’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

--

अनू-मनूची शाळेतून येण्याची वेळ झाली तशी श्रद्धाने लिखाण थांबवलं, हात वर करून, मान इथे-तिथे करत झडझडून आळस दिला. या कथेतल्या नायिकेने तिला दुपारपासून खूप दमवलं होतं. तिला नेमकं काय हवं असायला हवं आहे यावर श्रद्धाचा विचार पक्का होत नव्हता. एरव्ही अनू-मनूच्या बाबाशी बोललं की तिची कथा वाहती व्हायची पण तोही टूरवर गेला होता, त्यामुळे घर चमत्कारीक रितीने शांत होतं. त्या घराला आरडा‌ओरडा, चिल्लमचिल्ली, लुंगी डान्सवर अनू-मनूसोबत कंबर, भुवया, खांदे सर्व काही मटकवत नाचणारा अनू-मनूचा बाबा आणि अनू-मनूची इतकी सवय हो‌ऊन गेली होती की त्या शांततेने तिच्या घशात आवंढाच आला एकदम.

श्रद्धा उठली आणि किचनमध्ये गेली. अनू-मनूच्या बाबाने नाश्त्याचं वेळापत्रक त्याच्या सुवाच्य अक्षरात लिहून फ्रिजवर डकवलेलं होतं. काल चॉकलेट कॉर्नफ्लेक्स झाले तर मग आज स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्स नाही दिले तर अनू-मनू नाक, तोंड घाण करायला विसरत नाहीत याची आठवण अद्याप ताजी होती, त्यामुळे तिने दोनदोनदा चेक करुन स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्सचा डबा उघडला. तेवढ्यात बाहेर धपाधप उड्या टाकल्याचे आणि किन-या आवाजातल्या "रिक्षावाले मामा, बाय बाय"च्या आरोळ्या, हवेत फ्ला‌ईंग किस फेकल्याचे आवाज आले. पाय-यांवरचे दाणदाण आवाज दारापाशी ये‌ऊन पोहोचले आणि दारावर धाडधाडधाडधाड करुन थापा ऐकायल्या यायला लागल्या. ती घा‌ईघा‌ई धावली आणि दार उघडलं. दारात नखशिखांत मातीने मळलेल्या, नाका-तोंडाला माती लागलेल्या अवतारात अनू-मनू उभ्या होत्या. दोघींनीही एकाच वेळी वाकून श्रद्धाच्या पलीकडे कोणी उभं आहे का हे पाहिलं. काहीतरी घडेल आणि बाबा टूरवरून लवकर परत ये‌ईल असं या पोरींना रोज रोज कसं काय वाटू शकतं? श्रद्धाला प्रचंड अचंबा वाटला आणि किंचीत हेवाही.

दोघी चूपचाप आत गेल्या, स्वच्छ हातपाय धुतले. एरव्ही त्या जागी तशाच मळलेल्या अवतारात रिंग अ रिंग अ रोझेसचा एक खेळ झाला असता, साखरेचं पोतं करत खोलीपर्यंत हमाली करून झाली असती. टेबलावर दोघीही खायला बसल्या तशी त्यांच्यात तू विचार, तू विचार या अर्थी काहीतरी खाणाखुणा चालू आहेत हे श्रद्धाला त्यांच्याकडे न पाहताही कळत होतं पण वेळ येताच सर्व गोष्टी आपसूक समजतातच हे माहित असल्याने श्रद्धानेही काही विचारलं नाही. पोरी खाणं आटपून खोलीत पळाल्या आणि श्रद्धा किचनमध्ये इकडेतिकडे फिरत राहिली. फ्रिज उघडून भाज्यांच्या कंपार्टमेण्टकडे होपलेसली पाहताना तिच्या कुर्त्याचा शेव ओढला गेला. तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या कुर्त्याला धरून अनू, तिच्या मागे तिच्या फ्रॉकचा बेल्ट धरून उभी असलेली भित्र्या डोळ्यांची मनू अशी एकदम आगीनगाडीच तयार झाली होती. तिला खुदकन हसू फुटलं. तिला हसताना पाहून अनू-मनूही किंचीत हुशारल्या. तिने फ्रिज बंद केला आणि गुडघ्यावर बसत त्या दोघींना समोर घेतलं आणि विचारलं, "बोला, आमच्या अनू-मनूला काय विचारायचं आहे?"

