निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट

एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?

कोणाला सुखांत आवडतो तर कोणाला शोकांतिका आवडतात. काहींना नाट्यमयता ठासून भरलेली गोष्ट आवडते. पण माझ्याबद्दलच सांगायचं तर मला ’य’ बिंदूपासून सुरू हो‌ऊन ’व’ बिंदूपाशी संपणारी गोष्ट आवडते. त्या गोष्टीने ’य’ पाशी सुरू होण्यात आणि ’व’पाशी सपण्यातच तिचं सौंदर्य असतं. ’य’ पाशी सुरू होताना ’प’, ’फ़’ हे टप्पे सांगता येतात किंवा तिला ’श’ पर्यंत ताणता येतं, किंबहुना तसंच करायला हवं होतं असं सर्वांचं मत असतं; पण, तिने ’व’ पाशीच संपून ती गोष्ट माझ्या पद्धतीने संपवण्याचं, अनेक शक्यता पडताळून पाहायचं स्वातंत्र्य मला दिलेलं असतं. अशी गोष्ट सुरूवातीच्या आधीच्या कित्येक शेवटांच्या शक्यता सांगते आणि शेवटानंतरच्या अनेक सुरूवातींना जन्म देते. इतरांना वाटतं की त्यात काहीतरी राहून गेलंय. पण काहीतरी नेहमीच राहून गेलेलं असतं फ़ोक्स, काहीतरी नेहमीच राहून जातं. पूर्णत्वाची भावना नकोच असते अगदी पण गोष्टीत काहीही नसण्याची, त्यातल्या कशानेही आतात काहीही न हलल्याची भावना नको असते. बारीकसारीक तपशीलांतील केव्हढेतरी मोठे अर्थ उलगडत, सामान्य गोष्टींना असामान्यत्व बहाल करत, मनाच्या आत खोल खोल कुठेतरी रुतून बसलेल्या आठवणी उपसून काढत काढत या गोष्टीचा ’य पासून ’व’ पर्यंतचा प्रवास चालतो. त्यांत छान छान आदर्शवादी, लार्जर दॅन ला‌ईफ़ माणसं नसतात तर अनंत चुका करणारी, चुका प्रांजळपणे मान्य करणारी किंवा कधीकधी त्या चुका नव्हेच अशा ठाम समजात जगणारी, चुका करत करत, पडत-सावरत पुढे जाणारी, विचार करणारी माणसं असतात, या माणसांमध्ये एक समान दुवा असतो-नसतो. ती माणसं कधी एकमेकांना ओळखत असतात, कधी नसतात. ती माणसांच्या सभोवतालची नव्हे तर माणसांबद्दलची गोष्ट असते. मी नुकताच अशी माणसांबद्दलची गोष्ट पाहिली.

या गोष्टीत दोन माणसं आहेत. ही दोन माणसांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. ते एकमेकांच्या शेजारी राहात नाहीत, त्यांच्यात दूरन्वयानेही कोणतं नातं नाही. ते बहुधा शहराच्या विरूद्ध टोकांना राहतात. त्यांच्या वयातही बराच फ़रक आहे. त्यातला एक माणूस आहे साजन फ़र्नांडीस आणि दुसरी आहे ईला.

