ट्रेक-चिल्लर नोंदी

मला वाटतं, माझं आतापर्यंतचं दीर्घकाळ चाललेलं एकतर्फ़ी-अध्येमध्ये दुतर्फ़ी प्रेमप्रकरण एकदाचं संपलं तेव्हाची गोष्ट आहे.
एकमेकांबरोबर नको नको झालं होतं, "संपलं एकदाचं..सुटले!" असं वाटलं तरी सलग चार दिवस मी आपली भाडोत्री रुदालीसारखी रडत बसले होते.
दार उघड म्हणून विनंती करून एकजात सगळ्यांचे घसे सुकल्यावर पाचव्या दिवशी मला रडायला ही ये‌ईना आणि कोरडं रडायचं तर घशातून आवाजही ये‌ईना. मला वाटतं माझ्या अश्रूंमधला 'त्या'चा अलॉटेड कोटा संपला असावा. तेव्हा माझ्या (दुसरया!) मित्राने भल्या पहाटे लाथ घालून मला घराबाहेर काढलं आणि घडला माझा पहिलावाहिला ट्रेक.
दीर्घ मुदतीच्या तापातून उठावं तसं झालं होतं मला.
त्या कित्येक दिवसंत मी धावलेच नव्हते. वजन बेसुमार वाढले होते, चेहरयाची पार रया गेली होती, झोपे‌अभावी डोळ्याभोवती काळी वर्तुळं आली होती, स्टॅमिनाच्या नावाने बोंब होती..तेव्हा मी हा पहिला ट्रेक केला ’सिंहगड ’चा. १० कि.मी चं ते अंतर का्टताना मी पाच-दहा वेळा बसले, २ लीटरच्या दोन बाटल्या रिकाम्या केल्या, लिम्बु सरबताचे ४-५ ग्लास ढोसले

त्यावेळी सिहगडावरुन खाली बघताना वाटलं की जीव द्यायला कसली मस्त जागा आहे.

---

माझी एक घाणेरडी सवय आहे.
समोरचा एक वाट चढून गेला की त्याच वाटेने काय जायचं म्हणून मु्द्दामून वेगळी वाट घ्यायची. या हटटापयी अनेक वेळा गुडघे फ़ोडून घेतले, टाके पडले, लाख लाख वेळा खरचटलं.
माझ्या या हेकटपणाशी अतिपरिचित असलेला एक मित्र आता मला खरचटलं, रक्त आलं की क्रूरपणे हसतो.
हसेनात का लोक.
पण त्यामुळे झालं काय- वर जाताना कुठली वाट घे‌ऊ नये याचं ज्ञान माझं मलाच मिळत गेलं आणि मग भविष्यात कधीही त्या अपघातांची पुनरावृत्ती तर झाली नाहीच पण नवनवीन वाटा कळत गेल्या.
अहाहा! काय पण मस्त फ़ंडा!
ह्या सगळ्या शक्यता ऍक्चुअली आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतात पण त्यांना हट्टाने शब्दात मांडल्या की ते ’फ़ंडे’ होतात.

---

एरव्ही मी तोंड लांब करुन फ़ंडे मारण्यात एक नंबर असले तरी भयानक कंटाळ्याच्या वेळी मला दुसरयाचेच फ़ंडे आठवायला लागतात.
एकदा काय झालं,
माझ्याबरोबरचा तंद्रीमास्टर खूप पुढे निघून गेला होता आणि वर चढायला एक चढण असलेली पायवाट असताना मला बाजूची दगडांचा छोटा जिना केलेली चढण दिसली आणि आ‌ऊट ऑफ़ ब्लू मला गौतम बुद्ध आठवला. बुद्ध म्हणतो ,
"प्रवासात जर मोठा दगड वाटेत आला तर थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्वत:ची उंची वाढवा "
बघूयात उंची वाढवून म्हणून मी त्या दगडाखालची माती भुसभुशीत झालीये का हे पाहायचं सोडून त्या दगडावर भस्सकन पाय ठेवला आणि...