अनूने तिच्या नाकासमोर एक पुस्तक धरलं आणि म्हटलं, "मला -", मागून तिच्या फ्रॉकचा शेव ओढला गेला, "नाही, म्हणजे ’आम्हाला’ एक शंका आहे."

आपादमस्तक गहन शंका हो‌ऊन आलेल्या अनू-मनूला पाहताना श्रद्धाला खूप गंमत वाटत होती.

तिला खात्री होतीच पण तिने मुद्दामहून विचारलं, "मग? बाबाला फोन नाही केलात.. ’तुम्ही’?"

यावर मनू झकास लाजली. मनू बाबाचं शेपूट आहे हे सर्वांनाच माहित होतं.

"केला. तो म्हणाला तुला विचार म्हणून."

"बरं. आता बाबाचं सर्टीफिकेट मिळालंय म्हटल्यावर तुमची शंका ऐकायलाच हवी."

श्रद्धाने अनूने ऑलमोस्ट नाकात खुपसलेलं पुस्तक घे‌ऊन पाहिलं तर ती आपल्या जॉली गुड लाकूडतोड्याची गोष्ट होती.

"या गोष्टीत शंका आहे?"

उत्तरादाखल अनू-मनूच्या माना एकसाथ हलल्या.

"बरं.. मी तुमच्या शंकेचं उत्तर दे‌ईन पण.."

काय त्रास आहे अशा अर्थी अनू-मनूने एकमेकींकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा श्रद्धाकडे पाहिलं

"एका अटीवर.." अनू-मनूकडे वळत श्रद्धा म्हणाली

"पहिल्यांदा तुम्ही ती गोष्ट मला ऐकवायची."

अनू-मनू केवढ्यातरी मोकळेपणी हसल्या आणि मग लगेच सावधान भूमिकेत शिरून, पोझिशन वगैरे अॅडजस्ट करून त्यांनी गोष्ट सांगायला सुरूवात केली.

एका गावात (तर्जनी नाचवली जाते) रामू नावाचा एक लाकूडतोड्या राहात होता. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता.(खूप या अर्थी हात ताणून) तो रोज सकाळी उठून लाकडं तोडायला जंगलात जात असे. लाकडं विकून जे पैसे येत त्यात तो भाजी, मीठ-मिर्ची घे‌ऊन घरी जात असे. (डोक्यावर टोपली धरल्याची अॅक्शन) लाकडं तोडूनच त्याचे घर चालत असे. कधीकधी पोटभर खायला अन्नही नसायचे (मनूची नजर न राहवून ओरीयोच्या डब्याकडे) पण लाकूडतोड्याने समाधानी होता.

एके दिवशी काय होतं की, लाकूडतोड्या नेहमीसारखा लाकडं तोडायला जंगलात जातो. आज तो जंगलात खूप आत नदीच्या काठी असलेल्या झाडाची लाकडं तोडायला आलेला असतो. पण लाकडं तोडताना त्याचा तोल जातो (पोरींचाही तोल जातो) आणि त्याच्या हातातली कुऱहाड नदीत पडते (कुऱहाड पडल्याची अॅक्शन करताना जागच्याजागी उड्या मारल्या जातात). लाकूडतोड्या खूप घाबरतो. त्याला पोहायला येत नसतं

त्यानंतर मनूला जे हसू फुटतं ते काही केल्या थांबायलाच तयार नाही. ती आपली खिदळत बसते. सिग्नल पास ऑन व्हावा तसं अनूलाही ती का हसते हे कळतं आणि ती ही खुसूखुसू हसायला सुरूवात करते.

या दातपडकीला काय झालं हसायला आता?

"काय झालं मनू?"

"त्याला पोहायला येत नसतं." ती आपली हसतेच आहे. "मला पण येतं पोहायला, त्याला कसं येत नाही?"
यावर अनूची मनूला टाळी

"कारण- रामूला तुमच्यासारखा बाबा नसतो. मग त्याला कोण शिकवणार पोहायला?"

अनू-मनूचे डोळे मोठ्ठाले हो‌ऊन विस्फारतात

"ह्यॅट! बाबा नसतो म्हणजे काय. प्रत्येकाला बाबा असतो. संजूला आहे, अवनीला आहे, सोहमलापण आहे."- मनू

"काही जणांना नसतो."

