’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

--

त्या दिवशी अनू-मनूला सुट्टी होती.

सकाळी थोडसं काहीतरी खा‌ऊन अनू कुठेतरी गायब झाली होती. कधी तिचा आवाज घरातून यायचा तर कधी खालून यायचा. मध्येच एकदा खिडकीबाहेरच्या झाडावरूनही आल्यासारखा वाटला पण ते ठिकच म्हणायचं, कारण अनूचा आवाज आला नाही तरच श्रद्धाला चिंता वाटायची.

अनूचं असं वारा प्यायल्यागत हुंदडणं सुरू होतं तर मनू दोन तासापासून क्लेपासून काहीतरी बनवण्याच्या खटाटोपात होती. सुट्टी म्हणून श्रद्धानेही कधीपासून वाचायचा असलेला एक ठोकळा वाचायला काढला होता. तिच्या खोलीच्या दारातून हॉलमध्ये खुरमांडी घालून बसलेली मनू दिसत होती. दोन तासापासून मनू तिथून हललीदेखील नव्हती. अनू-मनू भलेही जुळ्या असतील, एकमेकींवरून छापून काढल्यासारख्या असतील पण एका जागी बसून मन लावून काही काम करायचं असेल तर मात्र अनू-मनू म्हणजे दोन ध्रुव होते. अनूला स्वस्थता ती कशी नसायची. बसल्या जागी तिची चळवळ चाललेलीच असायची. मध्येच तिला खिडकीतून दिसणा-या रॉबिनला बघायची हुक्की यायची, मग त्याच्याशी काहीतरी लाडेलाडे गिबरीश बोलून झालं की तिला भूक लागायची. तिची भूक भागवते आहे तोवर तिला टीव्हीवर काहीतरी बघायचं असायचं, आणि ते नाही तरी दुसरं काहीतरी करायचं असायचंच. असं सर्व निस्तरताना आपण मुळात अनूला काय करण्याकरता बसवलं आहे हेच श्रद्धाला विसरायला व्हायचं. पण मनू? छे! काम झाल्याशिवाय पठ्ठी जागची हलायची नाही, भुकेचं नाव काढायची नाही की तहान नाही. ज़ीभ नाकाला लावून तल्लीन हो‌ऊन तिचं आपलं-आपलंच काम चाललेलं असायचं. अभ्यासही तितकाच तल्लीन हो‌ऊन आणि हे मातीपासून पक्षी, फुलं बनवणंही तितकंच मन लावून. अशी समाधी लागणारी माणसं काय विलक्षण देखणी दिसतात.

मनू काय करते आहे हे पाहायची श्रद्धाला अनिवार इच्छा झाली पण तिला मनूची समाधीही मोडायची नव्हती. मग श्रद्धा अवघडलेले पाय मोकळे करायला उठली. हॉलमध्ये चक्कर मारण्याच्या बहाण्याने हलक्या पावलाने मनूच्या मागे उभी राहून ती काय करते आहे ते पाहू लागली. मनू क्लेपासून मांजर बनवण्याच्या मागे होती. अगदीच नेमकेपणाने सांगायचे झाले तर ती रागावलेलं मांजर बनवत होती. रागाने लालेलाल होणे कसे असते हे त्या मांजरावरून शब्दशः कळत होतं, लाल मातीपासून बनलेलं होतं ना ते! त्या मांजराच्या कानांनी जमिनीशी काटकोन केलेला होता, पाठीला किंचीत बाक आलेला होता आणि शेपटीचे केस पिंजारल्यासारखे दिसत होते. आजूबाजूच्या मिशा फ़ेंदारलेला जबडा किंचीत उघडा होता आणि त्यातून दोन सुळे डोकावत होते, आकुंचित झालेल्या डोळ्यांच्यावर उभ्या आठ्या होत्या. ते मांजर इतकं जिवंत दिसत होतं की ते आता फिस्कारून आपल्या अंगावर उडी टाकेल असं वाटलं आणि श्रद्धा किंचीत भ्याली. इतके तपशील माहिती असण्याकरिता निरीक्षण किती जबरदस्त असायला हवं याची श्रद्धाला कल्पना होती आणि म्हणूनच ती मनूला नव्यानेच पाहात असल्यासारखी कौतुकमिश्रित नवलाने कितीतरी वेळ पाहातच राहिली. इतक्यात मागून दाणकन दार उघडल्याचा आवाज आला, वावटळीसारखी अनू आली आणि "एय मनू चल गं, टीममध्ये फिल्डर कमी पडतोय" असं म्हणत तिला फरफटवत घे‌ऊनही गेली. मनूने दुबळा विरोध करून पाहिला पण नेहमीप्रमाणेच तिचं अनूपुढे काही चाललं नाही. त्या सर्व गडबडीत त्या मांजराचं शेपूट तुटलं. त्यानंतर कितीतरी वेळ ते शेपूटतुटकं लाल मांजर केविलवाणं तसंच जमिनीवर पडून होतं.

