिगोस! 
के एस्तेस बिएन. मान्तेनेईस ला कोर्दुरा!

’वामोस’

00:00>>00:45

तिला स्वप्नात नेहमी एक विस्तीर्ण माळरान दिसतं. त्या माळरानावर नेहमी व्हॅन गॉगने सूर्यफुलांच्या शेताची चित्रं काढली तेव्हा होतं तसं ऊन असतं. रेड अँडीचं ओकचं झाड शोधत येतो त्यावेळीही तसंच ऊन होतं. स्वप्नातही ती याच प्रहरी या माळरानावर येत असते.

उन्हाने पिवळ्या पडलेल्या गवताच्या एका बाजूने चढत गेलेला टेकडीवजा चढ आणि त्या टेकडीच्या बुडाला वळसे घालत येणारी पांढुरकी वाट. फारसं कोणी येत नाही की जात नाही. त्या वाटेवर कोणीतरी ऑब्सेसिव्ह कपल्सिव्ह माणसाने अंतर मोजून स्टेपल मारावीत तशी कमानी टाकून उभी असलेली झाडं. एरीयल ह्यूने पाहिलं तर रेघेवरच्या अवतरणासारखी दिसावीत. त्या माळाच्या पलीकडे समुद्र वाजतो आहे. दुपारी डोळा लागून तोंड उघडं ठेवून घोरत पडलेल्या मच्छूसारखा. 

आता दुरुन दिसणारा तो धुळीचा लोट नसता तर तो सबंध आसमंत स्तब्ध चित्रासारखाच वाटला असता. का काय माहित, पण याचं चित्र वॉटर कलर्समध्ये काढता येणार नाही, पेस्टलमध्येच ये‌ईल असं वाटतं.

धुळीचा लोट जवळ जवळ येत जातो आणि धुळीच्या लोटामागून एक मोटरसायकल अवतीर्ण होते. 

मोटरसायकलवर बसलेल्या मुलीला तिचा चेहरा आहे. त्या मुलीने तिचे कपडे घातले आहेत. ती ती-च आहे हे शंभर टक्के खरं, पण त्याचवेळी ती ती-नाहीसुद्धा. त्या न-तीच्या चेहऱयावरचा कुर्रेबाज दिमाख तिच्या ओळखीचा नाही. हाताच्या बाहीखालून दिसणारे रापलेले हात तिच्या सवयीचे नाहीत. 

00:45>>00:60

ती मोटरसायकलवाली क्षणभर तिच्याकडे पाहाते आणि नाक उडवून गाडी पुढे दामटते. 

ड्रीमर आणि सब्जेक्टमधला हा काँटॅक्ट कसनुसा करणारा आहे.

1:00>>1:15
एक वळण घे‌ऊन टेकडी‌आड नाहिशी होते. तो रस्ता कड्याकडे जातो.

तिने तिथे का असावं याला काही कारण नाही? स्वप्नात कोण कुठे का असतं याला काही कारणं असतात का, की याला असावं?

1:15>>1:30

गाडी सा‌ईड स्टँडला लावून ती थेट कड्याच्या दिशेने चालायला निघते. मागच्या स्वप्नात ही प्रगती झाली नव्हती. कड्याच्या दिशेने का जायचं म्हणते मी!

1:30>>2:17

तो कडा एपिक आहे. जमिन संपून थेट आकाश सुरु व्हावं असा दिसणारा. जमिन संपते तिथे खाली कित्येक फूट खाली पाणी सुरु होतं. खाली पाहिलं की थेट 90 अंशात खाली जाणारा काळाकरंद कातळ आणि खाली कोणा हौशी इप्रेशनिस्टने लाटांची इप्रेशन्स काढावीत तशा दिसणा-या लाटा. बरं, नुसत्या लाटा नाहीत तर त्या फेसामधून छद्मी हसत मान वर काढणारे रौरव खडक देखील. इथून थेट हेड ऑन खाली पडलो तर आपल्या शरीरातलं नेमकं काय वाचेल याचा होपलेस हिशोब न करवणारा आहे.

कुठेतरी वाचलेलं- 'जायते यस्मात च, लीयते यस्मिन इति जल:'

इथूनच आलो, इथेच संपू. 

काहीतरी भलतंच. स्वप्नात आपले चार दोन स्क्रू इथेतिथे सांडतात का?

ती कड्याच्या कडेवर जा‌ऊन थांबते आणि खाली वाकून पाहाते. ती उभी आहे तिथे पिशवीभरुन सांडावं तसं झगझगतं ऊन आहे, बाकी कड्याला ढगांच्या सावल्या लागल्या आहेत. वारा तिला सारखा मागे ढकलून द्यायचा प्रयत्न करतोय आणि ती तितक्याच निकराने पोक काढून वाकून पाहाते आहे. 

झालं पाहून? आता मागे वळ आणि गपचूप गाडीला किक मार आणि मला जागं हो‌ऊ देत. 

2:17>>2:55

पण नाही- ती ताठ होते, पायाच्या टाचा जुळवते आणि चवड्यांवर शरीर तोलत टाचा उचलायला लागते. ब्लॅक स्वॉनमधल्या ओं प्वॉ‌ईंट पोझसारखी.

आता हे काय? 

हळूहळू तिच्या शरीरातला तोल लयाला जातो आहे, पाय लटपटायला लागले आहे, आता फार काळ चवड्यांवर नाही उभं राहाता येणार. नजर आकाशाकडे, कंबरेला, पायाला रग लागलेली.

आपण झोपलेलोच आहोत, स्वप्नात डोळे मिटून तरी कसे घेणार?

इतक्यात वा-याचा एक मोठा झोत गुरगुरत येतो आणि तिला एकदम मागे ढकलूनच देतो. ती भेलकांडत एकदम चार पावलं मागे जा‌ऊन पडते. 
ती क्षणभर अवाक्!

ती काय-मी पण!

आणि तिला खळखळून हसू फुटतं

ब्लॅक‌आ‌ऊट. 

--

सकाळचे सहा वाजलेले. ती बाजूच्या डबीतून व्हॅसलिन घे‌ऊन कोरड्या हातांना चोळते. 

पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्नं खरी ठरतात असं ऐकलंय.
स्वप्नातील स्वप्नं कधी खरी ठरतात का?

कामिनोच्या दुस-या ट्रॅकचा लूप अव्याहत चालूच आहे. तो 'वामोस!' म्हणतो आहे खरा-पण तिला येववत नाहीये. हा लूप सोडवल्याशिवाय नवे स्वप्न पाहाणे नाही.

--

'एय्या'ला अजून बराच अवकाश आहे.’आल्मा’

00:00 >> 00:24

त्या खोलीला केस, साडी झटक्यात सावरुन लागलीच बाहेर पडणा-या बा‌ईचा चेहरा आहे.

पुस्तकांच्या थप्प्यांवर असलेल्या पुस्तकांच्या थप्प्या चादर पांघरुन पेंगणा-या भुतासारख्या वाटतायेत. 

खिडक्या उघड्या नाहीत, पंखा फिरत नाही. 
हे असं बोलायला ती केव्हा शिकली? खिडक्या बंद आहेत, पंखा बंद आहे असं म्हटलं असतं; तर, त्यांच्या स्टेट ऑफ बी‌ईंगमध्ये नेमका काय फरक झाला असता? 

फ्रिजचा नेहमी ऑन असणारा लालबुंद, आत खोलखोल अजून एक विश्व असावं आणि त्यात एलियन्स असावेत असा वाटणारा दिवा आज ब्लॅकहोलसारखा दिसतोय. 

