नेमेचि येतो. . %@#!

सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना.
मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना. मी अजूनही बेडरुममध्ये झोपलेय, त्या झोपेतल्या स्वप्नात मी चौरंगासमोर अभ्यास करते आहे, आणि मग त्या स्वप्नातल्या मला कॉन्स्टिट्युशन वाचता वाचता झोप लागलिये असं वाटायला लागलं. मग स्वप्नातल्या झोपेत तरी नीट झोपूयात म्हणून पुन्हा बेडरुममध्ये जाऊन झोपले.
सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"

त्यानंतर काही केलं नाही..करण्यासारखं काही नव्हतंच आणि असलं असतंच तरी काही करावंसं वाटलं नसतं. डोक्यात फ़टाफ़ट विचार येत होते. कुठलाही विचार दोन सेकंदांहून जास्त वेळ टिकत नव्हता. एक तासांपूर्वी स्वच्छ आंघोळ करुनही अस्वच्छ, पारोसं वा्टत होतं. सगळ्या अंगालाच कंटाळा लागलाय असं वाटत होतं.
या कंटाळ्यातून आलेल्या डेस्परेशनपायी  काल मी ’अपने दोस्तों को सुनाईये अपना मनपसंद गाना’ वाला एयरटेलचा कॉलसुद्धा मन लावून ऐकला.

पहिल्यापहिल्यांदा मला कंटाळा आलाय हे अमान्य करण्याचा मी प्रयत्न केला, नाही असं नाही.
त्यासाठी मी स्वत:लाच चॅलेंज दिलं - कंटाळ्याला किमान पाच वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सांग.
दोन मिनीटं विचार करुन उत्तर आलं- उन्युई, तेदियो, नोय्या, लांगव्हिल्ह, तैकुत्सु, बोअरडम, आलस्यम. घे!
मला मल्टीलिंग्वल कंटाळ्याला फ़ाउल धरता येत नाही.त्याला सिरीयसली घ्यावंच लागतं.
येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये दर ९१ मिनीटांनी उसळणारा एक गरम पाण्याचा झरा आहे म्हणे! त्याला ’फ़ेथफ़ुल गिझर’ म्हणतात.
दर दीड-दोन महिन्यांनी उपटणारया माझ्या  सिरीयसली घेतल्या जाणारया कंटाळ्यासाठी मीसुद्धा एखादं विशेषण तयार करायच्या विचारात आहे.

बघू! अभ्यास करु, जाईल कंटाळा करत गव्हर्नर जनरल्स ची यादी मनातल्या मनात म्हणून बघितली. कॅनिंग-एल्गिन-लॉरेन्स-मायो-नॉर्थब्रुक (जमतंय जमतंय)-लिटन-रिपॉन-डफ़रीन.. .  . रिपॉन-डफ़रीन... .   नंतरचे कर्झन-मिंटो-हार्डींग्ज-चेम्सफ़र्ड आठवतायेत पण मधले कोणतरी दोन चचलेत . .रिपॉन-डफ़रीन... .
प्च! मी नाद सोडला. 
भूगोल उघडला तर ऍटलासमधले लोहमार्ग मला सुरवंटासारखे भासायला लागले आणि मी पुस्तक खाटकन मिटलं.
मग मी अभ्यास ठेवलाच.

मग काय करावं बरं म्हणत ’ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका हेहेहेहे हेहेहेहे’ हे गाणं आपल्या कॉलरट्यूनवर लावू की नको? हो तर का हो? नाही तर का नाही? यावर सिरीयसली विचार केला
पण तो दोन मिंटातच संपला.

’नक्षत्रांचे देणे’ काढलं. वाचलं
त्यावर उतारा म्हणून माझ्या कविता वाचल्या.
त्यानंतर माझा धिक्कार कसा केला जावा याबद्दलचा मसुदा मनातल्या मनात तयार केला.त्यावर पुढील कंटाळ्याच्या वेळी अंमलबजावणी केली जावी अशी डायरीत नोंद करुन ठेवली.
गूगलवरुन कंटाळ्यावरचे कोट्स शोधून काढले. त्यात बर्ट्रांड रसेल साहेब म्हणतात,
" मनुष्यजमातीमधली अर्ध्याहून  अधिक पापं ही कंटाळ्याच्या भीतीमधून केली गेली गेलेली असतात".
आता हे खरं की काय?
असं कुठलंतरी पाप करुन मी तुरुंगात गेले तर तुरुंगात वेळ घालवण्याकरता काय करावं ह्या विचारात पुढचा अर्धा तास बरा गेला.
नंतर पुन्हा ब्लॅंक!
मी एम्पीथ्री प्लेयर कानाला लावून बसले.
पण ज्या गाण्याने मागचा कंटाळा सुरु झाला होता ते गाणंच कानात वाजायला लागल्यावर योगायोगाचं हसूही येईना.

