न पोहोचणा.. . .!

'प्रिय’,

मी माझं काहीतरी कुठेतरी ठेवलं होतं आणि आता ते हरवलंय. पण मला ते काहीतरीही आठवत नाही आणि कुठे हे तर त्याहून आठवत नाही.
पूर्वी असं कधीच व्हायचं नाही.
पूर्वी कधीच होत नसलेल्या गोष्टी व्हायला लागल्या की काय होतंय असं समजायचं?

--

मला हल्लीच एक मोठा साक्षात्कार झालाय.
म्हणजे मला कळलंय की आपल्या आयुष्याची नासाडी करून घेणं तितकंसं कठीण नसतं. फक्त ज्या व्यक्तीमुळे किंवा गोष्टीमुळे आपली नासाडी करून घ्यायची आहे त्याच्या/तिच्याजवळ जाणं किंवा त्याने/तिने आपल्याजवळ येणं यातलं पहिले काय घडतं याची वाट पाहात राहायची फक्त. बाकी आपण आपली नासधूस करून घेण्याकरिता नेहमीच तयार आणि तत्पर असतो. कोणत्याही क्षणी लप्पकन खाली पडायच्या बेतात असलेल्या पूर्ण पिकलेल्या फळासारखे.

--

मला इथे नाही ते बरंच काही हवंय पण त्यासाठी कुठे जावं ते कळत नाहीये.
अगदीच छाती फोडून बाहेर ये‌ईल इतका आनंद नकोय काही मला, पण ही सततची अस्वस्थता, ठुसठुस कमी झाली तर हवीये.
कधीकधी फोन खणखणतो नं तेव्हा ही ठुसठुस काही क्षण कमी करेल असं कोणीतरी असावं असं फार वाटतं.
तुला फोन न करता येणं किती गैरसोयीचं आहे हे तुला कळतंय का?

--

मला काय खुपतंय हे मला अधिक नेमकेपणाने सांगता आलं असतं तर खूप छान झालं असतं. मला पोहून सर्दी झाली की डॉक्टर मला ऑक्ट्रीव्हिनचा प्रे देतात आणि सर्दी संध्याकाळपर्यंत बरी देखील हो‌ऊन जाते. मला काय होतंय हे असं नेमकेपणाने काही सांगता आलं असतं तर मी त्यावर नेमका काहीतरी उतारा शोधला असता. पण काय होतंय हेच नेमकं ठा‌ऊक नाही त्यामुळे अंदाजपंचे दाहोदर्से करत निरनिराळे उपाय करून पाहिले जातात जे कधीकधी परस्परांना मारक देखील असतात. तुला माहितीये ना, हिथ लीजर असाच मेला. २२ जानेवारीलाच पण २००८च्या.  डीप्रेशन, डोकेदुखी, निद्रानाश, सर्दीसाठी वेगवेगळ्या गोळ्या घेतल्या आणि त्याचा एकत्रित परीणाम काहीतरी विपरीतच झाला. एकदम लीथल डोस. ठारच झाला एकदम. डोक्यातल्या परस्परविरोधी  विचारांची डोक्यातल्या डोक्यात जुगलबंदी हो‌ऊनच मी मरणार बहुधा.

--

आपली प्रेमं, मी करते ती, माझ्यावर निरातिशय प्रेम करणाऱया लोकांची प्रेमं ही अशीच का असतात? एकमेकांना नीटसा स्पर्शही न करता, एकमेकांचा अंदाज घेत, एकमेकांचे छोटे छोटे फोटो पाहात प्रेम जपणारी, प्रत्येक संदर्भात दुसऱयाला शोधणारी - पण खुलून नीटसं कधीच दुसऱयाला काहीच न सांगणारी?
किती त्रास होतो या गोष्टीचा .. पण त्याचवेळी बरंही वाटतं.
हे असलं प्रेम तापासारखं चढत जातं, असा ताप ज्यातून तुम्ही कधीच खऱया अर्थाने सावरत नाही.
पण आय टेल यू, मला किमान एकदातरी वखवखणारं, हावरं प्रेम करून पाहायचं आहे.

--

एकटं असण्यापेक्षा खूप भयंकर गोष्टी असतात. आपल्याला माहित नसतं त्या कोणत्या ते. आणि त्या कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि उशीर झालेला असणं यापेक्षा भयंकर गोष्ट दुसरी कोणती असू शकते?
आपण रस्त्यावरून एकटे चाललेलो असतो आणि आपल्या बाजूने लोकं जोडीने, घोळक्याने चाललेले असतात. आणि आपण आपल्याबरोबर कोणी असतं तर कसं याचा विचार करून कायम रडायच्या बेतात असतो. तेव्हा आपण इतके भावूक इत्यादी का आहोत याची खरंच लाज वाटते.
कधीकधी रात्री दचकून जाग येते तेव्हा लक्षात येतं की आपण घामाने पूर्ण निथळतो आहोत आ़णि समोर पाहावं तर आपण विसरलो, विसरलो असं ज्यांच्याबद्दल छातीठोकपणे सांगत असतो तीच माणसं आपल्यासमोर दत्त म्हणून उभी असतात. मग मला झोप लागत नाही. घड्याळाच्या संथ फिरणाऱया काट्यांमधून माझ्या जगातलं गच्च भरलेलं एकटेपण अधिक गडद होत जातं.
पण मग दुसऱया सकाळी सकाळ होते आणि मी अजूनही जिवंत असते.
मी रोज सकाळी उठते आणि मला वाटतं की नाही, आजचा दिवस काही धकत नाही आपल्याच्याने. पण त्याचंही नंतर हसू येतं, मला त्या‌आधीही असं किती वेळा वाटलं होतं हे आठवून.

--

सॉलिट्यूड आणि एकटेपणा यांत फरक आहे हे कळायला वयाची अठ्ठावीस वर्षे का जावी लागतात? एखादी पॉलिसी म्यॅच्यु‌अर झाल्यावर एकदाच काय ते घबाड हाती लागावं तशी ही उपरती मला आता‌आताच झाली. नाही म्हणायला मी वॉल्डेन वाचलंय; त्यामुळे, सॉलिट्यूड बाय चॉ‌ईस असतो हे मला ठा‌ऊक आहे, नाही असं नाही. सॉलिट्यूड बाय चॉ‌ईस असतो आणि एकटेपणा लादला गेलेला असतो. आपल्या कर्माने, इतरांच्या कर्माने. आय लव्ह सॉलिट्यूड आणि अधूनमधून एकटेपणाही बरा वाटतो पण तो ठिक आहे असं मला आजतागायत कधीही वाटलेलं नाही अजूनही वाटत नाही. मला माणसं आवडतात, मला माणसं हवी आहेत. मला तू हवा आहेस, इतरही लोक हवे आहेत.

--

संध्याकाळचे सहा वाजलेत. नेहमीच संध्याकाळचे सहा वाजलेले असतात.
मी हल्ली दिवसा लिहीत नाही. ते मॉलमध्ये कपडे उतरवून नागव्याने फिरल्यासारखं वाटतं. जो तो, प्रत्येकजण  तुमच्याकडे पाहात असतो, फिदीफिदी हसत असतो. तसंच वाटतं दिवसा लिहीताना.

--

माझ्या प्रत्येक ऍगनीला लोकं "जा‌ऊ दे गं" म्हणून मोडीत काढतात.
प्रत्येक गोष्ट या ना त्या प्रकारे सोडून देणे, विसरून जाणे, जा‌ऊ देणे इतकंच का असतं सर्व शेवटी? प्रत्येक गोष्ट जा‌ऊ द्यायची म्हणून हातात धरायची असते का? कागदावर लिहा किंवा गच्चीवरून उडी मारा एव्हढंच का असतं हे?
मी हे तुला का विचारतेय हे तुझ्या लक्षात येतंय नं? माझ्याकडे तुझ्याइतका अनुभवसंपन्न मनुष्य नाही.

--

पण मग रात्र होते. पांघरूण डोक्यावरून ओढून घेतलं की मला काहीच सतावत नाही. ना लोकं, ना ते, ना तू, ना मी- काहीच नाही.
म्हणून मी हल्ली खूप झोपते.
माझ्या डोळ्याखालची डार्क सर्कल्स कमी व्हायला लागली आहेत.
मला हल्लीच एक मोठा प्रश्न पडला. सर्व राक्षसांना डार्क सर्कल्स का असतात?
पण मला हल्लीच्याही आधीपासून बरेच प्रश्न पडलेले आहेत.
मेल्यावर प्रश्न पडायचे बंद होतात का? न कळे.

--
श्र.

एप्रिलमधील सुंदर सकाळी 100 टक्के पर्फेक्ट मुलीला पाहिल्यावर.

एप्रिल महिन्यातील एका सुंदर सकाळी टोकियोतील फॅशनेबल हाराजुकु भागातल्या रस्त्यावरुन जात असताना माझ्या बाजूने 100 टक्के पर्फेक्ट मुलगी गेली.

खरं सांगायच झालं तर ती दिसायला एव्हढी चांगली नव्हती, चार जणीमध्ये उठून दिसेल इतकीही बरी नव्हती.तिचे कपडे खास होते अशातलाही भाग नव्हता.  तिचे केस झोपेतून उठल्यावर दिसतात तसे विस्कटल्यासारखे दिसत होते. तरुणही नव्हती- बहुतेक तिशीतली असावी, त्यामुळे तिला मुलगीही म्हणता येणार नाही. पण तरीही, मला 50 यार्डांच्या अंतरावरुन कळले की ती माझ्यासाठी 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहे. ज्या क्षणी मी तिला पाहिलं त्या क्षणी माझ्या छातीत बाकबुक व्हायला लागलं, माझ्या तोंडाला कोरड प़डली.

तुम्हालाही एखादी मुलगी आवडत असेल-सडपातळ पायांची, मोठ्या डोळ्यांची किंवा नाजूक बोटांची. प्रत्येक घास चवीचवीने खाणा-या मुलीकडे तुम्ही तुमच्या नकळत ओढले गेला पाहात असंही कधीकधी होत असेल. तशाच माझ्या काही आवडी-निवडी आहेत. कित्येकदा माझ्या लक्षात येतं की मी रेस्टॉरंटमध्ये माझ्या समोर बसलेल्या मुलीकडे टक लावून पाहतोय कारण, मला तिचं नाक भयंकर आवडलंय.

पण या 100 टक्के पर्फेक्ट मुलीमध्ये मला मागे आवडलेल्या मुलींमधील एखादी खुबी होती असं नव्हतं. मला मागे भलेही एखाद्या मुलीचे नाक आवडलं असेल पण, या मुलीचे नाक मला आठवत नाही, तिला ते होते तरी का- हे ही नाही; पण, ती फ़ार काही सुंदर नव्हती एव्हढं मात्र लख्ख आठवतंय. विचित्रच आहे!

"काल माझ्या बाजूने 100 टक्के पर्फेक्ट मुलगी गेली" मी कोणालातरी सांगतो

"असं? " तो म्हणतो, " सुंदर होती? "

"नाही, एव्हढी नाही."

"मग तुला जशा मुली आवडतात तशातली होती का?"

"मला माहित नाही. मला तिच्याबद्दल काहीही आठवत नाहीये- ना तिचे डोळे, ना तिची छाती"

"विचित्रच आहे"

खरंय! विचित्रच आहे!

"तर मग.." तो इतक्यातच कंटाळलाय "तू काय केलस? बोललास का तिच्याशी? ती कुठे गेली हे पाहिलंस का? "

"यापैकी काही केलं नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या बाजूने गेलो. "

ती माझ्या विरुद्ध दिशेने येत होती आणि मी तिच्या विरुद्ध दिशेला चाललो होतो आणि ती एप्रिल महिन्यातील खरोखरंच सुरेख सकाळ होती.

मला तिच्याशी बोलता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. अर्धा तास पुष्कळ झाला असताः तिच्याबद्दल विचारण्यासाठी, माझ्याबद्दल सांगण्यासाठी. आणि मी खरं सांगू का मला काय करायला आवडलं असतं? - मला तिला, 1981 सालातल्या एप्रिल महिन्यातल्या एका सुंदर सकाळी हाराजुकुच्या आडबाजूच्या रस्त्यावर एकमेकांच्या बाजूने जाण्यातल्या विधीलिखितातील गुंतागुंत  समजा‌वून सांगायला आवडली असती. असं झालं असतं तर काय या भावनेतच काहीतरी उबदार, लोभस नक्की होतं - जगात शांतता नांदत असताना बनवलेल्या घड्याळ्याच्या टिकटिकीसारखं!

बोलून झाल्यावर आम्ही कुठेतरी जेवण घेतलं असतं, कदाचित वूडी ऍलनचा एखादा सिनेमा पाहिला असता, कुठल्यातरी हॉटेलच्या बारमध्ये कॉकटेल्स घेतली असती आणि माझे नशीब जोरावर असतं तर आम्ही रात्रही एकत्र घालवली असती.

माझ्या डोक्यात अनेक शक्यता तयार होतात.

आमच्यामधले अंतर कमी कमी होत चाललंय, 15 यार्डस..

मी काय बोलू? तिला कसं थांबवू?

"शुभ प्रभात मॅडम.  मला तुमच्या वेळातला अर्धा तास गप्पा मारण्याकरिता दे‌ऊ शकाल का? "

छे. हे इन्श्युरन्सवाल्यांसारखं वाटतंय.

"एक्स्क्यूझ मी,  इथे आसपास कुठे रात्रभर सुरु असणारे क्लीनर्स आहेत का? "

नाही नाही, हे तर जास्तच बाष्कळ वाटतंय. पहिली गोष्ट, माझ्या हातात धुवायचे कपडे देखील नाहीत आणि मला नाही वाटत कोणी अशा संवादाला गंभीरपणे घे‌ईल.

कदाचित खरं खरं काय ते सांगून टाकलेलंच जास्त चांगलं. "हेलो. तू माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहेस"

नाही. तिचा विश्वास नाही बसणार. आणि बसलाच, तरी तिला माझ्याशी बोलावंसं वाटेल हे कशावरुन? ती म्हणू शकते "सॉरी, मी तुझ्यासाठी 00 टक्के पर्फेक्ट मुलगी असले तरी तू माझ्यासाठी 100 टक्के पर्फेक्ट मुलगा नाहीस." का नाही? हो‌ऊ शकतं. पण, असं झालंच तर ते मला सहन होणार नाही. मला नाही वाटत मी त्या धक्क्यातून कधी सावरु शकेन. मी बत्तीस वर्षाचा आहे, मोठं होत जाताना काहीकाही गोष्टी उगाचच हळव्या हो‌ऊन जातात ना त्या अशा.

एका फुलवाल्याच्या दुकानासमोरुन ती माझ्या बाजूने निघून जाते. उबदार हवेचा एक छोटासा झोत मला स्पर्शून जातो. मला तिच्याशी बोलायचं आहे पण, मनाची तयारी होत नाहीये. तिने पांढरा स्वेटर घातलाय आणि तिच्या उजव्या हातात पांढरंशुभ्र पाकीट आहे. त्यावर फक्त स्टँप लागायचा बाकी आहे. हं, तिने कोणालातरी पत्र लिहीलंय. तिचे जागरणाने झोपाळलेले डोळेच सांगतायेत की ती पूर्ण रात्रभर पत्रच लिहीत असली पाहिजे. त्या पाकीटात पोटात तिची अनेक रहस्ये दडलेली असतील.

मी थोडा पुढे जा‌ऊन वळून पाहतोः ती गर्दीत नाहिशी झाली आहे.

अर्थातच, आता मला पक्कं ठा‌ऊक आहे की मी तिला काय सांगायला हव होतं. कदाचित ते खूप मोठं भाषण वाटू शकलं असतं. ते इतक मोठं होतं की ते मी तिला व्यवस्थित सांगू शकलो असतो की नाही याची मला शंकाच वाटते. माझ्या कल्पना या‌आधी पण मुळीच प्रॅक्टिकल नव्हत्या , मग आता का असाव्यात?

तर. ते भाषण  "कोणे एके काळी.. " ने सुरु झालं असतं आणि "वा‌ईट झालं नाही का? " ने संपलं असतं.