फोनच्या चार्जिंगचं बटनही आज ऑफ आहे. त्याचा नेहमी दिसणारा चौकोनी भाग धुळमटलेला काळसर दिसतोय आणि कधी नव्हे ते, नेहमी सर्कीट बोर्डाच्या आत असणारं त्याचं बूड आज बाहेर आलंय. छान कोरं, करकरीत पांढरं आहे. इनोसण्ट, व्हर्जिन पोरीसारखं. आता काही दिवसांमध्ये त्याचीही व्हर्जिनिटी जा‌ईल. सगळ्यांचीच केव्हाना केव्हा जातेच. 

पूर्वेकडची एक खिडकी कधीच बंद होत नाही. कितीही जोर लावा, बुधलाभर तेल घाला. नाना परी करुन झाल्या.  मग त्या फटीवर जिलेटिन पेपर लावला. वरच्या एक चतुर्थांश भागावर पिवळा, त्याखालच्या अर्ध्या भागावर लाल आणि सर्वात खाली निळा असा. त्या फटीतून सकाळी प्रकाश झोताने झगमगत सांडतो तेव्हा एका वेगळ्याच मितीतलं जग खुलं झाल्यासारखं वाटतं. हा प्रकाश म्हणजे एका वेगळ्या जगाचं पोर्टल. त्या झोताने खोलीचे दोन भाग केले आहेत. रोज सकाळी ती या झोतामधून चालत खोलीच्या या भागातून त्या भागामध्ये जाते- कधीतरी ती दुस-या जगात जा‌ऊन पोहोचेल अशा अपेक्षेत. पण या बाजूने त्या बाजूला जाते तेव्हा एक एकटा, एकही सुरकुती नसलेला, चादर ताणून बसवलेला बेड तिची वाट पाहात असतो आणि त्या भागातून या भागात येते तेव्हा वाचायाच्या राहिलेल्या पुस्तकांचा डोंगर तिची वाट पाहात असतो. नेहमी. एकही दिवस एकाही तपशीलाचा बदल न होता. बेडवर सुरकुत्या येत नाहीत, पुस्तकांचा डोंगर इंचभरही कमी होत नाही. 

आताही ते पोर्टल झगमगतं आहेच. "तू गेलीस की उघडेल बघ’, अशा वाकुल्या दाखवत असल्यासारखं. बाकीची फिल्टर्ड ब्लॅक अँड व्हा‌ईट खोली धुळीच्या पोलका डॉट्सने सजलेली, उगीच. एखाद्या खास प्रेमभंगानंतर आपण उगीचच सजून अजून काळवंडलेल्या चेह-याने बाहेर पडतो तेव्हासारखी.

त्या काळोख्या कोप-याला प्रकाशात भटकून यावेसे वाटत नसेल का?

श्शूssss

ती मोठ्या कष्टाने खोलीला मनावेगळं करुन, खोलीकडे पाठ करुन बाहेर पडते आणि आपल्यामागे दार लावून घेते. दार बंद करताना खोलीत पडलेल्या शेवटच्या तिरीपीत टेबलावरच्या कागदावरच्या शेवटल्या मायन्याची अजून ओलीकंच असलेली शा‌ई लक्ककन चमकून जाते.

’आल्मा’

00:25>>00:49

ओळखीच्या वासांमधून, ओळखीच्या आवाजांमधून ती वजनविरहित मूढतेने तरंगत चालली आहे. त्या प्रत्येक माणसाबद्दलची एकाद-दुसरी तद्दन निरुपयोगी डिटेल तिच्या डोक्यात कुठेतरी चमकून जाते. आपल्याला या माणसाबद्दलची ही माहिती का माहित आहे? ही माहिती आपण का लक्षात ठेवतो? किंबहुना ती का लक्षात राहाते?

दोन डावी वळणं, एक उजवं वळण, मग सरळ रस्ता. ती सवयीने चालत राहाते. दुसऱया वळणावर बसणाऱया वेड्या भिकाऱयाचे केस कोणीतरी स्वच्छ कापून दिलेत. अंगाखालची चादर स्वच्छ आहे. 

00:50>>1:10

तिच्या मनातलं ऊन बाहेरही आहे. ती सवयीने चालते आहे, चालत राहाते.. चालत राहाते.

बरोब्बर चारशे सत्याहत्तर पावलांनंतर एस.टी स्टँड येतो.
तिला ओळखीच्या नसलेल्या वेगवेगळ्या गावी जाणा-या चार एस्टी समोर उभ्या आहेत. त्यातल्या कुठल्यातरी एका एस्टीत शिरते आणि नेहमीसारखी डाव्या बाजूला पुढून तिस-या सीटवर बसते. मग पुन्हा उठून डोळे मिटून कुठल्यातरी सीटवर जाऊन कोसळते आणि मागे रेलून डोळे मिटून घेते.


1:10>> 1:45

कंडक्टर तिकीटासाठी तिला जागं करतो, तेव्हा बस एव्हाना शहराची वेस ओलांडून बाहेर पडली आहे. या हवेला वंगणाचा, डीझेलचा वास नाही. बस पूर्ण भरली आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यातला एकही चेहरा ओळ्खीचा नाही, याच्यामधल्या एकाही माणसाबद्द्लचं एकही फ़ॅक्ट आपल्याला माहित नाही याचं तिला बरं वाटतं. ती अशाच निरुपयोगी, अतिशय त्रासदायक, थकवणा-या डिटेल्स, गडद ३डी तपशीलांपासून स्वत:ला दूर खेचत इथे घेऊन आलिये.

बाजूला बसलेला मुलगा तिच्याकडे कुतूहलाने पाहातो आहे, किंवा किमान तिला असं जाणवतं आहे. तो तसा बराय. बसमध्ये एखादा अनोळखी मुलगा आवडला की त्याच्यासोबत गप्पा व्हाव्यात, दोघांच्या जाण्याचं ठिकाण एकच असावं आणि मग एकमेकांचं नावही न सांगता एकमेकांचा निरोप घे‌ऊन दूर निघून जावं ती तिची लाडकी  फँटसी. पण प्रत्यक्षात तिच्याचेही हे काही व्हायचं नाही. प्रयत्न करुन कोणाशी दोन शब्द बोलायला तोंड उघडणं म्हणजे महात्रास. 

पण, आजचा दिवस वेगळा आहे. हवा वेगळी आहे, सगळा नूर वेगळा आहे.

आणि, कशा काय माहित, गप्पा सुरु होतात. कोणी सुरुवात केली हे आठवत नाही. 

स्टॉपमागून स्टॉप येतात. तासांमागून तास उलटतात. एकमेकांबद्दलच्या सोडून एकमेकांच्या भोवतालच्या, -साठीच्या,-आवडीच्या, -नावडीच्या सर्व गप्पा होतात. काय बोलायचं म्हणून घुटमळ झाली असा एकही क्षण येत नाही. 

1:45>>2:00

पण, प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. असा शेवट असणं चांगलंच. त्याचा थांबा येतो. त्याला उतरायचंय पण त्याचा पाय निघत नाहीये. 

बस ताटकळलेली. कंडक्टर जोरात खेकसतो. 

गप्पांच्या ओघात तो या गावी काय करायला चाललाय, इथून कुठे जाणारेय हे विचारायचंच राहिलं. आपण का विचारलं नाही?
का? याचंही कारण तिला माहित आहे. त्याचं कारण काय असेल? 

उतरावं का त्याच्यासोबत? तसंही जायचं कुठंय हे कुठे ठरलंय? पण, नकोच. शेवटी अतिविचार करुन मोडता घालणारा तिचा मेंदू तिला त्याचा निरोप घ्यायला लावतो.

नो, इटस टू गुड टू बी ट्रू.

