ससुरा...!

"अगला स्टेशन कुतुब मिनार. दरवाजा बायी तरफ खुलेगा."

वेण्डी मेट्रोतल्या खास स्त्रियांसाठी असलेल्या २-सीटर जागेसमोर बारला टेकून कुठेतरी वर पाहात उभी होती. दाराच्या वरच येलो लाईनचा संपूर्ण मार्ग दाखवणारा नकाशा होता आणि त्यावरुन एक मुंगी चालत होती, सिकंदरपूरला मेट्रोमध्ये चढल्यापासून तिच्याकडेच लक्ष होतं वेण्डीचं. गाडी थांबली तशी ती मुंगीही थांबली, तिने अबाऊट टर्न केला आणि मिशा फेंदारुन अख्खा एक क्षण वेण्डीकडे पाहिलं. तिच्या लोंबणा-या लंबुळक्या अॅंटेनांपैकी एक जरा लहानच होती. वेण्डीने तिला नाव दिलं- टोरी अमॉस. वेण्डीला दूरचं दिसतं, हलक्यातला हलका आवाज, कुजबूजही ऐकू येते, पण, वेण्डी स्पायडरमॅन नाही, आणि व्हॅंपायर तर मुळीच नाही.

दार आपो‌आप उघडलं. गर्दीचा एक पुंजका तरंगत बाहेर गेला. जितकी माणसं बाहेर गेली तितकीच माणसं आत आली. जी माणसं बाहेर गेली ती पुन्हा आत आली असं झाली नाही, तरी त्या मेट्रोमध्ये काही बदललंय असं वाटलं नाही. वेण्डीला वाटलं की कुतुब मिनार, इतकंच काय हौज खास नामक स्टेशन देखील आहे याचा साक्षात्कार आपल्या तिशीत व्हावा याला काय म्हणावं? वेण्डीला ही माहिती असायला हवी होती की नको होती? शेरलॉकला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे देखील माहित नव्हतं, पण तो शेरलॉक आहे. वेण्डी शेरलॉक देखील नाही.

मी जसं टोरीकडे चौकस नजरेने पाहतेय तशी तीही आपल्याकडे ’कोण हा चमत्कारीक प्राणी’ म्हणून बघत असेल का? आपण फार गंमतीदार विचार करतो असं वाटलं वेण्डीला. मग तिने मोठया कष्टाने टोरीवरचे विचार काढून घेतले.

मेट्रोचं आपोआप बंद झालं आणि तो अजगर पुन्हा एकदा हलायला लागला. तिने आजूबाजूला नजर टाकली. कोणाचंही कोणाकडे लक्ष नव्हतं. गजबज, गोंधळ खूप होता, पण ते नुस्तंच माशा घोंघावताना जो अर्थहीन, डोक्यात तिडीक जाणारा घुमघुम आवाज होतो तसा होता. त्याला नाद नव्हता, त्याला सप्तकं नव्हती, इतकंच काय त्याला चढ-उतारही नव्हते. व्हाईट नॉईझसारखा तो आवाज वेण्डीच्या कानात गच्च बसला होता. पाहावा तो माणूस मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता किंवा कुठेतरी शून्यात नजर लावून बसला होता.

वेण्डीने टोरीकडे पाहिलं तेव्हा टोरी समयपूर बादलीला पोहोचूनन पुन्हा डाऊन यायला निघाली होती.

टोरी गुडगावच्या दिशेने चालली होती आणि वेण्डी गुडगावकडून दिल्लीकडे येत होती.

--

आधी वेण्डीला वाटायचं की शहरं तीच असतात, फक्त आपला पर्स्पेक्टीव्ह बदलतो.

घरं, त्यांची काळोखी माजघरं, घरातून येणारे टीव्हीचे आवाज, धुळमटलेल्या गच्च्या,अंगणातली तुळशी वृंदावनं, गोठ्यातली गुरं, गुरांची अंगकाठी, रस्त्याच्या बाजूने लावलेली झाडं, लोकांचे डोळे, त्यांच्या डोळ्यांतले दिवे, रात्री-दिवसा रस्त्यावरील वर्दळ  यावरुन शहराची ओळख ठरत असते. काहीतरी वजा होत असतं तेव्हा कशाचीतरी भर पडतच असते. रेंगाळलेले उच्छवास, वेण्यांचे वास, अपरिचित भाषेतली उत्साही बडबड, घराकडे जाणारी, घराकडून येणारी, घरापासून तुटलेली अनेक माणसं. तसं पाहायला गेलो तर आपण एकटे कधीच नसतो.

पण, गेले पाच दिवस तिला दिसलेलं गुडगाव पाहून ती चक्रावली होती, वैतागली होती आणि त्यानंतर अक्षरश: रडकुंडीला आली होती. शहर कसं असावं याबद्दलच्या वेण्डीच्या सर्व प्राथमिक कल्पनांना छेद देणारं ते शहर होतं. रस्त्यावर तिला आई-बाबाचा हात धरुन मजेत चालणारं एकही मूल दिसलं नाही की पंधरा-सोळा वर्षांची मुलं-मुली दिसली नाहीत.दिसली ती सर्व पोटापाण्याकरता गुडगावमध्ये येऊन राहणारी, पाच दिवस मान मोडून काम करणारी आणि शुक्रवारी रात्री थॅंक गॉड इट्स फ्रायडे म्हणजे टीजीआयएफ साजरा करत, दारू ढोसून लास होणारी तरूणाई!

रस्त्यावर एकही टपरी नाही, किराणा मालाचं दुकान नाही. छोट्यातली छोटी वस्तू घ्यायची असेल तरी तंगडतोड करत मॉलमध्ये जायचं. दारूची दुकानं मात्र नाक्या-नाक्यावर. वेण्डी राहात होती त्या डीएलएफ-३ भागापासून अॅंबियन्स नावाचा एक मॉल अवघ्या १ किलोमीटरवर होता, पण तिथे पोहोचेपर्यंत तिला मोलसरी ऍव्हेन्यू म्हणून एक रॅपिड मेट्रोचं स्टेशन लागायचं आणि त्यानंतर NH ४८. त्या रस्त्यावर जिथे पाहावं तिथे, वेळ कोणतीही असू देत जांभया देणारे, पारोसे, पचापच थुंकणारे ड्रायव्हर आणि रांगेने उभ्या असलेल्या टॅक्स्या पाहून तिचा उत्साहच गळून जायचा.
रस्त्यावर छोटं मूल नाही. कुटुंबं नाहीत. बागा नाहीत. विशीच्या खालची मुलं-मुलीच नाही. मेडिकलची, खेळण्यांची, कपड्यांची दुकानं नाहीत. एखाद्या शहरातली जिवंत सळसळ इथे नाहीच.

वड-पिंपळ नाहीत, आहेत ती सगळी आखूड, शोभेची झाडं, नाहीतर काटेकोरपणे कापून काढलेल्या लॉन्स. वेण्डीच्या गावात एक पुराणवड आहे. कल्पनाही करता येणार नाही इतकी वर्षं ऊन-पाऊस अंगावर झेलत विस्तारलेला तो अवाढव्य वड पाहून वेण्डीला उगाचच आधार असल्यागत वाटतं, एक नवी उभारी आल्यासारखी वाटते. या शहरात मात्र आधार वाटावा, आपली वाटावी, जिला धरून दिवसच्या दिवस काढू शकू अशी गोष्टच नाही. या शहरात आल्यापासूनच वेण्डीला हातात एक काठी देऊन बारीक दोरावर चालायला लावल्यागत वाटत होतं.

ती एका कंपनीत जाऊन आली. त्या कंपनीत किमान २०,००० लोक काम करतात, आणि त्यांचं सरासरी वय ३४-३५ आहे, पण त्यातला एकही लक्षात राहिला/राहिली नाही.
एव्हढी माणसं जातात आपल्या बाजूने- पण एकाचाही चेहरा धड आठवत नाही.
इतकी झाडं मागे टाकतो. कुठली होती ती? काहीच पत्ता नाही.
दिवसभर सगळ्यांच्या संभाषणातले तुकडे आदळत असतात अंगावर, पण त्यातलं काहीही डोक्यात नोंदलं जात नाही.
ड्रायव्हर तेजपाल ५ दिवस गुडगावमध्ये गाडी चालवून गावच्या ओढीने राजस्थानला पळतो आणि सोमवारी परततो तेव्हा रडवेला झालेला असतो.
संध्याकाळी सहाला काम संपवून हॉटेलवर परतायचं असतं तेव्हा वेण्डीला होपलेस, असहाय्य वाटतं
ते शहर तुमच्यातला सगळा जीवनरस शोषून घेतं.अगदी काही दिवसांच्या आतच! डिमेण्टर आपल्या सर्व आनंदी आठवणी शोषून घेतील तसं.

ट्रॅफिक तर सगळ्या शहरांमध्ये असतं. वेण्डीच्या मुंबईतलं ट्रॅफिक तर कुप्रसिद्धच. पण, तिथे कधी अडकून पडलोय अशी भावना होत नाही. आपण पुढे जातच राहणार आहोत असा विश्वास असतो तिथे. पण, गुडगावच्या ट्रॅफिकमध्ये मात्र इनर्शियाची अगदी लख्ख जाणवेल अशी भावना होते. आपण आता इथेच अडकून पडणार आहोत, आत पुढे जाणं होणारच नाही असं काहीतरी येडटाक डेस्परेशन आल्यासारखं होतं. एसी गाडीतही जीव कोंदतो आणि खिडक्या उघडल्या की घुसमटतो. इकडे आड, तिकडे विहिर.. काय करावं?

धुळीचा तो प्रचंड खकाणा, सर्वत्र बंजर, ओसाडीचं वातावरण, सकाळचं चावणारं, टुपणारं विचित्र ऊन, त्या एकंदर ओसाडीला अर्वाच्य शिवी हाणत अश्लील उभ्या असलेल्या त्या गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठ्या कॅफेटेरियामध्ये ताटामध्ये अन्नाचा डोंगर रचून तो अधाशागत चिवडणारी मुलं-मुली, रोजच्या रोज फुकट जाणारं किलोवारी अन्न, अर्थहीन, हेतूशून्य, तुपट सुबत्ता, मॉलमध्ये दररोज संध्याकाळी उधळला जाणारा अमाप पैसा..

अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टींनी गुडगाव मनातून उतरत गेलं. शेवटी शेवटी तर वेण्डीला गुडगावची इतकी शिसारी आली की शनिवारी सकाळी ८च्या मेट्रोने वेण्डी दिल्लीकडे यायला निघाली होती.
.
.
.
.
"अगला स्टेशन राजीव चौक. दरवाजा दायी तरफ खुलेगा."

गर्दीच्या एका पुंजक्याचा भाग होऊन वेण्डी राजीव चौक नामक स्टेशनवर उतरली. कायम गर्दीने लसलसणारं रेल्वे स्टेशन.
हवा उष्ण होती, प्लॅटफॉर्म उष्ण होता,  लोकं उष्ण होती, नजरा उष्ण आणि त्यांचे श्वासही.
ती दुपार-ती वेळ नेहमीप्रमाणेच तिच्या अंगात घुसली आणि ती त्या लोंढ्यावर स्वार होऊन स्टेशनच्या बाहेर यायला निघाली.

---

"अगला स्टेशन कुतुब मिनार. दरवाजा बायी तरफ खुलेगा."

पुन्हा एकदा कुतुब मिनार.

राजीव चौकला धावत पळत वेण्डी मेट्रोमध्ये चढली तेव्हा ती मेट्रो हूडा सिटी सेंटरलाच जाईल असा वेडगळ विश्वास तिला वाटत होता, पण तो साफ खोटा ठरला. मुंबईसारख्या इथेही येडपटासारख्या मधल्याच कुठल्यातरी स्टेशनपर्यंत जाणा-या गाड्या होत्या. आता काय करणार, साकेतला उतरू म्हणून ती तिथेच पेंढा भरलेल्या पांडासारखी बसून राहिली. गाडी कुतुब मिनारवरून पुन्हा एकदा आल्या दिशेने निघाली आणि तितक्यात एक बुटकी, ठेंगणीठुसकी मुलगी तिला हाय करत घाईघाईने तिच्या दिशेने येताना दिसली.

पहिल्यांदा वेण्डीला वाटलं की आपल्याला भास होतोय. कारण, आतापर्यंतच्या प्रवासात कोणी तिच्याशी आपणाहून बोललं नव्हतं किंवा उगीचच स्टेशन येईपर्यंत गप्पा मारल्या असं झालं नव्हतं.

ती मुलगी तिच्या बाजूला येऊन बसली आणि वेण्डीला कळलं की ती देखील वेण्डीसारखीच हूडा सिटी सेंटरला जायचं म्हणून गाडीत चढली होती. इव्हलिन तिचं नाव. कलकत्त्याहून आलेली. नोकरीच्या निमित्ताने हैद्राबाद-पुणे करत गुडगावला यायला लागलेली, सैराटचं ’झिंगाट’ गाणं मोडक्या मराठीत बोलता येणारी, गुडगावचा मनोमन प्रचंड तिरस्कार करणारी. I won't deny that this city gives me a livelihood, but that doesn't mean I have to like it असं मॅटर-ऑफ-फॅक्टली सांगणारी.

साकेतला दोघींनी गाडी बदलली. आधीच त्या भरपूर माणसं कोंबून भरलेली आणि त्यात भर म्हणून प्रत्येक स्टेशनवर माणसंच माणसं त्यांच्यावर चाल करुन येत होती. काळी, गोरी, उंच, बुटकी, क्रूर, मायाळू, मतलबी, हेकणी, फ़ेंगाडी, देखणी.
या सगळ्या गर्दीत तिला त्या दोघींच्या भोवती पातळ मेम्ब्रेनचे बुडबुडे असल्यासारखे वाटले. माणसं त्यांच्यावरुन वाहतायेत खरी, पण त्यांना या दोघींची काही पडलेली नाहीये आणि ना त्या दोघींना त्यांची. गप्पा रंगल्या, गुडगावला यथेच्छ शिव्या घालून झाल्या, मग अचानक सीन समूळ बदलतो तसं झालं. आपण गुडगावमध्ये आहोत याचा वेण्डीला विसर पडला.

पण, तो आनंद फार काळ टिकला नाही. लवकरच वेण्डीचं स्टेशन आलं. वेण्डीचा पाय निघत नव्हता आणि इव्हलिनचा चेहरा उतरलेला होता; पण, उतरायला हवंच होतं. वेण्डी इव्हलिनचा निरोप घेऊन गाडीतून उतरली आणि त्या निर्मनुष्य स्टेशनवर एकट्यानेच उभं असताना तिला फुटून फुटून  रडावंसं वाटलं. आपल्याला रडू का येतंय याची कणभरही कल्पना तिला अर्थातच नव्हती, पण ती रडणार नव्हती. दुस-यांसमोर असलं काही करायची सवय नव्हतीच तिला. तिने चिमटीत कपाळ दाबून ठेवलं आणि कपाळ खसखसून घासलं, सगळे विचार पुसले जातील समहा‌ऊ या अपेक्षेत. मग तिला वाटलं की गेल्या सहा-सात दिवसांमध्ये आलेल्या अनुभवांपेक्षा हे  नक्कीच वेगळं होतं. पण नेमकं कसं?  एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण नेगेटिव्हवर कसे उमटतात पुराव्यादाखल, तसंच त्या एका तासाने तिच्या मनावर एक कायमची खूण उमटवून ठेवली होती.
आणि मग काही ऐका-बोलण्याची, विचार करण्याची, आत चाललेल्या ठसठशीचा मागोवा घेण्याची गरज संपली. काहीतरी निसटून चालल्याची अस्वस्थता संपली.
एक साधं सरळ जिवंत सत्य सापडावं तसं वाटलं तिला.

कधीकधी पूर्णत्वाची भावना नकोच असते अगदी पण काहीही नसण्याची, आपल्या आतआत काहीही न हलल्याची भावना नको असते.
आज नेमकं तेच वेगळं होतं.

वेण्डीने मग एक खोल खोल श्वास घेतला आणि उगाचच स्टेशनच्या बाहेर पसरलेल्या गुडगावकडे पाहून म्हटलं, "कोई नही, ये तो ससुरा गुडगाव है. यहां यही होना है"

एक वर्ष स्पघेटीचं.

1971. ते वर्ष स्पघेटीचं होतं.

1971 या वर्षात मी जगण्याकरिता स्पघेटी केली आणि स्पघेटी करण्याकरता जगलो. त्या वेळी अॅल्युमिनियमच्या पॉटमधून येणा-या वाफा माझं आनंदनिधान होत्या आणि सॉसपॅनमध्ये बुडबुडत उकळणा-या टोमॅटो सॉसवर माझ्या आयुष्यातल्या सर्व आशा-आकांक्षा एकवटलेल्या होत्या.

तर, एके दिवशी मी किचनमधली उपकरणं विकणा-या एका स्टो‌अरमध्ये गेलो आणि तिथून एक किचन टायमर आणि अॅल्युमिनियमचा भलामोठा कुकींग पॉट घेतला. तो पॉट इतका मोठा होता की त्यात एखाद्या जर्मन शेफर्डलाही आंघोळ घालता आली असती. मग मी सुपरमार्केटमध्ये गेलो आणि तिथून चित्रविचित्र नावांचे अनेक  मसाले आणले. त्यानंतर मी एका बुकस्टो‌अरमधून एक पास्ता कुकबुक उचललं आणि अक्षरशः डझनावारी टोमॅटो घेतले. त्या वर्षात मी स्पघेटीचे जे मिळतील ते, जे म्हणाल ते, असतील नसतील तितके सर्व ब्रँड खरेदी केले.. मनुष्यजातीला माहित असलेले सर्व सॉस स्टोव्हवर उकळवले. त्या काळात माझ्या घरात सगळीकडे आल्याचे, कांद्याचे आणि ऑलिव्ह ऑ‌ईलचे सूक्ष्म कण तरंगत असायचे. त्यांचा एक दिसेल न दिसेलसा ढग माझ्या घरात सर्वत्र व्यापून राहिलेला असला पाहिजे कारण, त्यांचा वास माझ्या त्या छोट्याशा अपार्टमेण्टच्या कानकोप-यात, जमिनीत, सिलिंगवर, भिंतीवर, माझ्या कपड्यांवर, माझ्या पुस्तकांवर, माझ्या रेकॉर्ड्सवर, माझ्या टेनिस रॅकेटवर, माझ्या जुन्या पत्रांच्या बंडलामध्येही शिरला होता. जुन्या काळी रोमच्या रोमारोमातूनही असाच सुगंध दरवळत असला पाहिजे.

तर, ही कहाणी 1971 ए.डी. ची आहे.

त्यावेळी मी अगदी नेम केल्यासारखा स्पघेटी बनवत होतो आणि एकटाच खात होतो. स्पघेटीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ती एकट्यानेच खावी हे मला पटलं होतं. आता, मला असं का वाटलं हे मला नीट सांगता येणार नाही, पण तसं वाटलं, हे मात्र खरं!

मी स्पघेटीसोबत नेहमी चहा प्यायचो आणि लेट्यूस-काकडीचं छानसं सॅलड करुन खायचो. चहा आणि सॅलड मात्र भरपूर घ्यायचो. मी ते सर्व छानपैकी टेबलावर मांडायचो आणि आरामात, सावकाश, पेपर वाचत वाचत खायचो. रविवार ते शनिवार, सर्वच वार स्पघेटीचे वार असायचे आणि प्रत्येकी रविवारी एक नवा स्पघेटी आठवडा सुरु व्हायचा.

मी जेव्हा प्लेटमध्ये स्पघेटी घे‌ऊन खायला बसायचो- खासकरुन एखाद्या कुंद पावसाळी दुपारी- तेव्हा मला कोणीतरी माझं दार ठोठावणार आहे असं वाटत राहायचं. मी त्या दारामागच्या दार ठोठावणा-या व्यक्ती कोण असतील याची कल्पना करुन पाहायचो. त्या माझ्या कल्पनेतल्या, मला भेटायला येणा-या व्यक्ती प्रत्येकवेळी वेगळ्या असायच्या. कधीकधी त्या व्यक्तीला मी ओळखत देखील नसायचो, तर कधीकधी ती व्यक्ती माझ्या ओळखीतली निघायची. एके वेळी ती हाय स्कूलमधली, जिच्यासोबत मी डेटवर गेलो होतो, ती रेखीव पायांची मुलगी होती. आणि एकदा खुद्द मीच होतो, पण काही वर्षांपूर्वीचा! काही वर्षांपूर्वीचा मीच मला भेट द्यायला आलेलो होतो. एकदा तर चक्क विल्यम होल्डन आला होता, जेनिफर जोन्सला कवेत घे‌ऊन..

विल्यम होल्डन? हा!

पण, यांच्यापैकी कोणीही माझ्या अपार्टमेण्टमध्ये आलं नाही. ते सर्व माझ्या दाराच्या बाहेरच घुटमळत राहिले, दार न ठोठावता.. आठवणीतल्या एखाद्या सुट्या झालेल्या पानाप्रमाणे आणि मग निघून गेले..

-

ऋतू कोणताही असो, मी आपला स्पघेटी शिजवत राहिलो, कोणावर तरी सूड उगवायचा असल्यासारखा! प्रेमात फसवली गेलेली, एकाकी मुलगी आपली जुनी पत्रं कशी जाळायला आगीत टाकून देते, त्याप्रमाणे मी मूठमूठभर स्पघेटी त्या पॉटमध्ये भिरकावत होतो.

मी काळाच्या भरडल्या गेलेल्या सावल्या गोळा करायचो, त्यांना कुस्करुन, मळून छानसा जर्मन शेफर्डचा आकार द्यायचो, मग त्यांना त्या उकळत्या पाण्यामध्ये भिरकावून द्यायचो आणि मग छानपैकी मीठ शिंपडायचो. मग मी दोन मोठाल्या चॉपस्टिक्स हातात घे‌ऊन त्या टायमरचा व्याकुळव्यथित टिंग ऐकू ये‌ईपर्यंत त्या पॉटपाशीच भिरभिरल्यासारखा उभा असायचो.

स्पघेटीच्या त्या काड्या म्हणजे एक प्रकरण होतं. मी त्यांना कधीच नजरे‌आड हो‌ऊ द्यायचो नाही. माझी पाठ वळली की त्या पॉटवरुन उतरुन रात्रीच्या अंधारात नाहिशा होतील असं वाटायचं मला. एखादं घनदाट जंगल कसं रंगबिरंगी फुलपाखरांना काळाच्या कवेत गिळून घेतं तशीच ती रात्र देखील त्या स्पघेटीच्या काड्यांना आपल्या आत सारण्याकरिता शांतपणे कानोसा घेत थांबलेली आहे असं वाटायचं.

स्पघेटी आया पार्मिहियाना
स्पघेटी आया नापोलेताना
स्पघेटी आल कार्तोक्शियो
स्पघेटी आग्लियो ई ओलियो
स्पघेटी आला कार्बोनारा
स्पघेटी देला पिना
याशिवाय, कधीतरी राहून गेल्याने फ्रिजमध्ये भिरकावून दिलेली, नाव नसलेली थंडगार, निष्प्राण स्पघेटी असायचीच.

प्रचंड धगीतून जन्मास आलेल्या स्पघेटीची काडी न् काडी त्या 1971च्या पुरात वाहून गेली आणि नाहिशी झाली.
मला त्यांची अजूनही ल‌ईच आठवण येते- 1971 वर्षातल्या त्या सगळ्या स्पघेटींची.

-

तीन वीसला फोन वाजला तेव्हा मी तातामीवर पाय पसरुन सिलिंगकडे एकटक पाहात पडलो होतो. मी पडलो होतो त्या जागेवर हिवाळ्यातला कोमट सूर्यप्रकाश देखील ये‌ऊन पडला होता. डिसेंबर 1971च्या त्या हिवाळी स्पॉटला‌ईटमध्ये मी एखाद्या मरुन पडलेल्या माशीसारखा पडलो होतो.

पहिल्यांदा मला फोन वाजतोय हेच कळलं नाही. तो आवाज म्हणजे हवेमध्ये अद्याप रेंगाळत राहिलेल्या आवाजाची ओळख हरवत चालेली आठवण असेल असं मला वाटलं. पण, शेवटी त्या आवाजाला एक घनता यायला लागली आणि तो फोनचा आवाजच आहे असं वाटणा-या फोनच्या आवाजासारखा ऐकू यायला लागला. म्हणजे तो शंभर टक्के ख-या हवेतला शंभर टक्के ख-या फोनच्या रिंगचा आवाज होता तर! मी तिथून पडल्या पडल्याच हात लांबवला आणि रीसिव्हर उचलला.

दुस-या बाजूने एक मुलगी बोलत होती. ती इतकी-माहित-नसावीशी-वाटणारी मुलगी होती की मी साडेचारपर्यंत तिला पुन्हा विसरुनही गेलो असतो.  ती माझ्या एका मित्राची माजी गर्लफ्रेण्ड होती. काहीतरी झालं आणि तो आणि ती माहित-नसावीशी-वाटणारी मुलगी एकत्र आले. त्यानंतर पुन्हा काहीतरी झालं आणि त्यांचा ब्रेक‌अप झाला. त्यांना एकत्र आणण्यात माझा थोडाफार का हो‌ईना वाटा होता हे मात्र मी मान्य करतो.

"सॉरी, मी अवेळी फोन करतेय", ती म्हणाली, "पण तो कुठेय हे माहितिये का तुला?"

मी फोनकडे पाहिलं आणि फोनची कॉर्ड तपासली. कॉर्ड फोनला लावलेली होती, म्हणजे कोणीतरी खरंच फोनवर होतं. मी आठवत नाही काय ते, पण काहीतरी उत्तर दिलं. त्या मुलीच्या आवाजावरुन ती प्रचंड काळजीत आहे हे कळत होतं, पण ते जे काय असेल ते असेल, मला त्यात अडकून घ्यायची इच्छा नव्हती.

"कोणीही मला सांगत नाहिये की तो कुठेय." तिचा आवाज एकदम बर्फाळ होता. "सगळेच आपल्याला माहित नाहीये असं नाटक करतायेत. पण मला त्याला काहीतरी महत्त्वांच सांगायचंय, सो प्लीज, मला सांग तो कुठेय. आय प्रॉमिस की मी तुला यात ओढणार नाही. सांग, कुठेय तो?"

"मला खरंच माहित नाही", मी म्हणालो. "मी त्याला बरेच दिवस झाले पाहिलेलं नाहीये". हा माझाच आवाज होता का? मी त्याला बरेच दिवस झाले पाहिलेलं नाहिये हे खरं होतं, पण मला काही माहित नसल्याचा भाग खोटा होता. मला त्याचा पत्ता आणि फोन नंबर माहित होता. मी खोटं बोललो की माझ्या आवाजाचं असं काहीतरी विचित्र होतं.

तिच्याकडून काहीच उत्तर येत नाही.

फोनचा बर्फ झाल्यासारखा वाटत होता.

मग माझ्या सभोवतालच्या सगळ्या वस्तू बर्फाच्या झाल्या, मी जे. जी. बलार्डच्या सायन्स फिक्शन कथेत असल्यासारख्या!

"मला खरंच माहित नाही", मी पुन्हा तेच म्हणालो, "तो निघून गेला त्याला खूप दिवस झाले, पण तो एक शब्दही बोलला नाही."

ती मुलगी हसली, "गिव्ह मी अ ब्रेक!  त्याला इतकं डोकं नव्हतं. त्याला प्रत्येक गोष्टीचा गाजावाजा करायची सवय होती हे तुलाही माहितीये."

ती बरोबरच बोलत होती. त्या मुलाचा वरचा मजला खरंच रिकामा होता.

पण तरीही, तो कुठे आहे हे मी तिला सांगणार नव्हतो. तसं केलं असतं तर दुस-या दिवशी त्याने मला फोन केला असता आणि चार शब्द सुनावले असते. आणि लोकांच्या लफड्यात पडून स्वतःच्या डोक्याला ताप करुन घेणं आता मी सोडलं होतं. मी मागच्या दारात एक खड्डा खोदला होता आणि त्यात जे गाडून, पुरुन टाकायचं ते सगळं लोटून तो बुजवून टाकला होता. आता तो खड्डा पुन्हा कोणालाही उकरता येणार नव्हता.

"आयॅम सॉरी", मी म्हणालो.

"तुला मी अगदी अजिबात आवडत नाही, नाही का?" तिने अचानक विचारलं.

यावर काय बोलावं हे मला कळेना. मला काही विशेष नावडायची असं नव्हतं, पण मला तिच्याबद्दल कधीच काही विशेष वाटलं नाही. आता ज्याच्याबद्दल काहीच, कधीच वाटलं नाही त्याच्याबद्दल आवडणं किंवा नावडणं यापैकी काही वाटून घेणं म्हणजे महाकठीणच!

"आयॅम सॉरी", मी पुन्हा म्हणालो, "पण आता या क्षणी मी स्पघेटी बनवतोय."

"काय म्हणालास?"

"मी म्हटलं, मी स्पघेटी बनवतोय" मी खोटंच बोललो. मी ते का बोललो याची मला कल्पना नाही. पण ते खोटं माझा, माझ्या जगण्याचा एक भाग होतं, इतकं की, त्यावेळेपुरता तरी मला मी खोटं बोलतोय असं वाटलं नाही.

मग मी कल्पनेतच एक पॉट पाण्याने भरला, तो माझ्या कल्पनेतल्या स्टोव्हवर ठेवला आणि कल्पनेतल्या काडीने तो पेटवला.

"तर?" तिने विचारलं.

पाण्याला उकळी आली तशी मी त्याच्यावर कल्पनेतलं मीठ शिंपडलं, कल्पनेतच मूठभर स्पघेटी घे‌ऊन त्या कल्पनेतल्या पॉटमध्ये हळुवारपणे पसरुन दिली आणि किचनचा टायमर कल्पनेतच बारा मिनीटाला सेट केला.

"तर मी आता बोलू शकत नाही. स्पघेटी गंडेल."

ती एक शब्दही बोलली नाही.

"आयॅम सॉरी, पण स्पघेटी बनवणं खूप नाजूक काम असतं."

ती मुलगी शांतच होती. माझ्या हातातल्या त्या फोनचा पुन्हा एकदा बर्फ व्हायला लागला होता.

"थोड्या वेळाने कॉल करशील का?" मी घा‌ईघा‌ईने म्हटलं.

"तू आता स्पघेटी बनवतो आहेस म्हणून?" तिने विचारलं

"हो"

"कोणासाठी बनवतो आहेस की एकटाच खाणार आहेस?"

"मी एकटाच खाणार आहे"

तिने दीर्घ श्वास घेतला आणि हळूवारपणे सोडला. "तुला हे माहित असण्याची शक्यता नाहीच, पण तरीही सांगते, मी खरंच अडचणीत आहे, काय करावं हे कळत नाहिये."

"आयॅम सॉरी की मी तुला मदत करु शकत नाही", मी म्हणालो.

"माझे पैसेही अडकलेत"

"अच्छा"

"तो माझे पैसे देणं लागतो" ती म्हणाली, "मी त्याला पैसे दिले होते. मला माहितिये की मी द्यायला नको होते, पण मला द्यावेच लागले."

मी तब्बल एक मिनीट शांत होतो, माझे विचार आता स्पघेटीकडे वळायला लागले होते. "आयॅम सॉरी, मी म्हणालो, पण माझी स्पघेटी स्टोव्हवर आहे, सो,..."

ती कशीतरीच हसली, "गुडबाय", ती म्हणाली, "तुझ्या स्पघेटीला माझ्याकडून हाय सांग. आय होप की ती छान असेल."

"बाय", मी म्हणालो

मी फोन ठेवला तेव्हा ते हिवाळ्यातल्या कोमट सूर्यप्रकाशाचं वर्तुळ एकदोन इंचांनी बाजूला सरकलं होतं. मी पुन्हा एकदा त्या प्रकाशामध्ये अंग लोटून दिलं आणि छताकडे एकटक पाहायला लागलो.

-

कायम उकळत राहाणा-या, पण कधीच न शिजणा-या स्पघेटीबद्दल विचार करणं ही अत्यंत अप्रिय, वेदनादायक गोष्ट आहे.

आता मला त्या मुलीला काही न सांगीतल्याचा पश्चाताप हो‌ऊ लागतो. मी तिला काहीतरी सांगायला हवं होतं. तिचा तो एक्स-बॉयफ्रेण्ड नाही म्हणायला नाकर्ताच होता. आपल्याला कलेतलं खूप काही कळतं असा आव आणून बोलणारी पोकळ माणसं असतात ना, त्यातला. त्याला फक्त बडबडच करता येते हे आता बहुतेक सर्वांना ठा‌ऊक झालं होतं, त्यामुळे कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायचं नाही. त्याने तिच्याकडून बरेच पैसे उचलले असणार, किमान तिच्या आवाजावरुन तरी असं वाटत होतं. पण काहीही असो, तुम्ही कोणाकडून काही घेतलंत तर ते परत करायलाच हवं, हा नियम आहे.

त्या मुलीचं काय झालं असावं?? माझ्या मनात कधीकधी विचार येतो, वाफाळणा-या स्पघेटीची प्लेट समोर घे‌ऊन बसलं की तर हटकून येतो. फोन ठेवल्यावर ती कायमची नाहिशी झाली का? साडेचारच्या कललेल्या सावल्यांमध्ये विरुन गेली का? मला याचा दोष लागतो का?

पण माझीही बाजू समजून घ्या. मला त्यावेळी कोणातही, कशातही अडकायची इच्छा नव्हती. त्यामुळे मी आपला माझा माझाच, एकट्याने स्पघेटी शिजवत राहिलो होतो, त्या जर्मन शेफर्डही मावू शकेल इतक्या मोठ्या आकाराच्या पॉटमध्ये.

-

दुरम सेमोलिना. इटलीच्या शेतांमध्ये डोलणारा स्पघेटीचा सोनसळी गहू.

1971मध्ये आपण जर इथे काही धाडलं असेलच तर त एकाकीपणा धाडून दिला होता हे जर इटालियन माणसांना कळलं तर त्यांना कितपत आश्चर्य वाटेल?

--

पुस्तकः ब्लाईंड विलो, स्लीपिंग वूमन
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

मिकन् आणि गु-या


सेकंद काट्याने साठ घरं ओलांडली आणि एक मोठ्ठाली जांभ‌ई देत घड्याळबुवांनी आपल्या घड्याळाकडे एक नजर टाकली. मिकनचं काही अजून आटपलेलं दिसत नव्हतं.

गेली १० मिनीटं मिकन् खिडकीसमोरच मागे-पुढे जात काहीतरी करत होता. त्याला तिथे काय दिसलं होतं कोण जाणे, पण सारखं आपलं गुडघ्यावर हात ठेवून खाली वाकून आणि डोळे बारीक करून काहीतरी बघायचं आणि दोन-तीन पावलं पुढे जायचं आणि पुन्हा मागे पाहात चार पाच पावलं मागे यायचं असं चाललेलं होतं, म्हणजे त्याला काहीतरी दिसलं होतं खास! मिकन्  काय करतोय याचा अंदाज लावणं हा घड्याळबुवांचा मोठ्ठा विरंगुळा होता. घड्याळबुवांनी  आपल्या घड्याळात पाहिलं तर अकरा वाजले होते. त्यांनी झडझडून आळस दिला, टोल द्यायची वेळ झाली होती. घड्याळबुवांनी टोल सुरू केले आणि मिकनचं लक्ष खिडकीवरून उडालं.

मिकन् भारल्यासारखा घड्याळ्याच्या खाली ये‌ऊन उभा राहिला. त्याला हा आवाज म्हणजे घड्याळ्याच्या टोलांचा आवाज आहे हे कळू लागल्यापासून कितीतरी हजारो तास उलटून गेले होते पण, त्याचं घड्याळ्याच्या टोलांविषयीचं अप्रूप आणि विस्मय काही कमी होत नव्हता. घड्याळ्याच्या आतून कोण हे आवाज काढत होतं, आणि ते जे कोण होतं, ते घड्याळ्याच्या आत मावूच कसं काय शकतं याबद्दल मिकनला खूप कुतूहल होतं. पण, तीन मिकन्  जर एकमेकांवर उभे केले असते तरी मिकनचा हात घड्याळ्यापर्यंत पोहोचू शकला नसता त्यामुळे मिकनला तरत-हेच्या कल्पना लढवण्यापलीकडे फारसं काही करता येत नव्ह्तं. घड्याळाचे सर्वच्या सर्व अकरा टोल ऐकत तो तिथेच उभा होता आणि टोल संपेपर्यंत त्याचं तोंड उघडं ते उघडंच होतं. टोल संपले आणि मिकनने तोंड मिटलं. मग त्याने स्वत:शीच काहीतरी बोलत मान हलवली आणि वळून तो पुन्हा खिडकी निरीक्षणात गढला.

तो जसजसा खिडकीच्या गजांच्या जवळ जात होता तसतसे ते गज दूर जात होते, आणि दूर जावं तसतसे ते जवळ येत होते. आणि पुन्हा त्यामधून दिसणारं झाड दिसायचं थांबत नव्ह्तं किंवा कोणताही गज झाडावर येतोय असं होत नव्हतं. हे कसं काय बुवा? मिकनचं आश्चर्य त्याच्या डोळ्यांमध्ये मावत नव्हतं. म्हणून तो पुनपुन्हा पुढे-मागे होत खात्री करून घेत होता.  आपण हा काहीतरी नवीन शोध लावलाय असं वाटलं त्याला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला हा शोध आ‌ईला सांगायला म्हणून तो घा‌ईघा‌ईने वळला खरा, पण त्याला आठवलं की आ‌ई बाहेर गेलिये. आज घरात फक्त तो आणि बाबाच होता. त्याला नवं काही दिसलं, कळलं, त्याने काहीतरी नवीन ऐकलं की तो सर्वात पहिले आ‌ईला जा‌ऊन सांगे. मग आ‌ई त्याबद्दल त्याला आणखी काय-काय सांगत बसे. आ‌ईशी बोलताना त्याला एका नव्या जगात गेल्यासारखं वाटे.

परवाच आ‌ईने त्याला बाजारात नेलेलं तेव्हा त्याला आणखी कितीतरी भाज्यांची, फळांची नावं कळली. मिकनला ते एकदम आवडलेलं. कोहळा, अमरफळ, अननस, घेवडा हे शब्द त्याला भयंकर आवडले होते, इतके की, तो दिवसभर बंदुकीने ठो ठो गोळ्या मारल्यासारखा ते शब्द घोकत होता. आपल्याकडे अशा शब्दांचा खूप मोठा साठा असेल तर आपण लवकर मोठे हो‌ऊ शकू असं त्याला खूप वाटे. आणि तसंही, आ‌ईच्या "मोठा झालास की कर"च्या यादीतल्या गोष्टी वाढत होत्या, त्यामुळे त्याला लवकरात लवकर मोठं व्हायचं होतं. गोष्टीतली राजकन्या चेटकिणीच्या शापाने फायकसचं झाड हो‌ऊन त्याच्या हॉलमध्ये उभी होती तिला किस करून पुन्हा राजकन्या करायचं होतं. रोज सकाळी आंघोळीची रणधुमाळी सुरू व्हायच्या आधी तो त्या राजकन्येला तसं वचनही दे‌ऊन यायचा. आताही त्याने त्या झाडाकडे पाहात कंबरेतून किंचीत वाकत पुन्हा एकदा मान डोलावली. आ‌ई नाही तर नाही, मग आपला हा शोध बाबाला सांगूयात का असा विचार करत तो एका पायावरून दुस-या पायावर झुलत राहिला, पण मग त्याला मागच्या वेळी काय झालेलं ते आठवलं.

एके दिवशी तो चांदोबावर बसून फे-या मारत असताना चांदोबाचं एक चाक निखळून बाहेर आलं होतं. आ‌ईने खूप वेळ चाकाशी झटापट केली, पण तिला काय ते बसवता ये‌ईना. आ‌ईला येत नाही अशी पण एखादी गोष्ट आहे हे मिकनला तेव्हाच कळलेलं. मग आ‌ईने त्याला बाबाच्या खोलीत पाठवलं. बाबा त्याचा लॅपटॉप घे‌ऊन काहीतरी फटाफट लिहिण्यात गढला होता. मिकनने बाबाला हाक मारली पण ती काही बाबाच्या कानावर पोहोचलीच नाही. मग त्याने बाबाच्या हातावर टकटक केली, तेव्हा बाबा गाढ झोपेतून आचानक जागा झाल्यासारखा दचकला आणि त्याने मिकनकडे पाहिलं. त्यानंतरचे तीन चार सेकंद तो मिकनकडे अनोळखी नजरेने पाहत राहिला. मिकनला ते बिलकुल आवडलं नाही. "ए बाबा, मी मिकनेय" असं सांगण्याकरता मिकनने तोंड उघडलं, तितक्यात बाबाने त्याचा चहाचा रिकामा मग त्याच्या हातात दिला आणि तो पुन्हा कामात गढला. मिकनला खूप वा‌ईट वाटलेलं तेव्हा. आताही ते आठवताना त्याने ओठ बाहेर काढले आणि अचानकच त्याचे डोळे विस्फारले.

घरात आ‌ई नाही.

आज घरात आ‌ई नाही.

घरात आज आ‌ई नाही.

मिकनने अचानक "ये!" करत हात उडवले आणि आनंदात सवयीने आ‌ईला शोधायचा तसं आजही शोधलं. मग मान हलवत स्वत:लाच बोटाने दटावत "मिकन्, तू वेडा आहेस का, आ‌ई घरात नाही" म्हटलं. त्याला कसलातरी आनंद झाला होता खरा!

मग तो गंभीर झाला. त्याने हळूचकन जा‌ऊन बाबाच्या खोलीत नजर टाकली तर त्याला दिसलं की बाबा कपाट लावण्यात गुंतला होता. पुढची किमान १५ मिनीटं तरी बाबा लुडबूड करायला येणार नाही हे त्याने ताडलं आणि मग तो तयारीला लागला. त्याने सावधपणे पावलं टाकत टेबलाखालची पोकळी गाठली आणि हाताची दुर्बीण करत दारालगतच्या कोप-याकडे नजर टाकली.

गु-या शेपूट अंगाभोवती लपेटून मस्तपैकी झोपला होता.

मिकनला तशी फार कशाची भीती वाटायची नाही, पण या गु-याला तो खूप भ्यायचा. गूं गूं गूं आवाज करत, दाताड विचकटत तो सतत आपल्या मागावर आहे असे मिकनला सारखं वाटे. दिवसा तो बहुधा झोपलेलाच असायचा, पण रात्री आ‌ई त्याला त्याच्या झोपण्याच्या खोलीत आणून ठेवायची तेव्हा मिकनला दरदरून घाम फुटे. त्या गूं गूं आवाजातून तो आपल्याला "मिकोssन , मिsssकोsssन" सतत हाका मारतो आहे असे मिकनला वाटे. त्या आवाजाने त्याला गुंगी आल्यासारखी हो‌ई, आणि झोपही आपो‌आप ये‌ई, गु-याचा बंदोबस्त करायचा हे त्याने कधीपासूनच ठरवलं होतं, पण तशी संधी मिळत नव्हती. आज ती संधी आयतीच चालून आली होती.

मिकनने हाताची दुर्बीण तीनतीनदा रोखून गु-या झोपल्याची खात्री करून घेतली. आता आपल्या या मोहिमेच्या आड कोण्णीकोण्णी यायचं नाही असं पाहून मिकनने चांदोबाला हाय-फाय केलं आणि तो टेबलाखालच्या पोकळीतून बाहेर आला. त्याने इकडेतिकडे शोधून आपली इटुकली लाकडी तलवार पॅंटमध्ये खोचली, कपाटातला उशी्चा अभ्रा उपसून बाहेर काढला आणि मानेभोवती गुंडाळून पाठीवर केपसारखा सोडला. मग त्याने डोळ्यांवर मि. इन्क्रेडिबलचा मास्क लावला आणि दोन्ही मुठी कंबरेवर ठेवून सुपरमॅनची पोझ दिली. चांदोबाने न राहवून टाळ्या वाजवत मिकनला दाद दिली.  मग मिकन् हळूहळू, पावलांचा अजिबात आवाज हो‌ऊ न देता गु-याच्या दिशेने सरकू लागला. गु-या दोन हातांच्या अंतरावर आला तशी त्याने हळूचकन जा‌ऊन गु-याला मागून पकडलं. पण गु-या कसचा त्याच्या हातात मावतोय! मिकनचे दोन्ही हात त्याच्या बाजूंनाही पोहोचत नव्हते. शिवाय, मिकनने इतका खुला हल्ला चढवला तरी गु-या आपला गाढ झोपेतच होता. मग काय ब्र क्रावं? काय ब्र क्रावं? असा विचार करत मिकन्  थोडावेळ शांत उभा राहिला. मग त्याने पुन्हा टेबलाखालची पोकळी गाठली आणि चांदोबाशी थोडी सल्लामसलत केली. थोड्या वेळाने मिकन्  आत्मविश्वासाने पावलं टाकत आला आणि त्याने पुटकन जा‌ऊन दोन्ही हातांनी गु-याचं शेपूट पकडलं. गु-यामहाराजांना कोणती काळझोप लागलेली काय माहित!  इतकं हो‌ऊनही ते अजून ढिम्मच होते. मिकनने त्याला दरादरा ओढत न्यायला सुरूवात केली. अवघ्या तीन-सव्वा तीन फूट उंचीचा मिकन दात-ओठ खा‌ऊन गु-याला ओढत होता. शेवटी एकदाची ती वरात दारापर्यंत आली तशी मिकनने गु-याला दाराबाहेर ढकलून दिलं. पण इथे एक जबरदस्त घोटाळा झाला! गु-या पडला तर पडला, पण कितीतरी मोठठाला आवाज करत दाणकन जमिनीवर आपटला. त्या आवाजाने मिकनच्या कानठळ्या बसल्या आणि तो जागच्या जागी गारठला.

इतका मोठा आवाज कसला झाला म्हणून बाबा घाब-या घाब-या हॉलमध्ये आला आणि सताड उघड्या दारासमोर चाललेलं हे थरारनाट्य पाहून  त्याचा पुतळा झाला.

मिकन् थोड्याशा अस्वस्थपणे बाबाकडे पाहात होता आणि बाबा मिकनकडे. किती सेकंद, मिनीटं झाली माहित नाही, पण मग बाबा हळूह्ळू भानावर आला. मिकनने ओठ बाहेर काढलेले होते आणि उकीडवं बसून भेदरलेल्या डोळ्याने तो बाबाकडेच पाहात होता.  थोड्या वेळाने बाबाला पूर्ण भान आलं आणि तो शांतपणे बाहेर गेला. त्याने गु-याला उचललं आणि घरात आणून पुन्हा कोप-यात ठेवलं. बाबा काय करतोय हे? मिकनला न राहवून वाटलं. तेवढ्यात बाबाने मिकनला हाक मारली, "मिकन्  इथे ये" कुठे? तिथे त्या गु-यापाशी? हट! "मिकssन" बाबाने पुन्हा हाक मारली तशी मिकनला तिथे जाण्यावाचून गत्यंतर राहिलं नाही. तो अजून त्याच्यावर ओरडला नव्हता हेच नशीब होतं. मिकन् बाबापाशी गेला आणि गु-याकडे पाठ करून वर बाबाकडे पाहू लागला. बाबाने गु-याची शेपूट ओढली, भिंतीतल्या भोकात खुपसली आणि काय आश्चर्य! इतका वेळ झोपलेला गु-या पुन्हा गुरगुरायला लागला. मिकन भेदरून बाबाच्या पाठी लपला.

"मिकन्, याला काय म्हणतात माहितिये?"

"हो, गु-या"

"काय ते?"

"गुरगुरणारा राक्षस-गु-या"

"गुरगुरणारा राक्षस काय! छान, छान. पण मिकन्, याला म्हणतात ए‌अर प्युरिफायर. काय म्हणतात?"

मिकनच्या जिभेला गाठी पडलेल्या होत्या.

"हे मशीन आहे. ओव्हनसारखं, फ्रिजसारखं. ओव्हनचा आवाज येतो माहितिये ना, तसा तुझा हा गु-याही आवाज काढतो. ही त्याची वायर."

मिकन् काहीही न कळल्यासारखा गु-याची शेपूट हातात घेऊन उभ्या असलेल्या बाबाच्या तोंडाकडे पाहत आपला मख्ख उभा.

"हे बघ!"

बाबाने बटन बंद केलं तशी गु-याची गुरगुर बंद पडली आणि बटन चालू केलं तशी पुन्हा चालू झाली.

हैला! ही म्हणजे एक धमालच होती. मिकनची कळी खुलली.

त्यानंतर कितीतरी वेळ बाप-लेकाचं गु-याला चालू-बंद, चालू-बंद करणं आणि एकमेकांना टाळी देत हसणं सुरूच होतं.

"बाबा, आता ओव्हनचा आवाज ऐकूयात?"

"चलो, सुनेंगे."

"हा, सुनेंगे"

बाबासोबत पिक्चरवाल्यांसारखं हिंदी बोलताना मिकनला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. बाबाचा हात धरून स्वयंपाकघराकडे जाताना मिकनने गु-याकडे वळून पाहिलं तशी गु-याने ’आपला हिशोब बाकी आहे, सोडणार नाही’ अशा अर्थाचा गुरगुराट केला, पण मिकनने उलट जीभ बाहेर काढून गु-याला वेडावून दाखवलं. मिकनला आता त्याची भीती वाटत नव्हती.

गु-याचा पाडाव कसा करायचा हे त्याला बरोब्बर समजलं होतं.

मग घड्याळबुवांनीही खुषीत येत आपलेली ताणलेली स्प्रिंग सैल केली आणि बाराचे टोल द्यायला सुरूवात केली.

--

याआधीचे: मिकन् 

आरसा

तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी सांगीतल्या, त्या मला वाटतं, दोन प्रकारांमध्ये मोडतात. पहिला प्रकार- जिवंत माणसांचं जग एका बाजूला, मृतांचं दुस-या बाजूला आणि त्या दोघांना जोडणारी एखादी शक्ती वगैरे. त्यामध्ये भुतं आणि तत्सम प्रकार असतील. आणि दुसरा प्रकार म्हणजे, अतिमानवी शक्ती, क्षमता असणा-यांचा, भविष्य वगैरे आधीच दिसणा-या, भविष्याचे सूतोवाच करणा-यांचा. आज रात्रभरात तुम्ही ज्या गोष्टी सांगीतल्या त्या या दोनपैकी एका प्रकारात मोडणा-या आहेत.

अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर, तुमच्या कथा या दोनपैकी कोणत्यातरी एकाच प्रकारात मोडतात. म्हणजे, गोष्ट एका प्रकारात मोडणारी असेल तर दुस-या प्रकाराचा अजिबात संबंध नाही, असं. म्हणजे, मला म्हणायचंय असं की, भुतं दिसणा-यांना फक्त भुतं दिसतील, भविष्य इत्यादी दिसणार नाही आणि ज्यांना भविष्यवाणी करता येते त्यांना भुतं दिसणार नाहीत. मला माहित नाही असं का ते, पण, अशा प्रकारच्या कथांचा कलच मुळी कोणत्यातरी एकाच प्रकारात मोडण्याचा असतो, म्हणजे, किमान मलातरी असं वाटतं.

आणि अर्थातच, काही माणसं अशीही असतील जी या दोनही प्रकारांमध्ये मोडत नाहित. माझंच उदाहरण घ्या ना. मी जगून घेतलेल्या तीस वर्षांमध्ये मला एकदाही भूत दिसलेलं नाही, किंवा मला भविष्यात काय घडणारेय याचा साक्षात्कार वगैरे झालेला नाही, इतकंच काय, मला भविष्याची झलक देणारं एखादं स्वप्नही पडलेलं नाही. एकदा मी माझ्या मित्रांसोबत लिफ्टमध्ये होतो आणि त्यांना त्या लिफ्टमध्ये भूत दिसलेलं असं ते शपथेवर सांगतात. पण, मला कोणीही आणि काहीही दिसलं नाही. त्यांना म्हणे, माझ्या बाजूला ग्रे सुटातली एक तरुणी उभी असलेली दिसली, पण आमच्यासोबत एकही बाई नव्हती, म्हणजे किमान मला दिसत होतं त्याप्रमाणे.. त्या लिफ्टमध्ये आम्ही तिघेच होतो, अगदी गळ्याशप्पथ. आणि माझे ते दोन मित्र देखील अशा प्रकारची मस्करी करण्यांमधले नाहित. एकंदरीत विचित्रच प्रकार होता तो सगळा. तर, सांगायचा मुद्दा असा की, मला कधीही भूत दिसलेलं नाही.

पण एकदा, फक्त एकदा असं काही घडलं होतं की भीतीने माझी बोबडी वळली होती. या गोष्टीला दहाएक वर्षं झाली असतील, पण मी ती गोष्ट आजपावेतो कोणालाही सांगीतलेली नाही. मी त्याबद्दल बोलायलाही भीत होतो. एकतर मी त्याबद्दल काही बोललोच तर, ती गोष्ट पुन्हा एकदा घडेल असं मला वाटत होतं, त्यामुळे मी तो विषय कधीही, कोणासमोरही काढला नाही. पण, आज रात्री तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्याला आलेले भयप्रद अनुभव सांगीतले आहेत आणि आजच्या रात्रीचा तुमचा यजमान म्हणून माझा स्वत:चा अनुभव सांगीतल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. त्यामुळे, मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. तर, घडलं असं की,-

--

मी १९६०च्या सुमारास माझं शालेय शिक्षण संपवलं त्यावेळेस विद्यार्थी चळवळ जोरात सुरू होती. त्यावेळच्या हिप्पी पिढीचा मुलगा मी, मी कॉलेजात जायला साफ नकार दिला. त्याऐवजी, मी संपूर्ण जपानभर फिरलो, शरीरकष्टाची अनेक कामं केली. जगायचा हाच एक चांगला तरीका आहे असं मला मनापासूनच वाटायचं. तरुणपणात ही बेफिकिरी, हा कलंदरपणा असतोच असं तुम्ही म्हणाल कदाचित. पण, मी वळून माझ्या गत आयुष्यावर नजर टाकतो, तेव्हा मला वाटतं की काय मस्त आयुष्य जगलो आपण! ते चांगलं की वाईट हा वेगळाच मुद्दा आहे, पण, मला ते आयुष्य पुन्हा एकदा जग म्हणून सांगीतलं तर मी ते आनंदाने जगेन, खात्रीये माझी.

तर, माझ्या देशभर चाललेल्या भटकंतीचं दुसरं वर्ष होतं. उन्हाळा संपत आला होता आणि मी दोन महिन्यांसाठी एका शाळेत रात्रीच्या पहारेक-याची नोकरी धरली होती. निगातामधल्या एका छोट्याशा शहरातली शाळा. मी संपूर्ण उन्हाळा काम करून थकलो होतो आणि काही काळ आपण थोडी कमी शरीरकष्टाची नोकरी करूयात असं वाटलेलं. पहारेकरी म्हणून काम करण्यासाठी फार काही लागतं अशातला भाग नाही, ते काय रॉकेट सायन्स नाही. दिवसा मी त्या शाळेच्या केअरटेकरच्या ऑफिसमध्ये झोपायचो. रात्री मला शाळेत सगळं नीट, जागच्या जागी, आलबेल आहे हे तपासण्याकरता फक्त दोन फे-या घालायला लागायच्या. उरलेल्या वेळात मी गाण्यांच्या रेकॉर्ड्स ऐकायचो, लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचायचो किंवा जिममध्ये जाऊन एकटाच बास्केटबॉल खेळायचो. संपूर्ण शाळेत तुमच्याव्यतिरिक्त आणखी कोणीही नसणं, तुम्ही एकटे एकटेच असणं ही काही तितकीशी वाईट गोष्ट नाही. मला एकट्याने भीती नाही वाटली? नाही, मुळीच नाही. तुम्ही एकोणीस-वीस वयाचे असता तेव्हा तुम्हाला कशाची भीती म्हणून वाटत नसते, नाही का?

तुमच्यापैकी कोणी रात्रीचा पहारेकरी म्हणून काम केलं असेल असं वाटत नाही, त्यामुळे ते काम नक्की कसं असतं ते सांगतो. तुम्ही रात्रभरात दोन फे-या माराव्या लागतात, एक रात्री ९ला आणि दुसरी पहाटे ३ ला. रोज. शाळेची इमारत नवीच होती. त्या तीन मजली कॉंक्रीटच्या इमारतीत वीसेक वर्ग होते. ती काही फार मोठी शाळा नव्हती हे तुमच्या लक्षात आलं असेलच. या वर्गांव्यतिरिक्त पुन्हा एक म्युझिक रूम, होम इकॉनॉमिक्सची एक खोली, आर्ट स्टुडियो, प्रयोगशाळा, शिक्षकवर्ग बसायचा ती खोली आणि मुख्याध्यापकांचं ऑफिस अशा खोल्या होत्या. शिवाय, एक स्वतंत्र कॅफेटेरिया, स्विमिंग पूल, जिम आणि थेटर, हे ही होतंच.  फे-या मारताना हे सर्व तपासून घेणं हे माझं काम होतं.

तर, मला एकूण वीस खोल्या तपासायच्या असायच्या. मी त्या वीस खोल्यांची यादी करून घेतली होती. प्रत्येक खोली तपासल्यानंतर मी त्या खोलीच्या नावासमोर तपासल्याची खूण करायचो. म्युझिक रूम तपासली, केली खूण, प्रयोगशाळा झाली, केली खूण, असं. मी केअरटेकरच्या खोलीत झोपायचो तिथेच झोपून राहिलो असतो आणि फे-या मारायची तसदी न घेता तिथे झोपल्या झोपल्याच तपासल्याच्या खुणा केल्या असत्या तरी कोणाला कळलं नसतं, पण मी इतका भोंदू नव्हतो. तसाही, फे-या मारायला फार वेळ लागायचा नाही. आणि, मी तसा तिथे झोपलेलो असताना कोणी शाळेत शिरलंच, तर सर्वात पहिले मीच तावडीत सापडलो असतो हे ही होतंच.

तर, मी असा ९ला आणि ३ ला फे-या मारायचो. माझ्या डाव्या हातात टॉर्च असायचा आणि उजव्या हातात लाकडाची केंडो तलवार. मी शाळेत असतात केंडो शिकलो होतो आणि आपण कोणालाही पराभूत करून पळवून लावू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास मला वाटायचा. हल्ला करणारा लढाईत तरबेज असो वा नसो, त्याच्याकडे अगदी खरीखुरी तलवार जरी असती तरी मी घाबरलो नसतो. त्यावेळी मी तरुण होतो, लक्षात घ्या. आता जर असं काही घडलं तर मी पाठीला पाय लावून पळत सुटेन.

असो, तर, हा प्रसंग घडला तो दिवस मला आठवतो. ऑक्टोबरची नुकतीच सुरूवात होत होती. त्या रात्री जरा जास्तच वारं सुटलं होतं आणि त्या दिवशी ऑक्टोबरमध्ये एरव्ही असतो त्यापेक्षा जास्त उकाडा होता. त्यातून संध्याकाळच्या वेळेस मच्छरांची एक झुंडच आत घुसली होती, तिला हुसकावून लावण्याकरता मी मच्छर कॉ‌ईल जाळल्याचे पण आठवते. वा-याचा नुसता घुसघुराट सुरू होता. स्विमिंग पूलचं फाटक तुटलं होतं आणि ते जोराच्या वा-यात सारखं उघडत होतं, आणि दाणकन बंद होत होतं. पहिले वाटलं की जा‌ऊयात आणि नीट लावून ये‌ऊयात, पण बाहेर मिट्ट काळोख होता. त्यामुळे मी तो विचार बाद केला. ते फाटक रात्रभर तसंच दाणदाण आपटत राहिलं.

माझी 9वाजताची फेरी नेहमीप्रमाणे पार पडली. माझ्या यादीतल्या वीस खोल्यांवर सर्व आलबेल असल्याच्या खुणा झाल्या. सगळंकाही व्यवस्थित होतं, सर्व दारं कुलूपबंद होती. सर्व काही नेहमीप्रमाणेच होतं, नेहमीपेक्षा विचित्र, असाधारण असं काहीच नव्हतं. मी के‌अरटेकरच्या खोलीकडे परतलो आणि 3चा अलार्म लावून झोपी गेलो.

3च्या अलार्मने जाग आली तीच विचित्रशी भावना घे‌ऊन. मला ते नक्की काय आणि कसं ते सांगता येणार नाही, पण काहीतरी वेगळं आहे असं वाटत होतं. मला उठावंसंच वाटत नव्हतं. कोणीतरी माझी उठून बसण्याची इच्छा सर्वशक्तिनिशी दाबून टाकत असावं त्याप्रमाणे..एरव्ही मी जाग आल्या आल्या पलंगातून उठून बाहेर पडणारा माणूस आहे, त्यामुळे मला हे काय होतंय हे मला समजेना. पलंगातून बाहेर पडण्याकरता मला माझी सर्व इच्छाशक्ती पणाला लावायला लागली. मग मी फेरी मारण्यासाठी तयार झालो. स्विमिंग पूलचं ते फाटक अजूनही तालबद्ध दणादण वाजत होतं, पण त्याचा आवाजही काहीसा विचित्र वाटत होता. काहीतरी विचित्र आहे खरं, मी मनाशीच म्हटलं. पुढे जाण्यास माझे मन तयारच हो‌ईना. पण, काहीही होवो तिथे, आपण आपलं काम केलंच पाहिजे अशा निश्चयाने मी मनोबल एकवटलं आणि पुढे निघालो. तुम्ही एकदा कामचुकारपणा केलात की संपलं. तुम्ही तो पुढे पुन्हा पुन्हा करत राहणार आणि मला त्या कर्दमात फसायचं नव्हतं. त्यामुळे मी टॉर्च उचलला, हातात माझी लाकडी केंडो तलवार घेतली आणि फेरीवर निघालो.

काय विचित्रच रात्र होती ती! रात्र वाढत गेली तशी वा-याचा जोर देखील वाढत गेला आणि हवेतला दमटपणा आणखी वाढला. माझ्या शरीराला खाज सुटली आणि माझं कशात लक्ष लागेना. मी सर्वात पहिले जिम, थेटर आणि स्विमिंग पूल तपासून यायचं ठरवलं. तिथं सगळं काही ठिकठाक होतं. स्विमिंग पूलचं फाटक मात्र एखादा वेडा माणूस मनाला ये‌ईल तशी मुंडी हलवतो तसं दाणदाण धडकत होतं आणि वाजत होतं. पण, त्या दणादण आवाजालाही एक लय होती. पहिले होय होय..आणि मग नाय, नाय, नाय... अशी. ही तुलनाही विचित्र वाटते, माहितिये मला, पण त्यावेळी मला तसं वाटलं खरं.

शाळेच्या इमारतीत देखील सगळं काही नेहमीसारखंच होतं. मी खोल्या तपासत पुढे निघालो आणि माझ्या यादीत खुणा करत राहिलो. काहीतरी विचित्र असल्याची भावना होत होती ते सोडलं तर बाकी काहीही विचित्र घडलं नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि के‌अरटेकरच्या खोलीकडे परतायला निघालो. मी तपासलेली यादीतली शेवटची खोली होती- शाळेच्या इमारतीच्या पूर्वेस असलेल्या कॅफेटेरीयाच्या बाजूची बॉयलर रूम. ही बॉयलर रूम के‌अरटेकरच्या रूमच्या बिलकुल विरूद्ध बाजूस होती. याचाच अर्थ मला रूमकडे परतण्यासाठी पहिल्या मजल्यावरचा पूर्ण कॉरीडॉर चालून जाणं भाग होतं. आजूबाजूला मिट्ट काळोख होता.चंद्राचा प्रकाश असेल तेव्हा त्या बोळात थोडासा प्रकाश तरी असायचा, पण नसेल तेव्हा समोरचं काही म्हणून दिसायचं नाही. मला समोरचा रस्ता दिसावा म्हणून मला टॉर्च पेटवायला लागायचा. आणि, त्या रात्री तर वादळ होणार असल्याची सूचना होती, त्यामुळे चंद्राचाही पत्ता नव्हता. थोडावेळ चंद्रावरचे ढग दूर व्हायचे तेव्हा थोडासा प्रकाश पडायचा, पण, दुस-याच क्षणी  सर्वकाही पुन्हा काळोखात बुडून जायचं.

मी नेहमीपेक्षा जरा घा‌ईनेच बोळातून निघालो. माझ्या बास्केटबॉल शूज लिनोलियमच्या जमिनीवर घासून करकरत होते. हिरव्या रंगाच्या लिनोलियनची जमीन होती ती, दाट शेवाळाने माखलेल्या जमिनीसारखी.. मला आताही डोळ्यासमोर दिसतेय ती!

आता अर्धा बोळ ओलांडून गेलं की शाळेचं प्रवेशद्वार येणार होतं. मी प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आणि ते ओलांडून जाणार इतक्यात,.. आ‌ईच्या गावात...काये ते! असं वाटून मी चमकलो. मला त्या काळोखात काहीतरी दिसल्यासारखं वाटलं. मला दरदरून घाम फुटला. मी तलवारीवरची पकड घट्ट केली आणि ते काये हे पाहायला त्याच्या जवळ सरकलो. शूज ठेवायच्या शेल्फच्या बाजूच्या भिंतीवर मी माझा टॉर्च मारला.

आणि..तिथे मी होतो. म्हणजे तिथे एक आरसा होता आणि त्या आरशात माझं प्रतिबिंब दिसत होतं. आदल्या रात्री तर तिथे आरसा नव्हता, म्हणजे आजच्या दिवसात कधीतरी तो इथे आणून ठेवण्यात आला होता. आ‌ईशप्पथ, मी कसला घाबरलो होतो. तो एक पूर्ण लांबीचा, मोठा आरसा होता. आरशात मीच दिसतोय आणि मी मलाच पाहून घाबरलो हे कळून मला जरा मूर्खासारखंच वाटलं. हात्तिच्या, इतकंच तर होतं, असं वाटलं. किती बिनडोकपणा तो! मी टॉर्च खाली ठेवला, माझ्या पाकिटातून सिगरेट काढली आणि शिलगावली. मी सिगरेटचा एक झुरका घेतला आणि आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे एक नजर टाकली. बाहेरचा चंदेरी प्रकाश खिडकेवाटे त्या आरशावर ये‌ऊन पडला होता. माझ्या मागे स्विमिंग पूलचं फाटक दाणदाण वाजत होतं.

एकदोन झुरके मारून झाल्यावर मात्र मला अचानक काहीतरी विचित्र जाणीव झाली. आरशातलं माझं प्रतिबिंब म्हणजे मी नव्हतो. म्हणजे, प्रतिबिंबात दिसणारा मी दिसायला तंतोतंत माझ्यासारखा होतो, पण तो मी नव्हतो हे मात्र नक्की. नाही, असं नाही. तो मीच  होतो, अर्थातच!- पण, कोणतातरी भलताच मी होतो. मी कधीच असायला, व्हायला नको होतो असा कोणतातरी भलताच मी.  छे! मला ते कसं सांगावं हे कळत नाहिये. मला त्यावेळी कसं वाटलं हे समजावून सांगणं खूप खूप कठीण आहे.

पण, मला एक गोष्ट निश्चित कळली ती म्हणजे, तो आरशातला मी - माझा दुस्वास करत होता, त्याला पूर्णपणे नफरत होती माझ्याबद्दल! एखाद्या काळोख्या महासागरावर तरंगणा-या हिमनगासारखा तिरस्कार! हा इतका तिरस्कार कोणाला कधी नाहिसा करता येणं शक्य नसेल.

मी काय करावं हे न सुचून तिथेच खिळल्यासारखा उभा होतो. माझी सिगरेट माझ्या बोटांमधून निसटली आणि खाली पडली. आरशातल्या माझ्या हातातली सिगरेट देखील गळून खाली पडली होती. आम्ही दोघे एकमेकांकडे एकटक पाहात उभे होतो. मी आपला भारणीखाली असल्यासारखा, एकाच जागी जखडून ठेवल्यासारखा स्तब्ध उभा होतो.

शेवटी एकदाचा त्याचा हात हलला. त्याच्या उजव्या हाताची बोटं त्याच्या हनुवटीवर आली आणि हळूहळू त्याच्या चेह-यावर सरकत फिरायला लागली, एखाद्या सावकाश सरपटणा-या किड्यासारखी. आणि अचानक मला जाणवलं की, आपणही तेच करत आहोत. जणूकाही मीच त्या आरशातल्या मीचे प्रतिबिंब होतो आणि आरशातला मीच मला त्याच्या इच्छेबरहुकूम वागवत होता.

