ते.

संध्याकाळच्या कलत्या, कोमट उन्हात बाहेर पडलं की पाय आपसूक समुद्राची वाट धरतात.

गावापासून समुद्राकडे जाणारी एकच डांबरी सडक आहे. पिवळ्या पडत चाललेल्या हिरव्या साडीला काळा काठपदर असावा त्याप्रमाणे बोडक्या, विस्तीर्ण माळरानाच्या उजव्या अंगाने ती सडक जाते.  काही तासांपूर्वी फुफाटत असलेल्या रस्त्यावरच्या त्या लाटांलाटांनी येणारया वाफा एव्हाना रस्त्यात जिरायला लागलेल्या असतात. खूप वेळ वळणावळणाने एकट्याने जाणारया  वाटेला पुढे एका ठिकाणी फुटलेली एक वाट मुरका मारुन उजवीकडे वळते त्या वाटेवर ग्रामदेवता  वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हिरवकंच अंडाकृती तळं आहे. तळ्याच्या बाजूला शिंदीची झाडं आहेत, माडांची, खजुरींची तोबा गर्दी आहे आणि सभोवताली वस‌ईच्या किल्ल्याचे पडके भग्नावशेष आहेत. किल्ल्याच्या पलीकडे असलेल्या समुद्राचं अस्तित्व अलीकडूनच जाणवतंय. दिवसभराचा म्हावरा विकून आलेल्या कोळीणी मुरकत, खुर्दा खुळखुळवत चालल्या आहेत. त्यांच्यापैकी एकीच्या नाकातली मोरणी उन्हात लक्क्कन लखलखते, डोळे दिपतात. पडक्या चर्चचे कळस चमकत आहेत. बुरुजाला लगटून वाढलेल एकच झाड निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसतं आहे. उघड्यावाघड्या पोरांचा वेडाबागडा पकडापकडीचा खेळ सुरु आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने किल्याची पोरसवदा डागडुजी चालवलेली असल्याने पूर्ण किल्ल्याला हडप्पा, मोहेन्जोदडोची कळा आलेली आहे.

या सर्वांकडे पाठ करुन उभं राहायचं.

मंदीरासमोरुन एक काळी करडी वाट घनदाट झाडीतून वळणावळणाने वाट काढत आत जंगलात लपलेल्या किल्ल्यात निघून गेली आहे. त्या वाटेने चालायला लागायचं. वाटेवर शेणाचे पो पडलेले आहेत, घाणेरीचं रान माजलं आहे. रानात कुठेतरी फुटलेल्या शेवरीच्या बोंडातली म्हातारी वारयावारती लहरत आपल्याभोवती भिरभिरते आहे. इकडे तिकडे जिकडे पाहावं तिथे फुलपाखरं आहेत. फुलपाखरं आपल्यातच इतकी मग्न आहेत की ती अंगाला चाटून जातायेत, त्यांच्या पंखांचा हलकासा वर्ख माझ्या अंगाला लागतोय याचं त्यांना भानच नाहीये. त्या काळ्याकरड्या वाटेवरुन तीस एक पा‌ऊलं चाललं की पूर्वी किल्ल्यातील दरबार असावा असे वाटणारी भग्न रचना दिसते. हिरवट छटेच्या काळ्याकरंद शेवाळाने बुजबुजलेली. भिंतीतल्या वडा-पिंपळाच्या मुळांनी मोडकळीस आलेली.

