मोन्ती व्हाया लुई.

लुई आपला शो आटपून निघालाय. त्याला घरी जायला सबवेने जायला लागतं
इतर सबवे स्थानकांसारखं हे ही एक किंवा दुस-या कोणत्याही सबवे स्थानकासारखं नसलेलं.
काहीही, कसंही.
त्याला एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी जाण्याकरिता असलेली जागाच म्हणायचं असेल तर त्याला कशासारखंतरी म्हणण्याचा किंवा कशासारखंतरी न म्हणण्याचा उगा का इतका खटाटोप?
तिथली एकमेकांना अजिबात न ओळखणारी, आपापल्या विश्वात रमलेली माणसं. सगळ्यांचे डोळे कशावरतरी खिळलेले. कोणाचे पेपरवर, कोणाचे शून्यात, कोणाचं डोळ्यासमोर दिसत नसलेल्या आणि महिन्याअखेर मुटकून बसवायच्या हिशेबावर.
आपल्या दोन हातांच्या परिघापलीकडे काय चालू आहे याची किती जणांना कल्पना असेल?
पण, या प्रत्येक माणसाची एक वेगळीच कहाणी असते.
लुईची आहे.
त्याच सबवेमध्ये सर्वांपासून  बेदखल असा एक व्हिओलिनिस्ता त्याच्या त्या रक्तचंदनी व्हायोलिनवर मोन्तीचं कम्पोझिशन वाजवतोय.
त्याचीची कहाणी असेलच.
आमेलीमध्ये हिरवा प्रकाश साकळलेल्या सबवे टनलमध्ये रेकॉर्ड वाजवणा-या, ढगासारखे पांढरे केस असलेल्या या बुढ्या बाबाची कहाणी काय होती?
मंत्राने भारल्यासारखं, एखाद्या भुतापाठोपाठ  त्याच्या गुहेकडे जावं तसं आमेलीच्या पाठोपाठ आपण गेलोच की नाही?
तिथे आपली सुटका नव्हती.
इथेही आपली सुटका नाही.
व्हित्तोरियो मोन्तीचं Czardas*
तल्लीन होऊन ते आर्त सूर आळवतोय आपला...
पहिले मंद्र लयीत सुरू झालेलं संगीत नंतर बेभान होत जातं,  पुन्हा मंद्र, पुन्हा द्रुत.
पहिले स्वरांवर आंदुळल्यासारखे झुलणारे आपण आपले श्वास गुदमरल्यासारखे सुरांच्या लाटांवर हिंदकळतोय आपले. पुन्हा स्थिर होऊन श्वास जागी येतोय तोच पुन्हा ती लाट येते.
अजून जरा शांतता असती, आपल्याला अजून गप्प बसता आलं असतं,  श्वास थांबवता आला असता तर, अजून काहीतरी समजलं असतं असं वाटतं.
लुईची अवस्था काही वेगळी नाही. कधी नव्हे तो त्याच्या घशात आवंढा येऊन अडकलाय, समोर दिसणारं जग जरासं आऊट ऑफ़ फ़ोकस झालंय.
त्याला संगीतातलं काही कळतं असा दावा नाही त्याचा. त्याची हंगेरीयन शेजारीण आणि जेन, त्याची बिट्टी पोर व्हायोलिनवर बार्तोक* वाजवत असतात तेव्हा तो आपला चकित होऊन उभा असतो, त्या सुरांमध्ये निथळत. अनंत हस्ते कमलावराने देता घेशील किती दो कराने सारख्या अवस्थेत. एरव्ही शब्दांवर प्रचंड हुकुमत असलेला लुई अशा वेळी काही बोलत नाही. तो ते सर्व आत शोषून घेतो स्पंजसारखं. मुरवत राहतो.
पण, हे व्हायोलिन फ़ार डेंजरस. काहीतरी तुटतंच आपल्याआतलं.
अगदी हुकमी.
नेमाने.
प्र-त्ये-क वे-ळी.
मग त्याच्या कपच्या गोळ्या करताना आपल्याला केव्हातरी मागे निखळलेल्या, रंग उडालेल्या कपच्या दिसत राहतात. ’ठेवून देऊयात, पुढे कधीतरी लावायला होईल’ असं म्हणत तुटलेली करंगळी जपून ठेवल्यासारख्या. कधीकधी उगीचच, कधीकधी मुद्दामहून, तर कधीकधी अजाणतेपणी.
यातून आपल्याला भर्र्कन सावरता येत नाही. दिवसच्या दिवस जातात त्या खिन्नतेमध्ये.
मेलॅन्कोलीमध्ये.
त्या व्हिओलिनिस्तासारखं स्थळ, काळ, विसरून बेभान होणं लुईच्या स्वभावात नाही.
इतक्यात प्लॅस्टीकच्या बाटल्या, डब्बे यांचा डोंगर अंगावर घेऊन एक जाडाभरडा, कळकट मनुष्य  सबवेमध्ये प्रवेशतो.