साजन फ़र्नांडीस एक चाकरमानी आहे. गेली पंचवीस वर्षे तो एका रूक्ष सरकारी ऑफ़िसातल्या क्लेम्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. लवकरच तो स्वेच्छा निवृत्ती घेणार आहे. तो रोज सकाळी आपलं घर सोडतो, बस पकडून गर्दीतून धक्के खात बांद्राला येतो. बांद्राहून ट्रेन पकडतो, बसायला जागा मिळाली तर ठीक नाहीतर उभं राहून चर्चगेटला उतरून ऑफ़िसला येतो. तिथल्या पिवळट, खाकी रंगाच्या फ़ायली, सरळ पाठीच्या, जास्त बसलं तर ’तिथं’ रग लावणा-या, माणूसघाण्या लाकडी खुर्च्या, फ़ायलींच्या ढिगा-यात हरवून गेलेली माणसं, कण्हत फ़िरणारे पंखे, त्या पंख्याने हवा घुसळली गेली तरी जाणवावी इतकी वातावरणातील तटस्थता, प्रत्येक जण आपला मान खाली घालून काहीतरी करतोच आहे असं एकंदरीत वातावरण. मा्ना खाली घालून काम करणा-या त्या असंख्य कर्मचा-यांतील एक कर्मचारी म्हणजे साजन फ़र्नांडीस. गेली पंचवीस वर्षे कामात कोणतीही कसूर न करणारा अतिशय इंफ़िशियण्ट पण माणूसघाण्या मनुष्य. आपण बरं आपण काम बरं, बाकी लेको तुम्ही गेलात तेल लावत असा खाक्या. साजन एका रेस्टॉरंटमधून डबा माग्वतो याचा अर्थ करून घालणारं कोणी नसावं असा अर्थ लावायचा. तिथेही तो जेवणाबद्दल सारख्या तक्ररी करणारं गि-हा‌ईक म्हणून ओळखला जातो त्यामुळे तिथलं जेवण, जेवण नसून पोटात घालायचं जळण असा प्रकार असावा हादेखील एक कयास.  साजन एक वाजता जेवत असेल, पुन्हा कामाला लागत असेल. पावणेपाच वाजता काम आटपून आजूबाजूला न पाहता स्टेशनवर येत असेल आणि थकलेल्या, पेंगुळलेल्या आणि घराची ओढ लागलेल्या हजारो चाकरमान्यांच्या गर्दीचा एक भाग बनून जात असेल. तो गर्दीत जा‌ऊन मिसळतो तेव्हा त्याच्याभोवती पातळ मेम्ब्रेनचे बुडबुडा असल्यासारखा वाटतो. त्या बुडबुड्याच्या पलीकडे सर्वांची आयुष्यं समांतरपणे चाललियेत. माणसं त्यांच्यावरुन वाहतायेत खरी पण असं असूनही ती ऑब्लिव्हियस आहेत आणि तोसुद्धा.  त्या बबलच्या एका विशिष्ट परीघातलं वातावरण एकदम स्तब्ध, त्या वातावरणापलीकडे कुठेतरी ती गर्दी अनावर आपल्यातच कोसळत असलेली. मग ट्रेनमधून उतरून तो तीच ठराचिक बस पकडत असेल, कधीकधी त्याला बसयला जागा मिळत असेल,कधीकधी मिळत नसेल, कधीकधी चेंगरून यावं लागत असेल. काहीकाही वेळा साजनला विंडो सीट मिळते तेव्हा साजन रिकाम्या डोळ्यांनी बाहेरचं दृश्य पाहात असतो. ते दृश्य त्याच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे कळायला मार्ग नाही. तो घरी येतो. त्याचा दिनक्रम रोज असाच असतो, उद्याही तसाच असणार आहे, त्यात जराही बदल होत नाही. आला दिवस तसा-तसाच असण्याच्या ग्लानीतच त्याच्या नकळत कित्येक वर्षे निघून गेली आहेत.

मुंब‌ईतील हजारो गृहिणींसारखी एक ईला. ईला फ़क्त ईला आहे. तिला आडनाव नाही. ती पंजाबी ढंगाचं तोडकं हिंदी बोलते. लग्न, लग्नानंतर लगेचच मूल, मग मुलाची उस्तवार करण्यात पाच-सहा वर्षे चुटकीसरशी निघून गेलेली, नव्हाळीची वर्षं त्यात करपत चाललेली बा‌ई आहे ती. नवरा कायम कामात व्यस्त आणि घरी असेल तेव्हा कायम फ़ोनवर. त्यामुळे पती आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण होतो आहे. पतीला जिंकून घ्यायचे सर्व उपाय हरतात तेव्हा ती समस्त स्त्रीवर्ग करतो तो उपाय करते. पतीला खूष करण्याचा मार्ग म्हणे त्याच्या पोटातून जातो, त्यामुळे त्याला आपल्या हातातल्या चवीने जिंकायचं असं ती ठरवते. या कामात तिच्या घराच्या बरोबर वर राहणारी तिची स्मार्ट आंटी खंबीरपणे तिच्या पाठीशी आहे. ईला सकाळी उठते, मुलीच्या शाळेच्या तयारीला लागते, सगळ्या आयांप्रमाणे कितीही लवकर उठलं तरी शाळेची रिक्शा  ये‌ईपर्यंत तिची मुलीची तयारी करून झालेली नसते. मुलीला शाळेला पिटाळलं की ती नव-याच्या डब्याच्या तयारीला लागते. उद्या काय करायचंय हे तिने बहुतेकवेळा आदल्या दिवशीच ठरवून ठेवलेलं असतं. जेवण होता होता डबेवाला येतो, तिने कितीही वेळ ठेवून जेवण करायला सुरूवात केली तरीही डबेवाला ये‌ईपर्यंत तिचा डबा कधीही भरून झालेला नसतो. ती घा‌ईघा‌ईत डबा भरते पण त्या घा‌ईतही ती गव्हारीच्या भाजीवर खिसलेलं खोबरं टाकायला विसरत नाही. डबा भरून डबेवाल्याच्या हातात दे‌ईपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या डब्याच्या पिशवीवर लागलेलं पीठ झटकण्याचा तिचा निकराचा प्रयत्न चाललेला असतो. दार बंद केलं की मुलगी घरी ये‌ईपर्यंतचा दिवस तिच्यासमोर आ वासून पडलेला असतो. रात्री जेवताना नवरा ताटातल्या जेवणाबरोबर टीव्हीपण जेवत असतो, मुलगी खाली मान घालून जेवण चिवडत असते, तिघांमध्ये हसणं-खेळणं तर सोडूनच द्यायचं पण एका शब्दाचंही संभाषण होत नाही. जेवण होतं आणि तिचा दिवस संपतो. उद्याचा दिवस देखील आदल्या दिवसावरून छापून काढल्यासारखा असतो. फ़क्त भाजी बदलते, कपडे बदलतात आणि आंटीला सांगीतलेल्या व्यथा बदलतात. पण ती आला दिवस साजरा करायच निकराने प्रयत्न करते. कधीकधी खूपच असह्य झालं की ती तिच्या आ‌ईकडे जाते. पण तिथूनही ती डोक्यात हजारो प्रश्न, नव्या काळज्या घे‌ऊनच परतते. तिच्या बाबांना फ़ुफ़्फ़ुसाचा कॅन्सर आहे. या सर्व रगड्यात ती इतकी हरवून गेल्यासारखी झाली आहे की मागच्या वेळी कोरलेल्या भुवयांचे केस आता कसेही वाढले आहेत याचे तिला भानही नाही.

