एर्बसचं देणं.

पहिल्यांदा, सर्वत्र अंधारच अंधार होता.
हळूहळू वस्तू आपापले आकार धारण करायला लागल्या. काळोखाचा बुरखा हळु हळू उठायला लागला.
अशोकला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं ती अजून परतली नव्हती. तो सुस्कारला.
टळतही नाही मेली कायमची!
जेव्हा पहावं तेव्हा आपली मागे मागे मागे मागे
त्याने अंग झडझडवून आळस दिला आणि ओली सकाळ नाकात भरुन घेतली.
सकाळची दूधवाले, कामकाजवाले यांची वर्दळ सुरु होण्यापूर्वीची नेहमीची शांतता आहे.
त्याने आजूबाजूला नजर टाकली. बाहेरची झाडं फ़ुलं फ़ुलवण्यात, त्यापलीकडची त्याहून जास्त फ़ुलं फ़ुलवण्यात मग्न होती.
हिरवं रहावं का पिवळं याबद्दल गवताचा निर्णय होत नसावा बहुतेक. द्विधेत होतं बिचारं कधीपासून.
काल सूर्य आणायला गेलेली पाखरं त्याला घेऊन परतली होती.

तिच्या येण्याची चाहूल लागली तसा अशोक सावध झाला. आक्रसला.
आली.
आली.
आssली.
ती आली तशी त्याच्या मनात घृणेचा फ़ुत्कार उमटला.
कोणी किती बेढब असावं? काय तो रंग-हिणकस काळाकुट्ट, त्यात सगळ्या रेषा, काना, मात्रा लपून जातायेत. उरतोय तो फ़क्त एक गर्द रंग, नकोनकोसा.
त्याच्या मनात चाललेल्या या विचारांबद्दल अगदीच अनभिज्ञ असल्याप्रमाणे ती सावकाश आली आणि त्याच्या पायापाशी विसावली.

अशोकला काहीतरी जुनं दुखणं होतं. आठवणीत जेव्हढं मागे जाता येईल तिथपासून त्याचे सारे व्यवहार उभ्यानेच होत. पाठीचा कणा वाकवून बसणं मुळी त्याला जमतच नसे. इतरांइतकी आकलनशक्ती त्याला नव्हती. त्याच्या सुख-दु:खाच्या कल्पना अगदीच सरधोपट होत्या. इकडे तिकडे जाणंही नव्हतं. एकाच ठिकाणी असं आयुष्य काढलं म्हणजे लवकर म्हातारं व्हायला होतं. त्याचं वयही त्याला अंदाजानेच सांगता आलं असतं. आणि ह्या सर्व आठव्णी जितक्या जुन्या तितकाच जुना हिचा पाठलाग आहे.
हे देखील तितकंच सनातन दुखणं.
ही आपल्याला नेमकी केव्हा येऊन चिकटली? आपल्याला काहीच कसं आठवू नये?

त्या दोघांत एका शब्दाचंही संभाषण होत नसे. तिचा वावर हेच तिचं असणं. ते असणंही मोठं विचित्र! हात लांब करुन पोहोचावं तर तिला स्पर्श करता येउ नये पण आणखी थोडा प्रयत्न केला तर पोहोचता येइल एवढ्या परिघातलं तिचं रेंगाळणं. तिचा दरारा, दहशत! त्या दोघांमध्ये माजून राहिलेली बर्फ़ाळ शांतता.

वर्षानुवर्षे, दशकानुदशके चाललेला हा क्रम होता. तिच्या सोबतीला हा, ह्याच्या सोबतीला ती. रात्री कुणीकडे तरी जायची-तेव्हाही कुणाच्या तरी मागावरच असावी टवळी, अशोकला वाटे.
पण सकाळी फ़िरुन आहेच इथे. आपल्या भोवतीभोवती.

