उत्तररात्र- १

-एय, एक गोष्ट सांग नं.

-गोष्ट? आता?

-हं..

-ओके, (विचार करतो, डोकं खाजवतो) एक होता सॉफ़्टवेयर टेस्टर..

-मी सांगू मी सांगू पुढे काय होतं? त्याला एक बग खूप त्रास देतो..

-हैला, तुला कसं माहित?

-एक बोट पकड (दोन बोटांपैकी एक बोट पकडतो)

-कारण तुझं नवं व्हेंचर सुरु झाल्यापासून मला तू हीच गोष्ट एक होता प्रोग्रामर, डिबगर, टिम लीडर अशी सांगतोयेस

-असं?

-हो

-(थोडा वेळ शांत, मग अचानक) दुसरं बोट काय होतं?

-(मनापासून हसते)गोष्ट?

-ओके, आज मी तुला एक ब्रॅंड न्यू गोष्ट सांगतो.

(मांडी घालून, मांडीवर उशी घेऊन गोष्ट सांगायला सुरुवात करतो)
-एक होतं आटपाट नगर. आटपाट नगरातील एका कदंबाच्या झाडावर कावळ्यांची कॉलनी होती..

-कदंब?

-खरंतर आटपाट नगरातील एका कदंबाच्या झाडावर कावळ्यांची कॉलनी होती असे म्हटल्यावर आटपाट नगरातदेखील कावळे राहायचे एव्हढाच अर्थबोध होतो. तू-मी  कसले हरखलो होतो नाही- चेन्नईला कावळे बघितल्यावर? तिथले कावळे आपल्या कावळ्यांपेक्षा बिलकुल वेगळे नाहीत , तेवढेच काळे आहेत पहिल्यावर? (अचानक आठवल्यासारखं) तू  उद्या डोसे काढशील का?
(ती जोरात चिमटा काढते)

-आऊच..नखं काप ती बये.  हां. तर ते कदंब बिदंब सोड. माणसांच्या साहित्य सहवास कॉलनी सारखं पक्ष्यांचं कदंब.

-हां, ते साहित्य सहवास  माहितेय मला.

(एक क्षण तिच्याकडे बघतो आणि मग गोष्ट पुन्हा सुरु करतो)
-तर त्या कावळ्यांच्या वसाहतीत एक वेगळा, धडपडा कावळा रहात असतो. आपल्या गोष्टीत कावळा म्हटला की..

-कावळी आलीच आणि ती देखील तेवढीच वेगळी आणि धडपडी असणार. आय नो, गो  ऑन.

-शहाणी गं माझी बाय ती. आता गोष्ट तूच पूर्ण कर ना, मला जाम झोप येतेय.

-(ती खरंच पुढे गोष्ट सांगायला घेते) ती दोघं लिव्ह-इन मध्ये राहत असतात.

-(झोपलेला उठून बसतो) ये हुई ना बात! इंटेरेस्टींग. पुढे?

-कावळा सतत काहीतरी नवीन, जगावेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो, त्याची नेमकी हीच गोष्ट आवडत असल्याने कावळीचाही त्याला पूर्ण सपोर्ट असतो.

-तुझं लेमन तिरामिसु गंडलेलं तेव्हा इतरांसमोर तुझी वाहवा करुन मी दिलेला तसा..

-(त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन) तर "कावळ्याचं घर होतं शेणाचं" "कावळ्याचं घर गेलं वाहून" या मिडीयॉकर गोष्टीचा त्याला इतका भयंकर वैताग यायचा की एके दिवशी त्याने चिमणीचं मेणाचं घर काय झक मारेल असं घरटं बनवायचा घाट घातला. साहजिकच आहे त्याने ही योजना सर्वात पहिल्यांदा कावळीला सांगीतली.

-एमेफ़ीईओ नाही?

-(पुन्हा एकदा दुर्लक्ष करुन)असा प्रयत्न त्याआधीही एका धडपडया कावळ्याने केला होता पण ते कावळेमहाशय एके दिवशी पतंगाच्या दोराला अडकून स्वर्गाकडे प्रस्थान करते झाले.

-हं

-तर आपल्या धडपड्या कावळ्याने त्या कैलासवासी कावळ्याच्या बायकोकडून घरट्याचा प्लॅन, ब्लू-प्रिंट मिळवली आणि साहित्याची जमवाजमव करायचं काम कावळीला दिलं.

-लेमन तिरामिसुसाठी छप्पन्न डी-मार्टस आणि स्पेन्सर्स मी पालथी घातली तशी..

-(आता गोष्ट ओघवती येते आहे, त्याच ओघात) कावळीने उत्साहात ते काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिने ती ब्लू-प्रिंट नजरेखालून घातली, त्यातली प्रत्येक गोष्ट, त्या गोष्टीचा बारकावा समजून घेतला. घरटी बांधण्यात तज्ञ अशा अनेक कावळ्यांशी ती बोलली. ते घरटं अधिकाधिक चांगलं कसं करता येईल या विचारात तिचा पूर्ण वेळ जायला लागला.

-मग?

-कोकाकोलाचे स्ट्रॉ तकलादू म्हणून तिने मॅकडी आणि केएफ़सीचे स्ट्रॉ जमवले, त्यासाठी प्रत्येक आऊटलेट रोज पालथी घातली. टिकाऊपणासाठी लहान, सुक्या काटक्यांऐवजी मोठ्या, लवचिक काटक्या जमवल्या. सगळं सामानसुमान जमा झालं तसं तिने कावळ्याच्या समोर नेऊन टाकलं. तिची अपेक्षा अशी की कावळा तिला जवळ घेईल, चार स्तुतीचे शब्द बोलेल.

-नाही बोलला का?

-छे! त्याने ती थंडगार एकाक्षी नजर तिच्यावर टाकली आणि विचारलं,"हे काय?" कावळी म्हणे, "सामान" त्यावर कावळा विचारता झाला, "पण मी तुला कोकाकोलाचे स्ट्रॉ सांगीतले होते, हे कुठलेतरी भलतेच आहेत. शिवाय काटक्याही किती जाड आहेत" यावर कावळीने त्याला तिने कसा ब्लू-प्रिंट्सचा अभ्यास केला आणि त्यात काय-काय सुधारणा करता येण्यासारख्या आहेत हे शोधून काढलं हे सांगायला सुरुवात केली. यावर कावळ्याने अतिशय उर्मटपणे तिला थांबवलं आणि विचारलं, "तुला म्हणायचंय काय?"

