’न’गोष्ट.

गिरगावच्या चौपाटीवर निम्मीने त्याला ठार केलं.

’त्या’ने तिथे यायला नको होतं तिला,
निम्मीने तसं निक्षून सांगीतलं होतं.
पण ’तो’ आला
नको ये‌ऊ सांगितल्यावरही आला..
तिने पाय घालून त्याला पाण्यात पाडलं आणि पाण्याखाली दाबुन धरलं
तो पाण्यातल्या पाण्यात धडपडला, तिचे हात काढून टाकायचा प्रयत्न केला.
हळूहळू त्याची धडपड शांत होत गेली मग पूर्णच थंडावली
शर्टाचा फ़ुगवटा सावकाश आत जात राहिला
आणि तिने सुस्कारा सोडला..

--

निम्मीच्या आठवणींची सुरुवात जिथून होते
तिथपासून निम्मी आणि ’तो’ एकत्रच आहेत

शाळेच्या पहिल्या दिवशी तायडीने वापरलेली पुस्तकं
आ‌ईने हातात कोंबली
तेव्हा तिचे डबडबलेले डोळे फ़क्त ’त्या’लाच दिसले
’मी आहे ना!’ अशा अर्थाच्या आश्वासक नजरेने
मग पुढं बरीच वर्ष सावलीसारखी सोबत केली-
तायडीचे कपडे,
तायडीची खेळणी,
तायडीच्या यशाने जुनं होणारं निम्मीचं यश
या सगळ्या शिळेपणातून येणारया वांझोट्या संतापावर
तिने ’त्या’च्या जोडीने मार्ग शोधला तो-
पानांत सदैव पहिल्या पडणारया थालिपीठात,
वाढदिवसाला सर्वात पहिल्यांदा मिळणारया केकमध्ये,
ट्रेनमध्ये सदैव मिळणारया विंडो-सीटमध्ये,
लहान असल्याचं भांडवल करुन मिळणारया सर्वच गोष्टींमध्ये
तिने या सेकंडहॅंडेडनेसचं पुरेपूर उटटं काढलं
तायडीला सेकंडहॅंड नवरा मिळाला तर काय मजा ये‌ईल?
यावर तिनं ’त्या’च्याशी चवीने चर्चा केल्या.
’तो’ जास्त काही बोलत नसे. एखाददुसरा शब्द बस्स! सोक्षमोक्ष लावल्यासारखा.
"मी आहे!"-इति ’तो’

--

कधीकधी ती ’त्या’च्यामुळे डिफ़ा‌ईन होते असं तिला वाटे, तो तिच्यामुळे नाही.
पुढे त्याची जागा मिन्वाने घेतली
हळूहळ तो श्वासोच्छवासा इतका महत्वाचा झाला
ते कधीतरी व्हायचंच होतं
एखाद्याचं स्थान अबाधित राहिलच असा वायदा कोणी करुन शकत नाही
मात्र मिन्वाच्या समोर ’त्या’ने कधीच ये‌ऊ नये असं तिला फ़ार वाटायचं

पण ’त्या’च्या पासून किती काळ लपणार?
तो पेटून उठला
त्याने थयथयाट केला
त्याचे डोळे धगधगले
राग तर त्याला इतका आला की त्याच्यात मावणार नाही असं वाटायला लागलं
कधीही न भेटलेल्या मिन्वाबद्दलच्या द्वेषाने त्याचं मन पेटून उठलं.
निम्मीसमोर तो इतका दिमाखात कसा काय बसू शकतो?
मिन्वाला पार खाली खेचला पाहिजे, गर्तेत नेला पाहिजे.
इतका सारा द्वेष कुठून आला?
त्याच्या असण्याची इतकी ठळक जाणीव यापूर्वी कधीच झाली नव्हती.

तिथून जो तडा गेला तो गेलाच.

