’असलेपणा’तला बोर्हेस!

"आपण जागेपणी ठरवून पाहतो ती स्वप्नं म्हणजे आपलं लिखाण!"
ह्या वाक्यावर प्रथम ’ह्यॅट! काहीतरीच काय!’ अशीच प्रतिक्रिया होते. मग आपण मान वाकडी करकरुन डोकं खाजवत पुन्हा-पुन्हा ते वाक्य वाचतो, ’हे वाटतंय तेव्हढं साधं नाही’ म्हणत त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. मग सरतेशेवटी आपल्याला या वाक्यात केव्हढा मोठा गर्भितार्थ दडलेला आहे हे उमजतं आणि त्यात तथ्य आहे हे मान्य करायलाच लागतं. बोर्हेसच्या कविता वाचताना अशी मान डोलवण्याची वेळ अनेकदा येते.

होर्हे ल्युईस बोर्हेस हा अर्जेंटेनियन कवी, निबंधकार आणि कथालेखक. याची संपूर्ण साहित्यनिर्मिती ही स्पॅनिशमध्ये असून त्याची अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

आपल्याला जे जे काही म्हणायचं किंवा म्हणायचं नसतं, जे काही वाटत असतं किंवा आपल्याला वाटतंत नेमकं तसंच वाटतंय का याची खात्री नाही ते, ते बरंच काही बोर्हेस आपल्या कवितांमधून सांगतो. आपण जगायचं जगायचं म्हणतो पण ते राहूनच जातं ते जगणं बोर्हेस आपल्या कवितांमधून आपल्या पुढ्यात ठेवतो. कित्येक जाणिवा अशा असतात की ज्यांची आपल्याला फ़क्त चाहूल लागलेली असते पण नीटसं दिसत नाही, भिडेल इतकं जाणवत नाही, जाणव्ल्याच कधी तर त्या धूसर असतात की त्या आहेत की नाहीत याचा पत्ता शेवटपर्यंत लागत नाही,  त्या जाणिवा बोर्हेसच्या कवितांमधून मूर्त रुप घे‌ऊन येतात. साध्यासुध्या गोष्टींवर सुद्धा तो इ‌तकं काही वेगळं बोलून जातो की अरे! असा विचार आपण कसा केला नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो.

र्हा तोदो ता  लो मिल  रेफ़्लेहोस 
केंन्तेर्लो र्होक्रेपू कूलोर्हल्दिया
कू र्होत्रो फ़ु‌उलेहान्नोलो सेपेहोस
इल किरादेहांदो तोलाविया

सर्व गोष्टी दिवसभरातल्या पूर्वघटीत असतात 
आपण पाहतो ते त्यांच्या प्रतिमा फ़क्त.
आरशातून आजचा चेहरा नाहीसा होत असताना
पूर्वीचे कित्येक चेहरे तिथेच असतील मात्र.

किती वेगळा विचार!

त्याच्या कवितेतून अनेक शक्यतांना वाव असतो, त्या शक्यतांमधून त्यांना नवनवीन अर्थांचे धुमारे फ़ुटतात, मग त्या अर्थांवर लहरत लहरत आपल्या काही नव्या जाणिवांचा प्रवास करुन येतो. आपण कोण आहोत आणि आपल्या मर्यादा काय आहेत आपला आवाका काय आहे याची पुरेपूर जाणीव असलेला तो माणूस होता त्यामुळे तो किमान त्याच्या जाणिवांना न्याय दे‌ऊ शकायचा/ शकलाय आणि म्हणूनच त्याच्या कविता जाणीवश्रीमंत आहेत. "तुझ्याबरोबर असताना आणि तुझ्याबरोबर नसतानाचा- काळ मोजण्याची ही एकमेव पद्धत आहे माझी" असं काहीतरी हळवं बोलून जाणारा बोर्हेस दुसरयाच क्षणी "वास्तव हे असेलच असे नाही आणि असतंच असंही नाही" असं काहीतरी चमकवून टाकणारं बोलून जातो.

