’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

--

अनू-मनूची शाळेतून येण्याची वेळ झाली तशी श्रद्धाने लिखाण थांबवलं, हात वर करून, मान इथे-तिथे करत झडझडून आळस दिला. या कथेतल्या नायिकेने तिला दुपारपासून खूप दमवलं होतं. तिला नेमकं काय हवं असायला हवं आहे यावर श्रद्धाचा विचार पक्का होत नव्हता. एरव्ही अनू-मनूच्या बाबाशी बोललं की तिची कथा वाहती व्हायची पण तोही टूरवर गेला होता, त्यामुळे घर चमत्कारीक रितीने शांत होतं. त्या घराला आरडा‌ओरडा, चिल्लमचिल्ली, लुंगी डान्सवर अनू-मनूसोबत कंबर, भुवया, खांदे सर्व काही मटकवत नाचणारा अनू-मनूचा बाबा आणि अनू-मनूची इतकी सवय हो‌ऊन गेली होती की त्या शांततेने तिच्या घशात आवंढाच आला एकदम.

श्रद्धा उठली आणि किचनमध्ये गेली. अनू-मनूच्या बाबाने नाश्त्याचं वेळापत्रक त्याच्या सुवाच्य अक्षरात लिहून फ्रिजवर डकवलेलं होतं. काल चॉकलेट कॉर्नफ्लेक्स झाले तर मग आज स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्स नाही दिले तर अनू-मनू नाक, तोंड घाण करायला विसरत नाहीत याची आठवण अद्याप ताजी होती, त्यामुळे तिने दोनदोनदा चेक करुन स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्सचा डबा उघडला. तेवढ्यात बाहेर धपाधप उड्या टाकल्याचे आणि किन-या आवाजातल्या "रिक्षावाले मामा, बाय बाय"च्या आरोळ्या, हवेत फ्ला‌ईंग किस फेकल्याचे आवाज आले. पाय-यांवरचे दाणदाण आवाज दारापाशी ये‌ऊन पोहोचले आणि दारावर धाडधाडधाडधाड करुन थापा ऐकायल्या यायला लागल्या. ती घा‌ईघा‌ई धावली आणि दार उघडलं. दारात नखशिखांत मातीने मळलेल्या, नाका-तोंडाला माती लागलेल्या अवतारात अनू-मनू उभ्या होत्या. दोघींनीही एकाच वेळी वाकून श्रद्धाच्या पलीकडे कोणी उभं आहे का हे पाहिलं. काहीतरी घडेल आणि बाबा टूरवरून लवकर परत ये‌ईल असं या पोरींना रोज रोज कसं काय वाटू शकतं? श्रद्धाला प्रचंड अचंबा वाटला आणि किंचीत हेवाही.

दोघी चूपचाप आत गेल्या, स्वच्छ हातपाय धुतले. एरव्ही त्या जागी तशाच मळलेल्या अवतारात रिंग अ रिंग अ रोझेसचा एक खेळ झाला असता, साखरेचं पोतं करत खोलीपर्यंत हमाली करून झाली असती. टेबलावर दोघीही खायला बसल्या तशी त्यांच्यात तू विचार, तू विचार या अर्थी काहीतरी खाणाखुणा चालू आहेत हे श्रद्धाला त्यांच्याकडे न पाहताही कळत होतं पण वेळ येताच सर्व गोष्टी आपसूक समजतातच हे माहित असल्याने श्रद्धानेही काही विचारलं नाही. पोरी खाणं आटपून खोलीत पळाल्या आणि श्रद्धा किचनमध्ये इकडेतिकडे फिरत राहिली. फ्रिज उघडून भाज्यांच्या कंपार्टमेण्टकडे होपलेसली पाहताना तिच्या कुर्त्याचा शेव ओढला गेला. तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या कुर्त्याला धरून अनू, तिच्या मागे तिच्या फ्रॉकचा बेल्ट धरून उभी असलेली भित्र्या डोळ्यांची मनू अशी एकदम आगीनगाडीच तयार झाली होती. तिला खुदकन हसू फुटलं. तिला हसताना पाहून अनू-मनूही किंचीत हुशारल्या. तिने फ्रिज बंद केला आणि गुडघ्यावर बसत त्या दोघींना समोर घेतलं आणि विचारलं, "बोला, आमच्या अनू-मनूला काय विचारायचं आहे?"

अनूने तिच्या नाकासमोर एक पुस्तक धरलं आणि म्हटलं, "मला -", मागून तिच्या फ्रॉकचा शेव ओढला गेला, "नाही, म्हणजे ’आम्हाला’ एक शंका आहे."

