इल प्ल.

खूप शहाणी आणि खूप वेडी माणसं कधीच बदलत नसतात असं म्हणतात.
पण एके दिवशी आपल्याला एकाचवेळी खूप शहाणं आणि खूप वेडं असल्याचा ताण यायला लागतो. आणि मग आपण स्वत:ला  ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत बदलत आणतो.
इतका-म्हणजे ते म्हणतात तसा-आमूलाग्र बदल होऊनही आपल्याला काही गोष्टींबद्दल पूर्वी वाटायचं तेव्हढंच आणि तितकंच कसं वाटत राहतं?
समुद्राबद्दल, देवरायांबद्दल?
जसं मला पावसाबद्दल वाटतं?
पूर्वीही असं व्हायचं आणि अजूनही तसं होतं-
मला जर वाटतंय की पाऊस पडणार, तर तो पडतोच.

एरव्ही आत काजळलं, मनासारखं काही झालं नाही, मन खट्टू झालं की बाहेरचंही सगळं काजळल्यासारखं दिसायला लागतं. मग मी फ़ूं फ़ूं करुन ती काजळी उडवून लावायचा प्रयत्न करते, अनोळ्खी सुरांच्या कवेत झोकून देते, त्यावर वजनविरहीत मूढतेने तरंगत राहते किंवा अज्ञात, डोळ्यापर्यंत पोहोचूनही कसलाही अर्थबोध न होणरया दृश्यावर डोळे चिकटवून बसते. निर्वाणीचा उपाय म्हणजे शब्दांच्या बुडबुडयावर स्वार होते.
पण पावसात हे सर्व करण्याची गरज नसते.
पावसात फ़क्त बाहेर पडायचं असतं. हवेने ढकलत आणल्यासारखे आपण कुठवर तरी जाऊन पोहोचतोच.

इल प्ल. पाऊस पडतो आहे.
छान वितळलेला सूर्यप्रकाश असतो.
पावासाच्या रिपरिपीने आजूबाजूचे सर्व अश्लील आवाज शोषून घेतलेले असतात.
पत्र्यावर तडतडणारया पावसाच्या थेंबांमधून पावसाच्या गाभ्यातील गर्द शांतता कानावाटे आत झिरपते,  आपल्याआत ठिबकत राहते.
पृथ्वी फ़ुलांमधून हसते म्हणे..
पावसात तर काय प्रत्येक पान फ़ूल असते.
सर्वचजण आनंदात असतात.
त्या आनंदाचा स्पर्श मला देखील होतो.
हे सर्व पाहून आपण खूप सुंदर दिसत असू याबद्दल इतकी खात्री वाटायला लागते की स्वत:तून बाहेर निघून स्वत:कडे अनिमिष पाहत राहावं वाटतं.

ब्रिष्टी पोर्छे..पाऊस पडतो आहे. 
आतापर्यंत बाहेरच्या झाडा-फ़ुला-पानांमध्ये खोलवर डोकावून पाहत पाहात सर्वकाही आपसूक समजायला लागलेलं असतं, विचार संगतवार लागायला लागतात. आतून खूप  आजारी असल्यासारखं वाटत असतं ते बरं व्हायला लागतं.

अमे गा फ़ुत्ते इमास. पाणी पडते आहे. पाऊस पडतो आहे.
पांढरा आवाज सर्वत्र भरुन राहिला आहे असं वाटतं, आपल्या पोटात हजारो रहस्य वागवत असलेल्या शांततेसारखा.
आणि मग पावसातल्या शांततेच्या ओल्या गाभ्यातच आपल्यातला कधीही न संपणारा ठार कोरडेपणा कळतो.
आणि मग माझ्या माझ्याबद्दलच्या, इतरांबद्दलच्या खुळ्चट, अवास्तव कल्पना विरायला लागतात.
कुठल्यातरी काळोख्या वळ्चणीला बसून मी पाऊस ऐकत राहते.
कुठलीही, कसलीही, कोणाचीही गरज वाटण्याची गरज संपते.
मी शांत होते.

