माझं-काफ़्काचं लायब्ररी कम्युनिक.

प्रति,
काफ़्का तामुरा
स.न.वि.वि

तर, कायेकी आज सकाळच्या लोकलने येताना ट्रेनमध्ये सॉलिड राडा राडा राडा झाला. एकदम एकमेकींच्या झिंज्या पकडून सीट्खालच्या वळचणीत लोळण घेणं, तोंडाने अर्वाच्य शिव्यांची लाखोली वगैरे. या सगळ्या कोलाहलात ती साखरांब्यासारखा आवाज असणारी अना‌ऊन्सर मा‌ईकमध्ये तोंड घालून ’अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, नेक्स्ट स्टेशन अंधेरी’ असं तीनतीनदा आग्रहाने बोलत होती, आणि या सगळ्या जगड्व्याळ (बापरे!) धकाधकीमध्ये मी तुझ्या पत्राचं उत्तर काय द्यावं याचा विचार करतेय, या अवस्थेला इंग्लिशमध्ये ’ऑब्लिव्हियस’ नावाचा सुंदर शब्द आहे. मराठीत काय असावा याचा विचार करायला हल्ली मला भीती वाटते. कारण परवाच्याच दिवशी ’टर्न ऑन’ ला मराठी पर्यायी शब्द शोधताना ’उद्दीपित करणे’ हा वाक्प्रचार मेंदूत हात-पाय हापटत आला. आता उद्दीपित हा काय शब्द आहे? उगीचच्या उगीच आपलं कायतरी.
तर,
समोरुन चाललेल्या बोरिवली स्लो मध्ये दारात उभा असलेला एक मुलगा तल्लीन होऊन गाणं ऐकतोय, त्याचं नाव कृणाल, कुशल असंच काहीतरी असावं असं उगीचच वाटलं. आणि या सगळ्यातून तुला काहीतरी नाव असण्याची आत्यंतिक गरज मला वाटली. सगळ्या गोष्टींना नावं असतात, मग तुलाच का असू नये?
मला निनावी पत्रं आवडत नाहीत.(आता पत्र हा काय शब्द आहे? अंतराळात दुर कुठेतरी टांगलेल्या झिरमिळ्या फ़डफ़डल्यासारख्या वाटतात) निनावी तर निनावी- पण तू जे काही मला लिहून पाठवलयंस, ते मला आवडलं. मला आवडत नाही पण आवडलं हा पॅराडॉक्स झाला आणि पॅराडॉक्समुळे द्सरयांना इंप्रेस करता आलं तरी आपलं आपल्यालाच  गंडायला होतं. त्यामुळे तुझं नाव सध्यापुरता काफ़्का तामुरा. काफ़्का तामुराच का? तर मी सध्या मुराकामी वाचत असल्याने नाव द्यायचं म्हटल्यावर उचकी लागल्यासारखं तेच नाव डोक्यात आलं. तशी आणखीही होती ओशिमा, नाकाता, नोबुरो वातानाबे इत्यादी... त्यापेक्षा काफ़्का तामुरा खूप चांगलंय.  तसं मला अर्ध्या रात्रीत झोपेतून उठवून कोणी माझं नाव विचारलं तर ते मला न आठवण्याचीच शक्यता जास्त. मग मला दुसरयाच्या नाव नसण्याबद्दल एव्हढी उठाठेव असण्याचं काय कारण? ह्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

तर, तुझं पत्र-


मी तुला ओळखत नाही-नसावे. तू मात्र मला अंतर्बाह्य ओळखल्याचा दावा करतोयेस. आणि असं असताना तू मला पत्र पाठवतोस, ते ही निनावी- हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. "अगं बाई! तुझ्या लिखाणाइतकी तूही आवडतेस मला" असं प्रत्यक्ष  भेटून साधंसोप्पं बोललं तर मी लगेच तू झुरळ आहेस हे सिद्ध करीन हा समज खूप हास्यास्पद आहे. आणि तेव्हढाच मला खिन्न्न करणारा. वारयाची झुळूक आल्यागेल्यासारख्या सहज, साध्यासोप्प्या गोष्टींची गंमत कधी कळणार तुला?
असो.