2:00 >>2:34

बस चालू होते. बसने उठणा-या धुळीच्या लोटात तो दिसेनासा होतो. धुळीचा लोट खाली बसतो तेव्हा त्याला बस वळणाआड नाहिशी होताना दिसते आणि एक पेपर क्रेन तरंगत त्याच्यासमोर ये‌ऊन पडतो. त्यावर लिहिलेलं असतं-

’आल्मा’

त्याचं नाव तिला कधीच जाणून घ्यायचं नव्ह्तं. अशा फ़ॅक्ट्समध्ये तिला आता अजिबात रस राहिला नाही.
बसमध्ये तिने पुन्हा एकदा डोळे मिटून घेतलेत. तिचा पुढचा प्रवास सुरु झालाय.
कदाचित तो याआधीच्या प्रवासांहून कमी त्रासदायक असेल. 
’कामिनो’चं पहिलं पर्व संपलंय.

’रोमन साम्राज्याचा पाडाव’

रोमन साम्राज्याचा पाडाव *

रविवारी सकाळी वारा जरा सुसाटल्याचं माझ्या लक्षात आलं. अगदी नेमकंच सांगायचं झालं तर, तेव्हा दोन वाजून सात मिनीटे झाली होती.

त्या वेळी मी नेहमीसारखा- म्हणजे मी दर रविवारी असतो तसा- टेबलापाशी बसून माझ्या डायरीमध्ये आठवडाभराच्या नोंदी उतरवून काढत होतो. पाठी कुठलंतरी गाणं वाजत होतं. प्रत्येक दिवसातल्या ठळक गोष्टींची डोक्यात नोंद करुन ठेवायची आणि रविवारी त्या डायरीत लिहून काढायच्या हा माझा नेम होता.
तीन दिवसांच्या नोंदी लिहून मंगळवार आटपतोय इतक्यात मला खिडकीबाहेर जोरात वाहणा-या आणि खिडकीवर दाणदाण वाजणा-या वा-याची जाणीव झाली. मी लिहिणं थांबवलं, पेनाला टोपण लावून ठेवलं आणि दोरीवरचे कपडे काढायला व्हरांड्यात गेलो. सगळ्या कपड्यांची नुसती फडफड फडफड चालली होती. सुकून कडकडीत झालेल्या कपड्यांचे जोरदार सपकारे बसत होते. वा-यावर फडफडताना ते आकाशात मोकाट सुटलेल्या धूमकेतूसारखे वाटत होते.

असा सुसाट वारा सुरु हो‌ईल याची मला कल्पनाच नव्हती. सकाळी, अगदी नेमकंच सांगायचं झालं तर,दहा वाजून अठरा मिनीटांनी, वा-याचा मागमूसही नव्हता आणि याबाबतीत माझी स्मरणशक्ती तल्लख आहे. मी हे इतक्या छातीठोकपणे का सांगतोय तर, मी सकाळी कपडे वाळत घालत असताना अशा शांत, वारा नसणा-या दिवशी कपड्यांना क्लिपा लावायची पण गरज नाही असा विचार मी केलेला.

अगदी गळ्याशप्पथ, तेव्हा वा-याची साधी फ़ुंकर देखील इकडून तिकडे जात नव्हती.

मी भराभर कपडे गोळा केले आणि खिडक्या बंद करायच्या मागे लागलो. खिडक्या बंद झाल्या तसा वा-याचा आवाज ऐकू ये‌ईनासा झाला. त्या बिन‌आवाजी वादळामध्ये बाहेरची हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं प्रचंड खाज सुटलेल्या, पण त्या खाजेचं काय करावं हे समजेनासं झालेल्या कुत्र्यासारखी भोवंडत होती. ढगांचे पुंजके पाळत ठेवणा-या गुप्तहेरासारखे येत होते, जात होते. व्हरांड्यात कपडे वाळत घालायच्या दो-यांना बिलगून बसलेले शर्ट दिसत होते-अनाथ बच्ची बिलगतात तसे.

बाहेर चक्क वादळ सुरु झालंय, मी मनात म्हटलं.

मी पेपर उघडला आणि हवामान खातं काय म्हणतंय ते पाहिलं. पण तिथे वादळाचा अंदाज वर्तवल्याचं दिसलं नाही. पावसाची शक्यता तर 0 टक्के वर्तवली होती. रविवारची शांत दुपार कशी भरभराटीच्या दिवसातल्या रोममधील सुस्त दिवसासारखी वाटायला हवी आणि ती तशीच असायला हवी होती.

मी सुस्कारा सोडला. तो बहुतेक 30 टक्के सुस्कारा असावा. मी पेपर घडी करुन ठेवून दिला. मग कपडे घडी करून खणात ठेवून दिले. मघाच्याच त्या निरुपद्रवी गाण्यासारखी अजून काही गाणी ऐकत कॉफी बनवली आणि कॉफीचा वाफाळणारा मग घे‌ऊन डायरी उघडून बसलो.

गुरुवार, गर्लफ्रेण्डसोबत सेक्स. तिला सेक्स करतेवेळी डोळ्यांवर पट्टी बांधायला आवडते. तेवढ्याकरता ती प्रवासाच्या बॅगेमध्येही एक पट्टी नेहमी बाळगते- कधी लागलीच तर असावी म्हणून
ते मला आवडतं असं नव्हे, पण, ती डोळ्यांवर पट्टी बांधून इतकी क्यूट दिसते की मी निषेध वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. आपण माणसं आहोत शेवटी, प्रत्येक माणसात काही ना काही वैचित्र्य असतंच.

गुरुवारची नोंद इतकीच. 80 टक्के वास्तव आणि 20 टक्के टिप्पण्या. ही माझी डायरी लिहायची पद्धत आहे.

शुक्रवार, गिंझा बुकस्टो‌अरमध्ये मला माझा जुना मित्र भेटला. त्याने भयानक टाय घातला होता. रेघारेघांच्या टायवर टेलिफोन नंबर होते. मी इतके लिहितोय तोच टेलिफोनची घंटी वाजली.

1881चा भारतीय उठाव *

टेलिफोन घणघणला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटे झाली होती. तिचाच फोन असावा बहुधा- डोळ्यांवर पट्टीवालीचा- म्हणजे मला आपलं असं वाटलं. ती रविवारी येणार होती आणि येण्या‌आधी ती नेहमी एक फोन करते. रात्रीच्या जेवणाचं सामान तीच आणणार होती. आज रात्रीसाठी आम्ही ऑयस्टर हॉट पॉटचा बेत केला होता.

तर असो, टेलिफोन वाजला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटे झाली होती. माझा अलार्म टेलिफोनच्या बरोब्बर बाजूला आहे. त्यामुळे फोन उचलताना किती वाजलेत हे नेहमी कळतं आणि ते बरोब्बर लक्षात राहातं.

मी फोन उचलला तेव्हा रिसिव्हरमधून मला फक्त वा-याचा घूं घूं आवाज ऐकू आला. 1881च्या उठावात सामील झालेल्या भारतीय सैनिकांच्या संतप्त घोषासारखा. ते केबिन्स जाळत होते, टेलिग्राफ तारा कापत होते, कँडीस बर्जनवर बलात्कार करत होते.

"हॅलो", मी विचारुन पाहिलं, पण माझा तो इवलासा आवाज त्या संतप्त तांडवात कुठल्याकुठे विरुन गेला.
हॅलो? हॅलो? मी जोरात ओरडून पाहिलं पण व्यर्थ!

