एप्रिलमधील सुंदर सकाळी 100 टक्के पर्फेक्ट मुलीला पाहिल्यावर.

एप्रिल महिन्यातील एका सुंदर सकाळी टोकियोतील फॅशनेबल हाराजुकु भागातल्या रस्त्यावरुन जात असताना माझ्या बाजूने 100 टक्के पर्फेक्ट मुलगी गेली.

खरं सांगायच झालं तर ती दिसायला एव्हढी चांगली नव्हती, चार जणीमध्ये उठून दिसेल इतकीही बरी नव्हती.तिचे कपडे खास होते अशातलाही भाग नव्हता.  तिचे केस झोपेतून उठल्यावर दिसतात तसे विस्कटल्यासारखे दिसत होते. तरुणही नव्हती- बहुतेक तिशीतली असावी, त्यामुळे तिला मुलगीही म्हणता येणार नाही. पण तरीही, मला 50 यार्डांच्या अंतरावरुन कळले की ती माझ्यासाठी 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहे. ज्या क्षणी मी तिला पाहिलं त्या क्षणी माझ्या छातीत बाकबुक व्हायला लागलं, माझ्या तोंडाला कोरड प़डली.

तुम्हालाही एखादी मुलगी आवडत असेल-सडपातळ पायांची, मोठ्या डोळ्यांची किंवा नाजूक बोटांची. प्रत्येक घास चवीचवीने खाणा-या मुलीकडे तुम्ही तुमच्या नकळत ओढले गेला पाहात असंही कधीकधी होत असेल. तशाच माझ्या काही आवडी-निवडी आहेत. कित्येकदा माझ्या लक्षात येतं की मी रेस्टॉरंटमध्ये माझ्या समोर बसलेल्या मुलीकडे टक लावून पाहतोय कारण, मला तिचं नाक भयंकर आवडलंय.

पण या 100 टक्के पर्फेक्ट मुलीमध्ये मला मागे आवडलेल्या मुलींमधील एखादी खुबी होती असं नव्हतं. मला मागे भलेही एखाद्या मुलीचे नाक आवडलं असेल पण, या मुलीचे नाक मला आठवत नाही, तिला ते होते तरी का- हे ही नाही; पण, ती फ़ार काही सुंदर नव्हती एव्हढं मात्र लख्ख आठवतंय. विचित्रच आहे!

"काल माझ्या बाजूने 100 टक्के पर्फेक्ट मुलगी गेली" मी कोणालातरी सांगतो

"असं? " तो म्हणतो, " सुंदर होती? "

"नाही, एव्हढी नाही."

"मग तुला जशा मुली आवडतात तशातली होती का?"

"मला माहित नाही. मला तिच्याबद्दल काहीही आठवत नाहीये- ना तिचे डोळे, ना तिची छाती"

"विचित्रच आहे"

खरंय! विचित्रच आहे!

"तर मग.." तो इतक्यातच कंटाळलाय "तू काय केलस? बोललास का तिच्याशी? ती कुठे गेली हे पाहिलंस का? "

"यापैकी काही केलं नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या बाजूने गेलो. "

ती माझ्या विरुद्ध दिशेने येत होती आणि मी तिच्या विरुद्ध दिशेला चाललो होतो आणि ती एप्रिल महिन्यातील खरोखरंच सुरेख सकाळ होती.

मला तिच्याशी बोलता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. अर्धा तास पुष्कळ झाला असताः तिच्याबद्दल विचारण्यासाठी, माझ्याबद्दल सांगण्यासाठी. आणि मी खरं सांगू का मला काय करायला आवडलं असतं? - मला तिला, 1981 सालातल्या एप्रिल महिन्यातल्या एका सुंदर सकाळी हाराजुकुच्या आडबाजूच्या रस्त्यावर एकमेकांच्या बाजूने जाण्यातल्या विधीलिखितातील गुंतागुंत  समजा‌वून सांगायला आवडली असती. असं झालं असतं तर काय या भावनेतच काहीतरी उबदार, लोभस नक्की होतं - जगात शांतता नांदत असताना बनवलेल्या घड्याळ्याच्या टिकटिकीसारखं!

बोलून झाल्यावर आम्ही कुठेतरी जेवण घेतलं असतं, कदाचित वूडी ऍलनचा एखादा सिनेमा पाहिला असता, कुठल्यातरी हॉटेलच्या बारमध्ये कॉकटेल्स घेतली असती आणि माझे नशीब जोरावर असतं तर आम्ही रात्रही एकत्र घालवली असती.

माझ्या डोक्यात अनेक शक्यता तयार होतात.

आमच्यामधले अंतर कमी कमी होत चाललंय, 15 यार्डस..

मी काय बोलू? तिला कसं थांबवू?