-(गोष्ट ऐकण्यात गर्क. हं म्हणायचं भान नाही)

-कावळी हिरमुसली पण ती नेटाने सांगत राहिली. तिने सांगून संपल्यावर कावळा फ़क्त एवढंच बोलला "मला काय करायचंय हे मला चांगलं माहितेय आणि त्याचा पूर्ण विचार करुनच मी तुला सामान जमवायला सांगीतलं. तुला जेवढं सांगीतलंय तेवढं कर, त्याचं पुढे काय करायचंय याचा विचार तुला करायचं काहीच कारण नाही. नाहीतर असं कर नां, तू काही करुच नकोस, सामानही मीच जमवतो"

-बिच्चारी कावळी!

-हो नं. ती सदिच्छेने काहीतरी करायला गेली आणि त्याचा विचका झाला आणि तो दुसरया कोणी नाही तर आपल्याच धडपड्या कावळ्याने केला.

-मग काय झालं?

-आता गोष्ट तू पूर्ण कर मग मी डाळ-तांदूळ भिजत घालते.

-उम्म..मग काय, कावळ्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याच्या सांगण्याबरहुकुम सारे काही केले असेल नाहीतर..

-मेबी.. काय रे? तू तेलाचा डबा आणलास? नाही आणलायेस तर डोसे विसर.

-तर तर, आणलाय. ऐक ना,  नाहीतर आपल्या कावळीसमोर पुढे मागे स्वतंत्रपणे, तिला हवं तसं घरटं बांधण्याचा पर्याय असेलच ना? नक्कीच. अरे हो, ते तेलाचं सांगायचं राहिलंच. यावेळी आपलं नेहमीचंच सनफ़्लॉवर नाही आणलं, सफ़ोला आणलं-लो कोलेस्ट्रॉल, हार्ट केयर ऑईल, मस्त नं?.

-(प्रचंड ऑफ़ होऊन) का? तू सफ़ोला का आणलंस?

-(अजून गोष्टीतच रमलेला) अं?

-अरे,  तुला जेवढं सांगीतलंय तेवढंच करायला काय होतं? मी सनफ़्लॉवर आण म्हटल्यावर सनफ़्लॉवरच आणायचं, स्वत:ची अक्कल पाजळायची नाही. एक काम करतोस तेही धड करता येईना तुला..
(बोलता बोलता थांबते, दचकते आणि हिरमुसलेल्या त्याच्याकडे पाहात राहते)

(तो अचानक काहीतरी समजल्यासारखा.. पण सावरुन, समजुतीने)
-नाही राणी. मला काय वाटतंय माहितेय का? आपल्या गोष्टीचा शेवट "कावळ्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याच्या सांगण्याबरहुकुम सारे काही केले असेल." असाच व्हायला हवा. कावळीला स्वातंत्र्य नकोय, कावळाच हवा असेल तर शेवट तसाच होणे योग्य, नाही? काय म्हणतेस?

(ती गप्प, तो व्यग्र. पहाट व्हायला अजून भरपूर अवकाश आहे)

मो.मोडॉनेय-पुन्हा.


आताशा सगळ्यांना झालंय तरी काय?

पक्षी तारेवर समसमान अंतरावर बसत नाहीत.
पाखरांना, फ़ुलपाखरांना डिस्लेक्सिया झाल्यासारखा वाटतो. माझ्या गाडी्समोर वेगाचा अंदाज चुकून हरघडी धडपडत असतात हल्ली.
कुकरच्या शिट्टीच्या हिस्स्स्स्स्ने गाठलेले पार तार सप्तक
खारीची बडबड वाढलिये,
या खारीची समजूत कशी काढावी हेच मला समजेनासे होते.
कालपरवापर्यंत मजेत डोलायचे ते तीन दिवसांत झुरुन मेलेलं  वांझ झाड
आकाशात हल्लीहल्लीच दिसायला लागलेले वेडेविद्रे, हिंस्त्र आकार
डोकं आणि पाय धरुन हे sssss ताणल्यावर दिसेल तशी तिन्ही त्रिकाळ दिसणारी अभद्र सावली.
फ़िल्टरमधून येणारा एक्स्ट्रा रागावलेला ग्ळ्ळ्ळ्म्ग्ळ्ळ आवाज. (भर पाणी आणि फ़ूट एकदाची)
सगळेच जण वैतागल्यासारखे वाटतायेत.
छान छान असल्याचा, पर्फ़ेक्ट असल्याचा आव आणून कंटाळल्यासारखे वाटतायेत

तिन्ही त्रिकाळ डोळ्यातले दिवे विझलेली माणसेच माणसे दिसतात.
यांच्या डोळ्यातले ला‌ईट्स गेले तरी कुठे?
यांच्या डोळ्यातली लुकलुक चोरुन नेणारा ’पूट-आ‌ऊटर’ नेमका कुठे असतो?
लोकांना ’इसेन्स’मध्ये रस नाही उरलेला, फ़ालतू माहितीत मात्र अजूनही आहे.
लोकं हल्ली वेदनेला सामोरे जात नाहीत. वेदनेला ’स्यूडो’ बनवून पिल्स ऑफ़ विस्ड्म घेणं मात्र वाढलंय. आपण काय आणि कसं गमावलेय हे त्यांना कळत तरी असेल का?
डोळ्यात बघून स्वच्छ बोलणारया माणसांची जमात नाहिशी होण्याच्या मार्गावर आहे.

माणसांना हल्ली अटॅचमेंटस नको असतात.
म्हणजे हव्या असतात, अलबत! पण त्यांना पहिले ’नको’ म्हटलं तर exclusivity वाढते असं त्यांना वाटत असतं.
आणि खरंच आहे की ते-
आधी मिळणार नाही म्हणून शक्यतांना जागाच ठेवू नये आणि अकस्मात ते मिळावं नव्हे त्या समोरच्याने ते उदारहस्ते दे‌ऊ करावं याने असा खूप खूप छाती फ़ुटून जाते कि काय असं वाटायला लावणारा आनंद नाही का होत? होतो नं-आधी घडलेलं सर्व पुसून टाकत, त्याने दे‌ऊ करण्या‌आधी आपणच मागीतलं होतं हे सपशेल विसरुन जात?
पण समोरच्याने ’नको’ म्हणावं आणि मीदेखील हट्टाला पेटून ’कसं नाही मिळत मला बघतेच मी’ म्हणून हट्टाला पेटावं.
शी! कसले गेम्स आहेत हे?
पण असे खेळ खेळले जातात. हररोज, प्रत्येक क्षणी.

