’बेगम बर्वे’ नावाचं गिरमिट!

तुम्ही ’चारशे कोटी विसरभोळे’ वाचलंय? ’सात सक्कं त्रेचाळीस’ वाचलंय? नसतील वाचली तर ही पुस्तकं वाचल्यानंतर येणारं झपाटलेपण काय आहे हे कळणं शक्य नाही. आणि हे झपाटलेपण येत नसेल तर मी अंगात आल्यासारखी रात्रीची ’बेगम बर्वे’ या नाटकावर  ही पोस्ट का लिहीतेय याचाही जाम पत्ता लागणं शक्य नाही. पण लिहीणं माझ्यासाठी  गरजेचं आहे. मी सकाळपर्यंत थांबले की रात्रीचे विचार मूर्खपणाचे वाटणार याची खात्री आहे. मग मी ते कधीच लिहीणार नाही आणि मग ते विचार आकसत आकसत जरदाळूच्या टणक बी सारखे होणार आणि माझ्या मेंदूत खडखड करत बसणार, त्यापेक्षा लिहीते. मग ते विचार आणि तुम्ही -काय ते बघून घ्या.

तर, बेगम बर्वे-

मी जन्मायच्याही आधी सात वर्षं आधी हे नाटक लिहीलं गेलंय. मी आज ज्या वयात आहे त्या वयात आळेकरांनी हे नाटक लिहून ते अफ़लातूनरित्या एक्झिक्यूट केलं. केलं तर असं केलं की आजसुद्धा त्याबद्दल निव्वळ निव्वळ आदर आणि ’awe' मध्येच बोललं जातं.  त्याच्याबद्दल इतकं काही बोललं गेलं आहे, मी ऐकलं आहे की मी लायब्ररीत जाऊन मिळवून ते वाचलं. 
मला एकच पुस्तक पुन्हापुन्हा वाचायची खोड आहे.पुस्तक पुन्हापुन्हा वाचलं की दुसरया-तिसरया वाचनात आपल्याला पहिल्या वाचनात कळलं त्यापेक्षा वेगळ्यारितीने कळतंय असं माझं मलाच जाणवतं. अर्थात मी ’बेगम बर्वे’सुद्धा तीन वेळा वाचलं.

मी ’बेगम बर्वे’ पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला अत्यंत जुनी प्रत वाचायला मिळाली होती, त्यात आळेकरांच्या पुढच्या ’बेगम बर्वे’च्या नव्या आवृत्त्यांमध्ये आहे तसं रेखा साने-इनामदार यांनी केलेलं ऍनालिसिस नव्हतं, त्यामुळे माझं पहिलं वाचन हे अजिबात इन्फ़्लू‌एन्स्ड नव्हतं, त्या वाचनात इतरांचे रेडीमेड विचार मिसळून त्याचं निव्वळ पॉलिटीक्स झालं नव्ह्तं, नाटक मुघल काळात घडतंय की कोणत्या-याचीही कल्पना नव्हती, एकदम कोरी पाटी. त्यामुळे मला पहिल्यांदा ’बेगम बर्वे’ जे कळलं ते काहीसं असं होतं- 

यातला श्यामराव बुली आहे, शिवराळ आहे, डॉमिनंट, ऑब्सेसिव्ह आहे आणि अत्यंत लबाड आहे असा प्राथमिक निष्कर्ष मी काढला जो कोणीही काढेल. 
हे सबंध नाटक थोडं थोडं वास्तव आणि थोडी थोडी फ़ॅंटसी यात घडते.
या नाटकात बर्वे ’गे’ असण्याचा किंवा शामराव आणि बर्वे यांच्यामधल्या लैंगिक संबंधांचा थेट उल्लेख कुठेही नाही-त्यांचं नातं होस्ट आणि पॅरासा‌ईट सारखं आहे, या नाटकाची थीमच मुळी परावलंबनातून आलेली गुंतागुंत आहे. जावडेकर बर्वेवर, मित्र म्हणून बावडेकरवर, बर्वे श्यामराववर, श्यामराव त्याच्या मनाविरुद्धा आर्थिक कारणांकरता बर्वेवर, बर्वे पहिल्यांदा श्यामराववर नंतर जावडेकरवर, जावडेकर -बावडेकर नोकरीवर असं परावलंबनाचं मोठठच्या मोठठं जाळं आहे. ह्यातली एखादी लिंक निसटली की त्याचं नाटक हो‌ईल अशा रितीने ते घडवल्यासारखं आहे. 
बावडेकर हे पात्र फ़ारशा सुस्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर आलंच नाही, संपूर्ण नाटकात ते अंडरडॉगसारखं वाटत राहिलं, बर्वे जावडेकरांबरोबर आल्याने जावडेकरांच्या पात्राला वॉक-ओव्हर मिळालाय पण बर्वे बावडेकरांबरोबर असता तर जावडेकरांचा बावडेकर झाला असता असं वाटत राहिलं.
बर्वे हाच नलावडेबा‌ई आहे, श्यामराव हाच सूत्रधार कम प्यून आहे, एका बे‌अरींगमध्ये असताना ते अचानक निसटल्यासारखे दुसरया बे‌अरींगमध्ये शिरतात. उदा.-नलावडेबा‌ई अचानक बत्तीविषयी, कंपनीच्या मालकाविषयी बोलायला लागते हे मला कळलं.
एकंदरच जे शुद्धीवर असताना, सगळे सेन्सेस सतर्क असताना घडू शकत नाही असं वाटतंय ते फ़ॅंटसीत घडतंय असा ढोबळ नियम लावला की नाटक कळलंय असं वाटू शकतं असं मला पहिल्या वाचनात वाटलं.
--

श्यामराव हा बहुजन समाजाचा आहे (असं साने-इनामदार यांनी ’बेगम बर्वे विषयी’ या त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे) हे मला काही पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं, नंतर लक्ष दे‌ऊन वाचल्यावर त्याच्या भाषेवरुन असा अर्थ निघू शकतो असं वाटतं पण तसं असलंच पाहिजे याची गरज नाही वाटली किंवा त्याने काही फ़रक पडतो असे वाटले नाही . मी संगीत नाटकं बघितलेली नाहीत, मी नुकताच आलेला ’बालगंधर्व’ हा पिक्चर सुद्धा बघितलेला नाही. मला तो बघावासाच वाटला नाही. त्यामुळे बर्वेचं त्या काळात रमून असणं, त्याची गायलेली पदं, त्याचा नॉ्स्टॅल्जिया मला भिडला नाही, मला फ़क्त त्याच्या पुरुषी देहातलं सरावलेलं स्त्रीपण कळलं, मला तेव्हढं पुरेसं वाटलं. आता मला असं वाटणं चूक की बरोबर की थोडं थोडं चूक, थोडं थोडं बरोबर हे माहीत नाही.


नंतर वाचताना मला ही फ़ॅटसी नसावीच असंही एका ठिकाणी वाटून गेलं. यातली पात्रं भ्रमात जगतात असं वाटलं पण फ़ॅंटसी आणि भ्रम यांत मी मला स्वत:लाच पटेलसा हुशार फ़रक (स्वत:लाच) सांगू न शकल्याने नंतर तो विचार कटाप केला. स्त्री ’अफ़ोर्ड’ न करु शकण्यापायी जावडेकरांनी मेल बर्वेमधल्या फ़ीमेलवर भागवून घेतलं असावं (नो फ़ॅंटसी, पण चॉईस नसण्यातून किंवा डेस्परेशनमधून) आणि पुढच्या ज्या घटना बर्वेच्या पुरुष असण्याला कॉंट्रॅडीक्ट करत जातील त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा वेळ मारुन नेणे असा प्रकारही वाटला, पण त्याही वाटण्यात नंतर दम राहिला नाही.

नंतर मला प्रश्न पडला की ही ह्या चौघाजणांची कलेक्टीव्ह फ़ॅंटसी आहे (एकमेकावर ओव्हरलॅप होणारी) की जावडेकर, बावडेकर, बर्वे किंवा शामराव यापैकी कोणातरी एकाचीच? म्हणजे हे बर्वेच्याच फ़ॅटसीमध्ये घडतंय का कुणाच्या? की ही या चौघांपेक्षाही वेगळ्या कोणाचीतरी फ़ॅटसी आहे? नाटककाराची? म्हणजे हे सगळं नाटक आळेकर आपल्या डोक्यात घड्वतायेत आणि हे चौघे रोल प्ले करतायेत आणि त्यांना वाटेल तेव्हा ते ट्विस्ट आणणार आहेत, त्यांना वाटेल तेव्हा ते एखाद्याला भलताच रोल करायला सांगणार आहेत. 
म्हणजे मी जर वाचताना ती पात्रं स्टेजवर कशी वावरतायेत हे इमॅजिन करत असेन (म्हणजे मी करतेच) तर ही चौघं असताना स्टेजवर नसलेले(नाटककार) आळेकर त्यांना कठपुतळीसारखं नाचवतायेत असा फ़ील यावा ,म्हणजे त्यांचा अदृश्य वावर किंवा नसूनही ’असणं’ व्हॉटेव्हर जाणवत रहावं असं काहीतरी. म्हणजे कथानक घडतंय पण त्या कथानकात ही चौघं असूनही ती ते कथानक घडवत नाहीत. हे आता बघतोय ते झालं एक नाटक पण नाटककाराच्या मनात असेल तर तो दुसरंही काही घडवू शकला असता, आताही घडवू शकेल असं सारखं वाटत राहतं. 
आता ह्यातलं बरोबर किती, चूक किती हे मला माहित नाही, असं मला वाटलं खरं.

प्रत्येक फ़ॅंटसीला अंत असतोच, शेवटी फ़ॅंटसीतून बाहेर पडून सत्यसृष्टीत यावंच लागतं अशा अर्थाचा शेवट वाचताना मात्र "च्यायला! हे असंच होणार हे आपल्यालाही माहित होतं की!" असा फ़ील आला. तो शेवट मात्र आळेकरांनी जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या रितीने केला नसता असं वाटलं.

मलातरी ’बेगम बर्वे’ वाचून काय आठवलं माहित आहे का? मला एकाच वेळी तीन गोष्टी आठवल्या.

एक म्हणजे ’लेगो’ गेम. त्यात तुकड्यांवर तुकडे जुळवून ड्रायव्हर, गाडी, ट्रॅक्टर वगैरे बनवायचा असतो. एखादंदुसरंच मूल असं असतं जे ड्रायव्हरच्या जागी ड्रायव्हरला न बसवता तिथे चाक लावून बघेल, गाडीच्या चाकाच्या सिमिट्रीवर काहीतरी प्रयोग करुन बघेल,  मागची चाकं मोठी आणि पुढची छोटी असं काहीतरी मॉडेल असेल तर पुढेच मोठी चाकं लावून ती कशी कलंडते हे बघेल, हे सगळं करुन झाल्यावर मात्र तो ते मॉडेल जसं असायला हवं होत किंवा ऍटलीस्ट सगळे जसं म्हणतायेत किंवा ब्रोशरमध्ये जसं दाखवलंय तशा रितीने्च असेंबल करेल. मला ’बेगम बर्वे’ हा सतीश आळेकरांनी केलेला असाच काहीतरी खेळ वाटला. 

किंवा मग चित्र बघतानाची पद्धत. 
म्हणजे मी चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते.पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय हो‌ईल? चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल का? दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल का? असा विचार माझ्या डोक्यात येतो. तेव्हा मग वाटतं की न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच. 
’बेगम बर्वे’ मला चित्र बघायची ती दुसरी पद्धत वाटली. अगदी लिटरली नाही, पण बरीचशी तशी.

किंवा मग  पाब्लो पिकासोने एक ढांसू तंत्र विकसित केलं होतं ते म्हणजे क्युबिझ्मचं, ते आठवलं. क्युबिझम म्हणजे एक पूर्ण चित्र असतं तर ते फ़ाडून, डीकन्स्ट्रक्ट करुन होतं तसं न लावता मनाला ये‌ईल तसं, मूड लागेल तसं लावलं की कसं दिसेल, तशी तो चित्रं काढतो. म्हणजे तो मुळातच चित्र काढताना ते डीकन्स्ट्रक्ट केल्यावर कसं दिसेल तसंच चित्र काढतो. त्याला क्युबिझ्म म्हणतात. 

असं खूप खूप, काय काय वाटलं. हे वाटलं ते मी अर्थात ज्यांनी ’बे.ब’ वाचलंय त्यांच्याबरोबर शेयर केलं. मला ह्या वाचकांत दोनच प्रकार दिसले. एक- हे नाटक पूर्ण समजलंय असा दावा करणारे आणि दोन- हे नाटक अजिबातच समजलं नाही असं मान्य करणारे. मला अधलंमधलं त्रिशंकू कोणी भेटलंच नाही. बरयाच जणांना त्यांच्या मते खूप ऑब्व्हियस प्रश्न पडले होते जे मला पहिल्या वाचनात सुद्धा पडले नाहीत (Yes, I am bragging). उदा. बर्वेला दिवस जातात. हे कसं काय. पुरुषाला दिवस कसे काय जा‌ऊ शकतील? बर्वे स्त्रीवेशात स्त्री म्हणून खपून जा‌ईल कदाचित पण जावडेकरला कळलं असेलच नं, they are supposed to be नवरा-बायको, right?  इत्यादी.
मी ती ’चर्चा’ तिथेच बंद केली हे सांगायची गरजच नाही.

तर हे असं झालं.

’बेगम बर्वे’ लिहीण्याला कारणीभूत झालेले तीन प्रसंग आळेकरांनी त्यांच्या मुलाखतीतून वारंवार सांगीतलेत आणि ते फ़क्त तेव्हढंच सांगतात. पण ते तीन प्रसंग त्यांनी अशारितीने एक्झिक्यूट का केलेत हे मात्र ज्याचं त्यानं करायचं इंटरप्रीटेशन आहे, आळेकर त्याची मजा बघत बसतात. माझं इंटरप्रीटेशन मी माझ्यापद्धतीने केलंय,चूक-बरोबर याचा न खेद आहे न खंत. 

पण पात्रं कल्पून वाचणं आणि ती प्रत्यक्ष रंगमंचावर दृश्य झालेली पाहणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एलकुंचवारांची  गार्बो वाचणं आणि मोहित टाकळकरच्या गार्बोला पाहणं ह्या दोन वेगळे अनुभव होते. पुस्तक वाचून डोकं भीsssर्र् झाल्यावर आता मला 'बेगम बर्वे’ पाहायचं होतं. 
काल माझं तेही पाहून झालंय. 
तो वाचनापेक्षा अंमळ सोपा प्रकार आहे हे मात्र खरं. डोक्याला एव्हढं गिरमिट लागत नाही.

लॉर्का.

होला! कोमो एस्ता?

कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्या गोष्टीचं वेड असणं आवश्यक असतं.
स्पॅनिश भाषा आणि स्पॅनिश कवितांबद्दलचं माझं वेड खूप मागे ट्रेस करत गेलं तर ते गौरीच्या अणूपाशी येऊन थांबतं. शोध शोध शोधला तरी अणूचा बोर्हेज काही मला मिळेना पण बोर्हेजला शोधताना मला सापडला लॉर्का.

फ़ेडरिको गार्सिया लॉर्का.
कोणत्याही कलंदर कलाकाराची असते तशी वादळी लाईफ़स्टाईल.प्रसिद्ध चित्रकार साल्वाडोर दालीचा बॉयफ़्रेंड म्हणून ओळखल्या जाणारया लॉर्काला त्याचा स्वत:चा आवाज सापडायला वेळ लागला. प्रामुख्याने विरह, तुटलेपण, लैंगिक जाणिवा, समलिंगी संबंधांवर आपल्या कविता- नाटकांमधून भाष्य करणारया लॉर्काच्या लिखाणाला जिवंतपणी मिळाली नाही तितकी ओळख त्याच्या मृत्यूनंतर मिळाली. स्पॅनिश सिव्हील वॉर मधल्या त्याच्या हत्येनंतर लॉर्काच्या कविता झोतात आल्या.


"..माझ्या माथ्यावर चंद्राचं अमरत्व आहे,
मी झोपू इच्छितो एक क्षणभर,
एखादा तास, एक रात्र किंवा एक आठवडा, एखाद वर्ष
किंवा कदाचित एक शतकभर..
मी खूप थकून गेलोय.."

असं म्हणणारा लॉर्का कवितांमध्ये हळवा हळवा होऊन जातो. स्पेनमध्ये अराजक माजलेलं असताना त्याने लिहीलेली The Fable and Round of the Three Friends मधली ही कविता लॉर्काला खूप ठळकपणे आपल्यासमोर उभा करते.
--तुमच्यात
एखाद्या कवीला
ठार करायची
काय पद्धत आहे?