तर,

कुणी आपल्याला आपल्या नकळत पुस्तकात घालून पत्र द्यावं यातलं थ्रिल माझ्यालेखी कधीच संपलं.  या पत्राला उत्तर, त्याला तुझं उत्तर, मग माझं उत्तर असा न संपणारा लूप चालू करायची, आहेपण-नाहीपण चा खेळ  खेळायची तेविशी-चोविशीतली उमेद आता राहिली नाही. पण तू केलेल्या माझ्याबद्दलच्या होमवर्कचं कौतुक जरुर वाटतं. मी मागितलेलं पुस्तक माझ्यापर्यंत आणणारया माणसाला फ़ितवून तुझं पत्र त्यात टाकेपर्यंतच्या सेटींगसाठी तू जे मेहनत घेतली आहेस त्याचा विचका मी करणार नाही. वास्तविक पाहता माझे चार्म्स वापरुन माझ्या पद्धतीने काऊंटरवरच्या पोराला/पोरीला पोत्यात उतरवून तू कोण आहेस हे शोधून काढणं मला कठीण नव्हतं.  दोन मिनीटांचं काम ते. पण म्हटलं तुझ्या आनंदात आणि एक्साइटमेंटमध्ये मिठाचा खडा कशाला उगीच?  आणि तसंही त्या अजिबात खाडाखोड नसलेल्या नसलेल्या, दर २० शब्दामागे २ अशा रेशोने असलेली उदगारचिन्हे, फ़र्राटेदार ’र’चा प्रादुर्भाव असलेले, काळाच्या पडद्याआड गेलेला अल्पविराम वापरलेले ते पत्र अगदी बारकाईने वाचायची इच्छा होतीच. (तू मुळातच असा लिहीतोस की हा सतरावा कच्च्या ड्राफ़्टनंतरचा अठरावा पक्का खर्डा होता?)
हे तुलातरी माहितिये का की तू त्यात एकही प्रश्नचिन्ह वापरलेले नाहीस ते? तुझ्या कल्पनेतही तुला माझ्याबद्दल प्रश्न पडत नाहीत या गोष्टीत मला भयंकर रस वाटला.
आता विचार करते की उत्तर द्यायचं नसतं तर मी या पत्राचं काय केलं असतं? तुझं पत्र वाचलंच नसतं, तसंच चिंध्या चिंध्या करुन फ़ेकून दिलं असतं तर? किंवा सरळ लायब्ररीयनकडेच नेऊन देऊन जबरदस्त इश्श्यू केला असता तर? मला वाटतं तू या सगळ्या शक्यतांचा विचार केला असशीलच, हो नं?

मी कॉंपिटेटीव्ह एक्झाम्सची कॉंपिटेटीव्ह विद्यार्थिनी असल्याने प्रश्नाला प्रश्न पाडून उत्तर मिळवता येते या लॉजिकवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे  माझ्याकडे तुला विचारायच्या प्रश्नांची मोठी जंत्रीच आहे.

दादर स्टेशनला सकाळी ब्रिजवरुन खाली उतरताना एक आंधळा माणुस बासरी वाजवत उभा असतो, मी संध्याकाळी परततानाही असतो, पुन्हा दुसरया दिवशीही असणार आहे, त्याच्या नंतरच्या दिवशीही, मध्येच लवकर सुटून गेले तेव्हाही होता. मला जायचं असतं डाव्या बाजूला पण दादर ब्रिजवरची ती भयाण गर्दी मला नेटाने विरुद्ध दिशेला ढकलत असते- रोज. मी सुद्धा दात-ओठ खाऊन, जीव खाऊन मुसंडी मारत मला जायचंय तिथेच जाण्याचा प्रयत्न करत असते- तेही रोज. सकाळी तयारी करुन आपण दादरला जाणार आहोत म्हणजे पहिले बस पकडून स्टेशन-स्टेशन वरुन ट्रेन-ट्रेन नंतर दहा मिनीटाचा वॉक असाच क्रम असणार आहे, यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला,  हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला होपलेसपणा तुला जाणवतो का? आपण एखाद्या वेळी कुठे असणार आहोत याबद्दल आपली आपल्याला खात्री असणे, त्याबद्दलची खात्री दुसरयाने मागावी आणि ती आपल्याला देता यावी यांत कुठेतरी भयंकर मोठी चूक होतेय असं नाही वाटत तुला? आपण माणसाऐवजी झाड असलो असतो तर कसं असतं हा विचार तुझ्या डोक्यात येतो का?