आपादमस्तक गहन शंका हो‌ऊन आलेल्या अनू-मनूला पाहताना श्रद्धाला खूप गंमत वाटत होती.

तिला खात्री होतीच पण तिने मुद्दामहून विचारलं, "मग? बाबाला फोन नाही केलात.. ’तुम्ही’?"

यावर मनू झकास लाजली. मनू बाबाचं शेपूट आहे हे सर्वांनाच माहित होतं.

"केला. तो म्हणाला तुला विचार म्हणून."

"बरं. आता बाबाचं सर्टीफिकेट मिळालंय म्हटल्यावर तुमची शंका ऐकायलाच हवी."

श्रद्धाने अनूने ऑलमोस्ट नाकात खुपसलेलं पुस्तक घे‌ऊन पाहिलं तर ती आपल्या जॉली गुड लाकूडतोड्याची गोष्ट होती.

"या गोष्टीत शंका आहे?"

उत्तरादाखल अनू-मनूच्या माना एकसाथ हलल्या.

"बरं.. मी तुमच्या शंकेचं उत्तर दे‌ईन पण.."

काय त्रास आहे अशा अर्थी अनू-मनूने एकमेकींकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा श्रद्धाकडे पाहिलं

"एका अटीवर.." अनू-मनूकडे वळत श्रद्धा म्हणाली

"पहिल्यांदा तुम्ही ती गोष्ट मला ऐकवायची."

अनू-मनू केवढ्यातरी मोकळेपणी हसल्या आणि मग लगेच सावधान भूमिकेत शिरून, पोझिशन वगैरे अॅडजस्ट करून त्यांनी गोष्ट सांगायला सुरूवात केली.

एका गावात (तर्जनी नाचवली जाते) रामू नावाचा एक लाकूडतोड्या राहात होता. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता.(खूप या अर्थी हात ताणून) तो रोज सकाळी उठून लाकडं तोडायला जंगलात जात असे. लाकडं विकून जे पैसे येत त्यात तो भाजी, मीठ-मिर्ची घे‌ऊन घरी जात असे. (डोक्यावर टोपली धरल्याची अॅक्शन) लाकडं तोडूनच त्याचे घर चालत असे. कधीकधी पोटभर खायला अन्नही नसायचे (मनूची नजर न राहवून ओरीयोच्या डब्याकडे) पण लाकूडतोड्याने समाधानी होता.

एके दिवशी काय होतं की, लाकूडतोड्या नेहमीसारखा लाकडं तोडायला जंगलात जातो. आज तो जंगलात खूप आत नदीच्या काठी असलेल्या झाडाची लाकडं तोडायला आलेला असतो. पण लाकडं तोडताना त्याचा तोल जातो (पोरींचाही तोल जातो) आणि त्याच्या हातातली कुऱहाड नदीत पडते (कुऱहाड पडल्याची अॅक्शन करताना जागच्याजागी उड्या मारल्या जातात). लाकूडतोड्या खूप घाबरतो. त्याला पोहायला येत नसतं

त्यानंतर मनूला जे हसू फुटतं ते काही केल्या थांबायलाच तयार नाही. ती आपली खिदळत बसते. सिग्नल पास ऑन व्हावा तसं अनूलाही ती का हसते हे कळतं आणि ती ही खुसूखुसू हसायला सुरूवात करते.

या दातपडकीला काय झालं हसायला आता?

"काय झालं मनू?"

"त्याला पोहायला येत नसतं." ती आपली हसतेच आहे. "मला पण येतं पोहायला, त्याला कसं येत नाही?"
यावर अनूची मनूला टाळी

"कारण- रामूला तुमच्यासारखा बाबा नसतो. मग त्याला कोण शिकवणार पोहायला?"

अनू-मनूचे डोळे मोठ्ठाले हो‌ऊन विस्फारतात

"ह्यॅट! बाबा नसतो म्हणजे काय. प्रत्येकाला बाबा असतो. संजूला आहे, अवनीला आहे, सोहमलापण आहे."- मनू

"काही जणांना नसतो."

श्रद्धाने अतिशय गंभीरपणे म्हटलेलं ठाम विधान ऐकून पोरींचे चेहरे झटक्यात उतरतात आणि रामूच्या अॅगनीची फटक्यात कल्पना ये‌ऊन चुकल्यासारखे केविलवाणे होतात; पोट धरून रामूवर हसत असलेल्या मनूचा चेहरा तर फारच उतरतो.  श्रद्धाला फार अपराध्यागत वाटतं पण काही गोष्टी गृहित धरल्या जा‌ऊ नयेत तेच बरं असतं.