पुरातत्व विभागाची मेहेरनजर होण्या‌आधी या भग्नावषेशांकडे कोणी लक्षच दिलेलं नसल्याने झाडं, वेली वाटेल तशा, वाटेल तिथे. वाटेल तितक्या वाढलेल्या आहेत. इतक्या की त्या वरवर वाढत जाताना त्यांच्या पसारयाला जागा न मिळाल्याने त्या एकमेकांत गुंतून त्यांचं एक न सोडवता येणारं जाळं तयार झालंय. प्रकाशालाही जमिनीवर धडपडतच यावं लागत. भोकं असलेल्या छपरातून पावसाचं पाणी कसं धारेने गळत राहतं तसा प्रकाश इथे झोताझोताने गळत असतो. त्यामुळे इथल्या वातावरणाला एक गूढपणा आलेला आहे. बाहेरच्या प्रकाशाच्या लखलखाटातून इथे आलं की अचानक डे-ना‌ईट गॉगल घातल्यासारखं वाटायला लागतं. इतकी सारी झाडं असल्याने वातावरण कुंद असतं. हवेला विचित्र घनता असते, हवा ‘बसलिये’ असं वाटण्या‌इतपत. या हवेत पा‌ऊल टाकलं की हवा घुसळली जातेय असा विचित्र भास होतो कधीकधी. त्या रचनेला यथामती, यथाशक्ती पूर्वीचं रुप बहाल करण्याच्या पुरातत्व खात्याच्या प्रयत्नांमुळे  तिथल्या अनेक झाडांवर कुहाड पडली, वाचला तो हा एकच. त्या सारया उखीरवाखीर पसारयात ताठ, दिमाखात उभा आहे तो हा ताम्रक वृक्ष ऊर्फ रक्तचंदन.

हे झाड एका भिंतीच्या मधोमध उभं आहे.  पुरातत्व खात्याने त्या झाडाला अभय दे‌ऊन झाडाच्या अलीकडे बांधकाम थांबवून त्याच्या पलीकडून भिंतीला सुरुवात केली आहे. त्यामुळे झाडाचा अर्धा भाग या गूढगहिरया वातावरणात आहे तर अर्धा बाहेरच्या उजळ, प्रकाशित जगात आहे. त्यामुळे या झाडाला बाजूने बघायला गेलं तर ते मा‌ईम कलाकाराच्या मनासारखं वाटतं. अर्ध करडं तर अर्ध उजळ.

रहस्यपटांमध्ये दाखवतात तसं वर्म्स आय व्ह्यू शॉटमधून पाहिलं तर दिसेल असं भव्य, धीरगंभीर दिसणारं हे झाड मी आतापर्यंत पाहिलेल्या झाडांतील सर्वात घुमं झाड आहे .

लाल रंगाचं दणकट, विशाल खोड, गडद पानावळ, गोलगोल पानांची झालर, मांजराची पुष्पाळलेली शेपूट असावी तसे वाटणारे फुलांचे तुरे, त्याला लटकलेल्या हिरव्यागार करंज्या. त्या शेंगांमधून नंतर गुंजाच्या बिया निपजणार असतात. त्या झाडाच्या आजूबाजूच्या प्रकाशाला एक गूढगहिरी, विलक्षण घनता प्राप्त झालेली असते. झाडावरचा प्रकाश उजळ आणि झाडाखालचा प्रकाश सावळासुंदर. मी ज्यावेळी आलेले असते तेव्हा ऊन अद्याप भरात असतं. पानाच्या झालरीतून उन्हाचे गोलगोल आरसे सावल्यांतून लखलख करत असतात. वारयाच्या हेलकाव्यासोबत, हलक्या झुळूकीबरोबर झाडांची पाने होय होय होय, नाय नाय नाय करत डोलत असतात. आणि त्यांच्या या अनुनयासोबत त्या तुरयांचे पिवळे पिवळे रव्यासारखे कण मातीत विखुरत असतात. या झाडाच्या खोडापाशी मला सहज बसता येईल, माझ्याचसाठी बनवला गेलेला असावा असा कोनाडा आहे. उतरत्या उन्हात त्या कोनाड्यात बसून कोणतंही पुस्तक चघळावं. चवीला वेगळं लागतं.

या हिरव्यागार शेंगा किंवा ग्रीन पॉड्स सुकल्या की वाळून तपकिरी होतात. या तपकिरी-काळ्या कुरळ्या शेंगा हातात धरुन वाजवल्या की खडखड वाजतात. या शेंगांमध्ये चकचकीत लाल गुंजाच्या बिया असतात. हा इतका सुंदर लाल रंग आहे की या बियांना इंग्रजीमध्ये म्हणतात तसे कॉरल बीड्स हे विशेषणच साजेसे आहे. या गुंजांचं म्हणे वजन एकसारखंच असतं ग्रॅमचा एक दशांश इतकं. म्हणून पूर्वीच्या काळी त्या सोन्याचांदीचं वजन करण्यासाठी वापरल्या जायच्या. दहा गुंजा सोनं इत्यादी. एकसारख्या वजनाच्या असल्या तरी कोणतीही एक गुंजा दुसरीसारखी नसते. त्या सारख्या आहेशा ‘वाटतात’ पण नसतात.

