रतिमग्न!

आमच्याकडे नुकताच केबलचं कनेक्शन घेतलं.
लहानपणापासूनच नॅशनलवरचे प्रोग्राम्स बघत वाढलेल्या आम्हाला खाट-खाट बटणं दाबत चॅनेल सर्फ़िंग करणं जामच मानवलं. आणि त्यातून आम्ही ’असली तसली’ चॅनेल्स बघणारयांतले नसल्याने डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफ़िक, ऍनिमल प्लॅनेट गेला बाजार कार्टून नेटवर्क अशी आलटून पालटून वर्णी असते.
मला दोन भावंडं. दोघांच्या तीन त~हा. कोणाला एक काहीतरी बघायचं असतं तेव्हा दुसरा काहीतरी वेगळंच बघायचं म्हणून तंटायला लागतो.
मी या भानगडीत सहसा पडत नाही.
परवा घरी कोणीच नव्हतं त्यामुळे रिमोटचा ताबा पूर्णपणे माझ्याकडे होता.

सर्वात पहिले अर्थात टॉम ऍंड जेरी! एक तास हसून हसून गुळी झाल्यावर डिस्कव्हरी लावलं.त्यावर सापांबदल डॉक्युमेंटरी होती. डिस्कव्हरीचे हे कॅमेरामन्स कुठे लपून बसतात काही कळत नाही पण त्यांनी आपल्या कॅमेरात अत्यंत विरळा, मनमुक्त सर्प-शृंगार पकडला होता.

रहस्यमय संगीताच्या सलामीवर दोन तीन झुडुपं असलेल्या रखरखीत भागात लिंबासारखी पिलळीधम्मक कांती असलेले दोन साप अचानक कुठूनतरी उगवले आणि एकमेकांना समांतर सरपटत कॅमेरयाच्या दिशेने यायला लागले. अधून मधून एकमेकांच्या अंगाला निसटता स्पर्श करत होते. कधी नुसती कुरवाळत होते, आलिंगन देत होते आणि नवलाची गोष्ट अशी की हे असं अंगाला अंग घासणं, कुरवाळणं ही त्या सापांची प्रणयचेष्टा आहे हे माझ्यापर्यंत स्वच्छ पोहोचत होतं.

हळूहळू त्यांच्यातलं अंतर कमी कमी व्हायला लागलं आणि मागे अरेबियन नाईटसच्या काळातला फ़ील देणारं संगीत एकदम धूसर धूसर होत गेलं.त्या सापांच्या हालचाली आता अर्धनिद्रितावस्थेत व्हाव्या तशा होऊ लागल्या.आता त्या दोन सापांनी एकमेकांना मिठी मारणं सुरु केलं. एकमेकांच्या शरीराचे रबरी विळखे एकमेकांना पडत होते, सुटत होते.विळखा सैल होतोय तर कधी करकचून एकमेकांना पिळून काढतोय.विळखा सुटतोय, सैल होतोय.सुटतोय, सैल होतोय.मधूनच एखादा साप उंच फ़डा काढत होता. पण हा फ़डा नेहमीसारखा आक्रमक नव्हता वाटत.त्याच्यात मदनाची मस्ती शिगोशिग भरलेली होती.त्यांच्या प्रत्येक हालचालीत उन्माद होता.खोलवर रुतून बसलेल्या दोन आठवणी असाव्यात आणि त्यांना एकमेकांपासून विलग करता येऊच नये अशा आठवणींसारखे ते धुंद साप एकमेकांपासून विलग करता येऊच नये इतक्या आवेगाने एकमेकांना बिलगत होते. तो आवेग, तो विखार, तो उन्माद शेवटी अशा एका उत्कर्ष-बिंदुला जाऊन पोहोचला की दोघांनी एकमेकाला करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी गाढ होती की त्या दोघा सर्पांचा मिळून एक सर्प झाला..इतका एकजीव. अनावर आवेगाने मोहरत तो काही काळ शेपटीवर उंचच उंच उभा राहिला आणि मग जमिनीवर कोसळत गडाबडा लोळायला लागला. त्या दोन्ही शेपट्या ताठरून वलवळत राहिल्या, ताठरत राहिल्या, झटके देत राहिल्या.