मी लिहीते त्यातले काय चूक आणि काय बरोबर? हे मला ठा‌ऊक नाही. आज बरोबर वाटतंय, उद्या वाटेलच याची शाश्वती नाही.
दुसरा आपल्याबद्दल काय समज करुन घे‌ईल याची काळजी आपल्याला का वाटते? मुळातच जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल डोकेफ़ोड का करुन घ्या? तुम्ही समोरच्यापर्यंत जसं पोहोचायचं तसंच पोहोचता. तो त्याच्या सोयीचं तेव्हढंच आणि तसंच बघतो. लोकं आपल्याला त्यांना जसं बघायचं आहे तसंच बघत असणार, त्या गोष्टीवर आपली सत्ता चालत नाही. यावर असेही म्हणता ये‌ईल की इतकं स्पष्टीकरण देण्याची, दुसरयांना महत्व देण्याची इतकी गरज का वाटते? कारण त्यांना वजा करुन सिच्यु‌एशन समजून घेता येत नाही म्हणून. ती दुसरी माणसं तिथे तशी आहेत आणि असणारच आहे्त हे एकदाचं मान्य करुन टाकण्यात शहाणपणा आहे. आपण डोळे झाकून घेतलेस म्हणून ती तिथे असायची थांबणार आहेत असं होत नसतं.

यावर कधीकाळी कासवर पुरलेली पत्रे अवचित आठवली. फ़क्त माणसांना पुरायचं, आठवणींना का नाही? म्हणून पुरुन टाकलेली.
अक्षरं मातीत मिसळून जाताना त्यांचं काय होत असेल हा प्रश्न नेहमीच पडायचा. मला वाटायचं की कटू शब्दांमधून निवडुंगाचे फ़ड उभे राहतील आणि गोड शब्दांतून...पण दोघांतूनही एकाच प्रकारची फ़ुले उगवलियेत-अश्रुंची फ़ुले! एकच निर्वाणीचा टपोरा अश्रु छाताडावर वागवणारी-
त्या एका अश्रूनंतर आपण आपण आयुष्याचं जे काय करायचं ते करुन घेतोच. नाही का?

या डोळ्यांत बघणारया- न बघणारया, डिटॅच्ड असणारया-नसणारया, डिस्लेक्सिक, अडिस्लेक्सिक पाखरे, डोकं उठवणारी खार‌ आणि या सगळ्यांशी फ़टकन अटॅच होणारया माझं मी काय करायचं अं?
काय करायचं?
की काहीच करायचं नाही?

हे सारं कोणालातरी भेटून बोलावे अशी सोयही नाही उरलेली. ते माणूस जा‌ऊन बसलेय आमच्या बोडक्यावर त्या तिथे आकाशात चांदणी बनून. आता त्याने आमच्यासाठी आकाशगंगेच्या बाजूचं प्रा‌ईम लोकेशन बघून ठेवलेलं असावं इतकीच इच्छा. बाकी सगळं तर हाय काय आणि नाय काय.

मीच कधीकाळी लिहीलेलं एक वाक्य आठवलं
आठवणी या ’इंटरप्रीटेशन्स’ असतात, रेकॉर्ड्स नाही.
तुम्हाला माहितेय का माहित नाही पण आपण आपल्या आठवणींना (आठवणींना बरं- इंटरप्रीटेशन्सना नाही) काळानुसार ऑल्टर करत जातो. त्यात आपल्या सोयीची एक्स्प्लेनेशन्स घालतो, प्रसंग पार ट्विस्टेड करुन सांगतो, काल्पनिक संवाद-प्रसंग त्यात घुसडतो. का? तर खूप दुखत असतं आत कधीकधी ते जास्त दुखू नये म्हणून, रडणं कमी करता यावं म्हणून, आपल्या ब्लंडर्सची आपल्यालाच लाज वाटते म्हणून..त्यात वा‌ईट आहे का? मला वाटतं नाही कारण हा कामूफ़्लाजचा प्रकार आहे. कामूफ़्लाज ही नैसर्गिक प्रेरणा आहे-सर्व्हायव्हलसाठी! पण होतं काय- आपण दुसरयांना तीच एडिटेड व्हर्जन्स सांगत असतो. मग ती सांगता सांगता आपल्याच डोक्यात इतकी पक्की बसतात की आपण तीच खरी मानून चालायला लागतो. खरं-खोटं, बनवलेलं काय-वास्तव काय ह्यामधली ती रेषा पार मिटून जाते. मग आपण त्या ऑल्टर्ड व्हर्जन्सनाच आपल्या आठवणी मानून चालायला लागतो. कारण शहानिशा करण्या‌इतका मेबी इतका टा‌ईम आपल्याकडे नसतो किंवा तेव्हा त्याची गरज वाटत नाही. अशा ऑल्टर्ड आठवणींच्या इंटरप्रीटेशन्सना (कशीही) तसाही काय अर्थ असतो? फ़ावल्या वेळचा विंझणवारा-याशिवाय काही नाही.

आपण जुना रंग न खरवडता त्यावर नवीन रंग मारतो, मग तो जुना झाला की त्यावर आणखी एक थर, मग आणखी आणि मग आणखी एक..याला अंत असा नाहीच. पण त्याने होतं काय की मूळ रंग कोणता होता हे आपलं आपल्यालाच सांगता येत नाही, कितीही डोक्याला ताण द्या. पण त्याने अस्वस्थ व्हायला होतं का? माझं उत्तर आहे-नाही. आपल्याला आताच्या रंगाशी मतलब असतो. मग आपण आताचा रंग लक्षात ठेवू मे बी पुढच्या रेफ़रन्सकरता पण तो मूळचा जुना रंग पार विस्मृतीत जातो. अगदीच नेट लावून पाहायचा म्हटला तर तो पार आतपर्यंत खरवडून काढायला लागतो. आताच्या रंगाला पूर्णपणे विस्कटत. भिंतीलाही दुखतं, रंगालाही दुखतं, आतल्या रंगामध्ये धुगधुगी असेलच तर त्यालाही दुखेलच. तो पाहून कससंच झालंच आणि तो डोळ्यावेगळा करायचा म्हटला तरी त्या खरवडण्याचा ठसा ती भिंत कायम अंगावर वागवणार असते, तुम्ही नंतर कितीही पॅच मारा.