--

रात्री श्रद्धा अनू-मनूच्या खोलीत आली तेव्हा मनूचं कोपिष्ट मांजर ब्रँड न्यू शेपटीसह मनूच्या शेल्फवर दिमाखात उभं होतं. आजूबाजूला सुपा‌एव्हढे कान असलेला हत्ती, खिदळणारी माकडं असे त्याचे सहकारीही होते. अनू-मनू झोपल्या की हे सर्व जिवंत हो‌ऊन दंगामस्ती करत असतील असं त्यांच्या थिजलेल्या आविर्भावांकडे पाहून वाटत होतं.

दुसऱया दिवशीही सुट्टी असल्याने साडे दहा वाजून गेले तरी अद्याप व्हायब्रेटींग मोडवर असलेल्या अनू-मनूला बिछान्यात दामटून झोपवेपर्यंत अकरा वाजले. शेवटी मस्ती बंद केली नाहीत तर गोष्ट सांगणार नाहीची मात्रा लागू पडली. आज कोणती गोष्ट सांगायची हे मात्र श्रद्धा ठरवूनच आली होती.

"आज आपण भारतात नको राहूयात, आपण गोष्ट सांगायला जपानमध्ये जा‌ऊयात."

अनू-मनूने सीटबेल्ट्स बांधले, त्यांच्या-त्यांच्यात काहीतरी अना‌ऊन्समेण्ट हो‌ऊन त्या थेट ’जपान विमानतळा’वर उतरल्या. त्यांचं लँडींग, इमिग्रेशन हो‌ईपर्यंत श्रद्धाने तोंडातून एक चकार शब्द काढला नाही, तसा काढायचा नसतो नाहीतर "तुला समजत कसं नाही!"चे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात हे ती अनुभवाने शिकली होती.

"तर अनू, जपानबद्दल तुला काय माहिती आहे?"

"जपान ना- त्या कमानी घातलेल्या मुली असतात तोच नं?"

"अं..कमानी?"

"हो, पाठीवर गोल दप्तर घे‌ऊन मोठा आंबाडा घालतात ना?"

"अच्छा, किमोनो..अगं कमानी नाही किमोनो आणि ते दप्तर नाही, त्याला ओबी म्हणतात"

"हा, तेच ते कमीनो"

"अगं, किमोनो...बरं, राहू देत. आणि मनू?"

"आम्हाला क्राफ्टच्या टीचरने सांगीतलेलं की ओरीगामीचा बर्थ जपानमध्ये झाला"

"करेक्ट..तर याच जपानमध्ये फार फार वर्षांपूर्वी गो‌ईची नावाचं गाव होतं आणि तिथे साकुरा नावाचा एक छोटा मुलगा राहात होता."

"कुरकुरीत साकुरा"- अनुप्रास अलंकारावर अनूचा टेक

"तर या साकुराचे आ‌ई-वडील लहानपणीच वारल्याने तो या जगात एकटाच असतो. पण गो‌ईची गावातील गावकरी खूप प्रेमळ असतात. लहानपणापासून साकुरा गावातल्या लोकांकडे जेवून मोठा झालेला असतो आणि श्रीयुत हान्स यांच्या तबेल्यात झोपत असतो."

"ते त्याला ऑर्फनेजमध्ये नाही पाठवत?  कित्ती छान नं?"- अनू

"हो तर.. आता कोणी आपल्याला फेव्हर केला की आपण त्याच्याकरिता काहीतरी करतो नं? तसंच साकुराही गावकऱयांची छोटी छोटी कामं करत असतो."

"म्हणजे मी रोज सकाळी झाडांना पाणी घालते तसं?"- मनूची पृच्छा

"हो, तशीच कामं. साकुराला चित्रं काढायला खूप आवडायचं. गावकरी म्हणायचे की त्या गावातलं अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं मंदीर त्याच्या बाबांनी रंगवलेलं होतं. साकुराला त्याच्या बाबांसारखा रंगांचा वारसा मिळाला होता याबद्दल सगळ्यांना कौतुक वाटायचं."