मी कानाला ताण दे‌ऊन ऐकायचा प्रयत्न केला तेव्हा त्या घोंघावण्यात एका स्रीचा बारीकसा आवाज ऐकू आला, किंवा मला तसा भास झाला. वा-याचा आवाजच इतका होता की खात्रीने काही सांगता येणं अशक्य होतं. वा-याला अक्षरशः वेड लागलं होतं.

मला एक शब्दही बोलता आला नाही. मी रिसीव्हर कानाला लावून तसाच तिथं उभा होतो, रिसिव्हर कानाला चिकटवून उभा होतो असं म्हटलं तरी चालेल. मला वाटलं की, तो आता कानापासून सुटा होणारच नाही. पण, 15 ते 20 सेकंदांनतर टेलिफोन बंद झाला, सीझर ये‌ऊन एखादं आयुष्य कच्चकन संपावं तसा. उरली फक्त अचानक घेरुन येणारी रिकामी शांतता- सारखंसारखं ब्लीच करुन म‌ऊपणा हरवलेल्या अंडरवे‌अरसारखी.

* हिटलरचं पोलंडवर आक्रमण *

आता काय? असा विचार करुन मी पुन्हा एकदा डायरी लिहायला सुरुवात केली, निदान या नोंदी संपवून टाकू असा विचार करत.

शनिवार, हिटलरच्या सशस्त्र सैन्याने पोलंडवर हल्लाबोल केला. वॉरसॉवर डा‌ईव्ह बाँबर्स घिरट्या घालत-

अरे, हे काय लिहितोय मी. असं थोडीच घडलं? हिटलरने 1 सप्टेंबर, 1939 रोजी पोलंडवर हल्लाबोल केला होता, काल नव्हे. काल रात्री जेवण झाल्यावर मी मूव्ही पाहायला गेलो होतो. मेरील स्ट्रिपचा ’सोफीज चॉ‌ईस’ पाहिला. त्यात हिटलरच्या पोलंडवरील आक्रमणाचा उडता उल्लेख आहे. त्या मूव्हीमध्ये मेरिल स्ट्रिप डस्टिन हॉफमनला घटस्फोट देते. नेहमीच्या ट्रेन प्रवासात तिला एक सिव्हिल इंजिनीयर म्हणजे रॉबर्ट डी निरो भेटतो आणि ती पुन्हा लग्न करते. ठिकठाक मूव्ही.

माझ्या बाजूला हायस्कूलमधले दोन मुलगा-मुलगी बसले होते. ते सारखे एकमेकांच्या पोटाला हात लावून पाहात होते. हायस्कूल विद्यार्थ्यांचा उदरस्पर्श काय! चालायचंच! एकेकाळी मी पण कोणाच्यातरी पोटाला असा हात लावून पाहिला होता.

घोंघावत्या वा-याचं साम्राज्य *

मागच्या आठवड्यातल्या नोंदी लिहून संपल्या तशी मी डायरी मिटली आणि रेकॉर्ड ट्रकच्या समोर जा‌ऊन बसलो. रविवारच्या वादळी दुपारी ऐकण्यासाठी काही गाणी निवडली. त्यात शोस्ताकोविचचा चेलो काँचेर्तो होता, स्लाय अँड द फॅमिली स्टोन अल्बम होता. घोंघावत्या वा-यात ऐकायला बरी पडली असती ही गाणी! मग मी ती लागोपाठ ऐकली. यादरम्यान खिडकीबाहेरचं नाट्य सुरुच होतं. एक पांढरी चादर चेटकिणीसारखी वा-यावर उडत उडत पूर्वेकडून पश्चिमेला गेली. समोरचा पत्र्यांचा मोडकळीला आलेला पत्र्याचा फलक पार वाकला होता, अॅनल सेक्स करकरुन पाठीला बाक आलेल्या माणसासारखा. शोस्ताकोविचचा चेलो ऐकत ऐकत मी बाहेरचं नाट्य पाहात बसलो होतो. तेवढ्यात टेलिफोन पुन्हा वाजला. तेव्हा टेलिफोनच्या शेजारच्या त्या अलार्ममध्ये 3:48 वाजले होते. आता पलीकडून बोईंग 747 जेट इंजिनच्या घरघराटाशिवाय काही ऐकायला मिळायचं नाही अशी मनाची तयारी करुन मी रिसिव्हर उचलला. पण यावेळी पलीकडून वा-याचा आवाज ऐकू नाही आला.

"हॅलो", ती म्हणाली.

"हॅलो", मी पण म्हणालो.

"मी आता सामान आणायला बाहेर पडतेय, ओके?" माझी गर्लफ्रेण्ड म्हणाली. आता ती सगळं सामान घे‌ऊन घरी ये‌ईल, येताना तिची डोळ्यावरची पट्टी आणेल.

"ते ठीक आहे पण.."

"तुझ्याकडे कॅसेरोल आहे का?"

"होय, आहे, पण..",  मी म्हटलं, "काय झालंय तिथे? मला आता वा-याचा आवाज अजिबात ऐकू येत नाहीये."

"हो, वारा थांबलाय आता. इथे नाकानोमध्ये तीन वाजून पंचवीस मिनीटांनी थांबला. तुमच्या इथेही थांबायला वेळ लागणार नाही."

"बहुधा तसंच हो‌ईल", असं म्हणून मी देखील रिसिव्हर खाली ठेवला. फडताळाच्या वर एक साठवणीची जागा होती, तिथे कॅसेरोल होता, तो काढला आणि सिंकमध्ये धुतला.

मी अंदाज केल्याप्रमाणे वारा थांबला.. 4 वाजून 05 मिनीटांनी तंतोतंत. मी खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं. खिडकीच्या बरोब्बर खाली एक कुत्रा मन लावून जमीन हुंगत होता. पंधरा वीस मिनीटं झाली तरी त्याचं हुंगणं चालूच होतं. त्याला जमीन का हुंगाविशी वाटली याचं कारण मात्र मला समजू शकलं नाही.

हे इतकं सगळं घडलं तरी जग वारा सुरु व्हायच्या आधी होतं तसंच राहिलं होतं. ते हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं काही झालंच नाही अशा थाटामध्ये उभी होती. वाळत घातलेले कपडे पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या दो-यांवरुन लांबायला लागले होते. टेलिफोनच्या खांबांवर बसलेल्या कावळ्यांनी एकदोनदा पंख फडफडवले. त्यांच्या चोची आता क्रेडिट कार्डासारख्या चकचकीत झाल्या होत्या. मी हे सर्व पाहात असताना माझी गर्लफ्रेण्ड घरी ये‌ऊन हॉटपॉट बनवायच्या तयारीला लागली होती. किचनच्या कट्टयापाशी उभे राहून तिने ऑयस्टर साफ केले, कोबी कापला, टोफूचे तुकडे आणि वाफाळता ब्रॉथ तयार करून ठेवला. तिने 2:36 मिनीटांनी मला फोन करायचा प्रयत्न केला होता का असं मी तिला विचारलं.

मोठ्या पातेल्यात तांदूळ धुवून घेता घेता ती उत्तरली, "हो, मीच केला होता."

"मला काहीच ऐकू येत नव्हतं."

"हो, वाराच तेव्हढा होता", आहे हे असंच आहे या थाटात माझी गर्लफ्रेण्ङ.

मी रेफ्रिजरेटरमधून बी‌अर काढली आणि ती प्यायला टेबलाच्या कडेशी ये‌ऊन बसलो.
"पण बघ ना, अचानक वारा सुरु झाला, अचानक थांबला देखील", मी विचारलं.