त्या बियांच्या बरोबर मध्यभागी ‘स्मज’केल्यासारखा एक छोटासा डाग असतो. खारया पाण्याचा थेंब वाळून सुकल्यासारखा. मला फार वाटायचं की मला अतिशय, खूप लालभडक, एकही डाग नसलेली आणि पूर्ण गोल गुंजा मिळावी. मला हवी आहे तशी वाटणारी गुंजाची बी उचलायला जाणार तेवढ्यात त्याहून लालभडक बी चमचमायची मग मी तिच्याकडे खेचले जायचे. मग काही वेळानंतर मला तिच्याहून लालभडक आणि गोलगोल बी मिळायची. हा खेळ कितीतरी काळ सुरु राहायचा आणि मी आपली त्या झाडाभोवती भिरीभिरी फिरत बसलेली असायचे.  कितीतरी काळ मी परिपूर्ण गुंजेच्या शोधात होते.

पण परिपूर्ण असं काही नसतंच. अपूर्ण गोष्टही तिच्यातल्या अपूर्णत्वानेच ह्रदयाचा ठाव घेते. माझ्याकडे जमलेल्या अगणित बियांमधून अखेरीस मला हीच गोष्ट कळत गेली.

आपल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला अशीच आपसूकच, मुद्दाम काहीही करायला न लागता कळत गेली, उमजत गेली तर किती छान हो‌ईल नाही?

या बियांना फ्रेंचमध्ये ’प्वा रूज’ म्हणजेच लाल वाटाणे  म्हणतात. संध्याकाळचे ते उतरते, कलते ऊन, तो शेंगांचा खुळखुळ आवाज आणि ते झाड हलक्याशा वारयाच्या झुळकीबरोबर गुंजाच्या बिया शिंपत असते ती ऐकू ये‌ईल न ये‌ईलशी हलकी टपटप, हे एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की त्यांना एकमेकांपासून बाजूला करताच येत नाही. वाळलेल्या शेंगांचे ते गाणे मनात घर करुन बसले आहे ते कायमचेच.

या झाडाखालची सावली म्हणजे हे झाडच फ़क्त सावली म्हणजे काळं झाड. पण या झाडांचं जग आणि सावल्यांचं जग किती वेगळं असतं. त्यांची शरीरभाषा वेगळी, बोलीभाषा वेगळी. यांच्या थंडगार स्पर्शाने काटाही येतो पण त्यांच्या‌आतला जिव्हाळाही सरसरुन भिडतो. या झाडाच्या सावल्यांची मी अगणित रुपे पाहिलेली आहेत.  या सावल्या कधी जास्त मायाळू असतात तर कधी तिरसट. कधी नाचरया, हलत्या झुलत्या तर कधी भिववणारया. कधी फेर धरुन नाचणारया तर काही थिजून गेलेल्या. कधी पांगलेल्या तर कधी आक्रसलेल्या.

असं म्हणतात की कोणतेही शहर प्रत्येक ऋतूमध्ये पाहावं. तसंच कोणतंही झाड दिवसाच्या प्रत्येक प्रहरी पाहावं.
सकाळी उन्हाचा पूर येत जातो तेव्हा हे झाड तेजःपुंज योग्यासारखं वाटतं. प्रकाश त्या झाडाच्या आजूबाजूला नुस्ता चिवचिवत असतो. अशावेळी फांद्यापानांतून प्रकाश झिरपत असलेले ते झाड मोठे देखणे दिसते. मग उन्हं उंच उंच होत जातात आणि जमिनीशी लंब होता तेव्हा त्याचा रक्तवर्ण अजून रसरशीत झालेला असतो. त्यावेळी तर ते तारुण्याच्या ऐन भरात असलेल्या नौजवानासारखे वाटते.
मध्यान्हीच्या वेळी माथ्यावर ऊन जळत असतं तेव्हा ते झाड मान वर करुन त्या दावाग्नीत हू की चूं न करता निथळत असतं, तो वणवा अंगावर झेलत असतं तेव्हा कर्त्या, निधड्या पुरुषासारखं वाटतं.
संध्याकाळी आपल्याच तालात गिरक्या घेत असलेली फुलपाखरं आपल्या बरोबर चला चला चला! करत त्या उन्हांना घे‌उन जातात आणि उन्हंही बेटी आ‌ईने बोलावणं धाडल्यावर चालायला लागावं तशी निमूट निघून जातात. मुंग्याही तुरुतुरु झाडापासून दूर चाललेल्या असतात. झाडाखालच्या गोगलगायींनी आपल्या पोटात पाय घेतलेले असतात, संध्याछाया झाडावर पसरु लागलेल्या असतात. अशावेळी पानांचा चकचकीत हिरवा रंग श्यामल-सावळा होत अंधारात मिसळून जाताना ते झाड विलक्षण पोक्त वाटतं.