ओरिगामीचे कागद पुढ्यात ओढून ’पीगॅसस’ करायला घेतला पण अर्ध्यावरच मी हवा गेल्यासारखी पिळपिळीत झाले आणि ड्रॉवरमधल्या पूर्ण व्हायची वाट बघत पडून असलेल्या अकशे एकुणतीस कागदी मॉडेल्समध्ये आणखी एकाची भर पडली.
धाप्पकन खुर्चीत बसले.
पॅसिफ़िकच्या किनारयावर राहणारया माझ्या मित्राने मला पॅसिफ़िकबद्दल एकही ओळ लिहून का पाठवू नये याचा विचार करायला लागले.
मग कधीतरी तो विचार संपला.
थोडावेळ गबदूलपणे बसून राहिले.
मग टी.व्ही ऑन केला. खटॅक खटॅक बटणं दाबत मी सध्याचं ’इन व्होग’ गाणं ’भाग भाग डी.के.बोस’ वाजत असलेल्या चॅनेल वर आले.
पांडासारखा एकच डोळा लालकाळा असलेल्या इम्रानला आणि त्याच्या मागच्या शिमग्यातली सोंगं काढलेल्या पंटर्सना बघून करमणूक झाली खरी पण लागोपाठ वेगवेगळ्या चॅनेल्सवर तेच तेच गाणं ऐकल्यावर ते मला ’भाग भाग डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस’ ऐवजी’भाग भाग डी.के.’ बोस डी.के’.’बोस डी.के’.’बोस डी.के’(बोस डी.के. फ़ास्ट फ़ास्ट म्हणून पाहा) भाग’ असं ऐकू यायला लागलं.
मी वैतागून टीव्ही सुद्धा ऑफ़ केला

लोकं कंटाळा आला की डायरी लिहीतात म्हणे. मी पण लिहायचे.
पण प्रत्येक कंटाळ्यात डायरी लिहीताना पुढे केव्हातरी माझा कंटाळा डायरीत लिहीण्याला इम्यून झाला. मग मी लिहीणं सोडलं आणि डायरया वाचायचा सपाटा लावला. मग यथावकाश मला डायरया वाचायचाही कंटाळा आला.
मी डायरी उघडली. गेले दोन आठवडे ’असह्य डोकेदुखी’शिवाय नोंद नाहीये.
आता अचानक भूकंप होऊन मी डायरीसकट गाडले गेले तर शंभर शतकांनंतर झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या माझ्या या डायरीमधून सद्य समाजाच्या सांस्कृतिक, ऐहिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकेल काय? त्याची कल्पना येण्यासाठी माझी डायरी महत्वाचा दस्तावेज ठरु शकेल काय? माझ्या डायरीत असलेल्या-
 ’चालायला लागलो की कुठेतरी पोहोचतोच आपण’,
आयुष्य ही एक ओव्हररेटेड संकल्पना आहे’,
हा एक प्रश्न आपल्या पोटात हजार प्रश्नांना वाढवतो’,
आणखीही काही हॉरीफ़िक नोंदींशिवाय टु-जी स्पेक्ट्रम, वंगारी मथाई, पाणीपुरीवाले याबद्दल लिहायला हवं अशी मेंटल नोट करुन ठेवली.

फ़ोन वाजला.
गळ्याला पटटा लावणारया, मास्टर ऊग्वे सारख्या दिसणारया (संदर्भासाठी पहा: कुंग फ़ू पॅंडा)  माझ्या दूरच्या आजोंबाचा कॉल होता. माझ्याशी लग्न करायला उत्सुक किमान पंध्रा शाह्याण्णव कुळी मराठा मुलांची नावं निर्विकार चेहरयाने ऐकली. त्या पाच मिनीटांच्या कॉलमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली आणि ’रॉंग नंबर’ बोलून फ़ोन ठेवून दिला. परत फ़ोन नाही आला. आता बहुधा कधीच येणार नाही.
पाणी प्यायला किचनमध्ये गेले. तीनदा पाणी ओतलं, तीनदाही प्यायले नाही तरीसुद्धा पुढच्या वेळी पाणी ओतताना ग्लास रिकामा बघून खूप चक्रावले आणि नंतर भ्याले.

