तस्लिमा उवाच..

वादळांना नेहमी स्त्रियांची नावं असतात. ती जोपर्यंत खवळून उठत नाहीत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व कोणाला जाणवत नाही पण एकदा का त्यांनी आपला इंगा दाखवला की ती आपल्या वाटेत येणारया अशाचीही तमा कशी बाळगत नाहीत आणि काय उलथापालथ करु शकतात याची चुणूक दाखवतात.
’तस्लिमा नसरीन’ नावाचं वादळ गेल्या दोन दशकापासून घोंघावतंय ते काही अजून शमायला तयार नाही.
’लज्जा’ पासून परजलेल्या तिच्या बंडखोर लेखणीचा धांदोळा घेतला  की ’ धर्मनिरपेक्ष मानवतावादी लेखिका’ ते ”स्त्रीवादी लेखिका’ असा तिचा प्रवास झालेला दिसतो. ’नारी कोनो देश ना‌ई’ अर्थात ’नो कंट्री फ़ॉर विमेन’ या पुस्तकात कट्टर स्त्रीवादी भूमिकेतून लिहीणारी तस्लिमा तिच्या नेहमीच्याच शैलीत पुरुषप्रधान संस्कृती, तिचं कोतेपण यांचं वाभाडे काढताना दिसतेय. या पुस्तकातल्या ४६ लेखातून तिने जणू त्यांच्यावर ४६ कोरडेच ओढलेत. तिचे हे लेख म्हणजे फ़ावल्या वेळेतली चिंतनं नव्हेत तर जगाकडे, स्त्रियांकडे, शोषितांकडे बघायची एक नवी दृष्टी देणारी स्फ़ुट स्वगतं आहेत.

लेखक आपली पाळंमुळं सर्वसामान्यांमध्ये शोधतो. त्यांच्या वेदनेशी एकरुप झाल्याशिवाय त्या व्यक्तीची त्यांच्यासाठी चाललेली झुंज वैश्विक हो‌ऊच शकत नाही. तस्लिमाच्या लेखांमध्ये पार राजकीय उच्चासनावरच्या निलोफ़रसारख्या स्त्रियांपासून ते बिरभूमच्या रिक्षावाल्याची मुलगी सानेरापर्यंतच्या सर्व स्त्रिया हजेरी लावतात. तिच्या लेखांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि तेच अभिप्रेत आहे- ते म्हणजे आर्थिक स्तर कोणताही असो, स्त्रीला एकसमानच वागणूक मिळते ती म्हणजे दुय्यमत्वाची, गुलामाची. या सर्व स्त्रियांच्या आनंदाशी, दु:खाशी, वेदनेशी तिचं जोडलेपण जाणवतं. उपोषणाला बसलेल्या सिंगूरच्या स्त्रियांच्या अफ़ाट मनोबलाने ती स्तिमित होते-नतमस्तक होते, बळी पडलेल्या प्रत्येक स्त्रीच्या जाण्याने तिच्या आयुष्यात न भरुन येणारी पोकळी निर्माण होते. पुरुषी दडपशाहीच्या चरकात रगडल्या गेलेल्या प्रत्येकीबद्दल तस्लिमाला तेव्हढंच आणि तितकंच ममत्व वाटतं. पुरुषाचा आधार असणं हे स्त्रीच्या समस्यांचं निराकरण करु शकत नाही हे तिने या लेखांमधून पोटतिडीकीने सांगायचा प्रयत्न केला आहे.स्त्रीच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी पुरुषांवर नको तेव्हढा विश्वास टाकणाच्या स्त्रीच्या मूर्खपणाच कारणीभूत आहे असं तिचं म्हणणं आहे. कुठल्याही सबळ  कारणाच्या अभावावर उभ्या असलेल्या लग्नसंस्थेने कर्तृत्वनान गुणी मुलींचे मातेरे झाल्याचे दाखले दे‌ऊन ’विवाहसंस्था’ हा स्त्रियांसाठी भयंकर मोठा शाप असल्याचं सांगते.फ़क्त स्त्रीबद्दलच नाही तर अन्य दुबळ्या, शोषित घटकांबद्दलचा तिचा उदारमतवादी, सहानुभूत दृष्टीकोन लेखांमधून जाणवतो. तस्लिमा समलिंगी संबंधांची पाठराखण करते, कोणाच्याही लैंगिक आवडीनिवडी परस्पर ठरवायचा आणि त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार समाजाला नाही असे ती निक्षून सांगते.