ही सारी सारी कन्फ़्युजन्स अटळ असतात पण ती अन-कन्फ़्युज करण्याचा प्रयत्न करणं ऑप्शनल असतं. असं अन-कन्फ़्युज असलं की कसं छान छान चाल्लंय असा फ़ील येतो, उगाच. ओल्ड मॉंकची एक पिंट संपवली मेंदूवर एक तरल पडदा येतो तसं. आयुष्य़च हॅग-ओव्हर मध्ये काढायचं का मग? कल्पना छान आहे, पण हा पुन्हा ज्याचा त्याचा चॉ‌ईस.
हा माझा चॉ‌ईस, दुनिया ग‌ई तेल लगाने किंवा रास्ता नापने किंवा असंच काहीतरी.

Signing off!
Peace.



’न’गोष्ट.

गिरगावच्या चौपाटीवर निम्मीने त्याला ठार केलं.

’त्या’ने तिथे यायला नको होतं तिला,
निम्मीने तसं निक्षून सांगीतलं होतं.
पण ’तो’ आला
नको ये‌ऊ सांगितल्यावरही आला..
तिने पाय घालून त्याला पाण्यात पाडलं आणि पाण्याखाली दाबुन धरलं
तो पाण्यातल्या पाण्यात धडपडला, तिचे हात काढून टाकायचा प्रयत्न केला.
हळूहळू त्याची धडपड शांत होत गेली मग पूर्णच थंडावली
शर्टाचा फ़ुगवटा सावकाश आत जात राहिला
आणि तिने सुस्कारा सोडला..

--

निम्मीच्या आठवणींची सुरुवात जिथून होते
तिथपासून निम्मी आणि ’तो’ एकत्रच आहेत

शाळेच्या पहिल्या दिवशी तायडीने वापरलेली पुस्तकं
आ‌ईने हातात कोंबली
तेव्हा तिचे डबडबलेले डोळे फ़क्त ’त्या’लाच दिसले
’मी आहे ना!’ अशा अर्थाच्या आश्वासक नजरेने
मग पुढं बरीच वर्ष सावलीसारखी सोबत केली-
तायडीचे कपडे,
तायडीची खेळणी,
तायडीच्या यशाने जुनं होणारं निम्मीचं यश
या सगळ्या शिळेपणातून येणारया वांझोट्या संतापावर
तिने ’त्या’च्या जोडीने मार्ग शोधला तो-
पानांत सदैव पहिल्या पडणारया थालिपीठात,
वाढदिवसाला सर्वात पहिल्यांदा मिळणारया केकमध्ये,
ट्रेनमध्ये सदैव मिळणारया विंडो-सीटमध्ये,
लहान असल्याचं भांडवल करुन मिळणारया सर्वच गोष्टींमध्ये
तिने या सेकंडहॅंडेडनेसचं पुरेपूर उटटं काढलं
तायडीला सेकंडहॅंड नवरा मिळाला तर काय मजा ये‌ईल?
यावर तिनं ’त्या’च्याशी चवीने चर्चा केल्या.
’तो’ जास्त काही बोलत नसे. एखाददुसरा शब्द बस्स! सोक्षमोक्ष लावल्यासारखा.
"मी आहे!"-इति ’तो’

--

कधीकधी ती ’त्या’च्यामुळे डिफ़ा‌ईन होते असं तिला वाटे, तो तिच्यामुळे नाही.
पुढे त्याची जागा मिन्वाने घेतली
हळूहळ तो श्वासोच्छवासा इतका महत्वाचा झाला
ते कधीतरी व्हायचंच होतं
एखाद्याचं स्थान अबाधित राहिलच असा वायदा कोणी करुन शकत नाही
मात्र मिन्वाच्या समोर ’त्या’ने कधीच ये‌ऊ नये असं तिला फ़ार वाटायचं

पण ’त्या’च्या पासून किती काळ लपणार?
तो पेटून उठला
त्याने थयथयाट केला
त्याचे डोळे धगधगले
राग तर त्याला इतका आला की त्याच्यात मावणार नाही असं वाटायला लागलं
कधीही न भेटलेल्या मिन्वाबद्दलच्या द्वेषाने त्याचं मन पेटून उठलं.
निम्मीसमोर तो इतका दिमाखात कसा काय बसू शकतो?
मिन्वाला पार खाली खेचला पाहिजे, गर्तेत नेला पाहिजे.
इतका सारा द्वेष कुठून आला?
त्याच्या असण्याची इतकी ठळक जाणीव यापूर्वी कधीच झाली नव्हती.

तिथून जो तडा गेला तो गेलाच.

---

’तो’ कोण?
’तो’ ला नाव आहे, अर्थात!
नाव- ते ही चार लोकांनी भयमिश्रीत आदराने उच्चारावं असं
पण
’तो’ला निम्मी ’तो’च म्हणते
तृतीय पुरुषी एकवचनात- ’द गॉड’ सारखं
किंवा
व्होल्डेमॉर्टच्या ’यू नो हू’ सारखं
अगदी केव्हापासूनच

लोकं त्याचं नाव घेणं टाळतात
त्याला कोंडीत पकडायला बघतात
त्याच्याकडे बोटं दाखवून बोलतात
त्याचा दु:स्वास करतात

पण निम्मीने तसं कधी केलं नाही
त्याच्यामध्ये काही खोट काढण्यासारखं काही आहे असं वाटलं नाही

तो कायम तिच्याबरोबर होता, कोणीही त्यांच्यामध्ये आलं नाही, तिने कधी ये‌ऊ दिलं नाही

---

बाय हुक ऑर क्रूक
जे हवं ते मिळवायचंच
मग ते कुठल्याही मार्गाने- प्रसंगी नैतिकता वगैरे चिल्लर गोष्टींना धाब्यावर बसवून
हा त्याचा मोटो इत्यादी
त्यासाठी वाटेल तितक्या हीन पातळीला जायची तयारी.