ईला तरुण आहे. तिच्या बोलण्यातल्या लाडीकपणाला, आर्जवाला नवेपणाचा वास आहे. नवरा तिची हौस कायम मोडून पाडत असला तरी ती हौशी आहे हे खरं. नवीन प्रयोगांचं तिला वावडं नाही. पण, साजनचं तसं नाही. साजनच्या घरातल्या गोष्टी साजन इतक्याच जुन्या आहेत किंवा त्या गोष्टींसोबत साजन जुना होत गेलाय असं म्हणत ये‌ईल. जुनं काळातलं कपाट, शेल्फ़स,  कित्येक वर्षांपासून पडलेली असावी अशी वाटणारी, कोणी हलवायचीही तसदी न घेतलेली अशी अडगळ, जुनी सायकल, जुने प्रोग्राम्स, जुना रेडीयो ज्यावर भुटानचं चॅनेल लागतं, कुठल्यातरी जुन्या काळचा शाम्पू ज्याचं टोपण लावायचीही तसदी घेतलेली नाहीये, जुन्या टीव्हीवर रेकॉर्ड केलेले जुनेच कार्यक्रम पाहणारा जुना साजन. या सर्व जुन्या गोष्टींना साजनची सवय हो‌ऊन गेलीये आणि साजनला त्यांची. या सर्व चक्रात इतका तोचतोचपणा आहे की साजन रोज घरी ये‌ऊन तेच तेच कपडेच घालतो, त्याच वेळेला सिगरेट्स पितो, त्यानंतर बाहेरून आणलेल्या चिवट पोळ्या आणि कुठलीही भाजी म्हणून खपेल अशी भाजी चिवडत काल संपलेल्या पानावरून कादंबरी वाचायला सुरूवात करून काही पाने पुढे आणून ठेवतो. उद्याचा दिवस कसा असणार आहे हे त्याला आताही सांगता ये‌ईल, ते त्याला माहीत आहे. माहीत असलेल्या गोष्टींचं एव्हढं काय ते नवल आणि त्यात काय एव्हढंसं. तो उठेल, तयार हो‌ईल, बांद्राहून ट्रेन....

ही गोष्ट वर्षानुवर्षे शरीराला, मनाला त्याच त्याच प्रकाराच्या जगण्याची, अशा-तशा प्रकारच्या संवादांची किंवा संवादाच्या अभावाची, चुकूनही यांत कोणताही बदल न होण्याची सवय झालेल्या या माणसांच्या आयुष्यात अचानकपणे घडून आलेल्या बदलाविषयी आहे. बदल घडण्याची शक्यता दिसत असेल तर ती आजमावून पाहण्याकरिता, त्या बदलाला सामोरे जाण्याकरिता धाडस लागतं. मुळात आपल्या आयुष्यात बदल घडतो आहे हे मान्य करण्याकरिता प्रचंड  प्रामाणिकपणा लागतो, बदल करून घेताना तो आपल्याला पटला, भिडल तरच करून घ्यायचं शहाणपण लागतं. कधीकधी बदल घडतोच आहे तर फ़ार विचार न करता मनाला वाटतं म्हणून धाडकन एखादी गोष्ट करून वेडेपणा लागतो. कधीकधी बदलांमुळे प्रचंड बावरायला होतं, सगळं सोडून, कोणालाही कसली उत्तरं न देता पळून जावंसं वाटतं, कधीकधी पळून गेल्यावर पुन्हा परतावंसंदेखील वाटतं. पण, आपल्याला अमुक एका वेळी अस का वाटतंय याचे निश्चित कारण माहित नसलं तरी अंदाज मात्र असतो. या गोष्टीतील माणसं अशीचवेडी- खुळी, शहाणी, प्रांजळ, प्रामाणिक, स्वप्नाळू अशी बरीच काही आहेत. ती खोटी नाहीत,  दुटप्पी, दांभिक तर त्याहून नाहीत.