कोणे एके काळी एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा अठरा वर्षाचा होता आणि मुलगी सोळा वर्षाची. तो काही फार देखणा नव्हता आणि तीही फार सुंदर नव्हती. तो एक सर्वसामान्य एकटा मुलगा होता आणि ती एक सर्वसामान्य एकटी मुलगी होती. या जगाता त्यांच्याकरता 100 टक्के मुलगा आणि 100 टक्के मुलगी अस्तित्वात आहेत यांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हो, त्यांचा चमत्कारांवर विश्वास होता आणि  एके दिवशी खरंच तो चमत्कार घडला.

एके दिवशी एका रस्त्याच्या कडेला दोघे एकमेकांच्या समोर आले.

"काय कमाल आहे!." तो म्हणाला, "मी पूर्ण आयुष्य तुझा शोध घेतो आहे. तुझा विश्वास नाही बसणार कदाचित, पण तू माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहेस."

"आणि तू" ती म्हणाली, "माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगा आहेस. मी कल्पनेत तुझे चित्र रंगवलं होतं अगदी तसाच. मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय."

ते एका बागेतल्या बाकड्यावर बसले आणि एकमेकांचे हात हातात घे‌ऊन त्यांनी तासनतास गप्पा मारल्या, एकमेकांना स्वतःबद्दल सांगीतलं. ते काही आता एकटे राहिले नव्हते, त्यांना त्यांचा 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार मिळाला होता किंवा त्याच्या 100 टक्के पर्फेक्ट जोडीदाराने त्यांना शोधून काढलं होतं. कोणाला 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार मिळणं आणि कोणाला त्यांच्या 100 टक्के पर्फेक्ट जोडीदाराने शोधून काढणं किती सुंदर गोष्ट आहे, नाही का? असं घडणं म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. निव्वळ चमत्कार!

ते एकत्र बसले, बोलत होते, पण त्यांच्या मनात कुठंतरी एका सूक्ष्म शंकेने जन्म घेतलाः कोणाचंही स्वप्न इतक्या सहजपणे पूर्ण होणं बरोबर आहे का?

त्यामुळे, जेव्हा त्यांच्या अव्याहत चालू असलेल्या संभाषणात ‘आता काय बोलावं बरं?’ची घुटमळ आली तेव्हा मुलगा मुलीला म्हणाला, "आपण एकमेकांची परीक्षा घे‌ऊयात का? फक्त एकदाच! जर आपण खरोखरीच एकमेकांचे पर्फेक्ट जोडीदार आहोत तर कुठेतरी, केव्हातरी, आपली पुन्हा भेट हो‌ईलच-नक्कीच. आणि जर तसं घडलं तर आपली खात्री पटेल की आपण एकमेकांचे 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार आहोत. मग आपण तिथेच, त्याक्षणी लग्न करुन टाकू. काय म्हणतेस? "

"बरोबर आहे तुझं. " ती म्हणाली, "आपण असंच केलं पाहिजे."

आणि ते एकमेकांपासून दूर झाले. ती त्याच्या विरुद्ध दिशेने निघून  गेली आणि तो तिच्या विरुद्ध दिशेने निघून गेला.

त्यांनी एकमेकांची जी परीक्षा घ्यायची ठरवली होती तिची खरंतर काही‌एक गरज नव्हती. त्यांनी तसं करायलाच नको हवं होतं, कारण, ते खरोखरीच एकमेकांचे 100 टक्के पर्फेक्ट जोडीदार होते यात काही वादच नव्हता. ते त्या एका वेळीच एकमेकांना भेटू शकले हाच खरंतर एक मोठा चमत्कार होता. पण ते तरुण, वेडे जीव होते. त्यामुळे, नियती त्यांचा रंगात आलेला डाव निर्दयीपणे उधळून लावणार आहे हे त्यांना कळणं शक्यंच नव्हतं.
त्यानंतर, एका हिवाळ्यात आलेल्या एन्फ्लू‌एन्झाच्या साथीत तो मुलगा आणि मुलगी दोघेही आजारी पडले. जीवन-मरणाच्या पारड्यात हेलकावे खात असताना त्यांची स्मृती गेली. ते आजारातून उठले तेव्हा त्यांचा मेंदू डी. एच. लॉरेन्सच्या पिगिबँकसारखा रिकामा झाला होता.

पण ती दोघंही अतिशय हुशार आणि चिवट होती. त्यांच्या अविरत प्रयत्नांतून आवश्यक ते सर्व ज्ञान आणि रितीरिवाज आत्मसात केले, समाजाचा एक सुदृढ घटक म्हणून मान्यता मिळवली. एका सबवे ला‌ईनकडून दुस-या सबवे ला‌ईनकडे कसे जावे, स्पेशल डिलीव्हरी पत्र कसे पाठवावे हे त्यांना जमू लागले. ते हुशार नागरीक म्हणवले जाऊ लागले. आणि त्या दोघांनीही प्रेम पुन्हा अनुभवलं. कधीकधी 75 टक्के तर कधी 85 टक्केसुद्धा.

बराच काळ उलटला. लवकरच मुलगा 32 वर्षाचा झाला आणि मुलगी 30 वर्षांची.

एप्रिल महिन्यातील एका सुंदर सकाळी सकाळची कॉफी घेण्याकरता मुलगा पश्चिमेकडून पूर्वेकडे चालला होता आणि एक स्पेशल डिलीव्हरी पत्र पाठवण्याकरता मुलगी पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली होती. ती दोघंही टोकीयोतील हाराजुकू भागातील एका चिंचोळ्या रस्त्यावरुन चालले होते. रस्त्याच्या बरोबर मध्यभागावर ते एकमेकांच्या बाजूने निघून गेले. गतस्मृतींची एक बारीकशी तिरीप त्यांच्या डोळ्यात लकाकली. दोघांनाही आपल्या छातीत हे काय होतंय असं वाटलं. आणि त्या दोघांनाही कळून चुकलं

ती माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगी आहे!

तो माझ्याकरता 100 टक्के पर्फेक्ट मुलगा आहे!

पण त्या गतस्मृती खूपच अंधुक होत्या आणि त्यातून 14 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे एकही शब्द न बोलता ते एकमेकांच्या बाजूने निघून गेले आणि गर्दीत हरवून गेले. कायमचे.

वा‌ईट झालं नं? तुला काय वाटतं?

हो. हेच . अगदई हेच मी त्या मुलीला सांगायला हवं होतं.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट

एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?

कोणाला सुखांत आवडतो तर कोणाला शोकांतिका आवडतात. काहींना नाट्यमयता ठासून भरलेली गोष्ट आवडते. पण माझ्याबद्दलच सांगायचं तर मला ’य’ बिंदूपासून सुरू हो‌ऊन ’व’ बिंदूपाशी संपणारी गोष्ट आवडते. त्या गोष्टीने ’य’ पाशी सुरू होण्यात आणि ’व’पाशी सपण्यातच तिचं सौंदर्य असतं. ’य’ पाशी सुरू होताना ’प’, ’फ़’ हे टप्पे सांगता येतात किंवा तिला ’श’ पर्यंत ताणता येतं, किंबहुना तसंच करायला हवं होतं असं सर्वांचं मत असतं; पण, तिने ’व’ पाशीच संपून ती गोष्ट माझ्या पद्धतीने संपवण्याचं, अनेक शक्यता पडताळून पाहायचं स्वातंत्र्य मला दिलेलं असतं. अशी गोष्ट सुरूवातीच्या आधीच्या कित्येक शेवटांच्या शक्यता सांगते आणि शेवटानंतरच्या अनेक सुरूवातींना जन्म देते. इतरांना वाटतं की त्यात काहीतरी राहून गेलंय. पण काहीतरी नेहमीच राहून गेलेलं असतं फ़ोक्स, काहीतरी नेहमीच राहून जातं. पूर्णत्वाची भावना नकोच असते अगदी पण गोष्टीत काहीही नसण्याची, त्यातल्या कशानेही आतात काहीही न हलल्याची भावना नको असते. बारीकसारीक तपशीलांतील केव्हढेतरी मोठे अर्थ उलगडत, सामान्य गोष्टींना असामान्यत्व बहाल करत, मनाच्या आत खोल खोल कुठेतरी रुतून बसलेल्या आठवणी उपसून काढत काढत या गोष्टीचा ’य पासून ’व’ पर्यंतचा प्रवास चालतो. त्यांत छान छान आदर्शवादी, लार्जर दॅन ला‌ईफ़ माणसं नसतात तर अनंत चुका करणारी, चुका प्रांजळपणे मान्य करणारी किंवा कधीकधी त्या चुका नव्हेच अशा ठाम समजात जगणारी, चुका करत करत, पडत-सावरत पुढे जाणारी, विचार करणारी माणसं असतात, या माणसांमध्ये एक समान दुवा असतो-नसतो. ती माणसं कधी एकमेकांना ओळखत असतात, कधी नसतात. ती माणसांच्या सभोवतालची नव्हे तर माणसांबद्दलची गोष्ट असते. मी नुकताच अशी माणसांबद्दलची गोष्ट पाहिली.

या गोष्टीत दोन माणसं आहेत. ही दोन माणसांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. ते एकमेकांच्या शेजारी राहात नाहीत, त्यांच्यात दूरन्वयानेही कोणतं नातं नाही. ते बहुधा शहराच्या विरूद्ध टोकांना राहतात. त्यांच्या वयातही बराच फ़रक आहे. त्यातला एक माणूस आहे साजन फ़र्नांडीस आणि दुसरी आहे ईला.

साजन फ़र्नांडीस एक चाकरमानी आहे. गेली पंचवीस वर्षे तो एका रूक्ष सरकारी ऑफ़िसातल्या क्लेम्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. लवकरच तो स्वेच्छा निवृत्ती घेणार आहे. तो रोज सकाळी आपलं घर सोडतो, बस पकडून गर्दीतून धक्के खात बांद्राला येतो. बांद्राहून ट्रेन पकडतो, बसायला जागा मिळाली तर ठीक नाहीतर उभं राहून चर्चगेटला उतरून ऑफ़िसला येतो. तिथल्या पिवळट, खाकी रंगाच्या फ़ायली, सरळ पाठीच्या, जास्त बसलं तर ’तिथं’ रग लावणा-या, माणूसघाण्या लाकडी खुर्च्या, फ़ायलींच्या ढिगा-यात हरवून गेलेली माणसं, कण्हत फ़िरणारे पंखे, त्या पंख्याने हवा घुसळली गेली तरी जाणवावी इतकी वातावरणातील तटस्थता, प्रत्येक जण आपला मान खाली घालून काहीतरी करतोच आहे असं एकंदरीत वातावरण. मा्ना खाली घालून काम करणा-या त्या असंख्य कर्मचा-यांतील एक कर्मचारी म्हणजे साजन फ़र्नांडीस. गेली पंचवीस वर्षे कामात कोणतीही कसूर न करणारा अतिशय इंफ़िशियण्ट पण माणूसघाण्या मनुष्य. आपण बरं आपण काम बरं, बाकी लेको तुम्ही गेलात तेल लावत असा खाक्या. साजन एका रेस्टॉरंटमधून डबा माग्वतो याचा अर्थ करून घालणारं कोणी नसावं असा अर्थ लावायचा. तिथेही तो जेवणाबद्दल सारख्या तक्ररी करणारं गि-हा‌ईक म्हणून ओळखला जातो त्यामुळे तिथलं जेवण, जेवण नसून पोटात घालायचं जळण असा प्रकार असावा हादेखील एक कयास.  साजन एक वाजता जेवत असेल, पुन्हा कामाला लागत असेल. पावणेपाच वाजता काम आटपून आजूबाजूला न पाहता स्टेशनवर येत असेल आणि थकलेल्या, पेंगुळलेल्या आणि घराची ओढ लागलेल्या हजारो चाकरमान्यांच्या गर्दीचा एक भाग बनून जात असेल. तो गर्दीत जा‌ऊन मिसळतो तेव्हा त्याच्याभोवती पातळ मेम्ब्रेनचे बुडबुडा असल्यासारखा वाटतो. त्या बुडबुड्याच्या पलीकडे सर्वांची आयुष्यं समांतरपणे चाललियेत. माणसं त्यांच्यावरुन वाहतायेत खरी पण असं असूनही ती ऑब्लिव्हियस आहेत आणि तोसुद्धा.  त्या बबलच्या एका विशिष्ट परीघातलं वातावरण एकदम स्तब्ध, त्या वातावरणापलीकडे कुठेतरी ती गर्दी अनावर आपल्यातच कोसळत असलेली. मग ट्रेनमधून उतरून तो तीच ठराचिक बस पकडत असेल, कधीकधी त्याला बसयला जागा मिळत असेल,कधीकधी मिळत नसेल, कधीकधी चेंगरून यावं लागत असेल. काहीकाही वेळा साजनला विंडो सीट मिळते तेव्हा साजन रिकाम्या डोळ्यांनी बाहेरचं दृश्य पाहात असतो. ते दृश्य त्याच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे कळायला मार्ग नाही. तो घरी येतो. त्याचा दिनक्रम रोज असाच असतो, उद्याही तसाच असणार आहे, त्यात जराही बदल होत नाही. आला दिवस तसा-तसाच असण्याच्या ग्लानीतच त्याच्या नकळत कित्येक वर्षे निघून गेली आहेत.

मुंब‌ईतील हजारो गृहिणींसारखी एक ईला. ईला फ़क्त ईला आहे. तिला आडनाव नाही. ती पंजाबी ढंगाचं तोडकं हिंदी बोलते. लग्न, लग्नानंतर लगेचच मूल, मग मुलाची उस्तवार करण्यात पाच-सहा वर्षे चुटकीसरशी निघून गेलेली, नव्हाळीची वर्षं त्यात करपत चाललेली बा‌ई आहे ती. नवरा कायम कामात व्यस्त आणि घरी असेल तेव्हा कायम फ़ोनवर. त्यामुळे पती आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण होतो आहे. पतीला जिंकून घ्यायचे सर्व उपाय हरतात तेव्हा ती समस्त स्त्रीवर्ग करतो तो उपाय करते. पतीला खूष करण्याचा मार्ग म्हणे त्याच्या पोटातून जातो, त्यामुळे त्याला आपल्या हातातल्या चवीने जिंकायचं असं ती ठरवते. या कामात तिच्या घराच्या बरोबर वर राहणारी तिची स्मार्ट आंटी खंबीरपणे तिच्या पाठीशी आहे. ईला सकाळी उठते, मुलीच्या शाळेच्या तयारीला लागते, सगळ्या आयांप्रमाणे कितीही लवकर उठलं तरी शाळेची रिक्शा  ये‌ईपर्यंत तिची मुलीची तयारी करून झालेली नसते. मुलीला शाळेला पिटाळलं की ती नव-याच्या डब्याच्या तयारीला लागते. उद्या काय करायचंय हे तिने बहुतेकवेळा आदल्या दिवशीच ठरवून ठेवलेलं असतं. जेवण होता होता डबेवाला येतो, तिने कितीही वेळ ठेवून जेवण करायला सुरूवात केली तरीही डबेवाला ये‌ईपर्यंत तिचा डबा कधीही भरून झालेला नसतो. ती घा‌ईघा‌ईत डबा भरते पण त्या घा‌ईतही ती गव्हारीच्या भाजीवर खिसलेलं खोबरं टाकायला विसरत नाही. डबा भरून डबेवाल्याच्या हातात दे‌ईपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या डब्याच्या पिशवीवर लागलेलं पीठ झटकण्याचा तिचा निकराचा प्रयत्न चाललेला असतो. दार बंद केलं की मुलगी घरी ये‌ईपर्यंतचा दिवस तिच्यासमोर आ वासून पडलेला असतो. रात्री जेवताना नवरा ताटातल्या जेवणाबरोबर टीव्हीपण जेवत असतो, मुलगी खाली मान घालून जेवण चिवडत असते, तिघांमध्ये हसणं-खेळणं तर सोडूनच द्यायचं पण एका शब्दाचंही संभाषण होत नाही. जेवण होतं आणि तिचा दिवस संपतो. उद्याचा दिवस देखील आदल्या दिवसावरून छापून काढल्यासारखा असतो. फ़क्त भाजी बदलते, कपडे बदलतात आणि आंटीला सांगीतलेल्या व्यथा बदलतात. पण ती आला दिवस साजरा करायच निकराने प्रयत्न करते. कधीकधी खूपच असह्य झालं की ती तिच्या आ‌ईकडे जाते. पण तिथूनही ती डोक्यात हजारो प्रश्न, नव्या काळज्या घे‌ऊनच परतते. तिच्या बाबांना फ़ुफ़्फ़ुसाचा कॅन्सर आहे. या सर्व रगड्यात ती इतकी हरवून गेल्यासारखी झाली आहे की मागच्या वेळी कोरलेल्या भुवयांचे केस आता कसेही वाढले आहेत याचे तिला भानही नाही.