तिच्या आत आणखीनही कितीतरी ’ती’ आहेत आणि दिवसेगणिक त्या ’तीं’ मध्ये भर पडत चाल्लिये असं त्याला चमत्कारीकरित्या वाटायचं.

कधी कधी अशोकला वाटायचं आपल्याला ती समजत नाही फ़ारशी. पण न समजताही समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे का? तिलाही आपण समजायला नको का? का नकोच?

तिची सवयही होऊन गेली असती त्याला पण एके दिवशी ते घडलं-
त्या दिवशी एक गर्द निळं फ़ुलपाखरु कुठूनतरी तरंगत आलं. मोठं राजस, गोजिरवाणं. पंखांची हळूवाssर उघडमिट करत तिच्यावर विसावलं.
तर तिच्या काळ्याठिक्कर काळ्यात ते ही काळंच दिसायला लागलं. जणू काही त्याला तिचं काळं लागलं होतं.
त्याला ते काहीतरी प्रचंड अभद्र वाटलं.
हिच्याआत, हिच्यामध्ये काही निकोप वाढूच शकणार नाही, हिच्या भोवतालीही काही निकोप असूच शकणार नाही-त्याला वाटलं.
एकाएकी तो असहाय्य , निस्त्राण झाला.
त्याला दु:ख सापडलं होतं. खूप खूप मोठं दु:ख.
आपण जन्मभर लोढण्यासारखं काहीतरी गुमान, मुकाट्याने वागवत आलो. ते का वागवलं याचं कारण सांगता येऊ नये, नव्हे तर  ते दूरही सारता येऊ नये, चमत्का्रीक हताशता यावी याचं दु:ख!

तेव्हापासून तो हिच्यापासून पिच्छा सोडवण्याच्या मागे होता.
पण आपण ज्याचा ध्यास घेतो ते सहज थोडीच मिळतं? जबर किंमती मोजायला लागतातच त्यासाठी.

विचार करता करता अचानक एके दिवशी अशोकला त्याचं उत्तर मिळालंच.
हे आपल्याला आधी का सुचू नये असं त्याला वाटलं नाही मात्र.  कारण त्याला ते कधीपासूनच माहित होतं फ़क्त ते स्वीकारण्याची तयारी नव्हती. निर्णय होत नसल्याने त्या असलेल्या उत्तराला नवनव्या प्रश्नांनी भागून बघणं चाललं होतं.

दिवसामागून दिवस जात राहिले.
ती येत राहिली, जात राहिली, अशोकभोवती आपला कोष विणत राहिली, तो आणखीनच गुरफ़टत राहिला.
फ़ारसं काही म्हणणं नव्हतं त्याचं- तिचं असणं हीच आपल्यालेखी आपली ओळख ठरु नये असं त्याला वाटे इतपतच.
आपल्याला जे नेमकं ठाऊक असतं त्याचीच भीती जास्त वाटते..नाही?
आणि..
एका वादळी रात्री अशोकचा झोक गेला आणि तो दाण्णकन आपटला.
ब्लॅक आउट.
.
.
अखेर तिचा पिच्छा सुटलाच.

--

पक्ष्यांच्या वेड्या कालव्याने सोसायटीमधल्या सगळ्यांना जाग आली तेव्हा आडवा पडलेला अशोक सगळ्यांना दिसला.

--

एखाद्याला एखाद्या क्षणी मरावंसं का वाटतं हे कधी दुसरयाला कळत असतं का? त्याचं त्यालाही कळत नसावं नंतर. म्हणूनच आपला ध्यास आपल्यापाशीच असू द्यावा असं म्हणतात..

"ते बघा सावलीशिवायचं झाड!" असं म्हणवून घ्यायचा अशोकचा ध्यास शेवटी पुरा झाला नाही तो नाहीच.

सुव्हनियर!

Only antidote to mental suffering is physical pain.
--

सुई तिला कच्चकन टुपली.

