ऑब्लिव्हिएट!


थोरो ’वॉल्डन’ मध्ये म्हणतो- "To be awake is to be alive"
अशक्यप्राय गोष्टींचे नेहमीच सुविचार बनतात.
कंप्युटरसमोर बसून कीबोर्ड बडवू शकणे हे ’जागं’ असण्याचं लक्षण मानलं तर म्या ’जित्ती’ हाय.
जिवंत आहेच तर-जनरली या वेळेला वेगवेगळ्या टेक्स्चरचे ,या कानशिलापासून ते त्या कानशिलापर्यंत सर्दीसारखे गच्च बसलेले  विचार, जे क्रॉनिक खोकल्याची उबळ ये‌ऊन ढास लागावी तसे येत राहतात-लिहून काढूयात.
बेटर आ‌ऊट दॅन इन
--

अकरावीला रुपारेल ला प्रवेश घेतल्यावर आपसूक्च घेतला गेलेला निर्णय "आता इंग्लिश वाचलं पाहिजे."
तेव्हा  ’ हॅरी पॉटर ऍड फ़िलॉसॉफ़र्स स्टोन ’ आणि ’ कंपनी ऑफ़ वुमन ’ एकत्रच वाचलेलं.
रोलिंग आज्जी आणि सिंग आज्जोबा यांनी मला व्यवस्थित ’अपग्रेड’ केलेलं- रोलिंग आज्जींनी व्होकॅब मध्ये आणि खुशवंत आजोनांनी -यू नो..
नो गैरसमज- ते पण भयंकर इन्फ़र्मेटीव्ह पुस्तक आहे-जरुर वाचा.

तर -
एच.पी मधले काही काही चार्म्स मला खूप आवड्तात, मला ते वापरायला मिळाले असते तर काय बहार आली असती असं मला वाटत राहते ते चार्म्स म्हणजे- "सायलेन्शियो!" आणि "’ऑब्लिव्हि‌एट!"
पहिला दुसरयाला गप्प करतो आणि दुसरा दुसरयांच्या आठवणी खोडून टाकतो.

या दुसरयाबद्दल मला नेहमी प्रश्न पडायचा-म्हणजे हा नक्की काय करतो?

नोटपॅड मध्ये एखादा ड्राफ़्ट लिहावा आणि तो ’सिलेक्ट ऑल’ करुन डीलीट ’करुन टाकावा तसा आपल्या डोक्यातला आतापर्यंत साठवलेला डेटा खोडून टाकला जातो की रेट्रोस्पेक्टीव्ह इफ़ेक्ट सारखं काहीतरी?-ह्या पॉ‌ईंटपर्यंत विसरला की भोज्जा! बस्स.

आता माझ्यावर कोणी ऑब्लिव्हि‌एट चार्म वापरला तर नेमकं कुठल्या पॉ‌ईंट पर्यंत काय विसरेन?
गिल्डेरॉय लॉकहार्टसारखं भीषण स्पेल डॅमेज हो‌ऊन सगळंच विसरले आणि माझा मेंदू सोमवती अमावस्येच्या रात्रीसारखा पिच ब्लॅक झालाच तर मग सवयींचं काय?
चालण्याची,बोलण्याची सवय, शब्द जोडून अर्थपूर्ण वाक्यं तयार करण्याची पद्धत; ’प्रोसेस’-यांचंही रेकॉर्डींग मेंदूतच असतं नं?-पर्यायाने आठवणींमध्ये.
त्या सवयी पण नाहीशा होतील की कसं?
पिक्चरमध्ये वगैरे हिरॉ‌ईन् डोक्याची पट्टी चाचपून् "मै कहा हू?" म्हणते तेव्हा ते ’नेमकं’ किती-काय् काय्-कुठपर्यंत् विसरलेली असते?

मी आजही झाडून सगळ्या ब्रेक अप्सच्या पुण्यतिथ्या आठवून आठवून साजरया करते, त्या-त्या मुलाला आवडत नव्हत्या त्या गोष्टी दिवसभर करत बसते, उदा.- सुरणाची भाजी खाते, अर्ध्या बाह्यांचे वेडपट बनियन घालणारया मुलाबरोबर फ़िरायला जाते, रिक्षावाल्याने हूल दिली की कचकावून एक शिवी हाणते, यादी मोठी आहे.
एकाचा चेहरा आता तर मला आठवत सुद्धा नाही पण तो टपरीवर सुद्धा खाण्याच्या आधी बुफ़िनचा सोप पेपर वापरायचा तो ही फ़क्त लेमन फ़्लेवरचा हे लख्ख आठवतं.
इतकी वर्षं झाली तरी त्यांच्या आवडीनिवडी, सवयी माझ्या व्यवस्थित लक्षात आहेत.
हे कसं लक्षात राहतं?-त्याने आता तेव्हा पडायचा तसा फ़रक पडत नसला तरी?
माझा मेंदू बहुधा रोम आहे - ’रिरेमेंबर ऑल’ ला सेट केलेला आणि
पोरांचा बहुधा रॅम असावा-मोस्ट व्होलेटा‌ईल  मेमरी.
असो, तो माझा पॉ‌ईंट नाही.
सांगायचा आणि माझ्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असा की-

