अगं अगं बशी...!!

दर शनिवारी मी बशीत बसून मुंबैला येते..
आजवर मी अनेक प्रकारच्या बशींमधून प्रवास केला..एस.टी(लाल डब्बा म्हटलं तर हल्ली एस.टी वाल्याना राग येतो असं ऐकलं!!), एशियाड, सेमी-डीलक्स, स्लीपर कोच, व्हिडीयो कोच, ए.सी, नॉन -एसी ....यू नेम इट!
पण दर शनिवारी घडणारा ’शिवनेरी’चा प्रवास मला मनापासून आवडतो..!!
एरव्ही एशियाड स्टॅंड्च्या बाहेर रिक्शाने उतरलं की रिक्शावाल्याशी हुज्जत घालून होत नाही तोवरच नीता ट्रॅव्ह्लस, मेट्रो बस, स्वप्नदर्शन तत्सम नावाच्या बसकंपन्यांचे एजंन्ट्स अंगावर चाल करून येतात..पण ती नामुष्की माझ्यावर सहसा येत नाही कारण माझं तिकीट ’प्रिय’ने आधीच रिझर्व्ह केलेलं असतं आणि तो मला गाडीने सोडायला आलेला असतो..
’प्रिय’ची प्रचंड बोंब ठोकत येणारी चेतक, पिलीयनवर त्याहून जास्त कलकलाट करणारी मी आणि मी काय बोलतेय यातलं एक अक्षर जरी कळलेलं नसलं तरी दर २ मिनीटाला मुंडी हलवणारा ’प्रिय’ अशी आमची वरात एशियाड स्टॅंड वर आली की "कोण आलं ते??" अशा आविर्भावात स्टँडवरच्या निम्म्या नजरा आमच्याकडे कुतुहलाने वळतात..
आणि..
घनघोर गवतात एखादी छोटीशी मुळी उगवावी तशी मी ’प्रिय’च्या मागून अवतरलेली पाहून बरयाच जणांच्या चेहरयावर हसू फ़ुटतं..
एवढंच पुरेसं नाही तर त्या दोन बाय दोन अंगुळे साईझच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात मग्न असलेला पेप्सीकोलाच्या साईझचा माणूसही आमच्याकडे नजर टाकून घेतो...
बसमध्ये चार तास निवांत मिळतात म्हणून मी करायला कामाची जंत्रीच आणलेली असते...त्यामध्ये राहून गेलेले वाचन, कवितांचे ड्राफ़्ट्स सुरेख उतरवून काढणे..’आज तू कसा चुकलास??’ हे १२ साईझचा एसेमेस लिहून ’प्रिय’ला पाठवणे अशी वरीच कामे येतात...
वाचनात पु.ल, चि.विं वगैरे असेल तर मी माझं नेहमीचं होहो हुई करत खिदळखोबरीसारखी खिदळते (तोंडावर हात ठेवून लाजरं हसणं बिसणं बात आमच्यात नाही)..त्यामुळे बसमध्ये काहीतरी विनोदी वाचायचा माझा बेत आहे हे ’प्रिय’च्या लक्षात आलं की तो ’आमेन!’(माझ्या सहप्रवाशांसाठी) म्हणूनच मला बसमध्ये पाठवतो...
तिकीट घेऊन शिवनेरीत शिरत नाही तोच लक्षात येतं की झाडून सगळ्यांची नाकं ऑलरेडी कपाळावर गेलेली आहेत..
उजवीकडे ’I Suffer From CRS (Cant Remember Shit!)' तत्सम अर्थाचा शर्ट घातलेली बोजी...डावीकडे टाईम्स लावून लावून वाचणारा बोजा...टिपीकल पब्लिक...
अरे यांना कोणीतरी असांगा रे...शिवनेरीत मराठीचे वावडे नाही म्हणून!!!
कोणाच्याही हातात संध्यानंद, सामना तर म्हणतच नाही मी पण गेलाबाजार सकाळही दिसत नाही..
शिवनेरीच्या एसी मध्ये आल्यवार टाईमपासच्या कल्पना पण ’शीतकटबंधीय’ होतात की कय कोण जाणे???