श्रद्धाने अतिशय गंभीरपणे म्हटलेलं ठाम विधान ऐकून पोरींचे चेहरे झटक्यात उतरतात आणि रामूच्या अॅगनीची फटक्यात कल्पना ये‌ऊन चुकल्यासारखे केविलवाणे होतात; पोट धरून रामूवर हसत असलेल्या मनूचा चेहरा तर फारच उतरतो.  श्रद्धाला फार अपराध्यागत वाटतं पण काही गोष्टी गृहित धरल्या जा‌ऊ नयेत तेच बरं असतं.

"बरं. त्याला पोहायला येत नसतं. मग? पुढे काय होतं?"

त्यावर झटक्यात स्टोरीच्या बे‌अरींगमध्ये पुन्हा एकदा शिरून-
"हां.." तर मग तो बिचारा रडायलाच लागतो. त्याचे अश्रू टपटप करून नदीत पडायला लागतात. (अनू-मनू वाकून डोळ्यातून काहीतरी काढल्याचा अभिनय करतात पण ते अश्रू असावेत हे श्रद्धा समजून घेते) त्यानंतर चमत्कार होतो. खूप प्रकाश होतो आणि नदीतून एक देवता प्रकट होते. ती  म्हणते-

यावर अनू देवता आणि मनू लाकूडतोड्या असा रोल-प्ले सुरू होतो. अनू देवीच्या पोझमध्ये ताठच्या ताठ उभी आणि तिच्यासमोर वाकून बसलेल्या रडव्या चेह-याच्या चिमुकल्या मनूला पाहणे इतके गंमतीदार असते की आपलं हसू दडवायला श्रद्धाला तोंडावर बोटं घट्ट दाबून धरायला लागतात.

"काय झालं बाळा तुला रडायला?" -अनूदेवी

"हे देवी, माझी कु-हाड नदीत पडली म्हणून मी रडतो आहे." मनूचा हातवारे आणि आवेश पाहण्याजोगा आहे. "माझ्याकडे ती एकच कु-हाड होती. आता मी लाकडं कशी तोडणार, माझ्या मुलांना काय खायला घालणार या विचाराने मला रडू येतं आहे." मनू रामूचा रोल करताना इतकी तल्लीन झालीये की रामू उर्फ मनूच्या दुःखाने अनूदेवी ओठ बाहेर काढून गळा काढणार का काय असं वाटायला लागतं.

"मी या नदीची देवता आहे. या नदीवर माझं राज्य आहे. थांब रामू लाकूडतोड्या, मी तुझी कु-हाड शोधून देते"

यांवर अनूदेवी हवेत डुबकी मारल्याचा अभिनय करतात. रामू ऊर्फ मनू त्या अॅक्शनवर फिदा असतो की काय कोण जाणे, तो ही गरज नसताना हवेतल्या हवेत डुबकी मारून घेतो.

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"नाही देवी, ही सोन्याची कु-हाड आहे. ही माझी कु-हाड नाही"

पुन्हा डुबकी

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"नाही देवी, ही चांदीची कु-हाड आहे. ही माझी कु-हाड नाही"

पुन्हा एकदा एकदम फायनल ड़ुबकी

"ही आहे का तुझी कु-हाड?" -देवी

"हो देवी, हीच माझी लोखंडाची कु-हाड"

पुन्हा एकदा स्टोरीटेलिंगच्या सावधान पोझिशनमध्ये-
रामू लाकूडतोड्याला आपली कु-हाड मिळाल्याचा खूप आनंद होतो आणि तो देवीचे खूप आभार मानतो. त्यावर देवी म्हणते. "रामू लाकूडतोड्या, मी तुझ्या प्रामाणिकपणाने प्रसन्न (3ऱया प्रयत्नांनंतर प्रसन्न व्यवस्थित बोललं जातं) झाले आहे. त्यामुळे बक्षिस म्हणून मी या दोन्हीही कु-हाडी तुला देत आहे. जा, सुखी राहा."
रामू लाकूडतोड्याला त्या कु-हाडी विकून खूप पैसे मिळतात आणि तो खूप सुखी होतो.

गोष्ट संपते.

"मग आता यात काय शंका आहे? "

यावर अनू पुढाकार घे‌ऊन एकदाची विचारूनच टाकते-

"सोन्याची कु-हाड म्हणजे बाबाने आम्हाला चेन आणलेली तशी अख्खी सोनेरी कु-हाड का?"

"हो." त्यांची शंका नक्की कोणत्या बाबतीत आहे याबद्दल श्रद्धाला अजून अंदाज येत नाहीये.