"बरं. त्याला पोहायला येत नसतं. मग? पुढे काय होतं?"

त्यावर झटक्यात स्टोरीच्या बे‌अरींगमध्ये पुन्हा एकदा शिरून-
"हां.." तर मग तो बिचारा रडायलाच लागतो. त्याचे अश्रू टपटप करून नदीत पडायला लागतात. (अनू-मनू वाकून डोळ्यातून काहीतरी काढल्याचा अभिनय करतात पण ते अश्रू असावेत हे श्रद्धा समजून घेते) त्यानंतर चमत्कार होतो. खूप प्रकाश होतो आणि नदीतून एक देवता प्रकट होते. ती  म्हणते-

यावर अनू देवता आणि मनू लाकूडतोड्या असा रोल-प्ले सुरू होतो. अनू देवीच्या पोझमध्ये ताठच्या ताठ उभी आणि तिच्यासमोर वाकून बसलेल्या रडव्या चेह-याच्या चिमुकल्या मनूला पाहणे इतके गंमतीदार असते की आपलं हसू दडवायला श्रद्धाला तोंडावर बोटं घट्ट दाबून धरायला लागतात.

"काय झालं बाळा तुला रडायला?" -अनूदेवी

"हे देवी, माझी कु-हाड नदीत पडली म्हणून मी रडतो आहे." मनूचा हातवारे आणि आवेश पाहण्याजोगा आहे. "माझ्याकडे ती एकच कु-हाड होती. आता मी लाकडं कशी तोडणार, माझ्या मुलांना काय खायला घालणार या विचाराने मला रडू येतं आहे." मनू रामूचा रोल करताना इतकी तल्लीन झालीये की रामू उर्फ मनूच्या दुःखाने अनूदेवी ओठ बाहेर काढून गळा काढणार का काय असं वाटायला लागतं.

"मी या नदीची देवता आहे. या नदीवर माझं राज्य आहे. थांब रामू लाकूडतोड्या, मी तुझी कु-हाड शोधून देते"

यांवर अनूदेवी हवेत डुबकी मारल्याचा अभिनय करतात. रामू ऊर्फ मनू त्या अॅक्शनवर फिदा असतो की काय कोण जाणे, तो ही गरज नसताना हवेतल्या हवेत डुबकी मारून घेतो.

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"नाही देवी, ही सोन्याची कु-हाड आहे. ही माझी कु-हाड नाही"

पुन्हा डुबकी

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"नाही देवी, ही चांदीची कु-हाड आहे. ही माझी कु-हाड नाही"

पुन्हा एकदा एकदम फायनल ड़ुबकी

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"हो देवी, हीच माझी लोखंडाची कु-हाड"

पुन्हा एकदा स्टोरीटेलिंगच्या सावधान पोझिशनमध्ये-
रामू लाकूडतोड्याला आपली कु-हाड मिळाल्याचा खूप आनंद होतो आणि तो देवीचे खूप आभार मानतो. त्यावर देवी म्हणते. "रामू लाकूडतोड्या, मी तुझ्या प्रामाणिकपणाने प्रसन्न (3ऱया प्रयत्नांनंतर प्रसन्न व्यवस्थित बोललं जातं) झाले आहे. त्यामुळे बक्षिस म्हणून मी या दोन्हीही कु-हाडी तुला देत आहे. जा, सुखी राहा."
रामू लाकूडतोड्याला त्या कु-हाडी विकून खूप पैसे मिळतात आणि तो खूप सुखी होतो.

गोष्ट संपते.

"मग आता यात काय शंका आहे? "

यावर अनू पुढाकार घे‌ऊन एकदाची विचारूनच टाकते-

"सोन्याची कु-हाड म्हणजे बाबाने आम्हाला चेन आणलेली तशी अख्खी सोनेरी कु-हाड का?"

"हो." त्यांची शंका नक्की कोणत्या बाबतीत आहे याबद्दल श्रद्धाला अजून अंदाज येत नाहीये.

"आणि चांदी म्हणजे गावी आजीचे देव आहेत तशी चकचकीत?"-मनू चिवचिवते

"हो. मग?"

"मग देवीने दिलेलं ते गिफ्ट किती महाग आहे. असं क़ोणी इतकं महाग गिफ्ट देतं काय? आणि रामूने ते घेतलं तरी कसं?"

हांsss ही ती शंका होती काय?

"का अनू? तू नसतं घेतलं?"