निम्मी ठरवते," तो म्हणतो त्याच्या बरोब्बर उलटं करायचं"
लहानपणापासूनचे जीवाभावाचे दोस्त ते, ’त्या’च्यापासून कसं काय लपणार हे?
’तो’ म्हणाला, "असं काय! मी जे करवून घ्यायचंय मी त्याच्या नेमकं उलट सांगेन"

’तो’ नको म्हणाला मग सिगरेट ओढायचीच
कुठेतरी खोल खोल आत कण्हणारया "नको, नको"ला हाड! करुन
मग दारु
मग मारिजु‌आना
मग सेक्स
अध:पतनाची डिग्री वाढतच गेली
आपण काय करुन बसलोय
हे कोण्या एका सकाळी निम्मीला लख्ख जाणवलं
टॉम रिडल ने वापर करुन घेतलेल्या जिनीसारखं

--

’तो’ निम्मीचा क्रायसिस मधला फ़्रेंड, फ़िलॉसॉफ़र आणि गा‌ईड होता
जास्तच टॅवटॅव करणारी मैत्रिण असो
तिच्यावर गेम करु पाहणारा मित्र असू देत
निम्मीने ’त्या’च्या साथीने त्यांना पार गर्तेत नेलं होतं.
’त्या’ला तो प्रचंड महाभयंकर विजय मिळवल्यासारखं वाटायचं
’त्या’च्या डोळ्यांतली ती लाल चमक बघितल्याचे निम्मी शपथेवर सांगते.

---

वेदना अट्ळ असते, ती भोगणं ऑप्शनल असतं.
मग निम्मीने ’त्या’ला संपवायचंच ठरवलं

पण कसं क सं क सं?

--

निम्मीचा मेंदू जर आता खोलून पाहिला तर त्यातल्या प्रोग्राम्स मध्ये
व्हा‌ईल, ईफ़ चे लूप अनट्रू झाले की ’त्या’च्या स्ट्रॅटेजीसना सेट केलेत
तिच्या मेंदूतली नेमकी कोणती पेशी ’त्या ’च्या भजनी लागली होती
हे पुढे मागे कधीतरी संशोधनातून कळेलच

---

’तो’ जरा विचित्रच होता
वयाच्या मानाने केव्हढातरी प्रौढ, गंभीर

रडण्याचे विविध प्रकार असतात.
एकात चेहरा मख्ख कोरा असतो आणि पाट उघडल्यासारखे अश्रू घळाघळा वाहत असतात. तळहातावरुन सुरी अल्लाद फ़िरवल्यावर त्या उघडलेल्या जखमेतून रक्त वाहायला लागेल तसं.
आणि दुसरयात दात गच्च आवळून, ओठांवर दात रोवून, तोंडावर मूठ, पोटावर हात दाबून हमसून हमसून रडणे. शरीराचा स्वल्पविराम हो‌ईतो.
दोन महिन्यांमागे एकदा ती अशी रडली होती तेव्हा तिच्या डोळ्याभोवती अशी काळी वर्तुळं तयार झाली होती, डाग दिल्यासारखी. पुढे काहि दिवसांनी त्यात तडेदेखील गेले होते
पण आठवणीला खेचत कितीही मागे नेलं तरी ’ तो  रडल्याचं आठवत नाही
’त्या ’ला रडणं ठा‌ऊक नाही.
’त्या ’ला झोपेचा त्रास होता वाटतं
कारण निम्मीला आठवतंय तेव्हापासूनच
’त्या’च्या डोळ्यांखाली सदैव काळी वर्तुळंच पाहिलीत
आणि पांडवाच्या मूर्तीवर टोचून बसवल्यासारखे कवड्यांसारखे डोळे.
आपल्या‌आपल्यातच रहायचा ’तो’
निम्मीला खात्री होती त्यामागचं कारण
त्याची शिंगं असावीत
हो! त्याला डोक्यावर जाणवतील अशी दोन टेंगळं होती
ला‌ईटस गेले की मेणबत्त्यांच्या प्रकाशात सावल्या नाचताना
अगदी अगदी स्पष्ट दिसायची
त्यावेळी निम्मीला ’ओनिडा’आठवायचा
हरणटोळासारखा हिरवागार
शेपटीचा बाण फ़लकारणारा
लहाणपणी निम्मी ’ओनिडा’ला भ्यायची
ती भीती आता‌आतापर्यंत गच्च बसलेली मनात
"तुला आहे का रे असं शेपूट?" असं तिने त्याला अर्थातच विचारलं नाही
तो ’हो’ म्हणाला असता तर तिला भीती वाटली असती का?
’तो’ हो म्हणाला असता का?
?

---

काळ पुढे पुढे निघून जात होता आणि त्या काळातील तिच्या आणि ’त्या ’च्या जागा रिकाम्या राहून जातहोत्या

---

सुस्कारा तर सुटला-
कुणास ठा‌ऊक तिला सुटल्यासारखं वाटलं नाही
किनारयावर परतली तर ’तो ’ तिथेच होता
वाळूवर खुरमांडी घालून, वाळूवर रेघोट्या मारत
तिचं नाव गिरवत-
तिला आश्चर्य वाटलं नाही,
अगदी थोडंसुद्धा नाही
तो होता
तो आहे
तो जोवर असेल तोपर्यंत तो असणारच होता
आणि  तिला ते पक्कं ठा‌ऊक होतं..अगदी आतातून
तो म्हणजे एक सततची भावना होती
ती आज थांबवली आणि उद्या सुरु केली असं होत नाही

मग ती त्याच्याशेजारी वाळूत बसली आणि तिचं नाव गिरवू लागली
भरतीला अजून खूप अवकाश होता-
नाव पुसलं जायलाही!

पलभर में सब कुछ बदल गया
और कुछ भी नहीं बदला
जो बदला था वो तो गुजर गया

जगण्यातून एक गोष्ट तयार हो्ते
आणि
कुणाच्या वाट्याचं, कुणाच्या वतीने, कुणाच्या मर्जीने
म्हणजेच
न जगतानाची अशी ’न’गोष्ट!!

"मामेकाहेन!"

माझी प्रचंड चिडचिड झाली होती.