"मला पण कळत नाहीये", ती उत्तरली. नखांनी कोळंब्या सोलत ती माझ्याकडे पाठ करुन उभी होती. "वा-याचं काही सांगता येत नाही. आपल्याला ब-याच गोष्टींबद्दल बरंच काही माहित नसतं. इतिहासाचंच उदाहरण घे, किंवा कॅन्सरचं. समुद्रतळाबद्दल किंवा अवकाशाबद्दल, फारफार तर सेक्सबद्दल तरी आपल्याला सगळं कुठे माहित असतं?"

"हं", मी उत्तरलो. हे काही उत्तर नव्हे, पण, या विषयावर तिच्याशी जास्त बोलता आलं नसतं हे स्पष्ट झालं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला आणि ऑयस्टर हॉट पॉट कधी बनतोय याची वाट बघत बसून राहिलो.

"ए, मी तुझ्या पोटाला हात लावून पाहू का?",  मी तिला विचारलं.

"नंतर."

मग मी हॉट पॉट बनतोय तोवर पुढच्या आठवड्यात डायरीत लिहिण्यासाठी डोक्यात आजच्या दिवसभरातील घटनांची टिपणं तयार करायचं ठरवलं आणि माझ्या डोक्यात नोंद झाली ती अशीः

  • रोमन साम्राज्याचा पाडाव
  • 1881चा भारतीय उठाव
  • हिटलरचं पोलंडवरील आक्रमण

फक्त इतकंच: आणि, मी पुढच्या आठवड्यात आज काय घडलं होतं हे नेमकं सांगू शकलो असतो. नोंदी डोक्यात टिपून ठेवण्याच्या माझ्या या चोख आणि काटेकोर पद्धतीमुळेच मी एकही दिवस न चुकता गेली बावीस वर्षे डायरी लिहितो आहे. प्रत्येक अर्थपूर्ण गोष्टीमागे ती करायची खास पद्धत असते. मग वारा सुसाटो, अथवा पडो, मी असाच जगतोय, जगत आलोय.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

एक व्हिल, दोन व्हिल, डॉगव्हिल!

तसं बघायला गेलं तर हे काही मोठं गहन सत्य वगैरे नाही. आपल्या सर्वांकडे चॉ‌ईस असतो. एखादी परिस्थिती आहे तशी स्वीकारायची किंवा नाही, लोकांना स्वीकारायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. हा निर्णय बहुतेक वेळा प्रचंड क्रूरपणे घ्यावा लागतो. त्यामुळेच आपण बरेचदा एखाद्या परिस्थितीचं, लोकांच्या अशा-तशा असण्याचं-नसण्याचं खापर कोणत्यातरी दुस-या परिस्थितीवर, दुस-या लोकांवर फोडून, आहे त्या परिस्थितीची अनेक स्पष्टीकरणे देत निर्णय घेणं लांबणीवर टाकत असतो. अशा निवड करण्यातून-न करण्यातून, स्पष्टीकरणं देण्यातून उद्भवलेलं द्वंद्व म्हणजे डॉगव्हिल. क्रूर होण्याविषयी वाटणा-या भीतीतून डॉगव्हिल घडतो. कुब्रिक, तार्कोव्हस्कीच्या जातकुळीतल्या लार्स व्हॉन ट्रि‌एरने देखील मोजके सिनेमे केले. ’डॉगव्हिल’ हा त्याच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक.

डॉगव्हिल हा चित्रपट ग्रेस नावाच्या मुलीभोवती फिरतो. गँगस्टर्स मागावर असलेली ही ग्रेस जीव वाचवून पळ काढताना डॉगव्हिलमध्ये ये‌ऊन पोहोचते. ग्रेसला गावात लपायला जागा हवी असते, पण, गावकरी या अनोळखी मुलीला गावात ठेवून घ्यायला नाखूष आहेत. पण, प्रत्येक गावात (किंवा गावांच्या पाहिल्या-वाचलेल्या कथांमध्ये) एक स्वघोषित उदारमतवादी, चिंतनशील उमदा पुरुष असतोच, तसा इथे थॉमस एडिसन ज्युनियर आहे. तो गावक-यांना राजी करतो. कृतज्ञ ग्रेस या उपकारांच्या बदल्यात गावातल्या लोकांना कामात मदत करण्याची इच्छा बोलून दाखवते. आपल्याकडे तिला देण्यासारखं काही काम नाहीच आहे असं निक्षून सांगणा-या गावक-यांकडे ग्रेस कामं शोधून काढते. गावक-यांना आपलंसं करते.
ग्रेसफ़ुल ग्रेस
तिला आपल्या परीने त्यांची मदत करायची आहे बस्स. काही दिवसांनंतर ते गँगस्टर्स तिचा शोध घेत घेत डॉगव्हिलमध्ये ये‌ऊन पोहोचतात आणि ग्रेसला गावात ठेवणं किती जोखीमीचं आहे हे गावक-यांना कळतं. आपण पत्करत असलेल्या जोखीमीची परतफेड म्हणून ग्रेसने गावक-यांकडे अधिक वेळ काम करावं असं ठरतं. उपकारांची परतफेड म्हणून ग्रेस त्यालाही राजी होते; आणि, मग ग्रेसला द्यायला अजिबात कामं नसलेल्या गावक-यांकडे पुष्कळ कामं निघायला लागतात, ग्रेसवर ताण यायला लागतो. लैंगिक भूक भागवण्याच्या कामाकरिता देखील तिचा वापर करून घेतला जा‌ऊ लागतो. गावातील प्रत्येक पुरुष तिच्यावर बलात्कार करुन आपली लैंगिक भूक शमवून घेतो. आपण डॉगव्हिलचे गुलाम हो‌ऊन चुकलो आहोत हे ग्रेसला कळून चुकतं. ती पळायचा एक अयशस्वी प्रयत्नही करून पाहते. त्यानंतर मात्र तिच्या गळ्यात एक पट्टा अडकवण्यात येतो (हो! पूर्वी गुलामांच्या गळ्यात असायचा तसा) आणि त्या पट्याला सिमेण्टचं एक चक्र जोडण्यात येतं.
कामाने, छळाने पिचलेली ग्रेस खंगत जाते, पण, ग्रेसच्या नावातच ग्रेस आहे, क्षमाशीलता आहे. तिच्या मनात गावक-यांविषयी किल्मिष नाही. त्या डोंगराळ भागातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीने, खडतर आयुष्याने या लोकांना तसं बनवलं आहे , त्यात त्या लोकांचा दोष नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि मग एके दिवशी, ते गँगस्टर्स गावात ये‌ऊन ठेपतात आणि आपल्याला कळतं की त्या गँगस्टर्सचा म्होरक्या ग्रेसचा बाप आहे. मग त्यांच्यात काय चूक, काय बरोबर, काय नैतिक, काय अनैतिक यावर शाब्दिक द्वंद्व होतं. ग्रेससमोर दोन पर्याय उरतात. तिने डॉगव्हिलमध्येच राहावं आणि गावक-यांना तिचा फायदा घे‌ऊ द्यावा किंवा तिथून निघून जावं आणि तिच्यासारखी अजून कोणी ग्रेस तिथे ये‌ऊन तिची गत आपल्यासारखी हो‌ऊ नये याची खबरदारी म्हणून डॉगव्हिलला नष्ट करून टाकणं.

आणि ग्रेस डॉगव्हिलला नष्ट करण्याचा निर्णय घेते.

