सुव्हनियर!

Only antidote to mental suffering is physical pain.
--

सुई तिला कच्चकन टुपली.

कळ मस्तकात गेली तशी कोणी टिपेचा आवाज लावावा आणि गोंगाट शांत व्हावा तसं डोक्यात सगळं शांत झालं.
स्प्रिंगबोर्डवरुन पाण्यात सूर मारला की पाण्याआत कसं निर्वात वाटतं तसं.
आणि कुरणावर ढगांची सावली पसरत यावी तसं होत गेलं..

फ़क्त वेदना नकोच आहे तिला, वेदनेला भाषा हवीये.
सुईला आता हळूहळू लय सापडतेय.
सुई वेगवेगळ्या कोनातून फ़िरतेय, फ़िरत राहतेय. आडवी, उभी, वर्तुळाकार. शरीरावर तिची लिपी कोरत, गिरवत राहतेय.
ही एक नवीनच भाषा आहे. यातली वाक्यं वेगळी आहेत, हिचा सिंटॅक्सही वेगळा आहे.

तिने डोळे मिटून काळ्याकभिन्न अंधारामधल्या दूरवरच्या लालबुंद ठिपक्याकडे नजर लावली. वेदनेच्या पायरया चढत तिला तिथे जायचंय. चाळीसेक असतील.

वेदना आत चिरकली. तिचे प्रतिध्वनी शरीरभर उमटले.
पाण्यात पडलेल्या शाईच्या थेंबासारखी ती शरीरात विरघळत राहिली, भिनत राहिली.
आता कुठल्या आठवणी नाहीत, दुखरे विचार नाहीत, घसा दाटून येत नाहीये. आता शरीरात लख्ख वेदनेचा वास आहे.

ती त्या वेदनेला आजमावतेय.

वेदनेच्या लाटा मेंदूला थडकल्या की सातव्या लाटेबरोबर आतात जाणारया वस्तूंसारखी एकेक अप्रिय आठवण पुसली जातेय. त्यांचा ठणका निमालाय.
वेदनांच्या लाटांवर  स्वार व्हायचं आणि जायचं आठवणी नसलेल्या प्रदेशात. लालभडक वेदनेचं वारुळ बनवून घ्यायचं वाल्यासारखं , इतकं की त्यातून काही दिसता कामा नये की काही आकळता कामा नये.

वेदना अनावर झाली की डोळ्यापुढे काळीनिळी शाई सांडल्याचा भास होतोय, शरीराचा स्वल्पविराम होतोय.

ती या वेदनेला काहीही विचारु शकतेय कारण वेदना उलटून तिला काही विचारणार नाहीये, ती फ़क्त ’आहे’.

स्टुडीयोतलं धमाधम वाजणारं गाणं एव्हाना पुसट होत गेलंय.
.
.
.

सुई एकदाची शरीरावेगळी होते तशी लख्ख ऊन पसरल्यासारखं वाटतं.
अर्ध्या तासापूर्वी कुठेही नसलेलं एक निळंशार फ़ुलपाखरु आता तिच्या पाठीवर हुळहुळतंय.

तिच्यातुन ती बाहेर पडली आणि तिने स्वत:वर नजर फ़िरवली. नुकत्याच बनवलेल्या आरशासारखी कवळी कवळी वाटत होती ती.

ताप येऊन गेल्यासारखं हल्लख तर वाटतंच आहे पण हलकीशी नशा सुद्धा आहे.

त्या अर्ध्या तासाच्या ग्लानीत एक मोठ्ठा काळ निघून गेलाय. जणू काही तो दुसरया आयुष्याचा हिस्सा होता आणि आता ही तापाची चुरचुर आहे, ठणका आहे ते वेगळंच आयुष्य आहे.

टॅटू हे दुसरयांसाठी फ़क्त स्टाइल स्टेटमेंट असेलही कदाचित..
तिच्यासाठी तो वेदनेशी वेदनेने भिडू पाहायचा मार्ग आहे!
आणि ते फ़ुलपाखरु तिच्या सुटकेचं सुव्हनियर!

23 comments:

Shraddha Bhowad said...

मेघना,
मी तुझी कमेंट इनबॉक्समध्ये वेस्ट करु शकत नाही.
सॉरी.

"Apan kavita lihiliye bai. Office madhun comment lihu shakat nai, pan dad anawar. Mhanun fakt. Loved you for your butterfly."

:)
लव्ह यू टू.

aativas said...

वेदना आणि फुलपाखरू? पण सत्य अस ब-याचदा विचित्र असत ... बाहेरच्यांसाठी. आत ते एकजीव होऊन जात सगळ :-)

Shraddha Bhowad said...

@aativas,

:)
खरंय. सत्य सगळ्यात विचित्र अशी गोष्ट आहे. हॅडल करायला एकदम कठीण. जबर मनोबल असायला लागतं सत्य पचवायला.