पाय-यांवरून उतरताना त्या प्लॅस्टीकचा कर्कश्य खडखडाट त्या शांत, म्लान वातावरणात कच्चकन रूततो, शांततेच्या चिरफ़ाळ्या उडतात.
त्याच्या नुसत्या चालण्यातही गोंगाट आहे.
त्या मग्न लोकांना आपल्या विश्वातून दचकून बाहेर यायला लावणारा गोंगाट.
आयरनी अशी आहे, की त्यांना  हा गोंगाट ऐकू आला; पण, इतकं आर्त, तळमळून वाजवलेलं संगीत त्यांच्या कानापर्यंत  पोहोचलंच नाही.
गोंगाट इतक्या लवकर लक्ष वेधून घेतो का?
तो प्लॅस्टीक मॅन चालता चालता एकदम थबकतो आणि आज आपण इथेच झोपायचं असा निश्चय केल्यासारखा एका ठिकाणी अचानक थबकून आपला बोजाबिस्तारा आणि तो प्लॅस्टीकचा पर्वत तिथेच धाप्पदिशी टाकून देतो आणि कपडे काढायला सुरुवात करतो.
दुर्लक्ष करता येईल असा मनुष्यच नाही तो.
आता लुईचं लक्ष कधी मोन्तीच्या त्या सुंदर रचनेवर तर कधी त्या सेल्युलॉईटचा ढिगारा अंगावर वागवणा-या त्या अर्धनग्न कळकट मनुष्यावर.
तो इथेही आहे, तिथेही आहे.
तो यातही आहे, त्यातही असणार आहे.
आता त्याला पर्याय नाही.
आता तो माणूस त्या महाकाय पसा-यातून कुठूनतरी पाण्याची एक बाटली पैदा करतो आणि त्या बाटलीतल्या पाण्याने भर सबवेमध्ये त्याची आंघोळ सुरू होते.
आंघोळ करताना पाणी त्याच्या पाठीवरच्या चरबीतून वाट काढत निघालंय आणि त्याच्या तोंडून सुखातिरेकाने बम्म, भुश्श असे आवाज निघतायेत, तर इथे त्याच्या त्या गोंगाटाने अजिबात विचलित न झालेल्या, स्वत:तच हरवलेल्या त्या व्हिओलिनिस्ताच्या कानशीलावरच्या शिरा ताणल्या गेल्यात, ओठ लहान मुलासारखे पुढे आलेत, कधीकधी वेदनेची एकच उभी आठी चमकून जाते कपाळावर.
ब्रह्मानंदी टाळी लागल्याची लक्षणं-दोघांचीही
तो माणूस अत्यंत बेढब आहे.
हे संगीत किती जीवघेणं आहे
लुई कधी इथे , कधी तिथे
बाटलीतला शेवटचा थेंब संपतो तेव्हा मोन्तीदेखील समेवर आलेला असतो.
त्या समेवर तो कळकट म्हातारा थुंकल्यासारखा हसतो. छद्मी, माथेफिरू हास्य. का? कोणावर? कशासाठी?
ही पण एक वेगळीच कहाणी.
त्या व्हिओलिनिस्ताला याचा पत्ताच नाही, तो चूर आहे त्याच्या जगात. तिथे तो सूर जगतो, सूर खातो, सूर पितो.
त्याने लुईच्या काळजात घर केलं तसं इतरांचं झालं नाही.
पण, त्या कळकट म्हाता-याने लुईसकट सगळ्यांच्या दिवसावर एक ओरखडा उमटवून ठेवला. खिळा काचेवर घासत नेल्यावर उठतो तसा. आता कित्येक दिवस त्याला विसरता येणार नाही.
लक्षात कोण राहणार?
स्मृती कोणाच्या बनणार?
स्मृतीत कोण राहणार?
लक्षात राहाणं, न राहाणं, काय लक्षात राहाणं ते पाहाणं इतकं महत्वाचं असतं का?
शेवटी आठवणीच तर असतात आपल्या सोबत, दुसरं काय उरणार असतं?
या जगातलं नाहीच असं वाटण्याइतकं काहीतरी अतीव सुंदर असं काहीतरी इतक्या कमी लोकांना का भिडतं?
का असुंदराचा आवाजच मुळात इतका मोठा असतो? की ते ब-याच जणांच्या लेखी असुंदर अशा अर्थाने जास्त लक्षवेधी असतं? हे जग अशाच ब-याच जणांच्या लेखी असुंदर म्हणून स्मृतीत राहणा-या गोष्टींच्या पायावर चाललंय का?
अशा वेळी व्हिओलिनिस्तासारख्या माणसांनी काय करायचं?
आपण त्यांचं काय करायचं?
त्यांचं काय होतं?
जे होतं तसं होणं योग्य आहे का?
त्यांना त्याची काही क्षिती असते अशातला भाग नाही,
पण तरीही-
अशा विचारात लुई जायला निघतो.
पण, आपण तिथेच रुतून बसतो. उलटसुलट विचारांच्या कर्दमात रुतल्यासारखे.
आता त्यातून बराच काळ निघणे नाही.
या मानवी आकाराच्या पोकळीचं करायचं तरी काय?