"शुभ प्रभात मॅडम.  मला तुमच्या वेळातला अर्धा तास गप्पा मारण्याकरिता दे‌ऊ शकाल का? "

छे. हे इन्श्युरन्सवाल्यांसारखं वाटतंय.

"एक्स्क्यूझ मी,  इथे आसपास कुठे रात्रभर सुरु असणारे क्लीनर्स आहेत का? "

नाही नाही, हे तर जास्तच बाष्कळ वाटतंय. पहिली गोष्ट, माझ्या हातात धुवायचे कपडे देखील नाहीत आणि मला नाही वाटत कोणी अशा संवादाला गंभीरपणे घे‌ईल.

कदाचित खरं खरं काय ते सांगून टाकलेलंच जास्त चांगलं. "हेलो. तू माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहेस"

नाही. तिचा विश्वास नाही बसणार. आणि बसलाच, तरी तिला माझ्याशी बोलावंसं वाटेल हे कशावरुन? ती म्हणू शकते "सॉरी, मी तुझ्यासाठी 00 टक्के पर्फेक्ट मुलगी असले तरी तू माझ्यासाठी 100 टक्के पर्फेक्ट मुलगा नाहीस." का नाही? हो‌ऊ शकतं. पण, असं झालंच तर ते मला सहन होणार नाही. मला नाही वाटत मी त्या धक्क्यातून कधी सावरु शकेन. मी बत्तीस वर्षाचा आहे, मोठं होत जाताना काहीकाही गोष्टी उगाचच हळव्या हो‌ऊन जातात ना त्या अशा.

एका फुलवाल्याच्या दुकानासमोरुन ती माझ्या बाजूने निघून जाते. उबदार हवेचा एक छोटासा झोत मला स्पर्शून जातो. मला तिच्याशी बोलायचं आहे पण, मनाची तयारी होत नाहीये. तिने पांढरा स्वेटर घातलाय आणि तिच्या उजव्या हातात पांढरंशुभ्र पाकीट आहे. त्यावर फक्त स्टँप लागायचा बाकी आहे. हं, तिने कोणालातरी पत्र लिहीलंय. तिचे जागरणाने झोपाळलेले डोळेच सांगतायेत की ती पूर्ण रात्रभर पत्रच लिहीत असली पाहिजे. त्या पाकीटात पोटात तिची अनेक रहस्ये दडलेली असतील.

मी थोडा पुढे जा‌ऊन वळून पाहतोः ती गर्दीत नाहिशी झाली आहे.

अर्थातच, आता मला पक्कं ठा‌ऊक आहे की मी तिला काय सांगायला हव होतं. कदाचित ते खूप मोठं भाषण वाटू शकलं असतं. ते इतक मोठं होतं की ते मी तिला व्यवस्थित सांगू शकलो असतो की नाही याची मला शंकाच वाटते. माझ्या कल्पना या‌आधी पण मुळीच प्रॅक्टिकल नव्हत्या , मग आता का असाव्यात?

तर. ते भाषण  "कोणे एके काळी.. " ने सुरु झालं असतं आणि "वा‌ईट झालं नाही का? " ने संपलं असतं.

कोणे एके काळी एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा अठरा वर्षाचा होता आणि मुलगी सोळा वर्षाची. तो काही फार देखणा नव्हता आणि तीही फार सुंदर नव्हती. तो एक सर्वसामान्य एकटा मुलगा होता आणि ती एक सर्वसामान्य एकटी मुलगी होती. या जगाता त्यांच्याकरता 100 टक्के मुलगा आणि 100 टक्के मुलगी अस्तित्वात आहेत यांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हो, त्यांचा चमत्कारांवर विश्वास होता आणि  एके दिवशी खरंच तो चमत्कार घडला.

एके दिवशी एका रस्त्याच्या कडेला दोघे एकमेकांच्या समोर आले.

"काय कमाल आहे!." तो म्हणाला, "मी पूर्ण आयुष्य तुझा शोध घेतो आहे. तुझा विश्वास नाही बसणार कदाचित, पण तू माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहेस."

"आणि तू" ती म्हणाली, "माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगा आहेस. मी कल्पनेत तुझे चित्र रंगवलं होतं अगदी तसाच. मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय."

ते एका बागेतल्या बाकड्यावर बसले आणि एकमेकांचे हात हातात घे‌ऊन त्यांनी तासनतास गप्पा मारल्या, एकमेकांना स्वतःबद्दल सांगीतलं. ते काही आता एकटे राहिले नव्हते, त्यांना त्यांचा 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार मिळाला होता किंवा त्याच्या 100 टक्के पर्फेक्ट जोडीदाराने त्यांना शोधून काढलं होतं. कोणाला 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार मिळणं आणि कोणाला त्यांच्या 100 टक्के पर्फेक्ट जोडीदाराने शोधून काढणं किती सुंदर गोष्ट आहे, नाही का? असं घडणं म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. निव्वळ चमत्कार!