"आणि चांदी म्हणजे गावी आजीचे देव आहेत तशी चकचकीत?"-मनू चिवचिवते

"हो. मग?"

"मग देवीने दिलेलं ते गिफ्ट किती महाग आहे. असं क़ोणी इतकं महाग गिफ्ट देतं काय? आणि रामूने ते घेतलं तरी कसं?"

हांsss ही ती शंका होती काय?

"का अनू? तू नसतं घेतलं?"

"नाहीच्च मुळी. मी नसतं घेतलं. मनूनेही नसतं घेतलं, हो की नाही मनू?" मनू यावर जोरजोरात मान हलवते.

"तू घेतलं असतं का इतकं महागडं गिफ्ट कोणाकडून?" या प्रश्नाच्या उत्तरावर अवघं जीवन अवलंबून असल्यासारखा अनू-मनूचा आवाज आता एवढुस्सा झालेला आहे.

श्रद्धा त्यांच्याकडे रोखून पाहते. त्यांनी बाबालाही हाच प्रश्न विचारून खात्री करून घेतलेली आहे हे तिला कळून चुकतं आणि आता त्या तिला विचारायला तिच्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात.

"हो, घेतलं असतं. त्यात काय एव्हढं?" असं म्हणायचा खूप मोह होतो श्रद्धाला पण त्यांच्या भित्र्या, उत्सुक डोळ्यांत ती काय बोलणार आहे याबद्दलची खात्रीही कुठेतरी जाणवते आणि ती मोडायचे धार्ष्ट्य ती करू शकत नाही.

ती खाली बसते आणि त्यांच्या‌इतकी हो‌ऊन म्हणते, "नाहीच्च मुळी, मी पण नसतं घेतलं इतकं महागडं गिफ्ट."

अनू-मनूने रोखून धरलेले श्वास फुस्सकन सुटतात आणि त्या दिलखूष हो‌ऊन हसतात. "बाबा पण हेच म्हणाला" असं म्हणत-म्हणत, उड्या मारत आपल्या खोलीकडे जाणा-या अनू-मनूला पाहत श्रद्धा उठते आणि आपल्या गोष्टीतल्या उगाचच हे हवं, असंच का करत व‌ई व‌ई करत रडणाऱया नायिकेला मारो गोली करत त्यांच्यामागोमाग त्यांच्या खोलीत जाते.


’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

--

घड्याळातल्या चिमणीने 10वेळा बाहेर ये‌ऊन चिवचिव केली तशी अनू-मनूने बाथरूममध्ये धाव घेतली. चमकदार लाल-निळया टूथब्रशवर चमचमती टूथपेस्ट घे‌ऊन श्रद्धाने शिकवल्याप्रमाणे अप अँड डा‌ऊन, रा‌ऊंड अँड रा‌ऊंड करत दात स्वच्छ घासले. श्रद्धा यायला अवकाश होता तोवर थोडीशी पेस्ट खा‌ऊन घेतली आणि त्यावर चुळा भरून तोंडातून पाण्याचे बुडबुडे काढण्याचे चमत्कार केले. एरव्ही त्यांनी पाण्यात अजून खेळ केला असता पण बरोबर साडेदहाला श्रद्धा बेडरूममध्ये येणार होती आणि आजपासून ती त्यांना प्रत्येक रात्री एक गोष्ट सांगणार होती. त्यामुळे अनू-मनूने पाण्यातला चाळा थांबवला, तोंड कोरडं केलं, आपले सारखे सारखे इवलेसे नायटी घातले. दोघी पलंगावर उड्या मारून आपल्या जागी बसल्या. बाबा आज तरी झोपेत कॉटवरून पडू देत नको अशी प्रार्थना दोघींनीही गॉड ऑलमायटीकडे केली आणि आपल्या दुलया अंगावर घे‌ऊन त्या श्रद्धा येण्याची वाट पाहू लागल्या.

बरोबर साडेदहाला श्रद्धा आत आली तशी अनू-मनू टक्क जाग्या आहेत आणि आपण त्यांना गोष्ट सांगणार आहोत याची श्रद्धाला आठवण झाली. श्रद्धा नुकताच एक लेख आटपून आली होती, त्या व्यापात तिला पोरींना कोणती गोष्ट सांगावी हे ठरवायचंही सुचलं नव्हतं. पण आज सुटका करून घेता येणार नव्हती.

"तर अनू-मनूला आज गोष्ट सांगायची आहे नैका?"

