’प्रिय’,..

’प्रिय’,

माझी अर्ध्याहून अधिक पत्रं या मायन्यावरच अडलियेत.
म्हणजे तू ऑलरेडी ’प्रिय’ असताना तुला उद्देशून आणखी एकदा प्रिय म्हणावे तरी कसे? यावर मग नकोच लिहायला म्हणुन मी पुढे लिहायला लागते.
मराठीत या क्षणी तुला उद्देशून वापरावे असे एकही संबोधन नाही.
तुला एव्हढ्या भाषा येतात. एकातलं तरी सांग ना.

-----------

तर..
आज संध्याकाळी ’संध्याकाळच्या कविता’ काढल्या. मग तुझी अशी सरसरून आठवण झाली की काय म्हणतोस.
मग मला वाटलं की अशाच एखाद्या संध्याकाळी तू सुद्धा ग्रेसची कोडी सोडवत असताना तुला माझी आठवण येत असेल का?
मग मी न राहवून तुला फ़ोन करते. तर तू विचारतोस, ’ग्रेस का?’ मी म्हणते, ’हं’ . मग पुढचे अनेक क्षण ग्रेसची ती कविता जगल्यासारखे.

तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे,
ती ही अशा कातर वेळी
उदाच्या नादलहरी सारख्या संधीप्रकाशात..

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत जमा होतात,

अशा वेळी वाटेकडे पाहणे
सर्व आयुष्य पाठीशी बांधून
एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे,
जसे काळोखातही ऐकू यावे
दूरच्या झरयाचे वाहणे.
मी पाहतो झाडांकडे, पहाडांकडे.

तू येशील म्हणून अज्ञानाच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो
आणि आई नसलेल्या पोरासारखे,
हे माझे शहाणे डोळे हलकेच सोडून देतो,
नदीच्या प्रवाहात.

तू येशील म्हणून मी वाट बघत आहे..


मी विसरणार नाही. कधीच.

-----------

न कळणारया, क्लिष्ट गोष्टींबद्दलचं माझं वेड कधीपासुनचं?
आधी ग्रेस, मग तू का आधी तू मग ग्रेस?
तुझ्यामुळे ग्रेस का ग्रेसमुळे तू?
आता तर आठवत सुद्धा नाही.

-----------

मी तुला लिहीलेली बहुतेक पत्रं ही संध्याकाळी लिहीली आहेत. थोडा थोडा दिवस असताना, थोडी थोडी रात्र असताना.
थोडी थोडी ’मी’ माझ्यात आणि थोडी तुझ्यात असताना.
रात्री???
बोलूच नकोस.
मी तुला रात्रीची पत्रं लिहायला बसणारच नाही. काय काय येतं मनात. आवर घालायला लागतो, शब्द परतवावे लागतात, विचार थोपवावे लागतात.
हसू नकोस.
किती खोलवर गेलेल्या आठवणी असतात. साचलेलं सगळंच कागदावर भिरकावुन नये रे देऊ.
वाळूचा एक कण गेला असताना डोळ्याला लावायला दिलेला तुझा रूमाल, त्याचा गंध मला आज आत्ताही येतोय.
एका रात्री पत्र लिहीतानाही आला होता.
त्या क्षणी जर तू मला हवा झालास तर मी तुला कुठून आणि कसा बोलवू?
आणि हे सारं तुझ्यापर्यंत कशा आणि कुठल्या शब्दात पोहचवू?
नकोच..ती रात्रच मुळी वाईट असते.

शब्दांनी हरवून जावे
क्षितीजांची मिटता ओळ
मी सांजफ़ुलांची वेळ


पुन्हा ग्रेसच!

-----------

’ग्रेस’च्या कविता. मोठे विलक्षण गर्भितार्थ.
वाचतोस खरं पण तुला कधी ’ग्रेस’ कळला का रे?
मला नाही कळत कधी. पण त्या नकळतेपणात जो तुझा गर्द भास असतो तो कळतो.
जसं तू मला लिहीलेलं पत्र. एका वाक्यात अनेक अर्थ. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर असं, म्हटलं तर तसं.
तू सांगू पाहिलं तसं. मला उमगलं तसं!

कळला नाही तरी मला ग्रेस आवडतो कारण ’ग्रेस’ वाचताना मला तू हाताच्या अंतरावर असल्यासारखा वाटतोस.

-----------

तुला हे कळत असतं का?
की तुला उद्देशून दोन ओळी लिहीतानासुद्धा माझं काळीज सशाचं होऊन जातं.
दर दोन वाक्यांमध्ये केलेला आठवणींमधला हजार योजने प्रवास, खोल खोल श्वास घेऊन पुन्हा गुदमरावं लागणं..
प्रत्येक पत्रानंतर एक हल्लखपणा.
एव्हढं करुनही आलेला हताशपण..
न जाणो तुला हे समजेल न समजेल. उत्तर येईल न येईल.
काय करु? कसे लिहू? म्हणजे तुझ्यापर्यन्त लख्ख पोहोचेल?