चारच्या मिटींगला त्या टकल्या ढेरपोट्या फ़्रान्सिसने दुसरया दिवशी सकाळी ९ला कोल्हापूरला रिपोर्ट करायला सांगितलं तेव्हा मी भयानक चरफ़डले. पण कंपनी जॉईन करताना कंपनी सांगेल तेव्हा आणि सांगेल तिथे प्रवास करायची तयारी आहे असं छातीठोकपणे सांगितलेलं असल्याने तो संताप वांझोटा होता. "रिझर्व्हेशन काय तुझे थडग्यात जाऊन बसलेले पिताश्री करुन देणार आहेत का? का जॉन पॉल सार्त्र?" असं काहीतरी कचकाऊन बोलावंसं वाटत होतं पण शेजारी बसलेल्या देवेन हळ्ळीने मला खालून लाथ मारून गप्प बसायची खूण केली. त्या अर्ध्या तासाच्या मिटींगमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली.

असं शेवटच्या क्षणी जेव्हा बस/ट्रेन/प्लेन याखेरीज जाता येणार नाही अशा ठिकाणी तडकाफडकी रिपोर्ट करायला सांगीतलं जातं तेव्हा मला प्रचंड टेन्शन येतं. एकदम सहा वर्षांनी म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागतं.
त्या दिवशीही घरी आल्यावर माझा अवतार बघून माईने फ़क्त एकच प्रश्न विचारला.
"कुठं?’

--

एवढ्या रात्री प्रवास म्हणजे बसचा एकमेव पर्याय उरला होता. आज रात्री बसले तर उद्या पहाटे पोहोचणार.
मग इकडे धाव, तिकडे धाव, ह्याला फ़ोन कर, त्याला फ़ोन कर असं करून शेवटी हर्ष्याने मला या बसमध्ये जागा मिळवून दिली होती.

माझं सामान ठिकठाक लावून मी जागेवर बसती होतेय तोपर्य़ंत बसमध्ये एक माणूस प्रवेशता झाला.

ज्या लोकांना काहीही कसंही घातलं तरी खुलून दिसतं अशा कॅटॅगिरीतला तो पुरुष होता.
अंजिरी रंगाचा चुरगळलेला कुर्ता, बटणं खालीवर लावलेली, गालावर दाढीची खुंट वाढलेली, कपाळावर येणारी झुल्फ़ं, जग बरंच बघितल्याची साक्ष देणारे डोळे आणि याला सर्वस्वी विसंगत असा रुसलेल्या लहान मुलासारखा ओठ काढून सीट शोधण्याचा आविर्भाव. 

अशा खडबडीत, दाढीवाल्या अस्ताव्यस्त पुरुषांचं मालूला सॉलिड अपील आहे. तिला याच्याबद्दल सांगायचंच अशी मनात नोट ठेवुन मी माझं पुस्तक उघडलं.

माझ्या बाजूच्या रांगेतल्या सुबक ठेंगणीने त्याला बरोब्बर हेरला आणि शस्त्रं परजायला सुरुवात केली. तिची सीटमधली चाळवाचाळव, ड्रेसची उगाच चालवलेली सळसळ, पायावर टाकलेला पाय या कश्शाकश्शाकडे लक्ष देता तो माझ्या बाजूच्या सीटवर मख्खपणे स्थानापन्न झाला आणि ती प्रचंड हिरमुसल्याचे माझ्या लक्षात आलं. मी हसून पुन्हा पुस्तकात डोकं घालणार तेवढ्यात त्याने त्याच्या पोतडयातुन प्रॉफ़ेटकाढलं. आणि पहिल्याच बॉलला सिक्सर बसावा तसं झालं.

शो-ऑफ़ असतात बरेच म्हणून मी माझं वाचन सुरुच ठेवलं.

तो वाचनात अखंड बुडून गेला होता पण माझं लक्ष मधुन मधून त्याच्याकडे जात होतं. त्याहूनही जास्त त्याच्या बुकमार्ककडे. काळ्याशार शाईत सुरेख कॅलिग्राफ़ीक फ़ॉंट मध्ये काहीतरी विचित्र लिहीलं होतं. मामेकाहेन असं काहीतरी. शब्द आणि भाषा ओळखीची वाटेना.माझं लक्ष राहूनराहून त्या विचित्र बुकमार्ककडे जात होतं. प्रॉफ़ेटगुंगून वाचत असलेला पोरगा, त्याची आजूबाजूला (म्हणजे त्याच्या बाजूला) काय चाललेय याबद्दलची बेफ़िकीरी यामुळे मला आता त्याच्याबद्दल जबर कुतुहल वाटायला लागलं होतं.
प्रवासाचे सहा-सात तास याच्या शेजारी बसून काढायचे होते. बोलता काढणं तसं अशक्य नव्हतं पण माझ्या जीवावर आलं होतं. आणि त्यातून माझं कुतुहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं. संभाषणाची सुरुवात करावी तर कशी अशा विचारात मी असताना तोच माझ्या मदतीला धावून आला.
"कुठं चाल्लात?"
अं?
किती डंब प्रश्न?
बस कोल्हापूरला चाल्लीये. त्याला मी अध्येमध्ये कुठे उतरणार आहे की कसं? या किरकोळ डीटेल मध्ये इंटरेस्ट असेल तर काय घ्या म्हणून मी पण इमान-इतबारे कुठं चाल्लेय याचं उत्तर देऊन टाकलं. बोलण्याच्या ओघात तो माझ्याच स्टॉपवरच उतरणार आहे हे पण कळलं.
"कोल्हापूरला उतरल्यावर मला साईट वर घेऊन जायला गाडी येईल. तुमचं ठिकाण वाटेवरच आहे. यू कॅन जॉइन इफ़ यु विश!"
"प्रश्न माझ्या इच्छेचा असता तर बरं झालं असतं. म्हणजे मला यायला आवडेल पण तुम्हाला आवडेल की नाही हा मोठा प्रश्नच आहे"

थोड्या वेळापूर्वी टाकलेलं वाक्य याच्या डोक्यावरुन् गेलंय की काय असं वाटुन मी पुन्हा तेच विचारणार इतक्यात तोच म्हणाला,
"मॅडम, तुम्हाला काय माहितेय माझ्याबद्दल?"
ज्या प्रश्नाला "हो" किंवा "नाही" या एका शब्दात उत्तर देता येतेय अशा माझ्या प्रश्नाचं उत्तर हा दुर्वास नीट का देत नाहीये?