लार्स वॉन ट्रि‌एरचे सर्व चित्रपट पाहिलेल्या माणसाला त्याच्या चित्रपटाचा शेवट काय असणार आहे हे आपसूक सांगता येतं. ’निम्फोमेनियाक’मधली जो अधोगतीच्या सर्व पाय-यांवरुन गडगडत तळाला जा‌ऊन स्वतःची वाट लावून घेते, ’अँटीक्रा‌ईस्ट’मधली ’ती’ वेडाच्या थराला जाते, ’मेलॅन्कोलिया’मध्ये तर पृथ्वीच नष्ट होते, ’डान्सर इन डार्क’मध्ये ’सेल्मा’ला फाशी देतात, ’ब्रेकींग द वेव्ह्ज’मध्ये ’जॅन’ स्वतःहून मृत्यूच्या दारात चालत जाते. त्याच्या चित्रपटांचा शेवट बहुतेक वेळा, नव्हे, नेहमीच- विध्वंसाने, सेल्फ डिस्ट्रक्शननेच होतो. हे माहित नसते तरी या चित्रपटाचा शेवट वेगळा हो‌ऊ शकला नसता, व्हायला नको असं आतून वाटलं. चित्रपटाची शेवटची वीसेक मिनीटं डोक्याला हात लावून, कोरड पडलेल्या जिभेने पाहिल्यावर शेवट निराशा करत नाही. ते गाव नेस्तनाबूत झाल्याबद्दल अजिबात वा‌ईट वाटत नाही, झालं ते बरंच असं वाटतं. पण, ग्रेसच्या जागी आपण असतो तर हेच केलं असतं असं वाटतंय न वाटतंय तोच त्या विचारातलं वैयर्थ कळतं. एखाद्या परिस्थितीतून गेल्याशिवाय आपण काय करू शकतो हे आता कसं काय सांगता ये‌ऊ शकतं आपल्याला? ग्रेसच्या भूमिकेत जा‌ऊन देखील आपण ग्रेससारखा विचार करु शकणार नाहीच, आपण आपल्यासारखाच विचार करणार, आपल्याच कुवतीने निर्णय घेणार. ग्रेसला काय वाटत असेल हे देखील अनुभवू शकत नाही कारण, एम्पथी, तदनुभूती ही सब्जेक्टीव्ह कल्पना आहे. आपण दुस-याच्या वतीने, दुस-याच्या भूमिकेत जा‌ऊन बोलतानाही तिच्याबद्दलचे आपले विचार आपल्या वकुबाने, आपल्याच साच्यातून करत असतो. दुस-याची वेदना अनुभवता येते अलबत! पण त्या व्यक्तीची वेदना अनुभवण्याची पद्धत, त्याने उमटलेले काच वेगळे असतात. त्या व्यक्तीच्या इन्टेन्सिटीने आपण ती वेदना कधीच अनुभवू शकत नाही, आपल्याला झालेल्या कमाल वेदनांच्या वेळी अनुभवाला आलेल्या इन्टेन्सिटीने आपण ती अनुभवू शकतो. ग्रेस आणि तिच्या बापामध्ये झालेल्या चिंतनामध्ये ग्रेसचा बाप ग्रेसला समजावताना म्हणतो, "तू जी कारणं पुढे करून त्यांना माफ करते आहेस, त्या कारणांकरिता तू स्वतःला माफ केलं नसतंस." कशावरुन? ग्रेस गावक-यांच्या भूमिकेत असती, त्यांच्या परिस्थितीतून गेली असती तर कदाचित त्यांच्यासारखीच बनली असती.. किंवा बनली नसतीही. पण ती एखाद्या परिस्थितीत असती तर काय करु शकली असती आणि काय नाही याचे ठोकताळे बसल्या जागी कसे लढवता येतील? पण, ट्रि‌एर काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्यापुरता शोधण्याची जबाबदारी आपल्यावरच सोडून देतो.

ग्रेसच्या जागी एखादा ग्रॅहम असता तर डॉगव्हिल कसा असता हा अजून एक प्रश्न! शोषण शोषणच असेल आणि त्यात स्री-पुरुष असा भेद नसेल तर ट्रि‌एरने ग्रॅहम‌ऐवजी ग्रेसवर डॉगव्हिल का बनवला? नाट्य हा चित्रपटाचा आत्मा असेल तर पुरुषाच्या शोषणात आणि त्यातून त्याने घेतलेल्या सूडात नाट्य नसतं का?  डॉगव्हिलच नव्हे तर ट्रिएरची ’डिप्रेशन ट्रिलॉजी’देखील नायिकेभोवती फिरणारी आहे. निम्फोमेनियात ’जो’च्या निम्फोमेनियाबद्दल बोललं गेलंय आणि त्याच्या कडेकडेने गरज पडलीच किंवा कथेच्या ओघाने येतेच आहे म्हणून पुरुषी सेक्स ड्राईव्हवर भाष्य आहे. पुरुष निम्फोमेनियाक नसतात? की त्यांच्यात निम्फोमेनिया असतो हे अध्याह्रतच धरण्यात आलंय? अँटीक्रा‌ईस्टमध्ये ’ती’ आत्यंतिक शोकातून वेडाच्या थराला जाते, ’तो’ जात नाही- असं का? मेलॅन्कोलियामध्ये पृथ्वीचा काळ जवळ आल्याची जाणीव आणि त्यातून येणारी आत्यंतिक विषण्णता केवळ ’जस्टिन’लाच जाणवते. स्री ही अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तिला येणारे अनुभव हे बहु‌आयामी, बहुमितीय असतात आणि त्यामुळे ट्रि‌एरला स्री हा एक इंटरेस्टींग विषय वाटते हे तर उघडच दिसतं. आणि हे फक्त ट्रि‌एरच्या सिनेमांमध्ये नाही, तर ब-याचशा सिनेमांमध्ये दिसतं. सूडपटांमध्ये तर हे सर्रास दिसतं. मेमेण्टो, इनग्लोरीयस बास्टर्ड्स, म्युनिक असे सन्माननीय अपवाद सोडले तर बहुतेक सूडपटांमध्ये मुलीवर, प्रेयसीवर बलात्कार करून खून केला, कुटुंबाची खांडोळी केली म्हणून सूडाचा प्रवास सुरु होतो. पुरुषावर अत्याचार झाला, त्याला देशोधडीला लावला म्हणून त्याने सूड घेतला असे चित्रपट कितीसे आहेत? (’गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’ हा आताच आठवला) असं का असावं? स्रियांचे हालहाल, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांचं/त्यांच्याकरता कोणीतरी, सूडाने पेटून उठणं हे अधिक स्फोटक, अधिक चेतवणारं, अधिक नाट्यमय असतं म्हणून? असं असेल तर ते तसं का वाटतं? पुरुषावर बलात्कार झाला तर त्याचा सूडपट न बनता आतल्या‌आत धुमसणारा ’मिस्टिरीयस स्किन’च का बनतो?

प्रेक्षक कधीही चित्रपटाची कथा ’बनवू’ शकत नाही. चित्रपटात जे ’सांगीतलं’ गेलं आहे, ’बोललं’ गेलं आहे त्यावरुन त्याला कथा उमजते. डॉगव्हीलमधले गँगस्टर्स, चित्रपटाच्या शेवटी दाखवली जाणारी आर्थर रॉथस्टिन, डोरोथिया लान्ज यांची कृष्णधवल चित्रं, महामंदीच्या काळात टिपलेल्या त्या धुळमटलेल्या, विझलेल्या चेह-यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं डेव्हिड बोवीचं ’यंग अमेरीकन्स’ यावरुन डॉगव्हिल घडतो तो मंदीचा - अमेरीकेतला मंदीचा काळ असावा असं दिग्दर्शकाला सूचित करायचं आहे की काय असं वाटतं. ही छायाचित्रं महामंदीच्या काळामध्ये  महामंदीचा भस्मासूर प्रचंड ताकदीने लोकांसमोर आणण्याकरिता आणि त्यांना नव्या धोरणाचा स्वीकार करायला प्रवृत्त करण्यासाठी रूझवेल्ट सरकारद्वारा प्रसिद्ध केली गेली होती. पण,  डॉगव्हिलमधली माणसं कोणत्याही काळात, कोणत्याही देशात दिसतातच. अमेरीका काय, स्वीडन काय आणि भारत काय, विपन्नावस्था कोणत्याही, कुठल्याही माणसाच्या हातून कृष्णकृत्यं घडवते, उद्वेगात हातून नको नको ते घडून जातं; त्यामुळेच, डॉगव्हिल ही जागा कुठेही असू शकते. हा चित्रपट पाहताना काळ आणि जागेचं परिमाण लागू होत नाही. आपण केव्हाच ’यत्र तत्र सर्वत्र’च्या मूडमध्ये गेलेलो असतो.