--

संदर्भ: लुई | सीझन २, भाग ६। सबवे/पामेला

"नि इदिया!"

आपण आपलं पूर्ण आयुष्य कशाच्यातरी जंगी तयारीत घालवतो आणि तेकाहीतरीकधीच घडत नाही.

खरंय.

आता माझंच घ्या ना.

मला कुठेही जाताना, असताना-नसताना ’काहीतरी’ घडणार हे सतत वाटत आलंय. पण, ते ’काहीतरी’ म्हणजे काय हे मला कधीच माहित नसतं; म्हणजे, मला ते माहित असावं किंवा त्याची अंधुकशी कल्पना असावी असं देखील मला वाटत नसतं. त्यामुळे होतं काय की, काहीतरी घडण्याची अपेक्षा जरी असली तरी काय घडायला हवंय हे माहित नसल्याने कुठेही जाऊन आल्यावर, असताना-नसतानाच्या नंतर नेमकं काय घडून गेलंय हे मला सांगता येत नाही, त्यामुळे ते घडल्यासारखं असतं. अशारितीने घडणा-या काहीतरीच्या मागे माझं आयुष्य घरंगळत चाललंय.

मला तेकाहीतरीमाहित असतं आणि ते घडलं असतं तर ते मला आवडलं असतं का?

नो आयडीया

-

आज आताही मी एके ठिकाणी निघालेय.

मी जायला निघालेय त्या ठिकाणाचं नाव, तिथे जायला किती वेळ लागतो हे मला सुदैवाने माहित आहे. आणि त्यातून माझ्यासोबत एक मित्र देखील आहे. आणि दोघेही कुठेतरी निघालेत म्हटल्यावर त्यातल्या एकालातरी आपण कुठे निघालो आहोत हे माहिती असतंच. असं माहित वगैरे असलं की बरं असतं. म्हणजे जायचं होतं एकीकडेच आणि पोहोचलो भलतीकडेच, असं होत नाही.

पाय फसून तोंडघशी पडायला होईल इतके विचार करकरून, त्यांची गुंतवळ करून मला काय मिळतं?

हे मला आजतागायत कळलेलं नाही.

-

मी एक सर्वसाधारण सुखी मुलगी असावे.

म्हणजे, मी तसं वाटून घेतलं असतं, तर नक्कीच असते; पण, मी तसलं काही वाटून बिटून घेत नाही.

का?

माहित नाही.

मी स्वतःला प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरंही आपणाहूनच देते. माझा आवडता छंद आहे तो.

"आता या क्षणी आपण टोटल आनंदी आहोत का? खरेखुरे खूष?"

मी अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून पाहाते.

"माहित नाही. असेनही किंवा नसेनही."

"पण आपण तसं मानून चाललं तर काय हरकत आहे?

मी तसं मानून पाहाते. पण थोडाच वेळ. थोड्याच वेळाने मला मनातल्या मनात उमगतं, की हे खरं नाही. या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे असं मी स्वतःशीच म्हटलं असतं, तर ते मला बोचत राहिलं असतं. माझ्यामधून बाहेर पडून मी स्वतःचीच निर्भत्सना करत म्हटलं असतं, "तू खूष आहेस हे थोतांड आहे".

काही वेळा वगळता मला नेहमीच असं वाटतं.

का?

कदाचित काहीतरी राहून गेलेलं असावं; कारण, हे आता जे काही आहे, ते पिक्चर पर्फेक्ट नव्हे.

