काही बोलू नये तिशी.

गेल्या वर्षी नेमक्या याच वेळी आमचं घर दिसामासाने वाढत असताना मला ते कडीपत्त्याचं झाड भेटलं.

सहज नजरेस पडावं असं नव्हतंच ते! जास्वंद, लिंबू, आणखी दोन एक्झॉटिक जास्वंदींच्या जाळ्यांमध्ये लपून गेलं होतं.
इतर झाडांच्या पानांसारखी पानं. त्याला ना शोभेचं फूल येतं, ना रसरशीत फळं धरतात.

तर, मागच्या वर्षी याच वेळी त्याची ती तारकांसारखी दिसणारी पांढरी, गंधाळलेली फुलं गुच्छागुच्छाने फुलली होती. मी माझ्या बाल्कनीतल्या सिमेंट, फळ्या, शीगा, पत्रे यांच्या पसा-यात उभी राहून समोरच्या वाडीकडे पाहात असताना माझ्या नाकपुड्यांमध्ये तो दरवळ घुसला आणि माझी मान आपसूक त्याच्याकडे वळली.  तेव्हा ते झाड मला पहिल्यांदा दिसलं. समोरच्या सोसायटीच्या आवारात उभं होतं.

घर बांधून व्हायचं असलं की त्यात एक शांत शांतता असते आणि ते बांधून झाल्यावर त्यात राहायला आलं की घरातली माणसं एकमेकांशी बोलत नसली तरी त्यात एक विचित्र गहबज असतो, असं का असतं?
पण ठिक आहे. वैचित्र्य नसणं हीच वैचित्र्याची हद्द आहे.

तर, त्यावेळी पावसाळ्यात मी नेमाने तिथे जायचे, बाल्कनीत बसायचे. ते झाडही अर्थात तिथे असायचंच. त्या सोसायटीतली लोकं रोज त्याची पानं ओरबाडून पोह्याला फोडणी टाकायला घे‌ऊन जायची. झाडावरून देठ खुडून घ्यावा आणि मग त्याची पानं वेगळी करावीत इतका वेळ त्यांच्याकडे नसावा बहुतेक. पानंच्या पानं ओरबाडून नेल्यानंतर नागडी देठं वागवणारं ते झाड मोठं केविलवाणं दिसायचं. सोसायटीतल्या लोकांना त्यांचे गुलाब, मोगरे, गेला बाजार तुळस जास्त प्रिय असल्याने पाण्याचा नैवेद्य फक्त त्यांनाच जायचा. हे जगलं काय-मेलं काय, कुणाला काय त्याचे? पानं मात्र हवीत. रास्कल्स! ते झाड कसं तगलं होतं कुणास ठा‌उक?

पण ते झाड झालं गेलं सगळं विसरून लोकांनी पुन्हा ओरबाडण्याकरिता हाताला सहज लागतील इतक्या उंचीवर नव्या फांद्या उगवायचं.

या झाडाने माणसांवर इतका विश्वास टाकू नये असं फार वाटायचं पण सांगणार कोण?

त्यानंतर काही तिथे जाणं, त्या झाडाला पाहाणं झालंच नाही.

--

त्यानंतर आम्ही थेट उन्हाळ्यात तिथे राहायला गेलो तेव्हा ते झाड पूर्ण वठून गेलं होतं. त्याच्यावर एक पान शिल्लक नव्हतं. तळपणारं ऊन बाधून रस्त्याच्या कडेला उलट्या करत असलेल्या हातगाडीवाल्याचे हात पाहिले होते मी मागे एकदा. याचंही खोड तसंच सुरकुतून, कोमेजून गेलं होतं.

खरं सांगायचं तर आश्चर्य मुळीच वाटलं नाही. ही हॅड इट कमिंग! पण जबर वा‌ईट वाटलं.

पण नीट पाहिलं तेव्हा त्या झाडाच्या फांद्यांच्या टोकाकडचा हिरवेपणा अजून शिल्लक होता असं दिसलं.

मग, सोसायटीवाले गेले भो*%‍॑ म्हणून मी माझ्या बाल्कनीतून रोज एकेक तांब्या पाणी टाकायला सुरूवात केली.

सकाळी उठलं की माझ्या बाल्कनीतल्या झाडांसोबत त्याला पाणी टाकायचा नेमच झाला. तब्बल एक महिना हा अभिषेक सुरू होता.

मग ते झाडं जगलं, हिरवंगार झालं. आता तर त्याला फुलंही आलीयेत आणि मागच्या वर्षीसारखा दरवळ मला आज आत्ताही येतोय.

आणि अगदी आताआताच मला एकच बा‌ई गेली सहा वर्षं माझे केस कापतेय, मला सबवेच्या सबमध्ये हनी-मस्टर्ड, मिंट, ओनियन, चिली अशाच क्रमाने सॉसेस लागतात आणि त्यात गल्लत झाली तर माझी प्रचंड चिडचिड होते असा साक्षात्कार झाल्याने हाच मागच्या वेळसारखाच वाटणारा दरवळ मला अजूनच आवडतोय.

गंमत फक्त इतकी झालिये की त्या झाडाला आता हाताला लागतील अशा फांद्याच नाहीत. ते झाड  आता डोक्यावर आंबाडा घातलेल्या बा‌ईसारखं दिसतं. फांद्यांचा आहे तो सगळा पसारा फक्त वरच- माझ्या बाल्कनीला लागून. ल्येको! साल्यांनो! तुम्ही गेलात गाढवाच्या *%‍॓त असं म्हणत असल्यासारखा. आता ना त्याला कोणी ओरबाडू शकत. आणि ना कोणी दुखवू शकत.

--

मी जेव्हा माझ्या मित्रमंडळींना ही गोष्ट सांगते तेव्हा त्यांना मी कडीपत्याच्या झाडाचं नाव पुढे करून माझ्या ओळखीतल्या कोणाचीतरी किंवा बहुतेक वेळा माझीच गोष्ट सांगतेय असं वाटतं.

अरे?  माणसांखेरिज इतर कोणाच्या कथा नसूच शकतात का?

बरं, मला माझीच कथा सांगायची असती तर मी त्या बिचा-या झाडाला कशाला मध्ये आणलं असतं?  मी मी आहे, झाड झाड आहे, तुम्ही तुम्ही आहात, माणसं माणसं आहेत-बरी वा‌ईट कशीही! ते सगळं आहे-ते सगळं तेच असतं-दुसरं काही नसतं आणि त्याला दुसरं काही बनवायला जा‌ऊही नये.

आपण प्रतीकांमधून आपली कथा पोहोचवू पाहात असतो, अगदी मान्य आहे! पण ती ज्याच्यापर्यंत पोहोचवायची त्याची तितकी पात्रताच नसेल तर मग काय?

दुस-यावर इतक्या अवलंबून असलेल्या गोष्टीला काय अर्थ उरतो मग?

मला इतके प्रश्न का पडतात?

टा‌ईम मशिनचा शोध लागलाच मी काय करेन माहितीये? मी  भूतकाळात जा‌ऊन माझ्या आ‌ई-बाबांचा जन्मच होणार नाही अशी पूरेपूर व्यवस्था करेन. मग मी जन्माला येण्याची, माझ्या असण्याची शक्यताच नाहिशी हो‌ईल. पण, मग (अपरिहार्यपणे) विचार केल्यावर कळतं की, मीच नसेन तर मी माझ्या भूतकाळात कशी काय जा‌ऊ शकेन?
उफ्फ!

आपण असे अनेक प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे देखील मिळवतो. पण मग त्या उत्तरांना प्रश्न विचारल्यावर मूळ प्रश्न मिळायला हवेत की नाही? पण असं कधीच होत नाही. मिळतात ते कुठलेतरी भलतेच प्रश्न असतात. हे ही आणखी एक.

असं म्हणतात, की झाडांना स्मृती, आठवणी नसतात. आजच्यापुरता जे, ते त्यांचं. त्यामुळे त्यांना स्वतःमध्ये सहज बदल करून घेता येतात. आपल्यात किती बदल झाले आहेत, य वर्षांपूर्वी आपण कसे होतो हे तपासून पाहण्याकरता त्यांच्याकडे प्रोटोटा‌ईप नसतो. माणसाकडे मात्र असतो. त्यामुळे माणसाकरता बदल लाजिरवाणा असू शकतो. आपण कशापासून तरी पळ काढतोय असं वाटायला लावणारा, आपण पराभूत झालोय अशी भावना करून देणारा. मग बदल करावे लागलेच तर स्वतःमधला हा तो बदल असं स्वतःला बजावून सांगत, मूळच्या आपल्याला दोरीला बांधून त्या दोरीचं टोक हातात धरूनच बदल करून घेता आला तर पाहावा अशी आपली धडपड असते. बदल ही आपल्याला जगता यावं म्हणून म्हणून आपण (अति)विचारपूर्वक केलेली निवड असते.