पुढचा कथाभाग सांगण्यात हशील नाही.

---

"आपण तिथून जा‌ऊया? तो चढ सोप्पा वाटतोय".
कधीतरी मी ग्रूपलीडरला विचारल्याचं आठवतं.
तो हसला आणि म्हणला "हा चढ काय आणि तो काय, काटेकुटे सगळीकडेच असतात. थोडे कमी जास्त एव्हढाच फ़रक. चढ चढायचाच आहे ना? मग इकडे काय नि तिकडे काय. इकडून बघताना तुला तो चढ सोप्पा वाटणारच पण तिथे गेल्यावर तिथून हा चढ त्याहुन सोप्पा वाटेल हे ही तितकंच खरं".
मी आपली तोंड उघडं टाकून त्याच्याकडे बघत राह्यले आणि हळूहळू मला हसायलाच यायला लागलं.
अरे? म्हणजे फ़ंडे मारणारी माझ्या वर्तुळातली मी एकमेव नाही तर?
मला बरयाचदा गैरसोयीच्या जागी असले साक्षात्कार झालेले आहेत.

---

लांबचा पल्ला असेल तर मग साधारण एक तास सलग चालल्यानंतर किती अंतर राह्यलेय हे विचारायची उबळ येतेच येते.
सपोज कोणी समजुतीने सांगीतलं की बा‌ई, थोडंच राह्यलेय तरी पुन्हा वीस मिनीटांनी माझा प्रश्न त्याला जाऊन टोचतोच.
आतापर्यंत तरी कमाल सहनशक्ती असलेली लोकं माझ्या नशिबात होती आणि म्हणूनच "अजून बरीच तंगडतोड करायचीये गं बये, गप्प बसायला काय घेशील?" असं अजून मला कोणी बोललेलं नाहीये.
बोललं तर काय करीन माहीत नाही पण परमेश्वर माझ्यावर ती वेळ न आणो.

---

बा‌ईकवर एकाच सा‌ईडला दोन पाय सोडून बसणारया, पूर्ण चेहरा झाकून, हाय हील्स घालून ट्रेक ला येणारया पोरी मला अजिबात आवडत नाहीत. त्यांना वरुन ढकलून का दे‌ऊ नये? असा हिंसक विचार अनेकदा माझ्या मनात आलेला आहे.

---

चेहरा अर्धा झाकेल इतका गोगो, डोक्याला रुमाल, ढगळ टीशर्ट आणि लेगिंग्ज, खडीवरुन तोंडघशी पडण्याचा विक्रम आजवर अबाधित असल्याने हातात जाडजूड काठी या अवतारात एकतर मी डिटटो शेर्पा दिसते. त्यामुळे माझ्याकडे कोणी मुद्दामून लक्ष दे‌ईल अशी सुतराम शक्यता नसते. त्यामुळे आखमिचौली आणि नजरानजर अशा प्रकारांनाही काही स्कोप नसतो. आणि मलाही उगाच शस्त्रं परजत बसायचा कंटाळा आलेला असतो.
मग मित्र असले तरी तो एक मिडीयॉकर घोळका वाटायला लागतो.
मग एकटंच कुठेतरी फ़िरुन यायचं नाहीतर तटावर जा‌ऊन दरीत पाय सोडून बसायचं. (कोणी मुलगा बरोबर नाही म्हणून भटकायला कचरणारया पोरीही मला अजिबात आवडत नाहीत- पॉईंट टू बी नोटेड)
खरपूस उन्हाचा तो प्रचंड टेम्प्टींग वास सगळीकडे भरुन राहिलेला असतो. मध्येच दरीतून मोराचा म्या‌ऊ ऐकायला येत असतो, तो कुठल्या दिशेने येतोय हे शोधायचा प्रयत्न करायचा आणि देवासारखं शांत बसून राहायचं.
विसरू म्हटलं तरी न विसरल्या जाणारया काही क्षणांमध्ये अशाच एकांतामधले भरपूर क्षण आहेत.
परत आलं की कळतं की सगळ्यांच्या विकेट्स पडल्या आहेत.
विनय..
महाकाय जमदग्नी. भिजक्या मांजराच्या पोराला इथून तिथे हलवावं तसं मला एकीकडून दुसरीकडे हलवणारा. त्याच्या हाताचा पंजा केव्हढा मोठाय! त्याच्या अखंड पंजात माझी मानगूट मावते. तो विनय लहान पोरासारखा तोंड उघडं टाकून झोपलेला असतो.
अर्ध्या बाह्यांचे वेडपट बनियन घालणारा सॅम्या,
झोपेतही कपाळावर आठ्या असणारा जितू,
प्रत्येक ट्रेकला सगळ्यांना उत्साहात गोडमिट्ट चहा करुन पाजणारा-आमचा हरितात्या-शैल्या.
इकडे तिकडे टाकून दिल्यासारखे आपले मित्र अस्ताव्यस्त झोपलेले दिसतात
झाडाच्या पानांच्या जाळीतून उन्हाने त्यांच्या चेहरयावर मोझेक नक्षी काढलेली असते. अशा वेळी हे असे रांगडे, बाप्ये मित्र किती वेगळे दिसतात.

