कैखुश्रु दुबाश मार्ग.

’इ.स.पूर्व ५३० मध्ये पर्शियाचा अखमनोशिय सम्राट कैखुश्रु याने हिंदुकुश पर्वत ओलांडून गांधार व कांबोज प्रदेशांतील लोकांकडून खंडणी वसूल केली होती.’

कामा हॉलचा पत्ता विचारत मी पहिल्यांदा त्या रस्त्यावरुन गेले तेव्हा त्याच्या ’कैखुश्रु दुबाश मार्ग, फ़ोर्ट, ४०० ००१’ मधल्या ’कैखुश्रु’ नावापाशी उचकी लागल्यासारखी अडकले होते. त्यावर सव्यापसव्य करून कैखुश्रु हे नक्की काय प्रकरण आहे?? याचा शोध घेण्यासाठी मी थेट पुराणैतिहासिक काळात डोकावून आले. त्यावरून कळलेली माहिती वरीलप्रमाणे.
आता ही कैखुश्रु दुबाश असामी कोण आहे? हे तर माहीत नाही, त्याचा शोधही मी घेतला नाही, पण या काहीशा विचित्र नावामुळे हा रस्ता कायम लक्षात राहिला.

’काळा घोडा’ भागातला हा रस्ता मी पाहिलेल्या अतिशय सुंदर रस्त्यांपैकी एक आहे.

रस्त्याच्या सुरुवातीला डाव्या बाजूला रिदम हा‌ऊसची देखणी इमारत, उजव्या बाजूला जहांगिर आर्ट गॅलरी, मॅक्स म्युलर भवन, नजर पोहोचेल तिथपर्यंत दोन्ही बाजूने रस्त्यावर कमान टाकणारी झाडं, देखणं ऍम्फी थेटर, समोर कलकत्ता एम्पोरियम, कॉपर चिमनी, बाजूला शायना एन. सीचं बुटीक, पुढे मोठ्ठं स्पा सेंटर, पुढे एक चिमुकलं चर्च, झाडांच्या गर्दीतून डोकावणारे कळस, चर्चमधून बाहेर पडणारी गोरी-देखणी माणसं, रस्त्याच्या शेवटाला लायन गेट, डाव्या बाजूने कामा हॉल तर उजव्या बाजूने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, त्यावरचा तो ग्रेट हॉर्नबिल, पुढे पोलिस मुख्यालय आणि गेट वे ऑफ़ इंडिया.

प्रचंड शांतता आणि बराचसा निर्मनुष्य भाग!

रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायम चिरनिद्रेत असल्यासारख्या वाटणारया आलिशान गाडया कायम उभ्या असतात. या रस्त्यावरून माणसं केवळ गाड्यांनीच फ़िरतात, त्यामुळे माणसांचे पाय या रस्त्याला क्वचितच लागतात.
कोणी फ़ेफ़रं ये‌ऊन टाच घासत मेला तरी कोणाला कळणार नाही इतकी सामसूम.
एखादं जहागिरदाराचं कार्ट हायबुझा दामटत जायचं किंवा एखाद्या उमरावाची पोरगी बेबी फ़ोर्ड शिकायला यायची तेव्हा धुरळा उडायचा, पाला-पाचोळा सैरावैरा धावायचा.. त्या रस्त्यावर हालचाल फ़क्त तेव्हढीच.
एव्ह्ढीही हालचाल झालेली त्या रस्त्याला बघवत नसावी, कारण असा धुरळा उडून गेल्यानंतर पाचच मिनीटांनी शंकर-काका हजर व्हायचा.
त्या रस्त्यावर माझ्याशी नातं आहे वाटणारया दोनच गोष्टी..
रस्ता कायम चकचकीत ठेवायचं असिधाराव्रत घेतलेला शंकर जांभरे आणि महापलिकेची ’इथे कचरा टाकू नये’ ची मराठी पाटी! बस्स!