एकच झाड दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांना इतकं वेगळं कसंकाय दिसू शकतं?

या झाडाचीही स्वतःची कहाणी असेलच. रिल्के म्हणतो की झाडं ही प्रेमाचा सर्वात सहनशील आविष्कार असतात. वर्षांच्या हिशोबात म्हणायचे झाले तर माझ्या सुरुवातीच्याही सुरुवातीपासून हे झाड इथे असावे. याने नक्की किती उन्हाळे पावसाळे पाहिले असतील? या झाडाला माझ्यासारख्या अनेकांनी लळा लावला असेल, या झाडाचीही कोणाकोणावर माया असेल, ते कुठे आहेत, कोण असतील? आपल्या आजूबाजूचे वृक्षमित्र धारातीर्थी पडताना पाहून त्याचाही जीव तिळतिळ तुटला नसेल का? झाडाखालच्या मुंग्यांच्या वारुळातील मुंग्यांची ही कितवी पिढी असेल? नीट लक्ष दे‌ऊन ऐकलं तर पानाच्या सळसळीतून झाड त्याची कहाणी सांगत असतं. त्यासाठी खास कान असावा लागतो असे नाही. फक्त झाडाची कहाणी झाड हो‌ऊन ऐकावी लागते, माणूस राहून नाही. प्रत्येक झाडाला चेहरा असतो, या झाडालाही आहे- गहिरे, काळेभोर डोळे असलेल्या समजूतदार मितभाषी माणसाचा. फक्त त्याने थोडं कमी घुमं व्हावं असं फार वाटतं. म्हणून एखादे दिवशी माझ्या स्वप्नांमध्ये हे झाड मोठमोठ्या ढांगा टाकत छान भटकून येतंय असं  दिसतं आणि दुसरया दिवशी जा‌ऊन पाहावं तर त्यांच्या फांद्यांचा पसारा आदल्या दिवशीपेक्षा वेगळा असतो तेव्हा मला विलक्षण आनंद होतो.

मांजराचं एक बुटुकलं पिल्लू आहे. त्याचीही या झाडाशी गट्टी फार. माहित नाही कुठून पण आपल्याच तंद्रीत आजूबाजूला बघत बघत, रमत गमत आपलं कुठल्या कुठे लुटूलुटू निघून येतं. भारी नादिष्ट. ते रोज माझ्याकडे “हे कोण नवीन” म्हणून नव्या कुतूहलाने पाहात असतं. थोडंस आंजारलं गोंजारलं की काल भेटले ती मीच होते अशी ओळख पटते आणि ते हटकून वर बघतं. ते झाडालाही पूर्वीची ओळख विचारते आहे आहे का? माझ्याप्रमाणे झाडही त्याच्याशी जुनी ओळख सांगते आहे का? झाडात आणि माझ्यात असलेले अनेक समान धागे शोधत शोधत या झाडाशी असलेली माझी ओळख अशारितीने अधिकाधिक गहिरी होत जाते.