त्याचे अनेक मित्र त्याला सांगायचे की त्याच्या कथा त्याच्या कवितांपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत म्हणून. पण कविता लिहीताना एक वेगळाच आनंद होतो असे बोर्हेस म्हणायचा. बोर्हेस खरंतर त्याच्या कथा आणि निबंधाकरता प्रसिद्ध! पण कवितांवर त्याचा कोण जीव. डोळे कायमचे अधू झालेले असताना आणि दृष्टी गेल्यावर क्लिष्ट निबंधांपेक्षा कविता जसजशी डोक्यात येते तशी लक्षात ठेवायला सोपी पडते असं म्हणायचा. अधू असली तरी बोर्हेसकडे सामान्य दृष्टीपेक्षाही वेगळी दृष्टी होती हे सांगायला त्याच्या कविता आहेतच.

इला पुरतासे सि‌एरानातुपासो
सोलो देलोत्रोलादो देलोकासो
व्हेरा लोसारर्तेतीपो‌इ‌आ लेंदोरेस.

आपल्यामागून दारं बंद करत येणारे आपण मात्र
यातलं अद्भुत आणि सौंदर्य पाहू शकू
या सर्वाच्या पल्याड पोहोचू तेव्हाच. 

अंधत्वामुळेच त्याच्या कामोएस, स्पिनोझा अशा नंतरच्या बरयाच कवितांमध्ये कल्पनेतून जन्माला आलेल्या प्रतिमांचा प्रभाव दिसतो.

त्याची कविता आडवळणाने काहीच सांगत नाही. जे काही आहे ते थेट मांडणे हा बोर्हेसच्या कवितांचा फ़ॉर्टे! त्याच्या कवितांमध्ये धुरकर, गूढ असे काही आहे आणि भावुकता पार ओसंडुन वा्हतेय असं कधीच व्हायचं नाही. एकसंध कविता लिहीण्यापेक्षा चार-चार-तीन-तीन ओळींचे चरण लिहीण्याकडे त्याचा जास्त ओढा होता. ’द गोलम’ सारखी बॅलड्स त्याने अशाच प्रकारे लिहीलीयेत. ’ल लुविया’ नावाची ही कविताच पाहा.

ल लुविया (पा‌ऊस)

ब्रुस्कमेंतेलातार्द से हाक्लारादे
पूर्क या कालेलुविया मिनिसु‌ओसा
काय ओ कायो. ला लुवियेसुनाकोसा
के सिनदोदा सुसेद एनेल पासाद

आताशी कुठे दुपारी पावसाने उघडीप दिलीये
पण पा‌ऊस अधूनमधून रिमझिमतो आहे
पा‌ऊस पडतोय की पडून गेलाय?-कोणाला त्याचं काय
आता याक्षणी जे असतं, तेव्हढंच नेमकं खरं आहे

की ला ओये कायेल रेकोब्रादो
एल तियांपो‌एनक ला सुवेर्त व्हेंतुरोसा
ले रव्हाले यून फ़्लोर एलामादारोसा
येल कुरि‌ओसो कुलेर देल कोलोरादो

पावसाची रिपरिप ऐकताना मिळतो
प्रिय, आल्हादक आठवणींना उजाळा
कसे हिरीरीने बोलत बसायचो रंगांवर
मग ते गुलाब असो वा कोलोराडोतला उन्हाळा

इस्ता लुविया के सि‌एगा लोस क्रिस्तालेस 
अलेगारेम्पार्दिदोसाराबालेस
लास्नेग्रासुवोस्देना पारा एन सि‌एर्तो

तावदानावर पा‌ऊस तडतडतो आहे
शहरही कसं हरवल्यासारखं झालंय
वारुणीतल्या द्राक्षांची चव जितकी खरी
(तसं पावसातल्या हरखवणारया आठवणींचं झालंय.)