बदल घडणं ही चांगली गोष्ट आहे. वर्षानुवर्षे एकाच रूटने प्रवास केल्यावर कधीतरी एकदा नवीन रूट घे‌ऊन पाहावा. नेहमीचेच थांबे घेण्यापेक्षा एखाद-दुसरा थांबा वाढवून पाहावा. कधी बसने न येता रिक्षा करावी, कधीकधी उगाच कुठेतरी रेंगाळावं, उशीरा घरी परतावं. चहाचे दोन घेत केवळ आपल्याकरिता दहा एक मिनीटांचा वेळ काढावा. त्यात आपल्या आवडीचं काम करावं. कधीकधी अज्ञाताच्या हाती स्वत:ला सोपवून द्यावं, कधीकधी अनोळखी माणसावर विसंबून राहावं, वेडेपणा करून पाहावा, कधीमधी माणूसघाणेपणा सोडून एखादा माणूस जोडून पाहावा, त्याला पाठीशी घालावं, त्याची हकनाक काळजी करत राहावी, कधीकधी चुकीच्या रस्त्याने आपल्या घरी जायला पाहावं. कधीकधी तो चुकीचा रस्ता देखील आपल्याला बरोबर ठिकाणी पोहोचवतो. बदल खरंच चांगलं असतात. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडली आहे असं आपल्याला उगाचच वाटत असतं. पण, असे छोटेछोटे बदल झाले तरी बदला‌आधीच्या दिनक्रमातली, त्या सापडलेल्या लयीतीलही चाकोरी,तोचतोपणा चटकन लक्षात येतो. साजन एके संध्याकाळी नेहमीचे कपडे घालत नाही तेव्हा त्याच्यामधला बदल अखेरीस त्याने मान्य केल्याचे आणि त्या बदलासोबत दोस्ती करून टाकल्याचे आपल्याही लक्षात येते. आपल्यात बदल झाले की आपल्या नकळतच आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणातलेही बदल टिपायल लागतो. वास्तविक पाहता ते तेव्हाच बदललेलं असतं नाही तर एव्हढी वर्षे आपलं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं इतकंच. मग बदललेल्या इमारती दिसतात, कित्येक वर्षांमागे पाहिलेल्या जागा आहे तशाच आहे असे पाहून आश्चर्य वाटतं, आयुष्याला काहीतरी अर्थ गवसला आहेसं वाटायला लागतं. आयुष्य अशा छोट्या छोट्या गोष्टींनी अर्थपूर्ण करता येते. एक साधं सरळ जिवंत सत्य असतं ते. या गोष्टीत ते सापडतं.

पण कधीकधी जास्त बदल करून घेण्याचीही भीती वाटते. एकतर ते अन-डू करता येत नाहीत. मागे परतायचं म्हटलं तरी पूर्वीचे ते आपण आपल्याला सापडू की नाही याचं भय वाटतं. मग बदला‌आधीच्या आपल्याला एका खुंटीला बांधून बदल आपल्यात बदल करायचे म्हटले की कुतर‌ओढ ही व्हायचीच. मग साजननं एके संध्याकाळी सिगरेट न पिणं. कित्येक वर्षांची सवय अचानक मोडल्याने होणारी तगमग, अस्वस्थता आणि निर्ढावलेल्या, बदलांना नाखूष असलेल्या, निबर झालेल्या साजनच्या डोक्यात परिहार्पयणे सुरू होणारं विचारांचं चक्र. ही गोष्ट बदलांना आपल्या आतून होणा-या विरोधाचीही गोष्ट सांगते.

या गोष्टीत स्वाभाविक गोष्टी तर आहेत पण खूप सूक्ष्म गोष्टींतून डिफ़ा‌ईन होणा-या खूप सा-या गोष्टी आहेत. कधीकधी खूप शांतता आहे पण त्या शांततेच्या पार्श्वभूमीला खूप सारे, वेगवेगळ्या पिचमधील, वेगवेगळ्या टेक्सर्चचे आवाज आहेत. ते त्या शांततेला अधिक गडद करतात. साजनाच्या घरातली शांतता अशीच काळीकभिन्न आहे. कधीकधी खूप गोंगाट आहे, खूप गर्दी आहे, खूप माणसं एकाचवेळी बोलतायेत पण त्या गर्दीत उभ्या असलेल्या माणसाचं एकटेपण, तुटकपण कच्चकन रूततंय, फ़ार काही सांगायला –दाखवायला न लागता कळतंय. घडयाळाच्या ताणलेल्या स्प्रिंगसारखा ताण आहे, कंटाळ्याने सगळ्यांना संमोहीत केल्यासारखा चमत्कारीक यंत्रवतपणा देखील आहे. गोष्टीच्या सुरूवातील साजन आणि ईला यांचा दिनक्रम दाखवल्यावर यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला,  हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला, इतकंच काय तर त्यांच्याही हाती काहीही नसण्याचा होपलेसपणा  आहे. साजन बसला आहे ती एक खोली आहे. पण त्या खोलीपलीकडेही खोल्या आहेत; म्हणजे असू शकतील. पण साजन तिथे बसला असताना एखादी व्यक्ती या खोलीतून बाजूच्या खोलीत जा‌ऊ शकते ही शक्यता आपण साजनला लागू करत नाही. त्याच्या एकटेपणाची आपण आपसूक मान्य केलेली ही जाणीव अतिशय तीव्र आहे, धारदार आहे. ती जाणीव डोक्याच्या पाठी कुठेतरी सतत टकटकत राहते . पण साजनचं असं असलं तरी ईलाला ते लागू नाही ही गोष्ट आपल्या नकळत आपल्याला मान्य होणेही आहे. ईलाचं स्वत:ला प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणं यापेक्षा तेच प्रश्न दुस-याला विचारून त्यातून आपली उत्तरं मिळतायेत का हे पाहणं आहे. त्याचवेळी साजनचं एकही प्रश्न न विचारणंही ठळक होतं आहे. बोलण्यातील घुटमळीतून मनातल्या प्रश्नांना होय/नाहीमध्ये तोलणं सुरू आहे. मनातलं सगळं सांगून टाकतो त्या व्यक्तीपासून काही गुपिते ठेवणं आहे किंवा कधीतरी सांगायचं तर भरपूर आहे पण मध्ये दुराव्याची एक मोठीच्या मोठी भिंत उभी आहे अशी परिस्थिती आहे. टेबलाच्या दोन टोकाला बसलेल्या व्यक्तींमधलं पार न करता येणारं अंतर दिसतं आहे तर कधीकधी शहराच्या दोनटोकाला बसलेल्या व्यक्ती एकमेकांच्या एकदम निकट असाव्यात असं वाटतंय. दोन माणसांच्या बाबतीत एकाच वेळी समान गोष्टी घडण्यातला योगायोग आहे पण माणसांची गर्दी असलेल्या शहरात असे घडणे नवलाचे आहे असं वाटण्याची अपरिहार्यताही आहे.

