आम्ही गडकरी!

"सकाळी साडे-चारला तयार रहावे" असा हाय-कमांडचा आदेश आल्यापसून जराशी उत्सुकता होतीच पण सकाळी सॅम्या आणि राखुंड्या आपापल्या जांभया आवरीत मलाच विचारायला लागले "कुठे जायचे?" करून, तेव्हा तर ती आणखीनच वाढली. असा प्लॅन कुणाला आधीच नाही सांगीतला की आपले महत्व वाढते असे वाटते का काय या माकडाला? असू देत बुवा.. पाचच मिनीटात पहाटेच्या शांततेला चरे पाडत आपली बायको दामटवत के.डी हजर झाला. कुठल्यातरी चांगल्या स्वप्नातून उठून यायला लागलं असलं पाहिजे त्याला, आपण काहीतरी गौप्यस्फ़ोट करणार आहोत हे देखील विसरला तो. गाडी माझ्याकडे देऊन स्वप्न कंटीन्यू करत तो पिलीयनवर खुशाल पेंगायला लागला तेव्हा गाडी सुरु करत अजून सुषुम्नावस्थेत असलेल्या के.डी ला विचारले,"कुठे घ्यायची हे सांगणार आहेस की..."
"मळवलीला घे-लोहगडला जायचेय"
"जी हुजुर"..
गाडी माझ्या हातात मिळाल्यावर तो नारायणपेठेला १८० चकरा मार म्हणाला असता तरी मी मारल्या असत्या.

के.डी ची बॉक्सर पळवणं हा माझ्या आवडीचा भाग आहे. सॅम्या आणि राखुंड्या पल्सार वर होते. ही गाडी मला कधी झेपली नाही. मला खालून वरपर्यंत मोजून काढलं तरी मी ५-३ च्या पुढे नाही जाणार. टांग मारून मी पल्सारवर बसले जरी तरी पल्सारवर वाळत टाकल्यासारखी दिसते. चला...अशी लोंबकळत एखादवेळेस चालवलीच मी ती गाडी...पेलायला नको? मरू देत...मी त्या प्रकरणाच्या वाटेला जातच नाही. ’Definitely Male' आहे? हो बाबा...असू देत..

तर..गावातून बाहेर पडलं की जरा निवांत रस्ता मिळाला की गाडी ८० पर्यंत दामटायची.एखाद्या रीबॉकच्या जोड्याला किंवा टॉमी हिफ़्लीजरच्या जॅकेटला मागे टाकायचे. मग ते पोरगं चेकाळून मला गाठणार आणि मी गाडी चालवतेय हे लक्षात आल्यावर "साल्या! एका पोरीने पळवले तुला!" हे त्याच्या पाठीवर लटकलेल्याचे उद्गार तर नेहमीचेच! आजही मला नेहमीपेक्षा बरेच कॅचेस मिळाल्यावर त्याची बायको आज मी नेहमीपेक्षा बराच वेळ पिदववतेय हे के.डी. च्या लक्षात आले आणि तो जरा ’जे’ व्हायला लागला. मग कामशेत पुढे गाडी त्याच्याकडे दिली. तोपर्यंत किती वाजले होते ठाऊक नाही पण माझ्या पोटात कपभर चहा आणि बिस्कीटे वाजले होते. मागच्यावेळी भोर ला खाल्लेली लालभडक तर्रीवाली मिसळ आठवली. आई गं! पहिल्याच घासात तिने मला चांगलाच इंगा दाखवला होता. मी पण ती हट्टाने संपवून तिचे आफ़्टर-एफ़ेक्ट्स म्हणून दोन्ही गालांवर पिळ्पल्स मिरवत हिंडले होते. रामनाथच्या पण तोंडात मारेल अशा जहाल मिसळीचे इफ़ेक्टस कुठे भलतीकडेच दिसण्यापेक्षा असे दिसलेले कधीही बरे...नाही का? तर..एवढ्या पहाटे कोणी कुत्रं सुद्धा रस्त्यावर नव्हतं, हॉटेल्स उघडी असण्याची शक्यताच सोडून द्यायची. मग एका साखरझोपेत असलेया टपरीवाल्याला बाबापुता करत ऊठवले आणि चहा करायला लावला. चार बिस्कीटांच्या पुडयांचा फ़न्ना केला तेव्हा कुठे माणसात आल्यासारखं वाटलं. आणि मग भरल्या पोटाने पिलीयन वर बसून आवडीचा उद्योग सुरु केला, अखंड बडबड!

आज ’आवाजतोड’ खेळायचे ठरले. चिठ्ठया टाकून एका गाडीने एक गाणे/पद्य आणि दुसरया गाडीने दुसरे घ्यायचे आणि जोरजोरात सुरु व्हायचे. जी पार्टी त्या वाढत्या आवाजात आपले गाणे विसरून दुसरया पार्टीचे गाणे म्हणायला लगेल ती हरली. (कानात बोटं घालायची परवानगी नाही). या वेळी आम्हाला आलेलं ’भीमरूपी’ आणि राखुंड्याला ’गणपतीस्तोत्र'! सॅम्याने ’न च विघ्नं भयं तस्य’ करता करता ’वाढता वाढता वाढे’शी कधी फ़ुगडी घालायला सुरुवात केली हे त्याचे त्यालाच कळले नाही. माझ्यासारखा बुलंद आवाज असताना आमची सरशी होणार हे तर उघडच!(शिवमहिम्न आलं की मात्र माझी दांडी उडते). आम्ही गाडी थेट लोहगडाच्या पायथ्याशी न्यायची ठरवली आणि मनात ईश्वराचे स्मरण करत अशक्य कच्च्या रस्त्यावरुन हाणली गाडी. सकाळी सकाळीच के.डी. कशाने पिसाळला होता काय ठाऊक?? माझ्या डोक्याएवढ्या मोठ्या मोठ्या दगडांवरून गाडी हाणत होता. गाडी वेगवेगळ्या कोनांमधून अंगात आल्यासारखी गंमत गंमत करत चालली होती. माझी मागे बसून जाम तंतरली होती. मी जर मागच्या मागे बदाककन पडले असते तर निदान ३ आठवडे पाय वर करून पडावं लागलं असतं खास!घरून चपला पडल्या त्या वेगळ्याच.

आमचे मोठे आवाज, त्यात हसण्यात डायरेक्ट साताच्या वरचेच मजले! त्यामुळे आम्ही आलो की लोकं ’ते आले...ते आले..ते आले बरं का...!’ अशाच आविर्भावात आम्हाला बघतच राहतात. यावेळीही काही वेगळं नाहीच घडलं. तसं पाहायला गेलो तर आम्ही आहोतच चार नमुने!

ढुंगणावर ’ली’चा पॅच, पायात ऍडीडासचे जोडे आणि शर्टात ’वेस्ट्साईड’ शिवाय बात नाही असा थाट, "हर फ़िक्र को धुवे में" करत दु:ख, काळज्यांना श्शूss करण्यासाठी फ़काफ़का सिगरेट्स ओढणारा तो राखुंड्या! के.डी...बीयरचे आत्यंतिक प्रेम पोटाच्या वळणदार ’ट’ मधून झळकत असलेले. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले आणि हातात खाटकाची सुरी दिली तर ’पिशी मावशी आणि तिची भुतावळ ’ तत्सम नाटकामध्ये बच्चेकंपनीला घाबरवण्यासाठी कामी येणारा मनुष्य! सॅम्या त्यातल्या त्यात शहाणे कोकरू. त्याचा तो शर्टाच्या वरच्या बटणापाशी हनुवटी खोचून घडीघडी अंतर्मुख टिंब टिंब.. का कायसे होण्याचा तापदायक प्रकार सोडला तर शहाणुलं बाळ आहे ते. आणि शेवटी ’मी’..! खांद्यावर शर्टचे आढे पडलेय, त्याची गुडघ्याखाली येणारी दोन टोकं पोटापाशी आवळून बांधली आहेत असा अवतार. त्यामुळे मी मौजे पारलई मुकाम पोस्ट वाडे-बुद्रुक वरून तडकाफ़डकी ट्रान्सफ़र होऊन नेसत्या वस्त्रांशिवाय लोहगडावर रीपोर्टींग करायला आलेय असे कोणाला वाटले तर त्यात त्याची काहीही चूक नाही.

गडावर अजून वर्दळ चालू व्हायची होती. आमच्याही आधी गडावर येऊन पोहोचलेला ’सह्यमित्र’चा एक निकॉन डी-८० पालथा पडून ’कलरफ़ूल ग्रासहॉपर’चा फ़ोटो घेत होता.(असं त्यानेच मला नंतर सांगीतलं). ’रंगीत टोळ’ म्हणायला काही हरकत नव्ह्ती. पण एका गालाला माती लागलेल्या अवतारात तो भलताच गोड दिसत होता..त्यामुळे छोड दिया.

