न पोहोचणा.. . .!

'प्रिय’,

मी माझं काहीतरी कुठेतरी ठेवलं होतं आणि आता ते हरवलंय. पण मला ते काहीतरीही आठवत नाही आणि कुठे हे तर त्याहून आठवत नाही.
पूर्वी असं कधीच व्हायचं नाही.
पूर्वी कधीच होत नसलेल्या गोष्टी व्हायला लागल्या की काय होतंय असं समजायचं?

--

मला हल्लीच एक मोठा साक्षात्कार झालाय.
म्हणजे मला कळलंय की आपल्या आयुष्याची नासाडी करून घेणं तितकंसं कठीण नसतं. फक्त ज्या व्यक्तीमुळे किंवा गोष्टीमुळे आपली नासाडी करून घ्यायची आहे त्याच्या/तिच्याजवळ जाणं किंवा त्याने/तिने आपल्याजवळ येणं यातलं पहिले काय घडतं याची वाट पाहात राहायची फक्त. बाकी आपण आपली नासधूस करून घेण्याकरिता नेहमीच तयार आणि तत्पर असतो. कोणत्याही क्षणी लप्पकन खाली पडायच्या बेतात असलेल्या पूर्ण पिकलेल्या फळासारखे.

--

मला इथे नाही ते बरंच काही हवंय पण त्यासाठी कुठे जावं ते कळत नाहीये.
अगदीच छाती फोडून बाहेर ये‌ईल इतका आनंद नकोय काही मला, पण ही सततची अस्वस्थता, ठुसठुस कमी झाली तर हवीये.
कधीकधी फोन खणखणतो नं तेव्हा ही ठुसठुस काही क्षण कमी करेल असं कोणीतरी असावं असं फार वाटतं.
तुला फोन न करता येणं किती गैरसोयीचं आहे हे तुला कळतंय का?

--

मला काय खुपतंय हे मला अधिक नेमकेपणाने सांगता आलं असतं तर खूप छान झालं असतं. मला पोहून सर्दी झाली की डॉक्टर मला ऑक्ट्रीव्हिनचा प्रे देतात आणि सर्दी संध्याकाळपर्यंत बरी देखील हो‌ऊन जाते. मला काय होतंय हे असं नेमकेपणाने काही सांगता आलं असतं तर मी त्यावर नेमका काहीतरी उतारा शोधला असता. पण काय होतंय हेच नेमकं ठा‌ऊक नाही त्यामुळे अंदाजपंचे दाहोदर्से करत निरनिराळे उपाय करून पाहिले जातात जे कधीकधी परस्परांना मारक देखील असतात. तुला माहितीये ना, हिथ लीजर असाच मेला. २२ जानेवारीलाच पण २००८च्या.  डीप्रेशन, डोकेदुखी, निद्रानाश, सर्दीसाठी वेगवेगळ्या गोळ्या घेतल्या आणि त्याचा एकत्रित परीणाम काहीतरी विपरीतच झाला. एकदम लीथल डोस. ठारच झाला एकदम. डोक्यातल्या परस्परविरोधी  विचारांची डोक्यातल्या डोक्यात जुगलबंदी हो‌ऊनच मी मरणार बहुधा.

--

आपली प्रेमं, मी करते ती, माझ्यावर निरातिशय प्रेम करणाऱया लोकांची प्रेमं ही अशीच का असतात? एकमेकांना नीटसा स्पर्शही न करता, एकमेकांचा अंदाज घेत, एकमेकांचे छोटे छोटे फोटो पाहात प्रेम जपणारी, प्रत्येक संदर्भात दुसऱयाला शोधणारी - पण खुलून नीटसं कधीच दुसऱयाला काहीच न सांगणारी?
किती त्रास होतो या गोष्टीचा .. पण त्याचवेळी बरंही वाटतं.
हे असलं प्रेम तापासारखं चढत जातं, असा ताप ज्यातून तुम्ही कधीच खऱया अर्थाने सावरत नाही.
पण आय टेल यू, मला किमान एकदातरी वखवखणारं, हावरं प्रेम करून पाहायचं आहे.