मी खूप लहान असतानाची गोष्ट आहे. पहाटे पहाटे चार साडेचारच्या सुमारास मला जाग यायची. डोळे किलकिले करून पहिल्याप्रथम मी अंथरूणावरच्या आ‌ईच्या जागेकडे पाहायचे. तिथे तिचं अंथरूण नीट घडी करून गादीच्या पायाशी ठेवलेलं असायचं. स्वयंपाकघरात जाग असायची. दिवा ढणढणत असायचा. तिथं दारापाशीच एक पारा उडालेला छोटा आरसा लावलेला असायचा. त्यामध्ये पाहत बाब केस विंचरत असायचे. त्यांनी लावलेल्या कुठल्यातरी पावडरीचा हलका गंध दरवळत असायचा. आम्हा मुलांची झोपमोड हो‌ऊ नये म्हणून त्या दोघांमध्ये हलक्या आवाजात काहीतरी बोलणं चालू असायचं. मग स्वयंपाकघरातून येणरे एकेक खमंग वास माझ्या नाकाला गुदगुल्या करू लागायचे. पोळीचा खरपूस वास यायचा आणि झोप पार उडून जायची. मग मी उठायचे आणि अर्धवट झोपेत स्वयंपाकघराच्या दाराला ओठंगून उभी राहायचे. २० वॉट्सच्या दिव्याच्या प्रकाशात ते धुरकटलेलं स्वयंपाकघर एकदम सिंदबादच्या गोष्टीमधल्या जादु‌ई नगरीसारखं वाटे. आ‌ई बाबांचा डबा भरत असायची. तिचे केस पार विस्कटलेले असायचे, उठल्या उठल्या ती बाबांच्या डब्याच्या तयारीला लागलेली असायची. परवडत नसताना तिने त्या काळी बाबांसाठी तो मोठा डब्बा आणला होता. मस्टर्ड रंगाचा, चार कॅरीयरवाला. त्याला जाड ऑफ़ व्हा‌ईट रंगाची पट्टी होती. बाबा तिच्या खांद्यावरून वाकून ती डब्यात काय भरतेय ते पाहत असायचे. मध्येच ते काहीतरी बोलायचे आणि आ‌ई गालातल्या गालात हसायची. बाबा डबा घ्यायचे, दारापाशी यायचे, माझे केस खसाखसा विस्कटायचे आणि निघून जायचे. त्यांना सोडायला आ‌ई दारापाशी जायची आणि ते रस्त्याच्या वळणा‌आड दिसेनासे झाले की दार बंद करून त्याला टेकून उभी राहायची. त्यावेळी तिच्या वेह-यावर एकदम गूढ हास्य असायचं. काहीतरी गुपित केवळ तिला आणि तिलाच माहित असल्यासारखं. या आठवणीत संभाषण नाही. असलंच तर ते न कळेलशा कुजबुजीच्या स्वरूपात आहे. बाकी फ़ोडणीच्या चुरचुरीचे आवाज आहेत, बेसिनचा नळाची तोटी जरा जास्तच फ़िरल्याने फ़र्र्कन आलेल्या फ़व-याचे, पोळपाट लाटण्याचे, पोळी तव्यावर टाकल्याचा चर्र आवाज आहे. तेव्हा गाजत असलेले गाणे आ‌ई हलकेच गुणगुणत असायची ती गुणगुण आहे. बायोस्कोपमध्ये फ़टाफ़ट बदलल्यासारखी दिसणारी अर्धवट प्रकाशातली दृश्ये आहेत, खूप सारे गंध आणि आवाज आहेत. पण एखादी आठवण यावी आणि दुल‌ई पांघरल्यासारखं उबदार वाटतं अशा आठवणींपैकी ही एक आठवण आहे.