मी पुढच्या वेळी ’द फ़ाऊंटनहेड’ वाचायला आणणार आहे.. आणि केवळ हातातलं पुस्तक हिंग्लीश आहे म्हणून आपण आहोत त्यापेक्षा जगाला कितपत वेगळे दिसू शकतो हे बघणार आहे...
माझ्या जागेपाशी येऊन ’प्रिय’ च्या उर्ध्व लागलेल्या डोळ्यांची तमा न बाळगता मी माझ्या शेजारयाला न्याहाळून घेते...आणि मगच आपल्या सीट्वर जाऊन बसते..
शिवनेरीची सीट ही माझ्याकरता एक डोकेदुखी आहे...
सीटवर मागे डोके ठेवायच्या जागी सतत डोकं ठेवून पडलेला एक काळा डागवाला खळगा असतो..
कधी पूर्ण रिकाम्या शिवनेरीत जाऊन बघा...सगळ्या सीट्स काळा मळवट भरलेल्या निळ्या बायांप्रमाणे दिसतात...
पण हे प्रकरण फ़क्त दिसण्यापुरतं बरंय...कारण भडभडून येण्याइतपत फ़्लेवरचा वास या मळवटांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे शक्यतो त्या काळ्या मळवटापासून ६ इंच खाली डोकं ठेवून त्याखाली आपलं धड ऍडजस्ट करून उरलेल्या जागेत पाय ठेवू म्हटले तर ठेवावेत तरी कुठे?? या विवंचनेत ’पोझिशन’ ऍडजस्ट करेपर्यंत औंध येतं..
आजपावेतो माझ्या शेजारी कोणीही बेबी/बाबी लोकं आलेली नाहीत नेहमी आलीत ती बाबा/बाप्पू लोक...
बाबा आला की सामान ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या बाजूची स्त्रीलिंगी वस्तू कशी आहे हे डोळ्याच्या कोपरयातून बघून घेतो...
डुईपासून सुरुवात करताना माझ्या बॉयकटपाशीच त्याचा उत्साह निम्मा झालेला असतो अणि पायातल्या कॅन्हासच्या शूजपाशी शक्तिपात..!
त्यामुळेच माझ्या शेजारचे बाबा लोक निव्वळ झोपा काढत असावेत बहुतेक!!!
पण मी?
मला असले डोळ्याचे व्यायाम बिलकुल जमत नाहीत..
मायला...ताकाला जाऊन भांडं लपवायचंच कशाला म्हणते मी...
मी त्याला सीध्ध्धा न्याहाळून घेते...
बरा वाटला तर ’प्रिय’ ला फ़ोन करून पकवायला आयताच एक विषय ...नाही बरा...Who Cares???
माझ्याबाजूला आलेला बाबा ’खूबसुरती बाहरी नही, अन्धरूनी होती है’ अशा टाईपचा उदारमतवादी जरी असेल तरी औंधपर्यंत माझे ऍक्रोबॅटस बघून शरणचिट्ठी देतो आणि सरळ झोपी जातो...
"कसली खसखस चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"हे सायलंट...मनातल्या मनात..!!
छान स्थिरस्थावर होऊन मी माझ्या आवडीचं काही करायला घेतेय तोच तो फ़ुड-मॉल येतो..आणि पुण्यात सगळ्या दुकान-हॉटेलांचा हरताळ असल्यासारखं सगळं पब्लिक ते भयंकर महागडं खाणं खायला बाहेर पळतं...
आता मै और मेरी तनहाई???
अहं..
बसमधल्या एकांताचा फ़ायदा घ्यायला एखददुसरं जोडपं रेंगाळलेलं असतंच..
दोन सीट मधल्या फ़टीतून मला सग्गळं दिसत असतं...पण त्यांना मी तिथे आहे याची जाम खबर लगत नाही..
पण माझा मूड बूटात असेल तर अचानक त्यांच्यापुढे उगवून त्यांची गाळण उडवण्याचं धक्कातंत्र जरूर अवलंबते..
