चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’

सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनातून केलेल्या प्रयोगाबद्दल लोकं अजून अनभिज्ञ आहेत असं दिसतं. सचिन कुंडलकरची २००६ मध्ये प्रकाशित झालेली ’कोबाल्ट ब्लू’ ही अशीच एक अत्यंत छोटेखानी अशी ९० पानांची कादंबरी आहे. आजच्या इंस्टंट जमान्यात इंस्टंटली वाचून होईल अशी. प्रकाशन गॄह- मौज. गौरी देशपांडे, चि.त्र्यं, पु.ल यासारख्या दिग्गजांची पुस्तकं प्रकाशित केलेल्या ’मौज’ प्रकाशनाने ’कोबाल्ट ब्लू’ प्रकाशित करावे यात कादंबरी दर्जेदार असणार असं वाचकांनी समजायला हरकत नसावी.

कोबाल्ट ब्लू आहे तनय-अनुजा या भावंडांची आणि त्यांच्या घराच्या मनोरावजा खोलीत राहायला आलेल्या मुलाची (आपण याला ’नि’ म्हणूयात). आणि मग या तिघांच्या अनुषंगाने आलेल्या त्यांच्या कुटुंबांची, दोस्तांची, वैयक्तिक लढ्यांची सुद्धा.

या ’नि’च्या प्रेमात तनय-अनुजा आपापल्या पातळीवरुन पडतात.
तनयला आपल्या वयांच्या मुलांप्रमाणे मुली न आवडता मुलं आवडतात. कळायला लागल्यापासून तनयला आपल्यातलं वेगळेपण छळतंय आणि त्यातून तो एकाकी होत गेलाय. या एकाकीपणातून, आपण आहोत तसे स्वीकारलं जाण्याच्या डेस्परेशनमधून मैत्रीचा हात पुढे करणारया ’नि’मध्ये आणि त्याच्यात चटकन मैत्रीचे, मग पुढे शारिरीक-मानसिक बंध तयार होतात. आणि मग पुढे त्याच्या कित्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रेमात पडत ’नि’मय हो‌ऊन जातो. तर अनुजाला भावतो तो ’नि’चा सहजभाव, कसलेही प्रश्न न विचारणारं-कसल्याही बदल्यात कुठलीच उत्तरं न मागणारं त्याचं तुटक वेगळेपण.

तनय आणि ’नि’ यांनी वरच्या खोलीत यांनी घालवलेले दिवस, रात्रींमधून ’नि’च्या स्वभावातल्या बारीक बारीक बारकाव्यांना तोलत-जोखत आपण दोघे कधीतरी एकत्र राहायला लागूच अशी स्वप्नं तनय बघतो आहे तर अनुजाला त्याचा बेफ़िकीरपणा, कलंदरपणा आवडलाय. पण या दोन्ही भावंडांना एकमेकाच्या मनोव्यापारांची कल्पनाच नाहीये. आणि त्याचमुळे अनुजा ’नि’बरोबर निघून जाते तेव्हा "आपल्याला कधीच कसं कळलं नाही?" हया धक्क्याने खचलेल्या तनयचं फ़सवले गेल्यासारखं वाटणं जेन्यु‌ईन वाटतं. पुढे ’नि’ अनुजालाही एकटंच टाकून निघून जातो, अनुजा विचित्र मन:स्थितीत परत घरी येते तेव्हा तिच्याही बाबतीत ’नि’ने तेच केलं जे आपल्या बाबतीत केलं हे जाणवून आपल्याला कळल्यासारखा वाटणारा ’नि’ आपल्याला मुळात तेव्हढासा कळला नव्हता हे तनयला कळतं.