तू तुझ्या पत्रात अनेक अवतरणं दिली आहेस. त्या पत्रात एकतरी विचार तुझा स्वत:चा ओरिजिनल आहे का? मी जेव्हा विचार करते (म्हणजे नॉर्मली करते त्यापेक्षा जास्त) तेव्हा मला असं आढळतं की माझे खूपसे विचार ट्रेस करत करत पाSSर मागपर्यंत नेले तर ते कुठल्या न कुठल्या ग्रेट लेखकापाशी जाऊन थांबतात. त्यामुळे माझा स्वत:चा असा विचार आहे असं वाटलं तरी तो कोणीतरी आधीच केलेला असण्याची आणि लिहून ठेवलेला असण्याची शक्यताच जास्त वाटते. त्यामुळे प्रत्येक नवं पुस्तक हातात घेतल्यावर काय वाढून ठेवलंय ही घालमेल नेहमीच असते. तू पुस्तकं कशी वाचतोस? तुझी अशी घालमेल होते का?

माझ्या माजी मित्राला ओंकारेश्वरकडे चालणारे अंत्यसंस्कार बघायचा अभद्र छंद होता. तो बाकीच्या वेळी डोक्याने तसा ठीकच असायचा (असं मला वाटायचं) पण तिथं गेलं की त्याला कसलातरी ऑरगॅस्मिक आनंद व्हायचा. त्याकाळात त्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याबरोबर चोवीस तास रहायच्या हट्टापोटी मी माझंही तिथं असणं ओघानेच. "मी ग्रेसची कविता आहे" असं वाटण्याच्या काळात मी त्या पिंडदान वगैरे रिच्युअल मधली ए टू झेड व्होकॅब आत्मसात केली. फ़ारफ़ार तर ’आवारा भंवरे जो होल्ले होल्ले गाये’ इथपर्यंतची मानसिक कुवत असताना मी कवटी वगैरे फ़ुटल्याचे आवाज ऐकले.
तर विचारायचा मुद्दा असा की तुला कसले कसले (असले-तसले?) छंद आहेत का?

तुझी कवितांची आवड लगेच दिसते. तू मला त्या पत्रात तब्बल सहा कविता लिहून पाठवल्या आहेस. माझा एक मित्र होता, फ़ार सुंदर कविता म्हणायचा. वाचून कविता कळली नाही तरी त्याने म्हटलेल्या कवितेतून अर्थ भराभरा सुटत गेलेला जाणवायचा. माहित असलेली कविताही नव्याने ऐकतोय असा आविर्भाव करत त्याला म्हणायला लावावी आणि आपण ऐकावी यांत वेगळीच मजा होती. पण गेला तो.
तुला कविता म्हणता येतात का? येत असतील तर आपली बरयापैकी मैत्री जमण्याची सॉलिड शक्यता आहे.

तू तुझ्या पत्रात केलेल्या माझ्याबद्दलच्या विधानांबद्दल, तुझ्या माझ्याबद्दलच्या समजुतींबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, ते समज चुकीचे असतील तरी ते दूर करायच्या भानगडीत मी पडणार नाही, ते तुझं तूच करायचं  आहेस पण मला प्रिय असणारया गोष्टींबद्दल मात्र तुझी फ़ार फ़ार गल्लत झालिये. तू म्हणतो आहेस ते लेखन, संगीत या गोष्टी फ़ार सुपरफ़िशियल आहेत रे! मला या सर्वाहून प्रिय आहे ते ’स्वातंत्र्य’.कुणालाही बांधील नसण्याचं स्वातंत्र्य, कुणालाही कसलीही उत्तरं न देता नवीन नाती तयार करायचं स्वातंत्र्य,  कुणालाही मनाविरुद्ध उत्तरं न देण्याचं स्वातंत्र्य, मला हवी ती गोष्ट माझ्या पद्धतीने करायचं स्वातंत्र्य, सकाळी उठून कोणालाही काही न सांगता कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य हवंय मला. त्यामुळे ह्या पत्रातून मैत्री आणि त्या मैत्रीची परिणिती पुढे कशाततरी होण्याच्या अल्टीमेट पुरुषी फ़ॅंटसीमध्ये गुंतून पडला असशील तर तू आताच बाहेर यावं हे उत्तम. दुसरयाचं स्वातंत्र्य जपणारी मैत्री झेपेल का तुला?