"साकुराला चित्रं काढायला तर आवडायचीच, पण त्याला मांजरीही खूप आवडायच्या."

मनू हुशारते. मांजरी मनूच्याही आवडत्या.

"मांजरींचं आणि त्याचं गूळपीठ होतं. फावल्या वेळात त्याचं आणि मांजरींचं काहीतरी खुसूर-पुसूर सुरू असायचं. त्याला मांजरी इतक्या आवडायच्या, इतक्या आवडायच्या की त्याने त्याच्या तबेल्याच्या भिंतींवर मांजरांची चित्रे चितारून ठेवली होती. ती मांजरं इतकी खरीखुरी वाटायची की ती कधीही म्याँव्व करत भिंतीवरून आपल्या अंगावर उडी घेतील असं वाटायचं."

"अगं, मनूने बनवलेलं मांजर पाहून मलाही असं वाटलेलं एकदा"- अनू- "पण नंतर वाटलं, की मांजर इतकं टायनी कसं असू शकेल, तेव्हा मला कळलं की ते क्लेचं मांजर आहे"-अनूच्या आवाजात मनूविषयीचं कौतुक वाहून चाललेलं आहे.

"अनेक वर्षं सरतात, साकुरा मोठा होतो. मोठा होताना त्याचं मांजरींची चित्रं काढण्याचं वेडही वाढत जातं. रिकामी जागा दिसली की काढ मांजराचं चित्र असं करत तो असतील नसतील तितक्या रिकाम्या भिंती चितारून ठेवायला लागतो. आणि बरं..एकसारख्याच मांजरी नाही..हसणा-या मांजरी, रागावलेल्या मांजरी, आळस देणा-या मांजरी, जांभया देणा-या मांजरी, मोठमोठाल्या मिशा असणा-या मांजरी, काळ्या मांजरी, तपकिरी मांजरी..अशा केवढ्यातरी मांजरींची चित्रं असायची."

"फनी साकुरा, म्यॅडच आहे"-इति अनू, अनू दुजो-याकरिता मनूकडे पाहते पण मनू गोष्टीत इतकी तल्लीन झाली आहे की तिचं अनूकडे लक्षच नाही. अनू कि़ंचीत हिरमुसते.

"एके दिवशी काय होतं तर गावाच्या मुखियाच्या मुलीचं लग्न असतं आणि त्याने घराला रंगरंगोटी केलेली असते. सगळ्या घराला त्याने छान पीच रंगात रंगवून काढलेलं असतं. लग्नाच्या दिवशी सकाळी उठून मुखियाला दिसतं काय तर- त्याच्या घराच्या भिंतीवरून त्याच्याकडे रोखून पाहणा-या मांजरी! साकुराने त्याच्या घराच्या रिकाम्या भिंतींवर मांजरी काढून ठेवलेल्या असतात. ऐन लग्नाच्या वेळी हे असं झालेलं पाहून मुखिया संतापतो आणि गावक-यांची मीटींग बोलावतो. त्यांच्यात खूप चर्चा होते. फक्त मुखियाच नव्हे तर अनेकांच्या साकुराच्या मांजरवेडाबद्दल तक्रारी असतात. ते खूप विचार करतात आणि आता साकुरा मोठा झाला आहे तेव्हा तो स्वतः स्वतःची जबाबदारी घे‌ऊ शकतो असं त्यांचं म्हणणं पडतं. त्यामुळे त्यांच्यात निर्णय होतो आणि साकुराला गाव सोडून जायला सांगण्यात येतं."

"का?" अनू-मनू निषेधाच्या स्वरात कोरसमध्ये. अनू काही बोलणार तेवढ्यात तिला थांबवून (मनूने अनूला थांबवून बोलणं हा दुर्मिळ प्रकार आहे) मनूच विचारते, "पण, मी भिंतीवर चित्र काढली तर तू मला घराबाहेर जायला नाही सांगणार."- मग थोड्याशा साशंक स्वरात "का सांगशील?"

"नाही, मी मुळीच नाही सांगणार पण तू खालच्या पवार काकूंच्या भिंतींवर मांजरं चितारून ठेवली तर त्या वैतागतील, नाही का?"