शतकनुशतके चालत आलेल्या रुढींना, समजांना आव्हान देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही, प्रचलित रुढी व समज का आहेत? यावर प्रश्नचिन्ह डकवण्याचेही-पण तस्लिमाने ते केलं. तिच्या लिखाणामुळे गहबज उडाला तो याचमुळे. पेशाने मूळची डॉक्टर असलेली तस्लिमा तिच्या लेखणीचं स्कालपेल चालवत पारंपारीक कल्पनांना छेद देत ती तिचं भेदक विश्लेषण मांडते तेव्हा सर्व गोष्टी पार मुळापासून उघड्यावाघड्या हो‌ऊन आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या दिसतात.

स्त्रीवर लादली गेलेली बंधनं ही तिच्या भल्याकरताच आहेत असा स्त्रीचा समज करुन दिलेला असतो पण ती आपल्या भल्याची कुठल्या प्रकारे आहेत याचा पत्ताच ती बंधनं शतकानुशतके आपल्या अंगावर वागवणारया स्त्रीला नसतो. कधीकधी ती बंधनं तिच्यावर लादणारया खुद्द पुरुषालाही नसतो. त्याबद्दल तिला विचार करायचीही फ़ुरसत मिळू नये याची दक्षता घेतली गेलेली असते. स्त्रीला मालकी हक्काची, उपभोगाची वस्तू समजण्याची पुरुषाची वृत्ती पुरुषाच्याही नकळत त्याच्या नसानसातून भिनलेली असते किंबहुना समाजाने ती त्याला बहाल केलेली असते.हे पुरुषांचं आप्पलपोटेपण, कुटुंबसंस्थेत वारंवार निदर्शनास येणारा पुरुषी दुटप्पीपणा, यातून होणारी स्त्रीची ससेहोलपट याचं वास्तवात दडलेलं चित्रण, स्त्री-पुरुष संबंध, सेक्स यांची ऍनाटॉमी या सर्वांचा लेखाजोखा मांडणारे बरेच लेख या पुस्तकात आहेत.स्त्रीहक्क पायदळी फ़क्त अडाणी, गरीब समाजातच नाही तर सभ्यपणाचा बुरखा पांघरुन वावरणारया पांढरपेशा समाजातही स्त्री हक्कांची पायमल्ली होताना दिसते, तिथे तिला मनुष्यप्रण्या‌इतकाही दर्जा दिला जात नाही हे तिने दाखल्यांसह दिले आहे.तस्लिमाच्या मते शिक्षण घेतलं, स्वत:च्या पायावर उभं राहणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे आणि कॉलेज-युनिव्हर्सिटीमधून घेतलेली पदवी म्हणजे शिक्षण नव्हे. आपल्या अधिकारांबाबतचं समूळ ज्ञान आणि त्या अधिकारांबद्दल आग्रही असणं म्हणजे शिक्षण असं आग्रही प्रतिपादन ती करताना दिसते.
एका वेळी पुरुषी वर्चस्वाबद्दल बोलतानाच ती वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडत राहते, जुन्याच चुका करत राहते, घाव सोसत राहते, जुन्या चुकांमधून नवे धडे शिकते. यांत कधीतरी कुठेतरी पुरुषी नसलेला  पुरुष भेटेल याची आशा दिसते किंवा तिच्या शरीराच्या गरजेचा अपरिहार्य विचार.

कट्टर धर्मवाद्यांवर,धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवणारयांवर ती कडकडून हल्ला चढवते, पुरुषांच्या आक्रमकपणावर भाळणारया स्त्रियांना चार समजुतीचे शब्द सुनावते. पुरुषी हिंसा, उघड‌उघड सापत्न वागणूक, बालविवाह, पुरुषांचे बहुविवाह, त्या अपमानाच्या धगीत मुक्या बिचारया मेंढरांसारख्या उभं आयुष्य़ मुकाट जाळणारया स्त्रिया, चारित्र्यहिन स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याचा कायदा करणारी मुजोर सरकारं, बुरख्याची जबरदस्ती, पतीची आज्ञा न पाळल्याबद्दल होणारी मारहाण, भीतीप्रद तिहेरी ’तलाक’, शोषण-गुलामगिरी सगळ्या-सगळ्याचं दाहक वास्तव तस्लिमाच्या लेखामधून जळजळत राहतं, भळभळत राहतं.

