माझी सुपरवायझरगिरी!

वर्षभर केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेवर लिहीत असताना समोर उगीचच हवा करत बसलेला ’सुपरवायझर’ हा प्राणी मी अनेकवेळा बघितला. पण हा रोल मला करायला लागेल अशी सुतराम कल्पना मला तेव्हा नसली पाहिजे. बॉयफ़्रेंडबरोबर त्याची उगाचच पाचकळ बडबड करणारी बहीण कशी गळ्यात पाडून घ्यावी लागते तशीच आर्थिक स्वावलंबनासाठी पत्करलेल्या या नोकरीबरोबर हे सुपरवायझरगिरीचंही झेंगट माझ्या गळ्यात पडलं.

मे-जून हे आम्हा इंजिनीयरींगवाल्यांचे परीक्षांचे दिवस. बाकीचे जग जेव्हा सुट्टीवर असतं तेव्हा आम्ही पेपर वाटत तरी असतो किंवा तपासत तरी असतो.मुलांना शिकवणं हा एक इंट्रेस्टींग पार्ट तरी असतो पण पोरं पेपर कशी लिहीतात हे तीन तास नुसतं बघत बसायचं किती कंटाळवाणं काम असेल?पण वर्षाकाठी दोनदा एरंडेल प्यायला लागल्यासारखं वर्षात दोनदा कामाचा हा कंटाळवाणा भाग उरकावाच लागतो.

मला डयुटी मिळाली आणि मी उत्तरपत्रिकांचं बंडल घेऊन वर्गावर पोहोचले तरी वर्ग उघडलेला नसला की माझं टाळकं सरकतं.फ़ोनवरून माझी आणि खालच्या मजल्यांवरची गरमागरमी झाल्यावर मंद हालचाली करत एक शिपाई कुठूनतरी उगवतो आणि माझ्यावर कोटी कोटी उपकार केल्याच्या आविर्भावात मला वर्ग उघडून देतो.तोपर्यंत बाहेरच्या कॉरीडॉरमध्ये मुलांनी माज घातलेला असतो.एवढी सारी मुलं असतात पण अभ्यास पूर्ण झालाय आणि वर्ग उघडल्या उघडल्या आत येऊन शांतपणे बसलाय असा एकही मुलगा माझ्या या कॉलेजातल्या दोन वर्षातल्या कारकीर्दीत मला बघायला मिळालेला नाही. शेवटच्या सेकंदापर्यंत रिव्हीजन पूर्ण न व्हायला ही मुलं पूर्ण टर्मभर काय वडे वळत असतात की काय कोण जाणे?त्यांची वर्गात येण्याची लक्षणं दिसत नाही म्हटल्यावर आपल्यालाच सूत्रं हातात घेऊन त्यांना हल्या हल्या करत वर्गात घुसवावे लागते.त्यांना पेपर वाटणे, पेपरचे नंबर चुकीचे असतील तर ते परत घेऊन नवीन आणायला त्या सदम शिपायाला बाबापुता करून खाली पाठवणे, रोल नंबर कसे भरावेत याच्या सूचना देणे, हॉलतिकीट विसरल्याने रडून हलकल्लोळ घालणारया मुलीला शांत करणं, हॉलतिकीटाची नक्कल आणायला तिला खाली पाठवणं, कोणाकडे मोबाईल्स, कॅलक्युलेटर्सची कव्हरं नाहीत ना हे पाहणं,मुलांच्या वेंधळेपणाला सुगीचे दिवस आल्यासारखे बरयाच जणांनी रोल नंबर्स चुकीचे भरलेले असतात त्यांना दंड भरायला लावणे, तो दंड शिपायाकडे देऊन त्याची पावती बनवायला त्याला खाली पाठवणे ही कामं मला अवघ्या दहा मिनीटात आटपायची असतात.हे सगळे सोपस्कार आटपेपर्यंत मी बारा घरची धुणीभांडी केल्यासारखी थकून जाते.तोपर्यंत प्रश्नपत्रिका येतात आणि बेल वाजल्या वाजल्या पेपर हातात मिळेपर्यंत पळ अन पळ युगासारख्या भासणारया त्या पोरांना अजिबात निराश न करता ३० सेकंदांमध्ये त्या वाटायच्या असतात. कधी प्रश्नपत्रिका कमी पडतात, कधी चुकीच्या ब्रांचच्या प्रश्नपत्रिका येतात. मुलांची गडबड, त्यांचे प्रश्न, शंका निस्तरायच्या असतात.एव्हाना त्या सगळ्यांची उस्तवार करता करता मला मुलाबाळांच्या गराडयात बसलेल्या टेंपररी जिवतीसारख फ़ील यायला लागलेला असतो!मला इकडेतिकडे पळवून मुलांचं समाधान झालं की मुलं आपापल्या पेपर्सकडे वळतात आणि मी हुश्श करते. आता निदान ४५ मिनीट्स तरी ’मिस, सप्लीमेंट!’ ची आरोळी येईपर्यंत पोरांचा काही त्रास होणार नसतो.तोपर्यंत आमचे चीफ़ कंडक्टर आणि सिनीयर सुपरवायझर येऊन मुलांना त्याच त्याच धमक्या देऊन जातात. नाटकात जास्त स्कोप नसला की कसे तेच तेच संवाद पुन्हा पुन्हा येत जातात?चुकीच्या पात्राने नको तेव्हा एंट्री मारली की समोरचं पात्र कसं लोंबकळत "ऊमम न्य़ूम." करत राहतं?तशी काहीशी माझी अवस्था ह्या लोकांनी एंट्री मारल्यावर होऊन जाते. त्यांचं धमकी-सत्र पुरं होईपर्यंत काय करावं हे न सुचून मी उगाचच दीड पायावर झुलत बसलेले असते. एकदा का ही लोकं येऊन गेली की मी निवांत आपला पर्यवेक्षक-रिपोर्ट भरायला बसते.