"हो, आणि त्या सेक्रेटरीपण आहेत. त्या पण मिटींग बोलवतील आणि तुला सोसायटीतून काढून टाकतील मनू.."

विषयाला भलतंच वळण लागतंय बघून श्रद्धा हस्तक्षेप करून ती चर्चा थांबवते आणि थांबलेली गोष्ट पुन्हा एकदा सुरू करते.

"साकुराला खूप वा‌ईट वाटतं पण त्याच्यावर गावक-यांचे खूप उपकार असतात. त्याची परतफेड म्हणून त्यांच्या निर्णयाचा आदर करणं एव्हढंच काय ते त्याच्या हाती असतं. तो आपलं सामान भरतो आणि गावाच्या बाहेर जाणा-या वाटेने चालायला लागतो. त्याला जाताना पाहून गावक-यांनाही वा‌ईट वाटत असतं. त्याला निरोप द्यायला अनेक गावकरी रस्त्याच्या कडेला उभे असतात."

"प्च!" - अनू-मनू ह्ळहळ जाहिर करतात

"साकुरा गावाच्या बाहेर येतो आणि उजवीकडे जाणारी वाट पकडतो. रात्र पडेपर्यंत साकुरा चालत असतो, चालत असतो. अखेर वाटेत त्याला एक दे‌ऊळ लागतं. तो रात्रीपुरता तिथेच थांबून विश्रांती घ्यायची ठरवतो. थोड्याच वेळात मंदीराच्या रिकाम्या भिंती त्याला खुणावू लागतात आणि साकुराला राहावत नाही. तो बसतो मांजरं काढायला. एका तासाभरात मंदीराच्या भिंतीवर मांजरींचा नुस्ता सुळसुळाट होतो. मनाचं समाधान हो‌ईपर्यंत मांजरी काढून झाल्यावर साकुरा शांतपणे झोपी जातो."

अनू-मनूपण बिछान्यावर झोपून दुलया गळ्यापर्यंत ओढून घेतात

"त्या रात्री साकुराला कसल्यातरी आवाजाने जाग येते आणि पाहतो तर काय- अवाढव्य उंदरांची एक पलटण गावाच्या दिशेने चाललेली असते. केवढे मोठे ते उंदीर- त्यातले काही उंदीर तर साकुराच्या तबेल्याच्या उंचीचे असतात. साकुरा खूप घाबरतो आणि त्याला गावक-यांची काळजीही वाटायला लागते. पण या राक्षसी उंदरांच्या विरोधात तो एकटा काय करू शकणार असतो? काय करावं या विचारात असताना देवळातला दिवा फट्टकन विझतो आणि साकुराला आपल्या जवळ जमिनीवर नखं घासल्याचे आवाज यायला लागतात. साकुराची भीतीने गाळण उडते आणि आता आपण संपलो या विचाराने त्याची शुद्ध हरपते."

"अरे बापरे, साकुरा मरतो?" -मनू

"गप्प गं, अजून तरी नुस्ता बेशुद्ध झालाय"- अनू

"दुस-या दिवशी सकाळी गावातला एक माणूस मंदिरासमोरून जात असताना त्याच्या नजरेस ते भयानक दृश्य पडतं आणि तो घा‌ईघा‌ईने गावक-यांना बातमी द्यायला तसाच उलट्या पावली फिरतो. थोड्याच वेळात तिथे अवघा गाव जमतो. सर्वजण भयचकीत चेह-याने त्या दृश्याकडे पाहात साकुरा उठण्याची वाट पाहात असतात."

"बघ..सांगत होते नं मी, नुस्ता बेशुद्ध झाला होता"- अनू

"साकुराला जाग येते तेव्हा त्याला दिस्तं काय, तर सर्वत्र मरून पडलेले उंदीर. एक तर त्याच्या पायालगतच मरून पडलेला असतो. गावकरी साकुराला उचलून घेतात आणि त्याचा जयजयकार करतात. त्याने इतक्या सा-या उंदरांना कसं काय मारलं हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं. पण साकुराला तरी ते कुठे माहित असतं?"

"मग?  साकुरा नाही तर कोण मारतं उंदरांना?"