कधीकधी वारा एकाजागी राम लक्ष्मण सीता खेळल्यासारखा स्तब्ध होतो आणि दिवस अधिकाधिक कोरडा भासायला लागतो. वातावरणात इतकी स्तब्धता असते वीस पावलांवरच्या रस्त्यापलीकडच्या देवळातल्या घंटीचा नाद लाटांची आवर्तने घेत माझ्यापर्यंत ये‌उन पोहोचलेला लख्ख जाणवतो. जीवाची तगमग होत राहते. मग हा वृक्ष वारयाला बोलावणे पाठवतो आणि चवरया ढाळल्यासारखी पाने, फुले माझ्यावर ढाळायला लागतो. आपण एका झाडाशी केलेले हितगूज ते झाड दुसरया झाडाला सांगत असेल का? सगळी कामं आटपून दुपारच्या वेळी ओसरीवर सुखदुःखाच्या गप्पा मारत असताना बाया एकमेकांना सांगतात तसं?  ते हितगूज वारयाच्या झुळुकीवर स्वार हो‌ऊन  दुसरया झाडांपर्यंत पोहोचत असेल का? मी वारयावर ठेवलेले निरोप दूरदेशीच्या प्रियजनांना मिळतील का? मिळालेच तर ते माझ्याकडून आले आहेत हे त्यांना समजेल का?

उन्हं सावकाश, रेंगाळत रेंगाळत सरतात- खूप सारया गोष्टी करायच्या राहिल्यासारखी, बरंच काही बोलायचं राहून गेल्यासारखी. जायचं तर आहे आणि उद्या परत भेटायचंच आहे तरी पाय निघत नसलेल्या मैत्रिणीसारखी. रोज रोज यांना करायचं तरी काय असतं? बोलायचं तरी काय असतं? मला समजून घ्यायचं आहे पण नेहमीच समजतं असं नाही.

मांजराचे ते नादिष्ट पिल्लू. ते या झाडात रोज इतके काय पाहते तेही मला कळत नाही. तसंही- मी काय पाहते हे तरी मला कळतंय असं कुठंय?

या कळण्या-न कळण्याचा शोध घेता घेता झाडाभोवतालच्या माझ्या पावलांखेरिज असलेली पावले, पा‌ऊलखुणा यांतून  मला माहित नसलेल्या कित्येकांचे, कितीकिती गोष्टींचे या झाडाशी असलेल्या ममत्व, मैत्र मला कळत जाते आणि मी मला पडलेल्या खूप सारया प्रश्नांनी मी मुकी हो‌ऊन जाते. पण तेही मला फ़ार भावते. कारण या झाडाबद्दल माझ्या संदर्भात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी मला ते प्रश्नही पुरते समजून घ्यायचे आहेत.

दिवस झोपायला निघाला की मीही घराकडे निघते. महत्प्रयासाने माझे मन झाडावेगळे करुन मी झाडाखालच्या कोनाड्यामधून उठते. मागे वळून पाहते तो दिसते की वाचत बसलेल्या माझा ठसा अजून तिथे, त्या झाडाच्या खाली आहे. आपल्याकडे स्मृती असतात झाडांच्या तर झाडांकडे ठसे असतात आपले. असेच, आपण निघून गेल्यावरही रेंगाळणारे. आपल्याबाहेर निघून आपल्याकडे पाहण्याचा अनुभव कितीशा लोकांना येतो?  ही मी-जी इथे उभी असलेली मी आहे, ती मी आहे. पण, ती-जी अजूनही झाडाखाली बसलेली मी आहे, ती त्या झाडाची मी आहे. पण तिच्यातही माझा अंश आहेच. आपण आपल्यातलं सूक्ष्मसं काहीतरी मागे सोडून आलो आहोत ही जाणीव खूप तीव्र आहे.

पण आपल्या स्मृतींमध्ये चकवे फार असतात. एखाद्या स्मृतीची वाट चालताना त्यांना एक-दोन वाटा फुटतात आणि मग हमखास चुकायला होतं.

त्या हरवण्याची भीती वाटते म्हणून अशा कित्येक संध्यासमयांची पुटं मी माझ्यावर चढवून घेतली आहेत. या जुन्या संध्यांच्या नजरेतूनच मी या नव्या संध्येचं अप्रूप पाहात असते.

मग ते झाड दररोज नव्याने माझ्या स्वप्नांमध्ये सूक्ष्मसे थरथरत राहते.