"नाहीच्च मुळी. मी नसतं घेतलं. मनूनेही नसतं घेतलं, हो की नाही मनू?" मनू यावर जोरजोरात मान हलवते.

"तू घेतलं असतं का इतकं महागडं गिफ्ट कोणाकडून?" या प्रश्नाच्या उत्तरावर अवघं जीवन अवलंबून असल्यासारखा अनू-मनूचा आवाज आता एवढुस्सा झालेला आहे.

श्रद्धा त्यांच्याकडे रोखून पाहते. त्यांनी बाबालाही हाच प्रश्न विचारून खात्री करून घेतलेली आहे हे तिला कळून चुकतं आणि आता त्या तिला विचारायला तिच्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात.

"हो, घेतलं असतं. त्यात काय एव्हढं?" असं म्हणायचा खूप मोह होतो श्रद्धाला पण त्यांच्या भित्र्या, उत्सुक डोळ्यांत ती काय बोलणार आहे याबद्दलची खात्रीही कुठेतरी जाणवते आणि ती मोडायचे धार्ष्ट्य ती करू शकत नाही.

ती खाली बसते आणि त्यांच्या‌इतकी हो‌ऊन म्हणते, "नाहीच्च मुळी, मी पण नसतं घेतलं इतकं महागडं गिफ्ट."

अनू-मनूने रोखून धरलेले श्वास फुस्सकन सुटतात आणि त्या दिलखूष हो‌ऊन हसतात. "बाबा पण हेच म्हणाला" असं म्हणत-म्हणत, उड्या मारत आपल्या खोलीकडे जाणा-या अनू-मनूला पाहत श्रद्धा उठते आणि आपल्या गोष्टीतल्या उगाचच हे हवं, असंच का करत व‌ई व‌ई करत रडणाऱया नायिकेला मारो गोली करत त्यांच्यामागोमाग त्यांच्या खोलीत जाते.


8 comments:

Meghana Bhuskute said...

हां! ही जास्त आवडलीय. पण आता काही फुसके आणि काही सिर्यस आक्षेपः

कुर्त्याचा शेव म्हणजे? शेव म्हणजे नक्की काय? पदराचा शेव म्हणजे पदराची कडा, जिला दशा (बाहेर आलेली दोर्‍याची सुटी / गाठ मारलेली टोकं) असतात. कुर्त्यालाही शेव होता की कुर्त्याची नुसतीच कडा होती? आय नो, याचा गोष्टीशी तसा संबंध नाहीय. पण स्वारी, गेलं बॉ माझं लक्ष.

सिर्यस म्हणजे -
आता अनू-मनू ही माझ्यासाठी एकजिनसी आयडेन्टिटी होत चालली आहे. असं अज्याबात होणं अपेक्षित नाही. हे होणं आवडलेलं नाही. त्या पोरींना आपापली स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्वं नि वैशिष्ट्यं नकोत? कमॉन, दे डिझर्व इट. तसं करता आलं तुला, तर फार म्हणजे फारच मजा येईल. :)

Shraddha Bhowad said...

मेघना,
:)
पेशन्स, सबूर! ही आताशी दुसरी गोष्ट आहे.

कुर्त्याच्या शेवाबद्दल मी देखील साशंक होते. मला स्पेसिफिकली कुर्त्याचा कट ओढला गेला असं लिहायचं होतं पण त्याला कटशिवाय दुस्रा कोण्ता शब्द सुचलाच नाही. मग मी त्याला अंदाजपंचे कुर्त्याचा शेव करून टाकला. पण त्याने तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं चित्र हे मला दिसलं किंवा मला दाखवायचं होतं तसंच होतं का याबद्दल मात्र कल्पना नाही. हे दशा प्रकरण मात्र खरंच ठाऊक नव्हतं मला.

Vidya Bhutkar said...

'Kurtyacha tok'? :)
Anyway, I liked this one too. Waiting for more.
Vidya.

Vidya Bhutkar said...

'Kurtyacha tok'? :)
Anyway, I liked this one too. Waiting for more.
Vidya.

Shraddha Bhowad said...

विद्या,
नाही अगं. आत हे महिला मंडळ टाईप्स होतंय, पण कुर्त्याच्या कट्ला आपण किनार लावतो ती बाजू अनूने ओढली तर ते टोक नाही नं होत़्?
मरो.
तुला गोष्ट आवडली हे छान.

Anonymous said...

Good one.

Nil Arte said...

आवडेशच

Rahul-brain with beauty said...

Changli gosht ahe.awadli.tapshil surekh..manuchii najar oriochya dabayakade...amche laksh pudhil goshti kade. ..

 
Designed by Lena