या रस्त्यावर झाडांची एव्हढी गच्च दाटी आहे की सूर्याचे किरणही धडपडत खाली आलेसे वाटतात, आणि मग पानांच्या जाळ्यांमधून रस्त्यावर चमकदार मोझेकची नक्षी उठते.
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप झाडं आहेत, सगळी ओळखीची.
पण हे ओळखीचे पिंपळ, गुलमोहर, फ़णस या रस्त्यावर मात्र माझं नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस किंवा डेलोनिक्स रेजिया किंवा फ़ायकस रेलिजि‌ओसा आहे पण ही दुष्ट कार्टी मला जाणूनबुजून पिंपळ/फ़णस म्हणतेय अशा आविर्भावात उभे.
आमच्या गावचा पिंपळ जरासा वारा सुटला तरी शीळ वाजवतो, पण हा पिंपळ...छे!
सगळी झाडं कायम राम..लक्ष्मण ...सीता खेळत असल्यासारखी स्तब्ध!
इकडे वारा वाजत नाही, तर पडतो. आजूबाजूला वादळ का चालेना तिथे, इथल्या झाडांची पानं मंद सळसळच करणार. तेव्हढीच आणि तितकीच.
या सळसळीच्या वरचं आणि खालचं ऑक्टेव्ह मी अपवाद म्हणून सुद्धा कधी ऐकलेलं नाही.
रिदम हा‌ऊसच्या दारातला सोनमोहोर मात्र फ़ार खट्याळ आहे. मी आले की माझ्या डोक्यावर भसाभसा फ़ुलं ओतायची आणि मी ती कामा हॉल ये‌ईपर्यंत डोक्यातून उपसत रहायची, जवळजवळ एक वर्ष हा उद्योग हो‌ऊन बसला होता. सदा गंभीर आजीच्या पुढ्यात अखंड नाचरी छोटी पोर किलबिलत असावी त्याप्रमाणे कायम स्थितप्रज्ञपणे आडव्या असणारया रस्त्याच्या सुरुवातीलाच हा सोनमोहोर चवरया ढाळत हसतमुख उभा आहे.

पण या रस्त्यावरची ही सामसूम रस्त्या’वरच्या’ गोंगाटाने व्यवस्थित भरुन निघते. बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जवळ असल्याने पक्ष्यांना ’अप-डा‌ऊन’ करायला सोप्पं जात असावं बहुतेक, कारण बरेच देखणे आणि दुर्मिळ पक्षी या झाडांवर ’Rental’ने राहतायेत. कुठे पोपटांमध्ये जोड्यांसाठी भांडाभांड चालू आहे, कुठे फ़ांद्यांची बेचकी घरट्यांसाठी कोणी वापरायची यावर मारामारी सुरु आहे, या सगळ्या गोंगाटाच्या वर गळा काढून दयाळ गाणं गातोय, टुणटुण उड्या मारत साळुंक्यांचा ’अलीगडी लप्पीयो’चा डाव रंगात आलाय, कुठे ढेरपोट्या चिमण्या पिंपळावर उच्छाद घालतायेत, या गदारोळात आपण काहून मागे राह्यचे म्हणून कावळे कोकलत असतात, असंख्य बारीक मुरकुटे हवेत उडत असतात...हीsss धमाल चालू असते.
ती देखणी पाखरं या धुश्मचक्रीत आपली पिसं गाळायची. ती गोळा करायचा नाद लागला होता मला त्या काळात.

हा रस्ता मला कायम फ़ोटोसाठी सज्ज वाटतो. फ़ूटपाथवर झोपलेला भिकारी नाही, फ़ेरीवाले नाहीत, शेंबूड ओढत येणारी पोरं नाहीत..सगळं परफ़ेक्ट!!
पण या परफ़ेक्टपणापायी हा रस्ता कमालीचा एककल्ली वाटतो.
दादरचा गोखले रोड, बोरीवलीचा एस.व्ही.रोड, पुण्याचा लक्ष्मी रोड कसे आजूबाजूला पोरं, सुना, नातवंडं-पतवंडांच्या गराडयात बसलेल्या गरत्या बा‌ईसारखे वाटतात..हा रस्ता अतिश्रीमंत घटस्फ़ोटीत बा‌ईसारखा वाटतो.

अजूनही मला ऍम्फी थेटरच्या पायरयांवर बसून काढलेले तास आठवतात. मनाने मी केव्हाच समोरच्या ’कॉपर चिमनी’त जा‌ऊन पोहोचलेले असायचे. तिथला मंद प्रकाश, वेटर्सची आदबशीर लगबग, चमचा-पेल्यांचा नाजूक किणकिणाट मला बाहेर बसूनही ऐकायला यायचा. पारश्यांच्या त्या पोर्सेलीनसारखी कांती असणारया मुली, त्यांचे हात तोंडावर घे‌ऊन किणकिण हसणे, तृप्ती ओसंडून चालल्यासारखी त्यांची सुस्त, जडावलेली चाल बघून मी किती जंगली आहे ह्याची जाणीव दर दिवशी नव्याने व्हायची. एकदा बाजूला येऊन बसलेल्या हिप्पीने ’लायटर’ची विचारणा केल्यावर त्याला ’नाही’ म्हणताना भयंकर ओशाळल्यासारखे झाले होते मला. त्या आठवणीने अजूनही तोंड कडू होतं.
याच पायरयांवर ’फ़िल्दी रिच’ व्हायचं ठरवलं होतं मी. ’कॉपर चिमनी’त जेवायला कचकावून पैसे मोजायला लागतात असा माझा त्यावेळचा समज.
समोरच्या खांबाची सावली पायात घुटमळायला लागली की मी निघायचे.
कामा हॉलला मी दररोज ६-३० पर्यंत पोहोचायचे. त्याचवेळेस लायन गेटला विरुद्ध दिशेने नेव्ही ऑफ़िसर्सची बस यायची. त्यातल्या एकाशी तर हसून मान डोलवेपर्यंत ओळख झाली होती. कुणास ठा‌ऊक मैत्रीही झाली असती पण..
माझा क्लास अर्ध्यावरच सुटला आणि ही ओळखही तेवढ्यावरच थांबली.
त्या रस्त्यावर निदान माझ्याबाबतीत तरी सगळ्या गोष्टी अशाच अर्धवट हजामत केल्यासारख्या झाल्या. याच काळात गाणी अर्धवट ऐकून सोडून द्यायची घाणेरडी सवय मला लागली होती. माझं दीर्घकाळ टिकून राहिलेलं (एकमेव) एकतर्फ़ी प्रेम-प्रकरण पण ऍम्फी थेटरच्या पायरयांवरच संपलं.