फ़ोनची डायरी उघडली. डो्ळे मिटून चार नंबंरांवर बोट ठेवलं,  कॉल लावले.
मस्त चाललं होतं त्यांचं.
एक जण गर्लफ़्रेंडबरोबर कॅफ़े कॉफ़ी डे मध्ये खिसा खाली करायला गेला होता. दुसरीला काहीतरी छान सुचलेलं लिहून काढत होती, उरलेले दोघं झोपले होते. मी अशी कंटाळ्यात लडबडलेली असताना ते तिथे आनंदात आहेत बघून तुफ़ान चीडचीड केली आणि भैरवीला "आय ऍम अ बिच! यू नो द्यॅट, डोण्ट यू!’ हे भरतवाक्य टाकलं आणि फ़ोन ठेवून दिला. त्यांच्यापैकी एकानेतरी उलटून मला फ़ोन करावा, ताडताड बोलावं असं वाटत होतं पण
नंतर कोणाचाही कॉल आला नाही.

एकदोघांना टुकार एसेमेस पाठवले. त्या टुकार एसेमेसवरच्या त्यांच्या स्मायलींचे पीक घेतल्यासारख्या वाटणारया त्याहूनही  टुकार प्रतिक्रिया वाचून मी कपाळ बडवून घेतलं.

हातात ऍपी फ़िजची बॉटल घेऊन घळाघळा रडत सेलिन डियॉनचं ’ऑल बाय मायसेल्फ़’ गायले. रडण्याचा भर ओसरल्यावर किमान चार लाईक्स मिळतील असे कोणते स्टेटस फ़ेसबुकवर टाकावे याचा विचार केला. त्यात पाच मिनीटं जरा बरी गेली. माझे ’रिलेशनशिप स्टेटस ’ सिंगल वरुन 'कमिटेड' वर बदलणार एव्हढ्यात चार थेंब पाऊस आल्याने लाईट्स गेले.

भर पावसात गाडी काढली, किल्ल्यात भटकायला गेले.  किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला. त्याचवेळी खच्चून ओरडता यावे म्हणून घसा ्साफ़ केला, पण ह्या!  पाण्याला घोडा बिचकतो तसे एकट्या फ़िरायला येणारया पोरीला पाहून ती पोरं बिचकली आणि भलतीकडेच दूर निघून गेली.
मग मी तटावर बसून अथर्वशीर्ष म्हटलं. माझ्या आवाजाचाच कंटाळा आल्यावर थांबवलं.
अशा बालिश-किनरया आवाजाऐवजी जरा घोगरा-सेक्सी आवाज असता तर बरं असं वाटत राहिलं. माझ्यात आता आहे त्याऐवजी काय असतं तर बरं या विचारात अर्धा तास खरंच बरा गेला.
उद्यापासून कंपलसरी सलवार कमीज घालायचे आणि केस कमरेपर्यंत  वाढवायचे असा निश्चय करुन मी तट उतरले.
कंटाळलेल्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. कंटाळा का येतो हे माहीत असलेले
२.कंटाळा कशाचा आलाय हे नेमकेपणाने माहीत असलेले
मी दुसरया वर्गात मोडते. मला तोचतोचपणाचा कंटाळा आहे.
दोन चार जागी कडमडुन-दीड लिटर पेट्रोल जाळून घरी परतताना तोचतो रस्ता घ्यायचाही कंटाळा आला.मग चुकीचा रस्त्याने घरी यायचा प्रयत्न केला. येताना मेडीकल स्टोअरमधून ’बजाज आलमंड ड्रॉप्स केश तेल ’ घेतलं.
पावसात ’इटर्नल सनशाईन ऑफ़ द स्पॉटलेस माइंड’ सारखं मन लख्ख बिख्ख होइल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. बहुधा त्यातलं ’Everybody gotta learn sometime' एव्हढंच बेथला मला शिकवायचं असावं. मघाच्या भयानक कंटाळ्यातही किल्ल्याच्या तटावरुन समुद्रात उडी टाकून जी्व-बीव देऊन कोस्ट्गार्डच्या पाठी नस्तं लफ़डं लावलं नाही ह्या देशाप्रती दाखवलेल्या जबाबदारीबद्दल स्वत:ची पाठ थोपटली.

