"नि इदिया!"

आपण आपलं पूर्ण आयुष्य कशाच्यातरी जंगी तयारीत घालवतो आणि ते ’काहीतरी’ कधीच घडत नाही.

खरंय.

आता माझंच घ्या ना.

मला कुठेही जाताना, असताना-नसताना ’काहीतरी’ घडणार हे सतत वाटत आलंय. पण, ते ’काहीतरी’ म्हणजे काय हे मला कधीच माहित नसतं; म्हणजे, मला ते माहित असावं किंवा त्याची अंधुकशी कल्पना असावी असं देखील मला वाटत नसतं. त्यामुळे होतं काय की, काहीतरी घडण्याची अपेक्षा जरी असली तरी काय घडायला हवंय हे माहित नसल्याने कुठेही जाऊन आल्यावर, असताना-नसतानाच्या नंतर नेमकं काय घडून गेलंय हे मला सांगता येत नाही, त्यामुळे ते घडल्यासारखं असतं. अशारितीने घडणा-या काहीतरीच्या मागे माझं आयुष्य घरंगळत चाललंय.

मला तेकाहीतरीमाहित असतं आणि ते घडलं असतं तर ते मला आवडलं असतं का?

नो आयडीया

-

आज आताही मी एके ठिकाणी निघालेय.

मी जायला निघालेय त्या ठिकाणाचं नाव, तिथे जायला किती वेळ लागतो हे मला सुदैवाने माहित आहे. आणि त्यातून माझ्यासोबत एक मित्र देखील आहे. आणि दोघेही कुठेतरी निघालेत म्हटल्यावर त्यातल्या एकालातरी आपण कुठे निघालो आहोत हे माहिती असतंच. असं माहित वगैरे असलं की बरं असतं. म्हणजे जायचं होतं एकीकडेच आणि पोहोचलो भलतीकडेच, असं होत नाही.

पाय फसून तोंडघशी पडायला होईल इतके विचार करकरून, त्यांची गुंतवळ करून मला काय मिळतं?

हे मला आजतागायत कळलेलं नाही.

-

मी एक सर्वसाधारण सुखी मुलगी असावे.

म्हणजे, मी तसं वाटून घेतलं असतं, तर नक्कीच असते; पण, मी तसलं काही वाटून बिटून घेत नाही.

का?

माहित नाही.

मी स्वतःला प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरंही आपणाहूनच देते. माझा आवडता छंद आहे तो.

"आता या क्षणी आपण टोटल आनंदी आहोत का? खरेखुरे खूष?"

मी अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून पाहाते.

"माहित नाही. असेनही किंवा नसेनही."

"पण आपण तसं मानून चाललं तर काय हरकत आहे?

मी तसं मानून पाहाते. पण थोडाच वेळ. थोड्याच वेळाने मला मनातल्या मनात उमगतं, की हे खरं नाही. या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे असं मी स्वतःशीच म्हटलं असतं, तर ते मला बोचत राहिलं असतं. माझ्यामधून बाहेर पडून मी स्वतःचीच निर्भत्सना करत म्हटलं असतं, "तू खूष आहेस हे थोतांड आहे".

काही वेळा वगळता मला नेहमीच असं वाटतं.

का?

कदाचित काहीतरी राहून गेलेलं असावं; कारण, हे आता जे काही आहे, ते पिक्चर पर्फेक्ट नव्हे.

पण काय राहून गेलंय?

माहित नाही.

-

परवा असंच झालं.

मी कुठेतरी चालले होते. कुठे ते मला नेहमीप्रमाणे ठाऊक नव्हतं. माझ्या बरोबरच्याला बहुतेक माहित असावं. तीनेक तासांच्या ड्राइव्हनंतर प्रवासात एके ठिकाणी पाय मोकळे करायला उतरलो. मी या पूर्ण कल्पनेवरच नाखूष; कारण, माझा आणि उन्हाचा छत्तीसचा आकडा. डोक्यावर पाणी ओतल्यावर अंगभर ओघळणा-या पाण्यासारखं ते ऊन अंगावरून सापाच्या गतीने खाली उतरतं, त्या उन्हाने अंगभर मुंग्या आल्यासारखं होतं, तेव्हा मला कसंसंच होतं, भोवंडून गेल्यासारखं होतं.