आज आत्ता माझ्यावर ’ऑब्लिव्हि‌एट’ वापरला तर मग-
वरील सगळ्या गोष्टी-टाका‌ऊ इन्क्लूडेड-फ़ारसा प्रयत्न न करताही लक्षात राहण्याची सवय-
आजही कच्चकन ब्रेक दाबला की मी जीभ चावून सॉरी म्हणते-पर्टीक्युलरली कुणालाच नाही-पण म्हणते-
जीन्स, मोजे घालताना पहिले डाव्या पायातून घालते-उगाचच बनवलेली सवय-
गुलाबी रंग मला बिलकुल आवडत नाही-
पुस्तकांची पान दुमडून ठेवणारया लोकांचा भयंकर संताप येतो-
जेवण संपल्यावर मी ताटात गिरवत बसून राहते-
मला कॉफ़ीचा मग दोन्ही हातात घे‌ऊन पिण्याची सवय आहे, चहाचा कप मात्र एकाच हातात-
ट्रेममध्ये झोपेतून अचानक जाग आली तर "पुढलं स्टेशन कुठलं असावं बरं?" चा अंदाज लावायला आवडतो-
मी हे सगळं ऍबसोल्युटली विसरेन?
आजच्या घडीला ’नो’ मोड वर सेट असणारया गोष्टी ’येस’ ला रिसेट होतील?
की नाही?  मुळातूनच अशी ’आहेच’ म्हणून?

विस्मरणात जाणारया जगाला विसरता येणं शक्य आहे?

शिट!
माझ्या मेंदूतल्या हे असले काहीतरी विचार करणारया पेशीवर पुढे मागे संशोधन हो‌ईल का?
असो,
Signing Off!
Peace.

22 comments:

Unknown said...

अफलातून!

Poornima said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

Poornima says:

sundar.. bahutek maza pan mendu tuzya sarakhich Remember all la set kelela ahe..tyamule post khoop avadli.

Shraddha Bhowad said...

योग,
धन्यवाद! :)

http://poornimahere.blogspot.com/ वाली पूर्णिमा,
थँक्स!
का डिलीट केलीस कमेंट?

svn said...

"सामना" या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू एक प्रसंगात विलास रकटे यांना विचारतात "आपल्या या सुन्दर बिन्डोकपणाचे रहस्य काय?"
तो संवाद ऐकून पॊट धरून हसलो होतो. मला आत्ता कॉमेंट लिहीताना स्वत:विषयी असाच प्रश्न पडला आहे, खूप हसूही येत आहे तरीही....

"ऑब्लिव्हिएट!" वापरल्यावर फ़क्त विसरलॊ (memory wiped out) पण मेंदू (माणसासारखा) चालत असेल (firmware-bios intact) तर आपण जगाचा पुन्हा नव्याने आनंद घेऊ शकू! माणूस असूनही गाढवासारख्या चुका पुन्हा करण्याचा अधिकार मिळेल! ब्रेक-अप झालेल्या व्य़क्तीवर पुन्हा प्रेम करुन नकळत बदला घेता येईल! जुन्या काही न आवडलेल्या गोष्टी, व्यक्ती कदाचीत आवडायलाही लागतील! आणि बरच काहीबाही...

पण "ऑब्लिव्हिएट!" वापरल्यावर काही विसरलॊ नाही (memory intact) पण मेंदू चालत नसेल (firmware-bios gone) तर....
मग ’विसरण्य़ाला’ एवढं महत्व द्यायचं की मेंदू माणसासारखा चालण्याला?

Shraddha Bhowad said...

नाही रे एस.व्ही.एन,
तुला थोडा गंडायला झालंय.
ऑब्लिव्हिएट हा मेमरीशी रिलेटेड आहे, हार्डवेअरशी नाही. म्हणजे इथे आपल्या केसमध्ये, मेंदूशी नाही. हार्ड-डिस्क फ़ॉर्म्यॅट करतोस तेव्हा हार्ड-डिस्क चालायची बंद होते का?
तुला अशा वाईप-आऊट चं उदाहरण वाचायचं असेल तर हारुकी मुराकामीच्या ’काफ़्का ऑन द शोअर’ मधलं ’मि.नाकाता’ हे कॅरेक्टर बघ. मला एक्झॅक्टली तसंच म्हणायचंय. तो मेमरी जाण्याच्या क्षणापर्यंत शिकलेलं एव्हन वाचणं, लिहीणं, आपले नातेवाईक सगळंच विसरुन जातो.