आता मात्र माझा पारा चढायला लागला. एकतर मी आपणहून लिफ़्ट दे केली होती. निव्वळ मदतीच्या भावनेचा हा सद्गृहस्थ असा विचका करत असल्याचे मला सहनच होईना.
"हे पहा मि...अं... वॉटेवर.."
"जगत"
"येस मि.जगत, यू सी, तुम्हाला यायचे नसेल तर तुम्ही स्पष्ट्पणे "नाही" म्हणू शकता. आपला रूट सेम आहे म्हणून तुम्हाला ऑफ़र दिली एव्हढंच"
"दॅट्स व्हेरी काईंड ऑफ़ यू. पण त्या आधी थोडं माझ्याबद्दल तुम्हाला ठाऊक असेल तर बरं असं म्हणतोय मी"

काय कोणी खुनी पिसाट वगैरे आहे का काय हा?

"तर मिस..."
"मीरा"
"अरे वा, माझ्या ईचं नाव.."
हुं...क्रॅकपॉट तर आहेच, टॅक्टलेस पण आहे हा.

मग काय तर थोडा वेळ खिडकीतून बाहेर बघत शांतच बसला. बाहेर किर्र काळी रात्र होती. अचानक त्याने आपल्या बॅगेत हात घालून चक्क एक टेलिस्कोप काढला आणि डोळ्याला लावून बघत बसला. हा आपल्याला काहीतरी सांगणार होता ते विसरून गेला की काय? तेवढ्यात त्याने एकीकडे बोट दाखवत म्हटलं "ते पाहिलंत का?"
"काय?"
त्याने दिलेला टेलिस्कोप डोळ्याला लावुन मी त्याने दाखवलेल्या दिशेने पाहिलं.
तो शनी होता.
आपल्या भोवतालची तांबूस कडी मिरवत तो मंदमंद झगमगत होता. त्याला पाहणं इतकं विलोभनीय होतं की नजरबंदी झाल्यासारखी मी तब्बल पाच मिनीटं दुर्बिणीला डोळा लावून त्याकडे पाहत होते.
पण यात शनीचा इथे काय संबंध ?

"तो शनी आहे"
"हो."
"मग?"
"जगातल्या सगळ्या दुर्दैवाचे दशावतार ज्याच्यामुळे भोगायला लागतात, अपेक्षाभंग, खडतर आयुष्य याची तोंडओळख फ़ार लवकर होते असा तो शनी. माझा जन्म शनीच्या प्रभावाखाली झाला. मी तोआहे ज्याला सगळे अपशकुनी म्हणतात. मि. बॅडलक. मी हात लावतो ती प्रत्येक गोष्ट नामशेष होते, मी करायला घेतो ती प्रत्येक गोष्ट खड्ड्यात जाते, माझ्याबरोबर जे असतात ते सुद्धा. तुमच्या सद्भावनेचा मला अनादर करायचा नव्हता पण हे तुम्हाला सांगावंस वाटलं. तुम्हाला तुमची ऑफ़र मागे घ्यावीशी वाटली तर मी समजू शकतो."
मला जोरजोरात हसावंसं वाटत होतं पण तो खूपच अर्नेस्टली सगळं सांगत होता.
"तुम्ही काळजी करू नका. नशीब, ग्रहगोलांचा प्रभाव , ज्योतिष यावर माझा विश्वास नाही. माणुसकी, मदत करणं या चांगल्या गोष्टी या सर्वांच्या वरचढ मानते मी. तुम्ही काय शिकला आहात?"
"एम.एस.सी इन ऍस्ट्रोफिजिक्स"
ही माहिती मला पचायला अंमळ जडच गेलीये हे त्याच्या तात्काळ ध्यानात आलं. 

त्यानंतरचा जवळजवळ एक तास प्रवास मुक्यानेच झाला. सगळीकडे निजानिज झाली होती. शेवटी माझ्या तोंडून प्रश्न गेलाच.
"एव्हढे शिकले सवरलेले असून तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवता याचं मला सखेद आश्चर्य वाटतंय."
तो माझी किव करणारं हसला. त्याचे विझू विझू डोळे त्याच्या हसण्याशी पार विसंगत असल्याचं तत्क्षणी जाणवलं.
"शिक्षणाचं मला सांगू नका.ऍस्ट्रोफिजिक्स घेतलं ते काय उगीच? थियरी वाचून मलाही असं वाटायचं की आपले प्रयत्न कमी पडतायेत, पण सगळ्याच गोष्टी अशा ठरवल्यासारख्या माझ्या विरुद्ध जाव्यात? प्रत्येक? हरेक? कुठलातरी भोवती नळ्या असलेला एक ग्रह मी कुठलीही गोष्ट करायला घेतल्यावर वायरलेसने बॅड-लक चा एक पीस पाठवून देतो याची मला किती भयंकर चीड येत असेल याची तुम्हाला कल्पना नाही.. गं"
आमची बस एक प्रचंड गचका देऊन थांबली.

थोड्या वेळाने ड्रायव्हरने बस बिघडल्याचं जाहीर केलं. मीअभिप्रायाकरता जगतकडे पाहिलं तर तो माझ्याकडेच पाहात होता.

"ओह प्लीज, आता ही बस तुझ्यामुळे बिघडलिये असं म्हणायचं असेल तर प्लीजच"
"त्यात काय संशय आहे? बसमध्ये मी चढल्यावर कोल्हापूरमध्ये बस , रिक्षावाल्यांचा संप सुरु होतो काय? तासामध्ये बस बंद पडते काय?"
कोल्हापूरमध्ये संप चालूये? ही माहिती मला नवीनच होती. पण सध्या हातातल्या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं होतं.
"अरे बस जुनी आहे, झाला असेल काहीतरी प्रॉब्लेम."
"वेल, इफ़ यू थिंक सो" असं म्हणून तो गप्पच बसला.

एक तासाचे दोन , दोनाचे तीन तास झाले तरी बस दुरुस्त व्हायची चिन्हं दिसेना. ड्रायव्हरची शक्य तेव्हढी खट्पट करून झाल्यावर उद्या सकाळी मेकॅनिक येइपर्यंत गाडी इथेच थांबेल असं ड्रायव्हरने जाहीर केलं.