डॉगव्हिल


लार्स व्हॉन ट्रि‌एरने सुरु केलेल्या ’डॉग्मे मूव्हमेण्ट’च्या ’वा‌ऊज ऑफ चॅस्टिटीं’चं प्रत्यंतर हा चित्रपट पाहताना येतं. हा संपूर्ण चित्रपट एका सा‌ऊंड स्टेजवर घडतो. आपण स्टेजच्या बाहेर जात नाही, त्याच्या पलीकडचं पाहात नाही. पलीकडे पाहण्यासारखं काही नाहीचे तिथे. आपण आटपाट गावाच्या गोष्टी ऐकत वाढलो. पण कधीतरी ती गोष्ट ऐकताना आटपाट नगराच्या बाजूला एक गाव असू शकेल, त्याला नाव असू शकेल, दोन्ही गावांमधली लोकं कशी ये-जा करत असतील, त्यांच्यामध्ये कसे संबंध असतील याचा विचार करतो का? तर, नाही. आपण मनाने केवळ आटपाट गावातच असतो. कथेतील स्थळ-काळाबद्दलचं संकुचितत्त्व कदाचित ट्रि‌एरला असं दाखवायचं असावं. स्टेजवर गाव दर्शवण्याकरिता घरे, प्रॉप्स अजिबात उभारलेले नाहीत, तर सरळ खडूने रेषा मारून गावातल्या घरांचा आभास निर्माण करण्यात आलाय. सर्व कलाकार मंडळी दार उघडण्याचा, बंद करण्याचा फक्त अभिनय करतात. चित्रपटाच्या शेवटी संपूर्ण गावाला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केल्यानंतर खडूच्या रेषा पुसलेलं कोरं स्टेज दिसतं.
ट्रि‌एर खडूंनी आखलेल्या रेषांमधून त्या जगाचं मिथ्यापण आपल्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करत असतो. खडूंनी आखलेले भिंतींचे, दारांचे आडोसे असले तरी पल्याड काय घडतंय हे आपल्याला दिसत असतं. सगळं काही, सगळ्यांच्या समोर घडत असतं. आणि आपण त्या कथेशी एकजीव होत असताना तितक्याच हट्टाने ते मिथ्या नाही असं म्हणत मनातल्या मनात त्या खडूंच्या रेषांवर काल्पनिक भिंती, छतं चढवायचा खूप, अगदी जीवतोड प्रयत्न करत असतो. एका ठिकाणी घडणारा प्रसंग पाहताना दुस-या ठिकाणी घडणा-या प्रसंगाकडे डोळेझाक करायचा प्रयत्न करतो. भिंती असत्या तर ते आपल्याला कळू शकलं नसतं असं स्वतःला समजावत. पण नंतर, खरंच? आपल्याला कळू शकलं नसतं? असा उत्तर आधीच माहित असलेला प्रश्न स्वतःला विचारतो. ना आपण त्या सेटच्या बाहेर कधी जा‌ऊ शकणार आहोत, ना कॅमेरा- ही जाणीव आपल्याला एक क्लॉस्ट्रोफ़ोबिक भावना करून देते. पण, प्रत्येकजण आपापलं एकटं आयुष्य जगत असला तरी ख-या अर्थाने एकटा कधीच नसतो हे सत्य देखील त्यातून आपसूक उमजतं आणि ट्रि‌एरला काय म्हणायचं आहे हे समजून आपण आपल्याही नकळत तो प्रयत्न सोडून देतो.

डॉगव्हिल हे रॉकी पर्वतात डोंगरभागात वसलेलं गाव आहे हे चित्रपट सुरु होतानाच कळतं. गाव म्हटलं की अठरापगड भाषा बोलणारी माणसं आली, पशु-पक्षी आले, देवळं आली, विहिरी आल्या, झाडं आली. इथल्या माणसांचे जुनाट कपडे, मळलेले चेहरे यांवरून त्यांच्या ओढगस्तीच्या परिस्थितीचा अंदाज यावा. डॉगव्हिलमधील लोकांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे; पण, ती त्यांनी ना‌ईलाज म्हणून असेल-पण स्वीकारली आहे. इथे कृष्णवर्णी, श्वेतवर्णी आहेत, त्यांच्या बोलण्याच्या ढबी वेगवेगळ्या आहेत, तिथे एल्म स्ट्रीट आहे पण त्यावर एकही झाड नाही, विहिरी नाहीत, देवळं नाहीत. या लोकांचा धर्म काय, धारणा काय हे चित्रपटात कुठेही सांगण्यात आलेलं नाही. धर्म या चित्रपटातून पूर्ण वगळण्यात आला आहे.

संपूर्ण चित्रपट एका धीम्या मोनोटोनमध्ये चालतो. कोणीही किंचाळतंय, गुणगुणतंय असं कधी होत नाही. गावातली नित्यकर्म सुरु असतात, सर्व पात्रे एकमेकांशी संथ एकसुरी आवाजात बोलत असतात. नॅरेटर असलेल्या जॉन हर्टचा (आठवा- द वॉण्ड चूझेस  विझर्ड मि. पॉटर!) आवाज देखील आपल्याला स्क्रीनवर दिसणारी, न‌ऊ प्रकरणांमध्ये घडणारी कथा आवाजातील चढ‌उताराशिवाय, तटस्थपणे सांगतो आहे. या चित्रपटात नॅरेटरचे प्रयोजन काय असावे? शब्दांच्या अभावाने सोडलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी?

इथे खाजगीपण नाही. स्टेजवरच्या पात्रांना नाही, आणि त्या पात्रांना नाही म्हणून आपल्या डोक्यातल्या पात्रांना नाही. दोन पात्रांमधील जवळीक फक्त त्यांच्यावर स्थिरावलेल्या थरथरत्या क्लोझ-अप्समधून दिसते. या चित्रपटात एक डोकं दुखवायला लावणारा चरचरीत प्रसंग आहे. व्हेरा आणि चकच्या घरात त्यांच्या लहान मुलांच्या बेडरुममध्ये चक ग्रेसवर बलात्कार करतो आहे, हे सुरु असताना रस्त्यावर काय चालू आहे, पलीकडच्या घरात काय चालू आहे हे आपल्याला दिसते आहे. कॅमेरा सर्व अदृश्य भिंतींना पार करत आपल्या नित्यकर्मांमध्ये मग्न असलेल्या डॉगव्हिलवर स्थिरावतो आणि आपल्याला कुठेतरी एका कोप-यात चाललेला तोच बलात्कार दिसतो. या आक्रमणाला पण खाजगीपण असू नये म्हणून आपली तगमग सुरु होते, फार भयाण, उघडं पडल्यासारखं वाटतं.