झण्णकन छाताडातच गोळी घालता का?
ज्यातल्या
दडपलेल्या इच्छा आणि न संपणारया भयाने त्याला बंदीवान करुन ठेवलंय
तुम्ही नियम, कायदे आणि फ़ाकडू सैन्याने त्याला करु पाहाताय
त्याहून अंमळ जास्तच वेळ.

का मग थेट डोक्यातच गोळी घालता
जिथे
कधीकाळी मुक्तपणे गुणगुणलेल्या गीतांची भुते,
"आमच्याकडे बघा हो कोणीतरी!" घुसमटत आक्रोशणारया, व्यक्त व्हायला धडपडणारया जाणीवांचा
बुजबुजाट आहे नुसता

कसं? अशीच पद्धत आहे नं?

" आता हे लिहीता लिहीता कळलंय मी कधीचाच ठार झालोय
ते मात्र मला शोधत राहिले मी जिवंत असताना असलो असतो अशा ठिकाणी
कॅफ़े, चर्च, स्मशानांमध्ये...
..पण त्यांना काही मी सापडलो नाही.
कमालेय, त्यांना मी कधीच सापडलो नाही?
हं! खरंय,
त्यांना मी कधीच सापडलो नाही"

-लॉर्का

--
बोर्हेज नाही तर नाही पण लॉर्का ओळखीचा झाला. पुढचे काही दिवस छान जाणार!
आदिओस!

तस्लिमा उवाच..

वादळांना नेहमी स्त्रियांची नावं असतात. ती जोपर्यंत खवळून उठत नाहीत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व कोणाला जाणवत नाही पण एकदा का त्यांनी आपला इंगा दाखवला की ती आपल्या वाटेत येणारया अशाचीही तमा कशी बाळगत नाहीत आणि काय उलथापालथ करु शकतात याची चुणूक दाखवतात.
’तस्लिमा नसरीन’ नावाचं वादळ गेल्या दोन दशकापासून घोंघावतंय ते काही अजून शमायला तयार नाही.
’लज्जा’ पासून परजलेल्या तिच्या बंडखोर लेखणीचा धांदोळा घेतला  की ’ धर्मनिरपेक्ष मानवतावादी लेखिका’ ते ”स्त्रीवादी लेखिका’ असा तिचा प्रवास झालेला दिसतो. ’नारी कोनो देश ना‌ई’ अर्थात ’नो कंट्री फ़ॉर विमेन’ या पुस्तकात कट्टर स्त्रीवादी भूमिकेतून लिहीणारी तस्लिमा तिच्या नेहमीच्याच शैलीत पुरुषप्रधान संस्कृती, तिचं कोतेपण यांचं वाभाडे काढताना दिसतेय. या पुस्तकातल्या ४६ लेखातून तिने जणू त्यांच्यावर ४६ कोरडेच ओढलेत. तिचे हे लेख म्हणजे फ़ावल्या वेळेतली चिंतनं नव्हेत तर जगाकडे, स्त्रियांकडे, शोषितांकडे बघायची एक नवी दृष्टी देणारी स्फ़ुट स्वगतं आहेत.

लेखक आपली पाळंमुळं सर्वसामान्यांमध्ये शोधतो. त्यांच्या वेदनेशी एकरुप झाल्याशिवाय त्या व्यक्तीची त्यांच्यासाठी चाललेली झुंज वैश्विक हो‌ऊच शकत नाही. तस्लिमाच्या लेखांमध्ये पार राजकीय उच्चासनावरच्या निलोफ़रसारख्या स्त्रियांपासून ते बिरभूमच्या रिक्षावाल्याची मुलगी सानेरापर्यंतच्या सर्व स्त्रिया हजेरी लावतात. तिच्या लेखांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि तेच अभिप्रेत आहे- ते म्हणजे आर्थिक स्तर कोणताही असो, स्त्रीला एकसमानच वागणूक मिळते ती म्हणजे दुय्यमत्वाची, गुलामाची. या सर्व स्त्रियांच्या आनंदाशी, दु:खाशी, वेदनेशी तिचं जोडलेपण जाणवतं. उपोषणाला बसलेल्या सिंगूरच्या स्त्रियांच्या अफ़ाट मनोबलाने ती स्तिमित होते-नतमस्तक होते, बळी पडलेल्या प्रत्येक स्त्रीच्या जाण्याने तिच्या आयुष्यात न भरुन येणारी पोकळी निर्माण होते. पुरुषी दडपशाहीच्या चरकात रगडल्या गेलेल्या प्रत्येकीबद्दल तस्लिमाला तेव्हढंच आणि तितकंच ममत्व वाटतं. पुरुषाचा आधार असणं हे स्त्रीच्या समस्यांचं निराकरण करु शकत नाही हे तिने या लेखांमधून पोटतिडीकीने सांगायचा प्रयत्न केला आहे.स्त्रीच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी पुरुषांवर नको तेव्हढा विश्वास टाकणाच्या स्त्रीच्या मूर्खपणाच कारणीभूत आहे असं तिचं म्हणणं आहे. कुठल्याही सबळ  कारणाच्या अभावावर उभ्या असलेल्या लग्नसंस्थेने कर्तृत्वनान गुणी मुलींचे मातेरे झाल्याचे दाखले दे‌ऊन ’विवाहसंस्था’ हा स्त्रियांसाठी भयंकर मोठा शाप असल्याचं सांगते.फ़क्त स्त्रीबद्दलच नाही तर अन्य दुबळ्या, शोषित घटकांबद्दलचा तिचा उदारमतवादी, सहानुभूत दृष्टीकोन लेखांमधून जाणवतो. तस्लिमा समलिंगी संबंधांची पाठराखण करते, कोणाच्याही लैंगिक आवडीनिवडी परस्पर ठरवायचा आणि त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार समाजाला नाही असे ती निक्षून सांगते.

शतकनुशतके चालत आलेल्या रुढींना, समजांना आव्हान देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही, प्रचलित रुढी व समज का आहेत? यावर प्रश्नचिन्ह डकवण्याचेही-पण तस्लिमाने ते केलं. तिच्या लिखाणामुळे गहबज उडाला तो याचमुळे. पेशाने मूळची डॉक्टर असलेली तस्लिमा तिच्या लेखणीचं स्कालपेल चालवत पारंपारीक कल्पनांना छेद देत ती तिचं भेदक विश्लेषण मांडते तेव्हा सर्व गोष्टी पार मुळापासून उघड्यावाघड्या हो‌ऊन आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या दिसतात.

स्त्रीवर लादली गेलेली बंधनं ही तिच्या भल्याकरताच आहेत असा स्त्रीचा समज करुन दिलेला असतो पण ती आपल्या भल्याची कुठल्या प्रकारे आहेत याचा पत्ताच ती बंधनं शतकानुशतके आपल्या अंगावर वागवणारया स्त्रीला नसतो. कधीकधी ती बंधनं तिच्यावर लादणारया खुद्द पुरुषालाही नसतो. त्याबद्दल तिला विचार करायचीही फ़ुरसत मिळू नये याची दक्षता घेतली गेलेली असते. स्त्रीला मालकी हक्काची, उपभोगाची वस्तू समजण्याची पुरुषाची वृत्ती पुरुषाच्याही नकळत त्याच्या नसानसातून भिनलेली असते किंबहुना समाजाने ती त्याला बहाल केलेली असते.हे पुरुषांचं आप्पलपोटेपण, कुटुंबसंस्थेत वारंवार निदर्शनास येणारा पुरुषी दुटप्पीपणा, यातून होणारी स्त्रीची ससेहोलपट याचं वास्तवात दडलेलं चित्रण, स्त्री-पुरुष संबंध, सेक्स यांची ऍनाटॉमी या सर्वांचा लेखाजोखा मांडणारे बरेच लेख या पुस्तकात आहेत.स्त्रीहक्क पायदळी फ़क्त अडाणी, गरीब समाजातच नाही तर सभ्यपणाचा बुरखा पांघरुन वावरणारया पांढरपेशा समाजातही स्त्री हक्कांची पायमल्ली होताना दिसते, तिथे तिला मनुष्यप्रण्या‌इतकाही दर्जा दिला जात नाही हे तिने दाखल्यांसह दिले आहे.तस्लिमाच्या मते शिक्षण घेतलं, स्वत:च्या पायावर उभं राहणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे आणि कॉलेज-युनिव्हर्सिटीमधून घेतलेली पदवी म्हणजे शिक्षण नव्हे. आपल्या अधिकारांबाबतचं समूळ ज्ञान आणि त्या अधिकारांबद्दल आग्रही असणं म्हणजे शिक्षण असं आग्रही प्रतिपादन ती करताना दिसते.
एका वेळी पुरुषी वर्चस्वाबद्दल बोलतानाच ती वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडत राहते, जुन्याच चुका करत राहते, घाव सोसत राहते, जुन्या चुकांमधून नवे धडे शिकते. यांत कधीतरी कुठेतरी पुरुषी नसलेला  पुरुष भेटेल याची आशा दिसते किंवा तिच्या शरीराच्या गरजेचा अपरिहार्य विचार.

कट्टर धर्मवाद्यांवर,धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवणारयांवर ती कडकडून हल्ला चढवते, पुरुषांच्या आक्रमकपणावर भाळणारया स्त्रियांना चार समजुतीचे शब्द सुनावते. पुरुषी हिंसा, उघड‌उघड सापत्न वागणूक, बालविवाह, पुरुषांचे बहुविवाह, त्या अपमानाच्या धगीत मुक्या बिचारया मेंढरांसारख्या उभं आयुष्य़ मुकाट जाळणारया स्त्रिया, चारित्र्यहिन स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याचा कायदा करणारी मुजोर सरकारं, बुरख्याची जबरदस्ती, पतीची आज्ञा न पाळल्याबद्दल होणारी मारहाण, भीतीप्रद तिहेरी ’तलाक’, शोषण-गुलामगिरी सगळ्या-सगळ्याचं दाहक वास्तव तस्लिमाच्या लेखामधून जळजळत राहतं, भळभळत राहतं.

धर्माने केलेली स्त्रीची कोंडी हा केवळ बांगलादेशचाच नाही तर आशिया खंडाचाच विशेष आहे. तस्लिमाच्या झुंजीचा काळ हा मुळातच आशियातील खूप मोठ्या उलथापालथीचा कालखंड आहे. याच काळात इस्लामिक राष्ट्रांमध्ये जीवघेणी युद्ध लढली गेली, भारतीय उपखंडातले सततचे पेटते वातावरण, पत्त्यांसारखी कोसळलेली सरकारं, त्यातून राजकीय खेळ्यांना आलेला ऊत या सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा परामर्ष घेत तस्लिमा स्त्रीच्या अस्मितेचा शोध घेते आहे. हे सर्व लेख त्याचंच प्रतिबिंब आहेत.

तस्लिमाचे हे लेख वरवर जरी अवघ्या स्त्रीवर्गाभोवती रचले गेलेले आहेत असं वाटलं तरी तस्लिमा बांगला स्त्रियांना केंद्रस्थानी ठे‌ऊनच बोलतेय असं वाटत राहतं. बांगला स्त्रिया, पुरुष यांचे मनोव्यापार, स्वभावविशेष, बांगला संस्कृती, बांगला राजकारण याबद्दल जास्त मनस्वीपणे लिहीते कारण ती खुद्द बांगला आहे. ज्या बांग्लादेशवर तिचं आत्यंतिक प्रेम होतं तिथल्या कट्टर धर्मवाद्यांनी काढलेल्या फ़तव्यांमुळे तिला तो देश सोडावा लागला. तस्लिमा म्हणते स्त्रिला देश वगैरे काही नसतोच पण तस्लिमाला कागदोपत्रीही देशोधडीला लावलं गेलं. तस्लिमा पाकोळीसारखी देशोदेशी भिरभिरत राहिली पण तिचं आपलं मायदेशावरचं प्रेम आटलेलं नाही हे दिसतंच.

हे लिखाण म्हणजे कट्टर धर्मवाद्यांच्या लाडक्या ’नष्ट मेयेर’ नाठाळ मुलीची वर्षानुवर्षाची ठसठस आहे.तस्लिमाला माहितेय की स्त्रियांना स्वातंत्र्य कोणी बहाल करणार नाहीये किंवा आयतं देणार नाहीये, ते त्यांचं त्यांनीच लढून मिळवायचं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत व्यवस्थित ब्रेनवॉश झालेल्या स्त्रियांना हे जोपर्यंत उमजत नाही तोपर्यंत गुलामगिरीचा वसा पिढ्यानुपिढ्या चालूच राहणार आणि म्हणूनच तस्लिमाने या पुस्तकाचा डाव मांडल्यासारखा वाटतो. एकेकाळी वर्जिनीया वूल्फ़ने म्हटलं होतं की ’स्त्रीला देशच नसतो-कधीही", त्याला इतकी वर्षं लोटली तरी परिस्थितीत तिळमात्रही फ़रक पडलेला नाही हे खेदजनक आहे. तस्लिमा तिचं काम ती या आधीही करत होती, करत राहील पण ती खरी वाट बघतेय ती युगानुयुगे चाललेल्या या चिरनिद्रेतून स्त्रियांना जाग येण्याची. तसं घडेल तो सुदिन म्हणायचा जेव्हा ’नारी कोनो देश ना‌ई’ असं कडवटपणे म्हणायची पाळी कोणत्याच स्त्रीवर येणार नाही.

माझं-काफ़्काचं लायब्ररी कम्युनिक.

प्रति,
काफ़्का तामुरा
स.न.वि.वि

तर, कायेकी आज सकाळच्या लोकलने येताना ट्रेनमध्ये सॉलिड राडा राडा राडा झाला. एकदम एकमेकींच्या झिंज्या पकडून सीट्खालच्या वळचणीत लोळण घेणं, तोंडाने अर्वाच्य शिव्यांची लाखोली वगैरे. या सगळ्या कोलाहलात ती साखरांब्यासारखा आवाज असणारी अना‌ऊन्सर मा‌ईकमध्ये तोंड घालून ’अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, नेक्स्ट स्टेशन अंधेरी’ असं तीनतीनदा आग्रहाने बोलत होती, आणि या सगळ्या जगड्व्याळ (बापरे!) धकाधकीमध्ये मी तुझ्या पत्राचं उत्तर काय द्यावं याचा विचार करतेय, या अवस्थेला इंग्लिशमध्ये ’ऑब्लिव्हियस’ नावाचा सुंदर शब्द आहे. मराठीत काय असावा याचा विचार करायला हल्ली मला भीती वाटते. कारण परवाच्याच दिवशी ’टर्न ऑन’ ला मराठी पर्यायी शब्द शोधताना ’उद्दीपित करणे’ हा वाक्प्रचार मेंदूत हात-पाय हापटत आला. आता उद्दीपित हा काय शब्द आहे? उगीचच्या उगीच आपलं कायतरी.
तर,
समोरुन चाललेल्या बोरिवली स्लो मध्ये दारात उभा असलेला एक मुलगा तल्लीन होऊन गाणं ऐकतोय, त्याचं नाव कृणाल, कुशल असंच काहीतरी असावं असं उगीचच वाटलं. आणि या सगळ्यातून तुला काहीतरी नाव असण्याची आत्यंतिक गरज मला वाटली. सगळ्या गोष्टींना नावं असतात, मग तुलाच का असू नये?
मला निनावी पत्रं आवडत नाहीत.(आता पत्र हा काय शब्द आहे? अंतराळात दुर कुठेतरी टांगलेल्या झिरमिळ्या फ़डफ़डल्यासारख्या वाटतात) निनावी तर निनावी- पण तू जे काही मला लिहून पाठवलयंस, ते मला आवडलं. मला आवडत नाही पण आवडलं हा पॅराडॉक्स झाला आणि पॅराडॉक्समुळे द्सरयांना इंप्रेस करता आलं तरी आपलं आपल्यालाच  गंडायला होतं. त्यामुळे तुझं नाव सध्यापुरता काफ़्का तामुरा. काफ़्का तामुराच का? तर मी सध्या मुराकामी वाचत असल्याने नाव द्यायचं म्हटल्यावर उचकी लागल्यासारखं तेच नाव डोक्यात आलं. तशी आणखीही होती ओशिमा, नाकाता, नोबुरो वातानाबे इत्यादी... त्यापेक्षा काफ़्का तामुरा खूप चांगलंय.  तसं मला अर्ध्या रात्रीत झोपेतून उठवून कोणी माझं नाव विचारलं तर ते मला न आठवण्याचीच शक्यता जास्त. मग मला दुसरयाच्या नाव नसण्याबद्दल एव्हढी उठाठेव असण्याचं काय कारण? ह्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

तर, तुझं पत्र-


मी तुला ओळखत नाही-नसावे. तू मात्र मला अंतर्बाह्य ओळखल्याचा दावा करतोयेस. आणि असं असताना तू मला पत्र पाठवतोस, ते ही निनावी- हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. "अगं बाई! तुझ्या लिखाणाइतकी तूही आवडतेस मला" असं प्रत्यक्ष  भेटून साधंसोप्पं बोललं तर मी लगेच तू झुरळ आहेस हे सिद्ध करीन हा समज खूप हास्यास्पद आहे. आणि तेव्हढाच मला खिन्न्न करणारा. वारयाची झुळूक आल्यागेल्यासारख्या सहज, साध्यासोप्प्या गोष्टींची गंमत कधी कळणार तुला?
असो.

