नैनं छिन्दन्ति..

खबर पोहोचली होती.
ती- एहिमाया आल्याची खबर अज्ञातात कधीच पोहोचली होती.

--

एहिमायेला अज्ञातात यायचे वेध लागायचे तेव्हापासून अज्ञातात वेगळ्याच हालचालींना वेग यायचा. अज्ञातातील प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी पूर्वतयारीत असल्यासारखी दिसायची, आपापल्या भूमिकांची मन लावून उजळणी केल्यासारखी.
तसे म्हणायला तर अज्ञातात कित्येक यायचे-जायचे, परत यायचे-परत जायचे-नाही जायचे, नाहीसे व्हायचे. पण अज्ञाताला त्यांचं सोयरसुतक नव्हतं.  एहिमायेला शह द्यायचा अज्ञाताचा हट्ट तिच्या प्रत्येक प्रवासागणिक अधिकच वाढत जायचा,
काय अज्ञात? कोण एहिमाया?
अज्ञात म्हणजे एक उजाड माळरान होतं. नुस्तंच माळरान. ओकंबोकं, निर्मनुष्य.  ते सुरु कुठून व्हायचं हे नक्की कोणालाच माहित नव्ह्तं, संपतं कुठे हे तर त्याहून माहित नव्हतं. अज्ञाताविषयी माहित असलेली मर्त्य माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. त्यांनी अज्ञाताचं वर्णन करायचं म्हटलं असतं तर प्रत्येकाकडून वेगवेगळं वर्णन ऐकायला मिळालं असतं. असं रंगबदलू, कपटी आणि विखारी. त्याला कुठलीही कुंपणं घातलेली नव्हती की त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देणारा कुठलाही फलक तिथे लावण्यात आला नव्हता.
ते फ़क्त ’होतं’.
अज्ञातात प्रवेश करणारया माणसाला दुसरं काही कळो न कळो, त्याच्या आत सारखं काहीतरी खदखदतं आहे हे जाणवायचं. हे काहीतरी वेगळं आहे हे जाणवून अस्वस्थ वाटायला लागायचं, मानेवर कोणाचा तरी जड श्वासोच्छवास रेंगाळतोय, आपल्या मागावर सतत कोणीतरी आहे असं वाटायचं.
अज्ञात प्रत्येकाच्या मागावर असायचा.
अज्ञाताच्या पिंजरयात कोणी सापडला की अज्ञाताला पुढचे कित्येक महिने बघायला लागायचं नाही. त्या माणसाच्या तडफ़डीवर, ससेहोलपटीवर त्याचं व्यवस्थित भागायचं.
हो, अज्ञात मनुष्यभक्षी होता.
कुठल्याही ठिकाणाहून उभं राहून त्याच्याकडे पाहिलं तरी तो अमर्यादच दिसायचा. दोन्ही हात ताठ पसरुन त्याला कवेत घ्यायचं म्हटलं तरी मावायचं नाही इतका त्याचा विस्तार होता. डोळ्यांच्या टप्प्यांत सामावून घेता यायचं नाही. डोळे चिडचिडायचे. मग त्याला बिचकून आणखी दूर सरायला व्हायचं. सापाच्या खवल्यांसारखी दिसणारी भेगाळलेली जमीन आकाशाकडे आ  वासून पसरली होती.  