’सामना’ चा उल्लेख मस्त. :)

svn said...

मी हेच म्हणतोय की ऑब्लिव्हिएट हा फक्त मेमरीशी रिलेटेड आहे हेच बरे आहे. हार्ड-डिस्क फ़ॉर्म्यॅट केली तरी त्यावर नवीन ओ.एस. तसेच नवीन अप्प्लीकेशंस लोड करता येतात.
सर्व काही नव्याने करता येते! आठवणींची काशी करणारे व्हायरस पण नष्ट होतात! ब्याड सेक्टर नष्ट होतात!

जोपर्यंत मेंदू (म्हणजे सीपीयू + बायॉस) ची वाट लागत नाही तोपर्यंत ऑब्लिव्हिएट आपल्याला 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवा जन्मेन मी' अस म्हणण्याची संधी देईल! पण ऑब्लिव्हिएट हा हार्ड-डिस्क ऐवजी मेंदूची वाट लावणारा असता तर? रोलिंग बाईंनी तसे न करून बरे केलंय ना?

मला पण सर्व बऱ्या-वाईट आठवणी हव्याश्या वाटतात! ऑब्लिव्हिएट चार्म माझ्यावर चालला तर ज्यांना मी हवा आहे त्यांची अवस्था वाईट होईल - म्हणून तो मला नको. पण 'स्वार्थ' जर पाहीला तर ऑब्लिव्हिएट काही फार वाईट नाही, हो ना?

तुझे वाचन माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे बाई पण तुझ्या सूचनेप्रमाणे मी हारुकी मुराकामीचा ’काफ़्का ऑन द शोअर’ वाचायचा प्रयत्न जरूर करेन !

Shraddha Bhowad said...

आहा..एस.व्ही.एन,( एय बाबा, तुझं नाव काय आहे? तुझं नाव म्हणजे मला मेंडेलीनच्या टेबलमधल्या मूलद्रव्यांची नावं घेतल्यासारखी वाटतात. आय हेट केमिस्ट्री)),
तर..
तुला काय म्हणायचंय हे आताकुठे माझ्या लक्षात आलंय. पॉईंट आहे खरा. पहिले ऍब्सोल्युटली भंजाळायला झालं होतं.
<<तुझे वाचन माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे बाई
हे बळंच बरं का! :)

svn said...

माझे नाव शशिकांत! माझ्या पूर्ण नावाचं TLA हॊतं svn. ते दिसतं SUN सारखं, टाईप करायला सॊपं आणि UserID म्हणून उपयुक्त (कारण ते फारच कमी लोक वापरतात)!

तुझे वाचन खरेच माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे, मला ते तुझ्या लिखाणातून जाणवते!

मला माझी communication skills सुधारायची खूपच गरज आहे हे जाणवलं! हे बळंच नाही बरं का! अश्या कमेंटस लिहून हळू ह्ळू सुधारतील!

तू मात्र अशीच मनमॊकळं लिहीत रहा!

Anonymous said...

अतिशय जानदार लिखाण आहे. वाचकाला बसल्याजागी अस्वस्थ करणे ही खूप मोठी हातोटी आहे. असेच लिहित जा.
आणि परीक्षेकरता शुभेच्छा...

अपर्णा said...

ह्म्म्म...मेंदूला व्यायाम मिळाला हे वाचून..आता काय काय विसरेन म्हणजे आधी ते आठवायला सुरुवात केली की तरी बरच विसरलं गेलय हे कळून खर तर बरं वाटलं...

Shraddha Bhowad said...

दिसामाजी,
तुला/तुम्हाला माहितीये का, खूप खूप लहानपणी जेव्हा घडलेले प्रसंग आठवणींमध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात झाली होती तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा मी एकदा प्लॅस्टीकच्या बॉटलमध्ये उकळी आलेलं पाणी भरलं होतं आणि पुढे काय होणार याची कल्पना नसल्याने वरुन बूच लावून टाकलं होतं. तेव्हा त्या बाटलीला पोचे येऊन ती बॉटल काही क्षणातच चोळामोळा झालेली मी पाहिली होती. माझ्या डोक्यात जे काही घमासान चालत असतं ते क्वालिटी असो वा थिल्लर , त्याला आऊटलेट मिळाली नाही की मलाही असेच पोचे येतील अशी भीती मला नेहमी वाटते. माझा मेंदू कायम ताणलेल्या स्प्रिंगसारखा अशी माझी इच्छा नाही त्यामु्ळे लिहीण्याशिवाय काही गत्यंतर नाही. मला ते सगळंच्या सगळं बाहेर काढायचं असतं, स्वस्थ झोपायचं असतं त्यामुळे मी त्यात जीव ओतते. हा झाला माझा स्वार्थ. आता त्या स्वार्थाची परिणिती तुला/तुम्हाला आवडली, भावली, भिडली तर याहून आनंदाची गोष्ट कुठली असेल?