अनुजा आणि तनय मग आपापल्या कुवतीनुसार ’काय चुकलं असावं?’ (त्यांचं-’नि’चं नाही. एव्हढं सगळं होऊनही तनय काय आणि अनुजा काय, थेट ’नि’ला दोष देताना आढळतच नाहीत.), ’काय सुटून गेलं असावं?’ याचा भूतकाळात डोकावून मागोवा घ्यायचा प्रयत्न करतात, आपल्यापुरता उत्तरं मिळवतात, जुनीच नाती नव्याने कळल्यासारखी वाटून त्यांचा क्वचित आधारही घेतात. अनुजाला फ़क्त ’नि’बरोबर दिवसाचे अखंड चोवीस तास घालवून मिळवायचा आनंद, किंवा तनयचं ’नि’वरचं प्रेम हे तनय-अनुजाच्या घरचे जरासुद्धा समजून घेतील अशी अपेक्षा नसते. विस्कटलेल्या मन:स्थितीत घरी परतलेल्या अनुजाला मानसोपचारतज्ञाचे उपचार सुरु असताना कुठेही बभ्रा होऊ नये, झाल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये याकरता मावशीच्या घरी ठेवले जाते तेव्हाही अनुजाच्या "गॅरेजमध्ये गाडी न्यावी तसं मला ठिकठाक करुन इथून घेऊन जाणार." या उद्गारांनी तनय-अनुजाच्या सोवळ्यात बांधून ठेवलेल्या लोणच्याच्या छानशा बरणीसारख्या कुटुंबाविषयी पूर्ण कल्पना आपल्याला तोपर्यंत येऊन चुकलेली असते. पण कोणी दखल घेवो ना न घेवो- आयुष्य तर चालू राहणारच असतं-मग ते आता जरा एकटं जगून बघूयात म्हणून नंतर तनय-अनुजा आपापले मार्ग निवडून चालती होतात.

या कादंबरीतलं तनय-अनुजाचं निवेदन थेट आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आलेलं आहे. तनय विमनस्क मन:स्थितीत असताना आलेल्या निवेदनात त्याच्या डोक्यात काहीकाही विचार-अतिप्रिय प्रसंगांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यातून प्राथमिक शारिरिक गुंतवणूकीला पार करुन आलेली तनयची भावनिक आणि मानसिक गुंतवणूक खूप खोलवरुन आल्याचे जाणवते.
पण ’नि’?
या दोघांच्याही निवेदनातून वजा करुन तो उरतोच आहे. दाट धुक्याच्या पलीकडे, अस्पष्ट, धूसर, ज्याच्यापर्यंत पोहोचायला डोक्यापयंत कळ आणणारया ठोकरा खातच पोहोचायला हवं. कोणत्याही चाकोरीत स्व्त:ला अडकवून न घेणारा, कॅन्व्हासवर ओढलेल्या निळ्या रंगाच्या एकच फ़टकारयात (ज्याने या पुस्तकाचं मुखपृष्ठ सजलंय) गराड्यातलं उकटेपण सगळं असूनही काहीच नसल्याचं चितारणारा, आपली स्पेस हक्काने मागून घेणारा ’नि’. ’नि’ला खरंच प्रिय असणारया दोन व्यक्तींना सोडून तो का निघून जातो, त्यांना मनावेगळं करु शकत नसताना? तो गुंतलेला असतोही आणि नसतोही- हे कसे काय, त्याचं बायसेक्शुअल असणं हे जाणून घ्यायला ’नि’च्या मानसिकतेत डोकावण्याची ओढ लागून राहते.

अनेकदा आपण नात्याला अपेक्षांनी, गृहितकांनी भाग द्यायचा प्रयत्न करतो. बाकी शून्य आली की मग सर्वकाही आपल्या ताब्यात, आपल्या मनासारखं होतंय असा छानछान फ़ील येतो. पण बाकीच जास्त उरत असेल तर मग असुरक्षित वाटायला लागतं, अनिश्चिततता येते, घुटमळ वाढते. पण या अनिश्चितेतही ’मी’, ’माझं’, ’कायमचं’ हा विचार मनाबाहेर ढकलता येत नाही.अतिउत्साहात म्हणा किंवा प्रेमाबरोबर आपल्याही नकळत ओघाने येणारया गृहीत धरण्याच्या सवयीमुळे बरयाचदा आपण जे शोधतोय, आपल्याला जे हवंय ते समोरच्याला वेगळ्या पद्धतीने हवं असू शकतं, याचा विचार आपल्याकडून होत नाही. समोरच्याला बांधून घातल्यासारखं वाटू शकतं. कोणा एकाच्या आनंदात दुसरयाची फ़रफ़ट होऊ शकते.मग सहजीवनातल्या ’सह’ ला फ़ार केविलवाणा अर्थ उरतो. ’नि’ला कदाचित तनय आणि अनुजा बरोबर राहताना असंच वाटलं असावं. पण ’नि’ तनय अणि अनुजाच्या निवेदनातून जेव्हढा उमटतोय, मूर्त होतोय तेवढ्यावरुनच अंदाज बांधायला लागतात.