हा मनमोकळा शृंगार एकाच वेळी भयप्रद पण त्याच वेळी मंत्रमुग्ध करणारा होता.५-१० मिनीटांचाच काय तो विलक्षण थरार!पण खिळवून ठेवणारा.

माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीच्या शृंगाराच्या कल्पना या सगळ्या पुस्तकी असतात. थोडासा तळागाळातल्या लोकांशी संवाद असल्याने चाळीच्या एका खोलीत आई-वडीलांचा शृंगार नजरेस पडल्याने आयुष्य उध्वस्त झाल्याची उदाहरणं ऐकलेली, पाहीलेली आणि वाचलेली! अगदी लहानपणी आई घाईघाईत बदलून टाकलेल्या कुठल्यातरी एका चॅनेलवरचा काहीएक सेकंदांपुरता नजरेस पडलेला रेप जळत्या रेषांनी कोरला गेलेला.त्यामुळे ’शृंगार’ पाहणं ही अत्यंत स्फ़ोटक वस्तू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.मग तो माणसांचा असो वा प्राण्यांचा. दोघांमधली जवळीक हा अत्यंत खाजगी विषय असून तो पॉर्न किंवा ब्ल्यू फ़िल्म मधून चव्हाट्यावर आणणारयांचा मला राग आहे. आणि अशा फ़िल्मस पाहणारयांची, रस्त्यावरच्या कुत्र्यांचं झोंबणं मन लावून बघणारयांची मानसिकताही मला समजू शकत नाही.पण मी हा शॄंगार पाहिला.आणि काहीतरी अनैतिक बघितल्याची भावना नाही झाली. त्यांच्याबरोबरीने त्यांच्या थरारात मी बुडून गेले होते. कानशिलं सरसरून तापली होती. खुर्चीच्या हातांमध्ये हात गच्च रुतले होते.

माझ्या ओळखीतल्या अनेक आस्तिक किंवा गुरु केलेल्या लोकांकडून हा शृंगार पाहणं वर्ज्य असल्याचं आणि तो पाहणारयांना प्रायश्चित घ्यायला लागल्याच्या अनेक सुरस कथा मी ऐकल्या आहेत.मी हे ही ऐकलेय की हा शृंगार पाहायला मिळणं ही गोष्ट फ़ार विरळा!आणि आता एकदा पाहिल्यावर कोणाला बघायला मिळाल्यास चुकवू नये असाच.

मी खजुराहोची शिल्प जाणतेपणी पाहिलेली आहेत. त्या शिल्पांची ’नर-मादी मधला सेक्स’ अशी संभावना कोणीच करणार नाही.ती जोडपी एकमेकांत इतकी गुंगून गेलेली वाटतात, एकाच वेळी उन्मादक आणि काव्यमय की त्यांना ’रतिमग्न’ हा शब्दच चपखल बसतो!

त्या दोन सापांच्या मिलनाला सर्प-शृंगार हेही नाव देता आलं असतं पण..

5 comments:

Sthiti Chitra said...

Sundar lihila ahes! sarp-shrungaracha warnan apratim kela ahes. manapasun awadla lekh.ani lekhacha shirshakahi!!
ek gosht nit dhyanat nahi ali, suruwatila nukatach cable connection ghetalay asa lihilay ani nantar madhe ek vakya asa ki lahanpani aaine chennel badalala. visangat watatay.

Meghana Bhuskute said...