काही गोष्टी जशाच्या तशा आपल्या आठवणीत राहात नाहीत-त्या महत्वाच्या नसतात म्हणून नव्हे तर त्यांना आठवणीत न ठेवणं ही आपली त्या त्या वेळ्ची गरज असते. त्या आठवणींतील बारीकसा तपशील मात्र आपल्या मनात खोलवर रुतून बसलेला असतो. एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण नेगेटीव्ह वर कसे चिरंतन उमटतील पुराव्यादाखल, तसंच त्या तपशीलाने मनावर कायमची खूण उमटवून ठेवलेली असते. नंतर काहीतरी चांगलं वाचल्या-पाहिल्याचं निमित्त होतं आणि त्यातल्या एखाद्या तपशीलावरुन ती पूर्ण आठवण आपल्यासमोर उलगडत येते. गुगल सर्चमध्ये टॅग्स असतात ना तसं. विवक्षित टॅगवरुन कशी पेजेसची जंत्री आपल्यासमोर हजर होते?

आठ्वणी अशा अकस्मातच ये‌ऊन आपल्याला चकीत करतात. काल पाहिलेल्या त्या गोष्टीने माझं हे असं, एव्हढं-एव्हढं, इतक-इतकं झालंय. त्या गोष्टीचं नाव होतं-
’द लंचबॉक्स’.

18 comments:

Samved said...

Superb! That's what I precisely liked and wrote about the movie. Director thankfully is not in a hurry to explain everything. He just directs us towards a direction leaving us for further exploration. Sometime back Karnad said reason he sometimes disliked Tendular's plays is lack of unambiguity. Tendular wrote everything (if you get to read script of his play, you will get what I am saying). But fun is when you trust your audience and let them explore possibilities.

Samved

Shraddha Bhowad said...

संवेद,
कैसा बरोबर बोल्या तुम.
तेंडुलकरांसोबत नगरकरांचंही असंच आहे. सर्वच्या सर्व आयतं ताटात आणून ठेवल्यासारखं. वाचकाने कन्फ़्युझ तर व्हावं पण तेही त्यांच्या पद्धतीने व्हावं अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली असते. :)

तृप्ती said...

खासच लिहिलं आहेस.

य पासून व बद्दल अनुमोदन :)

Shraddha Bhowad said...

तृप्ती,
लॉंग टाईम नो सी तृप्ती. :)
अगदी ’प’ धन्यवाद!

तृप्ती said...

:) मी सगळ्या पोस्ट्स वाचते तुझ्या :) दर वेळी अभिप्राय देणं होत नाही वेगवेगळ्या कारणांनी.

awdhooot said...

Hats off to you Shraddhaa


itee awdhoot

Pradeep Bhide said...

The film has a definite connection to millions of people in mega cities like Mumbai who are living like machines. You have identified those subtleties superbly. It is not a review. it is aatma manthan. Very nice. Pradeep

Shraddha Bhowad said...

तृप्ती,
हो गं हो.
मला आनंद झाला. अगदी खरं.

Shraddha Bhowad said...

अवधूत सर,
खूप धन्यवाद!

Shraddha Bhowad said...

श्री. प्रदीप भिडे,
धन्यवाद!
खरंय, इतक्या छोट्याछोट्या गोष्टींतून कधीकधी किती बोलतो दिग्दर्शक.

पण ब-याच वेळ दिग्दर्शक एखादी गोष्ट करतो त्यामागे उद्देश वेगळा असतो पण आपल्याला ते वेगळ्या अर्थाने भिडतं. उदाहरणार्थ- किल बिल १ मध्ये ब्राईड ओ-रेनच्या हेंचमनशी लढत असताना इतका रक्तपात दाखवला गेलाय की काही वेळाने तेच लाल लाल रक्त पाहून अगदी कंटाळाच येतो. आणि प्रीसायझली त्याच क्षणाला टॅरन्टीनो त्या पूर्ण दृश्याला ब्लॅक ऍड व्हाईट करून टाकतो. यामागे टॅरन्टिनोचा उद्देश वेगळा असेल कदाचित पण मला तेच तेच पाहून कंटाळा येणार आहे हे त्या डिरेक्टरने ऍकनॉलेज करावं (जाणता/अजाणता) हे मला प्रचंड ब्रिलियण्ट वाटलेलं.

या सिनेमात शक्य असलेल्या ब-याच शक्यता हे या सिनेमाचे खूप मोठं सौंदर्य आहे. डबेवाल्यांनी एकदा योगायोगाने केलेली चूक दुस-यांदाही घडते आणि साजन ईलाच्या जागी कोणा भलत्याच्याच घरी जाऊन पोहोचतो का?मग तिथून एखादी दुसरी कथा सुरू होते का? का ईलाच शेखकडून साजनचा नशिकचा पत्ता घेऊन नाशिकला पोहोचते? फ़क्त नव-याच्या शर्टाला लेडीज पर्फ़्युमचा वास योतो म्हणून त्याचं अफ़ेयर चालू आहे असा फ़क्त अंदाज लावणारी, त्याबद्दल त्याला स्पष्टपणे कधीही न विचारणारी ईला घरातून बाहेर पडण्याचं धाडस एकवटू शकते का? कशाच्या जोरावर? अनंत गोष्टी आहेत. हाच शेवट साजन ईलाच्या घरची बेल वाजवतोय आणि ईलाने दार उघडून धरलंय असाही करता आला असता. पण तसा केलेला नसणं हे त्या शेवटाचं सौंदर्य आहे.