आज या गोष्टींना तब्बल आठ वर्षं उलटून गेलीत पण अजूनही ’कैखुश्रु दुबाश मार्ग’ म्हट्ला की मला पिसं गोळा करायला इकडेतिकडे धावणारी, पायरयांवर खुरमांडी घालून दात-ओठ खात mp3ची बटनं खटॅक-खटॅक दाबत बसलेली ८ वर्षांपूर्वीची मीच आठवते.. त्यावेळच्या इच्छांना आज संदर्भ उरलेला नाही, मला त्या आज मिडीयॉकर वाटतात, तपशीलही फ़ार धूसर झालेत. तेव्हाचा भाबडेपणाही नाही राहिलेला आता. पण मनाच्या सांदीकपारीत कुठेतरी या रस्त्याची आठवण तग धरून आहे. नाहीतर ८ वर्षांपूर्वी माझ्यासाठी पीलक पक्ष्याने गाळलेलं रेशमी पीस मी आताही डायरीत् खूण म्हणून जपून का ठेवलं असतं?

मुक्त जालों माझेपणें.

आपल्याशिवाय जराही न करमणारे लोक आपल्याशिवाय राहायला शिकलेत, तुम्ही नसलात तरी त्यांना चालण्यासारखं आहे, नव्हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं हद्दपार करून टाकलेय ही जाणीव फ़ार त्रासदायक असते. आणि ती थोबाडीत मारल्यासारखी अचानक होते तेव्हा पायाखालची जमीन सरकते..

पायाखालची जमीन सरकते ते आपण त्यांच्याशिवाय कसे जगणार या चिंतेने नव्हे तर कोणाला आपली लागलेली सवय तुटू शकते या नव्यानेच झालेल्या साक्षात्काराने आणि त्यापाठोपाठच्या आत्मवंचनेने. आपण त्यांना आधीन करून घ्यायला कुठे कुठे कमी पडलो की आपल्यावर ही वेळ आली याचा मागोवा घेत, जर-तर च्या भेंडोळ्यात गुरफ़टून श्रांत-क्लांत होऊन जातो, विचार करकरून डोकं फ़ुटायची वेळ येते.

अशी वेळ अनेकांवर येते तशीच एकदा माझ्यावरही आली.

अशा वेळी माणसं साधारणपणे स्वत:ला कामात गळ्यापर्यंत बुडवून घेतात किंवा चित्त थारयावर येईपर्यंत स्वत:ला कडीकुलपात बंदीस्त करतात. कामात बुडवून घेतलं तर ’अहं’ ला लागलेली ठेच मध्येच नागासारखी फ़णा काढून उभी राहायची मग त्यानंतरचे तासनतात सूडाच्या अभिनव कल्पना, त्या माणसावर वाया गेलेला वेळ, रिसोर्सेस यांच्या निरर्थक आणि वेळकाढू आकडेवारयांमध्ये मी रममाण व्हायचे. काम राहिलं बाजूला.
मग मी माणसं नाकारली, जगाशी संपर्क तोडला, स्वत:ला बंदीस्त करून घेतलं. तर मला पश्चातापाचे उमाळेच्या उमाळे यायला लागले. आता जर त्या व्यक्तीबरोबर असतो तर कसं आणि तसं या दिवास्वप्नांमध्ये मी रमायला लागले. आणि झाल्या प्रकाराबद्दल स्वत:ला दोषी करार देऊन झुरत गेले.

मग झाले तेव्हढे बस म्हणुन मी निसर्गाला शरण जायचे ठरवले. एका ग्रुपने काही गडकिल्ले ओळीने करायची मोहीम आखली होती, त्यात नाव नोंदवलं आणि निघून आले.

