"तुतानखामेन...!"

Comment allez vous?
कसे आहात??
माझा मुक्काम तब्बल एका वर्षाकरता पुण्यात आहे. रानडेमध्ये फ़्रेंचला प्रवेश घेतल्यापासून माझ्या अंगात फ़्रेंच आलंय. त्यामुळे बघावं तेव्हा मी आपली फ़्रेंचमध्ये घुमत असलेली असते. जमेल तिथे फ़्रेंच ची ठिगळं लावत ’प्रिय’ला ’टोचन’ देण्याचा अभिनव उपक्रम! असो..
’प्रिय’चंच शहर म्हटल्यावर मी ’प्रिय’च्या घरी पडीक असणार हे ओघानेच आलं. माझ्या रुमवर ’रेफ़्युजी कँप’ असल्यागत उगीच पाठ टेकवायला जायचं नाहीतर अभ्यास, खाणं-पिणं, मस्ती मारणं सगळं ’प्रिय’च्या घरी. आणि ’प्रिय’च्या घरी मी काय भूत आहे याची पुरेपूर कल्पना असल्याने (सुदैवाने!) मी मजेत असले तरी ते देखील मजेत असतात.
तर..
’प्रिय’ने घरी एक कासव आणलंय.
दोन पेरांएवढं बिटुकलं कासव. ऑलिव्ह ग्रीन रंगाची शंकू आकाराची पाठ, त्यावर फ़िकट काळ्या रंगाची मोझेक नक्षी, पूर्ण पाठीला ह्ट्टाने दिल्यासारखी वाटणारी लेमन-शिफ़ॉन कलरची आऊट-लाईन, त्याच रंगाचं कपाळ आणि जबडा, पाठीच्या दर्शनी भागावर बोंबलाच्या काट्यासारखी लाल-काळी नक्षी, काळ्याशार अंगावर मेझ कलरच्या तारा आणि इवल्याशा नखुल्या! अतिशय देखणं रुपडं. साहजिकच त्याचं नामकरण माझ्यातर्फ़े झालं.
तर झालं काय, त्यादिवशी क्लासमध्ये सरांनी आम्हाला इजिप्शियन फ़ारो्ह आणि पिरॅमिड्सचं आंबोण चारले आणि मी रवंथ करतच घरी आले. त्यातून हे नामकरणाचे झेंगट गळ्यात पडले. नस्तं लफ़डं सालं. मी कासवाला बघितले आणि त्याची ती शंकूसारखी पाठ बघून मला उचकी लागल्यासारखा ’तुतानखामेन’ आठवला आणि मी कानकुर्री दिली, "तुतानखामेन...!" आपलं राजेशाही नाव ऐकून तुतानखामेन कवचात हातपाय-मान ओढून घेऊन घोरायला पण लागला.
मी कसलं जबराट नाव ठेवलंय या आनंदात मला स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला उसंत पण मिळाली नाही कारण ’कसलं भंगार नाव ठेवलंयस’ करत ’प्रिय’ माझ्यामागे कटकट करत बसला. काका-काकूंना तर कळलंच नाही दोन दिवस काय नाव ठेवलंय ते. दोन दिवस पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेत होते बिचारे! नंतर ’तुत्या’ काय, ’आमेन’ काय, ’खामेन’ काय..कायच्या काय चालू होतं. ’प्रिय’च्या जिभेला टोक काढताना आणि सगळ्यांच्या जिभेला बसलेल्या गाठी सोडवताना तुतानखामेन साईझने २ अंगुळे अजून वाढला.
’तुतानखामेन’ फ़्फ़ार फ़्फ़ार क्युटी आहे. पहिले पहिले नुसता खात तरी असायचा नाहीतर झोपत तरी असायचा. अधूनमधून ’ह्हॉय्य सांबा..’ च्या आविर्भावात टॅंकमधली झाडं उपटायचा निष्फ़ळ प्रयत्न करत असायचा. जसा रुळला तसा त्याच्या उद्योगांचा पसारा आणि व्याप वाढला. आताशा टॅंकच्या काचेत स्वत:चे रुपडे न्याहाळत, उगाचच माना वेळावत बराच वेळ त्याचा खेळ चाललेला असतो. कधी सरळ पोहायचा कंटाळा आला तर बॅकस्ट्रोकही मारतो. ऑक्सिजनच्या बुडबुड्यांनी हेलकावे बसले तरी हट्टाने तिथेच जातो. उलटापालटा होऊन एकदा बाहेर आला की ’जितं मया’ करत आपला पराक्रम कोणी बघितला काय हे टेचात बघतो. सकाळी मी आणि तो एकदमच उन्हात बसतो. ’प्रिय’च्या घरातल्या गालिच्यावर ’चाली-चाली ’करतो. मग तो टॅंकमध्ये झोपायला जातो आणि मी क्लासमध्ये! (अभ्यास करायला!). मी आले की माझ्याबरोबर झाडामागे लपून ’कूsक कूsक ’करत बसतो. काका-काकूंना अजून माझ्या ’एक्स्ट्रा-ह्युमन सग्या-सोयरयांबद्दल माहित नसल्याने ते नुसतेच हवालदिल होऊन बघत बसतात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी व्यवस्थित देत असल्याने माझं वरचं कनेक्शन गंडलंय का काय? हे पण कळायला त्यांच्यापुढे मार्ग नसतो.
