’खोली’

हिरवट मातकट रंगाची उंचच उंच भिंत.

भिंतीवर हाताने सारवल्याचे अर्धवर्तुळाकार, नियमित ठसे.

त्या अर्धवर्तुळांच्या परिघावरचा पिवळट रंग आतवर हिरवट होत गेलेला.

वरवर चढत जा‌ऊन ती अंधारात मिसळून गेलिये. ती कुठेतरी संपते का?  की संपतच नाही?

विचार भयावह आहे आणि त्या भिंतीचं आव्हान मुजोर-ते येरागबाळ्याचे काम नोहे.

डोळ्यांना या कडेपासून त्या कडेपर्यंत ताणलं तरी भिंतीचा विस्तार डोळ्यांत मावत नाहीये.

डोळ्यांच्या कक्षेत न मावणारया त्या भिंतीत एकच काळंभोर शिसवी जोडदार आहे. शिसवी दारावर मंगलचिन्हे चितारली आहेत.

दोन्ही दारांवर पितळी कड्या आहेत, खुंट्याही पितळीच आहेत.

आणि..

त्या कडीला एक भलंमोठं पितळी कुलूप लटकतं आहे.

दाराला लागून एक मोठी खिडकी आहे.

असं वाटतंय की ते दार त्या खोलीची राखण करतंय आणि ती खोली त्या खिडकीतून सुटायचा प्रयत्न करतेय.


खिडकी आहे की कोनाडा?

खिडकीच असावी कारण कोनाडा अपारदर्शक असतो.


त्या खोलीचा जो भाग दिसतोय तो केवळ त्या खिडकीतून दिसतोय. पण त्याला निश्चित असं स्वरुप नाही.

तो देखावा त्या खोलीतलाच असेल असेही छातीठोकपणे सांगता येत नाहीये.

कारण तेजाळलेल्या त्या खोलीतला देखावा सतत बदलतोय. आतल्या वस्तूंच्या बाह्यरेषा विरघळतायेत, त्यांची मिती बदलतेय.

आत जे काही दिसतंय त्याला निश्चित आकार नाही पण..

आत काहीतरी आहे जे जीवघेणी ओढ लावतंय.

आत जे काही आहे त्याबद्दल वगैरे..इत्यादी..मध्ये त्रोटकच बोलता ये‌ईल पण त्या इत्यादीबद्दल तपशीलवार जाणून घ्यायची ओघ अनिवार आहे.

ती ओढ इतकी तीव्र आहे की त्यामुळे घशात आवंढा येतोय.

त्या भिंतीसमोरच इतकं कःपदार्थ, तुच्छ असल्यासारखं वाटतंय त्यावरुन खोली किती भव्य असावी याचा अंदाज सहज यावा.

पण..

खोलीत जायला हवंच आहे का? तिच्याबद्दल नुसतं ऐकणं पुरेसं नाही का?

हं!

की नकोच जायला?

आत जे नजरेस पडेल ते आपल्याला हवं तेच असेल का? आपण ज्याची जशी कल्पना केली होती तसं ते नसेल तर काय? आपला हिरमोड हो‌ईल का?

हो‌ईलच मुळी.

पण मग जावं की नको?

त्या खोलीत वेगवेगळ्या जगं जगता येणार होती म्हणून खोलीची ओढ होतीच पण,. त्या खोलीच्या भिंतींनी आपल्या आयुष्याचे साक्षीदार ही तहान आताआताचीच की आदिम आहे?

जा‌ऊयात.

नाहीतर नकोच.

जा‌ऊन तर बघुयात.

नकोच.

बरं...एक उपाय आहे

दोन बोटं धरली-चाफेकळी सुटली तर जा‌ऊयात, मधलं बोट सुटलं तर…बघुयात.

अक्कड बक्कड बंबे बो
अस्सी नब्बे पुरे सौ
सौ रुपये का धागा
चोर निकल के भागा

हात्तिच्या! मधलं बोट सुटलं- जायला नको?

हात्त! अक्कड बक्कड काय..जा‌ऊयात.

तर..

त्या शिसवी दारासमोर कोबाल्ट ब्लू रंगात मँगो येलोमध्ये वेलकम लिहीलेली डो‌अर मॅट आहे.

अंअं अंअंअं!

थोडंसं मागे जा‌ऊयात.

तर..

त्या शिसवी दारासमोर राखी लाल रंगाचं पायपुसणं आहे आणि त्या पायपुसण्यावर एक लखलखणारं पितळी घंघाळ आहे.

