जागेपणीच्या कविता-नंबर १

२८ मार्च.रात्रीचे ३-११
मी भुतासारखी टक्क जागी आहे. गाढ झोपेतून फ़ोन करून उठवल्याबद्दल, थँक्स टू दिमीत्री, ऍलन, निषाद ऑर व्हॉटेव्हर..तुम्हाला आवडेल ते नाव घ्या. जांभई आणि उचकी आली तशी ही नावं आठवली म्हणून लिहीली.
तर जागीच आहे तर बराहा खोललं आणि खरडलं काहीतरी.
ही कविता तरी आहे का नाही शंकाच आहे. पण तरीही...
नाव मात्र रोखठोक..जागेपणीच्या कविता-नंबर १

तिने त्याला दुरून पाहिले होते.
प्रथमदर्शी एकच भावना.
बेरड, बेरकी.
कायम लोकोपवादाने वेढलेला.
अहंमन्य नक्की कशासारखा
काही कळले नाही तिला,
तिने बघितले इतरांना
त्याच्या नुसत्या असण्याने आक्रसून जाताना

काहीतरी ओळखीचे वाटले तिला.
ती त्याच्या दिशेने चालायला लागली.

तर..
’मी कसा वाईट’,
’माझ्यापासून दूर व्हा’
हा भिववणारा आवेश,
जवळ कोणी येऊ नये म्हणून
परजलेली अस्त्रे..शब्दांची.
कसली इंटुक माणसं तुम्ही
करत केलेला प्रच्छन्न उपहास
कूट प्रश्नासारखं स्वत:ला
अधिकाधिक अवघड भासवत.

काहीतरी ओळखीचे आहे खासच..तीव्र भावना.
ती आणखी जवळ गेली.
अगदी हाताच्या अंतरावर राहिला तो..

दिसले..
स्वत:ला कैद करत लावून घेतलेले कित्येक दरवाजे,
त्यांच्या कपारयांतून डोकावणारी स्वप्नं,
फ़िरून पुन्हा त्यांना दडवताना कसनुसा होणारा जीव,
’काही हललेच नाही आत’ करत चेहरा कोरा ठेवयची धडपड,
गर्दीत जपलेलं एकटेपण..कधी भिववणारं,
स्वत:शीच चाललेली भांडणं,
जगरहाटीत स्वत:ला बसवण्याच्या प्रयत्नात
खुडलेले काही लसलशीत कोंब,
गतायुष्याचे कापून टाकलेले दोर.
तरीही कुठेतरी जपलेलं पोरपण.
कधी दाटून येणारी काजळी
नंतर एक गझल, दारू आणि पुस्तक!!

निकट जाऊन पोहोचली त्याच्या
अन तिला दिसले काही
मग ती नुसतीच हासली..
तिला कळून चुकले तिला काय ओळखीचे वाटले..


कारण तिला त्याच्यात तिचेच प्रतिबिंब दिसले.

- श्रद्धा

.......

थँक्स दिमीत्री, ऍलन, निषाद ऑर व्हॉटेव्हर!

(Disclaimer- ब्लॉगवरच्या कविता ह्या माझ्या असून त्या ’कोणाविषयी’ नाहीत. कोणाचा तसा समज झाल्यास विचारून खात्री करून घेण्याचा चोंबडेपणा करू नये)

2 comments:

Shirish Jambhorkar said...

नदीच्या पाण्यातील प्रतिबिंब आणि आरश्यातील प्रतिबिंब यामधे फरक तो काय? ...
नदी ज्यावेळी प्रतिबिंब दाखवते ...
त्यावेळी .. तिच्या प्रवाहाचा वेग ...
पाण्याची निर्मळ ता .. आणि तळाचा भाग ....
ह्या सर्व गोष्टी पडलेल्या प्रतिबिंबामधे अंतर्भुत असतात...
म्हणजे एक प्रकारे ...
नदी स्वत:चे स्वत्व अबाधित ठेवून ...
दुसर्‍याचे मूलयमापन करते ...
आरश्याचे तसे नसते ..
जे आहे जसे आहे ते असे आहे असे तो म्हणतो ...

Shraddha Bhowad said...

शिरीष,
हजारो माणसं आपल्याला भेटत असतात. काही थोड्याच लोकांबरोबर आपली वेव्हलेंथ जुळते. आणि त्याहून काही थोडे लोक असतात ज्यांचं ’असणं’, ’जगणं’,’लढणं’, ’तडजोडी करणं’, ’आक्रोश’ हे आपल्याच असण्याशी, जगण्याशी, लढण्याशी, तडजोडी करण्याशी, आक्रोशाशी नातं सांगतात. ’तंतोतंत साधर्म्य’ दाखवतात. या साधर्म्याला उद्देशून मी ’प्रतिबिंब’ म्हणाले.

 
Designed by Lena