बरान: पाऊस
मला पाऊस का आवडतो?
मला पाऊस आवडतो कारण  कारण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतो त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती आहे.
मला पाऊस आवडतो कारण त्याच्यात सर्व काही नवीन असतं.
एव्ह्ढं सारं खळखळ्णारं पाणी असतं पण, तुम्ही एकाच पाण्यात दोनदा पाय घालू शकत नाही कारण तुमच्या पायावर येणारं पाणी हे आधीचं पाणी नसतं.
आणि..
मला पाऊस आवडतो कारण इतकं पाणी असूनही त्याच्यामध्ये कोणालाही तृषार्त तळ्मळायला लावण्याची ताकद असते.

मला पाऊस आवडतो पण तो माझा मित्र नाही होऊ शकत कारण पाऊस हे माझ्या मनातल्या खळबळीचे प्रतीक आहे.
एखाद्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्या भांड्याच्या रंग उचलतं, स्थिर आणि चमकदार भासतं पण पावसाच्या धारांचा नेमका रंग आपण नाही सांगू शकत.
चिमुकला जीव असणाया सत्याचे शब्द सुस्पष्ट, नेमके असतात तर कवेत न मावणारं वास्तव अधिकाधिक मूक आणि गूढ असतं.
पावसासारखं आणि-
कधीही न बोललेल्या, मुकाट सोसलेल्या दु:खांसारखं.

ला युव्हिया. पाऊस. संततधार पाऊस.
मी पावसात चालत असते.
बरेच जण पावसात बाहेर पडलेले असतात.
काही जण पावसात चालतात, काहीजण नुसतेच भिजतात.
अशा पाना-फ़ुला-पावसांतून जाता जाता, चालता चालता आपल्या आत एकदाच लक्कन काहीतरी हलतं.
असं चालता चालता आपल्या आतलं काहीतरी एकदाच बदलतं.
आणि एरव्ही बदलण्यास एकदमच नाखूष असलेले आपण अगदी राजीखुषीने स्वत:ला बदलून घेतो.

मीठा है,कोसा है, बारिश का बोसा है..कोवळा, उबदार, सर्वांगाने भिडणारा पाऊस
काळ असा दोन क्षणांच्या मध्ये साकळलेला असतो.
पावसासाठी काहीतरी योजून ठेवावं आणि त्यानेही नेमकं त्याच दिवशी येण्याच्या आणि आपणही योजून ठेवलेलं सर्व काही त्याच दिवशी हातचं काही न राखता करुन टाकण्याच्या.
असं पहिल्यांदा घडतंय असं नाही, बरयाचदा घडतं.
पण तरीही पाऊस येतो तेव्हा मी गेल्या कित्येक जन्मापासून याची वाट पाहिली होती असं वाटायला लागतं.
आणि तो ही प्रत्येक वेळी असा अवचितच, माझ्याकरता आल्यासारखा वाटतो.

मग या एका दिवसाचं मॉर्फ़ीन अनेक दिवस, आठवडे, झालेच तर महिने पुरवून घेते.. पण ते केव्हाना केव्हा संपायचंच.
पण चालायचंच..!

19 comments:

K P said...

नमस्कार,
तुमचा ब्लॉग चाळला. पोस्टस् आवडल्या. खूप विचारपूर्वक लिहिलेल्या आहेत. लेखनाची शैली वर्णनात्मक असून ती एक चित्र उभे करते. उर्दू शेरोशायरी वाचायचा छंद दिसतो.
भरपूर शुभेच्छा.

Shraddha Bhowad said...

केदार,
धन्यवाद!
वाचन तर आहेच, ते असावंच. भिडतं ते आपोआप आठवणीतून पृष्ठभागावर येतं.
पण-
’विचारपूर्वक’ लिहीण्याचा आरोप मात्र मी फ़ेटाळून लावते आहे. :)

K P said...