क्लास...
पण या निमित्तानं एक प्रश्नः
दुसर्‍या माध्यमातून घेतलेला एखादा आयता अनुभव मला शब्दांतून मांडावासा वाटतो, नाही असं नाही. पण तो मांडताना - 'वा! अगदी डोळ्यांसमोर उभा राहिला सिनेमा' किंवा 'अगदी अगदी अस्संच. शब्दांतून चित्र काढलंय' अशी - काहीतरी प्रतिक्रिया मिळाली की विरस झाल्यासारखंही होतं. आपण दोन माध्यमांमधले फक्त मिडियेटर झालो, त्याहून जास्त काही नाही - अशी काहीतरी भावना होते.
तुला असं काही वाटतं का?
जर वाटत असेल, तर - सहीसही वर्णन करणारा आणि वर्णनाच्या पलीकडे जाऊन काहीतरी म्हणणारा, अशा दोन प्रकारांपैकी कुठल्या प्रकारात टाकशील तू हा लेख?
तुला असं काही वाटत नसलं तर प्रश्नच मिटला! पण मला मात्र तुझं पोस्ट या दोहोंच्या मधेच कुठेतरी रेंगाळल्यासारखं वाटतंय. बेटर लक नेक्स्ट टाईम. :(

HAREKRISHNAJI said...

you have written so well

Shraddha Bhowad said...

विनायक यांस,

तुमची प्रतिक्रिया वाचली..
तुमच्या ब्लॉगवरची तुमची पत्रंही वाचली. इवलाल्या पत्रांमध्ये केवढा मोठा आशय साठवतात ही पत्रं..
असं काही फ़्लो मध्ये लिहीताना खरंच ’एवढं’ फ़ॅक्चुअल’ राहता येतं का?आणि राहूही नये असे माझे मत आहे..

मला तरी असे वाटते की माझ्या लिखाणाचा विषय सर्प-शॄंगार होता आणि मी त्याला माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.मग मी तो ’रेप’ कुठे बघितला. माझ्याकडे केबल नसताना माझ्या आईला चॅनेल बदलणे कसे शक्य झाले?मग माझ्याकडे लहानपणी केबल होते का??होते तर मी का टेपा मारतेय आत्ताच केबल घेतले म्हणून? मनात उद्भवणारया या फ़ुटकळ प्रश्नावलीला खरंच अर्थ आहे का?

तुम्ही इंजिनीयर आहात असे कळले. मी ही इंजिनीयर आहे त्यामुळे ’टू द कॉंटेक्स्ट’ लिहिणे आपल्याला किती महत्वाचे आहे हे मी पण जाणते..
पण विनायक, प्रोजेक्ट प्रोपोझल लिहिणे आणि मनातलं काहीतरी उतरवून काढणे यात काहीतरी फ़रक असेल की नाही?

तुम्ही विसंगत आहे असं म्हटलेला मुद्दा बरोबर असेलही..पण व्यक्तिश: मला तो गौण वाटला. आणि तुमची पत्रे वाचल्यावर तो मुद्दा तुम्हाला खटकावा याचेही आश्चर्य वाटले.

मला तरी वाटते की आपण हे जे ब्लॉगवर लिहितो ते एक ’आऊट्लेट’ म्हणून..आणि ते इतकं spontaneous असतं की आपण मागे लिहिलेल्या मुद्द्याला पुरावे दिले आहेत की नाहीत? याला नाही महत्व देत.. आणि ते खरंच असावं असं स्वत:ला वाटून घेण्याइतपत सवलत आपण त्या लेखकाला द्यायलाच हवी..

पण तुमचा पिंड वाचकाचा आहे की टिकाकाराचा हे खरंच कळले नाही. चिनूला पत्रं लिहिणारा विनायक टिकाकार असू शकत नाही असे आत कुठेतरी वाटले म्हणून हा पत्र-प्रपंच..

ता.क= हे चॅनेल बदलणे वगैरे प्रकरण मामाच्या गावी गेले असताना झाले. तिथे केबल कनेक्शन आहे

Shraddha Bhowad said...

विनायक, तुझ्या परवानगीशिवाय तुझी मेल इथे टाकते आहे. पण चांगल्या कमेंट्स पब्लिश करायचा मोह नाही आवरत मला.
:))

Vinayak:

सर्वात आधी म्हणजे, माझी किरकोळ कमेन्ट वाचून इतका छान मेल केल्याबद्दल आणि माझ्या पत्रांवर दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद!!

दुसरं म्हणजे प्लीज्ज्ज्ज मला ’टिकाकार’ समजू नकोस. मुळात तो शब्दच मला कायम चुकीचा वाटतो. त्याऐवजी त्याला आपण ’आस्वादक’ का म्हणू नये? असो.

अगदी खरं सांगायचं तर ती कमेन्ट मी तितक्याच उत्स्फूर्तपणे आणि सहजपणे लिहीली होती. शिवाय, मी नोट केलेली विसंगती तुझ्या लेखाच्या बाबतीत अतिशय गौण आहे हे तसं लिहितानाही मला मान्यच होतं. आणि हे मला खरंच पटतं की, एक रसिक म्हणून असल्या गोष्टी रसास्वादात बिल्कूल फरक आणत नाहीत. मुळात एखाद्या कलाकृतीची ताकदच जर असामान्य असेल (जशी त्या लेखाची आहे), तर तपशीलाच्या गोष्टी किरकोळ असतात. पण तरी एक लेखक म्हणून मला असा प्रश्न पडलाय , की असं फ्लो मधे लिहीताना कधी कधी फ्याक्च्युअल असण्यापासून लेखकाने सवलत घ्यावी का? लेखकाला ती सवलत मिळावी की नाही किंवा आपण त्याला ती सवलत द्यावी की नाही (मुळात कुठल्याही चांगल्या लेखकाला कुठलीही सवलत देणारे आपण कोण?) हा प्रश्नच नाही, त्याने ती घ्यावी की नाही? मला व्यक्तिश: असं वाटतं की लेखकाने ती सवलत घेऊ नये.

उदा. कोसला वाचली आहेस का? मनूच्या मृत्यूचं वर्णन मला सगळ्यात जास्ती भारावून टाकतं नेहमीच. त्या भागाची सुरूवात अशी काहीतरी : माझी बहीण मेली तेव्हा तिचं वय फक्त पाच वर्षे होतं.... आणि त्यानंतर ओळीगणिक जीव घेणारी ती वाक्य....आता मला सांग, ते तसं लिहिताना मधेच कुठेतरी नेमाड्यांनी असं काही लिहिलं असतं की ... ती इयत्ता दुसरीत होती...ह तपशील कितीही विसंगत वाटला तरी त्याने आपल्याला काही फरक पडला असता का, नक्कीच नाही. हे झालं माझं काल्पनिक, पण कोसलातच एका ठिकाणी हनुमानाच्या शेपटीऐवजी रामाच्या (किंवा रावणाच्या) शेपटीप्रमाणे असा उल्लेख आहे, ते तसं का ते कळत नाही, पण वरवर तरी ही तपशीलाचीच चूक वाटते. पण त्यामुळे कोसला आवडण्यात काही फरक पडत नाही. पण एक लेखक म्हणून आपण लिहीलेल्या प्रत्येक ओळीची, प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपली असते असं मला वाटतं.

आपण अतिशय उत्स्फूर्तपणे जे लिहीतो, ते खरं तर खूप जास्त बिनचूक उतरलेलं असतं. हेच बघ ना, ता. क. मधे दिलेली गोष्ट तुझ्या मनात होती पण ती कागदावर आली नाही, खरं तर यायला हरकत नव्हती. तू म्हणते तसा त्या लेखाचा मुख्य विषय सर्प शृंगार होता, बाकी तपशील खरच गौण आहेत, त्यामुळे तो उल्लेख तपशीलात आला काय किंवा थोडक्यात आटोपला काय,त्याने काही फ़रक पडत नाही.

 
Designed by Lena