आमच्यातला के.डी. लोहगडावर अनेक वेळा नाचून बागडून गेलेला. त्यामुळे त्याला गड पाठ. तो झोपेत चालत जरी गेला असता तरी अलगड विंचूकाटा माचीवर जाऊन पोहोचला असता. मग काय जिवंत झरेच बघ, आवाज कसा घुमतोय हे बघायला घसा ताणूनच काय ओरड..क्यॅयच्या क्यॅय चालले होते. १२ वाजेपर्यंत आम्ही काहीही न खाता-पिता इकडेच चढ, त्याच बोळकांडयातून घूस असे प्रकार करत होतो. डोक्यावर सूर्य आग ओकायला लागला होता, पिण्याचे पाणी संपले होते आणि त्यात हा मंबाजी आम्हाला वाट्टेल तसा पिदवत होता. आम्ही त्याच्या मागे पाय ओढत चाललो होतो. के.डी वर काय वर्षानुवर्षे किटण चढलेले..त्यामुळे त्याला कवचकुंडले मिळाल्यासारखीच. पण आम्ही मात्र करपत होतो. माझ्या पोटात खाडखूड सुरु झाली होती. विंचुकाट्यावर जाऊन खायचं हा के.डी चा आग्रह होता( तिकडे काय पंगत बसणार होती? सातयेडं नायतर..) पण भूक लागल्यावर मी दोन पावलं जरी चालले तरी हवा गेल्यासारखी पिळपिळीत होते हे या बाबाजीला कुठे सांगणार? त्यामुळे त्याच्या बॅगेतल्या बिस्कीटच्या पुड्यासाठी मी ’बाजा लव्ह (लव्हस पण नाही) उर्मी’ चितारलेल्या कातळाखाली बैठा सत्याग्रह सुरु केला. आणि मारी टोपी..

मी तिथे अशी फ़तकल मारून बसलेली असताना नेमका कोण येऊन टपकावा? झुल्फ़ी??? दिवाळीच्या आधी नारायण पेठेत हा छानदार मिशी आणि खांद्यापर्यंत केस असलेला पल्सार-डी.टी.एस वाला दिसलेला. हा परत नारायण पेठेत दिसेल म्हणून बंदुक्षणी चहावाल्यांच्या लोखंडी बेंचला पोक आणलेलं मी. अशा मुलाने मला असा मांडा ठोकून भूक भूक करताना पहावं? या तिघा नालायकांचं हसणं उकळत होतं. ते पण महा इब्लिस कार्टं! मला त्या कातळाखाली अस खुडूक करून बसलेलं पाहून तो फ़टाका फ़ुटावा तसा हसला आणि आपल्या ग्रुपबरोबर निघून गेला..तेच मिशीत हसणे. मला ’प्रिय’ची सडकून आठवण आली.त्याला हे मी जेव्हा सांगेन तेव्हा तो याहून किलर स्माईल देऊन माझा खुर्दा करणार नक्की. उंची, मिशी आणि बुलेट ही माझी ३ ऑब्सेशन्स. आणि हीच माझा एक दिवस घात करतील ही शरीची शापवाणी आमच्या अख्ख्या मित्रमंडळात फ़ेमस आहे. पण तिच्याकडे कोण लक्ष देतेय? ती चिचुंद्री आहे.

अशा रितीने मी माझी पोटपूजा उरकून घेतल्यावर आली ती सुप्रसिद्ध विंचुकाटा माची आणि तिच्या सुरुवातीलाच असणारा तो फ़ेफ़रे आणणारा रॉक-पॅच. हे तिघं खारीसारखे सुर्रकन उतरून माझी मजा बघायला पायथ्याशी उभे राहिले. आमची सुरुवात तर चांगलीच झाली पण मध्यावर आल्यावर हरे रामा हरे कृष्णा..! बोटं ठेवता येतील एवढ्या जागेत एक पाय रोवून दुसरा ठेवू तर कुठे या विवंचनेत मी मधल्या मध्ये लोंबकळत पडले होते.आणि हे खाली पाद्रीबाबाच्या मख्खपणे उभे. मी तोल जाऊन पडले असते तर मला उठवायचे कष्टही न घेता ही लोकं ’टुझी माला डया येटे...आमेन" म्हणून सर्व मिळून सहा पायांवर चालती होतील असं वाटायला लागलं. शेवटी एकदाचं माझं सुखरूपपणे लँडींग झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एक रेबॅन पण "स्स..हा!" म्हणून सुस्कारल्याचं बघितलं मी! रॉकपॅच उतरत असले म्हणून काय झालं?? आमचं लक्ष असतं म्हटलं!. माझ्या मागून रॉकपॅच उतरताना मुलींचे ’ मॅडी मला भिती वाटते’, ’राज, मी पडणारेय ...आऊछ!’ असे चित्कार उठत होते...काही विचारू नका.मी मुलीसारखी ट्रीटमेंट ना कधी मागितली ना या लोकांनी मला कधी दिली..फ़ार फ़ार तर त्यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकर्समध्ये लिंबू टिंबू म्हणून थोडा पेशंस ठेवतात झाले!

विंचुकाटा माचीवर आल्यावर सॅम्याला जोर चढला. फ़ोटो-बिटो ही सॅम्याची खास कुरणं. इकडेच वळ, तिकडेच बघ, अशीच वाक असं करून आम्हाला यथेच्छ त्रास देऊन झाला. दिवाळीत बाटलीतून चुकून सुटलेल्या रॉकेटसारखा सॅम्या त्या पूर्ण माचीभर सैरावैरा पळत होता ते त्याच्याकडे उगीच पापण्यांची पिटपिटकरत बघत असलेल्या पिवळ्या स्कार्फ़साठी हे न समजायला आम्ही कय अगदीच ’हे’ नव्हतो.. फ़ोटो-बिटो काढून झाले आणि आम्ही एक २-रूम किचन गुहा गाठली. पथारी पसरली.तिकडे दर्ग्यावर पोरांनी ’आहुम आहुम’ वर धिंगाणा चालवलेला असताना आम्ही मात्र तिथल्या गुहेत बसून झाकीर ऐकत होतो.पळापळीचे सार्थक म्हणतात ते हेच असावे कदाचित!

मी तर आहेच विचित्र पण माझे मित्र पण माझ्यासारखेच. जगाच्या भाषेत ज्यांना ’weirdos’ म्हणतात आणि माझ्या भाषेत ’टोळभैरव!’(पुन्हा टोळ?? आह! निकॉन डी८०) प्रत्येकजण हसून साजरं करत असला तरी प्रत्येकाला काहीनाकाही दु:ख आहेच आणि आमच्यापैकी प्रत्येकाला ते माहीत आहे.

राखुंड्याचं F.M (Fluid Mechanics) सुटत नाहीये, के.डी ला प्रेसवरचे मशीन त्रास देतेय प्लस त्याच्या लग्नाचं घाटतेय, सॅमीला केतकी उर्फ़ केटी खापिटलीने डीच केलेय. माझा mp3 खराब झालाय, ’The Hindu’चा रेट वाढलाय , माझा भारताचा नकाशा कितीही प्रयत्न केला तरी कडबोळीसारखाच येतो..माझ्या दु:खाची कारणे हजार! आणि प्रवास हा दु:खावर हमखास उतारा असतो. त्यामुळे सगळ्यांच्या दु:खाचा म.सा.वि. एका लिमीटपुढे गेला की एखाद्या रविवारी जमायचे आणि वाट फ़ुटेल तिथे गाड्या सोडायच्या. लागेल तो गड पकडायचा आणि घ्यायचा चढायला हा उपक्रम!

माझे कालच ’भ.’शी जोरदार भांडण झालेय, ’प्रिय’ ’आऊट ऑफ़ टाऊन’ आणि ’आऊट ऑफ़ रेंज’ आहे, उद्या सॅमीच्या नव्या प्रेमभंगाचे सुतक पाळायला लागणारेय दिसतेय, राखुंड्याचा आत्ताच फ़ोन आला.. वाईट्ट्ट वैतागला होता तो. म्हणाला "मने, Let's go to Rajgad". मला काय?? चला.

"तुतानखामेन...!"