:)
विचारपूर्वक याचा अर्थ तपशिलावर लक्ष. लिहिताना अनुभवांचा प्रत्येक तपशील यावा, अशी दक्षता तुम्ही घेतल्याचे जाणवते.
तुमच्या प्रोफाईलवर लिहिलेलेही आकर्षक आहे. तसे ते गिरलेले लम्हे कुठे सापडतात पुन्हा ? आठवणीत असतात आणि उत्तम साहित्यात सापडतात. तुम्ही स्वतः शायरी करत असल्यास पोस्ट करा. वाचायला नक्की आवडेल.

Shraddha Bhowad said...

बरं. तुम्ही म्हणताय तर तसं. :)
शेरोशायरीचं म्हणाल तर नाही, ती देणगी मला मिळालेली नाही. मी उर्दू देखील आताआताच वाचायला लागले. कविता करायचे पण तो छंदबद्ध आणि वृत्तबद्ध प्रकार माझ्या पचनी पडला नाही. ६ साईझ असताना ३ साईझचे बूट घातल्यासारखं वाटायचं. कविता अगदी कालपरवापर्यंत ब्लॉगवर होत्या पण मला स्वत:ला त्या मीनाकुमारी कॉंप्लेक्स असलेल्या वाटायला लागल्या म्हणजे "बळंच काहीतरी बरं का!" असा प्रकार त्यामुळे नंतर काढून टाकल्या.
असो, वाचत राहा.

Eat & Burpp said...

पोस्टची ठेवण जाम आवडली! तसं पावसाचं आणि माझं फारसं जमत नाही..पण पावसाच्या कृपेनं बहरलेला निसर्ग मला आवडतो..भावतो!! त्या उप्पर मला कौतुक वाटतं तुम्हा मुंबईकरांचं!! तुम्ही न कंटाळता पावसाला साथ देता त्याचं..आणि तू या पोस्ट मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केलंस! मस्त झालंय लिखाण...मी सुद्धा 'pour une minute' पावसाच्या प्रेमात पडले!! :)

Shraddha Bhowad said...

गीता,
असं म्हणतात, म्हणजे मीच म्हणते की कोणत्याही शहराला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर त्या शहरातले सर्व ऋतू आपल्या अंगाखांद्यावरुन जाऊ द्यावेत. मी तर जन्मापासून मुंबईतच आहे पण पुण्यातही मी दोन वर्षे होते. समहाऊ, पुण्यातला पाऊस बेभान नसतो. मोजक्या धारा बरसतात, मोजकाच वेळ पाऊस पडतो, सगळं मोजकं मोजकंच होतं. मला ही देखील एक न कळलेली गोष्ट आहे की मुख्य शहरापासून दूर जावं तसा पाऊस जास्त खुलतो, कमी शिष्ट होतो. मी मागे एकदा बाईकवरुन वरंधाला गेले होते तेव्हा मला पावसाने असं सडकून काढलेलं की हा पुण्यातला पाऊस आहे यावर विश्वास बसू नये. मी देखील मुंबईच्या उपनगरी भागात राह्ते जिथे छत्री नसेल तर आडोसा देणारी, कमान टाकणारी रेन ट्रीची झाडे आहेत, जिथे झिमझिम पाऊस आला तरी झाडांच्या शेंगा खुळ्खुळ वाजतात, अनंत, तगर भिरभिरत खाली पडतात, जिथे पाऊस पडल्यानंतर चिखल नाही होत, तर सगळं स्वच्छ होतं.
अर्थात बॅंड-स्टॅंड, मरीन ड्राईव्ह, एनसीपीए इथल्या उच्चभ्रू पावसाची गंमत पण वेगळीच असते.
मला माहेरपण काय असतं याची कल्पना नाही पण त्या शब्दात जो कोझीनेस आहे, उबदारपणा आहे, ते जे काही असावं ते मी जिथे राह्ते तिथल्या पावसातून मला पूर्णपणे उमजलेलं आहे. :)

Nil Arte said...

एकदम भिडेश!!!