मला त्या चाव-या उन्हाचा मनोमन संताप येत होता. उन्हाच्या भपक्याने डोळे दुखायला लागले होते. उन्हाने चमकणा-या, लालसर होत जाणा-या माझ्या हातांकडे पाहात मी थोडंसं स्वतःशीच, थोडंसं दुस-याला उद्देशून म्हटलं, "थंडी वारली आहे का?"

तो काहीच बोलला नाही.

कोणीच काही बोललं नाही.

मी नक्की मोठ्याने बोलले का? की मनातल्या मनातच बोलले आणि मला मोठ्याने बोलल्यासारखं वाटलं?

पण, मला ती शांतता उधळून कशाची शहानिशा करण्यासाठी काहीतरी बोलण्याचा, करण्याचा कंटाळाच आला एकदम. एक वय असतं, जेव्हा आपण खोदून खोदून, स्वतःचं समाधान होईपर्यंत दुसऱयाला उलटसुलट प्रश्न विचारत असतो. मी ते वळण केव्हाच मागे टाकलंय.

पण, अशा शांततेमुळे फाटकन मुस्काटात बसल्यासारखं होतं.

आपल्या शांततेसारखी शांतता असलेली व्यक्ती असेल का कुठे अस्तित्त्वात? आणि असलीच, तरी त्या व्यक्तीची शांतता माझ्या शांततेसारखी आहे हे मला कसं कळेल?

नो आयडीया.

तोवर तरी दुस-याच्या शांततेने, गप्प असण्याने असं खजिल वाटून घेत राहायचं, प्रश्नांचं मोहोळ उठवत राहायचं का?

अॅब्सोल्युटली नो आयडीया!

-

तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करता तेव्हा ती कल्पना देखील कशावरून आलेली असते? कुठे काही वाचलं, काही पाहण्यात आलं त्यावरून.

उदाहरणार्थ- परवा मी एका देवराईत गेले होते. मी जंगलातून अनेकदा फिरलेले आहे, पण, देवरा म्हणून हा जो काही प्रकार असतो तो पाहण्याची माझी पहिलीच वेळ. मी देवराईचं मनातल्या मनात बनवलेलं चित्र विस्तीर्ण प्रवेशावर दूरदूरवर पसरलेल्या पुराणवृक्षांच्या रांगा, खाली कुरकुरीत क्रॅकजॅकसारखी वाजणारी वाळलेली पानं, त्यावर झोपून वरती पाहात पाहात विचारांचे विचार करत जावेत, करत जावेत, असलं काहीतरी होतं. जवळपास देवरा चित्रपटातल्या देवराईसारखं, किंवा चुके काळजाचा ठोका डोक्यात ठॉकठॉक करून वाजवणा-या एखाद्या गर्द राईमधल्या उंचच झाडांवरच्या झोक्यांनी माझ्या डोक्यात तयार केलेलं.

पण, वास्तवात ती देवरा म्हणजे चाळीस अंशाच्या चढणीने वरवर जात चाललेल्या एका छोट्या नागमोडी वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या झाडांची जाळी होती. इथली झाडं निराळीच होती, ती आपल्या नेहमीच्या, माणसाळलेल्या झाडांसारखी नव्हती. इथे त्यांचं राज्य आहे, त्यांचा दरारा आहे आणि त्या संपूर्ण परक्या प्रदेशात मी आगंतुक म्हणून घुसले आहे, याची मला पदोपदी जाणीव करुन दिली जात होती.

पण, मी ज्या कल्पनेवरून माझी देवराईची कल्पना बनवली ती कल्पना देखील कशावरून तरी आलेली असेलच नं? ती कुठेतरी खरोखरीच अस्तित्वात असेल नं?

मागे मागे जात गेले तशी कळलं की,

कुठल्याही कल्पनेचं मूळ शोधायला गेलं तर ते वास्तवात, वस्तुस्थितीतच दडलेलं असतं.