तू तुझ्या पत्रात तुझ्याबद्दल  न लिहीता माझ्याबद्दलच लिहीलेयेस आणि मीसुद्धा माझ्याबद्दलच जास्त बोलतेय. पण त्याला इलाज नाही. कारण तू डावीकडे झुकणारं सरळ रेषेतलं लिहीतोस, शाई ब्लॉट झालिये ती ओळ सोडून दुसरया ओळीत लिहायला सुरुवात करतोस, प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर गिरवतोस-पुढं काय लिहावं या विचारात कदाचित, या छोट्याछोट्या गोष्टींखेरीज तू जाड आहेस, बुटका आहेस, तुझे दात सरळ रेषेत आहेत का, तुला मिशी आहे का, तुझ्या डोक्यावर वेडेवाकडे केस आहेत की साधा भांगच पाडतोस? यातलं काSSहीही मला माहित नाही.  तुझ्या पत्रातून तुझे लुक्स वजा जाता तुझा थोडाफ़ार ’इसेन्स’ आलाय माझ्याकडे पण त्या मुदलावर मी काय काय लिहीणार आणि किती पाणी घालून वाढवणार? नाही का?

माझ्या अतिविचार करण्याच्या सवयीपायी ह्या घटनेमधला कार्यकारणभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करते पण  दोन माणसं समहाऊ एकमेकाला भेटतात, एकत्र बांधली जातात याची स्पष्टीकरणं कुठे असतात? सगळ्या गोष्टीत कारणं शोधण्याचा अट्टाहास करता येणार नाही ही समजूत कधीचीच खूप खोलवरुन पटलेली आहे.  नातं खूप वेळ टिकवून धरलं पक्कं आणि खरं -असं नसतं हे मला एव्हाना कळलंय, तुला कळलं असावं अशी फ़क्त आशाच करु शकते. त्यामुळेच कदाचित या पत्रानंतर आपला काहीही पत्रव्यवहार होणार नाही, कदाचित होईलही, कदाचित एक पत्र पुरे होईल या सर्व शक्यतांना माझ्यालेखी जागा आहे-असू द्यावी. पण मुळात हे पत्र मी पुस्तकाच्या गठ्ठ्यातल्या कुठल्यातरी एका पुस्तकात सरकवून दिलंय, ते पुस्तक पाहण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे तुला ते मिळालं का? वाचलंस का? वाचलं तर तू लगेच उत्तर लिहायला बसलास का? हेच माहीत नसल्याने मी हे सगळं लिहीलं काय न लिहीलं काय, तू वाचलं काय, न वाचलं काय- काय फ़रक पडतो? फ़रक पडत नसेल तर मी लिहीतेच का? असो, मी तुला फ़ार्फ़ारतर पंधरा प्रश्न विचारणार होते, ते लिमिट संपलं. तेव्हा टाटा.

कळावे,
आमेली पूलाश, हॉली गोलाइटली किंवा क्लेमेंटाईन क्रझिन्स्की यापैकी कुणीही
ह्याच का? याबद्दलही नंतर कधीतरी.

15 comments:

Nil Arte said...

श्रद्धा अशक्य सुंदर लिहितेयस तू.
मेघना पेठेंची आठवण आली. पण 'आठवणच' फक्त 'सारखेपणा' नव्हे
दोघीही वेगवेगळ्या परीने छान लिहिताय.
रॉक ऑन !!!

-नील
http://nilesharte.blogspot.com

Hema said...

You should seriously consider writing a book, girl!

Shraddha Bhowad said...