म्हणजे मागच्या वर्षी ऐन जुलै महिन्यात मी सकाळी (११ ला ) उठायचो आणि बाहेर रणरणतं ऊन बघून माझी तिरकी सटकायची! सूक्ष्म डोकं दुखायचं! कोणाला तरी जोर-जोरात शिव्या द्यावश्या वाटायच्या!

निर्लज्जपणे सांगायचं तर आपल्या सारख्या चाकर-मान्यांचं पाउस नाही झाला तरी सगळं चालू रहातं. फारसं काही अडकत नाय; पण आतूनच पारोसं वाटत रहातं!

या वर्षी कसं छान वाटतंय… म्हंजे २४ तास पाउस नसला तरी चालेल पण रस्ते ओले पायजेत रे आणि आकाश काळं.

म्हणूनच या महिन्यांत अगदी बाहेर ऊन असलं ना तरी मी गॉगल , लेदर शूज घालत नाय!
म्हणजे कसंय ना की जुलै महिन्यात आपण गॉगल घालणं म्हणजे एका लेव्हल वर उद्धटपणे पावसाला सांगणं की आज काय तू येणार नाय,
किंवा लेदर शूज असले आणि "हिरो" आला की खोल कुठे तरी सब-सब-सब-कॉन्शस मध्ये शूज भिजले की वाईट वाटतंच.
म्हणून बाटा झिंदाबाद!
म्हणजे अबोध, उप-बोध, अर्ध-बोध, पाव-बोध कोणत्याच मनात तो येऊ नये असं वाटायला नको… मां की!!!

लासिया शे पिओव्हा!

Shraddha Bhowad said...

पुण्यात पाऊस नाहीये वाटतं? :D
पावसात मी चामडं, खादी, माज सगळं गुंडाळून ठेवते. आपल्यासाठी त्या वस्तू आहेत, त्या वस्तूंकरता आपण नाही.
पण या वर्षी खरंच छान पाऊस आहे. अगदी.

Samved said...

छानै पण अगदी भयंकरच छान नाही झालय. तू लयी ब्येष्ट लिहु शकतेस पण कदाचित पावसाचे संदर्भ मर्यादित असु ही शकतील. माझ्या हापिसाच्या मागे टेकडी आहे, अगदी माझ्या मागल्या थोरल्या काचेतूनही दिसते. ढगांचं आणि टेकडीचं जे काही चालु असतं थोड्या थोड्या वेळानं, ते बघितलं की कळतं भाषाच ही निकामी...

संवेद

Samved said...

छानै पण अगदी भयंकरच छान नाही झालय. तू लयी ब्येष्ट लिहु शकतेस पण कदाचित पावसाचे संदर्भ मर्यादित असु ही शकतील. माझ्या हापिसाच्या मागे टेकडी आहे, अगदी माझ्या मागल्या थोरल्या काचेतूनही दिसते. ढगांचं आणि टेकडीचं जे काही चालु असतं थोड्या थोड्या वेळानं, ते बघितलं की कळतं भाषाच ही निकामी...

संवेद

Samved said...

छानै पण अगदी भयंकरच छान नाही झालय. तू लयी ब्येष्ट लिहु शकतेस पण कदाचित पावसाचे संदर्भ मर्यादित असु ही शकतील. माझ्या हापिसाच्या मागे टेकडी आहे, अगदी माझ्या मागल्या थोरल्या काचेतूनही दिसते. ढगांचं आणि टेकडीचं जे काही चालु असतं थोड्या थोड्या वेळानं, ते बघितलं की कळतं भाषाच ही निकामी...

संवेद

Shraddha Bhowad said...

संवेद,
मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे.
हे सगळं शब्दातीत आहे-अगदी मान्य. पण तरीही आपण ते हट्टाने शब्दात उतरवायला पाह्तो. का? मला वाटतं बहुतेक आपण लिहीलं की आपल्याला कळतं की, "छे छे! आपल्याला वाटतं ते काही हे नव्हे!" मग आपल्याला नक्की वाटतं तरी काय? हे कोणाला कळतं, कोणाला नाही कळत.