गर्द तपकिरी कातडीवरच्या लालकाळी गळवं दिसावीत तशी दिसणारी खुरटी खुडुपं अधून मधून उगवलेली दिसत होती. त्यातली बहुतेक सर्व काटेरीच तर काही लालसर विषारी फ़ळं अंगावर बाळगणारी. थोडक्यात असून नसल्यासारखी. समोर लावलेली नजर थोडी उचलली की आकाश डोळ्यात यायचं, खुपायचं. त्या जमिनीवर निकोप सकस काही वाढत नसावंच कारण आकाशाला आव्हान देत सरळ उंचच उंच गेलेलं एकही झाड नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. दूरदूरवर पसरलेली ती वांझ, वैराण जमीन तपकिरी धुळीने बरबटलेली होती आणि त्या तपकिरी धुळीत होते अगणित पावलांचे ठसे.
शेकडो, हजारो..अहं-लाखो ठसे. एकमेकांत गुंतत गेलेले, ठाम रोवलेले, लडखडत गेलेले, काही मध्येच नाहीसे झालेले.
किती आले-किती गेले
किती ’गेले’?
हिशोब कोणी ठेवला नव्ह्ताच. कोण ठेवणार? अज्ञाताच्या बळींची संख्या मोजण्याचा संकेत तिथे नाही. ते शिष्टसंमत मानलं जात नाही. पण ती पावलं त्यांच्या तप्तपदीची मूक कहाणी सांगत त्या माळरानावर कधीची पडून आहेत. यापुढेही राहतील, कितीतरी नवी पावलं त्यांना येऊन मिळतील.
तर असा हा अज्ञात.
सूर्याच्या प्रखर प्रकाशात  झगमग झगमग  झगमगणारा..रणरणणारा. डोळ्याला पाण्याच्या धारा लावणारा, भगभगायला लावणारा, जाळणारा आणि सरतेशेवटी आंधळं करणारा.
तिथे रात्र व्हायची नाही. डोळ्यांपुढे कायम प्रकाश पाहून डोळे शिणून जायचे, काढून ठेवावे वाटायचे.
अज्ञातात एकच टप्पा असा होता जिथून असंख्य वाटा असंख्य गंतव्य स्थानांपर्यंत जाऊन पोहोचत होत्या. कोणती वाट निवडणार यावर मग त्या वाटेने चाललेल्याचं विधिलिखित ठरायचं. अज्ञातातून सुटण्याची एकच संधी त्या वाटांमधल्याच एका वाटेमध्ये होती.
त्या टप्प्यावर-तिथे ती जमिनीवर पडली होती. ग्लानीने तिचा ताबा घेतला होता.
एहिमाया.
एहिमाया भान हरपून पडल्याचे ऐकून अज्ञात खदाखदा हसला होता पण दुसरयाच क्षणी व्यथितही झाला होता.
एहिमाया आणि त्याचा संघर्ष खूप जुना, त्यामुळे दोघानांही एकमेकांची ओळख पार खोलवरुन पटलेली.
अज्ञातात प्रवेश केल्यापासून एहिमायेच्या प्रवासावर असंख्य नजरा असायच्या-अज्ञातासह. तिची वाट चुकल्यावर हळहळायच्या, नेमकी वाट घेतल्यावर चित्कारायच्या. अज्ञाताला शह देणारं जर कोणी आहे तर ती एहिमायाच याची बरयाच गोष्टींना खात्री होती.
एहिमायेला हे माहित होते का?
माहित नाही.
तिला त्याचं सोयरसुतक होतं का?
तेही माहित नाही.
एहिमायेला फ़क्त प्रवास करणं माहित होतं.

एका प्रवासावरुन परतलं की तिला दुसरया प्रवासाचे वेध लागायचे. अज्ञातातल्या या वाटा तिला हाका घालायच्या, तिला यायलाच लागायचं.  कुठल्यातरई प्रकारचं एन्शियण्ट कॉलिंग असावं तसं.
गेले कित्येक महिने ती या वाटांवरुन प्रवास करत होती. त्यांना चाचपून, परखून पाहात होती. पायाला भिंगरी लावून आणि मनाशी काहीतरी योजून तिने काही महिन्यांपूर्वी हा प्रवास पुन्हा एकदा सुरु  केला होता. तेव्हापासून ती अखंड चालत होती.
इतकी वर्षं अज्ञातात प्रवास करुनदेखील आतापर्यंत एकाही वाटेवरुन परत एकदा प्रवास करतोय असं व्हायचं नाही आणि तिला अचंबा वाटायचा. आपण नव्या वाटा घेतो की त्या आपल्याला मिळत जातात? की आपण त्याच जुन्या वाटांना नवीन समजून प्रवास करत राहिलो?
अज्ञातात काहीही घडणं शक्य होतं.

--

पण यावेळी पारडं अज्ञाताच्या बाजूने झुकलेलं होतं-जे याआधी कधीही झालं नव्हतं.
यावेळच्या प्रवासाने तिचा अंत पाहिला होता.
जागृती आणि भान हरपण्याच्या उंबरठयावर हेलकावे खात अखेर ग्लानीने एहिमायेचा झोक गेला तेव्हा आपण ’त्या’ ट्प्प्यावर येऊन पोहोचलो आहोत एव्हढंच तिला कळलं आणि तिची शुद्ध हरपली.
सर्व जण् पाहात होते..झुडुपं, प्रकाश, माती, वाटा, वारा.
गुपचूप. चिडीचुप.
सर्व अज्ञाताचे गु्लाम, त्याची चाकरी करणारे. त्याच्या इशारयांवर नाचणारे.
पण वारयाला राहवलं नाही. एरव्ही त्याने धाडस केलं नसतं पण इथे एहिमायेचा प्रश्न होता.
अज्ञाताच्या हुकुमाविरुद्ध तो निघाला आणि थोड्या काळजीनेच एहिमायेपर्यंत जाऊन पोहोचला.
त्याने तिला हाक घातली पण काहीही प्रतिसाद आला नाही.
यावेळी काही निभत नाही दिसतंय पोरीचं म्हणत त्याने  धडधडत्या काळजाने एहिमायेच्या श्रांतक्लांत चेहरयावर फुंकर घातली.
चेहरयावरची धूळ फ़र्रकन् उडाली आणि जडावलेल्या पापण्या सावकाश उघडल्या.
प्रकाशाची प्रखरता सहन न होऊन मिटल्या. पण निग्रहाने उघडल्यासारख्या पुन्हा उघडल्या.
अपार थकलेले पण काळेभोर, चमकदार डोळे समोरच्या वाटेवर स्थिर झाले.
प्रचंड आनंदाने वारयाच्या तोंडून शीळ सुटली आणि एहिमायेच्या चेहरयावर इवलंसं, थकलेलं हसू फुललं.
ज्या वाटेच्या शोधात ती गेले काही दिवस वणवणत होती ती अखेरीस तिच्यासमोर दृश्यमान झाली होती. कोपरांवर शरीर तोलत ती हलक्या अंगाने उठून बसली आणि पुन्हा पडली. आपल्या शरीरातला उर्जेचा शेवटचा थेंबही या रखरखाटाने शोषून घेतलाय हे तिच्या लक्षात आलं.
पण आता काही मिनीटांचाच प्रश्न होता.

--

तिने डोळ्यावर हात धरुन दूरवर नजर लावली.
सुस्त अजगरासारखा दिसणारा धुळमटलेला हस्तिदंती रस्ता वेटोळे घेत घेत पाsssर नजर पोहोचेल तिथवर गेला होता.
ती या वाटेवर याआधी येऊन गेली होती का? तिने डोळे मिटून कपाळातून डोक्यात झाकून बघितलं पण आतून पक्की ओळख पटेना. तिने एकवार मागे बघितलं, मग पुन्हा वाटेवर नजर लावली. नाही.
त्या  तपकिरी समुद्रात तीच काय ती ह्स्तीदंती वाट होती.
मग मात्र परक्या ठिकाणी वाट भरकटून गरगरा फिरत असताना, सैरभैर झालेलो असताना कोणीतरी ओळखीचं भेटावं तसं सुटल्यासारखं वाटलं.
शरीरात तेव्हापर्यंत कोंडलेली गरम-गच्च हवा फ़स्सदिशी बाहेर आली तसं तिला हल्लख वाटलं, जिथे पोहोचायचं आहे ते समोर दिसत असताना शेवटच्या काही पावलांना लडखडावं तसं.. ताप येऊन गेल्यावर वाटतं तसं. शीण येतो तसं.
शीण..?
शीण ही मोठी अजब भावना खरी. तिच्यासारख्या फ़िरस्ता प्रवाशाला अजिबात न परवडणारी, प्रचंड घातक. बसलात की संपलात. गळून गेलात की संपलात. हार मानलीत की संपलात.
गती कमी-जास्त करा हवं-तर-पण थांबायचं नाही.
मग आपण आपोआपच चालत राहतो. मंद-गतीमान-खुरडत-रांगत-पाय ओढत. थांबायचं तर नसतंच या वाटांवर पण वाटलंच आतून तरी थांबता येत नाही. शरीराला सवय होऊन बसते या प्रवासाची.
आता तिला वाट तर मिळाली पण आता त्या वाटेने तिच्यावरुन आपल्याला जाऊ द्यावं म्हणून तिला काहीतरी देणं द्यायला लागणार होतं. तिलाच नव्हे तर या वाटेने जायचा निर्णय घेणारया प्रत्येकालाच द्यायला लागायचं.
प्रत्येक गोष्टीची किंमत ही असतेच. ती चुकवायला लागायचीच आणि चोख असायला लागायची. ती किंमत भरायला पात्र असल्याचा आव आणता यायचा नाही. कशातही कसलीही भेसळ असायला नको होती. या भावना चोख नसल्या की पांथस्तांचं काय होतं हे तिने आपल्या डोळ्याने पाहिलं होतं. तिच्यासारखाच प्रवासाला निघालेला वाटसरु  होता तो. पण खोटा, खोट्या मनाचा, खोट्या विचारांचा. आपल्या खोटेपणाला कसले कसले मुलामे लावून , तेच घोटलेले संवाद म्हणत तो जगात वावरायचा.एहिमायेला असलं काही समजत नाही, तिला सगळंच चांगलं वाटतं पण वाटेपासून काही लपत नाही. वाट तुमच्या आत आत जाऊन नेमकं काय ते शोधून काढते, खरं काय ते बघून घेते. तिच्या डोळ्यादेखत धूळ धूळ होऊन गेली होती त्याची आणि मग तो हवेत विरुन गेला होता. ती अवाक होऊन पाहत राहिली होती. इथून अंतर्धान पावलेल्या लोकांचं काय होतं हे तिला माहित नव्ह्तं पण तिने कहाण्या भरपूर ऐकल्या होत्या. त्यांना म्हणे नृशंस आगीत जळायला लागतं, थंडीत काकडावं लागतं,  त्यांना सुर्या-सुयांनी टोचून टोचून अर्धमेलं केलं जातं. त्या प्रदेशात फ़ेकून देऊन बाहेरुन कुलूप लावुन घेऊन त्याच्या चाव्या कुठेतरी मगरी-सुसरींनी भरलेल्या खोल तलावात फ़ेकून दिल्या जातात म्हणे.
ती शहारली होती.

--

एहिमायेचा आतापर्यंतचा प्रवास रणरणणारया उन्हातून झाला होता. डोक्यावर लंब पडणारे  ऊन, मस्तकशूळ उठवणारं ऊन, भाजणारा जाळ तो ही प्रत्येक मिनीट,दिवसाचे चोवीस तास. नावाला कुठे सावली नव्हती. खुद्द त्या वाटा सावल्यांच्या  इतक्या तहानलेल्या होत्या की येणारया जाणारया पांथस्थांच्या सावल्या जमिनीत शोषून घेतल्या जायच्या. खुद्द आपल्या सावलीत आसरा घ्यायची सोय नव्ह्ती या वाटांवर. पण एहिमाया?ती आव्हान घेतल्यासारखी चालत राहायची, वाटांवर हसायची, तिच्या सावलीवर त्यांना अवलंबावं लागतंय म्हणून त्यांना वाकुल्या दाखवायची. पण हे सर्व अर्ध्या वाटेपर्यंत. अर्धी वाट संपली तरी वाटेचा तिला शोषून घ्यायचा जोम तसाच राहयचा आणि ती मात्र थकून गळून जायची.प्राण कंठाशी यायचे.
यातून सुटका करुन घ्यायचा मार्ग होता, अज्ञाताकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय होता. तिच्याआधी कित्येकांनी अवलंबला होता. त्यासाठी खूप मोठी किंमत मोजायला लागायची पण या वडवानलापासून सुटका तरी व्हायची.
तुम्हाला तुमचा आत्मा वाटेला विकायला लागायचा.
त्याच्या मोबदल्यात ती वाट त्याला चुकूनही त्रास द्यायची नाही. दिला असता तरी तो झाला नसता, आत आत वर पोहोचला नसता हे त्या अभाग्यांना कळायचंच नाही. ते आपल्या सावल्या आपल्यापाशीच आहेत,. डोक्यावरचा दावानल  आपल्याला उभा जाळत नाहीये या आनंदात चूर असायचे. पण त्यांना आनंद तरी कसा होत असेल? वाटेने त्यांच्यातून आत्मा शोषून घेतला असताना?
कुणास ठाऊक?
पण वाटांवर वाटा पार करुन आता ती वाटेपाशी आली होती, तिला शरण आली होती तेव्हा ती तेव्हापर्यंतच्या प्रवासाने काळपटलेली होती, करपटलेली होती, डागाळली होती.
पण किमान इथे सावलीसाठी तिला आत्मा विकावा लागणार नव्ह्ता.
या जगावर अज्ञाताची सत्ता चालत नव्हती. इथे त्याला बघ्याखेरीज कोणतीही भूमिका नव्हती. ज्याच्याकडचं श्रेयस जसं तशी त्याला ही वाट सापडायची. नाहीच सापडली तर तो वेडा व्हायचा, सततच्या लखलखत्या अज्ञातात त्याला भ्रम होऊ लागायचे आणि मग एके दिवशी तो अज्ञातात कुठेतरी नाहीसा होऊन गेलेला असायचा.

--

तिने एक दीर्घ श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यांच्या प्रवासात, आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात जपून ठेवलेली निरागसता, समर्पणाचं अर्घ्य देऊ केलं केलं तेव्हा वर्षनुवर्षे तहानलेल्या जमिनीवर पाण्याचे थेंब पडावेत तसा सुवास आला, तिच्या पायाखालची माती थरथरली आणि तिच्या आणि त्या अजगरामधला वरवर पातळ वाटणारा पापुद्रा दूर झाला.
वाट खुली झाली होती.
प्रवास संपवण्याच्या आधी तिला आपल्या आत्म्याच्या भोवती लपेटलेली कातडी गुलझार करुन घ्यायची होती. घाव भरुन घ्यायचे होते. शक्य झाल्यास या प्रवासाचे वळ, चट्टे आपल्या शरीरावर कुठेही दिसू नये याची खबरदारी बाळ्गायची होती. तिच्या मनातल्या विचारांचा माग लागल्याप्रमाणे वाट खंतावली, सुस्कारली, वाटेच्या विचारांचं आवर्त तिच्या पायापाशी उठलेल्या चिमुकल्या वावटळीतून एहिमायेच्या पायापाशी भिरभिरलं.
तिने खाली बसून वाटेला थोपटलं होतं. या वाटांच्या मनात तिच्याबद्दल कुठेतरी नाजूक कोपरा होता हे तिला माहित होतं. पण तिला जे करायचं होतं ते करायला तर हवं होतंच, ते कधीच चुकलं नव्हतं, आताही चुकवून चालणार नव्हतं. वाट तिच्या रस्त्यात येणार नव्हती.
अज्ञाताला कितीही वाटलं तरी तिच्या रस्त्यात येता येणार नव्ह्तं.
मागे वळून पाहिलं तसं तिच्या ध्यानात आलं की वाटेने आपला पापुद्रा पुन्हा ओढून घेतलाय.
पापुद्र्याच्या पलीकडून इतर फ़िरस्त्यांना आपल्याला जे दिसतंय तेच आणि तसंच दिसत असेल का? असा प्रश्न तिला नेहमी पडायचा. कोण जाणे! कोणाला विचारणार आणि कोण सांगणार?
तिने वाटेवर नजर लावली तशी या वाटेचं वेगळेपण तिच्या लक्षात येऊ लागलं.
वाटेचा बहुतेक भाग काळ्याशार सावल्यांनी व्यापला होता आणि उरलेल्या भागात अज्ञातातल्या इतर वाटांवर होता तसाच प्रखर प्रकाश होता.पांढरया काठपदराच्या काळ्या लुगड्यासारखी दिसणारी ती वाट वळणं घेत घेत क्षितीजापलीकडे जाऊन संपली होती. सावल्यांचं काळं कितीतरी अधिक काळं होतं एव्हढं मात्र खरं. कागद फ़ाटेपर्यंत पेन्सिलीने गरागरा गिरवत बसलं खूप वेळ, बराच वेळ की दिसतं तसं.
तिच्या होरपळ्लेल्या शरीराला आता सावलीचे वेध लागले होते.
हां! इथे मात्र हवा तितका वेळ थांबायची परवानगी होती. इथे चालत राहायलाच हवं अशी पूर्वअट नव्ह्ती.
काहीक जण इथे थांबून खुद्द एक सावली होऊन गेल्याच्या कथाही तिने ऐकल्या होत्या पण त्यांचं काय चुकलं? होरपळीनंतर इथे थांबून राहण्याची त्यांची इच्छा तिला कळू शकत होती. कारण आता खुद्द तिलाही थांबायचं होतं, कुठेतरी टेकायचं होतं. शरीराची तल्लखी, जिवाची कहिली कमी करायची होती(जर झालीच तर!)
सावलीत शिरली तशी प्रखर प्रकाशाची सवय असलेल्या तिच्या भगभगणारया डोळ्यांना काही दिसेनासं झालं. प्रकाशाची लाल-पिवळी वर्तुळे डोळ्यांसमोर फ़िरत फ़िरत अ़ंतर्धान पावली. आपण आपले डोळे मिटून घेतलेत की ते उघडेच आहेत हे पाहायला तिने डोळ्यांची उघडझाप करुन बघितली. पण नाही, डोळ्यांत बोट घातलं तरी समजणार नाही इतका अंधार होता.
या जगात डोळ्यांना स्थान नव्हतं.
बरंच होतं एका अर्थी ते!
सावलीचा थंडावा डोळ्यांपासून समके़द्री वर्तुळांमध्ये पसरत पूर्ण शरीरात पसरला तशी ती विसावली. झाडापासून साल विलग व्हावी तसा तिच्या शरीराभोवतीचा करपटलेला, काळा पापुद्रा तिच्या शरीरापासून विलग होऊ लागला आणि भोवतालच्या सावल्यांमध्ये जाऊन मिसळला आणि तिच्याभोवतालाच अंधार जरा जास्तच गडद झाला. तिथल्या अंधारात हालचाल व्हायला लागली, अंधार ढवळला जायला लागला. सावल्यांमधली खदखद लख्ख ऐकू येत होती आणि त्यांच्यातून येणारे खराब रेडीयोतून आल्यासारखे वाटणारे आवाज यायला लागले होते.
हा तर तिचाच आवाज होता. वरवर अतिशय ताठ, निग्रही पण आतून तुटलेला, मोडलेला, पिचलेला आणि चिरकलेला. आतआत गाडून टाकलेला. आता या सावल्यांमधून येताना अधिकाधिक हिणकस वाटणारा.
जणू ते आवाज त्या सावल्यांवर टोचून ठेवले गेले होते. बिब्ब्यावर टोचून ठेवलेल्या सुयांसारखे. वर आकाश तर नव्हते पण त्या मिटट काळ्या अंधारातून अक्षरं गळून पडत होती. पत्रांतले मजकूर..ती अक्षरं मध्येच कुठेतरी पेट घेत होती आणि राख राख होऊन खाली पडत होती. त्या अंधारात अग्निफुलांच्या ठिणग्या दिसाव्यात तशी दिसत होती. काही धूसर होत चाललेले चेहरे, काही कालच पाहिल्यासारखे सुस्पष्ट दिसणारे चेहरे नजरेसमोर लहानमोठे होत राहिले, जवळ-लांब जात राहिले. चिरकलेल्या, तारसप्तकातले संवाद थांबून थांबून कानावर आदळायला लागले.
जिव्हारी लागलेले घाव जोराने ठसठसायला लागले, शरीरभर झालेला विखार उमळू लागला.
आणि मग तिची शुद्ध हरपली.