ईला तरुण आहे. तिच्या बोलण्यातल्या लाडीकपणाला, आर्जवाला नवेपणाचा वास आहे. नवरा तिची हौस कायम मोडून पाडत असला तरी ती हौशी आहे हे खरं. नवीन प्रयोगांचं तिला वावडं नाही. पण, साजनचं तसं नाही. साजनच्या घरातल्या गोष्टी साजन इतक्याच जुन्या आहेत किंवा त्या गोष्टींसोबत साजन जुना होत गेलाय असं म्हणत ये‌ईल. जुनं काळातलं कपाट, शेल्फ़स,  कित्येक वर्षांपासून पडलेली असावी अशी वाटणारी, कोणी हलवायचीही तसदी न घेतलेली अशी अडगळ, जुनी सायकल, जुने प्रोग्राम्स, जुना रेडीयो ज्यावर भुटानचं चॅनेल लागतं, कुठल्यातरी जुन्या काळचा शाम्पू ज्याचं टोपण लावायचीही तसदी घेतलेली नाहीये, जुन्या टीव्हीवर रेकॉर्ड केलेले जुनेच कार्यक्रम पाहणारा जुना साजन. या सर्व जुन्या गोष्टींना साजनची सवय हो‌ऊन गेलीये आणि साजनला त्यांची. या सर्व चक्रात इतका तोचतोचपणा आहे की साजन रोज घरी ये‌ऊन तेच तेच कपडेच घालतो, त्याच वेळेला सिगरेट्स पितो, त्यानंतर बाहेरून आणलेल्या चिवट पोळ्या आणि कुठलीही भाजी म्हणून खपेल अशी भाजी चिवडत काल संपलेल्या पानावरून कादंबरी वाचायला सुरूवात करून काही पाने पुढे आणून ठेवतो. उद्याचा दिवस कसा असणार आहे हे त्याला आताही सांगता ये‌ईल, ते त्याला माहीत आहे. माहीत असलेल्या गोष्टींचं एव्हढं काय ते नवल आणि त्यात काय एव्हढंसं. तो उठेल, तयार हो‌ईल, बांद्राहून ट्रेन....

ही गोष्ट वर्षानुवर्षे शरीराला, मनाला त्याच त्याच प्रकाराच्या जगण्याची, अशा-तशा प्रकारच्या संवादांची किंवा संवादाच्या अभावाची, चुकूनही यांत कोणताही बदल न होण्याची सवय झालेल्या या माणसांच्या आयुष्यात अचानकपणे घडून आलेल्या बदलाविषयी आहे. बदल घडण्याची शक्यता दिसत असेल तर ती आजमावून पाहण्याकरिता, त्या बदलाला सामोरे जाण्याकरिता धाडस लागतं. मुळात आपल्या आयुष्यात बदल घडतो आहे हे मान्य करण्याकरिता प्रचंड  प्रामाणिकपणा लागतो, बदल करून घेताना तो आपल्याला पटला, भिडल तरच करून घ्यायचं शहाणपण लागतं. कधीकधी बदल घडतोच आहे तर फ़ार विचार न करता मनाला वाटतं म्हणून धाडकन एखादी गोष्ट करून वेडेपणा लागतो. कधीकधी बदलांमुळे प्रचंड बावरायला होतं, सगळं सोडून, कोणालाही कसली उत्तरं न देता पळून जावंसं वाटतं, कधीकधी पळून गेल्यावर पुन्हा परतावंसंदेखील वाटतं. पण, आपल्याला अमुक एका वेळी अस का वाटतंय याचे निश्चित कारण माहित नसलं तरी अंदाज मात्र असतो. या गोष्टीतील माणसं अशीचवेडी- खुळी, शहाणी, प्रांजळ, प्रामाणिक, स्वप्नाळू अशी बरीच काही आहेत. ती खोटी नाहीत,  दुटप्पी, दांभिक तर त्याहून नाहीत.

बदल घडणं ही चांगली गोष्ट आहे. वर्षानुवर्षे एकाच रूटने प्रवास केल्यावर कधीतरी एकदा नवीन रूट घे‌ऊन पाहावा. नेहमीचेच थांबे घेण्यापेक्षा एखाद-दुसरा थांबा वाढवून पाहावा. कधी बसने न येता रिक्षा करावी, कधीकधी उगाच कुठेतरी रेंगाळावं, उशीरा घरी परतावं. चहाचे दोन घेत केवळ आपल्याकरिता दहा एक मिनीटांचा वेळ काढावा. त्यात आपल्या आवडीचं काम करावं. कधीकधी अज्ञाताच्या हाती स्वत:ला सोपवून द्यावं, कधीकधी अनोळखी माणसावर विसंबून राहावं, वेडेपणा करून पाहावा, कधीमधी माणूसघाणेपणा सोडून एखादा माणूस जोडून पाहावा, त्याला पाठीशी घालावं, त्याची हकनाक काळजी करत राहावी, कधीकधी चुकीच्या रस्त्याने आपल्या घरी जायला पाहावं. कधीकधी तो चुकीचा रस्ता देखील आपल्याला बरोबर ठिकाणी पोहोचवतो. बदल खरंच चांगलं असतात. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडली आहे असं आपल्याला उगाचच वाटत असतं. पण, असे छोटेछोटे बदल झाले तरी बदला‌आधीच्या दिनक्रमातली, त्या सापडलेल्या लयीतीलही चाकोरी,तोचतोपणा चटकन लक्षात येतो. साजन एके संध्याकाळी नेहमीचे कपडे घालत नाही तेव्हा त्याच्यामधला बदल अखेरीस त्याने मान्य केल्याचे आणि त्या बदलासोबत दोस्ती करून टाकल्याचे आपल्याही लक्षात येते. आपल्यात बदल झाले की आपल्या नकळतच आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणातलेही बदल टिपायल लागतो. वास्तविक पाहता ते तेव्हाच बदललेलं असतं नाही तर एव्हढी वर्षे आपलं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं इतकंच. मग बदललेल्या इमारती दिसतात, कित्येक वर्षांमागे पाहिलेल्या जागा आहे तशाच आहे असे पाहून आश्चर्य वाटतं, आयुष्याला काहीतरी अर्थ गवसला आहेसं वाटायला लागतं. आयुष्य अशा छोट्या छोट्या गोष्टींनी अर्थपूर्ण करता येते. एक साधं सरळ जिवंत सत्य असतं ते. या गोष्टीत ते सापडतं.

पण कधीकधी जास्त बदल करून घेण्याचीही भीती वाटते. एकतर ते अन-डू करता येत नाहीत. मागे परतायचं म्हटलं तरी पूर्वीचे ते आपण आपल्याला सापडू की नाही याचं भय वाटतं. मग बदला‌आधीच्या आपल्याला एका खुंटीला बांधून बदल आपल्यात बदल करायचे म्हटले की कुतर‌ओढ ही व्हायचीच. मग साजननं एके संध्याकाळी सिगरेट न पिणं. कित्येक वर्षांची सवय अचानक मोडल्याने होणारी तगमग, अस्वस्थता आणि निर्ढावलेल्या, बदलांना नाखूष असलेल्या, निबर झालेल्या साजनच्या डोक्यात परिहार्पयणे सुरू होणारं विचारांचं चक्र. ही गोष्ट बदलांना आपल्या आतून होणा-या विरोधाचीही गोष्ट सांगते.

या गोष्टीत स्वाभाविक गोष्टी तर आहेत पण खूप सूक्ष्म गोष्टींतून डिफ़ा‌ईन होणा-या खूप सा-या गोष्टी आहेत. कधीकधी खूप शांतता आहे पण त्या शांततेच्या पार्श्वभूमीला खूप सारे, वेगवेगळ्या पिचमधील, वेगवेगळ्या टेक्सर्चचे आवाज आहेत. ते त्या शांततेला अधिक गडद करतात. साजनाच्या घरातली शांतता अशीच काळीकभिन्न आहे. कधीकधी खूप गोंगाट आहे, खूप गर्दी आहे, खूप माणसं एकाचवेळी बोलतायेत पण त्या गर्दीत उभ्या असलेल्या माणसाचं एकटेपण, तुटकपण कच्चकन रूततंय, फ़ार काही सांगायला –दाखवायला न लागता कळतंय. घडयाळाच्या ताणलेल्या स्प्रिंगसारखा ताण आहे, कंटाळ्याने सगळ्यांना संमोहीत केल्यासारखा चमत्कारीक यंत्रवतपणा देखील आहे. गोष्टीच्या सुरूवातील साजन आणि ईला यांचा दिनक्रम दाखवल्यावर यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला,  हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला, इतकंच काय तर त्यांच्याही हाती काहीही नसण्याचा होपलेसपणा  आहे. साजन बसला आहे ती एक खोली आहे. पण त्या खोलीपलीकडेही खोल्या आहेत; म्हणजे असू शकतील. पण साजन तिथे बसला असताना एखादी व्यक्ती या खोलीतून बाजूच्या खोलीत जा‌ऊ शकते ही शक्यता आपण साजनला लागू करत नाही. त्याच्या एकटेपणाची आपण आपसूक मान्य केलेली ही जाणीव अतिशय तीव्र आहे, धारदार आहे. ती जाणीव डोक्याच्या पाठी कुठेतरी सतत टकटकत राहते . पण साजनचं असं असलं तरी ईलाला ते लागू नाही ही गोष्ट आपल्या नकळत आपल्याला मान्य होणेही आहे. ईलाचं स्वत:ला प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणं यापेक्षा तेच प्रश्न दुस-याला विचारून त्यातून आपली उत्तरं मिळतायेत का हे पाहणं आहे. त्याचवेळी साजनचं एकही प्रश्न न विचारणंही ठळक होतं आहे. बोलण्यातील घुटमळीतून मनातल्या प्रश्नांना होय/नाहीमध्ये तोलणं सुरू आहे. मनातलं सगळं सांगून टाकतो त्या व्यक्तीपासून काही गुपिते ठेवणं आहे किंवा कधीतरी सांगायचं तर भरपूर आहे पण मध्ये दुराव्याची एक मोठीच्या मोठी भिंत उभी आहे अशी परिस्थिती आहे. टेबलाच्या दोन टोकाला बसलेल्या व्यक्तींमधलं पार न करता येणारं अंतर दिसतं आहे तर कधीकधी शहराच्या दोनटोकाला बसलेल्या व्यक्ती एकमेकांच्या एकदम निकट असाव्यात असं वाटतंय. दोन माणसांच्या बाबतीत एकाच वेळी समान गोष्टी घडण्यातला योगायोग आहे पण माणसांची गर्दी असलेल्या शहरात असे घडणे नवलाचे आहे असं वाटण्याची अपरिहार्यताही आहे.

मी खूप लहान असतानाची गोष्ट आहे. पहाटे पहाटे चार साडेचारच्या सुमारास मला जाग यायची. डोळे किलकिले करून पहिल्याप्रथम मी अंथरूणावरच्या आ‌ईच्या जागेकडे पाहायचे. तिथे तिचं अंथरूण नीट घडी करून गादीच्या पायाशी ठेवलेलं असायचं. स्वयंपाकघरात जाग असायची. दिवा ढणढणत असायचा. तिथं दारापाशीच एक पारा उडालेला छोटा आरसा लावलेला असायचा. त्यामध्ये पाहत बाब केस विंचरत असायचे. त्यांनी लावलेल्या कुठल्यातरी पावडरीचा हलका गंध दरवळत असायचा. आम्हा मुलांची झोपमोड हो‌ऊ नये म्हणून त्या दोघांमध्ये हलक्या आवाजात काहीतरी बोलणं चालू असायचं. मग स्वयंपाकघरातून येणरे एकेक खमंग वास माझ्या नाकाला गुदगुल्या करू लागायचे. पोळीचा खरपूस वास यायचा आणि झोप पार उडून जायची. मग मी उठायचे आणि अर्धवट झोपेत स्वयंपाकघराच्या दाराला ओठंगून उभी राहायचे. २० वॉट्सच्या दिव्याच्या प्रकाशात ते धुरकटलेलं स्वयंपाकघर एकदम सिंदबादच्या गोष्टीमधल्या जादु‌ई नगरीसारखं वाटे. आ‌ई बाबांचा डबा भरत असायची. तिचे केस पार विस्कटलेले असायचे, उठल्या उठल्या ती बाबांच्या डब्याच्या तयारीला लागलेली असायची. परवडत नसताना तिने त्या काळी बाबांसाठी तो मोठा डब्बा आणला होता. मस्टर्ड रंगाचा, चार कॅरीयरवाला. त्याला जाड ऑफ़ व्हा‌ईट रंगाची पट्टी होती. बाबा तिच्या खांद्यावरून वाकून ती डब्यात काय भरतेय ते पाहत असायचे. मध्येच ते काहीतरी बोलायचे आणि आ‌ई गालातल्या गालात हसायची. बाबा डबा घ्यायचे, दारापाशी यायचे, माझे केस खसाखसा विस्कटायचे आणि निघून जायचे. त्यांना सोडायला आ‌ई दारापाशी जायची आणि ते रस्त्याच्या वळणा‌आड दिसेनासे झाले की दार बंद करून त्याला टेकून उभी राहायची. त्यावेळी तिच्या वेह-यावर एकदम गूढ हास्य असायचं. काहीतरी गुपित केवळ तिला आणि तिलाच माहित असल्यासारखं. या आठवणीत संभाषण नाही. असलंच तर ते न कळेलशा कुजबुजीच्या स्वरूपात आहे. बाकी फ़ोडणीच्या चुरचुरीचे आवाज आहेत, बेसिनचा नळाची तोटी जरा जास्तच फ़िरल्याने फ़र्र्कन आलेल्या फ़व-याचे, पोळपाट लाटण्याचे, पोळी तव्यावर टाकल्याचा चर्र आवाज आहे. तेव्हा गाजत असलेले गाणे आ‌ई हलकेच गुणगुणत असायची ती गुणगुण आहे. बायोस्कोपमध्ये फ़टाफ़ट बदलल्यासारखी दिसणारी अर्धवट प्रकाशातली दृश्ये आहेत, खूप सारे गंध आणि आवाज आहेत. पण एखादी आठवण यावी आणि दुल‌ई पांघरल्यासारखं उबदार वाटतं अशा आठवणींपैकी ही एक आठवण आहे.

काही गोष्टी जशाच्या तशा आपल्या आठवणीत राहात नाहीत-त्या महत्वाच्या नसतात म्हणून नव्हे तर त्यांना आठवणीत न ठेवणं ही आपली त्या त्या वेळ्ची गरज असते. त्या आठवणींतील बारीकसा तपशील मात्र आपल्या मनात खोलवर रुतून बसलेला असतो. एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण नेगेटीव्ह वर कसे चिरंतन उमटतील पुराव्यादाखल, तसंच त्या तपशीलाने मनावर कायमची खूण उमटवून ठेवलेली असते. नंतर काहीतरी चांगलं वाचल्या-पाहिल्याचं निमित्त होतं आणि त्यातल्या एखाद्या तपशीलावरुन ती पूर्ण आठवण आपल्यासमोर उलगडत येते. गुगल सर्चमध्ये टॅग्स असतात ना तसं. विवक्षित टॅगवरुन कशी पेजेसची जंत्री आपल्यासमोर हजर होते?

आठ्वणी अशा अकस्मातच ये‌ऊन आपल्याला चकीत करतात. काल पाहिलेल्या त्या गोष्टीने माझं हे असं, एव्हढं-एव्हढं, इतक-इतकं झालंय. त्या गोष्टीचं नाव होतं-
’द लंचबॉक्स’.

इल प्ल.

खूप शहाणी आणि खूप वेडी माणसं कधीच बदलत नसतात असं म्हणतात.
पण एके दिवशी आपल्याला एकाचवेळी खूप शहाणं आणि खूप वेडं असल्याचा ताण यायला लागतो. आणि मग आपण स्वत:ला  ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत बदलत आणतो.
इतका-म्हणजे ते म्हणतात तसा-आमूलाग्र बदल होऊनही आपल्याला काही गोष्टींबद्दल पूर्वी वाटायचं तेव्हढंच आणि तितकंच कसं वाटत राहतं?
समुद्राबद्दल, देवरायांबद्दल?
जसं मला पावसाबद्दल वाटतं?
पूर्वीही असं व्हायचं आणि अजूनही तसं होतं-
मला जर वाटतंय की पाऊस पडणार, तर तो पडतोच.

एरव्ही आत काजळलं, मनासारखं काही झालं नाही, मन खट्टू झालं की बाहेरचंही सगळं काजळल्यासारखं दिसायला लागतं. मग मी फ़ूं फ़ूं करुन ती काजळी उडवून लावायचा प्रयत्न करते, अनोळ्खी सुरांच्या कवेत झोकून देते, त्यावर वजनविरहीत मूढतेने तरंगत राहते किंवा अज्ञात, डोळ्यापर्यंत पोहोचूनही कसलाही अर्थबोध न होणरया दृश्यावर डोळे चिकटवून बसते. निर्वाणीचा उपाय म्हणजे शब्दांच्या बुडबुडयावर स्वार होते.
पण पावसात हे सर्व करण्याची गरज नसते.
पावसात फ़क्त बाहेर पडायचं असतं. हवेने ढकलत आणल्यासारखे आपण कुठवर तरी जाऊन पोहोचतोच.

इल प्ल. पाऊस पडतो आहे.
छान वितळलेला सूर्यप्रकाश असतो.
पावासाच्या रिपरिपीने आजूबाजूचे सर्व अश्लील आवाज शोषून घेतलेले असतात.
पत्र्यावर तडतडणारया पावसाच्या थेंबांमधून पावसाच्या गाभ्यातील गर्द शांतता कानावाटे आत झिरपते,  आपल्याआत ठिबकत राहते.
पृथ्वी फ़ुलांमधून हसते म्हणे..
पावसात तर काय प्रत्येक पान फ़ूल असते.
सर्वचजण आनंदात असतात.
त्या आनंदाचा स्पर्श मला देखील होतो.
हे सर्व पाहून आपण खूप सुंदर दिसत असू याबद्दल इतकी खात्री वाटायला लागते की स्वत:तून बाहेर निघून स्वत:कडे अनिमिष पाहत राहावं वाटतं.

ब्रिष्टी पोर्छे..पाऊस पडतो आहे. 
आतापर्यंत बाहेरच्या झाडा-फ़ुला-पानांमध्ये खोलवर डोकावून पाहत पाहात सर्वकाही आपसूक समजायला लागलेलं असतं, विचार संगतवार लागायला लागतात. आतून खूप  आजारी असल्यासारखं वाटत असतं ते बरं व्हायला लागतं.

अमे गा फ़ुत्ते इमास. पाणी पडते आहे. पाऊस पडतो आहे.
पांढरा आवाज सर्वत्र भरुन राहिला आहे असं वाटतं, आपल्या पोटात हजारो रहस्य वागवत असलेल्या शांततेसारखा.
आणि मग पावसातल्या शांततेच्या ओल्या गाभ्यातच आपल्यातला कधीही न संपणारा ठार कोरडेपणा कळतो.
आणि मग माझ्या माझ्याबद्दलच्या, इतरांबद्दलच्या खुळ्चट, अवास्तव कल्पना विरायला लागतात.
कुठल्यातरी काळोख्या वळ्चणीला बसून मी पाऊस ऐकत राहते.
कुठलीही, कसलीही, कोणाचीही गरज वाटण्याची गरज संपते.
मी शांत होते.

बरान: पाऊस
मला पाऊस का आवडतो?
मला पाऊस आवडतो कारण  कारण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतो त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती आहे.
मला पाऊस आवडतो कारण त्याच्यात सर्व काही नवीन असतं.
एव्ह्ढं सारं खळखळ्णारं पाणी असतं पण, तुम्ही एकाच पाण्यात दोनदा पाय घालू शकत नाही कारण तुमच्या पायावर येणारं पाणी हे आधीचं पाणी नसतं.
आणि..
मला पाऊस आवडतो कारण इतकं पाणी असूनही त्याच्यामध्ये कोणालाही तृषार्त तळ्मळायला लावण्याची ताकद असते.

मला पाऊस आवडतो पण तो माझा मित्र नाही होऊ शकत कारण पाऊस हे माझ्या मनातल्या खळबळीचे प्रतीक आहे.
एखाद्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्या भांड्याच्या रंग उचलतं, स्थिर आणि चमकदार भासतं पण पावसाच्या धारांचा नेमका रंग आपण नाही सांगू शकत.
चिमुकला जीव असणाया सत्याचे शब्द सुस्पष्ट, नेमके असतात तर कवेत न मावणारं वास्तव अधिकाधिक मूक आणि गूढ असतं.
पावसासारखं आणि-
कधीही न बोललेल्या, मुकाट सोसलेल्या दु:खांसारखं.

ला युव्हिया. पाऊस. संततधार पाऊस.
मी पावसात चालत असते.
बरेच जण पावसात बाहेर पडलेले असतात.
काही जण पावसात चालतात, काहीजण नुसतेच भिजतात.
अशा पाना-फ़ुला-पावसांतून जाता जाता, चालता चालता आपल्या आत एकदाच लक्कन काहीतरी हलतं.
असं चालता चालता आपल्या आतलं काहीतरी एकदाच बदलतं.
आणि एरव्ही बदलण्यास एकदमच नाखूष असलेले आपण अगदी राजीखुषीने स्वत:ला बदलून घेतो.

मीठा है,कोसा है, बारिश का बोसा है..कोवळा, उबदार, सर्वांगाने भिडणारा पाऊस
काळ असा दोन क्षणांच्या मध्ये साकळलेला असतो.
पावसासाठी काहीतरी योजून ठेवावं आणि त्यानेही नेमकं त्याच दिवशी येण्याच्या आणि आपणही योजून ठेवलेलं सर्व काही त्याच दिवशी हातचं काही न राखता करुन टाकण्याच्या.
असं पहिल्यांदा घडतंय असं नाही, बरयाचदा घडतं.
पण तरीही पाऊस येतो तेव्हा मी गेल्या कित्येक जन्मापासून याची वाट पाहिली होती असं वाटायला लागतं.
आणि तो ही प्रत्येक वेळी असा अवचितच, माझ्याकरता आल्यासारखा वाटतो.

मग या एका दिवसाचं मॉर्फ़ीन अनेक दिवस, आठवडे, झालेच तर महिने पुरवून घेते.. पण ते केव्हाना केव्हा संपायचंच.
पण चालायचंच..!

ते.

संध्याकाळच्या कलत्या, कोमट उन्हात बाहेर पडलं की पाय आपसूक समुद्राची वाट धरतात.

गावापासून समुद्राकडे जाणारी एकच डांबरी सडक आहे. पिवळ्या पडत चाललेल्या हिरव्या साडीला काळा काठपदर असावा त्याप्रमाणे बोडक्या, विस्तीर्ण माळरानाच्या उजव्या अंगाने ती सडक जाते.  काही तासांपूर्वी फुफाटत असलेल्या रस्त्यावरच्या त्या लाटांलाटांनी येणा-या वाफा एव्हाना रस्त्यात जिरायला लागलेल्या असतात. खूप वेळ वळणावळणाने एकट्याने जाणा-या  वाटेला पुढे एका ठिकाणी फुटलेली एक वाट मुरका मारुन उजवीकडे वळते त्या वाटेवर ग्रामदेवता वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हिरवकंच अंडाकृती तळं आहे. तळ्याच्या बाजूला शिंदीची झाडं आहेत.. माडांची, खजुरींची तोबा गर्दी आहे आणि सभोवताली वस‌ईच्या किल्ल्याचे पडके भग्नावशेष आहेत. किल्ल्याच्या पलीकडे असलेल्या समुद्राचं अस्तित्व अलीकडूनच जाणवतंय. दिवसभराचा म्हावरा विकून आलेल्या कोळीणी मुरकत, खुर्दा खुळखुळवत चालल्या आहेत. त्यांच्यापैकी एकीच्या नाकातली मोरणी उन्हात लक्क्कन लखलखते, डोळे दिपतात. पडक्या चर्चचे कळस चमकत आहेत. बुरुजाला लगटून वाढलेल एकच झाड निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसतं आहे. उघड्यावाघड्या पोरांचा वेडाबागडा पकडापकडीचा खेळ सुरु आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने किल्याची पोरसवदा डागडुजी चालवलेली असल्याने पूर्ण किल्ल्याला हडप्पा, मोहेन्जोदडोची कळा आलेली आहे.

या सर्वांकडे पाठ करुन उभं राहायचं.

मंदीरासमोरुन एक काळी करडी वाट घनदाट झाडीतून वळणावळणाने वाट काढत आत जंगलात लपलेल्या किल्ल्यात निघून गेली आहे. त्या वाटेने चालायला लागायचं. वाटेवर शेणाचे पो पडलेले आहेत, घाणेरीचं रान माजलं आहे. रानात कुठेतरी फुटलेल्या शेवरीच्या बोंडातली म्हातारी वा-यावारती लहरत आपल्याभोवती भिरभिरते आहे. इकडे तिकडे जिकडे पाहावं तिथे फुलपाखरं आहेत. फुलपाखरं आपल्यातच इतकी मग्न आहेत की ती अंगाला चाटून जातायेत, त्यांच्या पंखांचा हलकासा वर्ख माझ्या अंगाला लागतोय याचं त्यांना भानच नाहीये. त्या काळ्याकरड्या वाटेवरुन तीस एक पा‌ऊलं चाललं की पूर्वी किल्ल्यातील दरबार असावा असे वाटणारी भग्न रचना दिसते. हिरवट छटेच्या काळ्याकरंद शेवाळाने बुजबुजलेली. भिंतीतल्या वडा-पिंपळाच्या मुळांनी मोडकळीस आलेली..

पुरातत्व विभागाची मेहेरनजर होण्या‌आधी या भग्नावषेशांकडे कोणी लक्षच दिलेलं नसल्याने झाडं, वेली वाटेल तशा, वाटेल तिथे आणि वाटेल तितक्या वाढलेल्या आहेत. इतक्या, की त्या वरवर वाढत जाताना त्यांच्या पसा-याला जागा न मिळाल्याने त्या एकमेकांत गुंतून त्यांचं एक न सोडवता येणारं जाळं तयार झालंय. प्रकाशालाही जमिनीवर धडपडतच यावं लागतं. भोकं असलेल्या छपरातून पावसाचं पाणी कसं धारेने गळत राहतं तसा प्रकाश इथे झोताझोताने गळत असतो. त्यामुळे इथल्या वातावरणाला एक गूढपणा आलेला आहे. बाहेरच्या प्रकाशाच्या लखलखाटातून इथे आलं की अचानक डे-ना‌ईट गॉगल घातल्यासारखं वाटायला लागतं. इतकी सारी झाडं असल्याने वातावरण कुंद असतं. हवेला विचित्र घनता असते.. हवा ‘बसलिये’ असं वाटण्या‌इतपत. या हवेत पा‌ऊल टाकलं की हवा घुसळली जातेय असा विचित्र भास होतो कधीकधी. त्या रचनेला यथामती, यथाशक्ती पूर्वीचं रुप बहाल करण्याच्या पुरातत्व खात्याच्या प्रयत्नांमुळे  तिथल्या अनेक झाडांवर कुहाड पडली, वाचला तो हा एकच. त्या सारया उखीरवाखीर पसारयात ताठ, दिमाखात उभा आहे तो हा ताम्रक वृक्ष ऊर्फ रक्तचंदन.

हे झाड एका भिंतीच्या मधोमध उभं आहे.  पुरातत्व खात्याने त्या झाडाला अभय दे‌ऊन झाडाच्या अलीकडे बांधकाम थांबवून त्याच्या पलीकडून भिंतीला सुरुवात केली आहे. त्यामुळे झाडाचा अर्धा भाग या गूढगहिरया वातावरणात आहे तर अर्धा बाहेरच्या उजळ, प्रकाशित जगात आहे. त्यामुळे या झाडाला बाजूने बघायला गेलं तर ते मा‌ईम कलाकाराच्या मनासारखं वाटतं. अर्ध करडं तर अर्ध उजळ.

रहस्यपटांमध्ये दाखवतात तसं वर्म्स आय व्ह्यू शॉटमधून पाहिलं तर दिसेल असं भव्य, धीरगंभीर दिसणारं हे झाड मी आतापर्यंत पाहिलेल्या झाडांतील सर्वात घुमं झाड आहे .

लाल रंगाचं दणकट, विशाल खोड, गडद पानावळ, गोलगोल पानांची झालर, मांजराची पुष्पाळलेली शेपूट असावी तसे वाटणारे फुलांचे तुरे, त्याला लटकलेल्या हिरव्यागार करंज्या. त्या शेंगांमधून नंतर गुंजाच्या बिया निपजणार असतात. त्या झाडाच्या आजूबाजूच्या प्रकाशाला एक गूढगहिरी, विलक्षण घनता प्राप्त झालेली असते. झाडावरचा प्रकाश उजळ आणि झाडाखालचा प्रकाश सावळासुंदर. मी ज्यावेळी आलेले असते तेव्हा ऊन अद्याप भरात असतं. पानाच्या झालरीतून उन्हाचे गोलगोल आरसे सावल्यांतून लखलख करत असतात. वा-याच्या हेलकाव्यासोबत, हलक्या झुळूकीबरोबर झाडांची पाने होय होय होय, नाय नाय नाय करत डोलत असतात. आणि त्यांच्या या अनुनयासोबत त्या तु-यांचे पिवळे पिवळे रव्यासारखे कण मातीत विखुरत असतात. या झाडाच्या खोडापाशी मला सहज बसता येईल, माझ्याचसाठी बनवला गेलेला असावा असा कोनाडा आहे. उतरत्या उन्हात त्या कोनाड्यात बसून कोणतंही पुस्तक चघळावं.. चवीला वेगळं लागतं.

या हिरव्यागार शेंगा किंवा ग्रीन पॉड्स सुकल्या की वाळून तपकिरी होतात. या तपकिरी-काळ्या कुरळ्या शेंगा हातात धरुन वाजवल्या की खडखड वाजतात. या शेंगांमध्ये चकचकीत लाल गुंजाच्या बिया असतात. हा इतका सुंदर लाल रंग आहे की या बियांना इंग्रजीमध्ये म्हणतात तसं 'कॉरल बीड्स' हे विशेषणच साजेसे आहे. या गुंजांचं म्हणे वजन एकसारखंच असतं - ग्रॅमचा एक दशांश इतकं. म्हणून पूर्वीच्या काळी त्या सोन्याचांदीचं वजन करण्यासाठी वापरल्या जायच्या. दहा गुंजा सोनं इत्यादी. एकसारख्या वजनाच्या असल्या तरी कोणतीही एक गुंजा दुसरीसारखी नसते. त्या सारख्या आहेशा ‘वाटतात’, पण नसतात.

त्या बियांच्या बरोबर मध्यभागी ‘स्मज’केल्यासारखा एक छोटासा डाग असतो. खा-या पाण्याचा थेंब वाळून सुकल्यासारखा. मला फार वाटायचं की मला अतिशय, खूप लालभडक, एकही डाग नसलेली आणि पूर्ण गोल गुंजा मिळावी. मला हवी आहे तशी वाटणारी गुंजाची बी उचलायला जाणार तेवढ्यात त्याहून लालभडक बी चमचमायची मग मी तिच्याकडे खेचले जायचे. मग काही वेळानंतर मला तिच्याहून लालभडक आणि गोलगोल बी मिळायची... हा खेळ कितीतरी काळ सुरु राहायचा आणि मी आपली त्या झाडाभोवती भिरीभिरी फिरत बसलेली असायचे.  कितीतरी काळ मी परिपूर्ण गुंजेच्या शोधात होते.

पण परिपूर्ण असं काही नसतंच. अपूर्ण गोष्टही तिच्यातल्या अपूर्णत्वानेच ह्रदयाचा ठाव घेते. माझ्याकडे जमलेल्या अगणित बियांमधून अखेरीस मला हीच गोष्ट कळत गेली.

आपल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला अशीच आपसूकच, मुद्दाम काहीही करायला न लागता कळत गेली, उमजत गेली तर किती छान हो‌ईल नाही?

या बियांना फ्रेंचमध्ये ’प्वा रूज’ म्हणजेच लाल वाटाणे  म्हणतात. संध्याकाळचं ते उतरतं, कलतं ऊन, तो शेंगांचा खुळखुळ आवाज आणि ते झाड हलक्याशा वा-याच्या झुळकीबरोबर गुंजाच्या बिया शिंपत असते ती ऐकू ये‌ईल न ये‌ईलशी हलकी टपटप, हे एकमेकांत इतके मिसळून गेलं आहे की त्यांना एकमेकांपासून बाजूला करताच येत नाही. वाळलेल्या शेंगांचे ते गाणे मनात घर करुन बसले आहे ते कायमचेच.

या झाडाखालची सावली म्हणजे हे झाडच.. फक्त सावली म्हणजे काळं झाड. पण या झाडांचं जग आणि सावल्यांचं जग किती वेगळं असतं. त्यांची शरीरभाषा वेगळी, बोलीभाषा वेगळी. यांच्या थंडगार स्पर्शाने काटाही येतो, पण त्यांच्या‌आतला जिव्हाळाही सरसरुन भिडतो. या झाडाच्या सावल्यांची मी अगणित रुपे पाहिलेली आहेत.  या सावल्या कधी जास्त मायाळू असतात तर कधी तिरसट. कधी नाच-या, हलत्या झुलत्या तर कधी भिववणा-या. कधी फेर धरुन नाचणा-या तर काही थिजून गेलेल्या. कधी पांगलेल्या तर कधी आक्रसलेल्या.

असं म्हणतात की कोणतेही शहर प्रत्येक ऋतूमध्ये पाहावं. तसंच कोणतंही झाड दिवसाच्या प्रत्येक प्रहरी पाहावं.
सकाळी उन्हाचा पूर येत जातो तेव्हा हे झाड तेजःपुंज योग्यासारखं वाटतं. प्रकाश त्या झाडाच्या आजूबाजूला नुस्ता चिवचिवत असतो. अशावेळी फांद्यापानांतून प्रकाश झिरपत असलेले ते झाड मोठे देखणे दिसते. मग उन्हं उंच उंच होत जातात आणि जमिनीशी लंब होता तेव्हा त्याचा रक्तवर्ण अजून रसरशीत झालेला असतो. त्यावेळी तर ते तारुण्याच्या ऐन भरात असलेल्या नौजवानासारखे वाटतं.
मध्यान्हीच्या वेळी माथ्यावर ऊन जळत असतं तेव्हा ते झाड मान वर करुन त्या दावाग्नीत हू की चूं न करता निथळत असतं, तो वणवा अंगावर झेलत असतं तेव्हा कर्त्या, निधड्या पुरुषासारखं वाटतं.
संध्याकाळी आपल्याच तालात गिरक्या घेत असलेली फुलपाखरं आपल्या बरोबर 'चला चला चला!' करत त्या उन्हांना घे‌ऊन जातात आणि उन्हंही बेटी आ‌ईने बोलावणं धाडल्यावर चालायला लागावं तशी निमूट निघून जातात. मुंग्याही तुरुतुरु झाडापासून दूर चाललेल्या असतात. झाडाखालच्या गोगलगायींनी आपल्या पोटात पाय घेतलेले असतात, संध्याछाया झाडावर पसरु लागलेल्या असतात. अशावेळी पानांचा चकचकीत हिरवा रंग श्यामल-सावळा होत अंधारात मिसळून जाताना ते झाड विलक्षण पोक्त वाटतं.

एकच झाड दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांना इतकं वेगळं कसंकाय दिसू शकतं?

या झाडाचीही स्वतःची कहाणी असेलच. रिल्के म्हणतो की झाडं ही प्रेमाचा सर्वात सहनशील आविष्कार असतात. वर्षांच्या हिशोबात म्हणायचं झालं तर माझ्या सुरुवातीच्याही सुरुवातीपासून हे झाड इथे असावं. याने नक्की किती उन्हाळे पावसाळे पाहिले असतील? या झाडाला माझ्यासारख्या अनेकांनी लळा लावला असेल, या झाडाचीही कोणाकोणावर माया असेल, ते कुठे आहेत, कोण असतील? आपल्या आजूबाजूचे वृक्षमित्र धारातीर्थी पडताना पाहून त्याचाही जीव तिळतिळ तुटला नसेल का? झाडाखालच्या मुंग्यांच्या वारुळातील मुंग्यांची ही कितवी पिढी असेल? नीट लक्ष दे‌ऊन ऐकलं तर पानाच्या सळसळीतून झाड त्याची कहाणी सांगत असतं. त्यासाठी खास कान असावा लागतो असं नाही. फक्त झाडाची कहाणी झाड हो‌ऊन ऐकावी लागते, माणूस राहून नाही. प्रत्येक झाडाला चेहरा असतो, या झाडालाही आहे- गहिरे, काळेभोर डोळे असलेल्या समजूतदार मितभाषी माणसाचा. फक्त त्याने थोडं कमी घुमं व्हावं असं फार वाटतं. म्हणून एखादे दिवशी माझ्या स्वप्नांमध्ये हे झाड मोठमोठ्या ढांगा टाकत छान भटकून येतंय असं  दिसतं आणि दुस-या दिवशी जा‌ऊन पाहावं तर त्यांच्या फांद्यांचा पसारा आदल्या दिवशीपेक्षा वेगळा असतो तेव्हा मला विलक्षण आनंद होतो.

मांजराचं एक बुटुकलं पिल्लू आहे. त्याचीही या झाडाशी गट्टी फार. माहित नाही कुठून पण आपल्याच तंद्रीत आजूबाजूला बघत बघत, रमत गमत आपलं कुठल्या कुठे लुटूलुटू निघून येतं. भारी नादिष्ट. ते रोज माझ्याकडे “हे कोण नवीन” म्हणून नव्या कुतूहलाने पाहात असतं. थोडंस आंजारलं गोंजारलं की काल भेटले ती मीच होते अशी ओळख पटते आणि ते हटकून वर बघतं. ते झाडालाही पूर्वीची ओळख विचारते आहे आहे का? माझ्याप्रमाणे झाडही त्याच्याशी जुनी ओळख सांगते आहे का? झाडात आणि माझ्यात असलेले अनेक समान धागे शोधत शोधत या झाडाशी असलेली माझी ओळख अशारितीने अधिकाधिक गहिरी होत जाते.

कधीकधी वारा एकाजागी राम लक्ष्मण सीता खेळल्यासारखा स्तब्ध होतो आणि दिवस अधिकाधिक कोरडा भासायला लागतो. वातावरणात इतकी स्तब्धता असते वीस पावलांवरच्या रस्त्यापलीकडच्या देवळातल्या घंटीचा नाद लाटांची आवर्तने घेत माझ्यापर्यंत ये‌उन पोहोचलेला लख्ख जाणवतो. जीवाची तगमग होत राहते. मग हा वृक्ष वा-याला बोलावणे पाठवतो आणि चव-या ढाळल्यासारखी पाने, फुले माझ्यावर ढाळायला लागतो. आपण एका झाडाशी केलेले हितगूज ते झाड दुस-या झाडाला सांगत असेल का? सगळी कामं आटपून दुपारच्या वेळी ओसरीवर सुखदुःखाच्या गप्पा मारत असताना बाया एकमेकांना सांगतात तसं?  ते हितगूज वा-याच्या झुळुकीवर स्वार हो‌ऊन  दुस-या झाडांपर्यंत पोहोचत असेल का? मी वा-यावर ठेवलेले निरोप दूरदेशीच्या प्रियजनांना मिळतील का? मिळालेच तर ते माझ्याकडून आले आहेत हे त्यांना समजेल का?

उन्हं सावकाश, रेंगाळत रेंगाळत सरतात- खूप सारया गोष्टी करायच्या राहिल्यासारखी, बरंच काही बोलायचं राहून गेल्यासारखी. जायचं तर आहे आणि उद्या परत भेटायचंच आहे तरी पाय निघत नसलेल्या मैत्रिणीसारखी. रोज रोज यांना करायचं तरी काय असतं? बोलायचं तरी काय असतं? मला समजून घ्यायचं आहे पण नेहमीच समजतं असं नाही.

मांजराचे ते नादिष्ट पिल्लू. ते या झाडात रोज इतके काय पाहते तेही मला कळत नाही. तसंही- मी काय पाहते हे तरी मला कळतंय असं कुठंय?

या कळण्या-न कळण्याचा शोध घेता घेता झाडाभोवतालच्या माझ्या पावलांखेरिज असलेली पावल, पा‌ऊलखुणा यांतून  मला माहित नसलेल्या कित्येकांच, कितीकिती गोष्टींचं या झाडाशी असलेल्या ममत्व, मैत्र मला कळत जातं आणि मी मला पडलेल्या खूप सा-या प्रश्नांनी मी मुकी हो‌ऊन जाते. पण तेही मला फार भावतं. कारण या झाडाबद्दल माझ्या संदर्भात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी मला ते प्रश्नही पुरते समजून घ्यायचे आहेत.

दिवस झोपायला निघाला की मीही घराकडे निघते. महत्प्रयासाने माझं मन झाडावेगळं करुन मी झाडाखालच्या कोनाड्यामधून उठते. मागे वळून पाहते तो दिसतं की, वाचत बसलेल्या माझा ठसा अजून तिथे, त्या झाडाच्या खाली आहे. आपल्याकडे स्मृती असतात झाडांच्या तर झाडांकडे ठसे असतात आपले. असेच, आपण निघून गेल्यावरही रेंगाळणारे.. आपल्याबाहेर निघून आपल्याकडे पाहण्याचा अनुभव कितीशा लोकांना येतो?  ही मी-जी इथे उभी असलेली मी आहे, ती मी आहे. पण, ती-जी अजूनही झाडाखाली बसलेली मी आहे, ती त्या झाडाची मी आहे. पण तिच्यातही माझा अंश आहेच. आपण आपल्यातलं सूक्ष्मसं काहीतरी मागे सोडून आलो आहोत ही जाणीव खूप तीव्र आहे.

पण आपल्या स्मृतींमध्ये चकवे फार असतात. एखाद्या स्मृतीची वाट चालताना त्यांना एक-दोन वाटा फुटतात आणि मग हमखास चुकायला होतं.

त्या हरवण्याची भीती वाटते म्हणून अशा कित्येक संध्यासमयांची पुटं मी माझ्यावर चढवून घेतली आहेत. या जुन्या संध्यांच्या नजरेतूनच मी या नव्या संध्येचं अप्रूप पाहात असते.

मग ते झाड दररोज नव्याने माझ्या स्वप्नांमध्ये सूक्ष्मसं थरथरत राहतं.

’खोली’

हिरवट मातकट रंगाची उंचच उंच भिंत.

भिंतीवर हाताने सारवल्याचे अर्धवर्तुळाकार, नियमित ठसे.

त्या अर्धवर्तुळांच्या परिघावरचा पिवळट रंग आतवर हिरवट होत गेलेला.

वरवर चढत जा‌ऊन ती अंधारात मिसळून गेलिये. ती कुठेतरी संपते का?  की संपतच नाही?

विचार भयावह आहे आणि त्या भिंतीचं आव्हान मुजोर-ते येरागबाळ्याचे काम नोहे.

डोळ्यांना या कडेपासून त्या कडेपर्यंत ताणलं तरी भिंतीचा विस्तार डोळ्यांत मावत नाहीये.

डोळ्यांच्या कक्षेत न मावणारया त्या भिंतीत एकच काळंभोर शिसवी जोडदार आहे. शिसवी दारावर मंगलचिन्हे चितारली आहेत.

दोन्ही दारांवर पितळी कड्या आहेत, खुंट्याही पितळीच आहेत.

आणि..

त्या कडीला एक भलंमोठं पितळी कुलूप लटकतं आहे.

दाराला लागून एक मोठी खिडकी आहे.

असं वाटतंय की ते दार त्या खोलीची राखण करतंय आणि ती खोली त्या खिडकीतून सुटायचा प्रयत्न करतेय.


खिडकी आहे की कोनाडा?

खिडकीच असावी कारण कोनाडा अपारदर्शक असतो.


त्या खोलीचा जो भाग दिसतोय तो केवळ त्या खिडकीतून दिसतोय. पण त्याला निश्चित असं स्वरुप नाही.

तो देखावा त्या खोलीतलाच असेल असेही छातीठोकपणे सांगता येत नाहीये.

कारण तेजाळलेल्या त्या खोलीतला देखावा सतत बदलतोय. आतल्या वस्तूंच्या बाह्यरेषा विरघळतायेत, त्यांची मिती बदलतेय.

आत जे काही दिसतंय त्याला निश्चित आकार नाही पण..

आत काहीतरी आहे जे जीवघेणी ओढ लावतंय.

आत जे काही आहे त्याबद्दल वगैरे..इत्यादी..मध्ये त्रोटकच बोलता ये‌ईल पण त्या इत्यादीबद्दल तपशीलवार जाणून घ्यायची ओघ अनिवार आहे.

ती ओढ इतकी तीव्र आहे की त्यामुळे घशात आवंढा येतोय.

त्या भिंतीसमोरच इतकं कःपदार्थ, तुच्छ असल्यासारखं वाटतंय त्यावरुन खोली किती भव्य असावी याचा अंदाज सहज यावा.

पण..

खोलीत जायला हवंच आहे का? तिच्याबद्दल नुसतं ऐकणं पुरेसं नाही का?

हं!

की नकोच जायला?

आत जे नजरेस पडेल ते आपल्याला हवं तेच असेल का? आपण ज्याची जशी कल्पना केली होती तसं ते नसेल तर काय? आपला हिरमोड हो‌ईल का?

हो‌ईलच मुळी.

पण मग जावं की नको?

त्या खोलीत वेगवेगळ्या जगं जगता येणार होती म्हणून खोलीची ओढ होतीच पण,. त्या खोलीच्या भिंतींनी आपल्या आयुष्याचे साक्षीदार ही तहान आताआताचीच की आदिम आहे?

जा‌ऊयात.

नाहीतर नकोच.

जा‌ऊन तर बघुयात.

नकोच.

बरं...एक उपाय आहे

दोन बोटं धरली-चाफेकळी सुटली तर जा‌ऊयात, मधलं बोट सुटलं तर…बघुयात.

अक्कड बक्कड बंबे बो
अस्सी नब्बे पुरे सौ
सौ रुपये का धागा
चोर निकल के भागा

हात्तिच्या! मधलं बोट सुटलं- जायला नको?

हात्त! अक्कड बक्कड काय..जा‌ऊयात.

तर..

त्या शिसवी दारासमोर कोबाल्ट ब्लू रंगात मँगो येलोमध्ये वेलकम लिहीलेली डो‌अर मॅट आहे.

अंअं अंअंअं!

थोडंसं मागे जा‌ऊयात.

तर..

त्या शिसवी दारासमोर राखी लाल रंगाचं पायपुसणं आहे आणि त्या पायपुसण्यावर एक लखलखणारं पितळी घंघाळ आहे.

आणि त्या घंघाळात आहेत चाव्याच चाव्या. शे-दोनशे तरी असतील.

दारावरचं पितळी कुलूप त्या घंघाळातल्या फ़क्त एकाच चावीने उघडतं.

झालं! गळ्यातून गर्ळमगर्ळम..असे चित्रविचित्र आवाज फुटतात..साफ भंबेरी उडते..तंतरते.

पण..असं बघा ना.. पहिल्या फटक्यातच चावी मिळण्याचीही शक्यता आहेच ना?

मग खूप विचार होतो. एक-दोन चाव्या उचलून, मान हलवत पुन्हा घंघाळात ठेवल्या जातात.

चाव्यांवर बोटांचे अगणित ठसे आहेत. हं! खोलीचं औत्सुक्य बरयाच जणांना असणार-त्यात नवल ते काय! दारापाशी येणारी पावलं जेव्ह्ढी आहेत तेव्ह्ढीच जाणारी पावलं दिसतायेत.

पळपुटे साले!

पण आपण त्यातले नाही.

खूप विचाराअंती एक चावी उचलली जाते.

थरथरत्या हाताने पितळी कुलूपावरची आयताकृती पितळी झाकणी बाजूला करुन किल्ली कुलूपात सरकवली जाते.

जीव गोळा होतो,

ह्रदयाचे ठोके किंचीत वाढतात.

चावी फिरते.

खट्ट आवाज होतो

पण..

आवाज अर्ध्यातच अडकतो.

चावी मागे येते-पुन्हा फिरते.

खट्ट-पण अर्धच.

चावी पुन्हा मागे आणि यावेळी त्वेषाने कुलूपात फिरते.

पण तो हतबल करणारा अर्धवट खट्ट आवाज काही बदलत नाही.

चावी पूर्ण बाहेर काढून पुन्हा आत सरकावली जाते पण कुलूप जाम उघडत नाही.

कसं उघडणार?

ते कुलूप त्या चावीने उघडतच नसेल तर  आणि ती चावी त्या कुलूपाची नसेल तर?

घंघाळातून दुसरी चावी उचलली जाते.

फिरते-अर्ध खट्ट-मागे-जोरात फिरते-अर्ध खट्ट-दोनतीनदा त्वेषाने मागेपुढे---

पण त्या अर्ध्या खट्टचा जसाकाही सूर लागलाय

अर्ध्यातच तुटल्यासारखं वाटणारं ते खट्ट आपलं निर्ममपणे सुरुच राहतं.

It's going to take forever man.

Do I have what it takes? The Patience?

हो तर!

खोलीत काय आहे हे पाहायचं तर आहेच.

एव्हढं ऐकलंय आणि आता इथवर आलो आहोतच तर चार-पाच चाव्या आणखी लावून पाहू. हरकत काय आहे?

पण..

चार-पाच-दहा-पंधरा चाव्यांनीही ते कुलूप उघडत नाही.

भरीस भर म्हणजे इतक्या प्रयत्नांनंतर कुलूपाला लावून पाहिलेल्या चाव्या आपण पुन्हा घंघाळातच टाकून दिल्या आहेत अशी उपरती होते आणि आपण किंचीतसे खचतो.पोटात गोळा येतो.

आता कोणती चावी लावून पाहिलीये कोणती नाही हे कळायला काहीच मार्ग नाही.

एक अर्वाच्य शिवी हासडली जाते..घंघाळाला पायाची दाण्णकन ठोकर बसते.

स्वतःचा राग तर येतोच आहे पण त्या खोलीचाही राग यायला लागलाय.

एव्हढं काय आहे त्या खोलीत? घंघाळ काय, चाव्यांचे नखरे काय.

सरळ उघडायला काय जात होतं?

आपण खिडकीतून खोलीत वाकून पाहतो तेव्हा दिसतं की खोलीवर एक काळी छाया पसरली आहे.

पहिली चावी-दुसरी चावी-तिसरी-चौथी-पाचवी चावी
सहावी चावी-सातवी चावी-आठवी-नववी-दहावी चावी

यावेळी मात्र आपण वापरलेल्या चाव्या बाजूला ठेवण्याची खबरदारी घेतलिये.

वीस-पन्नास चाव्या लावून होतात पण कुलूप उघडल्याचा आशादायक आवाज काही कानावर पडत नाही.

आपली अस्वस्थता आणि खोलीबद्दलचा आकस एकदमच खदखदायला लागतात.

खिडकीतून दिसणारया खोलीत अंधारुन आले आहे.

अचानक रडू फुटतं.  दाराची विनवणी केली जाते, कुलूपाची करुणा भाकली जाते. हताश हो‌ऊन दाराला किल्ल्या फेकून मारल्या जातात पण दार आणि कुलूप दोघेही पूर्वीइतकेच ढिम्म.

आता डोक्यातली कलकल वाढत चाललिये.

पण नाही. इतक्यात हार मानायची नाही.

साठावी चावी-शंभरावी चावी-आपण चाव्या लावत चाललो आहोत

पण..

बहुधा त्या खोलीच्या मनात आपल्याला आत ये‌ऊ द्यायचे नसावे.

या विचारासरशी उमेद खचते, खांदे पडतात, कानशीलाजवळ आकसाची एक गच्चगोळा गाठ जाणवायला लागते.

पण आशेला अजून धुगधुगी आहे.

प्रयत्नांती परमेश्वरवर विश्वास आहे.

चार-पाच चाव्या अजून…

पण अ हं!

एव्हाना खिडकीतून दिसणारी खोली काळोखात बुडालिये. खोलीत गच्चमिट्ट काळोख पडलाय. जणू काही खिडकीवर कोणीतरी काळी पाटी ठोकून बसवलेली असावी.

आता त्या काळोखात डोळ्यांना स्थान नाही. किंबहुना कोणालाच स्थान नाही.

काय मिळवलं इतका प्रयत्न करुन?

कशासाठी आलो?

का आलो?

या खोलीच्या नादी लागून काय मिळवलं?

यापुढची चावी लागलीच तरी खोली अंधार पांघरुन बसलिये.

तिथे जा‌ऊन काय साधणार आहोत?

आपल्या मनात लाख असेल खोलीत जायचं पण खोलीच्याही मनात असायला हवं ना?

कुलूप उघडलंच आपण पण खोली आतून बंद असेल तर?

छे! तसा अनुभव कोणाला नाही.

पण पाहा ना-खोली फक्त उघडून आत जायला इतका खटाटोप-पुढे काय वाढून ठेवलं असेल?

हो, खोली पाहायचिये पण जीवाचा इतका आटापिटा करुन नाही.

फारफारतर दोन-तीन चाव्या..

पण या विचारांनी खोली आणि आपल्यातला दुरावा केव्हाचाच वाढलाय.

"कदाचित त्या खोलीत जाणं आपल्या ललाटी लिहीलेलं नसावं.."

इतक्या वेळ केलेल्या हजामतीमुळे हा विचार खूप सोयीचा वाटतोय, योग्य वाटतोय.

या विचारासरशी आपण आहे तिथेच थांबतो.

मोठा निःश्वास सोडतो.

त्या हिरवट मातकट भिंतीकडे पाठ करतो आणि खोलीपासून दूर जा‌ऊ लागतो.

तेव्हा घंघाळात फक्त एकच लखलखती किल्ली शिल्लक असते..आणि

खिडकीतून दिसणारी खोलीही नेहमीसारखीच उजळलेली दिसते.

वेदनेचा वाटसरु.

मेघना, पाठचा खो दिल्याला फ़ारसा वेळ नाही लोटला पण खो घेऊन बघता बघता वर्षं लोटली की! 

--

तर फ़ैज.

फ़ैजच्या कविता कशा आहेत हे सांगायला मला बरयाच प्रतिमांचा आधार घ्यायला लागणार आहे कारण त्याला, फ़ॉर दॅट मॅटर कुठल्याही ’चांगल्या’ कवीला सरळसोट शब्दांत मांडणं १ अधिक १  चं २ इतकं साधं नाहीये." कविता कशी वाटली?" या प्रश्नाला ’नाईस’ किंवा ’छान आहे’ इतकंच उत्तर देणं यांत डिप्लोमसीचा भाग खूप असतो. एकतर ज्याने आपल्याला ती वाचायला दिली त्याचं मन मोडायचं नसतं किंवा आपल्याला ती अजिबात सुधरलेली नाहीये हे दुसरयापासून लपवायचं असतं आणि समोरच्याला ती कळलेली असली तर त्याला कळते पण आपल्याला कळूच कशी शकत नाही हा सूक्ष्म गंड आणि त्याला दडपण्याकरता "व्हॉव्व्व्ह !" करत आलेला अहंकार खूप असतो.

कविता भिडली, आपण ती भोगू शकलो तरच ती आवडू शकते असं मला वाटतं. आपल्याला आवडलेली कविता आपल्यावरच लिहीली गेलिये इतपत ती आपली वाटते.  कवितेमुळे आपण असे समूळ हलतो की "हल्ल! आपल्यात नाहीच काही हललं" असं स्वत:ला निक्षून सांगत, पुन्हा पुन्हा बजावत आपण तिच्यापासून लपायला पाहतो. पण तरीही त्या जळ्ळ्या मेल्या कवितेने इतकी ओढ लावलेली असते  न राहवून, पुन्हा पुन्हा वाचत आपण तिला आयुष्यभराकरता पदरात पाडून घेतो. पुढे कधीतरी आपल्याला ती खिंडीत पकडते वगैरे आणि आपण सर्व बहाणे विसरुन  तिला शरण जातो. किंवा आपल्याला ती इतकी भुरळ घालते की ती पूर्ण दिवस, महिनोंमहिने झालंच तर वर्षोनवर्षे ती आपल्या डोक्यात छुमछुमत राह्ते. माझ्या डोक्यात कविता वाजते ती अशी वाजते.   मला समीक्षकांचं माहित नाही ऍंन्ड आय डोण्ट गिव्ह अ डॅम्न! याची नोंद घ्यावी. 

फ़ैजच्या कविता मोझेक टाईल्स सारख्या आहेत. बघायला गेलं तर शेकडो असमान रंगाचे, चित्रे असलेले, चित्रविचित्र आकारातले तुकडे मन मानेल तसे लावलेत असं वाटतं. बघायला गेलं तर ते फ़क्त वेगवेगळे पॅटर्न्स आहेत नाहीतर कोणाकोणाला त्यातून चेहरा दिसतो किंवा अख्खीच्या अख्खी कथा उलगडत गेल्यासारखी वाटते. एक दोर हातात घेउन रीळ सोडून द्यावं आणि ते बेटं लांबच्या लांब पसरत जावं अशा फ़ैजच्या कविता नाही. फ़ैजच्या कवितेत ज्याला रुढार्थाने ’सलगपणा’ म्हणतात तो नाही. फ़ैज पत्ते फ़ेकतो आणि म्हणतो की "घ्या! लागला सिक्वेन्स तर पाहा! "

कविता वाचल्या की माझ्या डोक्यात तरी त्या गद्य फॉरमॅटमध्येच इंटरप्रीट होतात. मग अनुवाद/रुपांतरावर आपण जे काही पद्य संस्करण करायचं ते करतो. कारण माझी व्यक्त होण्याची,  समजूत  पटण्याची पद्धत गद्य आहे. आणि फ़ैजने कविताच का लिहील्या असाव्यात? या मनात उठलेल्या प्रश्नावर ती त्याची व्यक्त होण्याची पद्धत असावी आणि मुख्य म्हणजे त्याचा ’कम्फ़र्ट झोन’ इतकं शहाणं-समजूतदार उत्तर मिळतं.

फ़ैजची ओळख ’आंधळ्याच्या गायी’तून झालेली, त्यामुळे त्या कवितेशिवाय माझ्या मनातला फ़ैज पूर्ण होणे नाही. आणि फ़ैज वेदनेवर हळुवार फ़ुंकर घालत, तिला जपत जपत-तिला धक्का लागणार नाही याची काळजी घेत लिहीतो त्याचं मला खूप अप्रूप आहे. त्याच्या कवितेत ’हार्श’, कठोर गोष्टी फ़ार कमी आहेत. त्याच्या कवितांमध्ये आहे हे सर्व असं आहे आणि तो आपलाच चॉईस आहे हा स्वीकार आणि समजूत आहे, तरीही त्या वाटेवर हार न मानता अखंड चालणं आहे, कुठलाही त्रागा नाही, वसवस नाही- या गोष्टी मला खूप भावल्या. कारण खूप ऑब्व्हियस आहे-त्याच्या वेदनांचा प्रवास हा माझा प्रवास आहे, कदाचित खूप जास्त इन्टेन्स!

मला जितका गुलझार आवडतो तितका फ़ैज आवडत नाही. पण फ़ैज कधीकधी सरसरुन भिडतो, त्यामुळे त्याचं देणं अमान्य नाहीच.

त्यामुळे सादर आहे-फ़ैज अहमद फ़ैज.

--

आए कुछ अब्र

आ‌ए कुछ अब्र कुछ शराब आ‌ए
उस के बाद आ‌ए जो अज़ाब आ‌ए

बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आ‌ए

हर रग-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बेनक़ाब आ‌ए

उम्र के हर वरक़ पे दिल को नज़र
तेरी मेहेर-ओ-वफ़ा के बाब आ‌ए

कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आ‌ए

न ग‌ई तेरे ग़म की सरदारी
दिल में यूँ रोज़ इन्क़लाब आ‌ए

जल उठे बज़्म-ए-ग़ैर के दर-ओ-बाम
जब भी हम ख़ानाख़राब आ‌ए

इस तरह अपनी ख़ामोशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आ‌ए

’फ़ैज़’ थी राह सर बसर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आ‌ए

मळभ येता..

वर मळभलेलं आकाश, हाती वारुणी -हे म्हणजे
वेदनांच्या आग्यामोहोळाला आयतंच आमंत्रण

आकाशाच्या सज्ज्यातून चंद्र तर दिसायला लागलाय एव्हाना
वारुणीतला सूर्य मात्र अजून चढायचा आहे

(मग)
रक्ताचा कण-न-कण असा काही धडधडून पेटतो
की त्या(वेदना) अशा चरचरीत नागड्या होऊन समोर ठाकतात

मग मी माझ्याच गतायुष्यात एक फ़ेरी मारुन येतो
तुझ्या प्रेमाचे आणि निष्ठेचे कितीतरी थांबे लागतात तिथे

मी असा माझ्या पोतंभर दु:खाचा हिशोब करत बसलेलो
की तुझी पिळवटून आठवण येणं किती अपरिहार्य

मी मनातल्या मनात कितीही बंड केलं तरी
(सत्य हेच आहे)
तुझ्या नावे डागलेल्या दु :खाचा आकांत कधी संपलाच नाही खरंतर

मी असा ध्वस्त, भणंग भटकतोय तेव्हा
दुसरयांच्या घरातल्या लखलखणारया मैफिली पाह्तो
(पण ठिक आहे मी म्हणतो)

(पण कधी तरी न राहवून)
माझं मौन दशदिशांनी किंचाळून उठतं
जणू काही कुठून तरी उत्तर मिळणारच आहे
(पण तसं कधी होत नाही)

(पण असंय की)
हा पूर्ण प्रवास फ़ैजची निवड होती
त्यामुळे जे चाललंय ते ठिकच म्हणायचं

---

मेरे दर्द को जो जबॉं मिले

मेरा दर्द नग़मा-ए-बे-सदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बे-निशाँ
मेरे दर्द को जो ज़बाँ मिले
मुझे अपना नामो-निशाँ मिले

मेरी ज़ात को जो निशाँ मिले
मुझे राज़े-नज़्मे-जहाँ मिले
जो मुझे ये राज़े-निहाँ मिले
मेरी ख़ामशी को बयाँ मिले
मुझे क़ायनात की सरवरी
मुझे दौलते-दो-जहाँ मिले

शब्दांची वळचण

माझ्या वेदनेचे ध्वनी
माझ्या अस्तित्वाची ग्वाही आहेत
जरा शब्दांची वळचण मिळाली त्यांना
तर मला माझीच ओळख पटेल

माझी अस्तित्वाची खूण पटली
तर मला विश्वाचं रहस्य कळल्याचा आनंद होईल
मला माझ्या सर्व गीतांच्या जन्माचे रहस्य कळेल
माझ्या मौनाला वाचा फ़ुटलीच कधी तर
तर अवघे जग माझ्या पायापाशी गोळा झाल्याचे वाटेल
दोन जगतातील दौलत म्हणतात-ती आणखी काय असते?

--

माझा खो राहुल आणि निखिलला, आणि संवेद , तू घेतलास तर!

नैनं छिन्दन्ति..

खबर पोहोचली होती.
ती- एहिमाया आल्याची खबर अज्ञातात कधीच पोहोचली होती.

--

एहिमायेला अज्ञातात यायचे वेध लागायचे तेव्हापासून अज्ञातात वेगळ्याच हालचालींना वेग यायचा. अज्ञातातील प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी पूर्वतयारीत असल्यासारखी दिसायची, आपापल्या भूमिकांची मन लावून उजळणी केल्यासारखी.
तसे म्हणायला तर अज्ञातात कित्येक यायचे-जायचे, परत यायचे-परत जायचे-नाही जायचे, नाहीसे व्हायचे. पण अज्ञाताला त्यांचं सोयरसुतक नव्हतं.  एहिमायेला शह द्यायचा अज्ञाताचा हट्ट तिच्या प्रत्येक प्रवासागणिक अधिकच वाढत जायचा,
काय अज्ञात? कोण एहिमाया?
अज्ञात म्हणजे एक उजाड माळरान होतं. नुस्तंच माळरान. ओकंबोकं, निर्मनुष्य.  ते सुरु कुठून व्हायचं हे नक्की कोणालाच माहित नव्ह्तं, संपतं कुठे हे तर त्याहून माहित नव्हतं. अज्ञाताविषयी माहित असलेली मर्त्य माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. त्यांनी अज्ञाताचं वर्णन करायचं म्हटलं असतं तर प्रत्येकाकडून वेगवेगळं वर्णन ऐकायला मिळालं असतं. असं रंगबदलू, कपटी आणि विखारी. त्याला कुठलीही कुंपणं घातलेली नव्हती की त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देणारा कुठलाही फलक तिथे लावण्यात आला नव्हता.
ते फ़क्त ’होतं’.
अज्ञातात प्रवेश करणारया माणसाला दुसरं काही कळो न कळो, त्याच्या आत सारखं काहीतरी खदखदतं आहे हे जाणवायचं. हे काहीतरी वेगळं आहे हे जाणवून अस्वस्थ वाटायला लागायचं, मानेवर कोणाचा तरी जड श्वासोच्छवास रेंगाळतोय, आपल्या मागावर सतत कोणीतरी आहे असं वाटायचं.
अज्ञात प्रत्येकाच्या मागावर असायचा.
अज्ञाताच्या पिंजरयात कोणी सापडला की अज्ञाताला पुढचे कित्येक महिने बघायला लागायचं नाही. त्या माणसाच्या तडफ़डीवर, ससेहोलपटीवर त्याचं व्यवस्थित भागायचं.
हो, अज्ञात मनुष्यभक्षी होता.
कुठल्याही ठिकाणाहून उभं राहून त्याच्याकडे पाहिलं तरी तो अमर्यादच दिसायचा. दोन्ही हात ताठ पसरुन त्याला कवेत घ्यायचं म्हटलं तरी मावायचं नाही इतका त्याचा विस्तार होता. डोळ्यांच्या टप्प्यांत सामावून घेता यायचं नाही. डोळे चिडचिडायचे. मग त्याला बिचकून आणखी दूर सरायला व्हायचं. सापाच्या खवल्यांसारखी दिसणारी भेगाळलेली जमीन आकाशाकडे आ  वासून पसरली होती.  गर्द तपकिरी कातडीवरच्या लालकाळी गळवं दिसावीत तशी दिसणारी खुरटी खुडुपं अधून मधून उगवलेली दिसत होती. त्यातली बहुतेक सर्व काटेरीच तर काही लालसर विषारी फ़ळं अंगावर बाळगणारी. थोडक्यात असून नसल्यासारखी. समोर लावलेली नजर थोडी उचलली की आकाश डोळ्यात यायचं, खुपायचं. त्या जमिनीवर निकोप सकस काही वाढत नसावंच कारण आकाशाला आव्हान देत सरळ उंचच उंच गेलेलं एकही झाड नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. दूरदूरवर पसरलेली ती वांझ, वैराण जमीन तपकिरी धुळीने बरबटलेली होती आणि त्या तपकिरी धुळीत होते अगणित पावलांचे ठसे.
शेकडो, हजारो..अहं-लाखो ठसे. एकमेकांत गुंतत गेलेले, ठाम रोवलेले, लडखडत गेलेले, काही मध्येच नाहीसे झालेले.
किती आले-किती गेले
किती ’गेले’?
हिशोब कोणी ठेवला नव्ह्ताच. कोण ठेवणार? अज्ञाताच्या बळींची संख्या मोजण्याचा संकेत तिथे नाही. ते शिष्टसंमत मानलं जात नाही. पण ती पावलं त्यांच्या तप्तपदीची मूक कहाणी सांगत त्या माळरानावर कधीची पडून आहेत. यापुढेही राहतील, कितीतरी नवी पावलं त्यांना येऊन मिळतील.
तर असा हा अज्ञात.
सूर्याच्या प्रखर प्रकाशात  झगमग झगमग  झगमगणारा..रणरणणारा. डोळ्याला पाण्याच्या धारा लावणारा, भगभगायला लावणारा, जाळणारा आणि सरतेशेवटी आंधळं करणारा.
तिथे रात्र व्हायची नाही. डोळ्यांपुढे कायम प्रकाश पाहून डोळे शिणून जायचे, काढून ठेवावे वाटायचे.
अज्ञातात एकच टप्पा असा होता जिथून असंख्य वाटा असंख्य गंतव्य स्थानांपर्यंत जाऊन पोहोचत होत्या. कोणती वाट निवडणार यावर मग त्या वाटेने चाललेल्याचं विधिलिखित ठरायचं. अज्ञातातून सुटण्याची एकच संधी त्या वाटांमधल्याच एका वाटेमध्ये होती.
त्या टप्प्यावर-तिथे ती जमिनीवर पडली होती. ग्लानीने तिचा ताबा घेतला होता.
एहिमाया.
एहिमाया भान हरपून पडल्याचे ऐकून अज्ञात खदाखदा हसला होता पण दुसरयाच क्षणी व्यथितही झाला होता.
एहिमाया आणि त्याचा संघर्ष खूप जुना, त्यामुळे दोघानांही एकमेकांची ओळख पार खोलवरुन पटलेली.
अज्ञातात प्रवेश केल्यापासून एहिमायेच्या प्रवासावर असंख्य नजरा असायच्या-अज्ञातासह. तिची वाट चुकल्यावर हळहळायच्या, नेमकी वाट घेतल्यावर चित्कारायच्या. अज्ञाताला शह देणारं जर कोणी आहे तर ती एहिमायाच याची बरयाच गोष्टींना खात्री होती.
एहिमायेला हे माहित होते का?
माहित नाही.
तिला त्याचं सोयरसुतक होतं का?
तेही माहित नाही.
एहिमायेला फ़क्त प्रवास करणं माहित होतं.

एका प्रवासावरुन परतलं की तिला दुसरया प्रवासाचे वेध लागायचे. अज्ञातातल्या या वाटा तिला हाका घालायच्या, तिला यायलाच लागायचं.  कुठल्यातरई प्रकारचं एन्शियण्ट कॉलिंग असावं तसं.
गेले कित्येक महिने ती या वाटांवरुन प्रवास करत होती. त्यांना चाचपून, परखून पाहात होती. पायाला भिंगरी लावून आणि मनाशी काहीतरी योजून तिने काही महिन्यांपूर्वी हा प्रवास पुन्हा एकदा सुरु  केला होता. तेव्हापासून ती अखंड चालत होती.
इतकी वर्षं अज्ञातात प्रवास करुनदेखील आतापर्यंत एकाही वाटेवरुन परत एकदा प्रवास करतोय असं व्हायचं नाही आणि तिला अचंबा वाटायचा. आपण नव्या वाटा घेतो की त्या आपल्याला मिळत जातात? की आपण त्याच जुन्या वाटांना नवीन समजून प्रवास करत राहिलो?
अज्ञातात काहीही घडणं शक्य होतं.

--

पण यावेळी पारडं अज्ञाताच्या बाजूने झुकलेलं होतं-जे याआधी कधीही झालं नव्हतं.
यावेळच्या प्रवासाने तिचा अंत पाहिला होता.
जागृती आणि भान हरपण्याच्या उंबरठयावर हेलकावे खात अखेर ग्लानीने एहिमायेचा झोक गेला तेव्हा आपण ’त्या’ ट्प्प्यावर येऊन पोहोचलो आहोत एव्हढंच तिला कळलं आणि तिची शुद्ध हरपली.
सर्व जण् पाहात होते..झुडुपं, प्रकाश, माती, वाटा, वारा.
गुपचूप. चिडीचुप.
सर्व अज्ञाताचे गु्लाम, त्याची चाकरी करणारे. त्याच्या इशारयांवर नाचणारे.
पण वारयाला राहवलं नाही. एरव्ही त्याने धाडस केलं नसतं पण इथे एहिमायेचा प्रश्न होता.
अज्ञाताच्या हुकुमाविरुद्ध तो निघाला आणि थोड्या काळजीनेच एहिमायेपर्यंत जाऊन पोहोचला.
त्याने तिला हाक घातली पण काहीही प्रतिसाद आला नाही.
यावेळी काही निभत नाही दिसतंय पोरीचं म्हणत त्याने  धडधडत्या काळजाने एहिमायेच्या श्रांतक्लांत चेहरयावर फुंकर घातली.
चेहरयावरची धूळ फ़र्रकन् उडाली आणि जडावलेल्या पापण्या सावकाश उघडल्या.
प्रकाशाची प्रखरता सहन न होऊन मिटल्या. पण निग्रहाने उघडल्यासारख्या पुन्हा उघडल्या.
अपार थकलेले पण काळेभोर, चमकदार डोळे समोरच्या वाटेवर स्थिर झाले.
प्रचंड आनंदाने वारयाच्या तोंडून शीळ सुटली आणि एहिमायेच्या चेहरयावर इवलंसं, थकलेलं हसू फुललं.
ज्या वाटेच्या शोधात ती गेले काही दिवस वणवणत होती ती अखेरीस तिच्यासमोर दृश्यमान झाली होती. कोपरांवर शरीर तोलत ती हलक्या अंगाने उठून बसली आणि पुन्हा पडली. आपल्या शरीरातला उर्जेचा शेवटचा थेंबही या रखरखाटाने शोषून घेतलाय हे तिच्या लक्षात आलं.
पण आता काही मिनीटांचाच प्रश्न होता.

--

तिने डोळ्यावर हात धरुन दूरवर नजर लावली.
सुस्त अजगरासारखा दिसणारा धुळमटलेला हस्तिदंती रस्ता वेटोळे घेत घेत पाsssर नजर पोहोचेल तिथवर गेला होता.
ती या वाटेवर याआधी येऊन गेली होती का? तिने डोळे मिटून कपाळातून डोक्यात झाकून बघितलं पण आतून पक्की ओळख पटेना. तिने एकवार मागे बघितलं, मग पुन्हा वाटेवर नजर लावली. नाही.
त्या  तपकिरी समुद्रात तीच काय ती ह्स्तीदंती वाट होती.
मग मात्र परक्या ठिकाणी वाट भरकटून गरगरा फिरत असताना, सैरभैर झालेलो असताना कोणीतरी ओळखीचं भेटावं तसं सुटल्यासारखं वाटलं.
शरीरात तेव्हापर्यंत कोंडलेली गरम-गच्च हवा फ़स्सदिशी बाहेर आली तसं तिला हल्लख वाटलं, जिथे पोहोचायचं आहे ते समोर दिसत असताना शेवटच्या काही पावलांना लडखडावं तसं.. ताप येऊन गेल्यावर वाटतं तसं. शीण येतो तसं.
शीण..?
शीण ही मोठी अजब भावना खरी. तिच्यासारख्या फ़िरस्ता प्रवाशाला अजिबात न परवडणारी, प्रचंड घातक. बसलात की संपलात. गळून गेलात की संपलात. हार मानलीत की संपलात.
गती कमी-जास्त करा हवं-तर-पण थांबायचं नाही.
मग आपण आपोआपच चालत राहतो. मंद-गतीमान-खुरडत-रांगत-पाय ओढत. थांबायचं तर नसतंच या वाटांवर पण वाटलंच आतून तरी थांबता येत नाही. शरीराला सवय होऊन बसते या प्रवासाची.
आता तिला वाट तर मिळाली पण आता त्या वाटेने तिच्यावरुन आपल्याला जाऊ द्यावं म्हणून तिला काहीतरी देणं द्यायला लागणार होतं. तिलाच नव्हे तर या वाटेने जायचा निर्णय घेणारया प्रत्येकालाच द्यायला लागायचं.
प्रत्येक गोष्टीची किंमत ही असतेच. ती चुकवायला लागायचीच आणि चोख असायला लागायची. ती किंमत भरायला पात्र असल्याचा आव आणता यायचा नाही. कशातही कसलीही भेसळ असायला नको होती. या भावना चोख नसल्या की पांथस्तांचं काय होतं हे तिने आपल्या डोळ्याने पाहिलं होतं. तिच्यासारखाच प्रवासाला निघालेला वाटसरु  होता तो. पण खोटा, खोट्या मनाचा, खोट्या विचारांचा. आपल्या खोटेपणाला कसले कसले मुलामे लावून , तेच घोटलेले संवाद म्हणत तो जगात वावरायचा.एहिमायेला असलं काही समजत नाही, तिला सगळंच चांगलं वाटतं पण वाटेपासून काही लपत नाही. वाट तुमच्या आत आत जाऊन नेमकं काय ते शोधून काढते, खरं काय ते बघून घेते. तिच्या डोळ्यादेखत धूळ धूळ होऊन गेली होती त्याची आणि मग तो हवेत विरुन गेला होता. ती अवाक होऊन पाहत राहिली होती. इथून अंतर्धान पावलेल्या लोकांचं काय होतं हे तिला माहित नव्ह्तं पण तिने कहाण्या भरपूर ऐकल्या होत्या. त्यांना म्हणे नृशंस आगीत जळायला लागतं, थंडीत काकडावं लागतं,  त्यांना सुर्या-सुयांनी टोचून टोचून अर्धमेलं केलं जातं. त्या प्रदेशात फ़ेकून देऊन बाहेरुन कुलूप लावुन घेऊन त्याच्या चाव्या कुठेतरी मगरी-सुसरींनी भरलेल्या खोल तलावात फ़ेकून दिल्या जातात म्हणे.
ती शहारली होती.