एक २० रुपयाचं पूर्ण कुरकुरे खाल्लं, पापड तळुन खाल्ले, रम केक खाल्ला, लिम्का प्यायले. मग अचानक लक्षात आल्यासारखं घटाघट पा्णी प्यायले. आज दोन-चार पिंपल्स नक्की उगवणार. 

मग मी उगीच आजूबाजूला बघितलं, खांदे उचकले, आरशात पाहून तोंड वेडंवाकडं केलं. त्यानेही माझ्याकडे बघून खांदे उचकल्यावर आरशाला नाक लावून  "हे काय होतंय मला?" हे वरुन त्यालाच विचारलं. त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.
मग काही करण्यासारखं उरलंच नाही.
गादीवर पडले अन पडल्या पडल्या झोप लागली.
.
.
आज मी खूपच बरी आहे.
पण आज-उद्या धौलपूर हाऊस मध्ये इंटरव्ह्यू ला ’कंटाळ्या’वर पाच मिनीटं बोलायला सांगीतली तर यातलं किती आणि काय काय बोलू शकेन हे मात्र सांगता येत नाहीये अजून.

**

वरचं सगळं एका पत्रात लिहून काढलं. मग ते कोणाला पाठवण्यात अर्थ नाही असं वाटून कालची तारीख घालून फ़ाईलला लावून ठेवलं.
लिहीलेल्या पण कधीच कुणालाच न पाठवलेल्या पत्रांची संख्या आता झाली २३.
Rungli Rungliot! (याचा संदर्भ देणार नाही, शोधून काढा).

27 comments:

Samved said...

रिअ‍ॅक्शन्स
१) हा हा हा हा हा
२) हे पोस्ट ढापून आपलं म्हणून छापलं तर?
३)मला अचानक श्याम मनोहरांची आठवण आली. श्रद्धा या नावानी त्यांनी हे पोस्टले नसेल ना?

Meghana Bhuskute said...

च्यायला, तुला कसं कळलं?

Shraddha Bhowad said...

संवेद,
तुझ्या रिऍक्शन्स वरच्या माझ्या रि-रिऍक्शन्स-
१. :)
२. Ditto. नंतर निवांत वाचून काढलं तेव्हा मलाही माझ्या पोस्टबद्दल असंच वाटलं.
३. कसचं रे! त्यांचा हर्षद आणि सुमाधुरी मला याहून जास्त डिप्रेशन देतात. पण त्यांच्याशी रिलेट करायचंच झालं तर काल ’उत्सुकतेने मी झोपले’ एव्हढीच गोष्ट अगदी खरीये!

Shraddha Bhowad said...

मेघना,
मी अल्ट्रासॉनिक रेंज ची डंबलडोर-ट्रेन्ड कट्टरपंथीय हायली अकंप्लिश्ड लेग्लिमेन आहे.
माझ्या "Leglimen!"ला ठाणे-कल्याण कधीकधी डोंबिवलीपर्यंत रेंज मिळते-अगदी सहज!
आता कळलं-मला कसं कळलं ते? :P

sudeepmirza said...

samved +1

Unique Poet ! said...

.. .प्च !
करेक्ट............ ! :)

Shraddha Bhowad said...

सुदीप
Long Time No See! Thanks by the way.
My reply to Samved+1

समीर
कोणाचं काय तर कोणाचं काय. हा हा हा!
प्च! अडोरेबल आवाज आहे नाही हा?
हे करेक्ट..! काय आहे किंवा कशाबद्दल बोलतोयेस ते काही कळलं नाही पण माझ्यामते माझ्या फ़ेसबुकवरच्या कमेंटला उद्देशून असावं किंवा नसावं. :)
थँक्स!

a Sane man said...

बरं जमतं ब्वा कंटाळा लिहून काढायला! नशीबवान आहेस!

Poornima said...

Etake perfect varnan kele ahes na tya avastheche..Superlike! :)

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

saglya goshti kalalya asa nahi..pan awadla...

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

saglya goshti kalalya asa nahi..pan awadla...

Satish said...

च्यायला तुम्ही ब्लॉगर लोक (म्हणज तू, संवेद, मेघना, अभिजीत (बाठे).. (बाकीचे ब्लॉगर लोक.. क्षमा)).. कशावरही लिहीता... आणि चक्क ते वाचनीय पण असते. बाकी भाग डि के बोस चे निरिक्शण साहिच.. मला पण असे ऐकू आले... पण मी आपले मनच पापी समजून गप्प बसलो.
mast aahe post.