ते एकत्र बसले, बोलत होते, पण त्यांच्या मनात कुठंतरी एका सूक्ष्म शंकेने जन्म घेतलाः कोणाचंही स्वप्न इतक्या सहजपणे पूर्ण होणं बरोबर आहे का?

त्यामुळे, जेव्हा त्यांच्या अव्याहत चालू असलेल्या संभाषणात ‘आता काय बोलावं बरं?’ची घुटमळ आली तेव्हा मुलगा मुलीला म्हणाला, "आपण एकमेकांची परीक्षा घे‌ऊयात का? फक्त एकदाच! जर आपण खरोखरीच एकमेकांचे पर्फेक्ट जोडीदार आहोत तर कुठेतरी, केव्हातरी, आपली पुन्हा भेट हो‌ईलच-नक्कीच. आणि जर तसं घडलं तर आपली खात्री पटेल की आपण एकमेकांचे 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार आहोत. मग आपण तिथेच, त्याक्षणी लग्न करुन टाकू. काय म्हणतेस? "

"बरोबर आहे तुझं. " ती म्हणाली, "आपण असंच केलं पाहिजे."

आणि ते एकमेकांपासून दूर झाले. ती त्याच्या विरुद्ध दिशेने निघून  गेली आणि तो तिच्या विरुद्ध दिशेने निघून गेला.

त्यांनी एकमेकांची जी परीक्षा घ्यायची ठरवली होती तिची खरंतर काही‌एक गरज नव्हती. त्यांनी तसं करायलाच नको हवं होतं, कारण, ते खरोखरीच एकमेकांचे 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार होते यात काही वादच नव्हता. ते त्या एका वेळीच एकमेकांना भेटू शकले हाच खरंतर एक मोठा चमत्कार होता. पण ते तरुण, वेडे जीव होते. त्यामुळे, नियती त्यांचा रंगात आलेला डाव निर्दयीपणे उधळून लावणार आहे हे त्यांना कळणं शक्यंच नव्हतं.
त्यानंतर, एका हिवाळ्यात आलेल्या एन्फ्लू‌एन्झाच्या साथीत तो मुलगा आणि मुलगी दोघेही आजारी पडले. जीवन-मरणाच्या पारड्यात हेलकावे खात असताना त्यांची स्मृती गेली. ते आजारातून उठले तेव्हा त्यांचा मेंदू डी. एच. लॉरेन्सच्या पिगिबँकसारखा रिकामा झाला होता.

पण ती दोघंही अतिशय हुशार आणि चिवट होती. त्यांच्या अविरत प्रयत्नांतून आवश्यक ते सर्व ज्ञान आणि रितीरिवाज आत्मसात केले, समाजाचा एक सुदृढ घटक म्हणून मान्यता मिळवली. एका सबवे ला‌ईनकडून दुस-या सबवे ला‌ईनकडे कसे जावे, स्पेशल डिलीव्हरी पत्र कसे पाठवावे हे त्यांना जमू लागले. ते हुशार नागरीक म्हणवले जाऊ लागले. आणि त्या दोघांनीही प्रेम पुन्हा अनुभवलं. कधीकधी 75 टक्के तर कधी 85 टक्केसुद्धा.

बराच काळ उलटला. लवकरच मुलगा 32 वर्षाचा झाला आणि मुलगी 30 वर्षांची.

एप्रिल महिन्यातील एका सुंदर सकाळी सकाळची कॉफी घेण्याकरता मुलगा पश्चिमेकडून पूर्वेकडे चालला होता आणि एक स्पेशल डिलीव्हरी पत्र पाठवण्याकरता मुलगी पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली होती. ती दोघंही टोकीयोतील हाराजुकू भागातील एका चिंचोळ्या रस्त्यावरुन चालले होते. रस्त्याच्या बरोबर मध्यभागावर ते एकमेकांच्या बाजूने निघून गेले. गतस्मृतींची एक बारीकशी तिरीप त्यांच्या डोळ्यात लकाकली. दोघांनाही आपल्या छातीत हे काय होतंय असं वाटलं. आणि त्या दोघांनाही कळून चुकलं

ती माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहे!

तो माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगा आहे!

पण त्या गतस्मृती खूपच अंधुक होत्या आणि त्यातून 14 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे एकही शब्द न बोलता ते एकमेकांच्या बाजूने निघून गेले आणि गर्दीत हरवून गेले. कायमचे.

वा‌ईट झालं नं? तुला काय वाटतं?

हो. हेच . अगदई हेच मी त्या मुलीला सांगायला हवं होतं.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड