एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी..!

’योरोईदो’ गावात कोळ्यांच्या वस्तीत राहणारी एक छोटीशी मुलगी..
चियो साकामातो.
आपल्याकडे दोन शेंडया घालणारी चिऊ असेल तशीच ही निळसर राखी रंगाचे डोळे असलेली जपानी चियो..
घरात अठराविश्वे दारिद्रय, आई बोन-कॅन्सरने आजारी, पहिल्या कुटुंबाच्या आकस्मिक निधनाने अकाले म्हातारे झालेले वडील, पोटाखेरीज आणखीनही भुका जागृत झालेली मोठी बहीण-सात्सू..
अशा हलाखीत आपली चियो काय करते?
काहीच नाही..
करण्यासारखं काही नसतंच तिच्याकडे..
असं झालं तर काय होईल आणि तसं झालं तर कसं? अशा कल्पनेच्या भरारया मारत, दिवास्वप्नं रंगवत चियो एकेक दिवस ढकलत असते..
अशातच..
योरोईदोचे असामी ’तानाका सान’यांची ’मेहेरनजर’होते आणि चियोची रवानगी सात्सूसकट ’गियोन’ परगण्यातल्या नित्ता ओकियात होते..

नित्ता ओकिया हे एक ’गेशा हाऊस’ आहे..

थोडक्यात तानाकांनी सात्सू आणि चियोला श्रीमती नित्तांना विकलेलं आहे..
चियो अधिक सुंदर असल्यामुळे तिला नित्ता ओकियात ठेऊन घेतात आणि सात्सूची रवानगी भलत्याच कुठल्यातरी परगण्यातल्या कमी दर्जाच्या ओकियात (जोरोऊया) होते..
अशा बहिणीच्या ताटातूटीपासून सुरु होते चियो नावाच्या ’होऊ घातलेल्या’ गेशेची कहाणी..
आर्थर गोल्डन यांनी उधृत केलेली चियो उर्फ़ नित्ता सायुरीची ’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’!

****

दिवसाढवळ्या जे घडतं त्याचा रात्री बंद दरवाजाआड घडणारया गोष्टीशी सुतराम संबंध नसतो या जपानी लोकांच्या ठाम समजुतीवर गेशांचे अस्तित्व पूर्वापार टिकून राहिले आहे..

’वेश्या’ आणि ’गेशा’ या दोन्ही अभिसारीकाच पण वेश्या ह्या गेशांपेक्षा खालच्या दर्जाच्या असतात..
गेशा होण्याकरता गायन, वादन, नृत्य, सरबराईचे यथासांग शिक्षण घ्यावे लागते..
शिवाय घरंदाज गेशा या कुठल्याही पुरुषाला एका रात्रीपुरता आपले शरीर वापरू देत नाहीत..एखाद्या पुरुषाकडून सोयी-सुविधा आणि योग्य मोबदला मिळत असेल तर वर्षानुवर्षे संबंध ठेवणे त्या पसंत करतात..नाहीतर ’दान्ना’ शोधतात..
’दान्ना’ म्हनजे असा पुरुष जो एखाद्या गेशेला आयुष्यभर ठेऊन घ्यायला तयार आहे..तिचा सगळा खर्च उचलायला तयार आहे.
असा दान्ना मिळणं म्हणजे गेशेचं सुखनिधानच जणू काही..
गेशा लग्न करत नाहीत पण आपल्या दान्नाची आयुष्यभर संगत-सोबत करतात, त्यांचं मन रिझवतात..

****

तर....
पम्पकीन नावाच्या एका समवयीन मुलीबरोबर चियोचं गेशा ट्रेनिंग सुरु होतं..
चियो एक नामांकीत गेशा होणार हे उघड असल्याने नित्ता ओकियातली एकमेव लावण्यखणी गेशा ’हात्सुमोमो’ तिचा रागराग करते, तिचं खच्चीकरण करते, तिला शक्य तितक्या अडचणीत आणायला बघते..
चियो आपल्या बहिणीचा शोध घेऊन तिच्याबरोबर पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करते...
तिच्या या गुस्ताखीमुळे श्रीमती नित्ता तिचं गेशा ट्रेनिंग बंद करतात..आणि तिला मोलकरणीसारखं राबवून घेतात..
अशाच एका हताश क्षणाला चियोला ’चेयरमन’ भेटतो..चियो पहिल्या भेटीतच त्याच्याकडे ओढली जाते आणि चेयरमनपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून ती तिच्या गेशा होण्याकडे पाहायला लागते..
चित्रपटसृष्टीत जसा गॉडफ़ादर तशी गेशा व्यवसायात शिकाऊ गेशेला योग्य ’मोठी बहीण’ मिळणे आवश्य़क असते कारण तीच आपल्या ’कॉन्टॅक्ट्स’ना आपल्या लहान बहिणीची ओळख करून देऊन तिच्यावर कृपानजर ठेवायला सांगते..
चियोच्या सुदैवाने मामेहा नावाची नामांकीत गेशा तिला मोठी बहीण म्हणून मिळते आणि चियो या शिकाऊ गेशेचं नामकरण ’सायुरी’ असं होतं..
तिथून मग चियो उर्फ़ सायुरी कधीच मागे वळून पाहत नाही..
’गेशा’ म्हणून तिची कारकीर्द सुरु होते ती तिचं इप्सित साध्य केल्यावरच थांबते...चेयरमनला ’दान्ना’ करून घेतल्यावरच!

****

पूर्वी परयांना शाप असायचे म्हणून त्या भूतलावर जन्म घ्यायच्या..आणि मुक्तीची वाट बघत भूतलावरच थांबायच्या...
या परीला केवळ रात्रीच भिरभिरणारं फ़ुलपाखरू बनून राहण्याचा शाप होता की काय कोण जाणे?..
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’ ही मला अशाच एका उ:शाप नसलेल्या परीची कथा वाटली..
पूर्वी ’ओशीन’ वाटली होती तशीच..
गेशांनी आपलं जीवन कुणासमोर उघडं करू नये हा पूर्वापार पाळला गेलेला संकेत आहे जो नित्ता सायुरींनी पण पाळला..
त्यांची ही कथा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आली..
भरपूर वादविवाद झडले...आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला..पण त्यामुळे केवळ रात्रीच बहरणारे एक निराळंच जग आपल्यासमोर आलं..
गेशांचा ’मिझुआबे’..’मिझुआबे’साठी कुमारी गेशांवर लावलेल्या चढत्या भाजणीतल्या बोली यासारख्या तिडीक आणणारया कथा जगासमोर आल्या..
’गेशा-संस्कृती’ जगासमोर आली जी आजपावेतो जाणिवपूर्वक पडदाशीन ठेवण्यात आली होती..
जपानमध्ये आजही गेशा-संस्कृती आहे..
पण ही माणसं अस्तित्वातच नाहीत अशा भ्रमात जगणारया प्रत्येक माणसाला सायुरींनी सत्याची जाणीव करून दिली..
त्यांची प्रातिनिधिक कहाणी मांडून..
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’- एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी!

आनंदाचे डोही..

परवा बरयाच दिवसांनी ’प्रिय’ची भेट झाली..
आला तो हातात काहीसं लपवूनच..
’प्रिय’ने मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी आणावं म्हणजे अघटीतच...
नाहीतर सरप्राईझेस, गिफ़्ट्स, चॉकोलेट्स, कुठेतरी लपून बसून मागून "भ्वॉक" करणे, बॉक्समागून बॉक्स खोलायला लावून आतल्या गिफ़्ट्साठी ’प्रिय’ला रडकुंडीला आणणं हा प्रांत माझ्याकडे आहे..(हे सर्व करताना स्थळ-काळ-वेळ यांचा अजिबात विधिनिषेध नाही)
"आपले स्वागत असो.." असे म्हणून त्याने मागून निशीगंधाच्या डहाळ्यांचा मोठ्ठाच्या मोठ्ठा गुच्छ काढला..
"तुला आवडतो म्हणून.."
सकाळी ९ वाजता त्याने कुठल्या फ़्लोरिस्टाकडून निशीगंध मिळवला होता कोण जाणे?
"थॅंक्स रे..खरंच सुंदर आहेत.."
यावर भरून पावल्यासारखा ’प्रिय’ हसला..
मला ठरवताच येईना..
’प्रिय’ला भेटायला गेले ती सकाळ अधिक सुंदर का तो निशिगंध सुंदर का ’प्रिय’चं आतबाहेर शुभ्र हास्य अधिक सुंदर..?
त्या क्षणी मी खूप आनंदात होते..
इतकी आनंदात की मी अतिशय पॉवरफ़ुल असा ’पेट्रोनास’ तयार करून डिमेंटर्सची झुंडच्या झुंड परतवून लावली असती..(हॅरी पॉटर न वाचलेले वाचक...क्षमस्व!)
आपल्याला एवढा आनंद झाल्याला किती दिवस झाले??
वर्षे तर खासच नाहीत..
परवापरवा पर्यंत कात्रजच्या बागेत पिसारा फ़ुलवून मनमुक्त नाचणारा मोर बघून मी अशीच हरखून गेले होते..
त्यावेळी ’प्रिय’ त्या मोराच्या पिंजरयातील लांडोरी दुसरया पिंजरयातल्या पिसारा अजिबातच न फ़ुलवलेल्या मोराला ’लाईन’ का देत होत्या??याच्या ऍनालिसीस मध्ये गढला होता)
जगात माझ्याइतकं आनंदी कोणीच असू शकत नाही..असं मला कधी वाटलं??
का वाटलंच नाही कधी??
वेल, वाटलं...खूप खूप वेळा वाटलं..

---------------

आता या क्षणी उपांत्य विशारदचा सराव करताना केलेली ढोर मेहनत आठवतेय, घोटवून घेतलेला ’धमार’ आठवतोय..
त्यावेळचा आमचा सराव पाच पाच तास तबलजी आणि पेटीवाले यांच्या सोबतीने चालायचा...
’धमार’ मधली ततकारची बाँट करताना आमची जाम फ़े-फ़े उडायची...विशेषत: दृत लयीत..
दीड किलोचे घुंगरू प्रत्येक पायात घालून ही बाँट करताना आमच्या पायाचे खरंच तुकडे पडायचे..
अशाच एका सरावाच्या वेळी तबलजींनी लय अतिदृत केली..आणि मी सोडून बाकी सगळ्यांनी शरणचिठ्ठी स्वीकारली..
तो अतिदृतमधल्या बाँट्चा गोवर्धन पेलून मी समेवर आले तेव्हा तबलजींच्या ’क्या बात है..!’ या प्रशस्तिपत्रकामुळे मला अस्मान ठेंगणे झाले होते..

---------------

इंजिनीयरींगचे दिवस..
कोणाच्या थ्रो-बॉलच्या सर्विसच्या प्रेमात पड, कोणाच्या अक्षराच्या प्रेमात पड असे प्रकार चालू असताना रेखा भारद्वाजने गायलेलं ’तेरे इश्क में’ ऐकण्यात आलं...आणि मी थरारून गेले ..
"बादल धुने, मौसम बुने
सदिया गिनी, लम्हें चुने
लम्हें चुने, मौसम बुने
कुछ गर्म थे, कुछ गुनगुने
तेर इश्क में..कब दिन गया...कब शब गयी.."
ऐकलं आणि वाटलं...च्यायला...असं काहीतरी भव्यदिव्य आपलं प्रेम असलं पाहिजे..
’प्रिय’ला भेटले आणि ’दिल सुफ़ी ये था’ची सुरावट मनात फ़िरून पूर्ण झाली..
सगळ्यांना सगळंच मिळतं असं थोडीच असतं...?
पण ज्यांना ईप्सित मिळतं अशा थोडक्या लोकांपैकी मी एक होते ही काय कमी आनंदाची गोष्ट आहे??

---------------

इयत्ता आठवी...
महाजन सर इंटरमिडीएट एक्झामची तयारी करून घेत असत..
माझं बाकी सगळं ओ.के. होतं पण ’स्मरणचित्राच्या’ नावाने शंख होता..
मला मुळी माणसं काढताच यायची नाहीत..
मी अशीच रडकुंडीला येऊन मी कागदावर चितारलेल्या ’होपलेस’ माणसांना(?) पाहत होते...
तेव्हा महाजन सरांनी मला एखाद्या पाककृतीसारखा माणूस ’बनवायला’ शिकवला होता...
मी पहिला ’बांधेसुद’ माणूस काढला तेव्हा हर्षातिरेकाने आरोळीच ठोकली होती..
(ता.क:मी इंटरमिडीएट पास झाले)

---------------

इयत्ता दुसरी
शाळेत गोकुळाष्टमी साजरी व्हायची होती..आणि अस्मादिकांना श्रीकृष्णजन्माची कथा सांगायची होती..
आयुष्यातलं पहिलं-वाहिलं वक्तृत्व..ते पण तो चनिया-चोलीचा मला न पेलणारा बोंगा सावरत, नाकात खाज आणणारी ती खोटी नथनी सांभाळत, डोक्यावरून सारखी ओघळणारी ती तिपेडी बिंदी चाचपडत करायचं म्हणजे..
आई नाही का मला इंजेक्शन घेताना नेहमी सांगायची..."बस्स एक मिनीट....झालंच.."
तसं मी स्वत:ला समजावत माझी भाषण-एक्स्प्रेस भरधाव सोडली..
कथा संपल्यानंतर धापा टाकत थांबले तेव्हा कळले की सगळ्यांना कथा आवडलेली आहे आणि मुख्य म्हणजे ती सगळ्यांना कळली आहे (सुदैवाने!)
तेव्हा आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून मला असाच काहीसा वर्णनातीत आनंद झाला होता..

---------------

असे बरेच आनंद आहेत...
टोकियोचे मेडल, ’मेरा कुछ सामान’ पहिल्यांदा ऐकलं तो क्षण, पहिली कविता, बोर्डात येणे, भांडून मिळवलेले हक्क, पहिली स्वकष्टाची कमाई, ’प्रिय’ला चर्चेत भारी पडले तो क्षण, एट्सेट्रा...एट्सेट्रा...
लहानपणीचे माझे आनंद कदाचित आजच्या या घडीला क्षुल्लक वाटतील...
पण आजही ते क्षण काळाच्या सीमा न बाळगता मला तसेच्या तसे आठवतायेत..
पुढे वय वाढलं, जाणिवांचा विस्तार वाढला आणि मग अशा अवर्णनीय आनंदाच्या व्याख्या बदलायला लागल्या..
पूर्वी मला आनंद झाला की मी दोन्ही मुठी अशा हवेत नाचवत ’येsss’ करून ओरडायचे..
नंतर नंतर माझ्या आनंदाला बॅकग्राऊंड म्युझिक आलं..
रंग आणि गंध आला..
हल्ली हल्ली मला आनंद झाला की मोझार्टच्या झाडून सगळ्या सिंफ़नीज एकाचवेळी मनात वाजायला लागतात..नाहीतर आशा-ताईंचं लाडीक ’आज मैं खुश हू...की तुम ही बोलो मै हु खुश क्यु?"...ऐकायला यायला लागतं..
माझा आनंद हा ’निळ्याशार’ कलरचा असतो..आनंद झाला की मला या रंगासारखंच cool, calm आणि compose वाटायला लागतं..
माझ्या आनंदाला अष्टगंधाचा वास येतो...’प्रिय’च्या शर्टाला नेहमी येतो तसा..!

---------------

अशाच आपल्यामध्ये बिलकुल न मावणारया ,आपल्याला फ़ोडून बाहेर येईल की काय? असे वाटणारया आनंदाला शब्दात कसं वर्णायचं असतं??
प्रश्नाचं उत्तर मिळेचना तेव्हा ’प्रिय’ला विचारलं..नेहमीसारखंच..
तो म्हणतो शब्द अपुरे पडत असतील तर तुकोबांना शरण जावं..
आणि मला जाणवलं...माझ्या आनंदाचं वर्णन तुकोबा किती यथार्थ शब्दात करून गेलेत..
ते म्हणतात...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदचे..!

इतके अचूक शब्द सापडलेत की तोच निळाशार आनंद मला पुन्हा एकदा झालाय..
आताही मला बीथोवनची सातवी सिंफ़नी ऐकायला येतेय..
असा आहे मला नेहमी होणारा रंग-गंध वाला, audible आनंद!
आनंदाचे रंग-गंध-आवाज बदलतील कदाचित...पण आनंदाची व्याप्ती या शब्दांपलीकडे कधीच जाणार नाही...
तुकोबांच्या चरणी आपले दंडवत!

क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि..!

मला एकटं पाडणारे क्षण माझ्यापासून माझ्या प्रियजनांचा सहवासही हिरावून घेतात...
आज तर ’प्रिय’सुद्धा मला म्हणाला..
"तू सारया जगाचा राग माझ्यावर काढतेस..घडीघडी अस्वस्थ व्हायला तुला होतं काय??"
चक्क ’प्रिय’ने मला हे म्हणावं???
मला वाटायचं ’प्रिय’ला कळू शकेल..ज्यांना उत्तरं नाहीत असेच प्रश्न मला नेहमी का पडतात ते???
क्षणोक्षणी माझ्यावर कोणती बेचैनी गारूड करते ती..
जिवाला स्वस्थता का मिळत नाही ते??
पण आज त्यानेच पांढरा बावटा दाखवल्यावर माझं अवसानच गळलं..
माझं एकटेपण कोणी समजून घेऊ शकत नाही हेच खरं..
मी घराबाहेर पडले..
आमच्या घरापासून फ़क्त १० मिनीटाच्या अंतरावर समुद्र आहे..
समुद्र आणि त्याला अर्धचंद्राकारात वेढून टाकणारी सुरूची बाग!
समुद्राची गाज अगदी दुरुनही ऐकायला येत होती..भरतीचा समुद्र वेड लागल्यागत गर्जत होता..
समुद्राचं रोंरावतं, गर्जना करणारं भरतीचं रूपच मला आवडतं...ओहोटीच्या वेळचा समुद्र एखाद्या हतप्रभ वीरासारखा वाटतो..
एरवी एकतर पायाला गुदगुल्या करणारया लाटांना अनुभवत मी किनारयावरच घोटाभर पाण्यात उभी असते किंवा वेगवेगळ्या कलाबतू असणारे शंख-शिंपले तरी गोळा करत असते..
पण आज माझ्या मनात काही वेगळंच असावं..
त्या शंख-शिंपल्यांकडे ढुंकूनही न बघता, माझ्या आजूबाजूने तुरूतुरू धावणारया चिंबोरयांची अजिबात दखल न घेत मी भस्सकन पाण्यात पाय टाकले..
आणि सरळ आत आत जायला सुरुवात केली...
माझा सर्व राग आज मी माझ्या सर्वात आवडत्या समुद्रावर काढणार असते...
मला पडणारे सर्वच्या सर्व प्रश्न घशाच्या तारा ताणून,किंचाळून त्याला विचारणार असते..
फ़ताक फ़ताक पाणी उडवत मी लाटांमधून रागारागात वाट काढायला सुरुवात केली..
पायाखाली एखादा शिंपला हुळहुळत होता...
मी सरकत्या वाळूवर पाय भक्कम रोवत हळूहळू पुढे सरकत होते..
लाटांशी झगडून थकलेल्या पायांनी असहकार पुकारल्यानंतर मी थांबले..
एव्हाना कंबरभर पाण्यात मी आले होते..
खालची वाळू मला तोंडघशी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती..
आणि मी तिच्या प्रयत्नांना तसूभरही दाद न देता छद्मीपणे हसत तोल सावरत उभी होते..
आणि अचानक मला ती दिसली..
मला जणू काही धडाच शिकवायच्या इराद्याने सर्व प्रवाही जलकणांची अमोघ शक्ती आपल्यात एकवटून माझ्या दिशेने झंझावातासारखी येणारी ती लाट..
मी तिच्याकडे पापणी लवमात्र न हलवता फ़क्त पाहत होते...तिकडून पळून माघारी किनारयाकडे जावं...असा विचार माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही..
इन फ़ॅक्ट..माझ्या संवेदनाच नष्ट झालेल्या होत्या..
तिच्यात आणि माझ्यात फ़क्त एका फ़ुटाचं अंतर राहिलं आणि..
पोटात कसं तळापासून ढवळून आलं..
जमिनीपासून पाय सुटतील का काय? असंच वाटायला लागलं..
आतापर्यंत वाळूत उद्दामपणे ताठ उभे असलेले माझे पाय लटलट कापायला लागले..
ती लाटेची भिंत माझ्यासमोर उभी ठाकण्याआधी एक क्षण माझ्यावर भीतीने पगडा केला..
क्षणागणिक तिचे माझ्या जवळ येणे पाहताना माझ्या डोळ्याच्या बाहुल्या पार उर्ध्व लागल्यासारख्या झाल्या..
लाट आ वासून माझ्यावर झेप घातली आणि मी माझे डोळे गच्च मिटून घेतले..
तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोर आई आणि ’प्रिय’चे चेहरे तरळून गेले..
आणि..
संपलंच आता सारं! असं वाटेपर्यंत लाट मला ओलांडून पार झालेली होती..
क्षणभरात..
मी चिंब निथळत उभी होते..
तिची मस्ती, तिची रग माझ्या अंगाअंगाला स्पर्शून गेलीली होती..
माझ्याही नकळत माझ्या छातीचे ठोके वाढलेले होते..
माझ्या तोंडून एक दोन मिनीट्स एक शब्द फ़ुटायला तयार नव्हता..
केसा-कपाळावरचं खारट पाणी निपटत रोखून धरलेला श्वास सोडून मागे बघितले तर ...
तीच लाट मला वाकुल्या दाखवत किनारयाशी गुजगोष्टी करत होती..
त्या एका क्षणापुरता माझं भान सुटलेलं होतं..
त्या क्षणाला मी न्याय देऊ शकलेले नव्हते..
माझ्या सर्व संवेदना एकवटून मी तो क्षण जगू शकले नव्हते...
काही सेकंदापुरता भेटलेल्या मृत्युला नीट आकळून घेऊ शकले नव्ह्ते..
पुन्हा एकदा पराभूत मी..
घरी आले तर एव्हाना माझ्या मोबाईल वर चिंतातुर ’प्रिय’चे ४० मिस्ड कॉल पडले होते..
मी त्याला फ़ोन लावला आणि जे घडले ते सगळे त्याला सांगितले..
"तू ना....खरंच...मला वाटलंच होतं तू तडमडायला समुद्रावर जाशील.."
"..."
"सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत असा अट्टाहास का असतो तुझा??...प्रत्येक क्षण असा सगळाच्या सगळा उलगडून तुझ्यासमोर आला पाहिजे ही तुझी अपेक्षाच अचाट आहे.."
".."
"काही गोष्टी गूढगहिरया असतात...असीम असतात..अज्ञात असतात..अफ़ाट असतात...त्यांचे अफ़ाट अस्तित्व मान्य करण्यातच शहाणपण असतो...आजच्या लाटेने तुला काय शिकवलं??"
".."
"मी सांगतो ना...त्या क्षणी ताळ्यावर राहून तुला मृत्यू अनुभवायचा होता..आला अनुभव??क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि.."
".."
"आला क्षण अनुभवावा...!’अनुभवावा’..’जोखू नये’...!त्याला कळून, आकलून, पारखून घेण्याची जिद्द बाळगू नये..प्रसंगी त्यात वाहावत जावं...
".."
"हे आहे हे असंच असतं गं...आपल्या जिवाला त्रास करून घेण्याने किंवा ’कसं कळत नाही बघतेच मी’ म्हणून आकांडतांडव करण्याने त्याचं असं असण्यात बदल होणार नसतो..हे सर्व आपल्या आवाक्याबाहेरचं आहे गं..आणि तू हे एकदा मान्य केलंस ना...की बघ तुला कशी स्वस्थता लाभेल.."
"खरंच लाभेल??"
"माझ्यावर विश्वास ठेव.."
’प्रिय’वर विश्वास नाही ठेवणार तर कोणावर??
जो सुटला तो क्षण आपला नव्हताच मुळी किंवा तो कळून घ्यायची आपली लायकीच नव्हती असं स्वत:ला समजावण्याने खरंच जिवाला शांतता मिळते??
बघितलं पाहिजे..

एक ’इंटरप्रीटेड’ कहाणी..!!

एक होते आटपाट नगर...
आटपाट नगराची होती एक राजकुमारी...
आता ही राजकुमारी कोण याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका...
ही राजकुमारी कुणीही असू शकते...तुमची शेजारीण, तुमची सेक्रेटरी, तुमची टीम-मेट, सखी कुणीही..खुद्द तुमची बायको सुद्धा..
भावी ’मी’ असण्याची शक्यता??ह्म्म...थोडीफ़ार..
पण नसण्याचेही चान्सेस नाकारता येत नाहीत...
बरं...
तर आटपाट नगराची राजकुमारी आणि मांडलिक राजाचा अतिशय लाघवी पुत्र यांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण होते तेव्हापासून आपली कहाणी सुरू होते..
थोडक्यात प्यार के बीच में कांटे, मुलीच्या बापाचा थयथयाट, दोन्ही साईडच्या आयांचा अश्रुपात, खानदान की इज्जत असे काहीही ’वंगाळ’ प्रकार न होता ती दोघं सुखेनैव नांदू लागतात..
साधारण वीस एक वर्षानंतरचा प्रसंग..
राजा नुकताच राज-दरबार आटपून आलेला आहे...आणि राणी-कक्षात अस्वस्थपणे येरझारया घालतो आहे..
राणी कुठुनतरी दमून भागून येते...तिला बसायचीही फ़ुरसतही न देता राजा पुसता होतो..
"कुठे होतीस एवढा वेळ??"
"तुला सांगूनच तर गेले होते...माझे साक्षरता वर्ग असतात या वेळात..आज तर शिबीरही होतं..फ़ार छान झालं...१०० योजने परिसरात आपल्याइतकं साक्षर राज्य नाही माहीत्येय तुला?"
"आणि काय गं? साक्षरता वर्ग चालवायचे तर हा खादीचा कळकट्ट झब्बा कशाला घालायला हवा???आणि ही शबनम???तुम्हा सोशल-वर्कर्सचा हा ड्रेस कोड आहे वाटते??"
"सारकास्टीक टोनची गरज नाही..बाहेर वैशाखवणव्यात तू हे चिलखत घालून हिंडतोस तेव्हा एका शब्दाने बोलते का मी?"
"त्यात बोलण्यासारखे काय आहे?एखाद्या राजाला शोभतील अशीच वस्त्रे परीधान करतो मी.."
"दॅट्स इट...या वर्गांच्या, शिबीरांच्या निमित्ताने मला गावागावातून हिंडायला लागते...कपडे मळतात...म्हणून असे मळखाऊ कपडे घालते मी..आपल्या कामाला साजेसे कपडे घालावेत"
"काय अवतार झालाय तुझा...चेहरयाची पार रया गेलीये..कशी छान केतकीसारखी कांती होती.."
"आता माझा कळवळा?अशी होते तेव्हा माझ्याकडे बघायला फ़ुरसत नव्हती तुला..तेव्हा तर जसा काय २४ तास पिंगाच घालायचास माझ्याभोवती..?"
"मला राज्याचा कारभार करायचा होता.."
"अहा रे राजा...राज्याचा प्रतिपालक याचबरोबर एका स्त्रीचा नवरा, मुलांचा बाप म्हणून काही कर्तव्ये होती...त्यांचे काय झाले मग?"
"सगळे तर आहे तुमच्याकडे...कपडालत्ता, दास-दासी, जायला यायला रथ-घोडे.."
"होल्ड इट...हे सर्व माझ्याकडे ऑलरेडी होतं..माझ्या बाबांचं...किंबहुना...आता जे काही आहे ते पण त्यांचेच.....यात ’तुझे’ असे काय आहे??"
"राणीसाहेब.."
"आवाज चढवू नकोस..सत्य झोंबलं का तुला? बाबांनंतर सारा कारभार मी चालवणार होते...तुझ्या सोबतीने...तर तू स्वत:ला राज्याभिषेक करून मोकळा!..आणि माझी जागा? राणीवशातल्या एका भोग्य स्त्रीची...जिला कपडे चढवून मिरवायला न्या...आणि वाटल्यास तेच उतरवून भोगा..असं कोपरयात ढकललं गेल्यावर मग म्हटलं ..चला, संसार करून बघुयात..तोच आजवर चोख केला..."
"हो..म्हणूनच नवरा घरी आल्यावर बायको घरी नसते.."
"एक बायकोचं फ़क्त तेवढच कर्तव्य असतं का रे?मला कीव करावीशी वाटते तुझी..आणि फ़क्त फ़िजीकल प्रेझेन्स एवढाच Criteria असेल तर माझ्या,मुलांच्या आजारपणात, त्यांच्या ऍडमिशन्सच्या वेळी, त्यांना काही अडलं-खुपलं धीर द्यायला तू कधी होतास??"
"ते मला काही माहीत नाही..मला उद्यापासून तू राजवाडयावर हवीस...मला हवी तेव्हा...मला लागशील तेव्हा.."
"आणि तू...तू असणार आहेस मला लागेल तेव्हा...मला गरज पडेल तेव्हा..?"
"मला तेव्हढा वेळ नाही..मला राज्य......"
"अहा रे पुरूष..दुसरयाकडून बरयाच सारया अपेक्षा करायच्या आणि आपल्यावर ती वेळ आली की शेपूट घालून पळायचं...मला आता हे काही जमणार नाही..मला माझी दिशा सापडलेली आहे..आणि त्यासाठी मला तुझी मर्जी सांभाळण्याची बिलकुल गरज नाही..आणि स्वत:चं विश्व उभारण्याइतकं कॅलिबर माझ्याकडे निश्चितच आहे"
"म्हणजे माझ्याकडे कॅलिबर नाहीये असं म्हणायचय का तुला?"
"मला असं काही म्हणायचं नव्हतं..तुझ्या कॅलिबरची मुळी गोष्टच निघाली नव्हती.."
"या वयात हे धंदे...मुलांना काय वाटेल?"
"मुलं जाणती आहेत..आणि मी जे काही करते त्याबद्दल त्यांना ऊरभर अभिमान आहे.."
"त्यांनाही फ़ितवलयंस वाटतं?"
"हे तू त्यांनाच जाऊन विचारशील तर बरं..त्यानिमित्ताने मुलांना भेटशील..."
"तुझा निर्णय झालाय तर?"
"इतका ठाम...की याआधी हे मला कसे सुचले नाही असं वाटतं आता..."
इतकं बोलून ती वळली..एक मोठ्ठा श्वास घेतला..
स्वातंत्र्याचा!
कहाणी तीच...पात्रही तीच...फ़क्त त्यांची ओळख बदलली..
’ओळख’या शब्दाशी प्रथम ओळख झाल्यानंतची स्त्री देखील बदलली...
स्त्री खरया अर्थाने मुक्त झाली...
इथं तुम्ही या कथेला सोयीनुसार ’इंटरप्रीट’ करू शकता...स्त्रीची ओळख तीच ठेऊन..अर्थात!
राजाच्या जागी येऊ शकतो...एखादा कॉर्पोरेट इंटरप्रुनर...किंवा एखादा प्रतिथयश वकील...किंवा कोणीही!
राज्य बळकावून स्वत: गादीवर बसणे या सिच्युएशन चा अर्थ..बायकोला काम सोडायला लावून घरी बसवणे...
वाटली तर साधीसुधी पण इंटरप्रीट करता आली तर वास्तवदर्शी..भलेही आटपाट नगरातली का असेना!
'Woman Emancipation' च्या नावाने बोंबाबोंब करणारया माणसांना हा राईचा पर्वत वाटण्याची शक्यता जिच्यात..
अशी ही आटपाट नगरातल्या राजाराणीची ’इंटरप्रीटेड’ कहाणी..!

तिरक्या...एली..आणि कालचा पाऊस..!!

तीर्थकर भयंकर अस्वस्थ होता..
दोन दिवस एलीचा पत्ता नव्हता...फ़ोन out of range लागत होता...
आज सकाळपासून एअरटेल ऑपरेटरची तीच तीच बकवास ऐकून तो अगदी कंटाळून गेला होता...
आहे कुठे ही पोरगी???मला सांगून जात नाही असं तर कधीच होत नाही..
सकाळपासून आभाळ नुसतं भरून आलं होतं...सोसाट्याचा वारा सुटला होता...
पहिलाच पाऊस मुसळधार पडणार अशीच चिन्ह होती...
ह्या पोरीला नक्कीच या सोसाट्याच्या वारयात adventures करायची हुक्की आली असणार...
मागच्या वेळी सोसाट्याच्या वादळात ’डयुक्स नोज’ पाहायला गेली होती कार्टी..
पुन्हा एकदा फ़ोन लावायला रिसीव्हर उचलणार इतक्यात फ़ोन वाजायला लागला..
तीर्थकर भूत पाहावं तसं फ़ोनकडे बघत राहिला..
फ़ोनवरून विचारणा झाली..
"तिरक्या...??"
तीर्थकरला अशा अतरंगी नावाने हाकारणारी फ़क्त एकच व्यक्ती आहे....
एली...
एरवी तीर्थकरला आपल्या नावाचा ऊरभर ठासून अभिमान आहे..पण एलीसमोर कोणाची बोलायची टाप आहे???
जगासाठी तो तीर्थकर पण एलीसाठी तो तिरक्या..!
"तिरक्या...मी खाली रिसेप्शनला उभी आहे...लवकर निघ.."
"अग पण एली..."
"कोणालाही मार...आजारी पाड...मला सांगू नकोस...i want you downstairs in 5 minutes from now.."
एली भन्नाट आहे...तिच्या नावासारखीच...
तिचं नाव एलिझाबेथ...चारचौघींसारखी अल्पना, पर्णिका किंवा कुठलीतरी कपर्दिका अशी नावं न ठेवता तिच्या वडीलांनी तिचं नाव एलिझाबेथ ठेवलेलं..
आणि वडीलांनी ठेवलेलं म्हणून तिला अंमळ जास्तच प्रिय..
तीर्थकरला एलीची नेहमीच चिंता वाटे...म्हणजे तिच्या मुलगी असण्याची नव्हे..तर तिच्या टोकाच्या मनस्वीपणाची..मनाला त्या त्या क्षणी जे वाटेल ते बेधडक करण्याची..
थोडीशी बेपर्वा, थोडीशी उध्दट असली तरी मनाने स्वच्छ होती, अरागस होती...
आणि म्हणूनच तीर्थकरचा तिच्यावर जीव होता..
एली आणि तीर्थकर आज पाच वर्षे मित्र होते....एली मित्रापेक्षाही बरेच काही होती तीर्थकरसाठी..
फ़क्त तीर्थकरसाठी....
एलीला काही सांगायची सोयच नव्हती...
"तिरक्या..जाम सेंटी मारतोय आज? ड्रॉप इट नाऊ..."असं म्हणून उडवून लावलं तर???
आपण तिच्यासमोर झुरळ आहोत हे ती सिद्ध करून दाखवेलही...
म्हणून आजवर तिरक्या गप्प होता...
मनात एका फ़ोनसरशी येऊन गेलेल्या विचारांना हाकून लावत, बॉससमोर खुद्द त्यालाही पटणार नाहीत अशी चलनं फ़ाडून तीर्थकर खाली आला...
एलीसाठी काहीही...
"पेट्रोल ची टाकी फ़ुल्ल कर...आपण बाहेर चाललो आहोत...."
"एली...तुझा पत्ता काय??तू होतीस कुठे...?"
"तिरक्या...कळेलच ना सगळं??थोडा वेळ कळ नाही काढू शकत???
तीर्थकर गप्प...
"ठिकाय...चल"
तीर्थकर एली सांगेल तशी गाडी चालवत राहिला...जवळजवळ एक दीड तासाच्या प्रवासानंतर एक आडवाटेचे गाव लागले...
पुढे सरळसोट छोटी पाऊलवाट होती...पण मध्येच त्या पाऊलवाटेने लाजून मुरका मारावा अस तिला एक फ़ाटा फ़ुटला होता...आणि..
त्या फ़ाट्याच्या बरोबर शेवटी एक बंगलीवजा घर होते...एलीने तीर्थकरला गाडी तिकडे घ्यायला सांगीतली...
बंगली तशी टुमदार...पण बंगलीच्या बाजूला दिमाखात उभं असलेलं एक झाड तीर्थकरच्या नजरेत भरलं..
एली बंगल्याचं फ़ाटक उघडून आत शिरली...तीर्थकरने नेमप्लेट पाहिली...
ते एलीच्या वडीलांचं घर होतं...
एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं होतं...
तीर्थकर काय करावं हे न कळून तसाच उभा राहिला....पण तेवढ्यात सुरू झालेल्या पावसाने त्यालाही त्या झाडाखाली हलवलं...
एलीला पाऊस भयंकर प्रिय...
पावसात तुम्हाला छत्र्या लागतात कशाला रे???असा प्रश्न ती हटकून तिरक्याला विचारी...
पण एलीच्या जगात सर्व काही शक्य असल्याने आर्ग्युमेंटला मुळीच जागा नसायची..
एरवी पहिल्या पावसात वारा प्यायलेल्या वासरासारखी उंडारणारी एली त्या पावसाकडे बघत फ़क्त बसून होती...
एलीच्या मनात काय आहे?
पाऊस संपेपर्यंत एली-तिरक्या झाडाखाली बसून होते..
एली पावसाकडे बघत होती...तर तिरक्या एलीकडे...
नेहमी बेसुमार बडबड करणारया एलीचे स्वस्थचित्त आणि जाणते रूप तिरक्या प्रथमच पाहत होता..
"एली..???"
एलीने तिरक्याला झाडाखाली उभे केले आणि कशाचीतरी वाट पाहत डोळे मिटून फ़क्त उभी राहिली..
एवढ्यात वारयाची एक लहर आली...आणि...
डोक्यावरचं झाड पानाफ़ुलावरचं पाणी ओळंबत त्यांच्यावर बरसलं..
आणि ऑफ़िसमधून निघाल्यापासून आत्तापर्यंत गप्प गप्प असलेली एली बोलू लागली..
"माझ्या लहानपणी मी आणि डॅड इथेच या झाडाखाली बसत असू..माझ्या आणि डॅडच्या बरयाचश्या आठवणी या झाडाशी निगडीत आहेत..हे...’पावसाचे झाड’ आहे.."
पावसाचे झाड????
तिरक्या विस्मयचकीत होऊन ऐकत होता..
"पहिला पाऊस आम्ही याच झाडाच्या अंगाखांद्यावरून अंगावर घेत असू..after dad passed away मी कध्धी कध्धी या झाडाकडे फ़िरकले नाही...पण...तुझ्याबरोबर असताना i felt i dont miss my dad anymore...सो, एकवार पुन्हा तुझ्याबरोबर या इथे यावेसे वाटले...दोन दिवस मी इथेच होते...जगापासून दूर, तुझ्यापासून दूर....i never felt so vacant.."
एली भरून आलेल्या आवाजात पुटपुटत राहिली..
नेहमीच मनाचा कौल मानत आलेल्या एलीच्या भावनांच्या सच्चेपणाबाबत तिरक्याला काही संदेहच नव्हता...
असं असेल तर मग....
"एली....अम.....मला काही विचारायचे होते.."
"हुं.."
"अं...तुला मी...म्हणजे तू माझ्याशी..."
तिरक्या शब्दाशब्दाला ठेचकाळत होता..
आतापर्यंत मुसमुसत असलेली एली आपल्या रडवेल्या नाकाच्या नाकपुडया आणखी फ़ेंदारत फ़िस्कारली...
"dont spoil the moment you MCP...."
तिरक्या अवाक..
"yes...i do want to marry you...what took you so long???"
मग सगळं काही उमजून आल्यासारखा तिरक्या हसायला लागला....अगदी पावसाच्या झाडासारखा..
दोन बोटे बंदुकीसारखी रोखून एलीला म्हणाला.."गुन्हा कबूल???"
डोळ्यातलं पाणी निपटत एव्हाना एलीने तिचं टिपीकल खट्याळ हसायला सुरुवात केलेली असते...
"कबूल कबूल.."
मग प्रत्यक्ष हसण्यालाही हसू फ़ुटावं असं आसमंतात भरून राहिलं...
त्या दोघांना खळाळ हसताना पाहून पावसाचं झाडही पुन्हा एकवार अंगभर गदगदलं...त्या दोघांना झिम्माड भिजवून आपल्या मस्तीत डोलायला लागलं...
कालच्या पावसाने तिरक्याला एली दिली...
एलीला तिचं पावसाचं झाड दिलं...
पावसाच्या झाडाला नवा दोस्त दिला...
सर्वांना सर्व काही दिलं....
कालच्या पावसाने तुम्हाला काय दिलं??

हाय काय..नाय काय...!!

आज बरयाच दिवसांनी हे वाक्य येऊन टोचलं..
"तू अशी नव्हतीस.."
मनात नसतानाही मला हसू आले..
माणसं तोंड लांब करून असे डायलॉग मारायला लागली की मला मनापासून हसू येतं.. आजही आलं...
च्यायला...मी कशी नव्हते आणि आता कशी आहे..हे आता कोणीतरी दुसरं मला सांगणार...
म्हणजे अर्थात ’त्याच्या सोयीचं’ पेक्षा ’त्याची गैरसोय’ होण्यासारखं मी काय वागले हे मला पुन्हा पुन्हा सांगितलं जाणार..उदाहरणांनी पटवून दिले जाणार..
साहजिकच आहे..
’अ’ आणि ’ब’ भेटले..’अ’ काही परिस्थितींमध्ये कसा वागतो, कसा रिऍक्ट होतो हे ’ब’ बघत आलेला आहे...मग ’ब’ काही आडाखे बांधतो, ’अ’ एखाद्या परिस्थितीत कसा वागेल याचे ठोकताळे त्याला जमू शकतात...आणि ते बरयाच वेळा खरे ठरतात सुद्धा...पण एखादा दिवस असा उजाडतो...की तशीच परिस्थिती उदभवल्यावर ’अ’ हा ’ब’ च्या ठोकताळ्यात बिलकूल न बसणारं वागतो...असं एकदा झालं, दोनदा झालं की ’ब’ बिथरतो...आणि मग उदगारतो...
’तू अशी तर नव्हतीस..’
एखादा माणूस विश्वासार्ह आहे...हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो???
तो माणूस कसा वागू शकतो आणि कसा नाही हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो तेव्हाच ना???
म्हणजे एखाद्याबद्दल गृहितकं मांडायची...आणि प्रत्येक वेळी तो आपल्या अंदाजाप्रमाणेच वागला की ’जितं मया’ करत स्वत:चीच पाठ थोपटून घ्यायची...आपण त्याला किती ओळखतो याबद्दल फ़ुशारत ’अगदी विश्वासू माणूस बरं का!’ असं लेबल त्याला चिकटवून द्यायचं....
unpredictable माणसं विश्वासू नसतात??
माणूस एका कॅलिडोस्कोपसारखा आहे हे माझ्या मराठीच्या बाई नेहमी घोकायच्या...
मला तेव्हा ’कॅलिडोस्कोप’ हा शब्द खूप आवडायचा...तेव्हा तर कळतंही नव्हतं की हे ’कॅलिडोस्कोप’ काय प्रकार आहे ते...
आता कळतय..आयुष्य स्वच्छंद, विविधरंगी बनवायचा प्रयत्न चाललाय.. जे खरं वाटतं, जे पटतं, जे अत:प्रेरणेने वाटतं तेच करावं ह्याचा प्रयत्न चाललाय तर ही विश्वासर्हतेची बंधने येतात...
म्हणजे कायम दुसरयाच्या विश्वासाला पात्र होण्याकरता स्वत:ला चौकटीत अडकवून घ्यायचे???
मी असा वागलो तर काय????मग तसंच वागावं म्हणजे काम होईल....गैरसमज होणार नाहीत...
कायम या प्रश्नांची उत्तर देत घेत कृत्रिम जगत राहायचं...
का???
आणि कशासाठी???
याला ’जगणं’ म्हणतात???
आपण असंच चौकटीत वागत राहिलो तर एके दिवशी त्रिकोण,वर्तुळासारखी आपल्यावर पण प्रमेयं बनतील....
"अमुक तमुक परिस्थिती आहे..असे ठोकताळे आहेत...तर याची परिस्थितीजन्य वागणूक सांगा.."
म्हणजे ’माणूस-एक कॅलिडोस्कोप’ निबंध लिहून बोर्डात यायचं..आणि नंतर..कॅलिडोस्कोप विसरून फ़क्त ’स्कोप’ शोधायचा...
’कॅलिडोस्कोप’ आणि ’स्कोप’...
हाय काय आणि नाय काय...!!