---

एकदा कुठूनतरी मा‌ऊथ-ऑर्गन चा आवाज ऐकायला आला. नुकताच एक मोठा ग्रुप आला होता त्यांचं कॅंप-फ़ायर चाललं असेल म्हणुन मी आवाजाच्या दिशेने निघाले. शेकोटीचा प्रकाश काही दिसला नाही पण खांबाला टेकुन बसलेला एक मुलगा दिसला.
लख्ख चांदण्यात त्याची सिल्व्हूट तेव्हढी दिसत होती.
त्या वेळी त्या क्षणाला तिथला वारयाच वावर, बांबुची शीळ जितकी खरी होती तेव्हढेच त्याचे सूर सच्चे होते.
काय दु:ख होतं त्याला कोण जाणे.. पण त्याने डोळे गच्च मिटून घेतले होते.
एक तास तो भान हरपल्यासारखा वाजवत होता.
तिथे मी होते, पलीकडे गडाचा राखणदार आमच्यावर लक्ष ठेवुन होता, पलीकडे मुलांचं खि-खि चालु होतं.. त्याला कशाकशाचं गम्य नव्ह्तं.
पण शेवटी शब्दांचा अटटाहास मला नडला.मी न राहवून थोड्याशा आगा‌ऊपणेच त्याच्या त्या एकांतावर अतिक्रमण केलं.
असा कोणाचा एकांत पाहू नये म्हणतात, आणि जरी पाहिला तरी त्यात मोडता घालायला जा‌ऊ नये असंही म्हणतात.
सकाळी त्यांचा ग्रूप निघताना मी जा‌ऊन त्याला हळूचकन सॉरी म्हटलं तेव्हा तो समजूतदार हसला.
घोळक्यात आपलेही क्षण- दोन क्षण जगता येतात हे मला या मुलाने शिकवलंय.

---

बॉनफ़ायर असली की मग कविता मस्टच.
त्यातूनही न सांगता कोणी खड्या आवाजात ’रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ सुरु केलं की कानशिलं सरसरुन तापतात. रात्रीच्या किर्र अंधारात लवलवणारया ज्वाळांपलीकडे त्या मुलाचा चेहरा दिसत नसला तरी त्याचा खर्ज डसतो. मग त्या तडतडणारया ज्वाळांबरोबर कवितेचा ज्वर चढत जातो.