कधीकधी सावलीच्या चाळ्वाचाळवीतूनही पडद्यावर बरंच काही सांगता येतं. फ़क्त आपल्याकडे दिग्दर्शक आपल्याला काय सांगायचंय ते सांगायचं की प्रेक्षकाला पाहायचंय ते सांगायचंय यांत खूप गंडलेला असतो. सुदैवाने इथे त्याबद्दलची सुस्पष्टता आहे.

-श्रद्धा

प्रसाद said...

सिनेमा पाहतानाच जाणवले होते की हा खूप बारकाईने बघावा लागणारे आणि सगळे बारकावे , शक्यता आजमावून पाहण्यासाठी पुन्हा पाहावा लागणारे.
आता हे वाचून वाटतंय की पुन्हा नाही पाहिला तरी चालेल इतका एकेक पापुद्रा तू उलगडून ठेवला आहेस :) खूप खूप thanks

"डबेवाल्यांनी एकदा योगायोगाने केलेली चूक दुस-यांदाही घडते आणि साजन ईलाच्या जागी कोणा भलत्याच्याच घरी जाऊन पोहोचतो का >> " नाही पटले. हे शक्य वाटत नाही कारण ही चूक एकदा झालेली नसते. जर इला डबेवाल्यांकडून साजनचा पत्ता बरोब्बर काढून ऑफिसात पोचते तर साजनला त्याच मार्गाने इलाचा पत्ता मिळू शकणार नाही हे पटत नाही.

दिग्दर्शकाने नक्की एक ठाम शेवट केला नसला तरी शेवटाकडे दाखवलेल्या गोष्टी या साजन-इला एकाच दिशेने येताहेत इतपत सूचक पद्धतीने दाखवल्या आहेत असे मला वाटते. त्यामुळे मला शेवटचे काही तपशील नाही रुचले कारण ते संपूर्णपणे ५०-५० शक्यता निर्माण करणारे वाटत नाहीत तर एका दिशेने चित्र जास्त झुकवतात

BsHrI said...

Apratim likhaan ...................
mvi bagaycha hota pn rahoon gela ti iccha purna jhali varil blog vachun agdi maditartha sakat.Pn sarvaat bhavnari hoti ti 'TUJI ATHWAN'.

Pradeep Bhide said...

फार सुरेख पद्धतीने आणखी खोलात जाऊन तू तुझे लॉजिक मांडले आहेस श्रद्धा.लंच बॉक्स मला पण अलीकडच्या काळात आवडलेला चित्रपट. फालतू फाफटपसारा न ठेवता अतिशय नेमकेपणाने चित्रित केलेला.

टॅरन्टीनो माझाही अतिशय आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्या किल-बिल मधला तो रक्तपात आणि तो अचानक कृष्णधवल करणे चक्रावून टाकणारेच होते.टॅरन्टीनोचा इन ग्लोरियस बास्टर्ड्स आणि त्यातला नाझी जर्मन अधिकारी अंगावर काटा उभा करणारा होता. अभिनेत्याची निवड एखाद्या व्यक्तिरेखेसाठी कशी अचूक करावी याचा वस्तुपाठच.

बिफोर सनराइज,बिफोर सनसेट
आणि यावर्षीचा बिफोर मिडनाइट हे चित्रपट तू बघितलेच असावेत.हे माझे अतिशय आवडते चित्रपट आहेत.मानवी रिलेशनशिपच्या अथांग खोलीचा आढावा घेणारे.

काही नवीन लिहिलेस तर कळवत रहा-- प्रदीप भिडे

Shraddha Bhowad said...

थॅंक्स प्रसाद.
तू हे जे म्हणतोयेस ना, त्यावरून मला एक आठवण आली.
कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप कॅंटीनमध्ये एका विशिष्ठ टेबलवर बसायचा. आम्ही दुस-या वर्षात गेलो, फ़्रेशर्स आले. तेव्हापासून फ़्रेशमन मुलींचा एक ग्रुप आमच्या टेबलच्या बाजूला बसायला लागला. माझ्या मित्राला त्यातली एक मुलगी खूप आवडायची. ती मुलगीही त्याकडे बघून हसायची. आय मीन फ़ुल ऑन्न सुरू होतं. आम्हाला खात्री होती की या वेगाने ऍट लीस्ट रोझ डे पर्यंत तरी यांच्यात रेड रोझची देवाण-घेवाण व्हायला हरकत नाही. ते एकमेकांशी बोलले नव्ह्ते तेव्हापर्यंत. पण आम्हाला त्यांचं सूत जुळणार याची सर्व लक्षणं दिसत होती. फ़क्त उठून थेट बोलायची देत होती.