मग हडबडलेला मुलगा मुलीला म्हणतो..."चल...लेट्स ईट आऊट!!"
ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय...लब्बॉड..!!!Lets eat out म्हणे....
१० मिनीटाने सगळे परतले की त्या काचबंद शिवनेरीत भयंकर दर्प दरवळायला लागलेला असतो...
माझ्यावर सूड उगवायचा म्हणून माझा शेजारी फ़ुडमॉलवरच्या फ़ोडणीच्या पातेल्यात जाऊन बसल्यासारखा घमघमत असतो...मागच्या सीट्वाल्याने तोंडाची गिरणी चालू केलेली असते आणि गिरनीतून मच्याक मच्याक आवाज यायला सुरुवात झालेली असते...
माझं डोकं अचानक खूप भणभणायला लागतं..
त्यामुळे घाट येईस्तो मी डोक्यावर शाल ओढून घेऊन, कानात ’टेंपरेचर’ फ़ुल ऑन ठेऊन गपचिप पडून राहते...
थोडया वेळाने एसीच्या थंड वारयाने तो वास ’बसला’ की मी डोकं बाहेर काढून पुन्हा पोझिशन, चुळबुळ इ. च्या मागे लागते...
"कसली खुड्बुड चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"यावेळी मात्र चेहरयावर हिंसक भाव!!!
अशारितीने पनवेल येता येता पुस्तकाची २० पाने वाचून होतात न होतात तोच आलेल्या ढेकरामुळे आज फ़ुडमॉलवाल्याने पावभाजीत चमचाभर बटर जास्तच दिलं हे ड्रायव्हरच्या लक्षात येतं आणि त्या आनंदात तो आम्हा सगळ्यांना कंपल्सरी ’यफ़.यम’ ऐकायला लावतो...शिंची कट्कट...!!
आता हातातलं पुस्तक गुमान आत ठेवायचं आणि बाहेरची गंमत (?) बघत बसायचं...
पण त्यातही नंतर गंमत वाटायला लागते...
खारघरचा फ़्लाय-ओव्हर ओलांडेपर्यंत बसमध्ये उठा-उठा सकळीक झालेलं असतं...
माझ्या सीट वर अनैसर्गिक स्वस्थता बघून बाजूचं पब्लिक अंधारात हातोहात बदललं की काय हे डोळे फ़ाड्फ़ाडून बघायचा प्रयत्न माझा शेजारी करत असतो...
पण तेवढ्यात चुनाभट्टी येतं आणि चुनाभट्टी आल्यावर नेहमी लागणारं हिमेशचं ’हरी आऊम..हरी आउम...हरी ओआऊऊम’ लागतं आणि मी ’खिक’ करून दात काढते....
फ़ुस्स...आपल्याबाजूची पार्टी तीच आहे ,काही अंधारात बदलली बिदलली नाहीये हे शेजारयाच्या लक्षात येतं..आणि तो लक्षात येण्याइतका हिरमुसुन बळंच पलीकडच्या खिडकीतून बाहेर पाहायला लागतो...गेला टिपरीत!!
सायन च्या ट्रॅफ़िक्मध्ये कारमधल्या, बसमधल्या छोट्या पोरांना चिडवत, डोळे काढून घाबरवत वेळ जरा बरा जातो..
मग येतंच दादर..
दादरला आल्यावर मात्र पुण्याच्या हवेने सुस्त झालेली, ’प्रिय’च्या लाडांनी हुळहुळी झालेली माझ्यातली मुंबईकरीण खाडकन जागी होते...आणि कशीही करून ८-५६ मिळालीच पाहिजे..जय महाराष्ट्र!!! अशी बोंब ठोकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावते..
शिवनेरीतून उतरते ते पुढच्या शनिवारी भेटण्याच्या वायद्यानेच!!!
’शिवनेरी’ही मग मोठ्याने भूश्श आवाज काढत मला ’सीया!’ म्हणते..