इंजिनीयरींगच्या असाईनमेंटस लिहिल्यावर मान मोडून छापावं लागेल असा कुठलाही जॉब घ्यायचा नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. Now, Here I am! प्रत्येक ब्रांचचे ६ असे रिपोर्ट भरताना ’कुठल्या खातेरयात येऊन पडले मी?’ असा विचार येऊन भ्या करून टाळा दाखवत रडत बसावेसे वाटते.त्या हिडीस पिवळसर रंगाच्या शीट्स, कार्बनपेपरने काळेकुट्ट झालेले हात बघून माझाच मला उबग यायला लागतो.

एकदा का हे रिपोर्ट्स बनवून संपले की मी वर्गात गस्त घालायला मोकळी होते.ती पोरं बिचारी पेपर लिहीत असतात.त्यांना आमच्या’ मला तुझा इरादा माहित्येय हो..पण मी तो काही तडीस जाऊन देणार नाही’ या टाईपच्या ट्फ़ लुक्सशी काहीच घेणेदेणे नसते. दु:खद अपवाद अर्थात असतात.गस्त घातली काय किंवा त्यांच्यासमोर रामा डान्स केला काय,एकच गोष्ट असते.

माझ्यासमोर ४० मुलं पेपर लिहीत असतात आणि ४० जणांच्या ४० वेगवेगळ्या तर्हा असतात. कोणी हवेत हातवारे करून आकृती आठवत असतं, कोणाचा लिहीता लिहीता ओठांचा चंबू झालेला असतो, कोणी उत्तर आठवत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला असतो,तर कोणी पेपरकडे बघत ’शक’ शी साधर्म्य असणारा ’फ़’ने सुरु होणारा शब्द बारंवार उच्चारत असतो.कोणी सुटलेली ढेरी त्यामानाने छोट्या बेंचशी adjust करत असतं, कोणी दर दोन मिनीटांनी आपले पेन झाडत असतो, कोणी सारखा घाम पुसत असतो तर कोणी बॅक-अप म्हणून आणलेल्या बादलीभर पेनांची चाळवाचळव करत असतो.कोणी पठ्ठया अर्धा तास उशिरा उगवून वर माझेच पेन पेपर सोडवायला मागतो.शर्टाची वरची बटणे उघडी सोडून आपल्या केसाळ छातीचे प्रदर्शन करणारया मेकॅनिकलच्या पोराने मिकी माऊसचे लाल-पिवळे चित्र असलेली कंपास-बॉक्स आणलेली असते.ती ही डबल-डेकर!या सगळ्या वल्लींकडे बघून मला हसण्याचे उमाळ्यावर उमाळे येत असतात.मला हसताना पाहून आपली सुपरवायझर येडी आहे.बघावं तेव्हा हसत बसलेली असते म्हणून ती पोरंही एकमेकांकडे बघून खांदे उचकत असतात.

सुपरवायझर्स ना मिळणारया सोयी हा आमच्या कॉलेजमध्ये फ़ार दुर्लक्षित प्रकार आहे. आमचे पाय आम्हाला मिळणारया डयुटीबरोबर भाडयाने दिलेले आहेत आणि त्यांचं भाडं पुरतं वसूल करायचंय या आवेशात ही मंडळी आम्हाला ट्रीट करत असतात. तीन तास त्या खोलीत आम्ही गस्त घालत उभं रहावं, अजिबातच बसून नये अशा काहीशा अचाट अपेक्षा आमच्याकडून केल्या जातात.सुपरवायझरला बसायला खुर्ची नसते. मी ती भांडून मिळवते.प्रत्येक सुपरविजनपाठी मला ४० रुपये मिळतात. म्हणजे त्या वर्गात हजर असणारया प्रत्येक मुलापाठी १ किंवा सव्वा रुपया...दक्षिणेसारखा! ४० रुपयात काय आम्ही शहीद व्हावं असं यांना वाटतं की काय कोण जाणे?