’प्रिय’च्या घरी गेले आणि हा झोपलेला असला की मी फ़ार फ़ारतर १० मिनीटं कळ काढते आणि नंतर त्याच्या पाठीवर कॅरम शॉट ठेऊन देते. यावर हा कवचातून मान बाहेर काढून’ कोण आलं ते?’ या आविर्भावात मॅक्स जडावलेले डोळे कष्टाने उघडून पहिले बघेल.(रविवारी कोंबडीच्या पायाचं हिरवं सूप स्टार्टरला घेऊन नंतर ४-५ पोळ्या रस्स्याबरोबर हाणल्या की दुपारी माझे डोळे कसे होतील? तसे जडावलेले.)मी असेन तर आरामात पोहत पहिले वर येईल, १०००० वेळा मान वाकडी करून माझ्याकडे बघेल, मी मीच आहे अशी एकदाची खात्री पटली की खूण म्हणून जोरजोरात चळवळ करेल. बोट दिले तर पुढच्या दोन पायात पकडेल. ’प्रिय’ एकदा त्याला असा उठवायचा प्रयत्न केला होता तेव्हा परत झोपून घेऊन तुतानखामेनने त्याचा साफ़ कचरा केला होता.
माझा कैवार त्याला फ़ार बुवा! ’प्रिय’ ने जीव खाऊन पकड चिमटा काढला की ’एय ...पोरीशी काय मारामारी करतोस?हिंमत असेल तर....’ च्या आवेशात टँकच्या काचेवर फ़ताफ़ता पाय मारत बसतो. ’प्रिय’ विरुद्ध ’मी’ या लढ्यात माझी बाजू घेणारा एकमेव जिवंत प्राणी तो हाच.. तुतानखामेन!
टॅंक्मधलं ऑक्सिजनचं ते नळकांडं त्याचा हॉटस्पॉट आहे. भल्या सकाळी त्याला त्यावर पुल-अप्स मारताना बघणे आणि त्याच पाइपवर टांग मारून झोपा काढताना बघणं हा आता माझा अतिप्रिय विरंगुळा बनला आहे.
’प्रिय’शी त्याची काय खुन्नस आहे माहित नाही पण आजतागायत तुतानखामेनने त्याचा पोपट केलाय. मला शिट्टी वाजवता येत नाही. उगीचच इकडून तिकडे गेले वारे टाईप शिट्टी वाजवली तरी तुतानखामेन वर येतो.’प्रिय’ला मात्र तो जाम दाद देत नाही.एकीकडे चुटकी वाजवली की दुसरीकडेच जातो.टँकमध्ये लाटा काय तयार होतील अशी शिट्टी वाजवली तरी ढिम्म एकाच जागी बसून राहतो.’मंदुडं सालं!’ असं करवादून ’प्रिय’ कंटाळून चालता झाला की तुतानखामेन मान झटकत मजेशीर एक्स्प्रेशन देतो.
कधीकधी मात्र जाम लहरीपणा करतो. खात नाही, पोहत नाही. झाडाचा आडोसा घेऊन पुढचे दोन पाय डोळ्यांवर घेऊन स्वस्थ पडून राहतो...दिवसेंदिवस! त्याचे आवडते लाल रंगाचे फ़िश-फ़ूडचे लाल दाणे, कोथिंबीर टाकली तरी त्याचा मूड सुधरत नाही. कुठं दुखतंय खुपतंय...तर ते ही कळत नाही. मला एकतर कासवाची भाषा पण येत नाही. त्याचं असं वागणं जीवाला लागून राहतं. माझा मूड बूटात गेलेला पाहून मग ’प्रिय’ कुठूनतरी एक व्हेट पैदा करतो. सगळे सोपस्कार होऊन तासाभरात तुतानखामेनने एक लॅप मारला की माझा सुधारलेला मूड बघून ’प्रिय’चा जीव भांडयात पडतो.
दोन महिन्यात तुतानखामेन एक इंच तरी वाढला असेल. वाढ्त्या वयाबरोबर त्याचे ’मी भी सजीला कुछ कम नाही ’म्हणत नखरे सुरु झालेत. एवढ्या लहान वयात हे उद्योग तर हा मोठेपणी काय करेल? असा प्रश्न मी हटकून ’प्रिय’ ला विचारते तेव्हा तो अस्पष्ट ’ढवळ्याशेजारी..’ असं काहीतरी बोलल्याचं ऐकू येतं पण ते मी सवयीने कानाआड करते.
वाढ होत असताना कासवाची कातडीही सापाने कात टाकल्यासारखी उलून निघते.तुतानखामेन मजेत सन-बाथ घेत फ़ेस-पॅक काढल्यासारखी कातडी पील-ऑफ़ करत बसलेला असतो. निकॉन घेऊन हवा करणारया ’प्रिय’च्या एखाद्या मित्राला ’तू भी क्या याद करेगा’ म्हणत पोझ-बिझ देत असतो.या सर्वामध्ये माझ्याकडे डोळे मिचकावून बघायला मात्र विसरत नाही.
माझ्या एक्स्ट्रा-ह्युमन सग्या सोयरयांची संख्या आता मोजण्यापलीकडे गेलीये. पुण्यात तर माणसांना माणसांशी सोंड सोडून बोलल्याशिवाय राहता येत नसल्याने मी या जगाच्या दृष्टीने मुक्या प्राण्यांशीच मैत्री केलीये. ’तुतानखामेन’ हे त्यातलं मजेशीर पर्व. ’प्रिय’ला काही तुतानखामेनचा सांभाळ जमत नाहीये. सारखा वसवस करत असतो. त्याला नाही झेपलं तर मीच तुतानखामेनला दत्तक घेणारेय. बघूयात!