"अरे देवा! मला उद्या सकाळी वाजेपर्यंत साईट वर पोहोचायचेच आहे. मी काय करु आता? शिटमाझ्या नशिबातच का हे?" आणि मी चरकून जगतकडे पाहिलं. थोड्या वेळापूर्वी नशिब, दुर्दैव यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही असं सांगून आता खुद्द आपल्याकडूनच नशिबाला कोसले गेले याचा मला विषाद वाटला.

जवळचं टॅक्सीस्टँड पाच किलोमीटर्सवर होतं. तिथपर्यंत चालत गेलं आणि टॅक्सी पकडली तर वेळेत पोहोचता येईल असा माझा विचार होता. जगतनेही माझ्याबरोबर यायची तयारी दर्शवली. एकटं जाण्यापेक्षा कोणी कंपनी मिळाली तर बरंच असं वाटुन मी आनंदले. आम्ही दोघेही शहराच्या दिशेने चालायला लागलो. वीस मिनीटे चालतोय चालतोय तोच एकदम मुसळधार पाऊसच सुरु झाला.

भर हिवाळ्यात पाऊस? विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासकट?

मी अवाक होऊन तशीच निथळत तब्बल पाच मिनीटं पावसात उभी होते. शेवटी जगतने कुठूनसं एक भलंमोठं प्लॅस्टीक पैदा केलं आणि ते इरलीसारखं डोक्यावर घेऊन आमची वरात पुढे निघाली.
"गप्प बसलीस तर प्रचंड थंडी वाजेल"
"मि.इंटरेस्टींग, तुम्हीच बोला काहीतरी"
"बरं.. तुला माहितीये? माझ्या ईचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. म्हणूनच माझ्याबाबतीत जे काही व्हायचं याचा तिला प्रचंड त्रास व्हायचा. माझी त्यात काहीही चूक नाहीये हेही तिला ठाऊक असल्याने तर आणखीनच. बोल लावायला, दोष लावायला कोणी नसलं की माणूस चुरमडत जातो. मग माझ्या या दुदैवाकरता तिनं तिच्याच नशीबाला कोसायला सुरुवात केली. "माझंच मेलीचं काय हे नशीब!" "माझंच मेलीचं काय नशीब!" असं दिवसातून किमान दहावेळा ऐकल्याशिवाय माझा दिवस संपत नसे. हे ऐकायला मिळालं नाही तरच चुकचुकल्यासारखं होई. त्या वाक्याची मला इतकी सवय होऊन गेली होती की आईच्या पश्चात ते वाक्य कधीही विसरता येऊ नये, कायम नजरेसमोर रहावं म्हणून मी पुस्तकांच्या, वह्यांच्या पहिल्या पानावर लिहायला लागलो, सोयीचं पडावं म्हणून त्याचा शॉर्टफ़ॉर्म वापरायला सुरुवात केली. "माझं मेलीचं काय हे नशीब!" तथा मामेकाहेन!"

अच्छा, त्या बुकमार्कचा अर्थ असा होता तर!

" गेली. माझ्या काळजीपोटी झुरून झुरुन गेली"
हे बोलताना त्याचा आवाज इतका चिरकला की त्याच्या डोळ्यात कुठे वेडाबिडाची झाक दिसते का हे जरा काळजीनंच बघितलं मी.

मग जवळजवळ मुक्यानेच प्रवास झाला. मध्ये जास्त काही झालं नाही. पावसाने आम्हाला आडवंतिडवं झोडपलं, माझा पाय मुरगळला, प्रचंड भिजल्याने जगतला ताप आला. एकही दुकान उघडं नव्हतं. प्रचंड शिणवटा आला होता. शेवटी आम्ही एकदाचे शहरात पोहोचलो आणि टॅक्सी स्टॅंड गाठलं. आता मात्र मी सुत्रे हातात घेऊन टॅक्सी ठरवली. आता जर सगळं सुरळीत झालं तर सकाळी वेळेवर पोहोचणं शक्य होतं.  
स्टॅंडवरच्या चहावाल्याने गेल्या सात वर्षात एव्हढा अवेळी पाऊस झाला नव्हता हेही जाताजाता सांगीतलं.

"पण तू हे विसरतेयेस की मी तुझ्यासोबत असल्यामुळेच हे सगळं होतंय आणि.."
"प्लीज जगत, ड्रॉप इट"

पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. धुंवाधार पावसामुळे दुकानं बंद होती. हा प्रवास लवकर संपेल तर बरं असं मला वाटायला लागलं. कोणीही कमनशिबी किंवा कसाही असो, मला माझ्या अंतिम स्थळी पोहोचण्याशी मतलब होता. 

सुदैवाने त्या टॅक्सीला काही होता आम्ही कोल्हापूरला पोहोचलोजगतला त्याच्या स्टॉपवर पोहोचवलं आणि निरोप घ्यावा म्हणून काच खाली केली तर विजेचा प्रचंड लखलखाट झाला.
"मला माहितेय की या अशा अवेळी वीजेचं खापर पण तू तुझ्यावरच फ़ोडुन घेणार आहेस. पण बघ ना, आपण आपल्या इप्सित स्थळी पोहोचलो की नाही?"

पण यावेळी माझ्या बोलण्यात हवा नव्हती.
ही अशी संकंटांची मालिका सुरू राहिलेली मला नको होती. मनात कुठेतरी हा माणूस पुन्हा कधी दिसणार नाही याचा आनंदही होता. त्याला "सी यू अगेन!" म्हटलं नाहीच मग शेवटी. त्यानेही समजल्यासारखी मान हलवली आणि तो निघून गेला.

दहा मिनीटात साईटवर पोहोचले तर सगळीकडे पळापळ, आरडाओरडा चालू होता.
मी धावणारया एका माणसाला थांबवलं आणि विचारलं,
"काय झालंय बाबा?"
"दहा मिनीटापुर्वी वीज पडुन आपलं साईट ऑफ़ीस कोसळलं बा!"
.
.
.
.
जाताजाताही त्याच्या नशिबाने मला सॉलिड दणका दिला होता.
मी काय बोलणार? मी फ़क्त एव्ह्ढंच म्हणू शकले.
"मामेकाहेन!"
...

(ही कथा यापूर्वी लोक नवनिर्माणच्या नव-वर्ष विशेषांकात प्रसिद्ध झाली.)

 
Designed by Lena