---

वारा प्रचंड आवाज करत वाहत असावा, आपल्याकडे अपुरं पांघरुण असावं, कोणी मायेने दे‌ऊ करावं, जाग आणि झोप यांच्या सीमारेषेवर आसमंतातल्या प्रत्येक बदलाची चाहूल अर्धजागृत मन ठेवत असावं, मनात आलं तर वेळ-काळ न बघता त्या वारयात भेलकांडत मस्तपैकी कुडकु्डत, दात वाजवत फ़िरुन यावं.
कसली खंत, द्वेष, डूख मनात नसतो. लख्ख कोरं. अशावेळी शब्दही नकोसे वाटतात.
श्वासांचाही मग गहबजच वाटतो.
अशावेळी कोणी अंगावरचं जॅकेट दे‌ऊ करुन नि:शब्द बाजूला चालत राहावं, आपल्याला आपल्यावरच सोडून.
हीच खरी सोबत.

---

रात्र पड्ता पडता पोहोचावं, शेकोटीचा आणि रात्रीचा भर उतरणीला लागताना गप्पांचा बहर वाढत जावा.निखारयांतली धुगधुगी थोडीशी शिल्लक असताना झोप अनावर व्हावी, मग तिथेच वळकटीवर आडवं व्हावं, सरतेशेवटी झोपेच्या आधीन होताना किलकिल्या डोळ्यांना क्षितीजावर फ़टफ़ट्लेली पहाट दिसावी.

आणखी काय हवं असतं?

8 comments:

Unique Poet ! said...

छान लिहीले आहे... लिखाणा बाबत कधी अंदाज बांधता येत नाही..... डोके रिकामे ठेवून वाचत जायचं ... नवीन काही मिळत जाते..... असं नेहमी होते! :)

" रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो " कुणाची आहे...कुठे मिळेल ?
सदीच्छा !
समीर.पु.नाईक

BinaryBandya™ said...

छान लिहिले आहेस ...

"वारा प्रचंड आवाज करत वाहत असावा, आपल्याकडे अपुरं पांघरुण असावं, कोणी मायेने दे‌ऊ करावं, जाग आणि झोप यांच्या सीमारेषेवर आसमंतातल्या प्रत्येक बदलाची चाहूल अर्धजागृत मन ठेवत असावं, मनात आलं तर वेळ-काळ न बघता त्या वारयात भेलकांडत मस्तपैकी कुडकु्डत, दात वाजवत फ़िरुन यावं. कसली खंत, द्वेष, डूख मनात नसतो. लख्ख कोरं. अशावेळी शब्दही नकोसे वाटतात.श्वासांचाही मग गहबजच वाटतो.अशावेळी कोणी अंगावरचं जॅकेट दे‌ऊ करुन नि:शब्द बाजूला चालत राहावं, आपल्याला आपल्यावरच सोडून. हीच खरी सोबत."

अप्रतिम ...

’फ़ंडे’ - फ़ंड्याची व्याख्या पण आवडली ...

Shraddha Bhowad said...

@ समीर,
धन्यवाद!

@बी.बी
अगदीच ’भिडला’ का रे पॅरा?
सह+अनुभूती?

BinaryBandya™ said...

अगदी म्हणजे direct भीडेश ...

Nil Arte said...

ए sssss यार मला आत्ताच्या आत्ता ट्रॅक पॅन्ट आणि फ्लोटर्स चढवून ट्रेकला जावंसं वाटतंय

Shraddha Bhowad said...

निलेश,
हा हा, पोस्टचा हेतू साध्य. :O

Amogh said...

Hey...great post...bumped into your blog randomly while searching for "raktat petlelya..."..i dont know who you are, i haven't even gone through the entire blog yet..but this is one fresh post i have seen in years...to be able to express yourself this freely and beautifully is something rare...wish i cud see more blogs like these...bye

Shraddha Bhowad said...

Hello Amogh,

Thanks for the compliments! It was nice seeing you on Facebook.

-Shraddha

 
Designed by Lena