Comment allez vous?
कसे आहात??
माझा मुक्काम तब्बल एका वर्षाकरता पुण्यात आहे. रानडेमध्ये फ़्रेंचला प्रवेश घेतल्यापासून माझ्या अंगात फ़्रेंच आलंय. त्यामुळे बघावं तेव्हा मी आपली फ़्रेंचमध्ये घुमत असलेली असते. जमेल तिथे फ़्रेंच ची ठिगळं लावत ’प्रिय’ला ’टोचन’ देण्याचा अभिनव उपक्रम! असो..
’प्रिय’चंच शहर म्हटल्यावर मी ’प्रिय’च्या घरी पडीक असणार हे ओघानेच आलं. माझ्या रुमवर ’रेफ़्युजी कँप’ असल्यागत उगीच पाठ टेकवायला जायचं नाहीतर अभ्यास, खाणं-पिणं, मस्ती मारणं सगळं ’प्रिय’च्या घरी. आणि ’प्रिय’च्या घरी मी काय भूत आहे याची पुरेपूर कल्पना असल्याने (सुदैवाने!) मी मजेत असले तरी ते देखील मजेत असतात.
तर..
’प्रिय’ने घरी एक कासव आणलंय.
दोन पेरांएवढं बिटुकलं कासव. ऑलिव्ह ग्रीन रंगाची शंकू आकाराची पाठ, त्यावर फ़िकट काळ्या रंगाची मोझेक नक्षी, पूर्ण पाठीला ह्ट्टाने दिल्यासारखी वाटणारी लेमन-शिफ़ॉन कलरची आऊट-लाईन, त्याच रंगाचं कपाळ आणि जबडा, पाठीच्या दर्शनी भागावर बोंबलाच्या काट्यासारखी लाल-काळी नक्षी, काळ्याशार अंगावर मेझ कलरच्या तारा आणि इवल्याशा नखुल्या! अतिशय देखणं रुपडं. साहजिकच त्याचं नामकरण माझ्यातर्फ़े झालं.
तर झालं काय, त्यादिवशी क्लासमध्ये सरांनी आम्हाला इजिप्शियन फ़ारो्ह आणि पिरॅमिड्सचं आंबोण चारले आणि मी रवंथ करतच घरी आले. त्यातून हे नामकरणाचे झेंगट गळ्यात पडले. नस्तं लफ़डं सालं. मी कासवाला बघितले आणि त्याची ती शंकूसारखी पाठ बघून मला उचकी लागल्यासारखा ’तुतानखामेन’ आठवला आणि मी कानकुर्री दिली, "तुतानखामेन...!" आपलं राजेशाही नाव ऐकून तुतानखामेन कवचात हातपाय-मान ओढून घेऊन घोरायला पण लागला.
मी कसलं जबराट नाव ठेवलंय या आनंदात मला स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला उसंत पण मिळाली नाही कारण ’कसलं भंगार नाव ठेवलंयस’ करत ’प्रिय’ माझ्यामागे कटकट करत बसला. काका-काकूंना तर कळलंच नाही दोन दिवस काय नाव ठेवलंय ते. दोन दिवस पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेत होते बिचारे! नंतर ’तुत्या’ काय, ’आमेन’ काय, ’खामेन’ काय..कायच्या काय चालू होतं. ’प्रिय’च्या जिभेला टोक काढताना आणि सगळ्यांच्या जिभेला बसलेल्या गाठी सोडवताना तुतानखामेन साईझने २ अंगुळे अजून वाढला.
’तुतानखामेन’ फ़्फ़ार फ़्फ़ार क्युटी आहे. पहिले पहिले नुसता खात तरी असायचा नाहीतर झोपत तरी असायचा. अधूनमधून ’ह्हॉय्य सांबा..’ च्या आविर्भावात टॅंकमधली झाडं उपटायचा निष्फ़ळ प्रयत्न करत असायचा. जसा रुळला तसा त्याच्या उद्योगांचा पसारा आणि व्याप वाढला. आताशा टॅंकच्या काचेत स्वत:चे रुपडे न्याहाळत, उगाचच माना वेळावत बराच वेळ त्याचा खेळ चाललेला असतो. कधी सरळ पोहायचा कंटाळा आला तर बॅकस्ट्रोकही मारतो. ऑक्सिजनच्या बुडबुड्यांनी हेलकावे बसले तरी हट्टाने तिथेच जातो. उलटापालटा होऊन एकदा बाहेर आला की ’जितं मया’ करत आपला पराक्रम कोणी बघितला काय हे टेचात बघतो. सकाळी मी आणि तो एकदमच उन्हात बसतो. ’प्रिय’च्या घरातल्या गालिच्यावर ’चाली-चाली ’करतो. मग तो टॅंकमध्ये झोपायला जातो आणि मी क्लासमध्ये! (अभ्यास करायला!). मी आले की माझ्याबरोबर झाडामागे लपून ’कूsक कूsक ’करत बसतो. काका-काकूंना अजून माझ्या ’एक्स्ट्रा-ह्युमन सग्या-सोयरयांबद्दल माहित नसल्याने ते नुसतेच हवालदिल होऊन बघत बसतात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी व्यवस्थित देत असल्याने माझं वरचं कनेक्शन गंडलंय का काय? हे पण कळायला त्यांच्यापुढे मार्ग नसतो.
’प्रिय’च्या घरी गेले आणि हा झोपलेला असला की मी फ़ार फ़ारतर १० मिनीटं कळ काढते आणि नंतर त्याच्या पाठीवर कॅरम शॉट ठेऊन देते. यावर हा कवचातून मान बाहेर काढून’ कोण आलं ते?’ या आविर्भावात मॅक्स जडावलेले डोळे कष्टाने उघडून पहिले बघेल.(रविवारी कोंबडीच्या पायाचं हिरवं सूप स्टार्टरला घेऊन नंतर ४-५ पोळ्या रस्स्याबरोबर हाणल्या की दुपारी माझे डोळे कसे होतील? तसे जडावलेले.)मी असेन तर आरामात पोहत पहिले वर येईल, १०००० वेळा मान वाकडी करून माझ्याकडे बघेल, मी मीच आहे अशी एकदाची खात्री पटली की खूण म्हणून जोरजोरात चळवळ करेल. बोट दिले तर पुढच्या दोन पायात पकडेल. ’प्रिय’ एकदा त्याला असा उठवायचा प्रयत्न केला होता तेव्हा परत झोपून घेऊन तुतानखामेनने त्याचा साफ़ कचरा केला होता.
माझा कैवार त्याला फ़ार बुवा! ’प्रिय’ ने जीव खाऊन पकड चिमटा काढला की ’एय ...पोरीशी काय मारामारी करतोस?हिंमत असेल तर....’ च्या आवेशात टँकच्या काचेवर फ़ताफ़ता पाय मारत बसतो. ’प्रिय’ विरुद्ध ’मी’ या लढ्यात माझी बाजू घेणारा एकमेव जिवंत प्राणी तो हाच.. तुतानखामेन!
टॅंक्मधलं ऑक्सिजनचं ते नळकांडं त्याचा हॉटस्पॉट आहे. भल्या सकाळी त्याला त्यावर पुल-अप्स मारताना बघणे आणि त्याच पाइपवर टांग मारून झोपा काढताना बघणं हा आता माझा अतिप्रिय विरंगुळा बनला आहे.
’प्रिय’शी त्याची काय खुन्नस आहे माहित नाही पण आजतागायत तुतानखामेनने त्याचा पोपट केलाय. मला शिट्टी वाजवता येत नाही. उगीचच इकडून तिकडे गेले वारे टाईप शिट्टी वाजवली तरी तुतानखामेन वर येतो.’प्रिय’ला मात्र तो जाम दाद देत नाही.एकीकडे चुटकी वाजवली की दुसरीकडेच जातो.टँकमध्ये लाटा काय तयार होतील अशी शिट्टी वाजवली तरी ढिम्म एकाच जागी बसून राहतो.’मंदुडं सालं!’ असं करवादून ’प्रिय’ कंटाळून चालता झाला की तुतानखामेन मान झटकत मजेशीर एक्स्प्रेशन देतो.
कधीकधी मात्र जाम लहरीपणा करतो. खात नाही, पोहत नाही. झाडाचा आडोसा घेऊन पुढचे दोन पाय डोळ्यांवर घेऊन स्वस्थ पडून राहतो...दिवसेंदिवस! त्याचे आवडते लाल रंगाचे फ़िश-फ़ूडचे लाल दाणे, कोथिंबीर टाकली तरी त्याचा मूड सुधरत नाही. कुठं दुखतंय खुपतंय...तर ते ही कळत नाही. मला एकतर कासवाची भाषा पण येत नाही. त्याचं असं वागणं जीवाला लागून राहतं. माझा मूड बूटात गेलेला पाहून मग ’प्रिय’ कुठूनतरी एक व्हेट पैदा करतो. सगळे सोपस्कार होऊन तासाभरात तुतानखामेनने एक लॅप मारला की माझा सुधारलेला मूड बघून ’प्रिय’चा जीव भांडयात पडतो.
दोन महिन्यात तुतानखामेन एक इंच तरी वाढला असेल. वाढ्त्या वयाबरोबर त्याचे ’मी भी सजीला कुछ कम नाही ’म्हणत नखरे सुरु झालेत. एवढ्या लहान वयात हे उद्योग तर हा मोठेपणी काय करेल? असा प्रश्न मी हटकून ’प्रिय’ ला विचारते तेव्हा तो अस्पष्ट ’ढवळ्याशेजारी..’ असं काहीतरी बोलल्याचं ऐकू येतं पण ते मी सवयीने कानाआड करते.
वाढ होत असताना कासवाची कातडीही सापाने कात टाकल्यासारखी उलून निघते.तुतानखामेन मजेत सन-बाथ घेत फ़ेस-पॅक काढल्यासारखी कातडी पील-ऑफ़ करत बसलेला असतो. निकॉन घेऊन हवा करणारया ’प्रिय’च्या एखाद्या मित्राला ’तू भी क्या याद करेगा’ म्हणत पोझ-बिझ देत असतो.या सर्वामध्ये माझ्याकडे डोळे मिचकावून बघायला मात्र विसरत नाही.
माझ्या एक्स्ट्रा-ह्युमन सग्या सोयरयांची संख्या आता मोजण्यापलीकडे गेलीये. पुण्यात तर माणसांना माणसांशी सोंड सोडून बोलल्याशिवाय राहता येत नसल्याने मी या जगाच्या दृष्टीने मुक्या प्राण्यांशीच मैत्री केलीये. ’तुतानखामेन’ हे त्यातलं मजेशीर पर्व. ’प्रिय’ला काही तुतानखामेनचा सांभाळ जमत नाहीये. सारखा वसवस करत असतो. त्याला नाही झेपलं तर मीच तुतानखामेनला दत्तक घेणारेय. बघूयात!