धर्माने केलेली स्त्रीची कोंडी हा केवळ बांगलादेशचाच नाही तर आशिया खंडाचाच विशेष आहे. तस्लिमाच्या झुंजीचा काळ हा मुळातच आशियातील खूप मोठ्या उलथापालथीचा कालखंड आहे. याच काळात इस्लामिक राष्ट्रांमध्ये जीवघेणी युद्ध लढली गेली, भारतीय उपखंडातले सततचे पेटते वातावरण, पत्त्यांसारखी कोसळलेली सरकारं, त्यातून राजकीय खेळ्यांना आलेला ऊत या सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा परामर्ष घेत तस्लिमा स्त्रीच्या अस्मितेचा शोध घेते आहे. हे सर्व लेख त्याचंच प्रतिबिंब आहेत.

तस्लिमाचे हे लेख वरवर जरी अवघ्या स्त्रीवर्गाभोवती रचले गेलेले आहेत असं वाटलं तरी तस्लिमा बांगला स्त्रियांना केंद्रस्थानी ठे‌ऊनच बोलतेय असं वाटत राहतं. बांगला स्त्रिया, पुरुष यांचे मनोव्यापार, स्वभावविशेष, बांगला संस्कृती, बांगला राजकारण याबद्दल जास्त मनस्वीपणे लिहीते कारण ती खुद्द बांगला आहे. ज्या बांग्लादेशवर तिचं आत्यंतिक प्रेम होतं तिथल्या कट्टर धर्मवाद्यांनी काढलेल्या फ़तव्यांमुळे तिला तो देश सोडावा लागला. तस्लिमा म्हणते स्त्रिला देश वगैरे काही नसतोच पण तस्लिमाला कागदोपत्रीही देशोधडीला लावलं गेलं. तस्लिमा पाकोळीसारखी देशोदेशी भिरभिरत राहिली पण तिचं आपलं मायदेशावरचं प्रेम आटलेलं नाही हे दिसतंच.

हे लिखाण म्हणजे कट्टर धर्मवाद्यांच्या लाडक्या ’नष्ट मेयेर’ नाठाळ मुलीची वर्षानुवर्षाची ठसठस आहे.तस्लिमाला माहितेय की स्त्रियांना स्वातंत्र्य कोणी बहाल करणार नाहीये किंवा आयतं देणार नाहीये, ते त्यांचं त्यांनीच लढून मिळवायचं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत व्यवस्थित ब्रेनवॉश झालेल्या स्त्रियांना हे जोपर्यंत उमजत नाही तोपर्यंत गुलामगिरीचा वसा पिढ्यानुपिढ्या चालूच राहणार आणि म्हणूनच तस्लिमाने या पुस्तकाचा डाव मांडल्यासारखा वाटतो. एकेकाळी वर्जिनीया वूल्फ़ने म्हटलं होतं की ’स्त्रीला देशच नसतो-कधीही", त्याला इतकी वर्षं लोटली तरी परिस्थितीत तिळमात्रही फ़रक पडलेला नाही हे खेदजनक आहे. तस्लिमा तिचं काम ती या आधीही करत होती, करत राहील पण ती खरी वाट बघतेय ती युगानुयुगे चाललेल्या या चिरनिद्रेतून स्त्रियांना जाग येण्याची. तसं घडेल तो सुदिन म्हणायचा जेव्हा ’नारी कोनो देश ना‌ई’ असं कडवटपणे म्हणायची पाळी कोणत्याच स्त्रीवर येणार नाही.

2 comments:

Bhagyalaxmi said...

Yes, there is no country for a woman and no matter where she goes. I will read this book first and then get back to the comment.
A woman is not safe. Most of the times, she gulp down everything in the sake for having peace, which she doesn`t. Sadly, our Education system also lacks to provide being a person to be aware of their own rites so that they can live Independently.
Girls do get marry because there parents want to or may be they want to. Most of the times, she wants to get married because she wants support and security and loves to be dependent on the man..no matter what.
A woman has to allow herself to think and to feel and to dare to take her own decision and step out from the comfort zone which she loves to be in. She needs to be awaken from this sleep.

Shraddha Bhowad said...

लक्ष्मी,
शेवटचं वाक्य लई मोलाचं आणि तुझ्या पूर्ण कॉमेंटचा क्रक्स आहे बघ!
पुस्तक वाच खरंच मग बोलूयात. तस्लिमाबाई एक दोन ठिकाणी भरकटल्यात, एकांगी वाटतात पण ऑल इन ऑल त्यांचा टेक खूप छान असतो.

 
Designed by Lena