परीक्षा तर होतच असतात, त्यांचं काय. पण खूप थॅंक्स! हे शब्दांचं आणि वाक्यांचं मॉर्फ़ीन कुठेतरी संपणारच असतं आणि ते संपलं की तिथेच जायचं असतं शेवटी. त्याला शुभेच्छा लागणारच. कमेंटबद्दल खूप थॅंक्स!

Shraddha Bhowad said...

अपर्णा,
छान! विसरल्याचं तुला आठवावं- ग्रेट पॅराडॉक्स. तुझं काय-माझं काय, असंच असतं. एक खूप क्लिशे वाक्य आहे माहितेय का तुला? ’तुला विसरण्याकरताच आठवत राहतो मी’ et cetera, त्यात खूप तथ्य आहे काहीही म्हटलं तरी. तपशील धूसर होतील कदाचित, काळ-वेळेचं गणित गंडेल पण कुठेतरी खोल असलेली गोष्ट कधीतरी आठवेलच.कशाचा कशाला काही संबंध नाही आणि कालच संध्याकाळी अचानक मला शाळेत जो मुलगा लई आवडायचा तो ’स्टीक्स’चे पेन वापरायचा, हे आठवलं, काय बोलणार? :) पण या निमित्ताने तुझ्या मेंदूत तू धावाधाव केली असशीलच, उत्खननातून हाती आलं ते छान असावं अशी आशा करते.

Anonymous said...

mast. especially, 'mein kaha hu' sandarbhat tu lihilays to prashn mala nehmi, na chukta padto.

Sachin said...

श्रद्धा,
हा ब्लॉग मी रात्री (जेव्हा खिडकीतून मंद झुळुका आणि धावणाऱ्या ढगाआडून चंद्रकिरण येऊ लागतात त्यासमयी ) वाचायला घेतला आहे.
उन्हाळ्यात भरदुपारी नुकत्याच पाण्यातून काढलेल्या ताज्या लिम्बासारखे फ्रेश लिखाण आहे. लिहित रहा. एकदा वाचायला घेतला की
वाचतच जावं.
ठीक आहे, फार कौतुक करणार नाही. कृत्रिम वाटायचं.
"माझा प्रथम परदेश प्रवास " किंवा "नंदादेवीचे शिखर वाढत आहे" किंवा " 'फारच छान लिहिताय तुम्ही. माझे डोळे अगदी भरून आले'
अशी कॉमेंट असलेले सौ. टिंब टिंब यांचे पोस्ट्स, कथा, असलं भरताड " यांच्या पेक्षा मराठी ब्लॉग्स वरती (तेही फारच कमी ) दुसरं आहे काय?
त्यात असलं तिखट-मीठ अभावानंच आढळायचे.
सविस्तर वाचेन.

Shraddha Bhowad said...

अर्चना, :) डिट्टो.

सचिन, बापरे :) एवढ्या कौतुकाबद्दल थॅंक्स.

अपर्णा said...

ha ha Shradhha, I loved your reply..To tell you very honestly you are very honest (at least about a few things you write in this blog) I am not sure if we girls can be that honest about lot of things in our lives as comapared to guys..anyway...
I actually came to read your next post but its a total bouncer (unless I read the original letter whom you are replying too...hee hee//:D)
Keep writing..:)

AParna

arti said...

apratim lihites tu

Shraddha Bhowad said...

अपर्णा (पुन्हा एकदा! :) ), आरती, धन्यवाद!

Parag said...

Mast blog!!! Tuza blog vachun "Eternal sunshine of spotless mind" hi movie and tyatli hi kavita aathavali...
How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!

Shraddha Bhowad said...

हाय पराग,
थॅंक्स! ’इसऑदस्पॉमा’ हा महान पिक्चर नाही असं माझं दोन वर्षांमागे मत होतं. त्यावरुन माझी कचकावून भांडणंही झालेली. पण गंमत अशी’ए की आता त्यातला ’Bliss' कळायला लागलाय. वर्षभरात जेव्हा मतं बदलतात तेव्हा आपल्याला मुळातच मत तरी होतं का? असा प्रश्न पडतो. असो. क्लेमेंटाईन महान, त्यातलं ’ Everybody gotta learn sometime' तर त्याहून महान.
लख्ख मनासाठी काहीही!

Bhagyashree said...

sahi ahe he post !! mi hi coffee cha cup 2 hatanni va chahacha 1ka hatani dharte, he athvalyavar hasu ala! :D

 
Designed by Lena