माझी सुपरवायझरगिरी!

वर्षभर केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेवर लिहीत असताना समोर उगीचच हवा करत बसलेला ’सुपरवायझर’ हा प्राणी मी अनेकवेळा बघितला. पण हा रोल मला करायला लागेल अशी सुतराम कल्पना मला तेव्हा नसली पाहिजे. बॉयफ़्रेंडबरोबर त्याची उगाचच पाचकळ बडबड करणारी बहीण कशी गळ्यात पाडून घ्यावी लागते तशीच आर्थिक स्वावलंबनासाठी पत्करलेल्या या नोकरीबरोबर हे सुपरवायझरगिरीचंही झेंगट माझ्या गळ्यात पडलं.

मे-जून हे आम्हा इंजिनीयरींगवाल्यांचे परीक्षांचे दिवस. बाकीचे जग जेव्हा सुट्टीवर असतं तेव्हा आम्ही पेपर वाटत तरी असतो किंवा तपासत तरी असतो.मुलांना शिकवणं हा एक इंट्रेस्टींग पार्ट तरी असतो पण पोरं पेपर कशी लिहीतात हे तीन तास नुसतं बघत बसायचं किती कंटाळवाणं काम असेल?पण वर्षाकाठी दोनदा एरंडेल प्यायला लागल्यासारखं वर्षात दोनदा कामाचा हा कंटाळवाणा भाग उरकावाच लागतो.

मला डयुटी मिळाली आणि मी उत्तरपत्रिकांचं बंडल घेऊन वर्गावर पोहोचले तरी वर्ग उघडलेला नसला की माझं टाळकं सरकतं.फ़ोनवरून माझी आणि खालच्या मजल्यांवरची गरमागरमी झाल्यावर मंद हालचाली करत एक शिपाई कुठूनतरी उगवतो आणि माझ्यावर कोटी कोटी उपकार केल्याच्या आविर्भावात मला वर्ग उघडून देतो.तोपर्यंत बाहेरच्या कॉरीडॉरमध्ये मुलांनी माज घातलेला असतो.एवढी सारी मुलं असतात पण अभ्यास पूर्ण झालाय आणि वर्ग उघडल्या उघडल्या आत येऊन शांतपणे बसलाय असा एकही मुलगा माझ्या या कॉलेजातल्या दोन वर्षातल्या कारकीर्दीत मला बघायला मिळालेला नाही. शेवटच्या सेकंदापर्यंत रिव्हीजन पूर्ण न व्हायला ही मुलं पूर्ण टर्मभर काय वडे वळत असतात की काय कोण जाणे?त्यांची वर्गात येण्याची लक्षणं दिसत नाही म्हटल्यावर आपल्यालाच सूत्रं हातात घेऊन त्यांना हल्या हल्या करत वर्गात घुसवावे लागते.त्यांना पेपर वाटणे, पेपरचे नंबर चुकीचे असतील तर ते परत घेऊन नवीन आणायला त्या सदम शिपायाला बाबापुता करून खाली पाठवणे, रोल नंबर कसे भरावेत याच्या सूचना देणे, हॉलतिकीट विसरल्याने रडून हलकल्लोळ घालणारया मुलीला शांत करणं, हॉलतिकीटाची नक्कल आणायला तिला खाली पाठवणं, कोणाकडे मोबाईल्स, कॅलक्युलेटर्सची कव्हरं नाहीत ना हे पाहणं,मुलांच्या वेंधळेपणाला सुगीचे दिवस आल्यासारखे बरयाच जणांनी रोल नंबर्स चुकीचे भरलेले असतात त्यांना दंड भरायला लावणे, तो दंड शिपायाकडे देऊन त्याची पावती बनवायला त्याला खाली पाठवणे ही कामं मला अवघ्या दहा मिनीटात आटपायची असतात.हे सगळे सोपस्कार आटपेपर्यंत मी बारा घरची धुणीभांडी केल्यासारखी थकून जाते.तोपर्यंत प्रश्नपत्रिका येतात आणि बेल वाजल्या वाजल्या पेपर हातात मिळेपर्यंत पळ अन पळ युगासारख्या भासणारया त्या पोरांना अजिबात निराश न करता ३० सेकंदांमध्ये त्या वाटायच्या असतात. कधी प्रश्नपत्रिका कमी पडतात, कधी चुकीच्या ब्रांचच्या प्रश्नपत्रिका येतात. मुलांची गडबड, त्यांचे प्रश्न, शंका निस्तरायच्या असतात.एव्हाना त्या सगळ्यांची उस्तवार करता करता मला मुलाबाळांच्या गराडयात बसलेल्या टेंपररी जिवतीसारख फ़ील यायला लागलेला असतो!मला इकडेतिकडे पळवून मुलांचं समाधान झालं की मुलं आपापल्या पेपर्सकडे वळतात आणि मी हुश्श करते. आता निदान ४५ मिनीट्स तरी ’मिस, सप्लीमेंट!’ ची आरोळी येईपर्यंत पोरांचा काही त्रास होणार नसतो.तोपर्यंत आमचे चीफ़ कंडक्टर आणि सिनीयर सुपरवायझर येऊन मुलांना त्याच त्याच धमक्या देऊन जातात. नाटकात जास्त स्कोप नसला की कसे तेच तेच संवाद पुन्हा पुन्हा येत जातात?चुकीच्या पात्राने नको तेव्हा एंट्री मारली की समोरचं पात्र कसं लोंबकळत "ऊमम न्य़ूम." करत राहतं?तशी काहीशी माझी अवस्था ह्या लोकांनी एंट्री मारल्यावर होऊन जाते. त्यांचं धमकी-सत्र पुरं होईपर्यंत काय करावं हे न सुचून मी उगाचच दीड पायावर झुलत बसलेले असते. एकदा का ही लोकं येऊन गेली की मी निवांत आपला पर्यवेक्षक-रिपोर्ट भरायला बसते.

इंजिनीयरींगच्या असाईनमेंटस लिहिल्यावर मान मोडून छापावं लागेल असा कुठलाही जॉब घ्यायचा नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. Now, Here I am! प्रत्येक ब्रांचचे ६ असे रिपोर्ट भरताना ’कुठल्या खातेरयात येऊन पडले मी?’ असा विचार येऊन भ्या करून टाळा दाखवत रडत बसावेसे वाटते.त्या हिडीस पिवळसर रंगाच्या शीट्स, कार्बनपेपरने काळेकुट्ट झालेले हात बघून माझाच मला उबग यायला लागतो.