अनू-मनूने डोळे आश्चर्याने वाटोळे होतात

"सांगते...गावकरी साकुराचा जयजयकार करत असताना एका गावक-याचं लक्ष मंदीराकडे जातं आणि तो थिजतो. त्याला पाहून सर्वांचंच लक्ष मंदीराकडे जातं. मंदीराच्या भिंतींवर साकुराने रंगवलेल्या मांजरी असतात पण, त्या त्याने रात्री काढलेल्या तशा , नेहमीसारख्या मांजरी नसतात. त्यांचे जबडे आता आ वासलेले असतात आणि त्यांच्या सुळ्यांवर रक्त लागलेलं असतं."

"हैला"- अनू, मनू एकदम उठून बसत. त्यांची झोप पळालेली आहे

"गावक-यांना कळून चुकतं की साकुराच्या मांजरांनीच आपले प्राण वाचवले आहेत."

"मग गावावर ओढवलेलं संकट टळल्याच्या आनंदात गावात उत्सव साजरा केला जातो. साकुरा पुन्हा एकदा गावात राहायला जातो आणि गावकरीही त्याच्यावर भरभरून प्रेम करत राहतात. साकुराच्या मांजरवेडाबद्दल त्यानंतर कोणाचीही तक्रार उरत नाही."

"गो‌ईची गावात अजूनही साकुराने रंगवलेल्या त्या भिंती आहेत. प्रत्येक घरात साकुराची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगीतली जाते. गावाला भेट देणा-या लोकांना साकुराची कथा सांगताना कधीकधी रात्री त्या भिंतींवरून फिस्कारल्याचे आणि सौम्य म्यॉवचे आवाज येत असतात हे सांगायलाही गावकरी विसरत नाहीत. दी एण्ड"

त्यानंतर एक खूप मोठ्ठा पॉझ.

"आपण जा‌ऊयात का जपानला त्याची मांजरं बघायला"- मनू स्वप्नाळू डोळ्याने विचारते. ती अजूनही गो‌ईची गावातून बाहेर आलेली नाही.

"जा‌ऊयात की. काय कठीण आहे? हो हो अनू, मॉरल सांगते आहे. तर गोष्टीचं मॉरल आहे, ऐकते आहेस नं मनू, की आपल्याला ज्या गोष्टी करण्याने आनंद मिळतो त्याच गोष्टी कराव्यात. त्याने आपलंही चांगलंच होतं आणि कालांतराने इतरांचंही चांगलंच होतं. कळलं?"

"हो"-मनू सावकाश उत्तरते आणि बाजूच्या शेल्फमधलं ते दुर्वास मांजर हातात घे‌ऊन कुरवाळते.

"तुला मला तर नाही ना काही सांगायचं होतं?" कुठलीतरी शंका ये‌ऊन अनू विचारते

त्यावर तिचा गालगुच्चा घे‌ऊन श्रद्धा बोलते, "नाही गं बयाबा‌ई, मी तुला काय सांगणार. मॉरल्स ज्याच्यापर्यंत पोहोचायची ती आपो‌आप पोहोचतात."

यावर मनू गोड हसते, मनूला हसताना पाहून श्रद्धा हसते आणि या हसणा-या दोघींना पाहून अनू म्यॅड हो‌ऊन पाहातच राहाते.

13 comments:

Meghana Bhuskute said...

आवडेश!

दुर्वास मांजर, व्हायब्रेटिंग मोडवरच्या अनूमनू, त्यांचे वेगळाल्ले सूर... जमलंय. :D

त्याकरता हे गिफ्ट: http://emmagrant01.tumblr.com/post/77544930884/cumber-porn-tymethiefslongerthoughts

Meghana Bhuskute said...

खूप पूर्वी निवेदिता जगताप-बर्वेचा एक ब्लॉग होता, आठवतंय? नीना आणि मांजराच्या गोष्टी असायच्या त्यावर. तुझी गोष्टींची मालिका वाचताना मला त्या गोष्टींची आठवण येतेय. साम्य? चक्‌. काहीच नाही. पण आठवण होतेय मात्र! तशी(तशी म्हणजे तशीच्या तशी नव्हेत! तशी म्हणजे ती चित्रं जशी त्या गोष्टींचं एक अंग झालीवती, तशी) चित्रं काढणारं कुणी मिळेल का तुला या मालिकेसाठी? मला चित्रं हवीयेत!

आणि या मालिकेची बरीच काय विच्छेदनं कम विश्लेषणं डोक्यात येतायत. पण ती काय मी खरडायला नाही, डोण्ट वरी!