तर,

कुणी आपल्याला आपल्या नकळत पुस्तकात घालून पत्र द्यावं यातलं थ्रिल माझ्यालेखी कधीच संपलं.  या पत्राला उत्तर, त्याला तुझं उत्तर, मग माझं उत्तर असा न संपणारा लूप चालू करायची, आहेपण-नाहीपण चा खेळ  खेळायची तेविशी-चोविशीतली उमेद आता राहिली नाही. पण तू केलेल्या माझ्याबद्दलच्या होमवर्कचं कौतुक जरुर वाटतं. मी मागितलेलं पुस्तक माझ्यापर्यंत आणणारया माणसाला फ़ितवून तुझं पत्र त्यात टाकेपर्यंतच्या सेटींगसाठी तू जे मेहनत घेतली आहेस त्याचा विचका मी करणार नाही. वास्तविक पाहता माझे चार्म्स वापरुन माझ्या पद्धतीने काऊंटरवरच्या पोराला/पोरीला पोत्यात उतरवून तू कोण आहेस हे शोधून काढणं मला कठीण नव्हतं.  दोन मिनीटांचं काम ते. पण म्हटलं तुझ्या आनंदात आणि एक्साइटमेंटमध्ये मिठाचा खडा कशाला उगीच?  आणि तसंही त्या अजिबात खाडाखोड नसलेल्या नसलेल्या, दर २० शब्दामागे २ अशा रेशोने असलेली उदगारचिन्हे, फ़र्राटेदार ’र’चा प्रादुर्भाव असलेले, काळाच्या पडद्याआड गेलेला अल्पविराम वापरलेले ते पत्र अगदी बारकाईने वाचायची इच्छा होतीच. (तू मुळातच असा लिहीतोस की हा सतरावा कच्च्या ड्राफ़्टनंतरचा अठरावा पक्का खर्डा होता?)
हे तुलातरी माहितिये का की तू त्यात एकही प्रश्नचिन्ह वापरलेले नाहीस ते? तुझ्या कल्पनेतही तुला माझ्याबद्दल प्रश्न पडत नाहीत या गोष्टीत मला भयंकर रस वाटला.
आता विचार करते की उत्तर द्यायचं नसतं तर मी या पत्राचं काय केलं असतं? तुझं पत्र वाचलंच नसतं, तसंच चिंध्या चिंध्या करुन फ़ेकून दिलं असतं तर? किंवा सरळ लायब्ररीयनकडेच नेऊन देऊन जबरदस्त इश्श्यू केला असता तर? मला वाटतं तू या सगळ्या शक्यतांचा विचार केला असशीलच, हो नं?

मी कॉंपिटेटीव्ह एक्झाम्सची कॉंपिटेटीव्ह विद्यार्थिनी असल्याने प्रश्नाला प्रश्न पाडून उत्तर मिळवता येते या लॉजिकवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे  माझ्याकडे तुला विचारायच्या प्रश्नांची मोठी जंत्रीच आहे.

दादर स्टेशनला सकाळी ब्रिजवरुन खाली उतरताना एक आंधळा माणुस बासरी वाजवत उभा असतो, मी संध्याकाळी परततानाही असतो, पुन्हा दुसरया दिवशीही असणार आहे, त्याच्या नंतरच्या दिवशीही, मध्येच लवकर सुटून गेले तेव्हाही होता. मला जायचं असतं डाव्या बाजूला पण दादर ब्रिजवरची ती भयाण गर्दी मला नेटाने विरुद्ध दिशेला ढकलत असते- रोज. मी सुद्धा दात-ओठ खाऊन, जीव खाऊन मुसंडी मारत मला जायचंय तिथेच जाण्याचा प्रयत्न करत असते- तेही रोज. सकाळी तयारी करुन आपण दादरला जाणार आहोत म्हणजे पहिले बस पकडून स्टेशन-स्टेशन वरुन ट्रेन-ट्रेन नंतर दहा मिनीटाचा वॉक असाच क्रम असणार आहे, यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला,  हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला होपलेसपणा तुला जाणवतो का? आपण एखाद्या वेळी कुठे असणार आहोत याबद्दल आपली आपल्याला खात्री असणे, त्याबद्दलची खात्री दुसरयाने मागावी आणि ती आपल्याला देता यावी यांत कुठेतरी भयंकर मोठी चूक होतेय असं नाही वाटत तुला? आपण माणसाऐवजी झाड असलो असतो तर कसं असतं हा विचार तुझ्या डोक्यात येतो का?

तू तुझ्या पत्रात अनेक अवतरणं दिली आहेस. त्या पत्रात एकतरी विचार तुझा स्वत:चा ओरिजिनल आहे का? मी जेव्हा विचार करते (म्हणजे नॉर्मली करते त्यापेक्षा जास्त) तेव्हा मला असं आढळतं की माझे खूपसे विचार ट्रेस करत करत पाSSर मागपर्यंत नेले तर ते कुठल्या न कुठल्या ग्रेट लेखकापाशी जाऊन थांबतात. त्यामुळे माझा स्वत:चा असा विचार आहे असं वाटलं तरी तो कोणीतरी आधीच केलेला असण्याची आणि लिहून ठेवलेला असण्याची शक्यताच जास्त वाटते. त्यामुळे प्रत्येक नवं पुस्तक हातात घेतल्यावर काय वाढून ठेवलंय ही घालमेल नेहमीच असते. तू पुस्तकं कशी वाचतोस? तुझी अशी घालमेल होते का?

माझ्या माजी मित्राला ओंकारेश्वरकडे चालणारे अंत्यसंस्कार बघायचा अभद्र छंद होता. तो बाकीच्या वेळी डोक्याने तसा ठीकच असायचा (असं मला वाटायचं) पण तिथं गेलं की त्याला कसलातरी ऑरगॅस्मिक आनंद व्हायचा. त्याकाळात त्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याबरोबर चोवीस तास रहायच्या हट्टापोटी मी माझंही तिथं असणं ओघानेच. "मी ग्रेसची कविता आहे" असं वाटण्याच्या काळात मी त्या पिंडदान वगैरे रिच्युअल मधली ए टू झेड व्होकॅब आत्मसात केली. फ़ारफ़ार तर ’आवारा भंवरे जो होल्ले होल्ले गाये’ इथपर्यंतची मानसिक कुवत असताना मी कवटी वगैरे फ़ुटल्याचे आवाज ऐकले.
तर विचारायचा मुद्दा असा की तुला कसले कसले (असले-तसले?) छंद आहेत का?

तुझी कवितांची आवड लगेच दिसते. तू मला त्या पत्रात तब्बल सहा कविता लिहून पाठवल्या आहेस. माझा एक मित्र होता, फ़ार सुंदर कविता म्हणायचा. वाचून कविता कळली नाही तरी त्याने म्हटलेल्या कवितेतून अर्थ भराभरा सुटत गेलेला जाणवायचा. माहित असलेली कविताही नव्याने ऐकतोय असा आविर्भाव करत त्याला म्हणायला लावावी आणि आपण ऐकावी यांत वेगळीच मजा होती. पण गेला तो.
तुला कविता म्हणता येतात का? येत असतील तर आपली बरयापैकी मैत्री जमण्याची सॉलिड शक्यता आहे.

तू तुझ्या पत्रात केलेल्या माझ्याबद्दलच्या विधानांबद्दल, तुझ्या माझ्याबद्दलच्या समजुतींबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, ते समज चुकीचे असतील तरी ते दूर करायच्या भानगडीत मी पडणार नाही, ते तुझं तूच करायचं  आहेस पण मला प्रिय असणारया गोष्टींबद्दल मात्र तुझी फ़ार फ़ार गल्लत झालिये. तू म्हणतो आहेस ते लेखन, संगीत या गोष्टी फ़ार सुपरफ़िशियल आहेत रे! मला या सर्वाहून प्रिय आहे ते ’स्वातंत्र्य’.कुणालाही बांधील नसण्याचं स्वातंत्र्य, कुणालाही कसलीही उत्तरं न देता नवीन नाती तयार करायचं स्वातंत्र्य,  कुणालाही मनाविरुद्ध उत्तरं न देण्याचं स्वातंत्र्य, मला हवी ती गोष्ट माझ्या पद्धतीने करायचं स्वातंत्र्य, सकाळी उठून कोणालाही काही न सांगता कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य हवंय मला. त्यामुळे ह्या पत्रातून मैत्री आणि त्या मैत्रीची परिणिती पुढे कशाततरी होण्याच्या अल्टीमेट पुरुषी फ़ॅंटसीमध्ये गुंतून पडला असशील तर तू आताच बाहेर यावं हे उत्तम. दुसरयाचं स्वातंत्र्य जपणारी मैत्री झेपेल का तुला?

तू तुझ्या पत्रात तुझ्याबद्दल  न लिहीता माझ्याबद्दलच लिहीलेयेस आणि मीसुद्धा माझ्याबद्दलच जास्त बोलतेय. पण त्याला इलाज नाही. कारण तू डावीकडे झुकणारं सरळ रेषेतलं लिहीतोस, शाई ब्लॉट झालिये ती ओळ सोडून दुसरया ओळीत लिहायला सुरुवात करतोस, प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर गिरवतोस-पुढं काय लिहावं या विचारात कदाचित, या छोट्याछोट्या गोष्टींखेरीज तू जाड आहेस, बुटका आहेस, तुझे दात सरळ रेषेत आहेत का, तुला मिशी आहे का, तुझ्या डोक्यावर वेडेवाकडे केस आहेत की साधा भांगच पाडतोस? यातलं काSSहीही मला माहित नाही.  तुझ्या पत्रातून तुझे लुक्स वजा जाता तुझा थोडाफ़ार ’इसेन्स’ आलाय माझ्याकडे पण त्या मुदलावर मी काय काय लिहीणार आणि किती पाणी घालून वाढवणार? नाही का?

माझ्या अतिविचार करण्याच्या सवयीपायी ह्या घटनेमधला कार्यकारणभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करते पण  दोन माणसं समहाऊ एकमेकाला भेटतात, एकत्र बांधली जातात याची स्पष्टीकरणं कुठे असतात? सगळ्या गोष्टीत कारणं शोधण्याचा अट्टाहास करता येणार नाही ही समजूत कधीचीच खूप खोलवरुन पटलेली आहे.  नातं खूप वेळ टिकवून धरलं पक्कं आणि खरं -असं नसतं हे मला एव्हाना कळलंय, तुला कळलं असावं अशी फ़क्त आशाच करु शकते. त्यामुळेच कदाचित या पत्रानंतर आपला काहीही पत्रव्यवहार होणार नाही, कदाचित होईलही, कदाचित एक पत्र पुरे होईल या सर्व शक्यतांना माझ्यालेखी जागा आहे-असू द्यावी. पण मुळात हे पत्र मी पुस्तकाच्या गठ्ठ्यातल्या कुठल्यातरी एका पुस्तकात सरकवून दिलंय, ते पुस्तक पाहण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे तुला ते मिळालं का? वाचलंस का? वाचलं तर तू लगेच उत्तर लिहायला बसलास का? हेच माहीत नसल्याने मी हे सगळं लिहीलं काय न लिहीलं काय, तू वाचलं काय, न वाचलं काय- काय फ़रक पडतो? फ़रक पडत नसेल तर मी लिहीतेच का? असो, मी तुला फ़ार्फ़ारतर पंधरा प्रश्न विचारणार होते, ते लिमिट संपलं. तेव्हा टाटा.

कळावे,
आमेली पूलाश, हॉली गोलाइटली किंवा क्लेमेंटाईन क्रझिन्स्की यापैकी कुणीही
ह्याच का? याबद्दलही नंतर कधीतरी.

ऑब्लिव्हिएट!


थोरो ’वॉल्डन’ मध्ये म्हणतो- "To be awake is to be alive"
अशक्यप्राय गोष्टींचे नेहमीच सुविचार बनतात.
कंप्युटरसमोर बसून कीबोर्ड बडवू शकणे हे ’जागं’ असण्याचं लक्षण मानलं तर म्या ’जित्ती’ हाय.
जिवंत आहेच तर-जनरली या वेळेला वेगवेगळ्या टेक्स्चरचे ,या कानशिलापासून ते त्या कानशिलापर्यंत सर्दीसारखे गच्च बसलेले  विचार, जे क्रॉनिक खोकल्याची उबळ ये‌ऊन ढास लागावी तसे येत राहतात-लिहून काढूयात.
बेटर आ‌ऊट दॅन इन
--

अकरावीला रुपारेल ला प्रवेश घेतल्यावर आपसूक्च घेतला गेलेला निर्णय "आता इंग्लिश वाचलं पाहिजे."
तेव्हा  ’ हॅरी पॉटर ऍड फ़िलॉसॉफ़र्स स्टोन ’ आणि ’ कंपनी ऑफ़ वुमन ’ एकत्रच वाचलेलं.
रोलिंग आज्जी आणि सिंग आज्जोबा यांनी मला व्यवस्थित ’अपग्रेड’ केलेलं- रोलिंग आज्जींनी व्होकॅब मध्ये आणि खुशवंत आजोनांनी -यू नो..
नो गैरसमज- ते पण भयंकर इन्फ़र्मेटीव्ह पुस्तक आहे-जरुर वाचा.

तर -
एच.पी मधले काही काही चार्म्स मला खूप आवड्तात, मला ते वापरायला मिळाले असते तर काय बहार आली असती असं मला वाटत राहते ते चार्म्स म्हणजे- "सायलेन्शियो!" आणि "’ऑब्लिव्हि‌एट!"
पहिला दुसरयाला गप्प करतो आणि दुसरा दुसरयांच्या आठवणी खोडून टाकतो.

या दुसरयाबद्दल मला नेहमी प्रश्न पडायचा-म्हणजे हा नक्की काय करतो?

नोटपॅड मध्ये एखादा ड्राफ़्ट लिहावा आणि तो ’सिलेक्ट ऑल’ करुन डीलीट ’करुन टाकावा तसा आपल्या डोक्यातला आतापर्यंत साठवलेला डेटा खोडून टाकला जातो की रेट्रोस्पेक्टीव्ह इफ़ेक्ट सारखं काहीतरी?-ह्या पॉ‌ईंटपर्यंत विसरला की भोज्जा! बस्स.

आता माझ्यावर कोणी ऑब्लिव्हि‌एट चार्म वापरला तर नेमकं कुठल्या पॉ‌ईंट पर्यंत काय विसरेन?
गिल्डेरॉय लॉकहार्टसारखं भीषण स्पेल डॅमेज हो‌ऊन सगळंच विसरले आणि माझा मेंदू सोमवती अमावस्येच्या रात्रीसारखा पिच ब्लॅक झालाच तर मग सवयींचं काय?
चालण्याची,बोलण्याची सवय, शब्द जोडून अर्थपूर्ण वाक्यं तयार करण्याची पद्धत; ’प्रोसेस’-यांचंही रेकॉर्डींग मेंदूतच असतं नं?-पर्यायाने आठवणींमध्ये.
त्या सवयी पण नाहीशा होतील की कसं?
पिक्चरमध्ये वगैरे हिरॉ‌ईन् डोक्याची पट्टी चाचपून् "मै कहा हू?" म्हणते तेव्हा ते ’नेमकं’ किती-काय् काय्-कुठपर्यंत् विसरलेली असते?