एकदा का हे रिपोर्ट्स बनवून संपले की मी वर्गात गस्त घालायला मोकळी होते.ती पोरं बिचारी पेपर लिहीत असतात.त्यांना आमच्या’ मला तुझा इरादा माहित्येय हो..पण मी तो काही तडीस जाऊन देणार नाही’ या टाईपच्या ट्फ़ लुक्सशी काहीच घेणेदेणे नसते. दु:खद अपवाद अर्थात असतात.गस्त घातली काय किंवा त्यांच्यासमोर रामा डान्स केला काय,एकच गोष्ट असते.

माझ्यासमोर ४० मुलं पेपर लिहीत असतात आणि ४० जणांच्या ४० वेगवेगळ्या तर्हा असतात. कोणी हवेत हातवारे करून आकृती आठवत असतं, कोणाचा लिहीता लिहीता ओठांचा चंबू झालेला असतो, कोणी उत्तर आठवत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला असतो,तर कोणी पेपरकडे बघत ’शक’ शी साधर्म्य असणारा ’फ़’ने सुरु होणारा शब्द बारंवार उच्चारत असतो.कोणी सुटलेली ढेरी त्यामानाने छोट्या बेंचशी adjust करत असतं, कोणी दर दोन मिनीटांनी आपले पेन झाडत असतो, कोणी सारखा घाम पुसत असतो तर कोणी बॅक-अप म्हणून आणलेल्या बादलीभर पेनांची चाळवाचळव करत असतो.कोणी पठ्ठया अर्धा तास उशिरा उगवून वर माझेच पेन पेपर सोडवायला मागतो.शर्टाची वरची बटणे उघडी सोडून आपल्या केसाळ छातीचे प्रदर्शन करणारया मेकॅनिकलच्या पोराने मिकी माऊसचे लाल-पिवळे चित्र असलेली कंपास-बॉक्स आणलेली असते.ती ही डबल-डेकर!या सगळ्या वल्लींकडे बघून मला हसण्याचे उमाळ्यावर उमाळे येत असतात.मला हसताना पाहून आपली सुपरवायझर येडी आहे.बघावं तेव्हा हसत बसलेली असते म्हणून ती पोरंही एकमेकांकडे बघून खांदे उचकत असतात.

सुपरवायझर्स ना मिळणारया सोयी हा आमच्या कॉलेजमध्ये फ़ार दुर्लक्षित प्रकार आहे. आमचे पाय आम्हाला मिळणारया डयुटीबरोबर भाडयाने दिलेले आहेत आणि त्यांचं भाडं पुरतं वसूल करायचंय या आवेशात ही मंडळी आम्हाला ट्रीट करत असतात. तीन तास त्या खोलीत आम्ही गस्त घालत उभं रहावं, अजिबातच बसून नये अशा काहीशा अचाट अपेक्षा आमच्याकडून केल्या जातात.सुपरवायझरला बसायला खुर्ची नसते. मी ती भांडून मिळवते.प्रत्येक सुपरविजनपाठी मला ४० रुपये मिळतात. म्हणजे त्या वर्गात हजर असणारया प्रत्येक मुलापाठी १ किंवा सव्वा रुपया...दक्षिणेसारखा! ४० रुपयात काय आम्ही शहीद व्हावं असं यांना वाटतं की काय कोण जाणे?

सुपरवायझरला चहा मिळतो. How Lovely is that!पण दुपारच्या सेशनच्या डयुटीमध्ये म्हणजे ३ ते ६ मध्ये चहा ची गरज ही साडेचार-पाच ला असते. तर या लोकांचा चहा ३ला मी पेपर वाटले नाहीत की ३-०५ ला हजर असतो.How Inconveniently Efficient!

दीड तासाने मग येतो रिलीव्हर आणि त्या कोंडवाडयातून ’फ़क्त १० मिनीट’ अशी तंबी देऊन सुटका होते.’परसाकडे’ वगैरे लागली असेल तर ते सगळे आटपून काहीतरी च्याऊम्याऊ तोंडात कोंबून वर्गाकडे धाव घ्यावी लागते कारण ११ व्या मिनीटाला तुम्हाला शिव्यांचे धनी व्हायला लागते.वर्गात दाखल होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पुरवण्या मागण्याचा सपाटा सुरु केलेला असतो.माझ्या मजल्यावरच्या त्या हतप्रभ, हतवीर्य शिपायांनी पुरवण्या आणेपर्यंत मुलांनी मला त्राही भगवान करून सोडलेले असते. पण कुठेही आवाज नसतो. यावेळी पास-आऊट होणारी बॅच आणि माझ्या वयामध्ये फ़क्त तीन बर्षाचा फ़रक आहे तरीही मुलं मला फ़ाट्यावर मारून न जुमानता हवं ते का करत नाहीत? सिरीयसली का घेतात? हा माझ्या कलीग्सचा शोधाचा आणि जलसीचा भाग आहे.मला नजरेची आणि आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे जरा कुठे संशयास्पद हालचाल झाली की नजरेने जरब बसवता येते. आणि आवाज वाढला की सातपट आवाज लावून झापलं की फ़रक पडलाच पाहिजे.मुलं पुरवण्यांवर पुरवण्या मागत असतात, मी तोल न ढळू देता ती मागणी बाहेरच्या शिपायाकडे फ़ॉरवर्ड करत असते. मुलांनी मागे-पुढे बघत उत्तरं टॅली करण्याचा प्रयत्नं सुरु केलेला असतो,तो हाणून पाडायचा असतो.डोके गमावलेल्या मुरारबाजींसारखी मी एकटीच सगळ्यांना तोंड देत उभी असते.आणि मग होते पेपर संपायला दहा मिनीट्स उरले हे सांगणारी बेल. आता शेवटचे दहा मिनीट्स तरी माझ्याकडे कोणीही पुरवणी मागणार नसते.पण माझी कामं कधी संपतच नाहीत. प्रत्येकाला पेपर लिहिण्याच्या समाधीतून बाहेर काढून पुरवणी बांधायला लावणे, पुरवण्यांचा आकडा लिहायला लावणे हे करवून घ्यायला लागते.आणि पेपर संपल्याची बेल होते. प्रत्येकाकडून पेपर जवळजवळ हिसकावून घेऊन ते मोजेपर्यंत वर्गात कुजबूज सुरु झालेली असते. क्वचित वेळी पेपर राहिला म्हणून एखादी रडत असते. उत्तर काय आलं म्हणूण एखाद्या स्कॉलर मुलाला सगळीकडून प्रश्नांचा भडीमार होत असतो, आपल्याला अचानक डिमांड आलेला पाहून तो भाव खात असतो, आपल्याला ४० मार्क तर मिळणार ह्याची खात्री पटल्याने एखादा मुलगा आनंदलेला असतो.किती संमिश्र भाव!मुलांचं भवितव्य असं हातात घेऊन जाताना वर्गात शेवटची नजर फ़िरते आणि खिडकीजवळच्या बेंचवर जिभेचे टोक नाकाला लावून पेपर लिहीणरी ३ वर्षापूर्वीची मीच मला दिसायला लागते.

मी ह्या नोकरीत कधीही रमले नाही. अशी नोकरी हे माझे ध्येयही नाही. पण काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात तशी ही नोकरी. पुरेसं आर्थिक पाठबळ घेऊन आता मी ही नोकरी सोडणार आहे आणि अभ्यासाला दिल्लीला पळणार आहे. ह्या वेळची सुपरवायझरगिरी ही शेवटची म्हणून उल्लेखनीय, बाकी काही नाही.हातून घडलेली काही मुलं आणि नॉस्टॅल्जियाचे काही क्षण, एवढीच यातून कमाई!

रतिमग्न!

आमच्याकडे नुकताच केबलचं कनेक्शन घेतलं.
लहानपणापासूनच नॅशनलवरचे प्रोग्राम्स बघत वाढलेल्या आम्हाला खाट-खाट बटणं दाबत चॅनेल सर्फ़िंग करणं जामच मानवलं. आणि त्यातून आम्ही ’असली तसली’ चॅनेल्स बघणारयांतले नसल्याने डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफ़िक, ऍनिमल प्लॅनेट गेला बाजार कार्टून नेटवर्क अशी आलटून पालटून वर्णी असते.
मला दोन भावंडं. दोघांच्या तीन त~हा. कोणाला एक काहीतरी बघायचं असतं तेव्हा दुसरा काहीतरी वेगळंच बघायचं म्हणून तंटायला लागतो.
मी या भानगडीत सहसा पडत नाही.
परवा घरी कोणीच नव्हतं त्यामुळे रिमोटचा ताबा पूर्णपणे माझ्याकडे होता.