आणि त्या घंघाळात आहेत चाव्याच चाव्या. शे-दोनशे तरी असतील.

दारावरचं पितळी कुलूप त्या घंघाळातल्या फ़क्त एकाच चावीने उघडतं.

झालं! गळ्यातून गर्ळमगर्ळम..असे चित्रविचित्र आवाज फुटतात..साफ भंबेरी उडते..तंतरते.

पण..असं बघा ना.. पहिल्या फटक्यातच चावी मिळण्याचीही शक्यता आहेच ना?

मग खूप विचार होतो. एक-दोन चाव्या उचलून, मान हलवत पुन्हा घंघाळात ठेवल्या जातात.

चाव्यांवर बोटांचे अगणित ठसे आहेत. हं! खोलीचं औत्सुक्य बरयाच जणांना असणार-त्यात नवल ते काय! दारापाशी येणारी पावलं जेव्ह्ढी आहेत तेव्ह्ढीच जाणारी पावलं दिसतायेत.

पळपुटे साले!

पण आपण त्यातले नाही.

खूप विचाराअंती एक चावी उचलली जाते.

थरथरत्या हाताने पितळी कुलूपावरची आयताकृती पितळी झाकणी बाजूला करुन किल्ली कुलूपात सरकवली जाते.

जीव गोळा होतो,

ह्रदयाचे ठोके किंचीत वाढतात.

चावी फिरते.

खट्ट आवाज होतो

पण..

आवाज अर्ध्यातच अडकतो.

चावी मागे येते-पुन्हा फिरते.

खट्ट-पण अर्धच.

चावी पुन्हा मागे आणि यावेळी त्वेषाने कुलूपात फिरते.

पण तो हतबल करणारा अर्धवट खट्ट आवाज काही बदलत नाही.

चावी पूर्ण बाहेर काढून पुन्हा आत सरकावली जाते पण कुलूप जाम उघडत नाही.

कसं उघडणार?

ते कुलूप त्या चावीने उघडतच नसेल तर  आणि ती चावी त्या कुलूपाची नसेल तर?

घंघाळातून दुसरी चावी उचलली जाते.

फिरते-अर्ध खट्ट-मागे-जोरात फिरते-अर्ध खट्ट-दोनतीनदा त्वेषाने मागेपुढे---

पण त्या अर्ध्या खट्टचा जसाकाही सूर लागलाय

अर्ध्यातच तुटल्यासारखं वाटणारं ते खट्ट आपलं निर्ममपणे सुरुच राहतं.

It's going to take forever man.

Do I have what it takes? The Patience?

हो तर!

खोलीत काय आहे हे पाहायचं तर आहेच.

एव्हढं ऐकलंय आणि आता इथवर आलो आहोतच तर चार-पाच चाव्या आणखी लावून पाहू. हरकत काय आहे?

पण..

चार-पाच-दहा-पंधरा चाव्यांनीही ते कुलूप उघडत नाही.

भरीस भर म्हणजे इतक्या प्रयत्नांनंतर कुलूपाला लावून पाहिलेल्या चाव्या आपण पुन्हा घंघाळातच टाकून दिल्या आहेत अशी उपरती होते आणि आपण किंचीतसे खचतो.पोटात गोळा येतो.

आता कोणती चावी लावून पाहिलीये कोणती नाही हे कळायला काहीच मार्ग नाही.

एक अर्वाच्य शिवी हासडली जाते..घंघाळाला पायाची दाण्णकन ठोकर बसते.

स्वतःचा राग तर येतोच आहे पण त्या खोलीचाही राग यायला लागलाय.

एव्हढं काय आहे त्या खोलीत? घंघाळ काय, चाव्यांचे नखरे काय.

सरळ उघडायला काय जात होतं?

आपण खिडकीतून खोलीत वाकून पाहतो तेव्हा दिसतं की खोलीवर एक काळी छाया पसरली आहे.

पहिली चावी-दुसरी चावी-तिसरी-चौथी-पाचवी चावी
सहावी चावी-सातवी चावी-आठवी-नववी-दहावी चावी

यावेळी मात्र आपण वापरलेल्या चाव्या बाजूला ठेवण्याची खबरदारी घेतलिये.

वीस-पन्नास चाव्या लावून होतात पण कुलूप उघडल्याचा आशादायक आवाज काही कानावर पडत नाही.

आपली अस्वस्थता आणि खोलीबद्दलचा आकस एकदमच खदखदायला लागतात.