--

हे सर्व कितीतरी काळ सुरु राहिलं.
माहित नाही किती मिनीटे उलटली की तास?
दिवस उलटले की महिने?
वर्षे उलटली की तपे?
सावल्यांच्या वळ्चणीला ती काय माहित किती वेळ बसून होती.
जखमा भरल्या, त्यावर खपल्या धरल्या, वळ-व्रण नाहीसे झाले, करपटलेली कातडी मऊसूत झाली.
काही काळापूर्वी मेंदूत कालच पाहिल्यासारखे सुस्पष्ट दिसणारे चेहरे धूसर दिसायला लागले.
सावल्यांनाही तिची सवय झाली.
पण तिला सावल्यांची सवय झाली का?
इतका सारा वेळ टिकटिकणारया काळाची आणि चार हात अंतरावर सुरु होणारया त्या प्रकाशमान पट्ट्याची जाणीव अधिकच धारदार होत गेली होती. सावलीच्या थंडाव्यात तिला विलक्षण काकडल्यासारखं व्हायला लागलं. कसलाही त्रास नव्हता तिथे पण कसलाही त्रास नसल्याचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. सावल्यांनी तिला आपलंसं करुन घ्यायचा, त्या जगाची आश्वस्तता पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न चालवला होता. पण ती आपली दर सरते क्षणी पलीकडच्या चंदेरी पट्ट्याकडे याआधी कधीही न पाहिल्यासारखं पाहात राहायची. सावलीच्या काळ्यातून तो दिसायचाही विलक्षण लोभस.
या काळ्या शाईसारख्या अंधाराचा तिला उबग आला.
एके दिवशी मात्र ती उठली आणि त्या प्रकाशमान पट्ट्याच्या दिशेने चालू लागली.
सावल्यांनी तिला आण घातली, तिचे गतायुष्य़ तिच्या डोळ्यासमोर सरकवून तिला भिववण्याचा प्रयत्न केला पण एहिमाया कशानेच बधली नाही. तिने ते सारं कधीच सावल्यांना अर्पण केलं होतं, ती ते कधीच मागे सोडून आली होती. सावल्यांना ते तिच्याविरुद्ध वापरता आलं नाही.
शेवटी हार मानून सावल्या मागे सरल्या.
लाट ओसरवी तशा मागे मागे जात राहिल्या.
एहिमाया प्रकाशापर्यंत पोहोचली आणि तिने त्या पट्ट्यात पाऊल टाकलं.
ते ऊन तिच्या गात्रांगात्रांमधून पसरु लागलं तशी शरीरभर शब्दांत वर्णन करुन सांगता येणार नाही अशी ऊब पसरली. शांतवलेल्या कातडीआड लपलेले चट्टे आक्रोशू लागले तशी तिला असह्य सुख झालं.भगभगणारया जमिनीवर पाण्याचा शिडकावा मारल्यावर जमिन शांतवते तसा तिचा जीव शांत झाला. सावल्यांमध्ये राहताना काहीतरी खुपत होतं, टुपत होतं हे नाहीसं झालं.  डोळे आभाळाकडे करुन त्या दावाग्नीत ती तशीच निथळत उभी राहिली आणि आपल्याला नेमकं काय सलत होतं हे तिला कळलं.
तिच्या डोळ्यातून एकच थेंब ओघळला आणि थप्प करुन वाटेवर पडला. निर्वाणीचा अश्रू, समजूत पटल्याचा अश्रू.
वाट सुस्कारली, तिच्याबद्द्लच्या कणवेने वाटेचं मन भरुन आलं.
हिने आपल्यापाशी कधीच परतू नये असं वाटेला वाटायचं, आधीच्या आगीत तिने जळून, होरपळून राख व्हावं, अज्ञातने तिचा घास घेऊन टाकावा एकदाचा- जेणेकरुन एहिमायेचा झगडा संपेल, तिला होणारा असह्य त्रास वाचेल, तिची ससेहोलपट वाचेल. पण एहिमाया नेटाने येत राहिली, प्रवास करत राहिली, होरपळून घेत राहिली, शांतवून घेत राहिली, पुन्हा प्रवासाला चालू पडू लागली. इतक्या सहजी हार मानणारा तो जीवच नव्हता.