---

’तो’ कोण?
’तो’ ला नाव आहे, अर्थात!
नाव- ते ही चार लोकांनी भयमिश्रीत आदराने उच्चारावं असं
पण
’तो’ला निम्मी ’तो’च म्हणते
तृतीय पुरुषी एकवचनात- ’द गॉड’ सारखं
किंवा
व्होल्डेमॉर्टच्या ’यू नो हू’ सारखं
अगदी केव्हापासूनच

लोकं त्याचं नाव घेणं टाळतात
त्याला कोंडीत पकडायला बघतात
त्याच्याकडे बोटं दाखवून बोलतात
त्याचा दु:स्वास करतात

पण निम्मीने तसं कधी केलं नाही
त्याच्यामध्ये काही खोट काढण्यासारखं काही आहे असं वाटलं नाही

तो कायम तिच्याबरोबर होता, कोणीही त्यांच्यामध्ये आलं नाही, तिने कधी ये‌ऊ दिलं नाही

---

बाय हुक ऑर क्रूक
जे हवं ते मिळवायचंच
मग ते कुठल्याही मार्गाने- प्रसंगी नैतिकता वगैरे चिल्लर गोष्टींना धाब्यावर बसवून
हा त्याचा मोटो इत्यादी
त्यासाठी वाटेल तितक्या हीन पातळीला जायची तयारी.

निम्मी ठरवते," तो म्हणतो त्याच्या बरोब्बर उलटं करायचं"
लहानपणापासूनचे जीवाभावाचे दोस्त ते, ’त्या’च्यापासून कसं काय लपणार हे?
’तो’ म्हणाला, "असं काय! मी जे करवून घ्यायचंय मी त्याच्या नेमकं उलट सांगेन"

’तो’ नको म्हणाला मग सिगरेट ओढायचीच
कुठेतरी खोल खोल आत कण्हणारया "नको, नको"ला हाड! करुन
मग दारु
मग मारिजु‌आना
मग सेक्स
अध:पतनाची डिग्री वाढतच गेली
आपण काय करुन बसलोय
हे कोण्या एका सकाळी निम्मीला लख्ख जाणवलं
टॉम रिडल ने वापर करुन घेतलेल्या जिनीसारखं

--

’तो’ निम्मीचा क्रायसिस मधला फ़्रेंड, फ़िलॉसॉफ़र आणि गा‌ईड होता
जास्तच टॅवटॅव करणारी मैत्रिण असो
तिच्यावर गेम करु पाहणारा मित्र असू देत
निम्मीने ’त्या’च्या साथीने त्यांना पार गर्तेत नेलं होतं.
’त्या’ला तो प्रचंड महाभयंकर विजय मिळवल्यासारखं वाटायचं
’त्या’च्या डोळ्यांतली ती लाल चमक बघितल्याचे निम्मी शपथेवर सांगते.

---

वेदना अट्ळ असते, ती भोगणं ऑप्शनल असतं.
मग निम्मीने ’त्या’ला संपवायचंच ठरवलं

पण कसं क सं क सं?

--

निम्मीचा मेंदू जर आता खोलून पाहिला तर त्यातल्या प्रोग्राम्स मध्ये
व्हा‌ईल, ईफ़ चे लूप अनट्रू झाले की ’त्या’च्या स्ट्रॅटेजीसना सेट केलेत
तिच्या मेंदूतली नेमकी कोणती पेशी ’त्या ’च्या भजनी लागली होती
हे पुढे मागे कधीतरी संशोधनातून कळेलच

---

’तो’ जरा विचित्रच होता
वयाच्या मानाने केव्हढातरी प्रौढ, गंभीर

रडण्याचे विविध प्रकार असतात.
एकात चेहरा मख्ख कोरा असतो आणि पाट उघडल्यासारखे अश्रू घळाघळा वाहत असतात. तळहातावरुन सुरी अल्लाद फ़िरवल्यावर त्या उघडलेल्या जखमेतून रक्त वाहायला लागेल तसं.
आणि दुसरयात दात गच्च आवळून, ओठांवर दात रोवून, तोंडावर मूठ, पोटावर हात दाबून हमसून हमसून रडणे. शरीराचा स्वल्पविराम हो‌ईतो.
दोन महिन्यांमागे एकदा ती अशी रडली होती तेव्हा तिच्या डोळ्याभोवती अशी काळी वर्तुळं तयार झाली होती, डाग दिल्यासारखी. पुढे काहि दिवसांनी त्यात तडेदेखील गेले होते
पण आठवणीला खेचत कितीही मागे नेलं तरी ’ तो  रडल्याचं आठवत नाही
’त्या ’ला रडणं ठा‌ऊक नाही.
’त्या ’ला झोपेचा त्रास होता वाटतं
कारण निम्मीला आठवतंय तेव्हापासूनच
’त्या’च्या डोळ्यांखाली सदैव काळी वर्तुळंच पाहिलीत
आणि पांडवाच्या मूर्तीवर टोचून बसवल्यासारखे कवड्यांसारखे डोळे.
आपल्या‌आपल्यातच रहायचा ’तो’
निम्मीला खात्री होती त्यामागचं कारण
त्याची शिंगं असावीत
हो! त्याला डोक्यावर जाणवतील अशी दोन टेंगळं होती
ला‌ईटस गेले की मेणबत्त्यांच्या प्रकाशात सावल्या नाचताना
अगदी अगदी स्पष्ट दिसायची
त्यावेळी निम्मीला ’ओनिडा’आठवायचा
हरणटोळासारखा हिरवागार
शेपटीचा बाण फ़लकारणारा
लहाणपणी निम्मी ’ओनिडा’ला भ्यायची
ती भीती आता‌आतापर्यंत गच्च बसलेली मनात
"तुला आहे का रे असं शेपूट?" असं तिने त्याला अर्थातच विचारलं नाही
तो ’हो’ म्हणाला असता तर तिला भीती वाटली असती का?
’तो’ हो म्हणाला असता का?
?

---

काळ पुढे पुढे निघून जात होता आणि त्या काळातील तिच्या आणि ’त्या ’च्या जागा रिकाम्या राहून जातहोत्या

---

सुस्कारा तर सुटला-
कुणास ठा‌ऊक तिला सुटल्यासारखं वाटलं नाही
किनारयावर परतली तर ’तो ’ तिथेच होता
वाळूवर खुरमांडी घालून, वाळूवर रेघोट्या मारत
तिचं नाव गिरवत-
तिला आश्चर्य वाटलं नाही,
अगदी थोडंसुद्धा नाही
तो होता
तो आहे
तो जोवर असेल तोपर्यंत तो असणारच होता
आणि  तिला ते पक्कं ठा‌ऊक होतं..अगदी आतातून
तो म्हणजे एक सततची भावना होती
ती आज थांबवली आणि उद्या सुरु केली असं होत नाही

मग ती त्याच्याशेजारी वाळूत बसली आणि तिचं नाव गिरवू लागली
भरतीला अजून खूप अवकाश होता-
नाव पुसलं जायलाही!

पलभर में सब कुछ बदल गया
और कुछ भी नहीं बदला
जो बदला था वो तो गुजर गया

जगण्यातून एक गोष्ट तयार हो्ते
आणि
कुणाच्या वाट्याचं, कुणाच्या वतीने, कुणाच्या मर्जीने
म्हणजेच
न जगतानाची अशी ’न’गोष्ट!!

11 comments:

Nil Arte said...

तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पोस्ट्स सरपास करून गेलीये ही राजा:

खूप डार्क आणि इव्हील आहे...पण सरस
उदाहरणार्थ नोलान दादांचे मूव्हीज, हिथ लेजरचा जोकर, जी एंच्या तळघर वाल्या कथा,
किंवा मेटालिकाचं "अनफर्गीव्हन "...

Harshada Vinaya said...

I was a different experience altogether- Can-not-compare-to-anything!

Sending Love and Blessings!

Shraddha Bhowad said...

@निळ्या,

थॅंक यू.

<<खूप डार्क आणि इव्हील आहे

मला कधी कधी कळत नाही की आपण सगळेच सगळ्या गोष्टींचं इतकं व्यवस्थित कॅटेगरायझेशन कसं करुन ठेवतो? एखादी गोष्ट इव्हिल आणि कुठली सेंटली हे कसं ठरवायचं? कुठल्या नॉर्म्सवर? आपल्याला सोयीचं वाटतं ते सेंटली आणि जे गैरसोयीचे ते इव्हिल का? किती हिप्पोक्रसी आहे ही. आणि हे नॉर्म्स ठरवतो तरी कोण? जर दुसरा कोणी ठरवतो तर मी मान्य का म्हणून करायचे?

प्रत्येक माणसाला डार्क शेडस असतात, तो इव्हिल असतो, आणि हे त्याच्या virtues इतकंच ढळढळीत सत्य आहे. मग जर सत्य आहे तर ते लपवायचा प्रयत्न का चालतो? नाकारायचा प्रयत्न का होतो?
I don't understand.

मी हे इन-जनरल विचारतेय, तुलाच असं नाही-

असो, तू पहिला माणूस आहेस ज्याला ही नुस्ती गोष्ट ’सरस’ वाटली. बाकीचे अस्वस्थ झाले, गप्प झाले, गडबडले वगैरे वगैरे. सगळ्यांना ही गोष्ट कळेल/कळावी असा माझा दावा नाही पण ’कळली नाही श्रद्धा’ हे सांगणारा अजूनतरी कोणीच नाही. :)

Shraddha Bhowad said...

हर्षदा विनया,

Thank you so much sweetheart.
I wish you the same.

Anonymous said...

..तू म्हणते तसे न कळणारा मी नाही, पण जे कळले ते तुझ्यातले माझ्यापर्यंत पोहचले नाही. ठराविकपणा याला आलाच, जरी कॅटेगरायझेशन न ठरवायचं तरी. न'गोष्टीत ओढून तीच जीए आणि इतर यांची टेप झालीये.

मला भावला तो तुझा 'गोष्टी'सांधणारा गोल प्रवास. आणि कितीही अडवून ठेवलं तरी तू गूढ अनोळख्या प्रदेशात घेऊन जातेच.
-नेहमी तुझ्या नव्या पोस्टच्या प्रतीक्षेत.

Anonymous said...

इन-जनरल विचारण्यावर
.. सगळ्याचे सगळे घेऊन कॅटेगरायझेशन करणे, हेसुद्धा कॅटेगरायझेशन होणार..आपल्या देशाततरी असली कधी पद्धत नव्हती..ब्रिटीश आणि इतर लोकांच्या सर्वदूर पसरण्यामुळे त्यांना उगीच करावी लागणारी ही फालतू पद्धत आता आपल्या अंगवळणी पडलीय. माणूस कॅटेगरायझेशन कधी करू शकत नाही, माणसातला समाज त्याच्याकडून ते कॅटेगरायझेशन करवून घेतो. कॅटेगरायझेशन ही सध्या ओल्ड फ्येषण वाटते तरी, तिला तसा विरोध आपण केला तर आपणही एक कॅटेगराईझ्ड होऊन जावू..पण त्याहीपुढे मी सत्य आणि चूक या संज्ञांनी आणि त्या दोहोंच्या तटबंदीत हल्ली सापडलोय, आणि त्यावर माझा ब्लॉग बळेच नासला जातोय..

Shraddha Bhowad said...

दुरित,

:)
ते माझ्यामधलं तुझ्यापर्यंत कधी पोहोचेल असेही नाही. आसपास पोहोचण्याची शक्यता असते मात्र. आपण त्याच्या शोधात असतो का? मला माझी एक गोष्ट पूर्ण उलगडून सांगणारी व्यक्ती भेटली होती तेव्हा भयानक ecstatic वाटलं आणि उगीचच एक क्वेस्ट पूर्ण केल्यासारखा भाव साचून राहिला होता दिवसच्या दिवस.