मी आजही झाडून सगळ्या ब्रेक अप्सच्या पुण्यतिथ्या आठवून आठवून साजरया करते, त्या-त्या मुलाला आवडत नव्हत्या त्या गोष्टी दिवसभर करत बसते, उदा.- सुरणाची भाजी खाते, अर्ध्या बाह्यांचे वेडपट बनियन घालणारया मुलाबरोबर फ़िरायला जाते, रिक्षावाल्याने हूल दिली की कचकावून एक शिवी हाणते, यादी मोठी आहे.
एकाचा चेहरा आता तर मला आठवत सुद्धा नाही पण तो टपरीवर सुद्धा खाण्याच्या आधी बुफ़िनचा सोप पेपर वापरायचा तो ही फ़क्त लेमन फ़्लेवरचा हे लख्ख आठवतं.
इतकी वर्षं झाली तरी त्यांच्या आवडीनिवडी, सवयी माझ्या व्यवस्थित लक्षात आहेत.
हे कसं लक्षात राहतं?-त्याने आता तेव्हा पडायचा तसा फ़रक पडत नसला तरी?
माझा मेंदू बहुधा रोम आहे - ’रिरेमेंबर ऑल’ ला सेट केलेला आणि
पोरांचा बहुधा रॅम असावा-मोस्ट व्होलेटा‌ईल  मेमरी.
असो, तो माझा पॉ‌ईंट नाही.
सांगायचा आणि माझ्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असा की-

आज आत्ता माझ्यावर ’ऑब्लिव्हि‌एट’ वापरला तर मग-
वरील सगळ्या गोष्टी-टाका‌ऊ इन्क्लूडेड-फ़ारसा प्रयत्न न करताही लक्षात राहण्याची सवय-
आजही कच्चकन ब्रेक दाबला की मी जीभ चावून सॉरी म्हणते-पर्टीक्युलरली कुणालाच नाही-पण म्हणते-
जीन्स, मोजे घालताना पहिले डाव्या पायातून घालते-उगाचच बनवलेली सवय-
गुलाबी रंग मला बिलकुल आवडत नाही-
पुस्तकांची पान दुमडून ठेवणारया लोकांचा भयंकर संताप येतो-
जेवण संपल्यावर मी ताटात गिरवत बसून राहते-
मला कॉफ़ीचा मग दोन्ही हातात घे‌ऊन पिण्याची सवय आहे, चहाचा कप मात्र एकाच हातात-
ट्रेममध्ये झोपेतून अचानक जाग आली तर "पुढलं स्टेशन कुठलं असावं बरं?" चा अंदाज लावायला आवडतो-
मी हे सगळं ऍबसोल्युटली विसरेन?
आजच्या घडीला ’नो’ मोड वर सेट असणारया गोष्टी ’येस’ ला रिसेट होतील?
की नाही?  मुळातूनच अशी ’आहेच’ म्हणून?

विस्मरणात जाणारया जगाला विसरता येणं शक्य आहे?

शिट!
माझ्या मेंदूतल्या हे असले काहीतरी विचार करणारया पेशीवर पुढे मागे संशोधन हो‌ईल का?
असो,
Signing Off!
Peace.

माय फ़ेव्हरीट पुतना ऑंटी.!


दिवसभरातल्या अनेक घटनांमधून एक कथा जन्म घेत असते. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडते, माणसाकडे आपण सूक्ष्मदर्शकातून पाहावं तसं पाहायला लागतो ,त्याचे कंगोरे आपणांस उकलू लागतात. वरवर पाहायला जरी सर्व व्यक्ती सुट्यासुट्या असल्या तरी त्यांची-आपली वीण आत कुठेतरी घटट विणली गेलीये, अदृश्याचा हा धागा आपल्याला उकलून घ्यायचाय पण तो कसा? कुठून? कुठवर? ह्याचा विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात चालू असतो. या दृश्य-अदृश्यातच कथांची बीजं लपलेली असतात. पण कथानिर्मितीस एव्हढं पूरक हो‌ऊ शकतं? पारंपारीक कथेत किमान दोन तीन प्रसंग असावे लागतात, ते काही अंतराने घडावे लागतात, त्यात कार्यकारणभाव असावा लागतो, पण सतीश तांब्यांच्या कथा हा समज खोटा ठरवतात.

’माझी लाडकी पुतना मावशी’ मधली प्रत्येक कथा कथेच्या पारंपारिक साच्याला छेद देत जाते. यातली कथा घटनाप्रधान रंजन आणि कृत्रिम उद्दीष्टवादापेक्षा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक अंतर्मुख होत जाणारी आहे. ह्या कथा आपल्याला भिडतात कारण त्या शोकात्म असतात किंवा त्यातल्या नाट्यपूर्ण घटनांनी नपेक्शित वळण घेतलं म्हणून नव्हे तर त्यातली पात्रं म्हणजे मी-तुम्ही-आपण सगळे असतो. ती पात्रं कधीकाळी आपणच बोललेली वाक्यं, आपणच सांगीतलेली फ़िलॉसॉफ़ी सांगत असतात. सतीश तांबे आपल्याला व्यक्तिश: ओळखत होते की काय असं वाटावं इतपत ती कथा आपल्यावर बेतल्याचं सतत जाणवत राहतं. ’राज्य राणीचं होतं’ या त्यांच्या पहिल्यावाहिल्या पुस्तकातल्या सर्जनशील लिखाणानंतर या दुसरया पुस्तकाबद्दलच्या अपेक्षा साहजिकच उंचावतात. ’न निखळ कल्पना, न निव्वळ वास्तव तर संकल्पना असते ज्यात तेच ठरु शकतं अभिजात’ या लाडक्या धारणेतून लिहीणारया या लेखकाच्या कथा मुळीसुद्धा भ्रमनिरास करत नाहीत.

काही घट्ना आठवणींच्या ड्रॉवरमध्ये पार आतल्या कप्प्यात लपवुन ठेवलेल्या असतात. कधीकधी वाटू नये त्या गोष्टींबद्दल ओढ वाटते, का वाटते हे  विचारल्यावर समाधानकारक सुसंगत उत्तर देता येत नाही, जगाच्या दृष्टीने दळभद्री त्याबद्दल तीव्र उत्सुकता वा्टते, आयुष्यातल्या रहस्यमय गोष्टींशी त्या त्या गोष्टींचं अनाकलनीय नातं जाणवायला लागतं अशा मनोवस्थेमधल्या ’खुनाच्या हद्दपारीची शिक्षा’, ’देव-दानवे नरा’ या कथा. आपल्या हातुन घडू नये ते घडवण्याची अमर्याद ताकद बाळगणारया आपल्यामधल्या अनिर्बंध ’त्या’ला प्रचंड वचकून असणारा समीर असो किंवा ’अ डे विल कम , डेविल विल विन, ईविल विल विन’ हा मंत्र अथक पुटपुटणारा नंदन असो, काहीशी भयाण, काहीशी विनोदी असंबंद्धता हाच जीवनाचा खरा पाया आहे ह्याची जाणीव या कथा वाचताना पदोपदी होते. समीरबद्दल लिहीताना तांबे एका ठिकाणी लिहीतात,
"चुटपूट लागल्यावर त्याला समांतरपणे असं आठवायचं की , बरयाचदा उंच ठिकाणी गेल्यावर वा चालत्या वाहनातून उडी टाकू की काय, अशी जी धाकधूक वाटते त्यातलाच हा प्रकार आहे"
अर्थ-निरर्थकाची अशी कितीतरी भेंडोळी आपल्याही डोक्यात पडून असतात पण त्यावर आपण कधी नीट विचार करत नाही. आपण फ़क्त उत्तरं मिळवायची धडपड करतो पण मुळात प्रश्न काय याचा सखोल विचार आपल्याकडून होत नाही. फ़क्त उत्तरंच कठिण असतात असं नव्हे तर कधीकधी प्रश्नसुद्धा कठिण असतात, समीर, उदय, नंदनला पडणारया-तांब्यांनी शब्दात नेमक्या मांडलेल्या प्रश्नांसारखे.

षांताराम पवारांची भडक गुलाबी-पिवळ्या  रंगातली जी पुतना मावशी मुखपृष्ठावर विराजमान झालिये त्या वच्छीमावशीची ’माझी लाडकी पुतना मावशी’ ही शीर्षक कथा. ’लैंगिकता’ या विषयाकडे बघायची आपली दृष्टी किती साफ़ आणि सहज आहे यावर ही कथा तसेच ’थेंब थेंब तळं-थेंबे थेंबे गळं’ तसेच ’खुदको खुद..खुदही!’ या कथा वाचक किती समजूतदार पणे घेतोय हे ठरेल. ’लैंगिकता’ ही मानवाची अनघड अशी आदिम प्रेरणा आहे, भल्याभल्यांना चकवणारी.लेखकाने आपल्या कथांमधून लैंगिक उर्मी आणि व्यवहार यांच्या विविध रुपांचा शोध घेतलाय. जिथे प्रत्यक्षपणे हा विषय नाही तिथेही तो अपरिहार्यपणे डोकावतोच आहे. तांब्यांच्या कथेत स्त्री-पुरुष संबंधाविषयीचे विषय व्यापून राहिले आहेत पण, त्यातही पुरुषमनाचा मागोवा त्यांनी समर्थपणे घेतला आहे. हे करताना परंपरागत कुटुंबव्यवस्थेची, स्त्री-पुरुष संबंधांची अंधारी दारं थोडीफ़ार का हो‌ईना किलकिली केली आहेत. बेरकी पुतना मावशीसुद्धा आपल्या व्यावहारीक शहाणपणात कणभर का हो‌ईना सरतेशेवटी भर घालून जातेच.

’सी-सॉ’ ,’देव-दानवे नरा’ , ’झेपेना मज अढी, वैर कुठे’ ह्या श्याम मनोहरांच्या कथांच्या शीर्षकांची आठवण करुन देणारया कथा -
एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी, साध्यासुध्या जगण्याची ’गुरुविण कोण’-
आपल्या सभोवतालचं जग स्थायी असतं, आपण बदलत जातो. लहानपणी पाह्यलेली एखादी गोष्ट मोठेपणी आपल्याला वेगळी भासते. ती वस्तू बदललेली असते का? तर नाही. आपण बदललेलो असतो. पण आपल्यात नेमकं बदलतं तरी काय,या बदलण्याचा वेध घेणारी ’होवो होवो सृष्टी दृष्टी‌आड’ -.
कधीकधी  घटना एकदम साधी असते पण तिच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पदरांचं जंजाळ असतं. त्या बारीक-बारीक तपशिलांमधून कथा आकाराला येते याचे उदाहरण असलेली ’बापूंच्या खुर्चीची गोष्ट’..
कोणतीही कथा असो, संस्कृती, सभ्यता यांचे मुळातले अर्थ तपासून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे.प्रत्येक गोष्टीबद्दलचा उलटसुलट विचार झाला आहे. उल्टाच्या उल्टा विचार म्हणजे सुलटा नसलेला विचारही मग ओघाने येतोच. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रातली दांभिकता, खोटेपणा तसेच कचखा‌ऊपणे भव्यदिव्य किंवा खरं श्रेष्ठ आहे ते नाकारतच आपण कसं जगतो याचं हे जबरदस्त चित्रण या कथांमध्ये झालेलं आहे.

अमर्याद प्रश्नांची तेव्हढीच अमर्याद उत्तरं वाचताना, व्यक्तिगत आणि समूहजाणिवांचा गुंता सोडवताना, त्यावर मनातल्या मनात बोलताना मनावर हलकासा  झाकोळ येतो न येतो तोच येते ’लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’ही कथा आणि मग तांब्यांची कथा तिची स्थिरवृत्ती सोडून गतिमान होते.प्रकटीकरणाच्या उपरोधात्मक आणि तिरकस शैलीतुन कथा मजेदार उलगडत जाते.कथेचा उगम कसा होत असावा हे शोधू पाहणारया आणि त्यासाठी तिला नियंत्रितपणे ’घडवू’ पाहणारया लेखकाची आणि गणपा न्हाव्याची कथा प्रत्येकाने वाचावी, खुसखुसावं, लेखकाला दाद द्यावी आणि ताजतवानं हो‌ऊन पुढच्या कथेच्या जगात जगायला निघून जावं.

तांब्यांच्या कथेचं वैशिष्ट्य असे की ते समकालीन जगण्याबद्दल लिहीतात, त्या जगण्याचा एक भाग हो‌ऊन लिहीतात. कथेची भाषा या जगण्याच्या रितीचाच एक भाग आहे आणि म्हणूनच ती चोख , रोकडी आहे. ती काही झाकत नाही, सुशोभितही करत नाही. प्रत्येक कथा काहीतरी निराळा विचार सांगते, समाज, परंपरा यावर भाष्य करणाया कथा असल्या तरी त्यांचा स्वर टिपेचा नाही, शांत आहे.
आयुष्यात वाच्यता करता न येणारया बरयाच घटना असतात, खुद्द आपल्या व्यक्तिमत्वाला काळी, करडी किनार असते पण त्या काळोख्या कोपरयांना आपण चुटपुटत्या भावनेनंच, क्वचित गंड मनात घे‌ऊनच बघतो. पण आयुष्यातल्या डार्क प्रॉब्लेम्सना डार्क व्हिजननेच भिडावं असं काही नसतं. तांबे आपल्या कथेतुन सर्वप्रथम तो अंधार काय आहे ते सांगतात आणि मग खुबीने त्या अंधारातून त्यांनी शोधलेला-तात्पुता/कायमचा मा्र्ग सांगतात.

सर्वसाधारण कथा वाचताना तेच तेच अतिपरिचयाचे आयुष्य, त्याचत्याच नाट्यमय घटना, तीच ती तकलादू पात्रं यांतून ती कथा पूर्वी वाचलेली वाटावी इतकी ओळखीची वाटायला लागते, मग त्या कथेतून आपल्याही नकळत आपण मनाने बाहेर पडतो.
पण या सगळ्या ’जगण्या’बद्दलच्या गोष्टी आहेत. जगण्याविषयीचे अ-चाकोरीतले अनुभव सांगणारया या कथा अतिपरिचयाच्या शिळ्या कथांसारख्या ठोकळेबाज नाहीत. या संपतात तिथून चालूच राहणार आहेत कारण जगण्याला कसला आलाय आरंभ- शेवट? कुठल्यातरी बिंदूपासून सुरु व्हाव्या तशा त्या सुरु होतात आणि कुठेतरी संपतात. मुद्दामून केलेली वातावरणनिर्मिती नाही, कोणतीही डूब द्यायचा प्रयत्न नाही, आणि सर्वात महत्वाचं कुठलाही अभिनिवेश नाही. ह्या कथा घटनांमधून नाही तर घटनांमधल्या संकल्पनांमधून, पात्रांमधून उलगडत जातात. आणि म्हणूनच आपण या कथांमध्ये हरवून जातो आणि त्या संपतात तेव्हाच सापडतो.

जगताना बहुसंख्यांना काळाचं जाणीव तर असते पण क्वचितच कोणाला क्षणाचं भान असतं. या कथांमध्ये ते भान जपलेलं पदोपदी जाणवतं. जगण्याच्या रेट्यातही लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधत-शोधत जाणारया कथा वाचायच्या असतील तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असा हा कथासंग्रह- ’माझी लाडकी पुतना मावशी’.

बॉं व्होयाज

आजचा दिवस रोजच्यासारखाच होता.

दिशाही त्याच होत्या.
सूर्य चुकून पूर्वेला उगवलाय असं नव्हतं.
माझी उंची गेल्या दिवसा-आठवड्या-महिन्या-वर्षाइतकीच म्हणजे पाच फ़ूट दोनशे एकूणऐंशी इंचच होती.
कशातही काहीही फ़रक नव्हता.
एकाच मिश्रणातून सारख्या वड्या पाडाव्यात तसा आजचा दिवसही तोचतोचतो, अगदी तस्साच होता.

सकाळच्याच लोकलची जुळी बहिण हलतडुलत दादर स्टेशनवर थांबायच्या आधीच दहा सेकंद आधी उडी मारुन इथं जाऊ का तिथं आणि इथं बसू का तिथं चं इन्जिनीयस डिसीजन मेकींग आटपलं. तेवढ्यात बाहेरच्या वेगवेगळ्या आकाराच्या, वजनाच्या, वासांच्या बायांचा लोंढा अंगावर चाल करुन आलाच.
आज मी शिताफ़ीने त्या लाटण्याच्या साईझच्या गुजराथीणीला टाळलंय.
’कुछ कुछ होता है’ मध्ये साना साईद गेली होती तशीच ही काल बंदुकीच्या गोळीसारखी  भक्ककन  डोक्यात गेली होती. पार कान किटेस्तो मला चावत बसली होती.
वाईट नव्हती ती पण दुसरया दिवशी माझ्याबरोबर हसली असती,
मग तिसरया दिवशी तिने माझ्याकरता जागा वगैरे पकडून ठेवली असती
आणि नंतर नंतर तिच्या घरी ढोकळा, उंधियो खायला बोलावलं असतं...
काल गाडीतून उतरताना एवढ्या शक्यता डोळ्यासमोर आल्या की मला क्षणभर भीतीच वाटली.
आपण एखाद्या वेळी नेमकं कुठे असणार आहोत हे कोणी गृहीत धरुन चालावं म्हणजे भयंकरच नाही का?