तर मग,

कल्पना शेवटपर्यंत निव्वळ कल्पनाच असण्याची शक्यता कितपत असते?

हे मला अजून कळायचं आहे.

ते मला कळलं तर नक्की काय होईल?

नो आयडीया.

-

त्या दिवशी -याच दिवसांनी फोनबुक उघडलं. थोडी नवी नावं घालायला आणि बरीचशी खोडायला.

त्यात मला एक नंबर दिसला नावाशिवायचा. पानाच्या वरच्या को-या जागेत लिहीला होता. हिरव्या शाईने.

मी हिरवी शा फार कधी वापरलेली नाही.

मी आठवणीत खूप पळापळ करून पाहिली; पण, कोणाचं नाव नाही समोर आलं. मी तो नंबर खोडणार होते तेवढ्यात असू देत, पुढे कधीतरी तो कोणाचा आहे हे समजेल म्हणून खोडायला नेलेला पेन पुन्हा ठेवून दिला.

असं आपण किती वेळा केलं?

असे किती नंबर निरर्थकपणे पडून आहेत आपल्याकडे?

असे नंबर वगैरे वाढत चाललेत की काय आपल्या आयुष्यात?

असे विचार अगदी आकस्मात येऊन मला चकीत करतात आणि छातीत चमक भरून दुखायला लागतं. या छातीतल्या दुखण्याचा आणि आपण रोज करतो त्या कार्डीयोचा, स्विमिंगचा, फाफलत चार किमी चालण्याचा काही संबंध नाही.

असं छातीत दुखू लागलं, जीव घाबरल्यासारखा झाला की हातातलं काम बाजूला टाकून एक शांत झोप काढण्याशिवाय दुसरा काही उपाय असतो का?

मला खरंच माहित नाही.

-

Little Alice fell down
the hole
bumped her head
& bruised her soul

-

माझं त्यापोसारखं झालंय.

पोया फोफशा, थुलथुलीत पॅंण्डाला जेड पॅलेसच्या त्या हजारो मॅड पाय-या चढून जायच्या असतात. मनात इच्छा असते, निर्णय अटळ असतो. बराच वेळ नेट लावून, हाश्शहुश्श करत प्रयत्न केल्यावर एकदाचे पोहोचलो का बघायला तो अपेक्षेने मागे पाहातो, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या अवघ्या पाच पाय-या चढून झाल्या आहेत.

मला वाटलेलं की माझं खूप सारं जगून, भोगून, जोखून, परखून झालंय. हा दावा खरा असेल, तर का? कशासाठी? किमर्थम? या साध्या प्रश्नांची उत्तरे मला ठाऊक असणं अपेक्षित आहे. हो नं?

पण, हे प्रश्न खरंच साधे आहेत का?

पण तो माझ्या काळजीचा विषय नाही. मला धडकी भरते ती या विचाराने की-

हे प्रश्न चुकीचे तर नाहीत ना?

प्रश्नांबद्दल पडलेल्या या प्रश्नांचं उत्तरही मला माहित नाही आणि मला ते कसं मिळेल हे देखील अर्थात,

मला माहित नाही.

माझं असं का होत असावं याचा विचार करत असताना माझ्या फ़ोनमधल्या संभाषणांचे लॉग्ज, माझे रिलेशनशिप स्टेटस, माझा बॅंक बॅलन्स, बाथरूममधल्या टूथब्रश-होल्डरमध्ये उभा असलेला एकांडा ब्रश यांकडे पाहिलं की मल एकाच वेळी खूप कळल्यासारखं वाटतं आणि त्याचवेळी आपल्याला काही सुद्धा कळलेलं नाही असं देखील वाटतं.

हे सारं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, कसं बनवणार आहे, आपलं काही बरं करणार आहे की आपली आहे त्याहून जास्त वाताहत करणार आहे?
यांतील किमान काही गोष्टींची उत्तरं नेमकी ठाऊक असती तर फ़ार बरं झालं असतं.