झाडांना स्मृती नसतात, अँडीच्या म्हणण्याप्रमाणे पॅसिफीकलाही आठवणी नाहीत, म्हणून तो असा नितळ, गूढ, आठवणशून्य पहुडलेला आहे.

माझ्या आवडत्या सर्व गोष्टींना स्मृती नाहीत असं कसं?
की त्यांना स्मृती नाहीत म्हणून त्या माझ्या आवडत्या आहेत?

झाडांना त्याचे लचके तोडले गेल्याच्या स्मृती नसतील कदाचित, पण मला आहेत.  पण, माझ्यातला एक लचका तोडला तरी मी संपत नाही. पण असे लचके वारंवार तुटत गेले तर एके दिवशी मी नाहीशी हो‌ईन. त्यामुळे त्या एका लचक्याला महत्व द्यावं की न द्यावं? तो एक लचका मी आणि न-मी यांच्यात फरक करू शकेल काय?

आपल्यामधल्या प्रत्येकाचंच काही ना काही तरी, कधी ना कधी तरी हरवत असतं, आपल्या स्वप्नांची धूळधाण होत असते, शक्यतांचा चक्काचूर होत असतो. आतून तुटत-खचत जाताना आपलं एककाळचं वाटणंही आपण हरवून बसतो, आणि ते आपल्याला पुन्हा कधीही परत मिळणार नसतं. हे जगण्याचा भाग आहे असं मला कोणी सांगतं तेव्हा मला ’शिप ऑफ थिसस’चा पॅराडॉक्स आठवतो.

आपण वर्षानुवर्षे वापरत असलेलं घड्याळ हरवलं/दुरूस्तीच्याही पलीकडे गेलं आणि आपल्याकडे नवं घड्याळ घ्यायला पैसे नसले की आपण आपल्याही नकळत रोज विवक्षित वेळी हात उचलून मनगटाकडे पाहात असतो, तिथल्या पांढ-या पडलेल्या पट्याला कुरवाळत असतो. तो पांढरा पट्टा आज ना उद्या निघून जाईल.
त्या झाडावरच्या सुकून, गळून पडलेल्या फांद्यांचे व्रण, कुरूप, काळ्या रेषा काही दिवसांनी इतर व्रणांत लपून जातील.
कदाचित काही काळाने त्या झाडाला पुन्हा हाताला लागतील अशा फांद्या येतील.
असं घडेल? कुणास ठा‌ऊक, घडेलही.

असू घडू शकतं हे मला समजतंय पण मला ते समजून घ्यायचं नाहीये. हे समजून घेतलं तर मी झालं-गेलं सगळं माफ करून टाकेन जे मला करायचं नाही. माफच करून टाकायचं तर जे घडलं त्याला अर्थ काय उरतो? त्याने कन्झ्युम व्हायचं नाही पण ते विसरायचंही नाही. मेबी, तेच बरोबर असेल. त्याने जीवाला जास्त शांतता लाभेल.

फक्त त्या झाडासारखं शांतपणे, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता "फक यू" म्हणता आलं पाहिजे.

प्रयत्न करतेय. जमेल.

6 comments:

Unknown said...

Hi,
Shradhdha.
I dont know how much I understand what you written everytime but I like it everytime.
But what you write is really what every person thinks in his mind but afraid to express else everybody will say he is totally mad..

Anyway i must say I love your articles very much. Please don't stop ever.........

tejas said...

Hi Shraddha,
Very interesting read..thought provoking and yet intense!
Tejas

Shraddha Bhowad said...

Utkarsh,Tejas,

Thank you guys! I felt very warm around my neck. :)

Nil Arte said...

FUCK! ... YOU


...........ROCK!!!

Nil Arte said...

Add pic of the tree if you can...
Want to check out that stud!

प्रीति छत्रे said...

पोस्ट आवडली.
या पोस्टच्या संदर्भात तुमच्या ब्लॉगर-प्रोफाईलवर दिलेल्या ईमेल आयडीवर एक ईमेल पाठवलं आहे. ते पाहून उत्तर पाठवावे ही विनंती.

 
Designed by Lena