वेदनेतून बरंच काही सुंदर जन्माला येतं. आपण माणसंच बघा ना! वेदनेचंच फ़लित आहोत.
वेदना कळली तरच वेदनेचा अभाव म्हणजे आनंद हेदेखील कळतं.
वेदना दाबून ठेवली की शरीर सुजतं, काळंठिक्कर पडतं, तिला कन्फ़्रंट करावंच लागतं.
वेदना भोगून पार केली की मुक्त झाल्यासारखं वाटतं आणि मुक्तीचं प्रतीक फ़ुलपाखरु, जे तिला जन्मभरासाठी बाळगावंसं वाटलं.

थॅंक्स!

Eat & Burpp said...

एक क्षण एकुप्रेशर आठवलं आणि दुसऱ्या क्षणाला आमचं जहाज तुझ्या टाटू च्या टापुवर येऊन धडकल! मला नेहेमीच पडणारा प्रश्न...कसं सुचलं?? टाटू केलंस का?? हसू नकोस...पण विचार तिथूनच सुरु होतात माझे..काय करणार?? फुलपाखरू ते सुव्हनीर...प्रवास आवडला! 'सुव्हनीर' हा फ्रेंच शब्द ना ग?? 'आठवण' कि असच काहीतरी?? विसरले बघ मी फ्रेंच...dictionary हातात उचलायला पाहिजे!

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

गीता,

There you are!
हो, फ़्रेंच शब्द आहे. मेमेंटो, आठ्वणीदाखल असलेलं कायमस्वरुपी काहीतरी- या अर्थी.

आपण किती शब्द त्यांचं ओरिजिन माहित नसताना किती सर्रास वापरतो नै?
आर.एस.व्हे.पे, रॉंदेव्हू उदाहरणार्थ?

तुला ऍक्युपंक्चर आठवलं? इंटरेस्टींग! त्या पर्स्पेक्टीव्हने बघितलं तर वाटणं शक्य आहे असं दिसलं.
:)

काही नाही, तुझ्या फ़्रेंच व्होकॅबवर फ़क्त थोडी धूळ बसलिये, टच अप करायला हवं फ़क्त.

Unknown said...

Finally tattoo kadhalas vatate tu! pan he faar sundar lihilayas...

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

कोमल,
थॅंक्स!
पण तू टांग मारलीसच शेवटी.

svn said...

सुंदर! नेहमीसारखंच नवीन, उंच आकाशात रात्री रंगीबेरंगी फ़ुलॊरा फ़ुलवणाऱ्य़ा आकाशबाणासारखं!
क्षमस्व, पण "वेदनेचा अभाव म्हणजे आनंद" हे खटकतय! शून्य वाटणं कुठे असतं?
हे कृपया ’बाल की खाल’ समजू नकोस.

Shraddha Bhowad said...

हाय शशिकांत,
थॅंक्स! बरयाच दिवसांनी हं?
वेदनेचा अभाव म्हणजे आनंद हे ’त्या त्या वेळच्या वेदनेचा’ अभाव म्हणजे आनंद असे वाच.
म्हणजे ज्या वेदनेला ऑर वेदनांना कन्फ़्रंट करण्यासाठी ही उरस्फ़ोड चाललिये ती नसतीच तर कसं? हे वाटून होणारा आनंद.
कन्फ़्रंट केली तरी वेदना आत आत कुठेतरी असतेच आणि संपूर्ण आनंदी आहोत अशीही आयडीयल स्टेटही नसते. पण हे झालं खूप खूप खोल पातळीवर, आपण रेट्रोस्पेक्शन करतो तेव्हा किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करतो तेव्हा. ache मध्ये विचार नसतो, त्यातून त्या त्या वेळी survive होणं गरजेचं असतं, विचार बिचार नंतर होतो.
मी सुपरफ़िशियल पातळीवर बोलतेय असं समज, काय? म्हणजे मला तो, तेव्हाचा क्षण फ़क्त साजरा करायचाय, त्यावेळेपुरता धकवून न्यायचंय वगैरे असं काहीतरी. :)

Parag said...

Mast!!! "Tatoo" baddal ahe (he shevati kalayavar) uagach bara watla :)

Shraddha Bhowad said...

:)
थॅंक्स पराग.
"आता काय लिहीतेय ही बया?" नंतरचं ते बरं वाटणं समजतंय मला.

svn said...

OK!

धर्मेंद्रच्या ’दोस्त’ मधे आनंद झालेला एक पक्षी :) म्हणूनच गेलाय -
... दर्द खुद हैं मसीहा दोस्तों,
दर्दसे भी दवा का दोस्तों, काम लिय़ा जाता है ...

Keep it up!

Sachin said...