उत्तरादाखल अनू-मनूने दुलया गळ्यापर्यंत ओढून मजेत माना हलवल्या.

"तर मग त्यांना कोणती गोष्ट ऐकायची आहे? ससा-कासवाची की राजकुमारीची?"

"ह्यॅट!" इति मनू. उठून बसत- "बाबाने आम्हाला त्या सगळ्या (ळ्या वर हात खांद्याच्याही पलीकडे ताणले जातात)गोष्टी सांगीतल्या आहेत."

"तू आम्हाला ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट सांग." मनूपेक्षा अवघं एक मिनीट मोठी असलेल्या अनूची ’इन्टेलिजण्ट’ बोलताना भंबेरी उडते खरी पण ते ती टेचात निभावते. "बाबा म्हणाला की श्रद्धा तुम्हाला ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी सांगेल."

दोघीही आता मांडी घालून, मुठी हनुवटीवर ठेवून ऐकण्याच्या तयारीत

"असं म्हणाला का बाबा?" (मनात- बाबाच्या नानाची..) "बरं. मग ऐका तर.."

"नंदीपूर नावाचं एक गाव असतं. नंदीपूर गावातलं शंकराचं मंदीर आणि त्यापुढचा मोठ्ठा नंदी खूप प्रसिद्ध असतो. (मनूचे समोरचे दोन दात पडलेले आहेत. त्या खिंडारातून जीभ लावत ती हळूच ’प्रसिद्ध’ म्हणून पाहते हे श्रद्धा डोळ्याच्या कडेतून पाहते.) त्या शंकराच्या मंदीराच्या आवारात आपल्या अनू-मनूसारखी दोन मोठी आवळी-जावळी आंब्याची झाडं असतात."

"पण मी मनूपेक्षा मोठी हाये." अनू आवर्जून सांगते

"हो, माहितेय. ती आंब्याची झाडं असतात कीनै म्हणून त्यापैकी एकाचं नाव असतं रांबा आणि दुस-याचं नाव असतं सांबा"

दोन्हीही पोरी तोंडावर हात ठेवून खुसखुसतात.

"तर अनू-मनूपैकी कोण होणार रांबा-सांबा?"

"मी रांबा होणार." एका क्षणाचाही विलंब न लावता अनू अंथरूणावर उठून उभी राहते. हात डोक्यावर घे‌ऊन झाड असण्याची भूमिका करत उभी राहते. चंद्र-तारे वागवणारा नायटी घालून उभा असलेला तो फारच गोड रांबा आहे असं श्रद्धाला फार वाटतं.

"मग मी सांबा." मनूला फारसा काही चॉ‌ईस उरलेला नाहीये त्यामुळे ती हिरमुसली झालेली आहे. तिला रांबा व्हायचं होतं हे स्पष्ट कळतंय. पण ती यावर तोडगा काढते. "..आणि सांबाला गोष्ट ऐकताना श्रद्धाच्या मांडीवर बसायला मिळणार, होकीनै?"

यावर रांबा गडबडतो. पण आता उशीर झालेला आहे. सांबा उडी टाकून श्रद्धाच्या मांड़ीवर स्थानापन्न झालेला आहे.

"तर.." गोष्ट एकदाची सुरू होते.

"रांबा सांबा जुळे भा‌ऊ असले तरी त्यांच्यात खूप मोठा फरक असतो. रांबा नेहमी खरे बोलत असतो आणि सांबा नेहमीच खोटं बोलत असतो."

"य्ये.. मी नेहमीच खरे बोलते.." रांबा हात उंचावलेल्या पोझिशनमध्येच दीड पायावर नाचत गोल-गोल फिरायला लागतो. यावर प्रतिक्रिया म्हणून सांबा मान वर करून श्रद्धाकडे पाहते आणि श्रद्धा सांबाकडे. दोघीही डोळे फिरवून पुन्हा रांबाकडे पाहतात.

रांबा-नृत्य थांबतं तोपर्यंत गोष्ट कशी प्रोसीड करावी याबद्दल श्रद्धाचा थोडा विचार करून झालेला आहे.