असं म्हणतात की, तुम्ही कुठे जाणार हे तुम्हाला माहित नसेल तर, कुठलाही रस्ता तुम्हाला तिथे पोहोचवेलच.

ओके, हे लॉजिक सध्या चालून जावं.

12 comments:

Nil Arte said...

एक पोस्ट वाचून आपल्याला खूप काही भसाभसा लिहावसं वाटणं हे मस्तच!
म्हणजे हा त्या पहिल्या मुळ पोस्टचा विजयच तेव्हा श्रद्धा-बाई तुम्ही कॉम्प्लीमेंट आधीच घेऊन टाका म्हणजे मी भसाभसा लिहायला मोकळा:

तर…
'हे काहीतरी घडणार' च्या मागे होणारी घरंगळ वगैरे एकदम पटेश पण मी कुठे तरी एक गोष्ट वाचली होती.

म्हणजे एका माणसाला कोणतरी सांगत की नर्मदेच्या सुक्या पात्रात हटकून परिस आहे…शोधला की मिळतोच.
तर हा आपला चालू होतो लोखंडाचा तुकडा घेऊन:
उचल गोटा… लाव लोखंडाला … नाय झालं सोनं… दे फेकून.
'व्हाइल-लूप' मध्ये चालू राहतं हे दिवस-महिने-वर्षं.
माणूस आपला शोधतोय-शोधतोय कणाकणाने फ्रस्ट्रेट होत.
शेवटी त्याची हटते आणि तो नाद सोडून द्यायचा ठरवतो …
पात्रातून बाहेर निघताना सहज लोखंडावर नजर टाकतो तर तो तुकडा केव्हाच सोन्याचा होऊन गेलेला असतो!

ह्यातून मी इतकच घेतलं की मोठे इव्हेंट्स वगैरे ठीकाय पण त्यांना जास्त भाव नाय द्यायचा…
म्हणजे स्वत:चं मोठ्ठ घर वगैरे मस्त पण कधी कधी स्वच्छ दाढी केल्यावर पण तितकच मस्त वाटतं…

मला पण असं वाटायचं की मी स्वत:चं मोठ्ठ घर घेईन मग सगळं लोन फेडीन मग एक छानसा कट-ग्लास घेईन आणि माझ्या त्या मोठ्ठ्या सर्व लोन फिटलेल्या घरात आरामखुर्चीत बसून मस्त ग्लासात मस्त स्कॉच पिईन

पण वरची गोष्ट वाचल्यावर स्कॉच चान्स मिळेल तेव्हा पिउन टाकली. घर-वर तो होता रहेगा :)
(ढासू कट-ग्लास मात्र घेतलाय :))

म्हणजे माझ्या हिशोबाने हे "बिग" काहीतरी घडायचं तेव्हा घडेल पण तोपर्यंत आपली मस्त नाटकं-बिटकं बघावीत, लेड-झेपलिन ऐकावं, छान भांग पाडावा, मुलींना स्माईल द्यावं वगैरे :)

आणि मला असा दाट संशय आहे की हे 'बिगोबा' म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या छोटया छोट्या गोष्टींचीच सम आहेत बहुतेक :)

खूप सुखी वगैरे डोन्ट नो… पण…
रात्री पुण्यातल्या शांत लष्करी रस्त्यांवरून थकून घरी येणं आणि गाडीत रेडिओवर रॉक अवर मध्ये क्वीन्स-राईशचं 'सायलेंट ल्युसिडीटी' लागणं हे त्या वेळचं सुख! नथिंग मोअर नथिंग लेस!!

लिना said...

पोस्ट आणि वरची प्रतिक्रिया वाचून झक्कास वाटलं .

इतकचं कि दोन्ही पैलू हातात हात घालून चालत असतात त्यामुळे अजून झक्कास खिचडी होते

Shraddha Bhowad said...

निलेश,

नेहमीप्रमाणेच मी गातेय काहीतरी वेगळं आणि तू ऐकतोयेस काहीतरी वेगळं असं होतंय.