पातियो के‌एन्नो  एक्झिस्ते.ला मोहादा
तार्दे मे त्रायला वोस, ला वोस देसियादा
दे मी पाद्रे कम्यु‌एले इल्केनो मा‌एर्तो

पाण्यात चिंब अंगण आणि उजळणारी दुपार
यांच्या निगडीत आहेत खूप सारया आठवणी
माझ्या बाबांच्या-हे आता हयात नाहीत पण
(खरंतर मला सोडून गेलेच नाहीत कधी..)
--

सृष्टीच्या चलनवलनाबद्दल, तिचं आखीव मार्गावरुन परिक्रमा करणं याबद्दल बोर्हेसला खूप कुतूहल होतं असं दिसतं. त्याच्या बरयाच कवितांमध्ये त्याबद्दलचे उल्लेख येतात. उदाहरणार्थ त्याच्या ’एव्हरनेस’ कवितेत तो म्हणतो तसं-

सोलो यूनाकोसा न्वाय एसोलोल्विदो
दि‌ओ, के साल्वेल्मेताल साल्वालेकोरिया
इ सिफ़्रसुपरोप्रोफ़ेतिका मेमोरिया
ला लुना केसेरान एला क्यानसिदो

निर्मात्याने धातू बनवताना मळी ही बनवलीच
तेव्हा विस्मृतीत जावी अशी एकही गोष्ट नसते 
त्याच्या अनादी, थांग न लागणारया स्मृतीत
कितीदा चंद्र उगवला आणि मावळला याचा हिशोब आहे

किंवा
इ तोदो सुनापार्त देल्दिव्हेर्सो
क्रिस्ताल देसाममोरिया, एल युनिव्हेर्सो
नो तिनेन्फ़िन सुसार्दो कोरेवोरेस

विश्वाच्या त्या बहुरंगी कॅलिडोस्कोपमधून 
या सर्व गोष्टी जन्म घेताना पाहणं आणि
त्या उलगडताना पाहणं याला अंत असा नाहीच
--

अमेरिकन, ब्रिटीश, रशियन साहित्याचा वरचष्मा असलेल्या साहित्यिक जगतात बोर्हेसचा प्रवेश झाला तो गाब्रि‌एल गार्सिया मार्केसची ’सि‌एन आन्योस दे सोलेदाद’ (वन हंड्रेड यियर्स ऑफ़ सॉलिट्यूड) प्रसिद्ध झाली तेव्हा. लॅटीन अमेरिकन साहित्याबद्दल लोकांना कुतुहल वाटायला लागलं आणि नेमक्या याच वेळी बोर्हेसच्या कविता प्रकाशझोतात आल्या.

बोर्हेसच्या इतर समकालिनांच्या झळझळीत वैयक्तिक आयुष्यांशी तुलना करता बोर्हेसचं आयुष्य तुलनेत फ़ारच एकसुरी. तो अत्यंत एकांतप्रिय माणूस होता. ब्युनास आयर्स मधल्या काळोख्या खोलीत तासनतास एकट्याने घालवत त्याने हे कागदावरचं अद्भुत विश्व निर्माण केलंय. बोर्हेस हा एकाच वेळी दोन विश्वांत जगणारा होता. प्रत्यक्षातला बोर्हेस एकलकोंडा, केवळ गंमत म्हणून राजकारणात लुडबुड करणारा, लायब्ररीयन असं थोडंथोडकं बरंच काही होता पण कागदावरचा बोर्हेस मात्र खर्राखुरा किंवा त्याला ज्या बोर्हेसची आस होती तसा होता.