पण काय राहून गेलंय?

माहित नाही.

-

परवा असंच झालं.

मी कुठेतरी चालले होते. कुठे ते मला नेहमीप्रमाणे ठाऊक नव्हतं. माझ्या बरोबरच्याला बहुतेक माहित असावं. तीनेक तासांच्या ड्राइव्हनंतर प्रवासात एके ठिकाणी पाय मोकळे करायला उतरलो. मी या पूर्ण कल्पनेवरच नाखूष; कारण, माझा आणि उन्हाचा छत्तीसचा आकडा. डोक्यावर पाणी ओतल्यावर अंगभर ओघळणा-या पाण्यासारखं ते ऊन अंगावरून सापाच्या गतीने खाली उतरतं, त्या उन्हाने अंगभर मुंग्या आल्यासारखं होतं, तेव्हा मला कसंसंच होतं, भोवंडून गेल्यासारखं होतं.

मला त्या चाव-या उन्हाचा मनोमन संताप येत होता. उन्हाच्या भपक्याने डोळे दुखायला लागले होते. उन्हाने चमकणा-या, लालसर होत जाणा-या माझ्या हातांकडे पाहात मी थोडंसं स्वतःशीच, थोडंसं दुस-याला उद्देशून म्हटलं, "थंडी वारली आहे का?"

तो काहीच बोलला नाही.

कोणीच काही बोललं नाही.

मी नक्की मोठ्याने बोलले का? की मनातल्या मनातच बोलले आणि मला मोठ्याने बोलल्यासारखं वाटलं?

पण, मला ती शांतता उधळून कशाची शहानिशा करण्यासाठी काहीतरी बोलण्याचा, करण्याचा कंटाळाच आला एकदम. एक वय असतं, जेव्हा आपण खोदून खोदून, स्वतःचं समाधान होईपर्यंत दुसऱयाला उलटसुलट प्रश्न विचारत असतो. मी ते वळण केव्हाच मागे टाकलंय.

पण, अशा शांततेमुळे फाटकन मुस्काटात बसल्यासारखं होतं.

आपल्या शांततेसारखी शांतता असलेली व्यक्ती असेल का कुठे अस्तित्त्वात? आणि असलीच, तरी त्या व्यक्तीची शांतता माझ्या शांततेसारखी आहे हे मला कसं कळेल?

नो आयडीया.

तोवर तरी दुस-याच्या शांततेने, गप्प असण्याने असं खजिल वाटून घेत राहायचं, प्रश्नांचं मोहोळ उठवत राहायचं का?

अॅब्सोल्युटली नो आयडीया!

-

तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करता तेव्हा ती कल्पना देखील कशावरून आलेली असते? कुठे काही वाचलं, काही पाहण्यात आलं त्यावरून.

उदाहरणार्थ- परवा मी एका देवराईत गेले होते. मी जंगलातून अनेकदा फिरलेले आहे, पण, देवरा म्हणून हा जो काही प्रकार असतो तो पाहण्याची माझी पहिलीच वेळ. मी देवराईचं मनातल्या मनात बनवलेलं चित्र विस्तीर्ण प्रवेशावर दूरदूरवर पसरलेल्या पुराणवृक्षांच्या रांगा, खाली कुरकुरीत क्रॅकजॅकसारखी वाजणारी वाळलेली पानं, त्यावर झोपून वरती पाहात पाहात विचारांचे विचार करत जावेत, करत जावेत, असलं काहीतरी होतं. जवळपास देवरा चित्रपटातल्या देवराईसारखं, किंवा चुके काळजाचा ठोका डोक्यात ठॉकठॉक करून वाजवणा-या एखाद्या गर्द राईमधल्या उंचच झाडांवरच्या झोक्यांनी माझ्या डोक्यात तयार केलेलं.

पण, वास्तवात ती देवरा म्हणजे चाळीस अंशाच्या चढणीने वरवर जात चाललेल्या एका छोट्या नागमोडी वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या झाडांची जाळी होती. इथली झाडं निराळीच होती, ती आपल्या नेहमीच्या, माणसाळलेल्या झाडांसारखी नव्हती. इथे त्यांचं राज्य आहे, त्यांचा दरारा आहे आणि त्या संपूर्ण परक्या प्रदेशात मी आगंतुक म्हणून घुसले आहे, याची मला पदोपदी जाणीव करुन दिली जात होती.

पण, मी ज्या कल्पनेवरून माझी देवराईची कल्पना बनवली ती कल्पना देखील कशावरून तरी आलेली असेलच नं? ती कुठेतरी खरोखरीच अस्तित्वात असेल नं?