दुसरा काहीही म्हणून देत तिथे, आपण आपल्याला पाहायचंय ते पाहातो, ऐकायचं तेच ऐकतो आणि बोलायचं तेच बोलतो आणि ते करताना दुस-याबद्दल ब-याच गोष्टी अझ्युम करतो, त्याला कोणीही अपवाद नसतो. मला नेमकं काय म्हणायचंय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ’का’ म्हणायचंय हे ते समजणं कसं शक्य आहे? त्यामुळे अपेक्षितच आहे, त्यामुळे, नो इश्यूज.

बाकी तुझ्या मोनोलॉगबद्दल,

तुला मी ओळखते आणि आयॅम नॉट सर्प्राईझ्ड. आय हिअर यू. :)

-श्रद्धा

Shraddha Bhowad said...

लिना,

केअर टू एलाबोरेट?

सौरभ said...

ahha... nice

Vijay Vasve said...

पोस्ट वाचुन मलाच गरगरल्यासारखं होतंय.. पण निलेशची प्रतिक्रिया छान वाटली.

Samved said...

तुकड्या तुकड्यात पोचतय. वाटतय म्हणजे नक्की काय? वाटयला हवं की नको? अस्संच का वाटतय? हा एक तुकडा. हे असं स्वतःकडे रोखुनबिखुन पाहाणं छान असतं. पिकासोनं माणसाचं अंगांग ३D बघितलं तसं. दुसरा तुकडा टिपीकल श्रद्धा टाईप झालाय (म्हणजे असं विचारशील तर तुझ्या मस्तकाची शकले शकले होऊन पडतील). पण मला तो यावेळी नाही आवडलाय. जरासा ओढून ताणून आल्यासारखा वाटला. शेवटचा तुकडा सुबकपणे गोल वळण घेऊन परत पहील्या तुकड्याशी वर्तुळ पुर्ण करतो, म्हणजे आवडलाच. तुला (आणि मलाही) नक्की कळतय का मला काय म्हणायचंय ते?

Shraddha Bhowad said...

संवेद,

१०० टक्के मान्य.

हे म्हणजे लेगो खेळासारखं झालंय. मला पिक-अप ट्रक तयार करायचाय आणि त्यासाठी मी तुकडे जुळ्वून पाहतेय. कधीकधी रंग-संगती गंडते, कधीकधी सिमिट्री. हे काहीतरी भलतंच तयार झालंय आणि ते मला देखील आवड्लेलं नाही. पण अशा गोष्टी आवडण्यासाठी नसतातच.

थोडक्यात, गंडणं हा या पोस्टचा यूएसपी आहे असं म्हटलंस तरी चालेल.

तुला पहिला तुकडा कळला तसा ब-याच जणांना कळत नाही. तुझ्यापर्यंत तेवढं पोहोचलं यांत मला आनंद आहे. आणि याचं १५० टक्के क्रेडिट तुला. कारण, त्याकरता अपुल्या जातिचे इत्यादी घडून यायला हवं असतं. आणि असं घडणं किती दुर्मिळ आहे हे तू ही जाणतोस आणि मी देखील.

आय मीन, हे आला क्षण जगून घेणं, जीवनाचा महोत्सव करणं ’तान कॉन्तेन्ता’, ’कार्पे दिएम’ फ़िलॉसॉफ्या ब-याच जणांना ठाऊक असतात, त्यात नवल काय? तो सर्व्हायव्हलचा एक भाग असतो. पण त्याचा अर्थ आपल्याला पडलेले सर्व प्रश्न गाडले जातात, नाहीसे होतात असं तर कधीच होत नाही. कधी तरी वेळ पाहून हे प्रश्न आपल्याला पकडतातच, नडतात.

आपण सर्व्हायव्हलासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढतो त्याचं कारण आपल्याला पडणारे हे विविध प्रश्न असतात हे मान्य करणं लोकांना इतकं अवघड का जात असावं याचा विचार मी ब-याच काळापासून करतेय.