सुपरवायझरला चहा मिळतो. How Lovely is that!पण दुपारच्या सेशनच्या डयुटीमध्ये म्हणजे ३ ते ६ मध्ये चहा ची गरज ही साडेचार-पाच ला असते. तर या लोकांचा चहा ३ला मी पेपर वाटले नाहीत की ३-०५ ला हजर असतो.How Inconveniently Efficient!

दीड तासाने मग येतो रिलीव्हर आणि त्या कोंडवाडयातून ’फ़क्त १० मिनीट’ अशी तंबी देऊन सुटका होते.’परसाकडे’ वगैरे लागली असेल तर ते सगळे आटपून काहीतरी च्याऊम्याऊ तोंडात कोंबून वर्गाकडे धाव घ्यावी लागते कारण ११ व्या मिनीटाला तुम्हाला शिव्यांचे धनी व्हायला लागते.वर्गात दाखल होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पुरवण्या मागण्याचा सपाटा सुरु केलेला असतो.माझ्या मजल्यावरच्या त्या हतप्रभ, हतवीर्य शिपायांनी पुरवण्या आणेपर्यंत मुलांनी मला त्राही भगवान करून सोडलेले असते. पण कुठेही आवाज नसतो. यावेळी पास-आऊट होणारी बॅच आणि माझ्या वयामध्ये फ़क्त तीन बर्षाचा फ़रक आहे तरीही मुलं मला फ़ाट्यावर मारून न जुमानता हवं ते का करत नाहीत? सिरीयसली का घेतात? हा माझ्या कलीग्सचा शोधाचा आणि जलसीचा भाग आहे.मला नजरेची आणि आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे जरा कुठे संशयास्पद हालचाल झाली की नजरेने जरब बसवता येते. आणि आवाज वाढला की सातपट आवाज लावून झापलं की फ़रक पडलाच पाहिजे.मुलं पुरवण्यांवर पुरवण्या मागत असतात, मी तोल न ढळू देता ती मागणी बाहेरच्या शिपायाकडे फ़ॉरवर्ड करत असते. मुलांनी मागे-पुढे बघत उत्तरं टॅली करण्याचा प्रयत्नं सुरु केलेला असतो,तो हाणून पाडायचा असतो.डोके गमावलेल्या मुरारबाजींसारखी मी एकटीच सगळ्यांना तोंड देत उभी असते.आणि मग होते पेपर संपायला दहा मिनीट्स उरले हे सांगणारी बेल. आता शेवटचे दहा मिनीट्स तरी माझ्याकडे कोणीही पुरवणी मागणार नसते.पण माझी कामं कधी संपतच नाहीत. प्रत्येकाला पेपर लिहिण्याच्या समाधीतून बाहेर काढून पुरवणी बांधायला लावणे, पुरवण्यांचा आकडा लिहायला लावणे हे करवून घ्यायला लागते.आणि पेपर संपल्याची बेल होते. प्रत्येकाकडून पेपर जवळजवळ हिसकावून घेऊन ते मोजेपर्यंत वर्गात कुजबूज सुरु झालेली असते. क्वचित वेळी पेपर राहिला म्हणून एखादी रडत असते. उत्तर काय आलं म्हणूण एखाद्या स्कॉलर मुलाला सगळीकडून प्रश्नांचा भडीमार होत असतो, आपल्याला अचानक डिमांड आलेला पाहून तो भाव खात असतो, आपल्याला ४० मार्क तर मिळणार ह्याची खात्री पटल्याने एखादा मुलगा आनंदलेला असतो.किती संमिश्र भाव!मुलांचं भवितव्य असं हातात घेऊन जाताना वर्गात शेवटची नजर फ़िरते आणि खिडकीजवळच्या बेंचवर जिभेचे टोक नाकाला लावून पेपर लिहीणरी ३ वर्षापूर्वीची मीच मला दिसायला लागते.

मी ह्या नोकरीत कधीही रमले नाही. अशी नोकरी हे माझे ध्येयही नाही. पण काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात तशी ही नोकरी. पुरेसं आर्थिक पाठबळ घेऊन आता मी ही नोकरी सोडणार आहे आणि अभ्यासाला दिल्लीला पळणार आहे. ह्या वेळची सुपरवायझरगिरी ही शेवटची म्हणून उल्लेखनीय, बाकी काही नाही.हातून घडलेली काही मुलं आणि नॉस्टॅल्जियाचे काही क्षण, एवढीच यातून कमाई!