एके दिवशी काय झालं, तो मित्र कॉलेजला आला नाही आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर माझा दुसरा एक मित्र बसला. तर ही बाई त्याच्याकडे पाहून नेहमीचं लाजरं बिजरं हसायला लागली. आम्हाला वाटलं हिला दूरचं दिसत नाही की काय. तो मित्र जाम गांगरला आंणि तिथून उठलाच. तरीही ती बया हसतच होती. मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला की ती त्या खुर्चीच्या मागे स्पोर्ट्स सेक्रेटरी बसला होता त्याच्याकडे पाहून हसत होती. आणि इट टर्न्ड आऊट दॅट की, तो ग्रुप देखील रोज तिथेच बसायचा. आणि ती मुलगी नेहमी त्या एस.एसकडे पाहून हसायची.

त्यामुळे ती मुलगी माझ्या मित्राकरिता हॉट होती असे वाटण्याइतपत सर्व सूचक पद्धतीने चालू असतानाही एक भलताच ट्विस्ट आला आणि स्टोरी एकदम पलटूनच गेली.

तुला कळतंय मला काय सांगायचं आहे ते?

माझा सांगायचा उद्देश हा आहे, इंटरप्रीटेशन ही व्यक्तिगणिक बदलणारी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाचं इंटरप्रीटेशन त्याच्यापरीने योग्यच असतं कारण त्याच्याकडे त्याचं सॉलिड जस्टीफ़िकेशन असतं. माझ्यापुरता म्हणायचं झालं तर मी कथेआतल्या अंतस्थ प्रवाहांची शक्यता धरून चालते. त्यामुळे मला ’य’ शक्यता वाटल्या. तू रॅशनली विचार केलास म्हणून तुला ’प’ शक्यता वाटली. कोणती चूक, कोणती बरोबर असं कधीही नसतं. पण, आय हियर यू. :)

Shraddha Bhowad said...

भाग्यश्री,
:)
गं बाई, मूव्ही पाहा ना. दत्ताणीला आहे अजून तोवर पाहून घे.

Shraddha Bhowad said...

प्रदीप भिडे,
जनरल लांडा नं? Djiango unchained मध्ये पाहिलंत का तुम्ही त्याला? मी टॅरन्टिनोची निस्सीम चाहती आहे. त्याचा ’पल्प फ़िक्शन’ माझा अत्यंत आवडता.

बिफ़ोर सनराईझ आणि बिफ़ोर सनसेट हे मला तुफ़ान आवडतात. पण समहाऊ, मला सनसेटवरच थांबावंसं वाटलं. छानसं काही बनल्यावर ते तिथंच थांबावं आणि अजरामर व्हावंसं वाटतं. त्याची आपल्या डोक्यातील आठवण कुठल्याही पद्धतीने टार्निश होऊ नये असंच वाटतं आपल्याला. नेमाडे एकदा माडगूळकरांना (व्यंकटेश) म्हणाले होते, "तुम्ही बनगरवाडी लिहील्यावर मरून जायला हवं होतं." याला शब्दश: घेतलं नाही तर नेमाडे किती मनापासून म्हणाले होते आणि का म्हणाले होते हे आपल्याही लक्षात यावं गौरीनेही ’थांग’वर न थांबता ’मुक्काम’चं लांबण का लावलं हे कळत नाही. पण ती त्या लेखकाची, कलावंतची त्या त्या वेळची निकड असावी. तस्मात, सांगायची गोष्ट अशी की मी ’बिफ़ोर मिडनाईट’ पाहण्य़ाचं धैर्य एकवटू शकलेले नाही.

अवधूत सरांच्या ई-मेला ई-मेलीतून तुमचा याहूचा ई-पत्ता टिपून घेतलाय. काही छान, मनापासून लिहीलंच, तर नक्की कळवेन.

थॅंक यू! :)

-श्रद्धा

Pradeep Bhide said...

Yes Shraddha. He is a fascinatiing actor who exhibited his prowess in Djajgo unchained --- diametrically different colours of his talent.

so essentially, any good film you witness presents spectrum of newer talent in various departments.

You said you got my Yahoo mail ID from Awdhoot. He is the one who forwarded me your Lunch Box article. I like Awadhoot's writing immensely. Because of his very dim view about the world around, we jokingly call him as " Dr No !"

Jokes apart. we love his scathing remarks on the establishment.

so great to know you Shraddha.. let us keep in touch. Pradeep

Pradeep Bhide said...

Yes Shraddha. He is a fascinatiing actor who exhibited his prowess in Djajgo unchained --- diametrically different colours of his talent.

so essentially, any good film you witness presents spectrum of newer talent in various departments.

You said you got my Yahoo mail ID from Awdhoot. He is the one who forwarded me your Lunch Box article. I like Awadhoot's writing immensely. Because of his very dim view about the world around, we jokingly call him as " Dr No !"

Jokes apart. we love his scathing remarks on the establishment.

so great to know you Shraddha.. let us keep in touch. Pradeep

 
Designed by Lena