खिडकीतून दिसणारया खोलीत अंधारुन आले आहे.

अचानक रडू फुटतं.  दाराची विनवणी केली जाते, कुलूपाची करुणा भाकली जाते. हताश हो‌ऊन दाराला किल्ल्या फेकून मारल्या जातात पण दार आणि कुलूप दोघेही पूर्वीइतकेच ढिम्म.

आता डोक्यातली कलकल वाढत चाललिये.

पण नाही. इतक्यात हार मानायची नाही.

साठावी चावी-शंभरावी चावी-आपण चाव्या लावत चाललो आहोत

पण..

बहुधा त्या खोलीच्या मनात आपल्याला आत ये‌ऊ द्यायचे नसावे.

या विचारासरशी उमेद खचते, खांदे पडतात, कानशीलाजवळ आकसाची एक गच्चगोळा गाठ जाणवायला लागते.

पण आशेला अजून धुगधुगी आहे.

प्रयत्नांती परमेश्वरवर विश्वास आहे.

चार-पाच चाव्या अजून…

पण अ हं!

एव्हाना खिडकीतून दिसणारी खोली काळोखात बुडालिये. खोलीत गच्चमिट्ट काळोख पडलाय. जणू काही खिडकीवर कोणीतरी काळी पाटी ठोकून बसवलेली असावी.

आता त्या काळोखात डोळ्यांना स्थान नाही. किंबहुना कोणालाच स्थान नाही.

काय मिळवलं इतका प्रयत्न करुन?

कशासाठी आलो?

का आलो?

या खोलीच्या नादी लागून काय मिळवलं?

यापुढची चावी लागलीच तरी खोली अंधार पांघरुन बसलिये.

तिथे जा‌ऊन काय साधणार आहोत?

आपल्या मनात लाख असेल खोलीत जायचं पण खोलीच्याही मनात असायला हवं ना?

कुलूप उघडलंच आपण पण खोली आतून बंद असेल तर?

छे! तसा अनुभव कोणाला नाही.

पण पाहा ना-खोली फक्त उघडून आत जायला इतका खटाटोप-पुढे काय वाढून ठेवलं असेल?

हो, खोली पाहायचिये पण जीवाचा इतका आटापिटा करुन नाही.

फारफारतर दोन-तीन चाव्या..

पण या विचारांनी खोली आणि आपल्यातला दुरावा केव्हाचाच वाढलाय.

"कदाचित त्या खोलीत जाणं आपल्या ललाटी लिहीलेलं नसावं.."

इतक्या वेळ केलेल्या हजामतीमुळे हा विचार खूप सोयीचा वाटतोय, योग्य वाटतोय.

या विचारासरशी आपण आहे तिथेच थांबतो.

मोठा निःश्वास सोडतो.

त्या हिरवट मातकट भिंतीकडे पाठ करतो आणि खोलीपासून दूर जा‌ऊ लागतो.

तेव्हा घंघाळात फक्त एकच लखलखती किल्ली शिल्लक असते..आणि

खिडकीतून दिसणारी खोलीही नेहमीसारखीच उजळलेली दिसते.

5 comments:

Pranav Jawale said...

Nice one!

Vidya Bhutkar said...

woowwwwwww very nice :)

Shraddha Bhowad said...

प्रणव (खूप उशिराने तरीही) आणि विद्या,

थॅंक्स!
काहीतरी आहे जे माझ्याइतकं तुम्हालाही भिडलंय. प्रत्येकवेळी सांगता येतंच असं नाही पण ते ’काहीतरी’ माहीत असतं आपल्याला.
त्या माहीत असण्याला-

प्रसाद said...

हे आवडलंय मला.

म्हणजे सगळंच कळलंय असं नाही पण तरीही भिड्लय अशी काहीतरी उंबऱ्यावरची भावना होतीये.

शेवटी प्रत्येक गोष्टीचा अर्थ लागलाच पाहिजे असा हट्ट नाही धरू शकत न आपण ?

शेवट वाचून मला "आशानाम मनुष्याणां " ची आठवण आली

Shraddha Bhowad said...

प्रसाद,
खरंय,
सगळं कळलं पाहिजे असा हट्ट धरु नये.
मी तरी मी जे लिहीते ते मला समजलंच पाहिजे असा हट्ट कुठे बाळगते?
जे लिहीलं जातं ते त्या क्षणापुरता खरं असतं नंतर ते असंबद्ध वाटतं बहुतेक वेळा.

 
Designed by Lena