ही श्रद्धा मस्त आहे. ही मालिका सोडून नको देऊस. अंतराअंतरानं हवं तर - लिहीत राहा पण.

तृप्ती said...

goShTa vaachaayachee aahe. meghana mhaNatey to blog- http://kachakavadya.wordpress.com/

Shraddha Bhowad said...

मेघना, आठवतोय नं निवेदिताचा ब्लॉग. बेबलॉश्की नावाचं मांजर होतं. आणि अनू-मनूच्या गोष्टी या वाचताना ’दिसल्या पाहिजेत’वर माझा भर होता, त्यामुळे एक क्षण माझ्याही डोक्यात चित्रांची कल्पना आली होती पण, आता मी चित्रं काढणारं कोण कसं मिळवू?

<<या मालिकेची बरीच काय विच्छेदनं कम विश्लेषणं डोक्यात येतायत. पण ती काय मी खरडायला नाही, डोण्ट वरी!

या डोण्ट वरी वर माझे बरेच आक्षेप आहेत. तू कर की विश्लेषण, आनंदाने वाचेन मी ते. तुला कोण काय बोललंय का कधी?

Shraddha Bhowad said...

आणि हो,

लिंक भन्नाट आहे. थॅंक यू. मी मांजरं तर पाहिलीच आणि ’आजू-बाजूच्या’ ब-याच गोष्टीही वाचल्या. मे बी तू मला ’आजू-बाजूच्या’ गोष्टींकरताच लिंक दिली होतीस खरंतर, क्लेची मांजरं वगैरे फ़क्त निमित्त!:D

Unknown said...

जपान, मांजरी, studio ghibli यांचं नातं मला अजून समजलं नाहीये. चित्रं anime शैलीत असावीत असंही वाटून गेलं. या निमित्ताने whispher of the heart, totoro, आणि विशेषत: tekkon-kinkrit सारखे चित्रपट आठवले.

Vidya Bhutkar said...

:) Woww Khupach avadali. Keep going... Looking forward to read more.
Vidya.

Shraddha Bhowad said...

सिराज,

मला वाटतं तुम्ही याआधीही ब्लॉगवर कमेण्ट केलेली आहे पण खूप वर्षांपूर्वी अर्थात. आता आठवत नाही.

ते असो.

मांजरं आणि जॅपनीज संस्कृती यांचं नातं खूप घट्ट आहे. आपल्याकडे लाफिंग बुद्धाला कसं ’लकी चार्म’ म्हणून वापरतात तसं तिथे मानेकी नेकोची (म्हणजे हात हलवून बोलवणारी मांजर) सिरॅमिकची मूर्ती वापरतात. मानेकी नेको अनेक लोककथांतून दिसते.

एक कथा अशी आहे की-
एकदा काय होतं की एका मिठाईवाल्याचा धंदा म्हणावा तसा चालत नसतो. त्याचा धंदा इतका बसतो, इतका बसतो की त्याला स्वत:चे पोट भरणेही मुश्कील होऊन बसलेले असते. त्याच वेळी त्याच्या दुकानाच्या दारात एक हडललेली, भुकेली मांजर येते. तिची दया येऊन तो दुकानदार तिला घरात घेतो आणि स्वत:च्या खाण्यापिण्याचे वांधे झालेले असताना तिला खायला-प्यायला घालतो. त्याच्या उपकरांची परतफ़ेड म्हणून ती मांजर दुकानाच्या बाहेर बसून ग्राहकांना हात करायला लागते, खुणवायला लागते आणि कालांतराने त्या दुकानाला बरी बरकत येते.
म्हणून आजही अजूनही जपानमध्ये छोट्या दुकानदारांकडे मानेकी नेकोचे पुतळे पाहायला मिळतात.

त्यांच्या लोककथांतून सुद्धा मांजरींचे बरेच संदर्भ वाचायला मिळतात. त्यांच्या कथांतून बाकेनेको या चेटूक करणा-या मांजरीचे, नेकोमाता या चेटकिणीत रूपांतर होणा-या, डोंगरद-यांमध्ये लपून बसणा-या चेटकिणीचे यामानेको, मिकेनेको अशा ब-याच मांजरींचे संदर्भ येतात.

मी ऍनाईम पाहिलेले नाही पण या कथेला दृश्य स्वरूपात सादर करायचे झाले तर मला गीतांजली रावच्या ’द प्रिन्टेड रेनबो’सारखं सादर करायला आवडेल.

Shraddha Bhowad said...