एल सुसिदा  (आत्महत्या)

नो केयराय एला नोश नेस्त्रेया
नो केयराय ला नोच
मोरिरेय कॉन्मिगो ल सुम्मा देलिन्तोराब्ल युनिवेर्स

चमकायला आकाशात एकही तारा उरणार नाही
मी रात्रच विझवुन टाकणारेय
मी मरेन तेव्हा मी माझ्याबरोबर विश्वाचा पसारा गुंडाळून जाणारेय

बोरारेल लास्पिरामिदेस लास्मेदालियेस
लोस कॉंतिनेंतेस सिलेस्कारेस
बोरारे लाकमुलास्यो डेल पासाद
हारे पोल्वो लेस्तोरिया, पोल्वो ए पोल्वो

मी पिरॅमिड्स नाहीसे करणारेय, आणि मेडॅलियन्सही
मी खंड पुसून टाकणारेय आणि चेहरेही
शेवाळलेला, तुंबलेला भूतकाळ बुजवून टाकणारेय
इतिहासाची धूळदाण उडवून त्या धुळीचीही धूळ करणारेय 

इस्तोया मिरांदो एलुल्तीमो पोनी‌एंते
ओ‌इगो एलुल्तीमो पाहारो
लेगो ला नादा अ नादी.

हा समोर आहे तो शेवटला सूर्यास्त
पक्षी गाणे म्हणतोय-तेही शेवटचे.
माझ्या नसण्याला मी कोणालाच न देता चाल्लोय.
--

बोर्हेसचं वाचन अफ़ाट आणि पुस्तकांबद्दल प्रचंड वेड! त्याची स्वर्गाबद्दलची कल्पना ’स्वर्ग लायब्ररीसारखाच असेल’ अशी होती. त्याचं हे वेड जपणं त्याला दुरापास्त व्हायचं ते त्याच्या डोळ्यातल्या अधूपणामुळे. पण त्याने त्याच्या आवडीपायी नेटाने जमवून घेतलं असावं बहुतेक. वयाच्या तिसाव्या वर्षापासून त्याची दृष्टी अधू अधू होत गेली ते उतारवया्त त्याला थेट अंधत्वच आलं. नेमक्या त्याच वेळी त्याला नॅशनल लायब्ररीचं प्रमुख पद देण्यात आलं. अंधत्व आणि ८००००० पुस्तकं, (पुस्तकांच्या गराड्यात बसलोय हे त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं) एकाच वेळी बहाल करण्यामागच्या दुर्दैवविलासाबद्दल तो काय म्हणतोय पाहा,

नादीयरेवाज्लाग्रिमो रेत्रोच
एतदिक्लरास्यो देला मेत्रीय
दे दि‌ओस क कॉन्माग्निफ़िकैरोनिया
मे दियो आ ला वेस लो लिब्रोस ला नोच

परमेश्वर ना हळहळतो ना बोल लावतो
ठरवल्यासारखा खेळतो एक विचित्र खेळी
त्याची उपरोधाची हद्दच पाहताय ना
फ़ट म्हणता पुस्तकही दिली आणि दृष्टीही नेली.
--

सर्व जगाकडे, चराचराकडे पाहायची इतकी साधी, सरळ, सुंदर नजर असलेल्या, ती वाचकाला विनासायास बहाल करणारया या जगप्रसिद्ध कवीला साहित्याचं नोबेल मात्र मिळू शकलं नाही त्याबद्दल हळहळ तर वाटतेच. ज्यांना नोबेल मिळायला हवं होतं असं सर्वांनाच ठामपणे वाटतं अशा निवडक साहित्यिकांत त्याची गणना होते. पण त्याने त्याच्या चाहत्यांना काही फ़रक पडत नाही. तो जरी आत्ता, इथे आपल्यात नाही तरी तो जे कवितांचे देणं दे‌ऊन गेलाय त्याबद्दल त्याचे वाचक हेच म्हणतील..

"ग्रासियास सिन्योर होर्हे ल्यु‌ई बोर्हेस पारा सु एव्होरनेस!"
"तुमच्या ’असलेपणात’च खूप काही आहे"