सर्वात पहिले अर्थात टॉम ऍंड जेरी! एक तास हसून हसून गुळी झाल्यावर डिस्कव्हरी लावलं.त्यावर सापांबदल डॉक्युमेंटरी होती. डिस्कव्हरीचे हे कॅमेरामन्स कुठे लपून बसतात काही कळत नाही पण त्यांनी आपल्या कॅमेरात अत्यंत विरळा, मनमुक्त सर्प-शृंगार पकडला होता.

रहस्यमय संगीताच्या सलामीवर दोन तीन झुडुपं असलेल्या रखरखीत भागात लिंबासारखी पिलळीधम्मक कांती असलेले दोन साप अचानक कुठूनतरी उगवले आणि एकमेकांना समांतर सरपटत कॅमेरयाच्या दिशेने यायला लागले. अधून मधून एकमेकांच्या अंगाला निसटता स्पर्श करत होते. कधी नुसती कुरवाळत होते, आलिंगन देत होते आणि नवलाची गोष्ट अशी की हे असं अंगाला अंग घासणं, कुरवाळणं ही त्या सापांची प्रणयचेष्टा आहे हे माझ्यापर्यंत स्वच्छ पोहोचत होतं.

हळूहळू त्यांच्यातलं अंतर कमी कमी व्हायला लागलं आणि मागे अरेबियन नाईटसच्या काळातला फ़ील देणारं संगीत एकदम धूसर धूसर होत गेलं.त्या सापांच्या हालचाली आता अर्धनिद्रितावस्थेत व्हाव्या तशा होऊ लागल्या.आता त्या दोन सापांनी एकमेकांना मिठी मारणं सुरु केलं. एकमेकांच्या शरीराचे रबरी विळखे एकमेकांना पडत होते, सुटत होते.विळखा सैल होतोय तर कधी करकचून एकमेकांना पिळून काढतोय.विळखा सुटतोय, सैल होतोय.सुटतोय, सैल होतोय.मधूनच एखादा साप उंच फ़डा काढत होता. पण हा फ़डा नेहमीसारखा आक्रमक नव्हता वाटत.त्याच्यात मदनाची मस्ती शिगोशिग भरलेली होती.त्यांच्या प्रत्येक हालचालीत उन्माद होता.खोलवर रुतून बसलेल्या दोन आठवणी असाव्यात आणि त्यांना एकमेकांपासून विलग करता येऊच नये अशा आठवणींसारखे ते धुंद साप एकमेकांपासून विलग करता येऊच नये इतक्या आवेगाने एकमेकांना बिलगत होते. तो आवेग, तो विखार, तो उन्माद शेवटी अशा एका उत्कर्ष-बिंदुला जाऊन पोहोचला की दोघांनी एकमेकाला करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी गाढ होती की त्या दोघा सर्पांचा मिळून एक सर्प झाला..इतका एकजीव. अनावर आवेगाने मोहरत तो काही काळ शेपटीवर उंचच उंच उभा राहिला आणि मग जमिनीवर कोसळत गडाबडा लोळायला लागला. त्या दोन्ही शेपट्या ताठरून वलवळत राहिल्या, ताठरत राहिल्या, झटके देत राहिल्या.

हा मनमोकळा शृंगार एकाच वेळी भयप्रद पण त्याच वेळी मंत्रमुग्ध करणारा होता.५-१० मिनीटांचाच काय तो विलक्षण थरार!पण खिळवून ठेवणारा.

माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीच्या शृंगाराच्या कल्पना या सगळ्या पुस्तकी असतात. थोडासा तळागाळातल्या लोकांशी संवाद असल्याने चाळीच्या एका खोलीत आई-वडीलांचा शृंगार नजरेस पडल्याने आयुष्य उध्वस्त झाल्याची उदाहरणं ऐकलेली, पाहीलेली आणि वाचलेली! अगदी लहानपणी आई घाईघाईत बदलून टाकलेल्या कुठल्यातरी एका चॅनेलवरचा काहीएक सेकंदांपुरता नजरेस पडलेला रेप जळत्या रेषांनी कोरला गेलेला.त्यामुळे ’शृंगार’ पाहणं ही अत्यंत स्फ़ोटक वस्तू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.मग तो माणसांचा असो वा प्राण्यांचा. दोघांमधली जवळीक हा अत्यंत खाजगी विषय असून तो पॉर्न किंवा ब्ल्यू फ़िल्म मधून चव्हाट्यावर आणणारयांचा मला राग आहे. आणि अशा फ़िल्मस पाहणारयांची, रस्त्यावरच्या कुत्र्यांचं झोंबणं मन लावून बघणारयांची मानसिकताही मला समजू शकत नाही.पण मी हा शॄंगार पाहिला.आणि काहीतरी अनैतिक बघितल्याची भावना नाही झाली. त्यांच्याबरोबरीने त्यांच्या थरारात मी बुडून गेले होते. कानशिलं सरसरून तापली होती. खुर्चीच्या हातांमध्ये हात गच्च रुतले होते.

माझ्या ओळखीतल्या अनेक आस्तिक किंवा गुरु केलेल्या लोकांकडून हा शृंगार पाहणं वर्ज्य असल्याचं आणि तो पाहणारयांना प्रायश्चित घ्यायला लागल्याच्या अनेक सुरस कथा मी ऐकल्या आहेत.मी हे ही ऐकलेय की हा शृंगार पाहायला मिळणं ही गोष्ट फ़ार विरळा!आणि आता एकदा पाहिल्यावर कोणाला बघायला मिळाल्यास चुकवू नये असाच.

मी खजुराहोची शिल्प जाणतेपणी पाहिलेली आहेत. त्या शिल्पांची ’नर-मादी मधला सेक्स’ अशी संभावना कोणीच करणार नाही.ती जोडपी एकमेकांत इतकी गुंगून गेलेली वाटतात, एकाच वेळी उन्मादक आणि काव्यमय की त्यांना ’रतिमग्न’ हा शब्दच चपखल बसतो!

त्या दोन सापांच्या मिलनाला सर्प-शृंगार हेही नाव देता आलं असतं पण..

मी..स्वप्नं आणि..ऑडीटी..!