स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या नात्यांच्या खूप वेगवेगळ्या त~हा असतात, वेगवेगळे कंगोरे असतात. डिक्शनरीत बघून सांगीतल्यासारखे एकेक बारकावे उकलून नाही दाखवता येत-कितीही दाखवायचे म्हटले तरी. आणि दोन मनुष्यमात्रांमधलं प्रेम हे इतक्या प्रतीचं असतं की चाकोरीतून येणारया प्रेमाच्या फ़ूटपट्टीत त्याला नाही मोजता येणार. ते पुरुषाने स्त्रीवरच केलं पाहिजे किंवा स्त्रीने पुरुषावर अशा ठोकळेबाज चौकटीत त्याला बसवायचा प्रयत्न केला की ते अनाकलनीय रहायचीच शक्यता जास्त. या कादंबरीचे नायक भलेही गे, बायसेक्शुअल असतील पण त्यांचं तसं असणं ही पूर्ण कादंबरीची ओळख ठरत नाही किंवा फ़क्त त्यावरुन कादंबरी वाचणं-न वाचणं ठरणं योग्य ठरत नाही. त्यामुळे या पुस्तकाची संभावना सरसकट ’Queer Literature’मध्ये करून या पुस्तकाच्या वाटेला न जाणे हा या पुस्तकावर शुद्ध अन्याय आहे. २ जुलै, २००९ नंतरही जर आपल्या विचारसरणीत थोडाफ़ार बदल व्हायची शक्यता नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते काय.

राहता राहिलं पुस्तकाचं शीर्षक- कोबाल्ट ब्लू. का?

शुद्ध निळा- त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ नसते. जशी त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ होते तसा तो होतो कोबाल्ट ब्लू! प्रशियन ब्लू, रॉयल ब्लू या आपल्या प्रतिष्ठीत भावंडांमध्ये काहीशा उपेक्षित राहिलेल्या या रंगाला प्रतिष्ठा मिळवून दिली व्हिन्सेंट व्हॅन गॉगने.
शुद्धतेच्या बाबतीत परिपूर्ण नसला तरी कोबाल्ट ब्लू अपूर्णत्वातच किती परिपूर्ण वाटतो, अलगरित्या डिफ़ा‌ईन होतो, स्वतंत्र स्पेस निर्माण करतो. पण हे सर्व असूनही त्या शुद्ध निळ्याशी नाळ जोडून असतो.

तनय आणि अनुजा आपल्या परिने परिपूर्ण नाती उभी करु पाहतात. पण एकाच माणसाकडून नाकारली गेलेली ही माणसं आपापली आयुष्य़ गोळा करतात, सावरुन जगू पाहतात. पण हे करताना ती त्याचं अस्तित्व नाकारत नाहीत. आपण आज जे आहोत त्यात त्याचाही वाटा आहेच हे प्रांजळपणे मान्य करुन आपापल्या वाटा चालायला लागतात, त्याच्या निळ्याशार अस्तित्वाचा ठसा मनात वागवतच.

म्हणून कोबाल्ट ब्लू!

18 comments:

aDi said...

आता वाचायलाच पाहिजे हे पुस्तक..
खरंच माहित नव्हतं याच्याबद्दल.

Eat & Burpp said...

तू क्रिटिक चा काम मस्तच करतेस!! छान लिहिल आहेस!!

Meghana Bhuskute said...

’निळ्या’चं विवेचन फार सुरेख. मलाही हे अंग नव्हतं मिळालं-नव्हतं कळलं कधी. थॅंक्स!
या गोष्टीच्या पार्श्वभूमीला मराठी मध्यमवर्गीय घराचं बांधून घातलेलं चौकटीतलं जगणं आहे. त्यात चाकोरीबाहेरचं शिक्षणही कुणाला मान्य नाही, मग चौकटीबाहेरच्या शारीर गरजा तर... मग त्या स्ट्रेट असोत, वा इतर.
ही चौकट घुसमटवत राहते पुस्तकभर. तिचा संदर्भ असतो या पात्रांच्या गोष्टीला. किंबहुना ही चौकटही एक पात्रच होते. सुरुवातीला कुटुंबीयांचा राग राग करणारे तनय आणि अनुजा शेवटाकडे आपापल्या पद्धतीनं आईचं कोंडलेपण समजून घेऊ शकतात... तेव्हा ती चौकट काहीशी असहायही वाटू लागते. आणि कुठल्याच समाजपद्धतीला सर्वसमावेशक असण्याची, कुणाचंच शोषण न करण्याची चैन परवडत नसेल का, असा एक निराश प्रश्नही पडतो...
बरं झालं लिहिलंस. मला हे पुस्तक फार आवडतं, महत्त्वाचं वाटतं. त्या मानानं दुर्लक्षित आहे ते.