आता मी कुठल्यातरी गडावर आहे.
झाल्या गोष्टींचा पुन्हापुन्हा आढावा घेऊन मन:स्थिती चिघळते हे माहीत असूनही आपण तेच करतो. मी पण तेच करते आहे. आतापर्य़ंतचा बराच वेळ रेट्रोस्पेक्शन मध्ये घालवलाय; इतका, की आताही मी कुठल्या गडावर आहे ह्याची मला जराही कल्पना नाही. आताही ग्रुपला मागे सोडून एकटीच तटावर आले आहे. खाली सह्याद्रीच्या कुठल्याही घाटमाथ्यावरून दिसतं तसंच दृश्य आहे.

मावळतीचा प्रकाश सर्वदूर पसरला होता. खाली गावात पेरणी चालू असावी बहुतेक, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण अस्पष्ट ऐकायला येत होती. सह्याद्री पर्वताच्या वळ्याच वळ्या नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरल्या होत्या. दोन रांगांमधून एक नदी लाजत, मुरकत गेली होती. खालचं गाव हिरव्या-काळ्या रंगात रंगवलेल्या बुद्धीबळाच्या पटासारखं दिसत होतं. पिंजलेल्या कापसासारखे दिसणारे विरळ ढग माथ्याशी रेंगाळले होते.हे सारं पाहून डोक्यातली बजबज कमी झाल्यासारखी वाटली. मी आता दरीत पाय सोडून तटावर बसते.

सूर्य मावळतीला आलेला आहे. बाहेरून उन्हातून आल्यावर पायावर थंड पाणी घेतल्यावर कसं वाटेल तशी शांतता मनात आहे.

मी बटव्यातून बचकभर दाणे काढते. संध्याकाळची वेळ असूनही ते खायला गर्दी केलेल्या पक्ष्यांकडे बघत बसते. तेवढ्यात एखादा चिंट्या मॅगपाय रॉबिन हाताशी सलगी करून जातो. त्या धिटाईने मी अवाक तर होतेच पण त्याच्या लालूस स्पर्शाने रडू येईल का काय असं वाटायला लागतं. दरीतल्या झुडुपांमध्ये एकच कुरुंदाचं झाड दिमाखात उभं असतं, बाजूला काकडशिंगी आपली लालसर जवान पानं मिरवीत असते. मावळतीची किरणं या सर्वांवर अशा काही कोनात पडलेली असतात की ती सर्व एखाद्या वेगळ्याच मितीत उभी असल्यासारखी वाटायला लागतात. मी आपली नजरबंदी झाल्यासारखी त्यांच्याकडे पाहात असते. मग आऊट ऑफ़ ब्लू, मला प्रश्न पडतो, ही झाडं, हे पर्वत, इथला वारयाचा वावर हे माझ्यासारख्या किती मेस्ड अप आयुष्यांचे साक्षीदार असतील?

मग तो शहाण्या उपरतीचा क्षण येतो.

माझ्यासारखे बरेच जण अमूर्त स्वरूपात त्या तटावर रेंगाळताना दिसायला लागतात. पूर्वी विझलेले डोळे, गमावलेला विश्वास, जहरी कडवटपणाने काठोकाठ भरलेले, पण.. आता जे खंबीर असतील, ताठ कण्याने वावरत असतील, नव्या उमेदीने चालायला लागली असतील, विश्वास टाकत असतील, विश्वासाला पात्र ठरत असतील, जगाच्या पाठीवर कुठेतरी ते असतीलच.

आताच्या या अंत पाहणारया क्षणांचा शेवट होणार आहे, दु:खाचा निचरा होऊन जाणार आहे, मग आपण नवी सुरुवात करणार असतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं पण, तोपर्यंतचा तो ’काही वेळ’ कुठलंही दृश्य डॅमेज न होऊन देता, श्रद्धा, विश्वास यांची तोडफ़ोड न होऊ न देता डोकं ताळ्यावर ठेऊन निभावणं गरजेचं असतं. नंतर हे क्षण आठवताना डंख होणार नाही असं नाही पण ते बाजूला सारता येईल. त्यातली निरर्थकता लक्षात येईल. यालाच कदाचित प्रगल्भ होणं म्हणत असावेत किंवा शहाणा स्वीकार! सुटकेचा आणि उपरतीचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण त्याच्यासाठी आपण तयार राहीलं पाहीजे. So, Keep looking for it. तेव्हा नाही सावरलात तर कधीच नाही. मग त्याच खातेरयात इफ़्स ऍन्ड बट्स ची उजळणी करत भोवंडत रहायचं.

आपण एकटे असलो तर काय झालं? त्या एकटेपणातही एकटं म्हणुन आपल्याबरोबर अनेकजण असतात हे मला उमगलं आणि..

मी सुटले.
 
Designed by Lena