"रांबा-सांबाचे स्वभाव पूर्ण गावाला ठा‌ऊक असतात. शंकराच्या मंदीरात लहान मुलं खेळायला जात असत आणि लपाछुपीचा खेळ खेळत असत. ज्याच्यावर राज्य असायचं तो रांबालाच पहिले विचारत असे. "अरे ए रांबा, गोपू कुठे लपला आहे रे?" रांबा सत्यवचनी. तो सरळ सांगून टाकायचा. "गोपू नं? तो बघ माझ्या उजव्या बाजूच्या बेचक्यात लपला आहे." मग गोपूला राज्य घ्यायला लागायचं. तो रडवेल्या चेहऱयाने लपण्याच्या जागेतून बाहेर यायचा. त्याचा रडका चेहरा पाहून रांबाला खूप वा‌ईट वाटायचं, मग तो त्याला एक गोल-गरगरीत, रसाळ आंबा द्यायचा."

"आंबा?" दोन्ही पोरींचे डोळे पैशा‌एव्हढे गोल गरगरीत झाले आहेत. आंबेखा‌ऊ बापावर गेलेल्या पोरी.

"तर सांबाची गतच वेगळी. रांबा नेहमी मुलांना आंबे कुठे आहेत, कुठल्या बेचक्यात आंबे जास्त लागले आहेत हे सांगे. पण सांबा? छे! आंबे असायचे एकीकडेच पण सांबाच्या खोटं बोलण्यामुळे मुलं चढायची भलतीकडेच. त्याच्या फांद्यावर पतंग अडकायचा तेव्हा तो रांबावर अडकला आहे असं खुश्शाल सांगायचा. मग मुलं रांबावर चढून शोध-शोध शोधायची आणि पतंग मिळत नाही म्हणून रडकुंडीला यायची. त्यावर सांबा खो-खो हसायचा."

"दुष्ट सांबा-" मनू ऊर्फ रांबा फिस्कारते. सांबाची मान खाली.

"मग?"-अनू

"मग रांबाला विचारल्यावर तोच खरंखरं काय ते सांगायचा आणि मुलं सांबावर चढून पतंग शोधून काढायची. पण गावातल्या सर्वांना ते आपले वाटायचे त्यामुळे त्यांचे स्वभावही गावकऱयांनी आपलेसे करून घेतले होते. अनू नाकात बोटं घालते हे बाबा कसं चालवून घेतो तसंच."

अनूचं नाकातलं बोट मुकाट निघतं. अनू निरूत्तर झालेली पाहून सांबा खूष.

"एके रात्री काय होतं की दोन माणसं घोड्यावर दौडत गावात येतात आणि त्यांच्या दृष्टीस पडतो सांबा. ती माणसे घोड्याच्या जीनला लावलेल्या थैल्या सोडवतात आणि त्या सांबाच्या फांद्यांमध्ये लपवून ठेवतात."

"पांडवांनी शमीवर त्यांची टूल्स ठेवलेली तशी.." अनूची ’इन्टेलिजण्ट’ भर

"हो, तशीच. थैल्या लपवून झाल्यावर ते सांबावर केवळ त्यांनाच कळेल अशी खूण करून ठेवतात आणि आले तसे घोड्यावर बसून दौडत पुढे निघून जातात."

"मग काय होतं?" (याशिवाय जगातली कोणती गोष्ट पुढे गेली आहे?)

"त्यानंतर अजून काही लोकं घोड्यावर बसून त्याच जागी येतात. त्यांनी अंधारात दिसू नये म्हणून काळे कपडे घातलेले असतात, तोंडावरूनही काळे फडके ओढून घेतलेले असते. आधी तिथून गेलेल्या लोकांनी थैल्यांमध्ये लपवलेला खजिना रांबा-सांबापैकी एकावर लपून ठेवलेला आहे असा त्यांचा अंदाज असतो."

"ते चोर असतात का?"- अनू

"कशावरून गं?"

"नाही, बाबाच्या गोष्टीतले चोर पण नेहमी काळे कपडे घालतात."

"हं. (जे जनरलायझेशन होतंय करत श्रद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही) मग ते पहिले रांबाच्या समोर येतात. थैल्या रांबावर लपवून ठेवल्या आहेत का याची विचारणा करतात. पण रांबावर थैल्या नसतातच मुळी.. त्यामुळे रांबा खरंखरं काय ते सांगतो. तो म्हणतो," थैल्या माझ्याकडे नाहीत.""

"पण ते काही त्या गावात राहणारे नसतात. त्यांना रांबा-सांबाची खासियत माहित नसते. त्यामुळे रांबा खरं तेच सांगतोय यावर त्या काळ्या डगलेवाल्यांचा विश्वास बसत नाही. मग ते काय करतात, तर कु-हाडी, कोयते आणतात आणि रांबाला डोक्यापासून पायापर्यंत सोलून काढतात. एकही फांदी तोडायची ठेवत नाही."

