इल प्ल.

खूप शहाणी आणि खूप वेडी माणसं कधीच बदलत नसतात असं म्हणतात.
पण एके दिवशी आपल्याला एकाचवेळी खूप शहाणं आणि खूप वेडं असल्याचा ताण यायला लागतो. आणि मग आपण स्वत:ला  ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत बदलत आणतो.
इतका-म्हणजे ते म्हणतात तसा-आमूलाग्र बदल होऊनही आपल्याला काही गोष्टींबद्दल पूर्वी वाटायचं तेव्हढंच आणि तितकंच कसं वाटत राहतं?
समुद्राबद्दल, देवरायांबद्दल?
जसं मला पावसाबद्दल वाटतं?
पूर्वीही असं व्हायचं आणि अजूनही तसं होतं-
मला जर वाटतंय की पाऊस पडणार, तर तो पडतोच.

एरव्ही आत काजळलं, मनासारखं काही झालं नाही, मन खट्टू झालं की बाहेरचंही सगळं काजळल्यासारखं दिसायला लागतं. मग मी फ़ूं फ़ूं करुन ती काजळी उडवून लावायचा प्रयत्न करते, अनोळ्खी सुरांच्या कवेत झोकून देते, त्यावर वजनविरहीत मूढतेने तरंगत राहते किंवा अज्ञात, डोळ्यापर्यंत पोहोचूनही कसलाही अर्थबोध न होणरया दृश्यावर डोळे चिकटवून बसते. निर्वाणीचा उपाय म्हणजे शब्दांच्या बुडबुडयावर स्वार होते.
पण पावसात हे सर्व करण्याची गरज नसते.
पावसात फ़क्त बाहेर पडायचं असतं. हवेने ढकलत आणल्यासारखे आपण कुठवर तरी जाऊन पोहोचतोच.

इल प्ल. पाऊस पडतो आहे.
छान वितळलेला सूर्यप्रकाश असतो.
पावासाच्या रिपरिपीने आजूबाजूचे सर्व अश्लील आवाज शोषून घेतलेले असतात.
पत्र्यावर तडतडणारया पावसाच्या थेंबांमधून पावसाच्या गाभ्यातील गर्द शांतता कानावाटे आत झिरपते,  आपल्याआत ठिबकत राहते.
पृथ्वी फ़ुलांमधून हसते म्हणे..
पावसात तर काय प्रत्येक पान फ़ूल असते.
सर्वचजण आनंदात असतात.
त्या आनंदाचा स्पर्श मला देखील होतो.
हे सर्व पाहून आपण खूप सुंदर दिसत असू याबद्दल इतकी खात्री वाटायला लागते की स्वत:तून बाहेर निघून स्वत:कडे अनिमिष पाहत राहावं वाटतं.

ब्रिष्टी पोर्छे..पाऊस पडतो आहे. 
आतापर्यंत बाहेरच्या झाडा-फ़ुला-पानांमध्ये खोलवर डोकावून पाहत पाहात सर्वकाही आपसूक समजायला लागलेलं असतं, विचार संगतवार लागायला लागतात. आतून खूप  आजारी असल्यासारखं वाटत असतं ते बरं व्हायला लागतं.

अमे गा फ़ुत्ते इमास. पाणी पडते आहे. पाऊस पडतो आहे.
पांढरा आवाज सर्वत्र भरुन राहिला आहे असं वाटतं, आपल्या पोटात हजारो रहस्य वागवत असलेल्या शांततेसारखा.
आणि मग पावसातल्या शांततेच्या ओल्या गाभ्यातच आपल्यातला कधीही न संपणारा ठार कोरडेपणा कळतो.
आणि मग माझ्या माझ्याबद्दलच्या, इतरांबद्दलच्या खुळ्चट, अवास्तव कल्पना विरायला लागतात.
कुठल्यातरी काळोख्या वळ्चणीला बसून मी पाऊस ऐकत राहते.
कुठलीही, कसलीही, कोणाचीही गरज वाटण्याची गरज संपते.
मी शांत होते.

बरान: पाऊस
मला पाऊस का आवडतो?
मला पाऊस आवडतो कारण  कारण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतो त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती आहे.
मला पाऊस आवडतो कारण त्याच्यात सर्व काही नवीन असतं.
एव्ह्ढं सारं खळखळ्णारं पाणी असतं पण, तुम्ही एकाच पाण्यात दोनदा पाय घालू शकत नाही कारण तुमच्या पायावर येणारं पाणी हे आधीचं पाणी नसतं.
आणि..
मला पाऊस आवडतो कारण इतकं पाणी असूनही त्याच्यामध्ये कोणालाही तृषार्त तळ्मळायला लावण्याची ताकद असते.

मला पाऊस आवडतो पण तो माझा मित्र नाही होऊ शकत कारण पाऊस हे माझ्या मनातल्या खळबळीचे प्रतीक आहे.
एखाद्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्या भांड्याच्या रंग उचलतं, स्थिर आणि चमकदार भासतं पण पावसाच्या धारांचा नेमका रंग आपण नाही सांगू शकत.
चिमुकला जीव असणाया सत्याचे शब्द सुस्पष्ट, नेमके असतात तर कवेत न मावणारं वास्तव अधिकाधिक मूक आणि गूढ असतं.
पावसासारखं आणि-
कधीही न बोललेल्या, मुकाट सोसलेल्या दु:खांसारखं.

ला युव्हिया. पाऊस. संततधार पाऊस.
मी पावसात चालत असते.
बरेच जण पावसात बाहेर पडलेले असतात.
काही जण पावसात चालतात, काहीजण नुसतेच भिजतात.
अशा पाना-फ़ुला-पावसांतून जाता जाता, चालता चालता आपल्या आत एकदाच लक्कन काहीतरी हलतं.
असं चालता चालता आपल्या आतलं काहीतरी एकदाच बदलतं.
आणि एरव्ही बदलण्यास एकदमच नाखूष असलेले आपण अगदी राजीखुषीने स्वत:ला बदलून घेतो.

मीठा है,कोसा है, बारिश का बोसा है..कोवळा, उबदार, सर्वांगाने भिडणारा पाऊस
काळ असा दोन क्षणांच्या मध्ये साकळलेला असतो.
पावसासाठी काहीतरी योजून ठेवावं आणि त्यानेही नेमकं त्याच दिवशी येण्याच्या आणि आपणही योजून ठेवलेलं सर्व काही त्याच दिवशी हातचं काही न राखता करुन टाकण्याच्या.
असं पहिल्यांदा घडतंय असं नाही, बरयाचदा घडतं.
पण तरीही पाऊस येतो तेव्हा मी गेल्या कित्येक जन्मापासून याची वाट पाहिली होती असं वाटायला लागतं.
आणि तो ही प्रत्येक वेळी असा अवचितच, माझ्याकरता आल्यासारखा वाटतो.

मग या एका दिवसाचं मॉर्फ़ीन अनेक दिवस, आठवडे, झालेच तर महिने पुरवून घेते.. पण ते केव्हाना केव्हा संपायचंच.
पण चालायचंच..!