आपल्याला खूप खूप काय काय वाटत असतं आणि ते दुसरयालाही वाटत असावं असं आपल्याला वाटून घ्यायचं असतं. ती गरज असते, आपल्याला ती स्यूडो-रिलेटीव्हीटी हवी असते नाहीतर ते पाकोळीसारखं होऊन बसतं, एकटंच भिरभिरायचं आणि कुठेतरी दाण्णकन आपटायचं एक्दाच काय ते! म्हणून लिहायचं. खरं खोटं मानून , खोटं खरं मानून.
पण पुन्हा एकदा माझ्या जगण्याची रिफ़्लेक्शन्स दुसरयाच्या जगण्यात असण्याची अपेक्षा बाळगणे म्हणजे अतिच नाही का? मग ती तडफ़ड, तो सॉलिट्यूड. पण आपण प्रयत्न सोडायचा नाही. मी सोडत नाही. गोष्टी धसास न्यायचा प्रयत्न करायचा. मी नेते. आत आत वर जायचं, कधीतरी अशी वेळ येईलच नं, की आता काय कळून घ्यायचं बाकी राह्यलंय, सगळं तर माहित आहे तुला.

आणि हे आपल्यातलं सगळं इतर चार-पाच लोकांमधलं मिळून काही काही तरी असेलच नं. आपल्यामधले काही ट्रेट्स आपल्याला बरयाच व्यक्तींमध्ये दिसतात. त्याचेच पॅटर्न असून असून कितीसे असणार अरे? मग त्याच्यावर जीए आणि नोलानचा पॅच मारला की सगलं काही कळल्याचा व्यवस्थित फ़ील येतो, आपलं आपल्यालाच बरं वाटतं. "अरे! हे तर आपल्याला माहित आहे", मधलं जे सवयीचं कुरण आहे नं, त्याने believe me, जबर स्वस्थता लाभते.

गूढ, गूढ काय असतं अरे. सवयीचं नाही, आतापर्यंत पडदाशीन ठेवलं, जाणूनबुजून कानाडोळा केला, किंवा तसं करायला शिकवलं गेलं तेच गूढ असतं. त्याबद्दल लिहीताना comfort zone गायब होतो and that's what I truly like.

मी काय लिहिते आहे हे मला कळत नाहीये. :) I should stop.

Anonymous said...

लिहतेस, अगदी पटणारं..!
शोधात असतो पण शोधायचे नसते.. शोधातांनाच जो प्रवास होतो, तो पाहिजे असतो. स्वत:च्या परिघातच असतो आपण सतत, काही जरी अनुभवले तरी. अगदी आरसा लावून समोरचे आपल्या मनात छापणे केविलवाणे आहे.
खरंच लिहायचं कसंही करून..निश्चितच.
हो, आक्रोश मांडायचा स्वत:ला पार करून..तडफड ठोकून द्यायची या जगात, मनातली..पण पुढे त्रयस्थाचा पाय उचलायचा, सर्वांचा बट्याबोळ करायचा(मी तरी तेच करतो, my perception ).
खचितच, तुझा सरस झालाय हा फॉर्म, जीए, इतरपेक्षा, तू त्यांची आत्ताची प्रतिनिधी वाटावी इतका भन्नाट..तशी अस्वस्थता तू निर्माण केलीस. मला तीच माणसे आवडतात.
गूढाची definition मनात खोल खुपली!.
आता, मी शांत होतो.

Samved said...

कॉमेन्ट द्यायला अंमळ उशीरच झालाय...पण डेन्जर झालय. पहीली ओळ अश्शी साट्टकन मेंदुत घुसली...अर्रेच्या..हे वेगळय बरं का. "तो" कुणीही असु शकतो. बट गोईंग बाय माय वे ऑफ थिंकींग "तो" निम्मीच्या आतलाच कुणी आहे! असो. आपण काही कवितेची समिक्षा करत नसतो पण फार दिवसांनी एक चांगली कविता (कविताच ना?) वाचली.

Shraddha Bhowad said...

संवेद,
भल्या माणसा, कुठला हवा तो फ़ॉर्म अझ्युम कर.
आणि अंमळ, भला-कुठलाही उशीर चालतो अरे! ऑल्वेज!

Unknown said...

Khup changala , congrats!

 
Designed by Lena