मागे मागे जात गेले तशी कळलं की,

कुठल्याही कल्पनेचं मूळ शोधायला गेलं तर ते वास्तवात, वस्तुस्थितीतच दडलेलं असतं.

तर मग,

कल्पना शेवटपर्यंत निव्वळ कल्पनाच असण्याची शक्यता कितपत असते?

हे मला अजून कळायचं आहे.

ते मला कळलं तर नक्की काय होईल?

नो आयडीया.

-

त्या दिवशी -याच दिवसांनी फोनबुक उघडलं. थोडी नवी नावं घालायला आणि बरीचशी खोडायला.

त्यात मला एक नंबर दिसला नावाशिवायचा. पानाच्या वरच्या को-या जागेत लिहीला होता. हिरव्या शाईने.

मी हिरवी शा फार कधी वापरलेली नाही.

मी आठवणीत खूप पळापळ करून पाहिली; पण, कोणाचं नाव नाही समोर आलं. मी तो नंबर खोडणार होते तेवढ्यात असू देत, पुढे कधीतरी तो कोणाचा आहे हे समजेल म्हणून खोडायला नेलेला पेन पुन्हा ठेवून दिला.

असं आपण किती वेळा केलं?

असे किती नंबर निरर्थकपणे पडून आहेत आपल्याकडे?

असे नंबर वगैरे वाढत चाललेत की काय आपल्या आयुष्यात?

असे विचार अगदी आकस्मात येऊन मला चकीत करतात आणि छातीत चमक भरून दुखायला लागतं. या छातीतल्या दुखण्याचा आणि आपण रोज करतो त्या कार्डीयोचा, स्विमिंगचा, फाफलत चार किमी चालण्याचा काही संबंध नाही.

असं छातीत दुखू लागलं, जीव घाबरल्यासारखा झाला की हातातलं काम बाजूला टाकून एक शांत झोप काढण्याशिवाय दुसरा काही उपाय असतो का?

मला खरंच माहित नाही.

-

Little Alice fell down
the hole
bumped her head
& bruised her soul

-

माझं त्यापोसारखं झालंय.

पोया फोफशा, थुलथुलीत पॅंण्डाला जेड पॅलेसच्या त्या हजारो मॅड पाय-या चढून जायच्या असतात. मनात इच्छा असते, निर्णय अटळ असतो. बराच वेळ नेट लावून, हाश्शहुश्श करत प्रयत्न केल्यावर एकदाचे पोहोचलो का बघायला तो अपेक्षेने मागे पाहातो, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या अवघ्या पाच पाय-या चढून झाल्या आहेत.

मला वाटलेलं की माझं खूप सारं जगून, भोगून, जोखून, परखून झालंय. हा दावा खरा असेल, तर का? कशासाठी? किमर्थम? या साध्या प्रश्नांची उत्तरे मला ठाऊक असणं अपेक्षित आहे. हो नं?

पण, हे प्रश्न खरंच साधे आहेत का?

पण तो माझ्या काळजीचा विषय नाही. मला धडकी भरते ती या विचाराने की-

हे प्रश्न चुकीचे तर नाहीत ना?

प्रश्नांबद्दल पडलेल्या या प्रश्नांचं उत्तरही मला माहित नाही आणि मला ते कसं मिळेल हे देखील अर्थात,

मला माहित नाही.

माझं असं का होत असावं याचा विचार करत असताना माझ्या फ़ोनमधल्या संभाषणांचे लॉग्ज, माझे रिलेशनशिप स्टेटस, माझा बॅंक बॅलन्स, बाथरूममधल्या टूथब्रश-होल्डरमध्ये उभा असलेला एकांडा ब्रश यांकडे पाहिलं की मल एकाच वेळी खूप कळल्यासारखं वाटतं आणि त्याचवेळी आपल्याला काही सुद्धा कळलेलं नाही असं देखील वाटतं.

हे सारं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, कसं बनवणार आहे, आपलं काही बरं करणार आहे की आपली आहे त्याहून जास्त वाताहत करणार आहे?
यांतील किमान काही गोष्टींची उत्तरं नेमकी ठाऊक असती तर फ़ार बरं झालं असतं.

असं म्हणतात की, तुम्ही कुठे जाणार हे तुम्हाला माहित नसेल तर, कुठलाही रस्ता तुम्हाला तिथे पोहोचवेलच.

ओके, हे लॉजिक सध्या चालून जावं.