मनू मटकन खाली बसते. सांबा श्रद्धाच्या मांडीवरून उठून रांबाला धीर द्यायला तिच्या बाजूला जा‌ऊन बसतो. दोघींनाही रांबाबद्दल हळहळ वाटते आहे.

"पण त्यांना काही थैल्या मिळत नाहीत. मग ते सांबासमोर येतात. बाजूच्या विव्हळत असलेल्या रांबाची अवस्था सांबा अस्वस्थ हो‌ऊन पाहात असतो."

""आता तू बोल. थैल्या तुझ्यावरच आहेत ना?" ते सांबाला विचारतात"

"थैल्या आहेत सांबावरच पण, सांबा सवयीने खोटंच बोलतो, "नाही, थैल्या माझ्याकडे नाहीत.""

"डगलेवाले गोंधळतात.पण रांबाची गत पाहता सांबा खोटे बोलायला धजावणार नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे ते लोक थैल्या आपल्याबरोबर घे‌ऊन गेले असावेत असे त्यांना वाटायला लागते. त्यामुळे सांबावर वेळ खर्च करण्या‌ऐवजी त्यांचा पाठलाग करावा आणि फैल्या हस्तगत कराव्यात असे त्यांचे ठरते. आणि ते सांबावर थैल्या शोधायचे सोडून घोड्यावर बसून पुढे निघून जातात."

"रांबा खरं बोलूनही जखमी होतो आणि सांबा खोटं बोलूनही वाचतो. दी एण्ड"

श्रद्धा उठते, दोघींची अंथरूण सारखी करून गुड ना‌इट करून जायला लागते.
अनू-मनू अजून गोंधळलेल्या आहेत.

"झाली गोष्ट?"

"हो, झाली की."

"अगं, पण गोष्टीचं मॉरल काय आहे? बाबा म्हणतो की ’ट्रूथ इझ द ग्रेटेस्ट व्हर्च्यू’. पण रांबाचं बघ नं कसं झालं."

"आणि सांबा.. तो तर वारंवार खोटं बोलूनही वाचला." सांबा झालेल्या मनूच्या शब्दातही अविश्वास  आहे.

"मग खरं बोलायचं की खोटं?" अनूचा प्रश्न

"तुम्ही विचार करा आणि उद्या मला सांगा. ओके? आता झोपा."

श्रद्धा दिवा घालवते आणि बाहेर जायला निघते

"मनू, मला आता कळलं, ज्या गोष्टीचं मॉरल सांगता येत नाही तीच ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट असते", अनू मनूच्या कानात कुजबुजते.

श्रद्धा हसते. खुद्द तिलाही त्या गोष्टीचं नेमकं मॉरल कुठे ठा‌ऊक असतं? परिस्थिती बदलली असती तर गोष्टीचा प्लॉट बदलला असता हे तिला माहित असतं. चोरांनी पहिले सांबाला कफ्रण्ट केलं असतं तर रांबाची जी गत झाली आहे तीच सांबाची झाली असती का? रांबा वाचला असता का? सगळे जर-तरचे प्रश्न. हे मुलींना कसं आणि कशाप्रकारे सांगणार. दैव, नियती वगैरे झकडम गोष्टी या दोन फूट उंचीच्या चिमण्यांना काय सांगणार.

नेहमी खोटं बोलणं वा‌ईटच पण परिस्थिती पाहून, जीव वाचवण्याकरिता खोटं बोललं तर त्यात काही वावगं नाही हा परिस्थितीने शिकवलेला धडा मुलींना नीतीमत्तेचा पाठ म्हणून कसा शिकवायचा आणि शिकवलाच तर त्यालाच ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट म्हणायची का हे त्यांच्या बाबालाच विचारू म्हणून ती अनू-मनूच्या खोलीतून बाहेर पडते आणि आपल्यामागे दरवाजा हळूच लावून घेते.

दार बंद होतं तशी अनू-मनूने मिटून घेतलेले डोळे उघडतात.

त्या रात्री अनू-मनू, अनू-मनूचा बाबा आणि श्रद्धा सगळेच्या सगळे श्रद्धाच्या ’इन्टेलिजण्ट’ गोष्टीचा विचार करत टक्क जागे असतात.