BinaryBandya™ said...

छान लिहिले आहेस ,,,
नक्कीच वाचायला हवे हे पुस्तक ...

Shraddha Bhowad said...

@आदित्य, बी.बी
जरुर वाचा. निराशा नाही होणार

@गीता
कसलं काय गं! पण या पुस्तकाबद्दलची लोकांची मानसिकता बघितलीये मी. ते एक प्रमुख कारण लिहीण्याचं

@मेघना
तुझ्या ’चौकट’ या मुद्द्यावर लिहा्यचं होतं, आणखीनही बरंच. पण आताच काही सुचत नाहीये. नंतर लिहीते.

Ketaki Abhyankar said...

नक्की वाचणार मी आता हे कोबाल्ट ब्लू!!!
लोकांची उत्सुकता कशी टिकवायची हे छान लक्षात आलंय हं तुझ्या. :) तू या पुस्तकाबद्दल माहिती दिलीस पण सगळ्याच डीटेल्स न सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दलची उत्सुकता कायम राहते. त्यासाठी धन्यवाद. आणतेच विकत.

Unique Poet ! said...

इंटरनेट गंडल्यामुळॆ राहून गेलेला अभिप्राय.......
खरं तर एका वेगळ्या विषयावरील हे पुस्तक ...............न वाचलेले !
चौकटी बाहेरील म्हणत नाही ... कारण मला चौकट व्यक्तीसापेक्ष वाटते..........

तू ज्या पध्द्तीने समीक्षा केली आहेस... माझ्या कडॆ एकच शब्द आहे.... सुंदर .... !

नि , तनय , अनुजा यांच्या नात्याचे तू केलेले विवेचन ,’कोबाल्ट ब्ल्यू ’ या पुस्तकाबद्दल जे काही लिहीले आहेस त्यातून तुझी निराळी स्वतंत्र दृष्टी सतत जाणवत राहते...
जी " आवरण " वरील पोस्ट मधूनही झळकत होती.
हे पुस्तक मिळवून वाचतो आता......
शुभेच्छा , सदीच्छा ........! :)

Shraddha Bhowad said...

समीर, या बाबतीत तरी स्वतंत्र वगैरे काही नाही रे. जगा आणि जगू द्या असा फंडा असलेला आणि आपण करतो ते नैसर्गिक आणि बाकीचे करतात ते अनैसर्गिक असं मानण्याची हीन प्रव्रृत्ती नसलेला कोणताही माणूस माझ्यासारखाच विचार करेल.

Unknown said...

smthin like "vicky cristina barcelona"
by Woody Allen

Gangadhar Mute said...

छान आहे ब्लॉग तुमचा. :)

Ketaki Abhyankar said...

फायनली वाचलं कोबाल्ट ब्लू. सुंदर आहे पुस्तक, आणि जरासं चाकोरी बाहेरचं असलं तरी वाचताना एक वेगळाच फील येतो. तनय- अनुजाचं घर, घरातली माणसं, तो मनोरा, मागचं लेडीज हॉस्टेल सगळं सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. आणि विशेष म्हणजे त्या मनोर्यातल्या मुलाचा कुठेही राग वगैरे येत नाही वाचताना. "असेल त्याची पण काहीतरी बाजू" एवढंच वाटतं फक्त.
ह्या पुस्तकाबद्दल तू इथे लिहिल्यामुळे, ते वाचलं गेलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अजून कुठली कुठली वाचली आहेस, किंवा वाचते आहेस, ते सांग, म्हणजे त्यातली न वाचलेली शोधून फडशा पडायला बरं. :)

the windtalker said...