Shraddha Bhowad said...

सेन, ह्म्म, असेन कदाचित.

पूर्णिमा, थॅंक यू. आणि ब्लॉगवर सुपरलाईक? :) फ़ेसबुक-भक्त दिसतेयेस. :)

अनुश्री, बाई, काय नाही कळलं तुला? ’ईटर्नल..’चा उल्लेख नसेल कळला तर सांगते- जिम कॅरी (जोएल) आणि केट विन्स्लेटच्या (क्लेमेंटाईन) या मूव्ही मध्ये ती दोघं काही काळ नात्यात असतात. मग दोघंही एकमेकांना झेपेनासे होतात, एकमेकांना सहन करु शकत नाहीत आणि परीणामी-फ़ारकत घेतात. ब्रेक-अप नंतर क्लेम जाऊन जोएलच्या आठवणी कायमच्या पुसून येते. हे कळल्यानंतर जोएलही तडकाफ़डकी तेच करायला जातो पण त्या प्रोसेसमध्ये त्याला कळतं-जाणवतं, की ह्या आठवणी त्याला पुसायच्या नाहीयेत, चिरंतन ठेवायच्यात, तेव्हा तो त्या लपवून सुरक्षित राखण्याची धडपड करतो. दोघंही एकमेकाच्या आठवणीतून पुसले गेल्यावर पुन्हा एकदा भेटतात, त्यांना एकमेकांत खूप ओळखीचं काहीतरी वाटत राहतं-पण काय ते नेमकं बोट ठेवून सांगता येत नाही..
तर अशा आठवणी पुसून काढता आल्या असत्या तर मी हा कंटाळ्याचा कालखंड पुसून काढला असता असं ते आहे.
बेथ ही लिरीसिस्ट आहे त्या मूव्हीची.

The world is forgetting by the world forgot..
Eternal Sunshine of the Spotless mind-
Each prayer accepted, each wish resigned..

हे नक्की मिळवून वाच.

Shraddha Bhowad said...

सतीश,
मी ठो करुन हसले इथे.
तुम्ही असा विचार केला तर तुमचं मन पापी आणि तसा मी केला तर तो धुतल्या तांदळाहून होली काय?
हा हा हा..
संस्कार वगैरे ला ’टैम प्लीज’ करुन पापी विचार करणं कंटाळ्यात अलाऊड असतं.
अवांतर- इतरवेळीही असतं. कंटाळा वगैरे निमित्त. :)

Dk said...

hmmmm :D

kantala aala khara. mhnun tula mail kele je kaay lihaaych te subject line madhyech lihily. kaaran kantala1

P.S. tuze hi kantalyavarchee post atichshay vaachniya asun jya hirariine tu he lihites tye pahun maza na lihinyacha kantala gaayb zalay :D

तृप्ती said...

पहिलं पान (माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनचे) वाचेपर्यंतच कंटाळा आला. आता पुढचं वाचत नाही. (यु कॅन डु अ लॉट बेटर !!!)

Shraddha Bhowad said...

@दीपक,
तुझ्या कंटाळ्याचं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं. पण वेल! कंटाळ्यातूनही नव्या कल्पना प्रसवू शकतात हे तुला पटलंच असेल. :D

@तृप्ती
शक्य आहे!(हे तुला कंटाळा येण्याबाबत).
तुझी वाचनाची टेस्ट अलग असू शकते.

svn said...

कंटाळा ’येतो’, टेक्नीकल गोष्टी ’कळतात’, काही बरेवाईट ’सुचते’, पण इतक्या चांगल्या प्रकारे (म्हणजे तुझ्यासारखं) व्यक्त करता येत नाही!
शब्द दगा देतात! मला पण जमलं तर...
तुझे हे लिहीणे अनन्त काळ चालू राहू दॆ या शुभेच्छा!

Shraddha Bhowad said...

एस.व्ही.एन,
अरे, इनव्हर्टेड कॉमावाल्या गोष्टी ’येतात’ हे ही लईच म्हणायचं.
तुला माहीतेय का 'लिहीणं’ म्हणजे लोकांमध्ये नागवं होण्याचा एक समाजमान्य प्रकार असतो. कुणाला जमतं, कुणाला नाही- त्यात काय एव्हढंस? तुला इतकं सारं कळतंय हेच पुरेय.
आणि जमवायचं असेलच तर जमेलही, मी कोण सांगणार?
तुझ्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

svn said...