"आज मला एक स्वप्न पडलं..त्यात ना..."
मला बाई दुसरयांची स्वप्नं ऐकायची जाम हौस..
आणि माझी ही किर्ती दिगंतात पसरली असल्यामुळे कुणाला काही विचित्र स्वप्न पडलं की तो "माऊ...You gotta hear this man!" म्हणत माझ्याकडे आलाच पाहिजे..
सगळ्यांचे पॅटर्न्स बहुधा सारखेच...
स्वप्नात कोणी मरतं तर कोणाला कोणीतरी दिसतो..कोणाचे विवाहबाह्य संबंध होतात (स्वप्नांमध्ये बरं का!)...तर कोणाला धनलाभ होतो...
तोचतोचपणा..
पण मला जशी स्वप्नं पडतात किंवा मी ज्या प्रकारची स्वप्नं पाहते तशी पाहणारं मला आजतागायत कोणीही भेटलेलं नाही..
आता ’प्रिय’चे उदाहरण घेऊ..
माझं अकलेचं डिपार्टमेंट कुठेतरी डागडुजीला दिलंय आणि ते माझ्यावतीने लीजवर दिल्यासारखा चालवतोय अशा आविर्भावात तो वावरतो..
त्यामुळे तो माझं कुठलंही बोलणं मनावर घेत नाही..जे घ्यायला हवं ते सुद्धा!
कधीकधी फ़ार वाटतं की आमच्यामधले हे वयाचे, प्रगल्भतेचे अंतर पार करून मी झटक्यात त्याच्या बरोबरीने यावं म्हणजे ऍटलीस्ट तो मला सिरीयसली तरी घेईल..
मी ३ वर्षांनी मोठी आणि (होपफ़ुली) मॅच्युअर होईन तेव्हा तोही तेवढ्याच चढत्या भाजणीत प्रगल्भ झालेला असणार...त्यामुळे ही परिस्थिती बदलणं संभव आहे असे मला वाटत नाही...
पण..
स्वप्नांमध्ये हे सहज शक्य असतं..
मी चेहरा लांब करून काहीतरी निर्वाणीचे बोलतेय आणि ’प्रिय’ ते अजिबात न हसता गंंभीरपणे ऐकून घेतोय..
मी त्याला ’हुंब कुठला’ म्हणते आणि मला जीव काढील असा चिमटा बसत नाही...
माझे जे काही वाईल्ड इमॅजिनेशन असेल..म्हणजे कानाची पाळी दुसरया कोणीतरी चावल्यानंतर नक्की काय होते?..वगैरे वगैरे.. ते ’प्रिय’च्या दाट भुवयांच्या वरच्या आणि खालच्या (डोळे आणि आठया) कुठल्याच गोष्टीला न जुमानता सांगते आणि त्यावर त्याचे कुचकट "कुठे शिकलात हे आपण?" ऐकायला मिळत नाही..
आहाहाहा...काय पण विशफ़ुल थिंकींग!
वास्तवात या गोष्टी किती अशक्यप्राय आहेत याची मला पुरेपूर कल्पना आहे..त्यामुळे माझ्या या इच्छा मी माझ्या स्वप्नांमध्ये पुरया करून घेते..
तर ही झाली बेसिक ओळख...
माझ्या स्वप्नांची महती इथवरच नाही संपत..
माझ्या स्वप्नांची वैशिष्ट्ये खालीलप्रकारे:
(१) मला स्वप्ने नुसतीच पडत नाहीत तर मला ती ’पाडताही’ येतात..
(२) रात्री ज्या विषयाचा विचार करत झोपेन त्या विषयाची स्वप्ने मला हटकून पडतात..
(३) सकाळी उठल्यानंतर मला ती तंतोतंत आठवतात..
(४) माझी स्वप्ने ३-D आणि इस्टमन-कलरमध्ये असतात..
(५) माझ्या स्वप्नांमध्ये परदेशातलं निसर्गसौंदर्य, सीन-सीनरी, कॉस्च्युम्स, साऊंड इफ़ेस्ट्स खच्चून भरलेले असतात..म्हणजे नुसतंच ब्लॅक बॅकग्राऊंडवर व्हाईट स्वप्न पडतंय (किंवा व्हाईटवर ब्लॅक), घासलेल्या रेकॉर्डसारखा किंवा बिघडलेल्या रेडीयो सारखा हिणकस आवाज येतोय असं मुळीच होत नाही..
(६) आता पडत असलेल्या स्वप्नात मी झोपलेले असून त्या स्वप्नातल्या झोपेत मला आणखी एक स्वप्न पडते आहे...मग त्या स्वप्नात आणखी एक स्वप्न ...अशी स्वप्नांची गुंतागुंत असूनही प्रत्येक स्वप्नात मी नक्की काय केलं हे मला नीट सांगता येतं...
वगैरे वगैरे वगैरे...
मला दिवसा कधीच झोप लागत नाही त्यामुळे रात्रीचा तो ७ तास झोपेचा काळ अगदी शो-टाईम असतो..
तुकडयातुकडयाने दिसणारया या स्वप्नांमध्ये मी आय.ए.एस ऑफ़िसर होऊन कुठेसं चांगलं काम करतेय..लोकं मला दुवा देतायेत..अशा आशयाचं स्वप्न हटकून असतं...जे आज ना उद्या सत्यात येणारच आहे..पण इतर तुकडयांमध्ये अतर्क्य तरीही मजेदार असं बरंच काही दिसतं..
म्हणजे मी अशी मांडा ठोकून, दूधात सर्फ़ एक्सेल घालून ढवळत बसलेय...त्यातून एक मोठा बुडबुडा निघतोय..मी त्या बुडबुडयात बसून मी थेट पुण्यात येऊन पोहोचते..सदाशिव पेठेतल्या ’प्रिय’च्या घरावर त्या बुडबुडयाला ब्रेक मारून ’प्रिय’ला फ़ोन लावते...
आणि माझ्याशी बोलताना तो एक्झॅक्टली किती वेळा डोळे कपाळात नेतो हे मोजून काढते..
???
कशाचाही कशाला संबंध नसतो आणि मी अचानक उडायला बिडायला लागून पुण्याला जाऊन पोहोचते..
किंवा मी गरूडाच्या नाकाला मन लावून सँड-पेपर घासतेय..आणि घासून झाल्यावर ’मी कसली जबरदस्त आहे’ अशा आविर्भावात मान वाकडी करकरून पाहतेय..
किंवा चिवित्रतेचा परमावधी... मागं पिसं लावलेल्या कोंबडीसारखा ’प्रिय’पाय उडवत नाचतोय..आणि त्यावर मी लाहीसारखी उडत खिदळतेय..
?
?
.
.
माझी स्वप्नं म्हणजे ’वसुधैव कुटुंबकम’चा आदर्श नमुना आहेत..ज्यांना कशाचे म्हणता वावडे नाही..
माझ्या स्वप्नांमध्ये बिल्डींगमध्ये शेपटी फ़िस्कारत फ़िरणारया काशीबाई, अभिषेक बच्चन, ’फ़ाईंडींग नेमो’ मधला नेमो, टॉम हँक्स, कुबड्या खवीस, किरण बेदी, सिंबा, मॉली आणि सॅम, तात्या विंचू, बालभारतीमधले अजबराव, श्यामची आई ...सगळे मिळून अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतात..
म्हणजे स्वप्नातल्या स्टोरीपेक्षा साईड कास्टींग तगडी...
यातली नॉन-मराठी, अभारतीय पात्रं माझ्या स्वप्नांमध्ये एकदम फ़र्ड मराठी बोलतात..
माझ्या स्वप्नांमध्ये पाहुणे मंडळी सुद्धा चक्कर मारून जातात..म्हनजे कधीमधी रजनीकांत तर कधी टी.एन. शेषन...कधी झुंपा लाहिरी तर कधी गौरी देशपांडे...
नेमक्या सणाच्या दिवशीच बक्षिसीसाठी कचरा काढायचे केवळ नाटक करणारा बिल्डींगमधला कचरेवाला सुद्धा कधीमधी दिसतो..
कधीकधी रंगीत फ़ुलाफ़ुलांचा फ़्रॉक घातलेली तान्हुली ’प्रिय’च्या पोटावर पालथी पडून तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना दिसते तर कधी तिच्याशी लाडेलाडे गिबरीश बोलणारा ’प्रिय’ दिसतो..
माझ्या स्वप्नांमध्ये माझे तिथे काहीही चाललेले असो मॉली आणि सॅमनी "I love you!","Ditto!"चं पालुपद लावलेलं असतं तर नीमोने काशीबाई आणि कुबडया खवीस बरोबर पकडापकडीचा डाव मांडलेला असतो..किरण बेदी तात्या विंचूला झाड-झाड झाडत असतात तर काशीबाई आणि सिंबा दोघेही मिळून अजबरावांवर उचकलेले असतात..
थोडक्यात सगळ्यांनी मिळून माझ्या स्वप्नामध्ये माज घातलेला असतो...
.
.
.
३ वर्षांपूर्वी माझ्या स्वप्नांना ’इतकी’ डायमेन्शन्स नव्हती..
इंजिनीअरींगच्या वर्षांमध्ये तर मी स्वप्नात माझी राहून गेलेली असाईनमेंट लिहून काढायचे आणि सकाळी उठून तिला तशीच अर्धवट पाहून दुप्पट थकून जायचे..
स्वप्नं तशीच रंगीत ...पण सगळी डल..
आता’ घोस्ट’मधल्या मॉलीसारखी मीही रात्र रात्र जागून( म्हणजे स्वप्नातल्या रात्रीत जागून) चित्रविचित्र आकाराची भांडी बनवते...’घोस्ट’मधल्या भांडी बनवण्याच्या प्रसंगानंतरच्या आफ़्टर-इफ़ेक्ट्सकट!
माझ्या स्वप्नांमध्ये जे रंग आहेत किंवा थोडंफ़ार वैविध्य आहे..फ़्रेशनेस आहे तो ’प्रिय’मुळे आहे...
मला ’ट्रॅजिक’ स्वप्नं कधीही पडत नाहीत..ते केवळ मी सदैव आनंदी असल्यामुळेच हे मी त्या स्वप्नांमध्येही विसरत नाही...
त्यामुळे माझी झोप ही ’प्रिय’ला ’चितळे’च्या काजू-कतलीचा १ किलोचा डब्बा देऊनच संपते...दररोज..
आणि या ’अशा’ स्वप्नांमुळे मी मलाच ऑड वाटायला लागते...
मला भेटलेल्या १० माणसांपैकी किमान दोघांना माझ्यासारखी स्वप्नं पडत असती तर एकवेळ ठिक होतं..
पण आजपावेतो कोणीही नाही भेटलेलं असं..
असो..माझं जगच छोटं असलं पाहिजे..
मग मला कुठे तरी वाचलेलं "मनात का आले, स्वैर स्वप्न काही..चित्त कोठे जाई-भटकाया" अशा आशयाचं काहीसं आठवतं..
बेदम हसायलाच येतं..