व्हेरा आणि चकच्या घरात काय घडतंय याची कल्पना डॉगव्हिलमधल्या माणसांना असू शकेल का? असू शकेल. पण असं असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नामानिराळं राहायची त्यांची वृत्ती, निरागसतेची झूल पांघरुन सुरु असलेला कातडीबचा‌ऊपणा; या सर्वांनी ती माणसं अधिकाधिक धोकादायक वाटत जातात. ग्रेसने तिथून लवकर सुटलं तर बरं, असं वाटायला लावतात. या माणसांना हिंसेतून प्रचंड सुख मिळतं, मग ती शारिरीक असो, वा मानसिक. त्यांच्या प्रत्येक कृतीला स्पष्टीकरणाचं अस्तर आहे, ठोस कारणं आहेत. ती दुटप्पी तर आहेतच, शिवाय, त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे एकाच जागी, एकाच कळपात राहून येणा-या साचलेपणाचा वृथा अभिमान बाळगण्याची वृत्ती देखील आहे. त्यांना प्रश्नही फार क्वचित पडत असावेत, कारण ती नेहमी वैश्विक सत्य सांगीतल्याच्या आविर्भावात बोलत असतात. संपूर्ण चित्रपटात कोणाच्याही बोलण्यात प्रश्नचिन्ह नाहीच. टॉमचे चांगले हेतू आपल्याला कळतात, पण कथा पुढे जाताना त्याचं प्रेम असलेल्या ग्रेसला सोडवण्याचं वारंवार वचन दे‌ऊनही वचन न पाळता आलेल्या वरकरणी प्रचंड उदारमतवादी, विचारी असलेल्या टॉममधील एक भेकड, कोता आणि सर्वसामान्य पुरुष उघडा पडत जातो. या चित्रपटातला प्रकाशाचा खेळही मोठा अजब आहे. एकाच व्यक्तीवर वेगवेगळ्या कोनातून प्रकाश पडल्यावर व्यक्ती वेगवेगळी दिसते हे आपल्याला माहितच आहे. पहिल्या पहिल्यांदा एका कोनातून प्रकाश पडल्यानंतर साध्या, नीरस दिसणा-या डॉगव्हिलवर घटनांनी वेग घेतल्यावर आणि सगळ्यांनी आपल्या नख्या बाहेर काढल्यावर एका वेगळ्याच कोनातून प्रकाश पडतो आणि त्यात ते गाव खरोखरीचं दुष्ट वाटतं. असे बदलणारे प्रकाश आपल्या कल्पना, दृष्टीकोनातील बदल सूचवतात.

संपूर्ण चित्रपटभर मा‌ईम आणि रेखाकृतींतून आपल्यासमोर साकार होणारं गाव, ऑर्चर्ड पाहिल्यावर मोझेसचा (कुत्र्याचा!) खडूचा आकार खराखुरा आकार घेतो तेव्हा नेहमीचा हाडामांसाचा कुत्रा पाहायची सवय असतानाही दचकायला होतं. पूर्ण चित्रपटात बोलणं, संषर्घ, वाद, शारीरिक, मानसिक हिंसाही अंडरटोन्समध्ये चालू असताना अचानक शेवटी बोवीचं उडतं ’यंग अमेरीकन्स’ लागतं तेव्हा प्रचंड अश्लील वाटतं. या चित्रपटाला पार्श्वसंगीतही नाही, असलेच तर, दारं उघडण्या-बंद होण्यातून, काहीतरी करण्यातून होणारे आवाज आहेत. त्यामुळे संगीत आपली कथेबद्दलची समजूत मॅनिप्युलेट करू शकत नाही.

डॉगव्हिल अॅक्शन आणि रि‌अॅक्शनचा नियम सांगतो, त्याहून जास्त कसलाही बोध होत नाही. फक्त रि‌अॅक्शन न्याय्य की अन्याय्य, याचा निवाडा करणं आपल्या हाती उरतं. त्यामुळे रूढार्थाने डॉगव्हिलला आटपाट नगरांतील कथांप्रमाणे नीतीकथा म्हणता येणार नाही. पण, अनुकूल परिस्थिती असेल तर गुन्हा कुठेही घडू शकतो हे माहित झाल्याने यत्र तत्र सर्वत्र घडणा-या गोष्टीचा वस्तुपाठ देणा-या कथेला नीतीकथा का म्हणू नये असाही प्रश्न पडतो. ट्रि‌एर प्रतिमांमधून कथा सांगता सांगता अशा रितीने साधर्म्यापर्यंत येतो.

--

असोसि‌एशन्स कशी बनतात?

प्रेमातून? गरजेतून? सोयीतून?

थोडक्यात ज्या व्यक्तीसोबत असण्याने आपला स्वार्थ साधला जा‌ऊ शकतो अशा व्यक्तीसोबत आपल्या असोसि‌एशन्स बनतात. अर्थात आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीचाही स्वार्थ साधला जायला हवा. ग्रेसला आधार हवा आहे आणि गावाला बाहेरच्या परक्या माणसाचं स्वागत करण्यातून उदारमतवादीपणा सिद्ध करायचा आहे. परस्परांच्या गरजांतून असोसि‌एशन तयार झाली. आपल्या सभोवतालच्या बहुतेक सर्व व्यवहारांना असोसि‌एशन्सचा पाया असतो. पण, या असोसि‌एशन्स हेल्दी आहेत किंवा नाही हे कोणी ठरवावं? ते कसं ठरतं? ग्रेस आणि गावकरी यांच्यातील देवघेव ही परस्पर समजूतींतून घडत होती. पण देव-घेवीतला समतोल बिघडला, जितकं दिलं-घेतलं जायला हवं, त्याहून कमी-जास्त दिलं-घेतलं गेलं , तर ती असोसि‌एशन हेल्दी असेल का? असोसि‌एशनमधील बॅलन्स ऑफ पॉवर कसा ठरतो? बॅलन्स ऑफ पॉवर नेहमी ज्याची निकड कमी त्याच्याकडे असतो का? तर मग, असोसि‌एशन्समध्ये नेहमी छुपं शोषक आणि शोषिताचंच नातं असतं? असोसि‌एशनमध्ये एकमेकांकडून एकमेकांचा जेवढा आणि जितका स्वार्थ साधला जायला हवा, जितकं दिलं-घेतलं जायला हवं, त्याहून कमी-जास्त दिलं-घेतलं गेलं तर त्याची परिणती कशात होते? ती विध्वंसक आणि विनाशकच असते का?

गरीबीने पीडल्या नाडल्या गेलेल्या मुलाने पाव चोरी करणे, प्रचंड भ्रष्टाचारामुळे नोकरी न मिळू शकलेल्या मुलाने दरोडे घालणे यांत ज्याने गुन्हे केले त्यांच्याकडे पाहायचं, की त्यांना ज्या परिस्थितीने गुन्हे करायला भाग पाडलं त्या परिस्थितीकडे पाहायचं असा प्रश्न आपल्याला हटकून पडतो. तसंच, प्रतिकूल परिस्थितीतून जगताना येणा-या वैफल्यातून एखाद्यावर अन्याय झाला, अत्याचार झाले, तर अन्याय करणा-याला शिक्षा झालीच पाहिजे हा हट्ट देखील धरला जातो. कोणता गुन्हा माफ करण्यालायक असतो आणि कोणता गुन्हा शिक्षेस पात्र असतो?

असे अनेक प्रश्न मला लार्स वॉन ट्रि‌एरचा डॉगव्हिल बघताना पडले. या प्रश्नांची माझ्यापुरता उत्तरं मिळालीशी वाटली, पण थोडा विचार केल्यावर त्यावरही प्रश्न पडतील हे देखील तितकंच खरं. कदाचित मी सेलिगमन म्हणतो तशी नखं कापायला उजव्या हातापासून सुरुवात करणा-या माणसांपैकी एक असेन. असो!