विद्या,

आय ऍम ग्लॅड.
मला आता कथा लिहून झाली की तुझी आणि तुझ्या मुलीची आठवण एकदा तरी येतेच येते.:)

Nil Arte said...

श्रभो (हे थोडं न. मो. सारखं वाटतंय का?)
बाय द वे नमोंचा बांगडा मासा किंवा देवानंद झालाय म्हणजे तुम्हाला प्रचंड आवडणार किंवा तुम्ही प्रचंड हेट करणार … मधली अवस्था ना SSSS ट पासिबल ! (रेफेरिंग कणेकर )

अच्छा ते सोड,
गोष्ट आवड्लीच … आधी तू सांगितली होतीसच!

पण मला स्वत:ला अनूची बॉर्डर लाइन A.D.D. जास्त रिलेट होतेय. (is it that unobivous in my case ;) I guess not!)
म्हणजे मनूचा फोकस वगैरे मस्त पण गम्मत काय आहे माहितीय का?

हे उडान, स्टेपअप सारखे पिक्चर, चेतन भगत आणि वीस हजार इतर लेखक सांगतात की follow ur heart… focus on what u are good at वगैरे.
पण ट्रिकी पार्ट हा आहे की मनूसारख्या लकी लोकांना आपण कशात सरस आहोत ते माहीत असतं किंबुहना ते कशात तरी तुफान सरस असतात in first place!

पण अन्यासारख्या लोकांना आधी आपलं हार्ट कशात आहे ते शोधावं लागतं मग ते फॉलो करण वगैरे

म्हणजे माझ्या डोक्यात एखादं माणूस तुफान लिहितं किंवा नाचतं किंवा गातं हाच मुळात happy end आहे.
मग त्यासाठी नोकरी सोडण वगैरे ठीकाय पण तो लिहिण्याचा / नाचाचा / किंवा गाण्याचा खजिना ऑलरेडी
त्यांच्याकडे असतोचना…. किती लोकांचा तो खजिना शोधण्यातच जन्म निघून जातो.

जाऊदे अनू-मनू मस्त जेवून गुडूप झोपल्या असतील ….'बाजारात तुरी आणि … वगैरे वगैरे'

Shraddha Bhowad said...

निलेश,

आय हियर यू. :)

पण इथे मनूला ’तू ज्याच्यात बेस्ट आहेस ते कर’ असं न सांगता तुला जे आवडतंय ते - मग ते काहीही का असेना- कर असं सांगायचा प्रयत्न आहे. आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय यबद्दलच्या कल्पना अनू-मनूच्या वयात तरी हजारदा बदलतात, :) त्यामुळे त्यांच्या ’कॉलिंग’ची गोष्ट नाही चाललिये. अनू तिला जे करायला आवडतंय ते करतेय, खूष आहे, इतरांनाही तेच करायला लावण्याइतपत तिला ती गोष्ट आवडतेय. त्यामुळे आपली कन्सर्न मनू आहे जी अनू सांगते म्हणून, तिच्या आनंदासाठी हातातलं मांजर सोडून क्रिकेट खेळायला जाते.

दुस-याच्या आवडीनिवडी आपल्या मानणं एक गोष्ट असते, पण त्यासाठी आपल्या आवडी-निवडी बाजूला ठेवणं ही ऑलटूगेदर दुसरी गोष्ट आहे, ती मनूच्या बाबतीत होऊ नये असं श्रद्धाला वाटतं-म्हणून ही इन्टेलिजण्ट गोष्ट.

बाकी बोलूच.

Asita Ajgaonkar said...

Mage Meghanachya Reshakshare madhe vachaleli tuzi gosht. ata parat tichyach blogwarun tuzya blogwar ale.:)

Akadam lobhas characters ahet.Chhan ubadar vatala vachun.

Shraddha Bhowad said...

हाय असिता,
तुझं नाव वाचून मला एकदम 'त्या वर्षी' मधली अनिमा आठवली. :)
Well, ही पात्रं, the very idea of them, is the warmth I have in my life too. लिहिताना माझं मलाच उबदार वाटत असेल, तर ते तसं माझ्याकडून तुझ्यापर्यंतही पोहोचायला हवं ideally. तसं पोहोचलं, तुझ्याकडून त्याची पोचपावती मिळाली, मला जे पाहिजे ते मिळालं. Thanks a lot for that!

-श्रद्धा

 
Designed by Lena