आज माझ्या आजूबाजूला परिचायचीच मंडळी आहेत.
कुरकुरीत क्रॅक्जॅकसारखी कांजीवरम, तिच्या बाजूची ग्रे रंगाची अत्यंत स्फ़ोटक वस्तू, माझ्या सीटवरची कायम आतून थंड असणारया पण बाहेरुन  घाम येणारया बाटल्यांमधली पेयं पिणारी पोरगी, पलीकडच्या विंडो सीटवरची बाई ;जी मला पहिल्यापासून निळ्या रंगाची वाटते-निळा म्हणजे  काटेभवरीच्या फ़ुलासारखा निळा, कुठलं गाणं ते- ’निले निले अंबर पर’ मधला निळा..आणि माझ्याकडचे निळे अचानक संपलेत.
तर इत्यादी मंडळी.

ट्रेनमध्ये प्रत्येक जण आपल्याचकडे चोरून बघतोय  असं चमत्कारीक फ़िलींग येतं.
आणि हे माझ्यासकट सगळ्यांनाच वाटत असल्यामुळे जो पहावा तो आपला एकमेकांची नजर चुकवत बसलेला नाहीतर गळे, खांदे चाचपत बसलेला असतो.
कधीकधी कोणातरी वाटतं ओळखीचं पण आतमध्ये जाम काही हलत नही.
आताही माझ्या डाव्या खांद्यापासून पंचेचाळीस अंशातली मुलगी माझ्याकडे गेली दहा मिनीटं बघतेय हे मला तिच्याकडे न बघता जाणवतंय. हे वरच्या बघण्यातलं बघणं नाही तर ऍक्चुअल ’बघणं’.
मी तिला ओळखत नाही म्हणजे ऍटलीस्ट मला तरी असं वाटतंय.
ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल?
ती गाणी ऐकतेय..कुठलं?
कुठलं गाणं ऐकताना ती आपल्याबद्दल विचार करतेय याबद्दल मला जबर कुतूहल वाटलं.
आपल्या मनात चाललेले विचार म्हणजे आपण असू तर दुसरयाच्या मनात आपल्याविषयी येणारे विचार म्हणजे सुद्धा आपणच का?

मला व्यक्तिश: विंडो सीट आवडते. ट्रेनच्या सुसाट वेगात पुढे जाताना खिडकीत बसलेल्या आपल्या सावलीचा ठसा मागे पडणारया प्रत्येक जागी उमटलेला आहे ही जाणीव मला वसई-दादर परिसरात ओम्निप्रेझेंट असल्याचा फ़ील देते.माझी सावली हे स्वत:ला सावली नसलेलं आक्रित असल्याने तिला (म्हणजे माझ्या सावलीला!) काय वाटत असेल याची मला कल्पना नाही.

कधीतरी माझ्या सीटच्या आजूबाजूला चिल्लीपिल्ली असतात, त्यातली काही एखाददुसरे दात विचकत तोंडभरुन हसत असतात, उरलेली कसल्यातरी अनामिक आनंदाने असह्य थयथयत असतात. त्यांच्याशी "इची पिची पिची पू" असं बरंच काही बोलणं अपेक्षित असतं पण मी काही बोललेच आणि ते पोरगं चेकाळून विंडो सीटवर हक्क सांगायला लागलं तर काय घ्या! असा विचार करुन मी खिडकीपासून जाम हलत नाही. विंडो सीट साठी या पोरांची चेहरयावरचं कान ते कान टांगलेलं हसू आपल्या थोबाडावर भिरकावण्याची ट्रीक तर फ़ार जुनी. पण मी ही या खेळातली मुरलेली गडी असल्याने ’हल्ल! च्यक! करत पेंढा भरलेल्या पॅंडासारखी आपली बसूनच राहते.

माझ्यासाठी संपूर्ण निरुपयोगी असलेल्या अंगठ्या, कानातली विकायला आलेली आपल्या प्रत्येकासाठी वेगळ्या असलेल्या आवाजात खेकसतेय. माझ्यासमोरची हातावर ’भागवान’ गोंदवलेली बाई हातातली गवार कात्रीने कराकरा कापतेय. मी प्रचंड हाय मेंटेनंस आणि कंट्रोल फ़्रीक मुलगी असल्याने माझं तिथे बरोब्बर लक्ष जातं कारण ती ते चुकीच्या पद्धतीने करतेय.
आज गवार काय? काल हिच्याकडे फ़्लॉवर होता,
परवा  हिने पालकच्या अख्ख्या जुडीची मुंडी मुरगळली होती
आणि त्याच्याही आदल्या दिवशी मला वाटते फ़्लॉवरच होता. नाही, बहुधा लाल माठ- नाही, बरोबर, फ़्लॉवरच होता, तिच्याशेजारी बसणारया समस्त भारतीय नारीधर्माचा अर्क असणारया बाईने तिला फ़्लॉवरवर मौलिक टिप्स दिल्या होत्या-आता आठवलं..
गेल्या महिन्याभराच्या प्रवासाच्या डिटेल्समध्ये एव्हढाच काय तो भाजीपाल्याएव्हढा फ़रक!

पण मला त्याचं एव्हढं काही वाटत नाही कारण-
विकलांगच्या आणि आमच्या डब्ब्यामध्ये फ़क्त काही बार्सचा अडसर आहे. तिथे एक छानदार हसू असलेला आणि रंगबिरंगी बुब्बुळं असलेला मुलगा रोज माझ्या गाडीला असतो.  त्याचं एक बुब्बुळ काळं तर दुसरं कोणीतरी जपून मधाचा थेंब डोळ्यात सोडावा तसं आहे. त्याला ’हेट्रोक्रोमिया’ म्हणतात जे मला नंतर गुगलल्यावर कळलं.
अलेक्झांडरचीही (द ग्रेट वाला) बुब्बुळं अशीच रंगीबिरंगी होती म्हणून त्याला ’डिकॉरस’ म्हणायचे-दोन बुब्बुळंवाला. म्हणून याला मी ’D’ नाव दिलंय.
हा विकलांगमध्ये का प्रवास करत असावा? याबद्दलच्या न संपणारया कुतूहलात मी तब्बल आठवडाभर बुडालेले. बघावं तेव्हा  मी आपली सतत त्याला नजरेने चाचपत असलेली, चालतोय तर मस्त, कुठे प्लॅस्टर वगैरे पण नाही- मग?
मग नंतर कधीतरी त्याच्यावर डोकं शिणवणं बंद केलं. मात्र त्याचा आवाज कसा असेल याबद्दल मात्र मी मनातल्या मनात वेगवेगळ्या ऑडियो फ़ाईल्स तयार के्ल्या होत्या.
मला हे पुरुषांच्या आवाजाचं फ़ार आहे.
व्यक्तीचं नाव सर्वात पहिल्यांदा आपल्या मनात त्याचा आवाज उमटवतं आणि त्यामुळेच त्याच्याशी दुसरं कुठलं नातं जुळो न जुळो-आवाजाचं नक्कीच जुळतं ह्यावर माझी अतोनात श्रद्धा आहे.
’D'ला खर्ज सुट होईल असं मला मनोमन वाटत होतं पण त्याचा आवाज बॉयिश असला तरी माझं काही म्हणणं नव्हतं (काय म्हणणं असणार? मूर्ख कुठली!)
तर असं.
अशी अर्थपूर्ण-निरर्थक विचारांची भेंडोळी उलगडत माझा प्रवास चालतो.

रोजच्या प्रवासात आताशी विचारांचे पॅटर्नसु्द्धा ठरुनच गेलेत.
विचारांमध्ये वेळ मात्र  बरा जातो पण त्या विचारांची आकसत आकसत जरदाळूच्या टणक बी सारखं होण्याची आणि मग प्रवासभर खडखडत बसण्याची क्रियाही तेव्हढीच सेल्फ़-टॉर्चरिंग.
कुठल्या ठिकाणी बसल्यावर कुणाचे विचार किती एक्स्टेंट पर्यंत यावेत हे ही मग ठरल्यासारखं होऊन गेलंय.
दारात उभं राहिलं की मला ’थोरो’ आठवतो, दुर्गाबाई आठवतात, ’वाल्डन’ आठवतं, त्यात म्हटलेलं , "To be awake is to alive" आठवतं.
 मी ’सॉर्ट ऑफ़ अलाईव्ह’ आहे,
आणि त्याची फ़ळं एखाद्या मुक्या मारासारखे मला मुकाट्याने सहन करणारे मित्रमैत्रिणी भोगतायेत.
लांबलचक पसरलेल्या रुळांमध्ये उगाचच मग आतापर्यंत जगलेलं आणि जगून घ्यायचं राहिलेलं आयुष्य दिसत राहतं.
दारात नसलो तर मात्र हे करताना आभाळाचा एक तुकडा, निदान चिंधी तरी दिसत रहावी अशा रितीने बसायचं म्हणजे आपण कधीतरी इथून बाहेर पडणार आहोत ह्या आशेत धुगधुगी राहते. असं झालं नाहीच तर ट्रॅप झाल्यासारखं वाटतं, इथून कधीच सुटका नाही आपली असं येडटाक डिप्रेशन येतं

शरीरात वाढत असलेल्या किडनीस्टोनसारखं हे रुटीन आपल्या शरीरात निरुपद्रवी वाढत राहतं, आपली मुळं पसरत राहतं, मुरतं, भिनत राहतं. कानातली गाणी, हातातली पुस्तकं आणि डायरीतल्या नोंदी दिवसेगणिक अधिकाधिक ट्रॅजिक होत जातात.

आजही सगळं नेहमीसारखंच, नेहमीच्या लयीत घडत होतं. डब्बा प्रत्येक स्टेशनावर गळत होता, रिफ़ील होत होता तेवढ्यात अंधेरी स्टेशन आलं. कितीतरी माणसं प्लॅटफ़ॉर्मवर सांडली, त्याच्या कितीतरी पटीत स्पंजने पाणी शोषावं तशी शोषली गेली आणि तेवढ्यात-
प्लॅटफ़ॉर्मवरच्या गर्दीला त्रासल्यासारखं राजहंसी रंगाचं एक फ़ुलपाखरु डब्यात शिरलं, थकलेल्या, कावलेल्या एकमेकींमध्ये खोचलेल्या बायांवरुन आपल्या विलंबीत लयीत लहरत लहरत माझ्या दिशेने आलं  आणि आपल्या पंखांची सावकाssश उघडमिट करत हॅंडलबारवर विसावलं आणि त्या बारवरच उगवून आलं असावं इतकं नैसर्गिक वाटायला लागलं.आणि असल्या जीवघेण्या गर्दीतल्या त्याच्या या स्टंटबाजीमुळे चरकलेल्या माझा आतापर्यंत रोखून धरलेला श्वास फ़ुस्सकन सुटला.
फ़ुलपाखरांमधलं नर-मादी काही नाही ओळखता येत मला पण मी त्याला बघितल्या बघितल्या त्याचं नाव ठरवलं-बबष्का.
रशियन मध्ये बबष्का म्हणजे लिटील सोल-चिमणा जीव
सावलीचं लोढणं नाही म्हणूनच तर फ़ुलपाखरांना हे असं तरंगता येत असावं का? असावं. कारण आयुष्यभर  माणसांना जमिनीशी जखडून ठेवणारया कोण? तर या आकार उकार बदलून पाळतीवर असणारया, सतत पायात घोटाळणारया सावल्याच.
मी त्याला म्हटलं,
"अरे बबष्का, तुझ्या पलीकडच्या त्या ’D'ला कुणाला तरी हाक मारायला सांग ना, त्याचा आवाज ऐकायचाय"
बबष्काने आपले डोळ्याच्याही पुढे येणारे लंबुळके ऍंटेने मजेदार हलवले आणि म्हटले,
"मी त्याच्या नाकावर जाऊन बसू का? तो कोकलेल कितीतरी मस्त"
मी प्रचंड टरकले, बबष्का भलतंच अग्रेसिव्ह होतं. मी घाईघाई म्हटलं
"नाही नाही, फ़क्त हाक मारायला सांग-तेव्हढं पुरेय"
त्याने त्याच्या त्या ऍंटेना वरखाली केल्या, त्याचा अर्थ मी ’हो’ किंवा’ बघतो’ असा घेतला.
मला त्या लोभस फ़ुलपाखराशी वरीलप्रमाणे संवाद व्हावासा वाटला, माझ्या मनात तो प्रसंग घडलाही पण-फ़ुलपाखराला तर बोलता येत नाही. बबष्काला येतं-पण फ़क्त माझ्या मनात.
नाही तर नाही ,उलट त्यामुळे त्याच्याजवळ बोललेलं माझं हे सीक्रेट सुरक्षित राहील कारण त्याला ते कोणाला बोलून दाखवता येणारच नाही. मला खजिल होऊनही बरं वाटलं.
अचानक गाडीला जोरात गचका बसला आणि सगळ्या बायांचे हात एकत्रितपणे बारवर गेले आणि बबष्का उडून
’D'च्या डब्ब्यात गेलं. तिकडे ते गेलं काय, त्याच्या सीट वर वसून पंख हलवत नखरे केले काय-अचानक तो उठला आणि बार्सपाशी आला. बबष्का त्याच्याही मनात बोललं की काय?? बोंबला!

मला वाटलं आता तो बोलणार. आठवड्या-आठवड्यांपासून मनात रंगवलेला प्रसंग प्रत्यक्षात घडेल याची मला अचानक खूप भीती वाटली.
मग मघापासून जे झुंपा लाहिरीचं पुस्तक वाचायचं फ़क्त नाटक करत त्याला न्याहाळत बसले होते त्या पुस्तकाकडे त्याने तर्जनी  रोखली, मग वाचतोय असा अभिनय केला आणि मग अंगठा आणि तर्जनी जुळवून छानची खूण केली.
ऍ?
आम्हा दोघांमध्ये फ़क्त बार्स असताना हा असा डंबशेराड्स का खेळतोय?
आणि मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली-
तो खाणाखुणा करत होता कारण  तो मूक होता.
हैला! आता काय? मला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं.
तो त्याच्या त्या अबोलीतून मला काही सांगू पाहत होता, संवादासाठी जागा तयार करत होता आणि मी "मी जे बोलते ते माझ्या मेंदूत पहिले वाजतं आणि मला नंतर अर्थबोध होतो, याचं नेमकं कसं असेल?" असं काहीतरी हुशार, चतुर वाटत चिंता करत बसले होते.
मग मी माझ्याकडल्या वहीवर मोठ्याला अक्षरात ’येस! आय नो’ लिहीलं आणि याच पद्धतीने पुढचा बराच वेळ आम्ही झुंपाच्या अवतीभोवतीचं बोलत(?) राहिलो.(सात-आठ वाक्यं-चार त्याची, चार माझी)
मी माझ्याशी विचार करतानासुद्धा मनातल्या मनात बोलत असते, हा मनातल्या मनात तरी बोलू शकत असेल का? हा त्यानंतरचा अपरिहार्य विचार.
पुढे त्याचं स्टेशन आलं-तो उतरला
त्याच्यापुढे माझं स्टेशन-मी ही उतरणार. खिडकीच्या गजांचा पारोसा वास आणि दिवसाच्या शेवटी तोंडात जमा झालेली कडू तुरट चव घोळवत..नेहमीसारखीच.

दिवस काल-परवा-तेरवासारखाच.
पण बबष्का आणि ’D'च्या अबोलीतल्या बोलीमुळे वेगळा वाटायला लागलेला.
एकाच रंगाच्या दोन फ़टकारयांमध्ये, वेगवेगळ्या रितीने जोर देऊन बोललेला एकच शब्द- यात जाणवेल न जाणवेल असा फ़रक असतो.
हे मे बी तसलंच काहीतरी असावं.
नॉट बॅड ! हं?
"अशाच काही एखाद्यासाठी
निमूट सोसावे सारे
सहज लाभे एखादे फ़ूल
तेवढे वासाला पुरे!"  टाईप?

नेमेचि येतो. . %@#!

सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना.
मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना. मी अजूनही बेडरुममध्ये झोपलेय, त्या झोपेतल्या स्वप्नात मी चौरंगासमोर अभ्यास करते आहे, आणि मग त्या स्वप्नातल्या मला कॉन्स्टिट्युशन वाचता वाचता झोप लागलिये असं वाटायला लागलं. मग स्वप्नातल्या झोपेत तरी नीट झोपूयात म्हणून पुन्हा बेडरुममध्ये जाऊन झोपले.
सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"

त्यानंतर काही केलं नाही..करण्यासारखं काही नव्हतंच आणि असलं असतंच तरी काही करावंसं वाटलं नसतं. डोक्यात फ़टाफ़ट विचार येत होते. कुठलाही विचार दोन सेकंदांहून जास्त वेळ टिकत नव्हता. एक तासांपूर्वी स्वच्छ आंघोळ करुनही अस्वच्छ, पारोसं वा्टत होतं. सगळ्या अंगालाच कंटाळा लागलाय असं वाटत होतं.
या कंटाळ्यातून आलेल्या डेस्परेशनपायी  काल मी ’अपने दोस्तों को सुनाईये अपना मनपसंद गाना’ वाला एयरटेलचा कॉलसुद्धा मन लावून ऐकला.