बडी देर भई..!

परवा आनंदी आणि सुब्रतोचा ब्रेक-अप झाला...ऑफ़ीशियली!!
२ वर्षापासूनचं लळत-लोंबत पडलेलं प्रकरण संपलं एकदाचं..आणि मला जी पाचर ठोकली गेली होती ती ही निघाली एकदाची!!
बेसिकली तिच्याहून परस्पर भिन्न अशा सुब्रतोमध्ये तिला काय आवडले कुणास ठाऊक???
म्हणजे त्याचे वाडगाभर भात आणि बरोबर माछेर जॉल फ़न्ना करणारे तोंड पाहून कोणाला काही रोमॅंटीक वाटण्याची सुतराम शक्यता नाही असे मला ठामपणे वाटायचे...पण या बयेला ते क्युट वाटले..
पाच पाच वाट्या दह्या खात ’मोई मिष्टी दोही’ आळवताना त्याचे डोळे लुकलुकायचे ते आवडायचे म्हणे तिला...मी म्हटले घंटा...!
आणखी काय बोलणार???
वेडाचार चालला होता दोन वर्षे..
सुब्रतो, मी, आनंदी आणि विशू ही आमची चौकडी बंगाली वर्गांमधली...
सुब्रतो आम्हाला बंगाली शिकवायला होता.
तसा तो साधारणच होता..टिपीकल बंगाली!!!
वंग पृथांनी...आयांनी..मावशांनी अतिशय लाडावून ठेवलेला पुरुष...ढेरी बाहेर आलेला..
पण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी अतिशय विसंगत होते त्याचे डोळे..
काळेभोर...निर्व्याज तरीही कशाचा ठाव न लागू देणारे...बरंच काही होतं त्या डोळ्यांमध्ये..
गुरुदेवांच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या...त्या बोलून दाखवताना त्याचे डोळे असे काही लक्खन तेजाळून उठायचे..
आनंदीला तो आनोंदी म्हणायचा...
विशू जाम वैतागायचा..म्हणायचा..."फ़ोफ़्शा...आणखी एकदा म्हणत तिला आनोंदी...नाही चार-पाच बुक्क्यांची नोंद तुझ्या दोंदीवर केली तर बघ.."
त्यावेळी हसून गुळी व्हायची..तो ही विशूच्या शालजोडीवर काही न कळून पोट गदगदवून हसायचा.
आमच्यात पहिला ताण आला ते आनंदीने ती सुब्रतोच्या प्रेमात पडलीये हे आमच्याकडे जाहीर केलं तेव्हापासून..आम्ही मुळासकट हादरलो...
कुठे आनंदी आणि कुठे सुब्रतो...दोन टोकाची माणसं..
आनंदीसारखी प्रगल्भ आणि स्मार्ट मुलगी गीतांजली पाठ असणं आणि काळेभोर डोळे एवढी पुंजी असलेल्या माणसाच्या प्रेमात पडू शकते हा एक नवीनच साक्षात्कार आम्हाला झाला..
ऑफ़ ऑल द पीपल इन द वर्ल्ड...सुब्रतो???
काय म्हणणार??
आता नातं कधीतरी तुटणारच आहे म्हणून जीव लावायचाच नाही ही लॉजिक कुठल्या हजामाचं आहे??
कुठल्याच हजामाचं नाही...कारण ते सुब्रतोचं मत होतं....
त्याचा म्हणे अशा नात्यांवर विश्वास नव्ह्ता..कुठलंही नातं काहीतरी मोटीव्हनेच जोडलेलं असतं असा त्याचा ठाम विश्वास होता..आणि या कार्टीला तेच ’तीव्र असे काही जीवघेणे’ वाटलं...
ती आपली त्याच्यात वेडीवाकडी गुंतत गेली..
मी बदलायला लावेन त्याला...असं आम्हाला ठणकाऊन सांगत!
वर्षानुवर्षे मनाशी धरून ठेवलेले समज असे थोडीच ना दूर करता येतात वेडे??
म्हटलं ठिक आहे..
सुब्रतो आणि आनंदीचं काही जमण्यासारखं नाही हे आम्हाला आमच्या पहिल्या मीट मध्येच कळले..
’कोबे सिझलर्स’ मध्ये सुब्रतोने पूर्ण टेबलवर सांडवलेलं उष्टं...तोंडाने येणारा मच्याक मच्याक आवाज..तोंडातला पुरता घास न संपवता तोंडातली शितं उडवत बोलणारा सुब्रतो जाम गिळगिळीत वाटला होता...टिप-टॉप महाराणीसारख्या राहणारया आनंदीपुढे तर फ़ारच...
पण सुब्रतो मुळे ओशाळून येवढुश्शी झालेली आनंदी आम्हाला बिलकुल ओळखीची नव्हती...
हे तिनं कसंतरी पचवून घेतलं असावं..
तिला त्याच्यात नेमकं काय आवडलं हेच तिला डिफ़ाईन करता येत नसावं असं बरयाच वेळा वाटायचं..
तिला एका इंपल्समध्ये काहीतरी आवडून गेलं असावं कदाचित...पण ते ’काहीतरी’ नंतर तिला कधीच सापडलं नाही..
तिने ते शोधायचा खूप प्रयत्न केला...नंतर सरधोपट मार्ग स्वीकारला..
रोमॅंटीक बोलणं तर सोडाच त्याला साधं आनंदी खुलेल असंही बोलता यायचं नाही..
आता असतात अशी माणसं...त्यात काही गैर नाही..पण नेमका तसाच मनुष्य अतिशय रसिक, रोमॅंटीक अशा आनंदीला मिळावा???अह...तो तिने पसंत करावा???
त्याला कधी फ़रक पडायचाच नव्हता पण तिचं चुरमडत जाणं आम्ही दिवसांगणिक पाहत होतो...तिचा आऊट झालेला चेहरा बघून कधी कधी माझं तोंड शिवशिवायचं..पोटात तुटायचं..पण विशूने नेहमी अडवून धरलं..."शी शूड लर्न हर ओन लेसन.."
"मी असाच आहे तुला माहीत होतं..""
"मी नव्हतं सांगीतलं माझ्यावर प्रेम कर म्हणून..आय वॉर्नड यू बीफ़ोर"
"मला एकटं रहायची सवय झालीये आनंदी...माझी मनाची तयारी तीच आहे...व्हाय डू यू वेस्ट युअर टाईम ऍंड माईन टू?"
अशा प्रकारची वाक्यं त्याच्या बोलण्यात वारंवार यायला लागली.
तिला त्याच्यात जे काही आवडले त्यासाठी तिने मनापासून सर्वकाही केले..शेवटी ती एक मनस्वी मुलगी होती...
पण परतून त्याच्याकडून काहीच आले नाही तेव्हा मात्र ती शहाणी झाली..
दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!
आनंदीसारख्या बरयाच मुली असतात ज्या इंपल्सवर जगतात..त्या इंपल्सशी इमान राखत आयुष्यभर झगडत राहतात...त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...
आनंदीसारख्या फ़ार कमी नशिबवान मुली असतात ज्यांना ह्या प्रकारात राम नाही हे तुलनेत फ़ार लवकर कळतं..
मलाही कधीकधी असं वाटतं की हे इंपल्सवर जगणं बिगणं हा शुद्ध येड**पणा आहे...
"मला इंपल्सवर जगणारी माणसं आवडतात" माय बट्ट...!
असं बोलणारा मनुष्य केवळ व.पुं.च्या कथेत भेटतो...आणि हे किती पुस्तकी आहे हे प्रकर्षाने तेव्हाच जाणवतं..
कारण जेव्हा आपल्यासमोर आनंदीसारखं, स्वत:सारखं जितंजागतं उदाहरण असतं तेव्हा ह्या गोष्टी हवा वाटतात..
"मला वाटलं ते मी केलं...मला त्याचे रिग्रेट्स नाहीत...उद्या मी मनाविरुद्ध जगले असं नको वाटायला" हा डायलॉग ’जब वी मेट’ मध्ये कसला भारी वाटतो ना?
रील लाईफ़ सोडून रियल मध्ये आलं की oh please...give me a break!
स्वत:ला सतत तपासत राहिलं पाहिजे...निर्णय जोखून पाहिले पाहिजेत..
क्षणिक उर्मीत मोठे निर्णय घ्यावेसे वाटले..किती अवास्तव आहेत याचा विचार केला पाहिजे..
नाहीतर..
देर भई..बडी देर भई..!