19 comments:

Pranav Jawale said...

surekh design aahe blogwar

Abhijit Bathe said...

डिझाईन गेलं तेल लावत - अल्टिमेट लिखाण आहे हे! दिल खुष!!

Yogesh said...

लै भारी

Unknown said...

1 no.... ya shivay 2 re kai shabd nait....................

अमोल केळकर said...

आपल्या या लेखनाने पुणे- दादर-पुणे केलेले प्रवास आठवले.

शिवनेरीचे अगदी योग्य वर्णन केले आहे.

Nandan said...

sahi!

Unknown said...

"खिदळखोबरीसारखी"
अगा बाबो, एकदम आवडुन गेला. काय पण शब्द आहे!!

"मी त्याला सीध्ध्धा न्याहाळून घेते...
बरा वाटला तर ’प्रिय’ ला फ़ोन करून पकवायला आयताच एक विषय"
ह. ह. पू. वा. :) :)

"ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय...लब्बॉड..!!!Lets eat out म्हणे...."
हीही .. आम्हीपण त्यातनच गेलोय .. नाही का? ;)

काय छ्चान लिहिता हो तुम्ही. कीप इट आप.

यशोधरा said...

>>मग हडबडलेला मुलगा मुलीला म्हणतो..."चल...लेट्स ईट आऊट!!"
ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय...लब्बॉड..!!!Lets eat out म्हणे....

LOL!! अगदी! येडछापच असतात बाकी हे लब्बॉड! मस्त लिहिलय!

Pranav Jawale said...

ho lihilay chhanach, pan mhanun design ka gela tel lawat?

Samved said...

सगळ्या सीट्स काळा मळवट भरलेल्या निळ्या बायांप्रमाणे दिसतात...

Lai bhari!! निळ्या बायां...HaHaPuWa

HAREKRISHNAJI said...

आर तिच्या मारी, हे ,हे सगळं शिवनेरीत, पुणे मुंबई प्रवासात होतं ?

परवाला माझ्या बाजुला बसलेल्या तुम्ही तर नव्हत्या ना ?

बहुतेक नसाव्यात . कारण माझा प्रवास उलट्या दिशे्ने होत असतो. आता दर प्रवासात हा लेख आठवणार.

झक्कास

Tulip said...

सही.तेरे ऍटीट्युडपे हम फ़िदा!

कोहम said...

lai bhari....evadhach

Raj said...

SAHI!!! ekadam masta. :)

Dhananjay said...

Nice :)

Jaswandi said...

kay bhari lihilays! bestch!!

Dk said...

लै म्हनजे लै म्हनजे लैच भारी!!!!!!!

आतापर्यंतच्या तुझ्या ब्लॉगवरची ही सर्वात मस्त पोस्ट आहे. आवडली एकदम :) ’प्रिय’ची प्रचंड बोंब ठोकत येणारी चेतक>> पुण्यात पीयुसी नाहीये का?

कोणीही बेबी/बाबी लोकं आलेली नाहीत नेहमी आलीत ती बाबा/बाप्पू लोक...> ह्म्म्म्म तरीच एवढी निरिक्षणशक्ती छान आहे

आणि कशीही करून ८-५६ मिळालीच पाहिजे..जय महाराष्ट्र> आयला ग्रेटच आहेस तू म्हणजे


"मला असले डोळ्याचे व्यायाम बिलकुल जमत नाहीत" हाहा

Dk said...

"खिदळखोबरीसारखी" :D :D :D :D :D :D :D
haa ek nava shabd add kela maazya dictionary t!

Nil Arte said...

तू भीती वाटावी इतकी माझ्यासारखी आहेस ...

हे माझे ब्लॉग्ज जमल्यास वाच म्हणजे माझा पॉइन्ट कळेल तुला:



http://nilesharte.blogspot.com/2011/06/blog-post_25.html
http://nilesharte.blogspot.com/2011/08/blog-post_13.html
http://nilesharte.blogspot.com/2011/09/blog-post_10.html

 
Designed by Lena