pan kobalt ch kaa? it reminds me of something gloomy, or may be morose, something like lonelyness, aayushyat nirman zaleli pokli, nakki nahi, pan namke shabd nahit, why not sky blue? ayhang nilya aakashacha rang, sarvanna samavun ghenara, tarihi vegvegle rand asnara,

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

The Windtalker, तुमची कमेंट ब्लॉगस्पॉट ने स्पॅम मध्ये घातली. का? ते न कळे-

The Windtalker म्हणाले,
pan kobalt ch kaa? it reminds me of something gloomy, or may be morose, something like lonelyness, aayushyat nirman zaleli pokli, nakki nahi, pan namke shabd nahit, why not sky blue? ayhang nilya aakashacha rang, sarvanna samavun ghenara, tarihi vegvegle rand asnara,

Shraddha Bhowad said...

तर मी परीचयात याचा खुलासा केला आहे
..राहता राहिलं पुस्तकाचं शीर्षक- कोबाल्ट ब्लू. का?

शुद्ध निळा- त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ नसते. जशी त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ होते तसा तो होतो कोबाल्ट ब्लू! प्रशियन ब्लू, रॉयल ब्लू या आपल्या प्रतिष्ठीत भावंडांमध्ये काहीशा उपेक्षित राहिलेल्या या रंगाला प्रतिष्ठा मिळवून दिली व्हिन्सेंट व्हॅन गॉगने.
शुद्धतेच्या बाबतीत परिपूर्ण नसला तरी कोबाल्ट ब्लू अपूर्णत्वातच किती परिपूर्ण वाटतो, अलगरित्या डिफ़ा‌ईन होतो, स्वतंत्र स्पेस निर्माण करतो. पण हे सर्व असूनही त्या शुद्ध निळ्याशी नाळ जोडून असतो.

तनय आणि अनुजा आपल्या परिने परिपूर्ण नाती उभी करु पाहतात. पण एकाच माणसाकडून नाकारली गेलेली ही माणसं आपापली आयुष्य़ गोळा करतात, सावरुन जगू पाहतात. पण हे करताना ती त्याचं अस्तित्व नाकारत नाहीत. आपण आज जे आहोत त्यात त्याचाही वाटा आहेच हे प्रांजळपणे मान्य करुन आपापल्या वाटा चालायला लागतात, त्याच्या निळ्याशार अस्तित्वाचा ठसा मनात वागवतच.

म्हणून कोबाल्ट ब्लू!
..

या परीच्छेदात.

कोबाल्ट ब्लू हा चमकदार रंग आहे. झळझळणारा. त्यामुळे तुम्ही मोरोज आणि ग्लूमी म्हणता आहात ते काही पटलं नाही. (#0047AB) हा कोबाल्ट ब्लू आहे.
तुम्ही मला वाटताहे, ’नेव्ही ब्लू’ बरोबर कोबाल्ट ब्लू बरोबर गल्लत करत आहात. आणि नेव्ही ब्लू का नाही? तर, नेव्ही ब्लू म्हटल्याबरोबर आठवतात ते गणवेष, शिस्त. चाकोरी..आणि त्या अनुषंगाने येणारी चौकट! Like a square peg in the square hole! आणि नी, अनुजा, तनय ह्यापैकी कोणीही स्व्त:ला चौकटीत बांधून घेणारं नाही़च आहे.

स्काय ब्लू चं म्हणाल, तर तो सर्वांना सामावून वगैरे घेतो, याची गोष्ट नाहीच चालू आहे. तर, तो एक स्वतंत्र रंग म्हणून कसा आहे हा मुद्दा आहे. स्काय ब्लू हा कॉमन रंग आहे. त्यात कोबाल्ट ब्लू ची exclusivity नाही. तनय, नी, अनुजा चारचौघांसारखे नाहीच आहेत, वेगळे आहेत. त्यांना मिडीयॉकर रंगाने डीफ़ाईन करुन कसं चालेल? आणि तो थोडासा feminine रंग आहे म्हणजे पुन्हा एकदा चौकट!

yogik said...

mast mast mast

drhadi.masoom said...

thanks shraddha , i read jerry pinto's version first and followed it by the original ..felt like eating a baked puran poli followed by the real tava one..both were delicious.. :)

Shraddha Bhowad said...

Thanks doc, an interesting simile there. I am glad you liked the book.

 
Designed by Lena