निलेश,
प्रतिक्रिया खूप आवडली. ती आवडली याकरता की शब्दांच्या निवडीमागचा विचार. आणि खरंच आहे ते, ’सारखेपणा’ म्हटला की आरोपाचा फ़ील येतो, म्हणजे म्हणायचं असतं 'ढापलंय!" पण लिहीताना ’तिच्यासारखं लिहीलंय" आणि ’आठवण’ येते म्हटलं की काहीतरी लिहीण्यासारखं आपण आपल्या पद्धतीने पुढे चालवतो आहेसं वाटतं, यू नो, मशाल पुढे नेल्यासारखं..
हे असले आठव लिखाणात जाणवणे आणि ते जाणवल्याची पावती देणं ही माझ्यामते सर्वात उच्च प्रशंसा आहे. थँक्स.

Shraddha Bhowad said...

हेमा, :)
Should I, really? I have long way to go friend.
But still, I appreciate your advice, I will definitely think about it eventually. Thank you very much!

aativas said...

माणूस प्रत्यक्षात भेटणारा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असतो (असते). पत्रात मात्र आपल्याला हव त्याची कल्पना करून लिहिता येत - तेही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ असत हे समजल की आणखी गंमत येते - निदान मला तरी :-)

Shraddha Bhowad said...

aativas,
कल्पना म्हणूनच तर बहुतेक वेळा स्वैर असते. :)
कुणी कल्पनांमध्ये आयुष्यभर रमतो तर कुणी आचमन घेतल्यासरखा डुबकी लगावून पुन्हा अ-स्वैर जगात येतो. कसंही- त्यातली गंमत ओळखणं महत्वाचं, ते तुम्हाला कळलंय. मस्तच! आणखी काय हवं? :)

Anonymous said...

भन्नाट ! अशक्य लिहिले आहे .

Keep it up.

Shraddha Bhowad said...

साकेत, थॅंक्स! :)

Harshada Vinaya said...
This comment has been removed by the author.
Harshada Vinaya said...

A warm Hi!
तुमचं, नको तुझं बरं आहे, लिखाण वाचतेय, ब्लॉग वरचं तर पूर्ण.. हो..
हम्म.. दादरच्या ब्रीज वरच्या त्या आंधळ्या माणसाला मधे धरून एक कोन तयार झालेला दिसला.. खुळचट visualizations!
Basically, I Love reading You!

care
Harshada

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

हाय हर्षदा विनया,
सरळ एकेरीनेच सुरुवात केलीस ते बरं. पुढच्या दोन-तीन आग्रही वाक्यांची भरताड वाचली.
तुझ्या Visualizationमध्ये काहीही खुळचट नाहीये. किंबहुना वाचताना तसा फ़ील येणे अपेक्षित होते. I am really impressed. आपण सगळे आपापल्या अशा वेगवेगळ्या प्रतलात (plane मध्ये) जगतो. असंख्य बिंदूंनी मिळून एक प्रतल बनतं. त्यातल्या प्रत्येक बिंदूचा दुसरया बिंदूशी असलेल्या संबंधांचा कार्यकारणभाव तिथल्या तिथे सांगता येत नाही खरं पण ते कोणत्यातरी अदृश्य धाग्याने जोडलेले असतात हे सुद्धा तेव्हढंच खरं. त्यामुळे तुला ते तसे जोडलेले दिसावेत यांत तुला या भाराभार बडबडीचा अर्थ लावता आला असंच म्हणेन.
Good to have you reading me. I am so glad. :)

Unknown said...

Jabardast!! :)
I just loved it!
Chhan shbdat asa kuni nakar deu shkat ka?? :P

Shraddha Bhowad said...

किती जुनीये ही पोस्ट :) आणि आता वाचताना मला बळंच जुनं झाल्यासारखं वाटतंय.
आपण पंचविशी-सव्विशीत असतो तेव्हा किती ’ब्ला!’ असतो हे नव्याने कळलं मला. :D
निवेदिता, थॅंक्स! तुझ्या कमेण्टमुळे मला माझी उडालेली ही कपची पाहाता आली. मोझेकसारखी.

Unknown said...

Actually tuzi language hi khup jast chhan ahe....mlapn kdhi kdhi wichar yeto asa khi lihinyacha..but shbdach nhi suchat .... mnat bharpur aste..But thnq u soo much coz tuzya ya blog mule mla lihinyachi prerna milaliye...ani SHBDA pn suchtayet!! :)

 
Designed by Lena