-----------

परवा आपण टेप करून घेतलेल्या कॅसेट्स काढल्या होत्या.
तुझा खर्ज आणि माझी किणकिण.
आपण काय बोलत होतो हे ही कळलं नाही मला.
कारण..
तुझी ती गुरगुर ऐकताना पोटात तुटलं उगीचच.
का? काही कळत नाही.

-----------

माझी पत्रं तू कशी वाचतोस?
वाचताना काम करत असतोस की निवांत असतानाच वाचतोस?
एखादा संदर्भ नाही कळला तर केस खसाखसा विस्कटून टाकतोस का? कपाळावरच्या आठयांची खाच अंगठयाने दाबत डोळे मिटून खोलवर श्वास घेतोस का? अजूनही..?
मी बह्यताडासारखं लिहीलेलं काहीतरी वाचून कपाळाला हात लावत, मान हलवत हनुवटीत खळी रुतवत गदगदत तसंच हसतोस का?
पत्र वाचताना डेस्क वरच्या फ़ोटोकडे डोळे वारंवार वळतात का?
कितीदा???

-----------

माझ्या पत्रातल्या काही मुद्दामहून सोडलेल्या खाचाखोचा तुला कळतात का? म्हणजे हेतुपुरस्पर अवतरणात घातलेला एखादा शब्द, एखादी ओळ, तिच्यामागचं प्रयोजन वगैरे?
खोडलेला ’तो’ शब्द कोणता? हे न कळल्याचं वैषम्य वाटते का रे?
कधीकधी मुद्दाम खोडते आणि तू विचारशील याची वाट बघते.
विचारले नाहीस आतापर्यंत.
कधीतरी विचारशील?
आवडेल मला सांगायला.

-----------

असतात तरी काय माझी तुला लिहीलेली पत्रं? तु मला किती हवा आहेस हेच आळवून आळवून सांगीतलेले.
तुझ्या नुसत्या आठवणीने आलेले आवंढे गिळत.
मला पत्रं लिहीत असताना तुझं असं होतं का?

-----------

कधी कधी तुझी बेफ़ाम आठवण येते. ’तू आत्ताच्या आत्ता इथे ये!’ असं तुला सांगावंसं वाटायला लागतं. पण त्याच्या पुढचाच विचार ’ते केव्हढं अशक्य आहे’ हा असतो.
अशफ़ाकचं ’मोरा सैय्या’ लावते. आणि त्याच्या गाण्यातली ’तू जो नहीं तो यंव, तू नहीं तो त्यंव’ करत विरहाचं सॉलिड रिझनिंग देणारी समंजस उत्तर भारतीय नायिका दिसण्याच्या प्रयत्न करत तुफ़ान रडून घेते.
रडण्याचा भर ओसरला की डोक्यावर उशी घेऊन झोपून जाते.
तू इतका जुना होऊन गेलास तरी तुझ्या आठवणीने येणारं डोळ्यातलं पाणी तेव्हढंच खारट आणि कोमट कसं?
कसं..? सांग.

-----------

छे! एव्हढं सगळं लिहून पण जे समजवायचं आहे, पोहोचवायचं ते ही शेवटी अपूर्ण, तोकडंच आहे.
विश्वातले यच्चयावत शब्द मला वश झाले तरी मला ते पोहोचवता येईल का?
न कळे!

-----------

दारातला कॅशिया गच्च फ़ुललाय. आणखी वांड झालाय. तुझं पत्र आल्यावर मी त्याच्याच बुंध्याशी बसते वाचायला तेव्हा भसाभसा फ़ुलं ओतत असतो माझ्यावर.
मी लावलेल्या गुलाबाला मोठी फ़ूट आलीये.
रातराणी दिमाखात वाढतेय.
सगळं आहे, फ़क्त तू इथे नाहीयेस.

-----------

मी इथं आणि तू तिथं.
तुझ्या माझ्यामधल्या एव्हढ्या अंतराने कधी कधी माझा जीव दडपतो.
पुन्हा मी आणि आपला कॅशिया.
तुला पत्र लिहीते.
कधी फ़िरवशील प्रेमाने हात त्या पत्रावर तर कदाचित त्याचे सुकलेले तुरे मिळतील तुला.
मिळाले आहेत?
.
.
.
आणि मग आपल्यातल्या अंतरावर मी ते पत्र पसरुन देते.

-----------

आपल्या पत्रांची पण एक गोष्ट होऊन जायला नको रे. जी आपण लिहीली खरी पण एकमेकापर्यंत पोहोचलीच नाहीत.
पुन्हा एकदा ग्रेस सारखीच.

लवकर पत्र लिही. वाट पाहतेय.

तुझीच,
माऊ