फ़ाईंडींग नीमोमध्ये नाही का ब्रुसचे मित्र ’मै एक हसता खिलखिलाता डॉल्फ़िन हूं’ची सॉलिड रेवडी उडवतात. असला डॉल्फ़िन आपण नाही बुवा आणि ते जमायचं देखील नाही. कारण, ते जमतंय असा दावा केला, तर ती शुद्ध लोणकढी थाप असेल.

पण ते एक असो.

आपल्यातलं ’कळण-न कळणं’ असंच राहो.

-श्रद्धा

Samved said...

क्रेडीटबिडीट कसलं...पण मला(च) तुझा आनंद समजु शकतो त्यामुळे :)
मजेत राहा, जे तुला जमतय-होतय, ते फार कमी लोकांच्या बाबतीत होतं. लोकांना प्रश्नच पडत नाहीत हे तुला माहीत आहे का? आणि स्वतःच्या बाबतीत? पा...प!

Mandar Shinde said...

कल्पना शेवटपर्यंत कल्पनाच असते. कल्पनेपलिकडचं काही समोर आलं तर नवी कल्पना तयार होते. पण मूळ कल्पना तशीच राहते, कल्पनेच्याच रूपात. मग पुढच्या वेळी आपण मूळ आणि नव्या कल्पनेशी तुलना करून पाहतो, आणि त्यातली एखादी जुळते. नाही जुळली तर अजून एक नवी कल्पना, त्याच्या पुढच्या वेळेसाठी. आणि मग यांतल्या कुठल्याही कल्पनेचं मूळ सापडत नाही, मुद्दाम शोधायचं ठरवलं तरी. म्हणजे वस्तुस्थिती आणि कल्पना वेगळ्याच राहतात. फक्त नवी वस्तुस्थिती नव्या कल्पनेला जन्म देते, पण दोघीही एकमेकींचं ओझं वागवत नाहीत जगत. मोकळ्या जगतात, एकदम फ्री... आपणही असंच फ्री जगायला शिकलं पाहिजे नाही का?

Shraddha Bhowad said...

मंदार,

हो, शिकलं पाहिजे नं. त्याला कोण नाही म्हणतंय? पण फ़्री म्हणजे काय? तुमचा फ़्रीपणाचा ब्रॅंड काय आहे हे पहिलं ठरवलं पाहिजे. प्रश्न पडणारी माणसं फ़्री जगू शकत नाही असं म्हणणं असेल तर आपल्या पॉईंट ऑफ़ व्ह्यू मध्ये सॉलिड लोच्या आहे असं मी म्हणेन.
कल्पनेचं ओझं कधीच होत नाही. ती बॅकग्राऊंडला असतेच. फ़क्त काहीजणांना कळते, काहीजणांना नाही, काही तिला ऍकनॉलेज करतात, तर काही डिनायल मध्ये जगतात.
प्रश्न पडणं म्हणजे तुम्ही कसल्या ओझ्याखाली जगताय असंच नसतं. मला या प्रोसेसचं महत्त्व खूप वाटतं, आणि हे जगणंही फ़्री आहेच. मी कशालाही आंधळेपणाने फ़ॉलो करत नाही, मी कोणत्याही धुंदीत आयुष्य काढत नाही, मी प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक गोष्टीला ’का?’ विचारते, माझ्या लेखी हे जगणं पराकोटीचं मुक्त आहे. कोणत्याही गृहितकांपासून दूर ठेवणारं, मनात नसताना कोणत्याही गोष्टीला चिकटून राहण्याचं ऑब्लिगेशन स्वत:वर न ठेवणारं, सेल्फ़-मेड बनवणारं. यावर कोणी सहमत असेल, नसेल, प्रत्येकाचा यावरचा विचार वेगळा. आणि माझ्या या मुक्तपणाने मला या शक्यतेचाही विचार करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहेच की.
मला वाटतं इतकं पुरेय.
इत्यलम.

-श्रद्धा

Unknown said...

विरोधाभास अस्तित्वात नसतातच,असे वाटले की आपली गृहितकं पुन्हा नव्याने तपासून पहावित त्यातील एक चुकलेले असतं..

 
Designed by Lena