--

एकटं असण्यापेक्षा खूप भयंकर गोष्टी असतात. आपल्याला माहित नसतं त्या कोणत्या ते. आणि त्या कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि उशीर झालेला असणं यापेक्षा भयंकर गोष्ट दुसरी कोणती असू शकते?
आपण रस्त्यावरून एकटे चाललेलो असतो आणि आपल्या बाजूने लोकं जोडीने, घोळक्याने चाललेले असतात. आणि आपण आपल्याबरोबर कोणी असतं तर कसं याचा विचार करून कायम रडायच्या बेतात असतो. तेव्हा आपण इतके भावूक इत्यादी का आहोत याची खरंच लाज वाटते.
कधीकधी रात्री दचकून जाग येते तेव्हा लक्षात येतं की आपण घामाने पूर्ण निथळतो आहोत आ़णि समोर पाहावं तर आपण विसरलो, विसरलो असं ज्यांच्याबद्दल छातीठोकपणे सांगत असतो तीच माणसं आपल्यासमोर दत्त म्हणून उभी असतात. मग मला झोप लागत नाही. घड्याळाच्या संथ फिरणाऱया काट्यांमधून माझ्या जगातलं गच्च भरलेलं एकटेपण अधिक गडद होत जातं.
पण मग दुसऱया सकाळी सकाळ होते आणि मी अजूनही जिवंत असते.
मी रोज सकाळी उठते आणि मला वाटतं की नाही, आजचा दिवस काही धकत नाही आपल्याच्याने. पण त्याचंही नंतर हसू येतं, मला त्या‌आधीही असं किती वेळा वाटलं होतं हे आठवून.

--

सॉलिट्यूड आणि एकटेपणा यांत फरक आहे हे कळायला वयाची अठ्ठावीस वर्षे का जावी लागतात? एखादी पॉलिसी म्यॅच्यु‌अर झाल्यावर एकदाच काय ते घबाड हाती लागावं तशी ही उपरती मला आता‌आताच झाली. नाही म्हणायला मी वॉल्डेन वाचलंय; त्यामुळे, सॉलिट्यूड बाय चॉ‌ईस असतो हे मला ठा‌ऊक आहे, नाही असं नाही. सॉलिट्यूड बाय चॉ‌ईस असतो आणि एकटेपणा लादला गेलेला असतो. आपल्या कर्माने, इतरांच्या कर्माने. आय लव्ह सॉलिट्यूड आणि अधूनमधून एकटेपणाही बरा वाटतो पण तो ठिक आहे असं मला आजतागायत कधीही वाटलेलं नाही अजूनही वाटत नाही. मला माणसं आवडतात, मला माणसं हवी आहेत. मला तू हवा आहेस, इतरही लोक हवे आहेत.

--

संध्याकाळचे सहा वाजलेत. नेहमीच संध्याकाळचे सहा वाजलेले असतात.
मी हल्ली दिवसा लिहीत नाही. ते मॉलमध्ये कपडे उतरवून नागव्याने फिरल्यासारखं वाटतं. जो तो, प्रत्येकजण  तुमच्याकडे पाहात असतो, फिदीफिदी हसत असतो. तसंच वाटतं दिवसा लिहीताना.

--

माझ्या प्रत्येक ऍगनीला लोकं "जा‌ऊ दे गं" म्हणून मोडीत काढतात.
प्रत्येक गोष्ट या ना त्या प्रकारे सोडून देणे, विसरून जाणे, जा‌ऊ देणे इतकंच का असतं सर्व शेवटी? प्रत्येक गोष्ट जा‌ऊ द्यायची म्हणून हातात धरायची असते का? कागदावर लिहा किंवा गच्चीवरून उडी मारा एव्हढंच का असतं हे?
मी हे तुला का विचारतेय हे तुझ्या लक्षात येतंय नं? माझ्याकडे तुझ्याइतका अनुभवसंपन्न मनुष्य नाही.

--

पण मग रात्र होते. पांघरूण डोक्यावरून ओढून घेतलं की मला काहीच सतावत नाही. ना लोकं, ना ते, ना तू, ना मी- काहीच नाही.
म्हणून मी हल्ली खूप झोपते.
माझ्या डोळ्याखालची डार्क सर्कल्स कमी व्हायला लागली आहेत.
मला हल्लीच एक मोठा प्रश्न पडला. सर्व राक्षसांना डार्क सर्कल्स का असतात?
पण मला हल्लीच्याही आधीपासून बरेच प्रश्न पडलेले आहेत.
मेल्यावर प्रश्न पडायचे बंद होतात का? न कळे.

--
श्र.