---तुला माहीतेय का 'लिहीणं’ म्हणजे लोकांमध्ये नागवं होण्याचा एक समाजमान्य प्रकार असतो.---
श्रद्धा, You are simlpy amazing! (मला ना, मराठीत शब्दच सुचले नाहीत पटकन)

yogik said...

ithalya saglyaani mala sollid depression dilay....ha blog mothha hot raho...nahi mothhach ahe...majhya blog la kulup!! jam rag yeto ahe swathahacha pan..thik ahe...itke changale wachayla milte mhanun khush ahe!!

Shraddha Bhowad said...

अरे योगिक, (तुझां नाव ’योगिक’ आहे? शॉर्टफ़ॉर्म वगैरे आहे की खरंच? आणि खरं असेल तर म्हणजे काय?),
काहीतरीच काय?
हे म्हणजे पहिल्याच स्विमिंग क्लासला गेल्यावर दुसरयांना फ़्रिस्टाईल पोहताना पाहिले की "छे! आपण काय पोहणार यांच्यापुढे? मी पोहतच नाही आता! " असं म्हणण्यासारखं आहे. आणि बिलीव्ह मी, हा कल्पोकल्पित प्रसंग नाही, मला खरंच असं वाटलेलं आहे. पण अशावेळी ते फ़्रिस्टाईल पोहणारेसुद्धा त्यांच्या पहिल्या पहिल्या काळात दुसरयांकडे असेच ऑ मध्ये बघत असतील हे लक्षात यावं लागतं.
Just a matter of time if you ask me.
असो, लई फ़ंडे मारले.
तू आर्किटेक्चर ला आहेस असे वाचले. रॉर्क विषयी काय मत आहे तुझं लिही ना ब्लॉगवर.

yogik said...

ho yogik shortform ahe!! ha ha!!
roark.....baap re....tyaapeksha mi louis kahn kimwa bhartatle laurie baker yanwishayi jarur lihin....karan roark mala pharsa samjala nahiy (honestly)...mi ekdach wachaly fountainhead ani kahi diwas tari vedyasarkha design madhe ghusalo hoto.
l.i. kahn chi ek chaan goshta majhya blog war ahe...volume zero mhanun!! jarur wacha!
matr blog tumcha jackass!

Ashish Phadnis said...

बापरे तु केवळ अफाट आहेस...
हे सगळे विचार मनात येणं ही गोष्ट वेगळी आणि ते जसेच्या तसे लिहून काढणं हे वेगळं...असं वाटत होतं की तुझ्या मनाच्या खिडकीतून तुझ्याकडे पाहतोय..तुला कंटाळा आल्यावर काय काय होतं ते....
फारच सुरेख...
मला असाच तुझा ट्रेकिंगवरची पोस्ट आवडलेली...लोहगडच्याच ना...डी-९० च्या गालाला माती लागलेला वगैरे...भन्नाटच होता...

Shraddha Bhowad said...

आशिष a.k.a आशुचॅंप,

थॅक्स!
हो, ते डी-९० कांड लोहगडावरचंच. मला तुझ्या ब्लॉगलिस्टमध्ये ’डेस्टीनेशन सह्याद्री’ वगैरे पाहून तूच तो की काय? असं वाटून स्लाईटली हुळहुळायला झालं होतं पहिल्यांदा. पण त्या पोस्टवर मी तोडलेले तारे पाहता तू तो नाहीचेस हे सुद्धा चांगलंच असंही वाटलं. :)

Ashish Phadnis said...

हाहाहाहा, सुदैवाने मी छान वगैरे क्याटेगिरीत मोडत नाही. पण तु आम्हा भटक्यांच्या क्याटेगिरीत मोडतेस हे पाहून खूप छान वाटले.
बाकी तुझ्या सहज ओघवत्या लिखाणाचा मला जाम हेवा वाटतो आणि तसे काहीसे खरडायचाही प्रयत्न केला. पण छे, ते कुठून तरी आतूनच यावे लागते. तो रस्ता अजून सापडला नाहीये...पुढे मागे कधीतरी सापडेल या आशेत...:)
तु मात्र अशीच लिहीत जा...भावना शब्दरूपात कशा दिसतात हे पहायचे असेल तर तुझ्या ब्लॉगला भेट द्यावी प्रत्येकाने

Ashish Phadnis said...
This comment has been removed by the author.
 
Designed by Lena