--

एहिमायेचा आतापर्यंतचा प्रवास रणरणणारया उन्हातून झाला होता. डोक्यावर लंब पडणारे  ऊन, मस्तकशूळ उठवणारं ऊन, भाजणारा जाळ तो ही प्रत्येक मिनीट,दिवसाचे चोवीस तास. नावाला कुठे सावली नव्हती. खुद्द त्या वाटा सावल्यांच्या  इतक्या तहानलेल्या होत्या की येणारया जाणारया पांथस्थांच्या सावल्या जमिनीत शोषून घेतल्या जायच्या. खुद्द आपल्या सावलीत आसरा घ्यायची सोय नव्ह्ती या वाटांवर. पण एहिमाया?ती आव्हान घेतल्यासारखी चालत राहायची, वाटांवर हसायची, तिच्या सावलीवर त्यांना अवलंबावं लागतंय म्हणून त्यांना वाकुल्या दाखवायची. पण हे सर्व अर्ध्या वाटेपर्यंत. अर्धी वाट संपली तरी वाटेचा तिला शोषून घ्यायचा जोम तसाच राहयचा आणि ती मात्र थकून गळून जायची.प्राण कंठाशी यायचे.
यातून सुटका करुन घ्यायचा मार्ग होता, अज्ञाताकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय होता. तिच्याआधी कित्येकांनी अवलंबला होता. त्यासाठी खूप मोठी किंमत मोजायला लागायची पण या वडवानलापासून सुटका तरी व्हायची.
तुम्हाला तुमचा आत्मा वाटेला विकायला लागायचा.
त्याच्या मोबदल्यात ती वाट त्याला चुकूनही त्रास द्यायची नाही. दिला असता तरी तो झाला नसता, आत आत वर पोहोचला नसता हे त्या अभाग्यांना कळायचंच नाही. ते आपल्या सावल्या आपल्यापाशीच आहेत,. डोक्यावरचा दावानल  आपल्याला उभा जाळत नाहीये या आनंदात चूर असायचे. पण त्यांना आनंद तरी कसा होत असेल? वाटेने त्यांच्यातून आत्मा शोषून घेतला असताना?
कुणास ठाऊक?
पण वाटांवर वाटा पार करुन आता ती वाटेपाशी आली होती, तिला शरण आली होती तेव्हा ती तेव्हापर्यंतच्या प्रवासाने काळपटलेली होती, करपटलेली होती, डागाळली होती.
पण किमान इथे सावलीसाठी तिला आत्मा विकावा लागणार नव्ह्ता.
या जगावर अज्ञाताची सत्ता चालत नव्हती. इथे त्याला बघ्याखेरीज कोणतीही भूमिका नव्हती. ज्याच्याकडचं श्रेयस जसं तशी त्याला ही वाट सापडायची. नाहीच सापडली तर तो वेडा व्हायचा, सततच्या लखलखत्या अज्ञातात त्याला भ्रम होऊ लागायचे आणि मग एके दिवशी तो अज्ञातात कुठेतरी नाहीसा होऊन गेलेला असायचा.

--

तिने एक दीर्घ श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यांच्या प्रवासात, आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात जपून ठेवलेली निरागसता, समर्पणाचं अर्घ्य देऊ केलं केलं तेव्हा वर्षनुवर्षे तहानलेल्या जमिनीवर पाण्याचे थेंब पडावेत तसा सुवास आला, तिच्या पायाखालची माती थरथरली आणि तिच्या आणि त्या अजगरामधला वरवर पातळ वाटणारा पापुद्रा दूर झाला.
वाट खुली झाली होती.
प्रवास संपवण्याच्या आधी तिला आपल्या आत्म्याच्या भोवती लपेटलेली कातडी गुलझार करुन घ्यायची होती. घाव भरुन घ्यायचे होते. शक्य झाल्यास या प्रवासाचे वळ, चट्टे आपल्या शरीरावर कुठेही दिसू नये याची खबरदारी बाळ्गायची होती. तिच्या मनातल्या विचारांचा माग लागल्याप्रमाणे वाट खंतावली, सुस्कारली, वाटेच्या विचारांचं आवर्त तिच्या पायापाशी उठलेल्या चिमुकल्या वावटळीतून एहिमायेच्या पायापाशी भिरभिरलं.
तिने खाली बसून वाटेला थोपटलं होतं. या वाटांच्या मनात तिच्याबद्दल कुठेतरी नाजूक कोपरा होता हे तिला माहित होतं. पण तिला जे करायचं होतं ते करायला तर हवं होतंच, ते कधीच चुकलं नव्हतं, आताही चुकवून चालणार नव्हतं. वाट तिच्या रस्त्यात येणार नव्हती.
अज्ञाताला कितीही वाटलं तरी तिच्या रस्त्यात येता येणार नव्ह्तं.
मागे वळून पाहिलं तसं तिच्या ध्यानात आलं की वाटेने आपला पापुद्रा पुन्हा ओढून घेतलाय.
पापुद्र्याच्या पलीकडून इतर फ़िरस्त्यांना आपल्याला जे दिसतंय तेच आणि तसंच दिसत असेल का? असा प्रश्न तिला नेहमी पडायचा. कोण जाणे! कोणाला विचारणार आणि कोण सांगणार?
तिने वाटेवर नजर लावली तशी या वाटेचं वेगळेपण तिच्या लक्षात येऊ लागलं.
वाटेचा बहुतेक भाग काळ्याशार सावल्यांनी व्यापला होता आणि उरलेल्या भागात अज्ञातातल्या इतर वाटांवर होता तसाच प्रखर प्रकाश होता.पांढरया काठपदराच्या काळ्या लुगड्यासारखी दिसणारी ती वाट वळणं घेत घेत क्षितीजापलीकडे जाऊन संपली होती. सावल्यांचं काळं कितीतरी अधिक काळं होतं एव्हढं मात्र खरं. कागद फ़ाटेपर्यंत पेन्सिलीने गरागरा गिरवत बसलं खूप वेळ, बराच वेळ की दिसतं तसं.
तिच्या होरपळ्लेल्या शरीराला आता सावलीचे वेध लागले होते.
हां! इथे मात्र हवा तितका वेळ थांबायची परवानगी होती. इथे चालत राहायलाच हवं अशी पूर्वअट नव्ह्ती.
काहीक जण इथे थांबून खुद्द एक सावली होऊन गेल्याच्या कथाही तिने ऐकल्या होत्या पण त्यांचं काय चुकलं? होरपळीनंतर इथे थांबून राहण्याची त्यांची इच्छा तिला कळू शकत होती. कारण आता खुद्द तिलाही थांबायचं होतं, कुठेतरी टेकायचं होतं. शरीराची तल्लखी, जिवाची कहिली कमी करायची होती(जर झालीच तर!)
सावलीत शिरली तशी प्रखर प्रकाशाची सवय असलेल्या तिच्या भगभगणारया डोळ्यांना काही दिसेनासं झालं. प्रकाशाची लाल-पिवळी वर्तुळे डोळ्यांसमोर फ़िरत फ़िरत अ़ंतर्धान पावली. आपण आपले डोळे मिटून घेतलेत की ते उघडेच आहेत हे पाहायला तिने डोळ्यांची उघडझाप करुन बघितली. पण नाही, डोळ्यांत बोट घातलं तरी समजणार नाही इतका अंधार होता.
या जगात डोळ्यांना स्थान नव्हतं.
बरंच होतं एका अर्थी ते!
सावलीचा थंडावा डोळ्यांपासून समके़द्री वर्तुळांमध्ये पसरत पूर्ण शरीरात पसरला तशी ती विसावली. झाडापासून साल विलग व्हावी तसा तिच्या शरीराभोवतीचा करपटलेला, काळा पापुद्रा तिच्या शरीरापासून विलग होऊ लागला आणि भोवतालच्या सावल्यांमध्ये जाऊन मिसळला आणि तिच्याभोवतालाच अंधार जरा जास्तच गडद झाला. तिथल्या अंधारात हालचाल व्हायला लागली, अंधार ढवळला जायला लागला. सावल्यांमधली खदखद लख्ख ऐकू येत होती आणि त्यांच्यातून येणारे खराब रेडीयोतून आल्यासारखे वाटणारे आवाज यायला लागले होते.
हा तर तिचाच आवाज होता. वरवर अतिशय ताठ, निग्रही पण आतून तुटलेला, मोडलेला, पिचलेला आणि चिरकलेला. आतआत गाडून टाकलेला. आता या सावल्यांमधून येताना अधिकाधिक हिणकस वाटणारा.
जणू ते आवाज त्या सावल्यांवर टोचून ठेवले गेले होते. बिब्ब्यावर टोचून ठेवलेल्या सुयांसारखे. वर आकाश तर नव्हते पण त्या मिटट काळ्या अंधारातून अक्षरं गळून पडत होती. पत्रांतले मजकूर..ती अक्षरं मध्येच कुठेतरी पेट घेत होती आणि राख राख होऊन खाली पडत होती. त्या अंधारात अग्निफुलांच्या ठिणग्या दिसाव्यात तशी दिसत होती. काही धूसर होत चाललेले चेहरे, काही कालच पाहिल्यासारखे सुस्पष्ट दिसणारे चेहरे नजरेसमोर लहानमोठे होत राहिले, जवळ-लांब जात राहिले. चिरकलेल्या, तारसप्तकातले संवाद थांबून थांबून कानावर आदळायला लागले.
जिव्हारी लागलेले घाव जोराने ठसठसायला लागले, शरीरभर झालेला विखार उमळू लागला.
आणि मग तिची शुद्ध हरपली.

--

हे सर्व कितीतरी काळ सुरु राहिलं.
माहित नाही किती मिनीटे उलटली की तास?
दिवस उलटले की महिने?
वर्षे उलटली की तपे?
सावल्यांच्या वळ्चणीला ती काय माहित किती वेळ बसून होती.
जखमा भरल्या, त्यावर खपल्या धरल्या, वळ-व्रण नाहीसे झाले, करपटलेली कातडी मऊसूत झाली.
काही काळापूर्वी मेंदूत कालच पाहिल्यासारखे सुस्पष्ट दिसणारे चेहरे धूसर दिसायला लागले.
सावल्यांनाही तिची सवय झाली.
पण तिला सावल्यांची सवय झाली का?
इतका सारा वेळ टिकटिकणारया काळाची आणि चार हात अंतरावर सुरु होणारया त्या प्रकाशमान पट्ट्याची जाणीव अधिकच धारदार होत गेली होती. सावलीच्या थंडाव्यात तिला विलक्षण काकडल्यासारखं व्हायला लागलं. कसलाही त्रास नव्हता तिथे पण कसलाही त्रास नसल्याचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. सावल्यांनी तिला आपलंसं करुन घ्यायचा, त्या जगाची आश्वस्तता पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न चालवला होता. पण ती आपली दर सरते क्षणी पलीकडच्या चंदेरी पट्ट्याकडे याआधी कधीही न पाहिल्यासारखं पाहात राहायची. सावलीच्या काळ्यातून तो दिसायचाही विलक्षण लोभस.
या काळ्या शाईसारख्या अंधाराचा तिला उबग आला.
एके दिवशी मात्र ती उठली आणि त्या प्रकाशमान पट्ट्याच्या दिशेने चालू लागली.
सावल्यांनी तिला आण घातली, तिचे गतायुष्य़ तिच्या डोळ्यासमोर सरकवून तिला भिववण्याचा प्रयत्न केला पण एहिमाया कशानेच बधली नाही. तिने ते सारं कधीच सावल्यांना अर्पण केलं होतं, ती ते कधीच मागे सोडून आली होती. सावल्यांना ते तिच्याविरुद्ध वापरता आलं नाही.
शेवटी हार मानून सावल्या मागे सरल्या.
लाट ओसरवी तशा मागे मागे जात राहिल्या.
एहिमाया प्रकाशापर्यंत पोहोचली आणि तिने त्या पट्ट्यात पाऊल टाकलं.
ते ऊन तिच्या गात्रांगात्रांमधून पसरु लागलं तशी शरीरभर शब्दांत वर्णन करुन सांगता येणार नाही अशी ऊब पसरली. शांतवलेल्या कातडीआड लपलेले चट्टे आक्रोशू लागले तशी तिला असह्य सुख झालं.भगभगणारया जमिनीवर पाण्याचा शिडकावा मारल्यावर जमिन शांतवते तसा तिचा जीव शांत झाला. सावल्यांमध्ये राहताना काहीतरी खुपत होतं, टुपत होतं हे नाहीसं झालं.  डोळे आभाळाकडे करुन त्या दावाग्नीत ती तशीच निथळत उभी राहिली आणि आपल्याला नेमकं काय सलत होतं हे तिला कळलं.
तिच्या डोळ्यातून एकच थेंब ओघळला आणि थप्प करुन वाटेवर पडला. निर्वाणीचा अश्रू, समजूत पटल्याचा अश्रू.
वाट सुस्कारली, तिच्याबद्द्लच्या कणवेने वाटेचं मन भरुन आलं.
हिने आपल्यापाशी कधीच परतू नये असं वाटेला वाटायचं, आधीच्या आगीत तिने जळून, होरपळून राख व्हावं, अज्ञातने तिचा घास घेऊन टाकावा एकदाचा- जेणेकरुन एहिमायेचा झगडा संपेल, तिला होणारा असह्य त्रास वाचेल, तिची ससेहोलपट वाचेल. पण एहिमाया नेटाने येत राहिली, प्रवास करत राहिली, होरपळून घेत राहिली, शांतवून घेत राहिली, पुन्हा प्रवासाला चालू पडू लागली. इतक्या सहजी हार मानणारा तो जीवच नव्हता.

वाट आहे तशी फ़क्त एहिमायेलाच दिसायची. हे तिला माहित नव्ह्तं,  माहित असायचं कारण नव्ह्तं. एहिमायेखेरिज फ़ार थोडे असे होतेजे  धडपणी बाहेर गेले होते. इथून बाहेर पडण्याची एकच वाट होती ती म्हणजे त्या  वडवानलाची, अज्ञाताची. जेवढ्या लवकर तुम्ही या सत्याचा स्वीकार करताय तेवढ्या लवकर तुम्हाला त्या वाटेवरुन बाहेर येता यायचं. दुसरी वाट होती पण ती तुम्हाला चकवायची, अज्ञात आता तुमच्या आयुष्याचा भाग कधीच नसणार आहे असा भ्रम होईपर्यंत फ़िरवत ठेवायची. त्या भ्रमातून बाहेर येईपर्यंत परतीचे रस्ते बंद झालेले असायचे. असे अनेक जण तिथे  सावल्या बनून आक्रोशत साचून गेले होते.  "आम्ही चुकलो, आम्हाला परत जाऊ द्यात!" म्हणून त्यांचा विलाप चालला होता. पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आणि  वेळ कोणालाही चुकलेली नव्हती. त्या सावल्यांच्या अंधाराने ती वाट म्हणजे अधिकाधिक काळेकुट्ट होत चाललेले गचपण होत चालली होती. ती काळीकभिन्न वाट फिरस्त्यांना चकवायचा प्रयत्न करत होती, आपल्या कवेत आढून घ्यायचा प्रयत्न करत होती-तो प्रयत्न एहिमायेवरही पुन्हा पुन्हा केला गेला होता पण एहिमाया तिथे कधीही जाणार नव्हती याची वाटेला खात्री होती. गेले कित्येक प्रवास तिने असेच याच वाटेने अशाचप्रकारे प्रवास करुन संपवले होते. कारण ती वाट म्हणजे मायेच्या विधीलिखितातला एक पूर्वरचित ट्प्पा होता. वाटेलाही मुक्तता मिळायची होती आणि ती ही याच एहिमायेच्या हातून. पण त्याला वेळ होता.
एहिमाया पुन्हा तिथे येणार होती...आणखी एकदा..आणखी एकदा..
तोपर्यंत तरी वाटेला तसंच पडून राहायचं होतं.
एहिमायेने वाटेचा निरोप घेतला तेव्हा ती नव्या उमेदीने बाहेरच्या डोळे दिपवणारया वडवानलाला सामोरी जायला तयार झाली होती. 

तेच तिचं विधीलिखित होतं, भागधेय होतं, जगण्याचा उद्देश होता. त्यापासून तिला पळून जाता आलं नसतं. कधीच आलं नसतं.
त्या तेज:पुंज प्रकाशात तिला पाठमोरी चालत जाताना पाहताना वाटेने पापुद्रा ओढून घेतला.
वाट बंद झाली होती.
आणि एहिमायेच्या डोक्यातल्या या वाटेवरच्या आठवणी धूसर होऊन गेल्या होत्या. कोणीतरी फ़ळा पुसून लख्ख करावा पण आधी गिजबिजून ठेवलेल्या अक्षरांचे पुसट अवशेष दिसत रहावे अगदी तसेच. आपण ही वाट या अगोदर घेतली होती हे ही तिला कदाचित आठवलं नसतं.
तिने सहज मागे वळून पाहिलं तर तिथे फ़क्त उजाड माळरान दिसत होतं.
आता ती पुन्हा अज्ञातात आली होती.
ती हसली.
अज्ञात हसला.
झुडुपं, प्रकाश, माती, वाटा, वारा सगळे हसले.
एहिमायेचा प्रवास पुन्हा एकदा चालू झाला होता.

 
Designed by Lena