कळ मस्तकात गेली तशी कोणी टिपेचा आवाज लावावा आणि गोंगाट शांत व्हावा तसं डोक्यात सगळं शांत झालं.
स्प्रिंगबोर्डवरुन पाण्यात सूर मारला की पाण्याआत कसं निर्वात वाटतं तसं.
आणि कुरणावर ढगांची सावली पसरत यावी तसं होत गेलं..

फ़क्त वेदना नकोच आहे तिला, वेदनेला भाषा हवीये.
सुईला आता हळूहळू लय सापडतेय.
सुई वेगवेगळ्या कोनातून फ़िरतेय, फ़िरत राहतेय. आडवी, उभी, वर्तुळाकार. शरीरावर तिची लिपी कोरत, गिरवत राहतेय.
ही एक नवीनच भाषा आहे. यातली वाक्यं वेगळी आहेत, हिचा सिंटॅक्सही वेगळा आहे.

तिने डोळे मिटून काळ्याकभिन्न अंधारामधल्या दूरवरच्या लालबुंद ठिपक्याकडे नजर लावली. वेदनेच्या पायरया चढत तिला तिथे जायचंय. चाळीसेक असतील.

वेदना आत चिरकली. तिचे प्रतिध्वनी शरीरभर उमटले.
पाण्यात पडलेल्या शाईच्या थेंबासारखी ती शरीरात विरघळत राहिली, भिनत राहिली.
आता कुठल्या आठवणी नाहीत, दुखरे विचार नाहीत, घसा दाटून येत नाहीये. आता शरीरात लख्ख वेदनेचा वास आहे.

ती त्या वेदनेला आजमावतेय.

वेदनेच्या लाटा मेंदूला थडकल्या की सातव्या लाटेबरोबर आतात जाणारया वस्तूंसारखी एकेक अप्रिय आठवण पुसली जातेय. त्यांचा ठणका निमालाय.
वेदनांच्या लाटांवर  स्वार व्हायचं आणि जायचं आठवणी नसलेल्या प्रदेशात. लालभडक वेदनेचं वारुळ बनवून घ्यायचं वाल्यासारखं , इतकं की त्यातून काही दिसता कामा नये की काही आकळता कामा नये.

वेदना अनावर झाली की डोळ्यापुढे काळीनिळी शाई सांडल्याचा भास होतोय, शरीराचा स्वल्पविराम होतोय.

ती या वेदनेला काहीही विचारु शकतेय कारण वेदना उलटून तिला काही विचारणार नाहीये, ती फ़क्त ’आहे’.

स्टुडीयोतलं धमाधम वाजणारं गाणं एव्हाना पुसट होत गेलंय.
.
.
.

सुई एकदाची शरीरावेगळी होते तशी लख्ख ऊन पसरल्यासारखं वाटतं.
अर्ध्या तासापूर्वी कुठेही नसलेलं एक निळंशार फ़ुलपाखरु आता तिच्या पाठीवर हुळहुळतंय.

तिच्यातुन ती बाहेर पडली आणि तिने स्वत:वर नजर फ़िरवली. नुकत्याच बनवलेल्या आरशासारखी कवळी कवळी वाटत होती ती.

ताप येऊन गेल्यासारखं हल्लख तर वाटतंच आहे पण हलकीशी नशा सुद्धा आहे.

त्या अर्ध्या तासाच्या ग्लानीत एक मोठ्ठा काळ निघून गेलाय. जणू काही तो दुसरया आयुष्याचा हिस्सा होता आणि आता ही तापाची चुरचुर आहे, ठणका आहे ते वेगळंच आयुष्य आहे.

टॅटू हे दुसरयांसाठी फ़क्त स्टाइल स्टेटमेंट असेलही कदाचित..
तिच्यासाठी तो वेदनेशी वेदनेने भिडू पाहायचा मार्ग आहे!
आणि ते फ़ुलपाखरु तिच्या सुटकेचं सुव्हनियर!