पहिल्यापहिल्यांदा मला कंटाळा आलाय हे अमान्य करण्याचा मी प्रयत्न केला, नाही असं नाही.
त्यासाठी मी स्वत:लाच चॅलेंज दिलं - कंटाळ्याला किमान पाच वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सांग.
दोन मिनीटं विचार करुन उत्तर आलं- उन्युई, तेदियो, नोय्या, लांगव्हिल्ह, तैकुत्सु, बोअरडम, आलस्यम. घे!
मला मल्टीलिंग्वल कंटाळ्याला फ़ाउल धरता येत नाही.त्याला सिरीयसली घ्यावंच लागतं.
येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये दर ९१ मिनीटांनी उसळणारा एक गरम पाण्याचा झरा आहे म्हणे! त्याला ’फ़ेथफ़ुल गिझर’ म्हणतात.
दर दीड-दोन महिन्यांनी उपटणारया माझ्या  सिरीयसली घेतल्या जाणारया कंटाळ्यासाठी मीसुद्धा एखादं विशेषण तयार करायच्या विचारात आहे.

बघू! अभ्यास करु, जाईल कंटाळा करत गव्हर्नर जनरल्स ची यादी मनातल्या मनात म्हणून बघितली. कॅनिंग-एल्गिन-लॉरेन्स-मायो-नॉर्थब्रुक (जमतंय जमतंय)-लिटन-रिपॉन-डफ़रीन.. .  . रिपॉन-डफ़रीन... .   नंतरचे कर्झन-मिंटो-हार्डींग्ज-चेम्सफ़र्ड आठवतायेत पण मधले कोणतरी दोन चचलेत . .रिपॉन-डफ़रीन... .
प्च! मी नाद सोडला. 
भूगोल उघडला तर ऍटलासमधले लोहमार्ग मला सुरवंटासारखे भासायला लागले आणि मी पुस्तक खाटकन मिटलं.
मग मी अभ्यास ठेवलाच.

मग काय करावं बरं म्हणत ’ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका हेहेहेहे हेहेहेहे’ हे गाणं आपल्या कॉलरट्यूनवर लावू की नको? हो तर का हो? नाही तर का नाही? यावर सिरीयसली विचार केला
पण तो दोन मिंटातच संपला.

’नक्षत्रांचे देणे’ काढलं. वाचलं
त्यावर उतारा म्हणून माझ्या कविता वाचल्या.
त्यानंतर माझा धिक्कार कसा केला जावा याबद्दलचा मसुदा मनातल्या मनात तयार केला.त्यावर पुढील कंटाळ्याच्या वेळी अंमलबजावणी केली जावी अशी डायरीत नोंद करुन ठेवली.
गूगलवरुन कंटाळ्यावरचे कोट्स शोधून काढले. त्यात बर्ट्रांड रसेल साहेब म्हणतात,
" मनुष्यजमातीमधली अर्ध्याहून  अधिक पापं ही कंटाळ्याच्या भीतीमधून केली गेली गेलेली असतात".
आता हे खरं की काय?
असं कुठलंतरी पाप करुन मी तुरुंगात गेले तर तुरुंगात वेळ घालवण्याकरता काय करावं ह्या विचारात पुढचा अर्धा तास बरा गेला.
नंतर पुन्हा ब्लॅंक!
मी एम्पीथ्री प्लेयर कानाला लावून बसले.
पण ज्या गाण्याने मागचा कंटाळा सुरु झाला होता ते गाणंच कानात वाजायला लागल्यावर योगायोगाचं हसूही येईना.

ओरिगामीचे कागद पुढ्यात ओढून ’पीगॅसस’ करायला घेतला पण अर्ध्यावरच मी हवा गेल्यासारखी पिळपिळीत झाले आणि ड्रॉवरमधल्या पूर्ण व्हायची वाट बघत पडून असलेल्या अकशे एकुणतीस कागदी मॉडेल्समध्ये आणखी एकाची भर पडली.
धाप्पकन खुर्चीत बसले.
पॅसिफ़िकच्या किनारयावर राहणारया माझ्या मित्राने मला पॅसिफ़िकबद्दल एकही ओळ लिहून का पाठवू नये याचा विचार करायला लागले.
मग कधीतरी तो विचार संपला.
थोडावेळ गबदूलपणे बसून राहिले.
मग टी.व्ही ऑन केला. खटॅक खटॅक बटणं दाबत मी सध्याचं ’इन व्होग’ गाणं ’भाग भाग डी.के.बोस’ वाजत असलेल्या चॅनेल वर आले.
पांडासारखा एकच डोळा लालकाळा असलेल्या इम्रानला आणि त्याच्या मागच्या शिमग्यातली सोंगं काढलेल्या पंटर्सना बघून करमणूक झाली खरी पण लागोपाठ वेगवेगळ्या चॅनेल्सवर तेच तेच गाणं ऐकल्यावर ते मला ’भाग भाग डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस’ ऐवजी’भाग भाग डी.के.’ बोस डी.के’.’बोस डी.के’.’बोस डी.के’(बोस डी.के. फ़ास्ट फ़ास्ट म्हणून पाहा) भाग’ असं ऐकू यायला लागलं.
मी वैतागून टीव्ही सुद्धा ऑफ़ केला

लोकं कंटाळा आला की डायरी लिहीतात म्हणे. मी पण लिहायचे.
पण प्रत्येक कंटाळ्यात डायरी लिहीताना पुढे केव्हातरी माझा कंटाळा डायरीत लिहीण्याला इम्यून झाला. मग मी लिहीणं सोडलं आणि डायरया वाचायचा सपाटा लावला. मग यथावकाश मला डायरया वाचायचाही कंटाळा आला.
मी डायरी उघडली. गेले दोन आठवडे ’असह्य डोकेदुखी’शिवाय नोंद नाहीये.
आता अचानक भूकंप होऊन मी डायरीसकट गाडले गेले तर शंभर शतकांनंतर झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या माझ्या या डायरीमधून सद्य समाजाच्या सांस्कृतिक, ऐहिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकेल काय? त्याची कल्पना येण्यासाठी माझी डायरी महत्वाचा दस्तावेज ठरु शकेल काय? माझ्या डायरीत असलेल्या-
 ’चालायला लागलो की कुठेतरी पोहोचतोच आपण’,
आयुष्य ही एक ओव्हररेटेड संकल्पना आहे’,
हा एक प्रश्न आपल्या पोटात हजार प्रश्नांना वाढवतो’,
आणखीही काही हॉरीफ़िक नोंदींशिवाय टु-जी स्पेक्ट्रम, वंगारी मथाई, पाणीपुरीवाले याबद्दल लिहायला हवं अशी मेंटल नोट करुन ठेवली.

फ़ोन वाजला.
गळ्याला पटटा लावणारया, मास्टर ऊग्वे सारख्या दिसणारया (संदर्भासाठी पहा: कुंग फ़ू पॅंडा)  माझ्या दूरच्या आजोंबाचा कॉल होता. माझ्याशी लग्न करायला उत्सुक किमान पंध्रा शाह्याण्णव कुळी मराठा मुलांची नावं निर्विकार चेहरयाने ऐकली. त्या पाच मिनीटांच्या कॉलमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली आणि ’रॉंग नंबर’ बोलून फ़ोन ठेवून दिला. परत फ़ोन नाही आला. आता बहुधा कधीच येणार नाही.
पाणी प्यायला किचनमध्ये गेले. तीनदा पाणी ओतलं, तीनदाही प्यायले नाही तरीसुद्धा पुढच्या वेळी पाणी ओतताना ग्लास रिकामा बघून खूप चक्रावले आणि नंतर भ्याले.

फ़ोनची डायरी उघडली. डो्ळे मिटून चार नंबंरांवर बोट ठेवलं,  कॉल लावले.
मस्त चाललं होतं त्यांचं.
एक जण गर्लफ़्रेंडबरोबर कॅफ़े कॉफ़ी डे मध्ये खिसा खाली करायला गेला होता. दुसरीला काहीतरी छान सुचलेलं लिहून काढत होती, उरलेले दोघं झोपले होते. मी अशी कंटाळ्यात लडबडलेली असताना ते तिथे आनंदात आहेत बघून तुफ़ान चीडचीड केली आणि भैरवीला "आय ऍम अ बिच! यू नो द्यॅट, डोण्ट यू!’ हे भरतवाक्य टाकलं आणि फ़ोन ठेवून दिला. त्यांच्यापैकी एकानेतरी उलटून मला फ़ोन करावा, ताडताड बोलावं असं वाटत होतं पण
नंतर कोणाचाही कॉल आला नाही.

एकदोघांना टुकार एसेमेस पाठवले. त्या टुकार एसेमेसवरच्या त्यांच्या स्मायलींचे पीक घेतल्यासारख्या वाटणारया त्याहूनही  टुकार प्रतिक्रिया वाचून मी कपाळ बडवून घेतलं.

हातात ऍपी फ़िजची बॉटल घेऊन घळाघळा रडत सेलिन डियॉनचं ’ऑल बाय मायसेल्फ़’ गायले. रडण्याचा भर ओसरल्यावर किमान चार लाईक्स मिळतील असे कोणते स्टेटस फ़ेसबुकवर टाकावे याचा विचार केला. त्यात पाच मिनीटं जरा बरी गेली. माझे ’रिलेशनशिप स्टेटस ’ सिंगल वरुन 'कमिटेड' वर बदलणार एव्हढ्यात चार थेंब पाऊस आल्याने लाईट्स गेले.

भर पावसात गाडी काढली, किल्ल्यात भटकायला गेले.  किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला. त्याचवेळी खच्चून ओरडता यावे म्हणून घसा ्साफ़ केला, पण ह्या!  पाण्याला घोडा बिचकतो तसे एकट्या फ़िरायला येणारया पोरीला पाहून ती पोरं बिचकली आणि भलतीकडेच दूर निघून गेली.
मग मी तटावर बसून अथर्वशीर्ष म्हटलं. माझ्या आवाजाचाच कंटाळा आल्यावर थांबवलं.
अशा बालिश-किनरया आवाजाऐवजी जरा घोगरा-सेक्सी आवाज असता तर बरं असं वाटत राहिलं. माझ्यात आता आहे त्याऐवजी काय असतं तर बरं या विचारात अर्धा तास खरंच बरा गेला.
उद्यापासून कंपलसरी सलवार कमीज घालायचे आणि केस कमरेपर्यंत  वाढवायचे असा निश्चय करुन मी तट उतरले.
कंटाळलेल्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. कंटाळा का येतो हे माहीत असलेले
२.कंटाळा कशाचा आलाय हे नेमकेपणाने माहीत असलेले
मी दुसरया वर्गात मोडते. मला तोचतोचपणाचा कंटाळा आहे.
दोन चार जागी कडमडुन-दीड लिटर पेट्रोल जाळून घरी परतताना तोचतो रस्ता घ्यायचाही कंटाळा आला.मग चुकीचा रस्त्याने घरी यायचा प्रयत्न केला. येताना मेडीकल स्टोअरमधून ’बजाज आलमंड ड्रॉप्स केश तेल ’ घेतलं.
पावसात ’इटर्नल सनशाईन ऑफ़ द स्पॉटलेस माइंड’ सारखं मन लख्ख बिख्ख होइल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. बहुधा त्यातलं ’Everybody gotta learn sometime' एव्हढंच बेथला मला शिकवायचं असावं. मघाच्या भयानक कंटाळ्यातही किल्ल्याच्या तटावरुन समुद्रात उडी टाकून जी्व-बीव देऊन कोस्ट्गार्डच्या पाठी नस्तं लफ़डं लावलं नाही ह्या देशाप्रती दाखवलेल्या जबाबदारीबद्दल स्वत:ची पाठ थोपटली.

एक २० रुपयाचं पूर्ण कुरकुरे खाल्लं, पापड तळुन खाल्ले, रम केक खाल्ला, लिम्का प्यायले. मग अचानक लक्षात आल्यासारखं घटाघट पा्णी प्यायले. आज दोन-चार पिंपल्स नक्की उगवणार. 

मग मी उगीच आजूबाजूला बघितलं, खांदे उचकले, आरशात पाहून तोंड वेडंवाकडं केलं. त्यानेही माझ्याकडे बघून खांदे उचकल्यावर आरशाला नाक लावून  "हे काय होतंय मला?" हे वरुन त्यालाच विचारलं. त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.
मग काही करण्यासारखं उरलंच नाही.
गादीवर पडले अन पडल्या पडल्या झोप लागली.
.
.
आज मी खूपच बरी आहे.
पण आज-उद्या धौलपूर हाऊस मध्ये इंटरव्ह्यू ला ’कंटाळ्या’वर पाच मिनीटं बोलायला सांगीतली तर यातलं किती आणि काय काय बोलू शकेन हे मात्र सांगता येत नाहीये अजून.

**

वरचं सगळं एका पत्रात लिहून काढलं. मग ते कोणाला पाठवण्यात अर्थ नाही असं वाटून कालची तारीख घालून फ़ाईलला लावून ठेवलं.
लिहीलेल्या पण कधीच कुणालाच न पाठवलेल्या पत्रांची संख्या आता झाली २३.
Rungli Rungliot! (याचा संदर्भ देणार नाही, शोधून काढा).

जांभळ्या रंगाचा माणूस.


’पिवळा’ म्हटला की मुठीत दाबलेला स्पंज उघडल्यासारखं वाटतं, सातारयाकडच्या भाजलेल्या रव्यासारखा वास असणारया सोनसळी उन्हाचा गंध येतो आणि मनभर होतो तो व्हॅन गॉगच्या ’आर्लसचा’ झगझगीतपणा, त्याची सूर्यफ़ुलं आणि कासच्या पठारावर लांबच लांब माळावर बिनघोर पसरलेल्या स्मिथिया-सोनकीचा रंग"

खूप वर्षामागच्या गोष्टी कालच ऐकल्यात इतक्या सहजतेने आठवतात तेव्हा गुलजारपासून सुटका नाही.
"मांझी से आती हु‌ई हंसी और आवाज बहोत दूर नहीं लगी
ऐसे ही लगा आवाज अभी तक बीती नहीं.."
’प्रिय’पासून तर सुटका तेव्हाही नव्हती, आजही नाही.