"स्पर्शा" वर तू मागे लिहिलंस. तसाच एक बारीक धागा पकडून तू वेदनेची तळहाता एवढी गोष्ट मांडलीस.
स्पर्शाच्या तुला भावलेल्या वेगळ्या छटा तू पकडण्याचा प्रयत्न केलास, आणि आता वेदनेतून
झंकारणाऱ्या मोकळेपणाची गोष्ट. तू वर दिलेल्या वाक्याचा आणि तुझ्या या गोष्टीमधला
मला एक छान paradox पकडता आला. वेदना ही मानसिक आंदोलनावर उपाय आहे आणि तू
तिलाच मानसिक आंदोलन करून टाकलेस की. आवडले. त्यात फक्त "suffering" आणून तू ही गोष्ट
एकांगी केली नाहीस. उलट त्या सुईच्या अग्रापासून तुझी गोष्ट फुलत फुलपाखरापाशी आली.
खरेतर मुक्तीचे जे क्षण साधायचे होते ते आलेच आहेत पण या गोष्टीला तू जी अनुभवांची खोली दिली, शब्दांची जी मर्यादा
दिली आहेस ती त्या प्रोसेसइतकीच वाटते. एवढ्याशा काळात जुन्या प्रिय-अप्रिय आठवणीना फाटा देऊन
त्या निर्माण करणाऱ्या मूळच्या शारीरिक आणि नंतर मनावर जाळीसारखी उमटत गेलेय वेदनेलाच समजून घायची
तुझी धडपड आवडली. ते साधे काम नाही. म्हणून नंतर उमलणाऱ्या फुलपाखरावर फक्त त्या निखळ वेदनेचीच नक्षी उरते,
बऱ्या-वाईट भूतकाळातील कुठलाही रंग ना लागता. तुझ्या ह्या प्रयत्नाला मनापासून दाद.
अजून एक; ही वेदना देखील स्वत:चीच आहे का हा प्रश्न देखील त्या फुलपाखरापुढे
तसाच ताजा ठेवला आहेस. मग तिची सुटका झाली असे तरी कसे म्हणावे?

Shraddha Bhowad said...

सचिन,
माझ्या पोस्टचं याहून जास्त ऍनालिसिस कोणी करु शकेल असं वाटत नाही.
खूप थॅंक्स!

<<मग तिची सुटका झाली असे तरी कसे म्हणावे?

खड्ड्यात पडलो आणि खड्डा बुजवता येण्यासारखा नसेल तर तिथे एक धोक्याचं चिन्ह तर लावतोच ना आपण? पुन्हा त्याच मार्गाने जाण्याची वेळ आली तर जेणेकरुन तो खड्डा चुकवता यावा, पुन्हा तोंडघशी पडण्याची वेळ येऊ नये. एव्हढी तजवीज तर करतोच ना आपण? तसं आयुष्यभर लक्षात राहिल असं जवळ बाळगलं तर ते कायम आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करुन देत राहिल, सतर्क रहायला लावेल. फ़ुलपाखराचं प्रयोजन त्याचकरता आहे, to remind me what I went through once.

Samved said...

उत्तम. वेदनांचे प्रतिध्वनी ऎकु येऊ लागले की त्याचा कैफ चढतो तो असा. छानच लिहिलयस

तृप्ती said...

masta. vedanecha deNa 'सुव्हनियर' hee kalpanaach khUp bhaaree vaaTalee.

Shraddha Bhowad said...

संवेद,
थॅंक्स!
मी वेदना मांडायचा प्रयत्न केलाय. ती चढलिये असं वाटलं तर मस्तच.
वेदनांचे ’प्रतिध्वनी’ पॉलिटीसाईज्ड असतात, पॉलिटीकली करप्ट, मॅनिप्युलेटेड, म्हणशील तितकी शेलकी विशेषणे आहेत त्याला. थोडक्यात वेदनांचे प्रतिध्वनी हे आपल्या लेखनासारखे असतात. बोर्हेस म्हणतो तसं ठरवून पाहिलेल्या स्वप्नांसारखे.

Shraddha Bhowad said...

तृप्ती,
थॅंक्स!
कशाचंही कुठलंही देणं हे सुव्हनियरच! दृश्य किंवा अदृश्य आपण वागवत असतोच की आपल्याही कळत-नकळत. फ़क्त नीट लक्ष देऊन ऐकलं-बघितलं की आपलं आपल्यालाच ते जाणवतं एव्हढंच.

Unknown said...

Shraddha, Borhes na vachatahi tuzyamule tyachya jagat dokavata aala, thanks!

BsHrI said...

apratim. . .
Majyakade shabdach nastat comment deyla.
Bhashevar prabhutva,
shabdancha samudra,
vicharanchi sangad,
vishayala purnatvah dena.
Sarva kahi je vachakala vachanachi godi lavta . . .

Shraddha Bhowad said...

भाग्यश्री, ही कमेंट मला मिळालेल्या सर्वात फ़्लॅटरी़ग, ज्या कमेंट्स वाचून मला सॉलिड हुळहुळतं अशा कमेंट्सपैकी एक आहे.

 
Designed by Lena