मला काय वाटत नसावं, किंवा मला वाटतंय की मला ’असं असं’ वाटतंय-ते खरंच तसं वाटतंय की नाही हे माझ्या अंतिम खर्ड्याकडे पाहून कळतं. बहुधा अपयशच हाती येतं. पण प्रयत्न गरजेचा आहे म्हणून ही धडपड.

काय वाटते आहे? यापेक्षा काय वाटत नाहीये? हे कळलं की काय वाटत असावं याचा अंदाज लढवता येतो म्हणून रे!

मी हल्लीच रुमीचं एक वाक्य वाचलं की "मौन ही परमेश्वराची भाषा आहे, बाकी सर्व त्याची यथामती केलेली भाषांतरं असतात."
मी तो नाही रे. आपण कुणीच नाही.

तस्मात! :)

प्रसाद said...

पुण्याचा असूनही (म्हणजे पुण्याचा फारसा त्रासदायक नसूनही) का कुणास ठाऊक पावसाशी जवळीक, नाते वगैरे जाणवलेच नाही कधी …. म्हणजे निसर्गसौंदर्य वगैरे अवर्णनीय असते… पण तरीही त्यामुळे पावसाच्या प्रेमात पडलोय वगैरे असे वाटले नाही.

अर्थात तरीही लेखाची मांडणी आवड्लीच !!!

मुंबईसारखा गात्रा-गात्राची परीक्षा पाहणारा पाउससुद्धा तुझ्यासारखी माणसे एन्जॉय करतात तेव्हा विशेष वाटते.

पावसात काय प्रत्येक पान फूल असते >>>> वा !!! साधीच पण किती विलक्षण उपमा!

ashish said...

बाई,

थोर आहेस. खूप आवडले. पुन्हा वाचेल परत.
लिहावसे वाटतेय खूप काही पण
"जो भी में केहना चाहु , बरबाद करे अल्फाझ मेरे"

Shraddha Bhowad said...

प्रसाद,
I hear you.
एकदम cliche आहे पण-
अरेंज्ड मॅरेजमध्ये कसं आपण जोडीदाराला आवडून घ्यायला शिकतो तसं आपण पुण्यामध्ये पावसाला चालवून घ्यायला शिकतो. आता पडतो आहे तर त्याचं काही करता येण्यासारखं नाही-केवळ या भावनेतून.
लहान, निरागस वगैरे असलं तरी चिरचिरणारं पोरं कसं डोकं उठवतं तसा मला पुण्यातला पाऊस वाटतो. मी होते पुण्यात आणि पेठांमध्ये राहिलेले आहे, त्यामुळे अनुभवातून सांगतेय.
बनेश्वरला जाऊन ये एकदा.

Shraddha Bhowad said...

आशिष,
:)
पोहोचलं!

प्रसाद said...

आता माझ्या लक्षात येतंय की पाऊस किंवा कोणताही ऋतू एन्जॉय करणे हे थंडी-पावसाच्या प्रमाणापेक्षा व्यक्तीच्या मूळच्या स्वभावावरच अवलंबून असावे. माझं म्हणशील तर मला उन्हाळा पावसाळ्यापेक्षा कितीतरी जास्त आवडतो. विशेषतः टळटळीत दुपार. स्तब्ध शांततेचा (आणि मधूनच किटकिटणाऱ्या खारींचा) आवाज कानात साठवून घेता घेता जिवाची काहिली सहजतेने विसरू शकतो मी.

आणि तू म्हणतेस तसा मी बनेश्वरला गेलो होतो एकदा - अगदी धुंवाधार पावसात - आणि तिकडचं वातावरण एन्जॉयदेखील केलं, पण तरीही कधी एकदा एकदा घरी जाऊन ओले कच्च कपडे बदलून कोरडा होतोय असे झाले होते. can't help :)

Meghana Bhuskute said...

स्वारी, पण पोस्टहून कमेंटाच आवल्ड्या. :)

Meghana Bhuskute said...

पुन्हा वाचताना पोस्टपण ’झाली’. मधे पाऊस पडून गेला असणार बहुतेक!

 
Designed by Lena