.
.
"असं मला बघता ये‌ईल?"
"का नाही? बघूयात करून. डोळे मिट"
मी डोळे मिटले.
"आता मी काही शब्द उच्चारेन ते ऐकल्या ऐकल्या पहिल्यांदा मनात काय येतं ते मला सांगायचं"
डिंगडॉंग!
"निळा"
".."
मी ब्लॅंक. काळ्याकुट्ट गचपणाखेरीज मला काही दिसले नाही की मनात काही आले नाही.
"अरे! काही येत नाही रे!"
"प्रयत्न कर ये‌ईल. थांब, असं कर., स्वत:शीच एकदा म्हणून पहा. म्हण निळा, निsळा, निळाss"
काहीही मनात येण्या‌ऐवजी मला दूरवरुन सावकाsश चाललेल्या ट्रकचा आवाज, थोडु‌याच अंतरावर मातीतून निसटून घरंगळत खाली गडगडत गेलेल्या दगडाचा आवाज, पायापाशी ये‌ऊन फ़ुटलेल्या लाटेचा चुबुक करुन येणारा आवाज असे अनेक बारीकसारीक आवाज ऐकू येत राहिले पण डोळ्यासमोर अद्याप अंधारच होता. नक्की काय घडायला हवंय याचीही कल्पना नसल्याने मी हैराण हैराण हो‌ऊन गेले. लाल रंगाची झाक ये‌ऊ लागलेल्या त्या गडद अंधाराला पाहून माझे डोळे थकले पण तोंडाने निळ्याचा घोष चालूच. मग मध्ये केव्हातरी सगळे आवाज मिटून गेले, आजूबाजूचं सगळं काही पुसून टाकल्यासारखं झालं आणि ..मग चमत्कार झाला.
कपाळाचा सेंट्रॉ‌ईड जिथे असतो तिथे मला काहीतरी जाणवायला लागलं. निळा म्हटलं की कानात काहीतरी खळखळल्यासारखं वाटलं, तोंडात मिंटचा गारवा आला.
फ़ारच जबरदस्त फ़ीलींग होतं ते.
मग तो खेळ मला तीन तास पुरला.
हिरवा”म्हटला की कानात एक लाडीक लकेर ऐकू येते, मंदमंद सुगंध येतो-बहुधा वाळ्याचा हे जाणवून मी थक्क झाले. .
करडा” म्हटला की उकळणारा चहा प्यायल्यावर भाजतं त्या ठिकाणी टाळूला खडवडीत वाटतं, आकारहीन, पसरट सावल्या स्वत:चंच विडंबन करत नाचताना दिसतात..
तांबडा” म्हटल्यावर दाबून ठेवलेलं काहीतरी दुप्पट वेगाने उसळी मारुन वर यावं , एखाद्या उंचावरुन पडलेल्या बशीने भेलकांडत भेलकांडत कर्कश्य आवाज करत स्वस्थ व्हावं असं वाटतं..
पांढरा”म्हटल्यावर फ़ळ्यावरुन खडू घासत नेताना भुरभुरत खाली येणारे खडूचे कण आठवतात, कुरकुरीत ट्रेसपेपर कानापाशी करकरतो, शुभ्र कळ्यांचा तलम स्पर्श मुठीत जाणवतो..
असे वेगवेगळे अनुभव घेताना मी हरखून गेले.
"शायद कोहरे में हाथ बढाये तो छू ही ले उसे!"
--

खूप खूप वर्षांपूर्वी ’प्रिय’चं बोट धरून मी या रंगांच्या दुनियेत पहिलं पा‌ऊल टाकलं.
आणि मग त्यानंतर मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीशी मी रंगांची, स्पर्शाची, मनातून कधीही न पुसली जाणारी नाती जोडली.
एखादा अनुभव आठवणीत कन्व्हर्ट होताना रंग, गंध, नादासहीत हो‌ऊ लागला.
माणूस दोन कान, एक नाक, दोन डोळे घे‌ऊन जन्माला आलेला असतो तसाच आपल्याबरोबर स्वत:चा असा एक खास कोवळा रंग घे‌ऊन आलेला असतो.
माझी आ‌ई ही माझी आ‌ई म्हणूनच जन्माला आली असावी असं मला कायम वाटत आलंय कारण ती माझी आ‌ई होण्या‌आधीचं सगळं माहीत असलं तरी त्यातलं काही मनात उमटत नाही. ’आ‌ई’ म्हटलं की आपसूकच आठवतो ’सनशा‌ईन येलो’ आणि त्यासरशी नरम दुल‌ई लपेटून घेतल्यासारखं उबदाSSर वाटतं.
माझा मित्र जयदेवचं नाव घेतलं की आठवतो टवटवीत ’लाल’ रंग, वारीतला जयघोष, दुमदुमणारा धुमाळी आणि ओल्ड मॉंकचा ठसकवणारा गंध.
किती नवल!
या रंगांचा आणि माणसांच्या काळं, गोरं , करडं असण्याशी संबंध नाही.
विशिष्ठ अशा रंगांशी त्यांची नाळ आपण त्यांना भेटल्याक्षणी जुळलेली असते, कालपरत्वे ती आणखी दृढ होत जाते एव्हढंच!
पण इतकी व्यवधानं असतात, माणसांचा गराडा असतो, अगणित आवाज, वास, हवे/नकोसे स्पर्श यांची गिजबिज असते की कधीकधी आपल्याला त्या रंगाचा जाम पत्ता लागत नाही. या गोंगाटाकडे जरा दुर्लक्ष करून पाहिलं तर आपसूकच दिसतात हे रंग.
हा प्रदेश तसा अनोळखी नाही पण आडबाजूचा खरं. आपलं आपणच जायचं म्हटलं तर चकवा लागायचीच शक्यता जास्त. हात धरुन तिथवर पोहोचवणारा कोणीतरी भेटायला हवा.

माझ्याबरोबर ’प्रिय’ होता.
--

काळ पुढे पुढे निघून गेला आणि त्या काळातल्या माझ्या आणि ’प्रिय’च्या रिकाम्या जागा तशाच राहून गेल्या.
त्या रिकाम्या जागा त्यांच्या रंग, गंध, नादासहीत आहेत आत कुठेतरी- तपशीलवार गोठवलेल्या.
काल काहीतरी निमित्त झालं आणि त्या आठवणींवरचं कुलूप निघालं.
आणि मग इतकी वर्षं न केलेली एक गोष्ट केली.
धीर करुन मनात ’प्रिय’चं नाव घेतलं.
वाट्लं की सहन नाही होणार इतके अगणित रंग आपल्यातच अनावर कोसळत राहतील..पण नाही..
’प्रिय’ च्या नावासरशी डोक्यात रंगबिरंगी भडक चुनड्या घातलेल्या काठेवाडी स्त्रियांनी "
सावन लाग्यो भादवो जी.." म्हणत
एकसुरात धरलेला फ़ेर उमटला..
वारयाच्या एका झुळुकीसरशी एकलय हलणारी जिरॅनियमची शेतं आठवली..
मिरमिरवणारा गंध असलेल्या तुळशीच्या जांभळ्या मंजिरयांचे घोस नाकापाशी उलगडत गेल्यासारखे वाटले..
आपला जांभळा पुष्पसंभार मिरवत एखाददुसरया वाटसरुवर कृपाकटाक्ष टाकल्यासारखा फ़ुलं ढाळणारा बापटांचा जॅकरॅडा आठवला,
जिथे तिथे उघड उघड
फ़िरुन फ़िरुन असणारा!
.
माझ्या मनातल्या ’प्रिय’ला एक निश्चित रंग आल्याचं पाहून नवल वाटलं. आणि पुढच्याच क्षणी ’प्रिय’शी संबंधित कुठल्याही गोष्टीचं नवल वाटावं याचं नवल वाटलं.
तर-
’प्रिय’, बाबा रे! विचारलसंच कधी तर मी सांगू शकेन की-
तू एक जांभळ्या रंगाचा माणूस आहेस.
.
.
आणि कधीतरी, केव्हातरी तुझ्या मनातला माझा रंग कोणता हे सांगण्याचं जमव बुवा!
तुम्हालाही बघा सांगता आला तर!

चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’

सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनातून केलेल्या प्रयोगाबद्दल लोकं अजून अनभिज्ञ आहेत असं दिसतं. सचिन कुंडलकरची २००६ मध्ये प्रकाशित झालेली ’कोबाल्ट ब्लू’ ही अशीच एक अत्यंत छोटेखानी अशी ९० पानांची कादंबरी आहे. आजच्या इंस्टंट जमान्यात इंस्टंटली वाचून होईल अशी. प्रकाशन गॄह- मौज. गौरी देशपांडे, चि.त्र्यं, पु.ल यासारख्या दिग्गजांची पुस्तकं प्रकाशित केलेल्या ’मौज’ प्रकाशनाने ’कोबाल्ट ब्लू’ प्रकाशित करावे यात कादंबरी दर्जेदार असणार असं वाचकांनी समजायला हरकत नसावी.

कोबाल्ट ब्लू आहे तनय-अनुजा या भावंडांची आणि त्यांच्या घराच्या मनोरावजा खोलीत राहायला आलेल्या मुलाची (आपण याला ’नि’ म्हणूयात). आणि मग या तिघांच्या अनुषंगाने आलेल्या त्यांच्या कुटुंबांची, दोस्तांची, वैयक्तिक लढ्यांची सुद्धा.

या ’नि’च्या प्रेमात तनय-अनुजा आपापल्या पातळीवरुन पडतात.
तनयला आपल्या वयांच्या मुलांप्रमाणे मुली न आवडता मुलं आवडतात. कळायला लागल्यापासून तनयला आपल्यातलं वेगळेपण छळतंय आणि त्यातून तो एकाकी होत गेलाय. या एकाकीपणातून, आपण आहोत तसे स्वीकारलं जाण्याच्या डेस्परेशनमधून मैत्रीचा हात पुढे करणारया ’नि’मध्ये आणि त्याच्यात चटकन मैत्रीचे, मग पुढे शारिरीक-मानसिक बंध तयार होतात. आणि मग पुढे त्याच्या कित्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रेमात पडत ’नि’मय हो‌ऊन जातो. तर अनुजाला भावतो तो ’नि’चा सहजभाव, कसलेही प्रश्न न विचारणारं-कसल्याही बदल्यात कुठलीच उत्तरं न मागणारं त्याचं तुटक वेगळेपण.

तनय आणि ’नि’ यांनी वरच्या खोलीत यांनी घालवलेले दिवस, रात्रींमधून ’नि’च्या स्वभावातल्या बारीक बारीक बारकाव्यांना तोलत-जोखत आपण दोघे कधीतरी एकत्र राहायला लागूच अशी स्वप्नं तनय बघतो आहे तर अनुजाला त्याचा बेफ़िकीरपणा, कलंदरपणा आवडलाय. पण या दोन्ही भावंडांना एकमेकाच्या मनोव्यापारांची कल्पनाच नाहीये. आणि त्याचमुळे अनुजा ’नि’बरोबर निघून जाते तेव्हा "आपल्याला कधीच कसं कळलं नाही?" हया धक्क्याने खचलेल्या तनयचं फ़सवले गेल्यासारखं वाटणं जेन्यु‌ईन वाटतं. पुढे ’नि’ अनुजालाही एकटंच टाकून निघून जातो, अनुजा विचित्र मन:स्थितीत परत घरी येते तेव्हा तिच्याही बाबतीत ’नि’ने तेच केलं जे आपल्या बाबतीत केलं हे जाणवून आपल्याला कळल्यासारखा वाटणारा ’नि’ आपल्याला मुळात तेव्हढासा कळला नव्हता हे तनयला कळतं.

अनुजा आणि तनय मग आपापल्या कुवतीनुसार ’काय चुकलं असावं?’ (त्यांचं-’नि’चं नाही. एव्हढं सगळं होऊनही तनय काय आणि अनुजा काय, थेट ’नि’ला दोष देताना आढळतच नाहीत.), ’काय सुटून गेलं असावं?’ याचा भूतकाळात डोकावून मागोवा घ्यायचा प्रयत्न करतात, आपल्यापुरता उत्तरं मिळवतात, जुनीच नाती नव्याने कळल्यासारखी वाटून त्यांचा क्वचित आधारही घेतात. अनुजाला फ़क्त ’नि’बरोबर दिवसाचे अखंड चोवीस तास घालवून मिळवायचा आनंद, किंवा तनयचं ’नि’वरचं प्रेम हे तनय-अनुजाच्या घरचे जरासुद्धा समजून घेतील अशी अपेक्षा नसते. विस्कटलेल्या मन:स्थितीत घरी परतलेल्या अनुजाला मानसोपचारतज्ञाचे उपचार सुरु असताना कुठेही बभ्रा होऊ नये, झाल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये याकरता मावशीच्या घरी ठेवले जाते तेव्हाही अनुजाच्या "गॅरेजमध्ये गाडी न्यावी तसं मला ठिकठाक करुन इथून घेऊन जाणार." या उद्गारांनी तनय-अनुजाच्या सोवळ्यात बांधून ठेवलेल्या लोणच्याच्या छानशा बरणीसारख्या कुटुंबाविषयी पूर्ण कल्पना आपल्याला तोपर्यंत येऊन चुकलेली असते. पण कोणी दखल घेवो ना न घेवो- आयुष्य तर चालू राहणारच असतं-मग ते आता जरा एकटं जगून बघूयात म्हणून नंतर तनय-अनुजा आपापले मार्ग निवडून चालती होतात.

या कादंबरीतलं तनय-अनुजाचं निवेदन थेट आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आलेलं आहे. तनय विमनस्क मन:स्थितीत असताना आलेल्या निवेदनात त्याच्या डोक्यात काहीकाही विचार-अतिप्रिय प्रसंगांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यातून प्राथमिक शारिरिक गुंतवणूकीला पार करुन आलेली तनयची भावनिक आणि मानसिक गुंतवणूक खूप खोलवरुन आल्याचे जाणवते.
पण ’नि’?
या दोघांच्याही निवेदनातून वजा करुन तो उरतोच आहे. दाट धुक्याच्या पलीकडे, अस्पष्ट, धूसर, ज्याच्यापर्यंत पोहोचायला डोक्यापयंत कळ आणणारया ठोकरा खातच पोहोचायला हवं. कोणत्याही चाकोरीत स्व्त:ला अडकवून न घेणारा, कॅन्व्हासवर ओढलेल्या निळ्या रंगाच्या एकच फ़टकारयात (ज्याने या पुस्तकाचं मुखपृष्ठ सजलंय) गराड्यातलं उकटेपण सगळं असूनही काहीच नसल्याचं चितारणारा, आपली स्पेस हक्काने मागून घेणारा ’नि’. ’नि’ला खरंच प्रिय असणारया दोन व्यक्तींना सोडून तो का निघून जातो, त्यांना मनावेगळं करु शकत नसताना? तो गुंतलेला असतोही आणि नसतोही- हे कसे काय, त्याचं बायसेक्शुअल असणं हे जाणून घ्यायला ’नि’च्या मानसिकतेत डोकावण्याची ओढ लागून राहते.

अनेकदा आपण नात्याला अपेक्षांनी, गृहितकांनी भाग द्यायचा प्रयत्न करतो. बाकी शून्य आली की मग सर्वकाही आपल्या ताब्यात, आपल्या मनासारखं होतंय असा छानछान फ़ील येतो. पण बाकीच जास्त उरत असेल तर मग असुरक्षित वाटायला लागतं, अनिश्चिततता येते, घुटमळ वाढते. पण या अनिश्चितेतही ’मी’, ’माझं’, ’कायमचं’ हा विचार मनाबाहेर ढकलता येत नाही.अतिउत्साहात म्हणा किंवा प्रेमाबरोबर आपल्याही नकळत ओघाने येणारया गृहीत धरण्याच्या सवयीमुळे बरयाचदा आपण जे शोधतोय, आपल्याला जे हवंय ते समोरच्याला वेगळ्या पद्धतीने हवं असू शकतं, याचा विचार आपल्याकडून होत नाही. समोरच्याला बांधून घातल्यासारखं वाटू शकतं. कोणा एकाच्या आनंदात दुसरयाची फ़रफ़ट होऊ शकते.मग सहजीवनातल्या ’सह’ ला फ़ार केविलवाणा अर्थ उरतो. ’नि’ला कदाचित तनय आणि अनुजा बरोबर राहताना असंच वाटलं असावं. पण ’नि’ तनय अणि अनुजाच्या निवेदनातून जेव्हढा उमटतोय, मूर्त होतोय तेवढ्यावरुनच अंदाज बांधायला लागतात.

स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या नात्यांच्या खूप वेगवेगळ्या त~हा असतात, वेगवेगळे कंगोरे असतात. डिक्शनरीत बघून सांगीतल्यासारखे एकेक बारकावे उकलून नाही दाखवता येत-कितीही दाखवायचे म्हटले तरी. आणि दोन मनुष्यमात्रांमधलं प्रेम हे इतक्या प्रतीचं असतं की चाकोरीतून येणारया प्रेमाच्या फ़ूटपट्टीत त्याला नाही मोजता येणार. ते पुरुषाने स्त्रीवरच केलं पाहिजे किंवा स्त्रीने पुरुषावर अशा ठोकळेबाज चौकटीत त्याला बसवायचा प्रयत्न केला की ते अनाकलनीय रहायचीच शक्यता जास्त. या कादंबरीचे नायक भलेही गे, बायसेक्शुअल असतील पण त्यांचं तसं असणं ही पूर्ण कादंबरीची ओळख ठरत नाही किंवा फ़क्त त्यावरुन कादंबरी वाचणं-न वाचणं ठरणं योग्य ठरत नाही. त्यामुळे या पुस्तकाची संभावना सरसकट ’Queer Literature’मध्ये करून या पुस्तकाच्या वाटेला न जाणे हा या पुस्तकावर शुद्ध अन्याय आहे. २ जुलै, २००९ नंतरही जर आपल्या विचारसरणीत थोडाफ़ार बदल व्हायची शक्यता नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते काय.

राहता राहिलं पुस्तकाचं शीर्षक- कोबाल्ट ब्लू. का?

शुद्ध निळा- त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ नसते. जशी त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ होते तसा तो होतो कोबाल्ट ब्लू! प्रशियन ब्लू, रॉयल ब्लू या आपल्या प्रतिष्ठीत भावंडांमध्ये काहीशा उपेक्षित राहिलेल्या या रंगाला प्रतिष्ठा मिळवून दिली व्हिन्सेंट व्हॅन गॉगने.
शुद्धतेच्या बाबतीत परिपूर्ण नसला तरी कोबाल्ट ब्लू अपूर्णत्वातच किती परिपूर्ण वाटतो, अलगरित्या डिफ़ा‌ईन होतो, स्वतंत्र स्पेस निर्माण करतो. पण हे सर्व असूनही त्या शुद्ध निळ्याशी नाळ जोडून असतो.