वाट आहे तशी फ़क्त एहिमायेलाच दिसायची. हे तिला माहित नव्ह्तं,  माहित असायचं कारण नव्ह्तं. एहिमायेखेरिज फ़ार थोडे असे होतेजे  धडपणी बाहेर गेले होते. इथून बाहेर पडण्याची एकच वाट होती ती म्हणजे त्या  वडवानलाची, अज्ञाताची. जेवढ्या लवकर तुम्ही या सत्याचा स्वीकार करताय तेवढ्या लवकर तुम्हाला त्या वाटेवरुन बाहेर येता यायचं. दुसरी वाट होती पण ती तुम्हाला चकवायची, अज्ञात आता तुमच्या आयुष्याचा भाग कधीच नसणार आहे असा भ्रम होईपर्यंत फ़िरवत ठेवायची. त्या भ्रमातून बाहेर येईपर्यंत परतीचे रस्ते बंद झालेले असायचे. असे अनेक जण तिथे  सावल्या बनून आक्रोशत साचून गेले होते.  "आम्ही चुकलो, आम्हाला परत जाऊ द्यात!" म्हणून त्यांचा विलाप चालला होता. पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आणि  वेळ कोणालाही चुकलेली नव्हती. त्या सावल्यांच्या अंधाराने ती वाट म्हणजे अधिकाधिक काळेकुट्ट होत चाललेले गचपण होत चालली होती. ती काळीकभिन्न वाट फिरस्त्यांना चकवायचा प्रयत्न करत होती, आपल्या कवेत आढून घ्यायचा प्रयत्न करत होती-तो प्रयत्न एहिमायेवरही पुन्हा पुन्हा केला गेला होता पण एहिमाया तिथे कधीही जाणार नव्हती याची वाटेला खात्री होती. गेले कित्येक प्रवास तिने असेच याच वाटेने अशाचप्रकारे प्रवास करुन संपवले होते. कारण ती वाट म्हणजे मायेच्या विधीलिखितातला एक पूर्वरचित ट्प्पा होता. वाटेलाही मुक्तता मिळायची होती आणि ती ही याच एहिमायेच्या हातून. पण त्याला वेळ होता.
एहिमाया पुन्हा तिथे येणार होती...आणखी एकदा..आणखी एकदा..
तोपर्यंत तरी वाटेला तसंच पडून राहायचं होतं.
एहिमायेने वाटेचा निरोप घेतला तेव्हा ती नव्या उमेदीने बाहेरच्या डोळे दिपवणारया वडवानलाला सामोरी जायला तयार झाली होती. 

तेच तिचं विधीलिखित होतं, भागधेय होतं, जगण्याचा उद्देश होता. त्यापासून तिला पळून जाता आलं नसतं. कधीच आलं नसतं.
त्या तेज:पुंज प्रकाशात तिला पाठमोरी चालत जाताना पाहताना वाटेने पापुद्रा ओढून घेतला.
वाट बंद झाली होती.
आणि एहिमायेच्या डोक्यातल्या या वाटेवरच्या आठवणी धूसर होऊन गेल्या होत्या. कोणीतरी फ़ळा पुसून लख्ख करावा पण आधी गिजबिजून ठेवलेल्या अक्षरांचे पुसट अवशेष दिसत रहावे अगदी तसेच. आपण ही वाट या अगोदर घेतली होती हे ही तिला कदाचित आठवलं नसतं.
तिने सहज मागे वळून पाहिलं तर तिथे फ़क्त उजाड माळरान दिसत होतं.
आता ती पुन्हा अज्ञातात आली होती.
ती हसली.
अज्ञात हसला.
झुडुपं, प्रकाश, माती, वाटा, वारा सगळे हसले.
एहिमायेचा प्रवास पुन्हा एकदा चालू झाला होता.