तनय आणि अनुजा आपल्या परिने परिपूर्ण नाती उभी करु पाहतात. पण एकाच माणसाकडून नाकारली गेलेली ही माणसं आपापली आयुष्य़ गोळा करतात, सावरुन जगू पाहतात. पण हे करताना ती त्याचं अस्तित्व नाकारत नाहीत. आपण आज जे आहोत त्यात त्याचाही वाटा आहेच हे प्रांजळपणे मान्य करुन आपापल्या वाटा चालायला लागतात, त्याच्या निळ्याशार अस्तित्वाचा ठसा मनात वागवतच.

म्हणून कोबाल्ट ब्लू!

ट्रेक-चिल्लर नोंदी

मला वाटतं, माझं आतापर्यंतचं दीर्घकाळ चाललेलं एकतर्फ़ी-अध्येमध्ये दुतर्फ़ी प्रेमप्रकरण एकदाचं संपलं तेव्हाची गोष्ट आहे.
एकमेकांबरोबर नको नको झालं होतं, "संपलं एकदाचं..सुटले!" असं वाटलं तरी सलग चार दिवस मी आपली भाडोत्री रुदालीसारखी रडत बसले होते.
दार उघड म्हणून विनंती करून एकजात सगळ्यांचे घसे सुकल्यावर पाचव्या दिवशी मला रडायला ही ये‌ईना आणि कोरडं रडायचं तर घशातून आवाजही ये‌ईना. मला वाटतं माझ्या अश्रूंमधला 'त्या'चा अलॉटेड कोटा संपला असावा. तेव्हा माझ्या (दुसरया!) मित्राने भल्या पहाटे लाथ घालून मला घराबाहेर काढलं आणि घडला माझा पहिलावाहिला ट्रेक.
दीर्घ मुदतीच्या तापातून उठावं तसं झालं होतं मला.
त्या कित्येक दिवसंत मी धावलेच नव्हते. वजन बेसुमार वाढले होते, चेहरयाची पार रया गेली होती, झोपे‌अभावी डोळ्याभोवती काळी वर्तुळं आली होती, स्टॅमिनाच्या नावाने बोंब होती..तेव्हा मी हा पहिला ट्रेक केला ’सिंहगड ’चा. १० कि.मी चं ते अंतर का्टताना मी पाच-दहा वेळा बसले, २ लीटरच्या दोन बाटल्या रिकाम्या केल्या, लिम्बु सरबताचे ४-५ ग्लास ढोसले

त्यावेळी सिहगडावरुन खाली बघताना वाटलं की जीव द्यायला कसली मस्त जागा आहे.

---

माझी एक घाणेरडी सवय आहे.
समोरचा एक वाट चढून गेला की त्याच वाटेने काय जायचं म्हणून मु्द्दामून वेगळी वाट घ्यायची. या हटटापयी अनेक वेळा गुडघे फ़ोडून घेतले, टाके पडले, लाख लाख वेळा खरचटलं.
माझ्या या हेकटपणाशी अतिपरिचित असलेला एक मित्र आता मला खरचटलं, रक्त आलं की क्रूरपणे हसतो.
हसेनात का लोक.
पण त्यामुळे झालं काय- वर जाताना कुठली वाट घे‌ऊ नये याचं ज्ञान माझं मलाच मिळत गेलं आणि मग भविष्यात कधीही त्या अपघातांची पुनरावृत्ती तर झाली नाहीच पण नवनवीन वाटा कळत गेल्या.
अहाहा! काय पण मस्त फ़ंडा!
ह्या सगळ्या शक्यता ऍक्चुअली आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतात पण त्यांना हट्टाने शब्दात मांडल्या की ते ’फ़ंडे’ होतात.

---

एरव्ही मी तोंड लांब करुन फ़ंडे मारण्यात एक नंबर असले तरी भयानक कंटाळ्याच्या वेळी मला दुसरयाचेच फ़ंडे आठवायला लागतात.
एकदा काय झालं,
माझ्याबरोबरचा तंद्रीमास्टर खूप पुढे निघून गेला होता आणि वर चढायला एक चढण असलेली पायवाट असताना मला बाजूची दगडांचा छोटा जिना केलेली चढण दिसली आणि आ‌ऊट ऑफ़ ब्लू मला गौतम बुद्ध आठवला. बुद्ध म्हणतो ,
"प्रवासात जर मोठा दगड वाटेत आला तर थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्वत:ची उंची वाढवा "
बघूयात उंची वाढवून म्हणून मी त्या दगडाखालची माती भुसभुशीत झालीये का हे पाहायचं सोडून त्या दगडावर भस्सकन पाय ठेवला आणि...

पुढचा कथाभाग सांगण्यात हशील नाही.

---

"आपण तिथून जा‌ऊया? तो चढ सोप्पा वाटतोय".
कधीतरी मी ग्रूपलीडरला विचारल्याचं आठवतं.
तो हसला आणि म्हणला "हा चढ काय आणि तो काय, काटेकुटे सगळीकडेच असतात. थोडे कमी जास्त एव्हढाच फ़रक. चढ चढायचाच आहे ना? मग इकडे काय नि तिकडे काय. इकडून बघताना तुला तो चढ सोप्पा वाटणारच पण तिथे गेल्यावर तिथून हा चढ त्याहुन सोप्पा वाटेल हे ही तितकंच खरं".
मी आपली तोंड उघडं टाकून त्याच्याकडे बघत राह्यले आणि हळूहळू मला हसायलाच यायला लागलं.
अरे? म्हणजे फ़ंडे मारणारी माझ्या वर्तुळातली मी एकमेव नाही तर?
मला बरयाचदा गैरसोयीच्या जागी असले साक्षात्कार झालेले आहेत.

---

लांबचा पल्ला असेल तर मग साधारण एक तास सलग चालल्यानंतर किती अंतर राह्यलेय हे विचारायची उबळ येतेच येते.
सपोज कोणी समजुतीने सांगीतलं की बा‌ई, थोडंच राह्यलेय तरी पुन्हा वीस मिनीटांनी माझा प्रश्न त्याला जाऊन टोचतोच.
आतापर्यंत तरी कमाल सहनशक्ती असलेली लोकं माझ्या नशिबात होती आणि म्हणूनच "अजून बरीच तंगडतोड करायचीये गं बये, गप्प बसायला काय घेशील?" असं अजून मला कोणी बोललेलं नाहीये.
बोललं तर काय करीन माहीत नाही पण परमेश्वर माझ्यावर ती वेळ न आणो.

---

बा‌ईकवर एकाच सा‌ईडला दोन पाय सोडून बसणारया, पूर्ण चेहरा झाकून, हाय हील्स घालून ट्रेक ला येणारया पोरी मला अजिबात आवडत नाहीत. त्यांना वरुन ढकलून का दे‌ऊ नये? असा हिंसक विचार अनेकदा माझ्या मनात आलेला आहे.

---

चेहरा अर्धा झाकेल इतका गोगो, डोक्याला रुमाल, ढगळ टीशर्ट आणि लेगिंग्ज, खडीवरुन तोंडघशी पडण्याचा विक्रम आजवर अबाधित असल्याने हातात जाडजूड काठी या अवतारात एकतर मी डिटटो शेर्पा दिसते. त्यामुळे माझ्याकडे कोणी मुद्दामून लक्ष दे‌ईल अशी सुतराम शक्यता नसते. त्यामुळे आखमिचौली आणि नजरानजर अशा प्रकारांनाही काही स्कोप नसतो. आणि मलाही उगाच शस्त्रं परजत बसायचा कंटाळा आलेला असतो.
मग मित्र असले तरी तो एक मिडीयॉकर घोळका वाटायला लागतो.
मग एकटंच कुठेतरी फ़िरुन यायचं नाहीतर तटावर जा‌ऊन दरीत पाय सोडून बसायचं. (कोणी मुलगा बरोबर नाही म्हणून भटकायला कचरणारया पोरीही मला अजिबात आवडत नाहीत- पॉईंट टू बी नोटेड)
खरपूस उन्हाचा तो प्रचंड टेम्प्टींग वास सगळीकडे भरुन राहिलेला असतो. मध्येच दरीतून मोराचा म्या‌ऊ ऐकायला येत असतो, तो कुठल्या दिशेने येतोय हे शोधायचा प्रयत्न करायचा आणि देवासारखं शांत बसून राहायचं.
विसरू म्हटलं तरी न विसरल्या जाणारया काही क्षणांमध्ये अशाच एकांतामधले भरपूर क्षण आहेत.
परत आलं की कळतं की सगळ्यांच्या विकेट्स पडल्या आहेत.
विनय..
महाकाय जमदग्नी. भिजक्या मांजराच्या पोराला इथून तिथे हलवावं तसं मला एकीकडून दुसरीकडे हलवणारा. त्याच्या हाताचा पंजा केव्हढा मोठाय! त्याच्या अखंड पंजात माझी मानगूट मावते. तो विनय लहान पोरासारखा तोंड उघडं टाकून झोपलेला असतो.
अर्ध्या बाह्यांचे वेडपट बनियन घालणारा सॅम्या,
झोपेतही कपाळावर आठ्या असणारा जितू,
प्रत्येक ट्रेकला सगळ्यांना उत्साहात गोडमिट्ट चहा करुन पाजणारा-आमचा हरितात्या-शैल्या.
इकडे तिकडे टाकून दिल्यासारखे आपले मित्र अस्ताव्यस्त झोपलेले दिसतात
झाडाच्या पानांच्या जाळीतून उन्हाने त्यांच्या चेहरयावर मोझेक नक्षी काढलेली असते. अशा वेळी हे असे रांगडे, बाप्ये मित्र किती वेगळे दिसतात.

---

एकदा कुठूनतरी मा‌ऊथ-ऑर्गन चा आवाज ऐकायला आला. नुकताच एक मोठा ग्रुप आला होता त्यांचं कॅंप-फ़ायर चाललं असेल म्हणुन मी आवाजाच्या दिशेने निघाले. शेकोटीचा प्रकाश काही दिसला नाही पण खांबाला टेकुन बसलेला एक मुलगा दिसला.
लख्ख चांदण्यात त्याची सिल्व्हूट तेव्हढी दिसत होती.
त्या वेळी त्या क्षणाला तिथला वारयाच वावर, बांबुची शीळ जितकी खरी होती तेव्हढेच त्याचे सूर सच्चे होते.
काय दु:ख होतं त्याला कोण जाणे.. पण त्याने डोळे गच्च मिटून घेतले होते.
एक तास तो भान हरपल्यासारखा वाजवत होता.
तिथे मी होते, पलीकडे गडाचा राखणदार आमच्यावर लक्ष ठेवुन होता, पलीकडे मुलांचं खि-खि चालु होतं.. त्याला कशाकशाचं गम्य नव्ह्तं.
पण शेवटी शब्दांचा अटटाहास मला नडला.मी न राहवून थोड्याशा आगा‌ऊपणेच त्याच्या त्या एकांतावर अतिक्रमण केलं.
असा कोणाचा एकांत पाहू नये म्हणतात, आणि जरी पाहिला तरी त्यात मोडता घालायला जा‌ऊ नये असंही म्हणतात.
सकाळी त्यांचा ग्रूप निघताना मी जा‌ऊन त्याला हळूचकन सॉरी म्हटलं तेव्हा तो समजूतदार हसला.
घोळक्यात आपलेही क्षण- दोन क्षण जगता येतात हे मला या मुलाने शिकवलंय.

---

बॉनफ़ायर असली की मग कविता मस्टच.
त्यातूनही न सांगता कोणी खड्या आवाजात ’रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ सुरु केलं की कानशिलं सरसरुन तापतात. रात्रीच्या किर्र अंधारात लवलवणारया ज्वाळांपलीकडे त्या मुलाचा चेहरा दिसत नसला तरी त्याचा खर्ज डसतो. मग त्या तडतडणारया ज्वाळांबरोबर कवितेचा ज्वर चढत जातो.

---

वारा प्रचंड आवाज करत वाहत असावा, आपल्याकडे अपुरं पांघरुण असावं, कोणी मायेने दे‌ऊ करावं, जाग आणि झोप यांच्या सीमारेषेवर आसमंतातल्या प्रत्येक बदलाची चाहूल अर्धजागृत मन ठेवत असावं, मनात आलं तर वेळ-काळ न बघता त्या वारयात भेलकांडत मस्तपैकी कुडकु्डत, दात वाजवत फ़िरुन यावं.
कसली खंत, द्वेष, डूख मनात नसतो. लख्ख कोरं. अशावेळी शब्दही नकोसे वाटतात.
श्वासांचाही मग गहबजच वाटतो.
अशावेळी कोणी अंगावरचं जॅकेट दे‌ऊ करुन नि:शब्द बाजूला चालत राहावं, आपल्याला आपल्यावरच सोडून.
हीच खरी सोबत.

---

रात्र पड्ता पडता पोहोचावं, शेकोटीचा आणि रात्रीचा भर उतरणीला लागताना गप्पांचा बहर वाढत जावा.निखारयांतली धुगधुगी थोडीशी शिल्लक असताना झोप अनावर व्हावी, मग तिथेच वळकटीवर आडवं व्हावं, सरतेशेवटी झोपेच्या आधीन होताना किलकिल्या डोळ्यांना क्षितीजावर फ़टफ़ट्लेली पहाट दिसावी.

आणखी काय हवं असतं?

’ऑफ़’!

You have a new message!
राणीने घा‌ईघा‌ईत मेलबॉक्स उघडला आणि तिने आनंदाने जवळवळ उडीच मारली. नीराचं उत्तर.
राणी या जबरदस्त पोरीची फ़ॅन.
ताठ, तत्वनिष्ठ आणि निडर नीरा.
दोनच दिवसापूर्वी अंगातले धाडस एकवटून तिने नीराला मेल लिहीली होती. तिला कसं नीरासारखं निडर व्हावंसं वाटतं, बंधनं झुगारुन द्यावीशी वाटतात, स्वत:करता जगावंसं वाटतं वगैरे. स्वत:कडून तिनं केलेलं एक मुक्त आत्मचिंतन होतं म्हणा ना..
"तुला भीती कशी वाटत नाही एखाद्या गोष्टीची?" तिने नीराला विचारलं होतं.
काय म्हणते यावर नीरा?

"परिणामांची भीती संपली की माणूस निडर होतो. आणि मी तर कायम पर्यायांचंच आयुष्य जगत आले. चोखाळायच्या वाटांची वानवा मलातरी कधीच नव्हती. मला जे करावंसं वाटलं, त्यावेळी योग्य वाटलं-तेच केलं"

मस्त!
पण नीराबा‌ई, तुम्ही किती सहजपणे सांगताय सगळं.
एकदा माझं आयुष्य जगून पहा. दुसरयाला बांधलेलं, दुसरयांभोवतीच फ़िरत असलेलं, कायम पडतं-नमतं घ्यायला लागणारं..
राणीने हे टा‌ईप केलं आणि दिलं पाठवून.
दोनच मिनीटांनी नीराचं उत्तर हजर. वॉव्ह!

"स्वीकाराचंच आयुष्य जगत आली असशील आजवर तर मग आणखी काय होणार? आज आहे हे असं-तसंच असण्याला काही पर्याय होता का-याचा विचार केलास कधी?"

आ‌ई गं! ही अशी कशी आपल्या गाभ्यातलंच बोलतेय?- हिच्याशी बोललंच पाहिजे.
"ऑनला‌ईन आहेस?" Message sent to Neera
दोनच मिनीटांनी-
New message from Neera

"आहे."

"चॅटवर येतेस का?" Message sent to Neera
New message from Neera

"जरुर! दोन मिनीट्स फ़क्त-आलेच"
.
दोन मिनीट्स झाली..
.
.
.
पाच
.
.
.

पंधरा मिनीट्स झाली..
"Messages you send will be delivered when Neera comes online"
.
.
.
अर्धा तास झाला.
नीरा आलीच नाही.
राणी थोडीशी हताश, थोडीशी रडवेली, फ़सवली गेल्यासारखी वाटणारी.
नीराच्या मेल्समुळे अंगात आलेलं थोडंफ़ार बळ सुद्दा राणीला सोडून जा‌ऊ लागलं.
पण राणी काय करु शकणार होती?
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तिला मुळात हे माहीत नव्हतं की तिचं जी-मेल चं ’मल्टीपल सा‌ईन-इन’...
’ऑफ़’ होतं.