मी हे सगळं सहन न हो‌ऊन शरीरातलं सगळं बळ एकवटलं आणि जिवाच्या आकांताने एक आरोळी ठोकली. त्यासरशी मला त्या जागेशी बांधून ठेवणारे पाश सुटले. मी माझी केंडो तलवार उचलली आणि दात‌ओठ खात त्या आरशावर घाव घातला. काच खळाखळा तुटल्याचा आवाज आला, पण मी ते पाहायला थांबलो नाही, मी वळून वेगाने चालायला लागलो होतो. के‌अरटेकरच्या रूमपाशी ये‌ईपर्यंत मी अजिबात मागे वळून पाहिले नाही. आता आलो तशी मी घाईघा‌ईने दाराला कडी घातली आणि पांघरूण डोक्यावरून ओढून घेतलं. मला माझ्या हातातून गळून पडलेल्या त्या सिगरेटच्या थोटूकाची चिंता वाटत होती, पण मी काही तिथे परत जाणार नव्हतो. रात्रभर वारा आपला सुसाटत घुरघुर करत राहिला आणि स्विमिंग पूलचं ते गेट दाणदाण वाजत राहिलं, होय होय, नाय, होय , नाय नाय नाय करत...

माझी खात्रीये की तुम्ही या कथेचा शेवट ओळखला असेलच.
तिथे कधीच, कोणताही आरसा नव्हता.

सूर्य एकदाचा वर आला तेव्हा तुफान शमलं होतं. वारा नेहमीसारखा वाहू लागला होता आणि सगळीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. मी प्रवेशद्वारापाशी जा‌ऊन पाहिलं. तिथे माझ्या हातातून गळून पडलेली सिगरेट होती, माझी लाकडी तलवार देखील होती, पण, आरसा मात्र नव्हता. तिथे कधीच, कोणताही आरसा नसल्यासारखा.

मला काही भूतबित दिसलं नव्हतं. मला मीच दिसलो होतो. पण, मी त्या रात्री किती घाबरलो होतो हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मला जेव्हा हा प्रसंग आठवतो तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार येतो की, या जगात आपल्याला सर्वात जास्त घाबरवणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती आपण स्वतः असतो.
तुम्हाला काय वाटतं?

इथे, माझ्या घरात एकही आरसा नाही हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. आरशाशिवाय शेव्ह करायला शिकणं ही काय खायची गोष्ट नाही, मस्करी नाही करतेय मी!

--

पुस्तकः ब्लाईंड विलो, स्लीपिंग वूमन
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड


सौदाद.

आपण आपलं पूर्ण आयुष्य ’कशाच्यातरी’ जंगी तयारीत घालवतो आणि ते ’काहीतरी’ कधीच घडत नाही.

खरंय.

म्हणजे पाहा, की, कुठेही जाताना, असताना-नसताना ’काहीतरी’ घडणार हे आपल्याला सतत वाटत असतं. पण, ते ’काहीतरी’ म्हणजे काय हे आपल्याला कधीच माहित नसतं; म्हणजे, ते माहित असावं किंवा त्याची अंधुकशी कल्पना असावी असं देखील आपल्याला वाटत नसतं. त्यामुळे होतं काय की, काहीतरी घडण्याची अपेक्षा जरी असली तरी काय घडायला हवंय हे माहित नसल्याने कुठेही जा‌ऊन आल्यावर, असताना-नसतानाच्या नंतर नेमकं काय घडून गेलंय हे आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे ते न घडल्यासारखं असतं. अशारितीने न घडणा-या ’काहीतरी’च्या मागे आपलं आयुष्य घरंगळत चाललेलं असतं.

पण, शमीला ते ’काहीतरी’ म्हणजे काय ते नीटच कळलं होतं, म्हणूनच ती तो निर्णय घे‌ऊ शकली.

-

शमी. शमिकाचं शमी झालेलं.
ही शमी एक सर्वसाधारण सुखी मुलगी असावी. म्हणजे, तिनं तसं वाटून घेतलं असतं, तर ती नक्कीच असती. पण ती तसलं काही वाटून बिटून घेत नाही. तिच्या मनात असतं तर ती तिचं आतापर्यंतचं आयुष्य ’ट्रॅजिक’ आणि ’सर्वसाधारणपणे सुखी’ अशा दोन मोडमध्ये पोट्रे करु शकली असती, पण नंतर तिचं तिलाच वाटतं की, इतकं काही ट्रॅजिक आयुष्य नव्हतं आपलं!  हं, बाबा अपघातात सापडून वारले आणि त्यानंतर आ‌ई झुरुन झुरुन गेली हे इतकं सोडलं तर बाकी सगळं व्यवस्थित झालं आपलं.. पैशाची ददात नव्हती. काही वर्षं दाया, नॅनींच्या देखरेखीखाली वावरल्यानंतर मामा-काकांनी तिला हॉस्टेलवरच ठेवलेलं, त्यामुळे फॅमिली ड्रामाने बालपण आणि तरुणपण नासायची बलामत टळली. तिने आ‌ई-बाबा गेल्यावर फार अश्रू ढाळलेले नसले तरी तिला तिच्या आ‌ई-बाबांची खूप आठवण यायची. अगदी बेदम. त्यांच्यासोबत अजून एक दिवस घालवता आला असता तर आपण काय काय केलं असतं यावर तिचं स्वप्नरंजन चालायचं, पण जमिनीवर यायला जास्त वेळ नाही लागायचा! व्हायचं ते हो‌ऊन गेलं होतं. तिचे आ‌ई-बाबा आता या जगात नव्हते. ती आता या जगात ख-या अर्थाने एकटी होती, हे सत्य थोबाडीत बसल्यासारखं कळायचं. मग पुढे कधीतरी शमीने त्या कटू वास्तवाचं हलाहल पूर्ण पचवलं. तिचं स्वप्नरंजन संपलं आणि तिने एकटीने राहायची मनाची तयारी केली. एकटीने राहायची, एकटीने निर्णय घेण्याची, एकटी-एकटीने सगळं सगळं करायची, सोसायची, निभवायची सवय अशी अगदी लहानपणापासूनची, त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना कुठे काही अडलं नाही. पण, पोटातलं पाणीही न हलवणा-या गुळगुळीत एक्प्रेसवेवर आपली मोटर सुर्ळकन पळत असते आणि अचानक कुठेतरी एक स्पीडब्रेकर येतो आणि मोटारीला गचके बसतातच, त्याप्रमाणे तिच्या एकमार्गी, सरळ-सोप्या आयुष्यात निखिल आला.

त्याला म्हणे उर्मट माणसांच्या प्रेमात पडायचा भारी सोस होता. शमीने म्हटलं "ओके, तू म्हणशील तसं!". हे म्हणताना त्याने तिला उर्मट म्हटलं हे तिने सवयीने काना‌आड केलं. नाही म्हणायला तो बरा होता. करड्या डोळ्यांचा, शाळेच्या भिंतीच्या कडेने वाढणारं गवत असतं ना, अंगाला तसा वास येणारा! पुन्हा लिहिणारा वगैरे, शिवाय लिहिलेलं झकासही असणारा, म्हणजे डोक्यावरुन पाणीच! त्याने तिला भावुक प्रेमिक लिहितात तशी एक-दोन मूर्ख पत्रं लिहिली होती आणि तिने पण त्या ’थोड्याशा आणि वेगळ्या चमत्कारीक प्राण्याला’ अगदी दयाळूपणे उत्तरं दिली होती. मग तो तिच्या प्रेमात वगैरे पडला, आणि आपलंही त्याच्यावर प्रेम बेम आहे की काय अशी शंका येण्या‌इतपत शमी त्याच्यात गुंतली. त्यानंतरचा अपरिहार्य टप्पा- त्याने शमीला लग्नाचं विचारलं.

ती आपली एका वेळी एकाच माणसावर प्रेम करणारी मुलगी! पण, थोडीशी मजा म्हणून, लगेच काय हो म्हणायचं, म्हणून खरंतर तिला जर-तर, असं-तसंचे वाह्यात खेळ खेळता आले असते,  थोडा वेळ जा‌ऊ देत-मग सांगू करत होकार लांबणीवर टाकता आला असता. तिच्या रटाळ आयुष्यात तसाही विरंगुळा होताच कुठे! पण धोरणीपणाने किंवा मनात काहीतरी योजून उभ्या आयुष्यात कोणती गोष्ट न केल्याने तिने त्याला सरळपणे ’हो’ म्हणून टाकलं.

आणि त्यानंतर मीनाता‌ईंची भेट!

शमीने निखिलला 'हो' म्हणण्याचं खरं कारण तिला एक रेडीमेड आ‌ई मिळू शकेल हे होतं. निखिलच्या आ‌ईबद्दल, म्हणजे मीनाता‌ईंबद्दल तिने खूप ऐकलं होतं.  निखिल तर अष्टौप्रहर आ‌ईचे गुणगान गायचाच, शिवाय निखिलच्या मित्रमंडळींमध्येही त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं. निखिलचे बाबा पण त्याच्या लहानपणीच गेलेले आणि त्यानंतर मीनाता‌ईंनी त्याला तळहाताच्या फोडासारखा जपून मोठा केलेला. शमीला लहानपणापासून सभोवताली वडीलधारं कोणी नसण्याची सवय, त्यामुळे निखिलच्या घरातला वेगळा अनुभव घे‌ऊन पाहाण्याची तिला ओढ लागली होती. लहानपणापासूनची आस ती! कोणी सांगावं, इतक्या वर्षांनंतर आपल्या सोबत वडीलधा-यांचं राहाणं आपल्याला आवडूनही जा‌ईल असं तिला वाटलेलं. शिवाय, निखिलच्या वाटचं थोडं प्रेम जरी माझ्या वाट्याला आलं तरी आय विल टेक द डील असा विचार करुन तिने हो म्हटलेलं! पण मीनाता‌ईंची भेट तिला वाटली होती, तिने गेले कित्येक दिवस मनात रंगवली होती त्यापेक्षा खूप वेगळी झाली.

"आ‌ई, ही शमी! मी तुला सांगीतलं होतं ना.. "

मीनाता‌ईंची पहिली भेट शमी कधीही विसरणार नाही. निखिलच्या घरातल्या हॉलमध्ये त्रिकोणी चेह-याच्या, लांब जिवणीच्या, शेलाट्या अंगकाठीच्या घा-या मीनाता‌ई तिच्या समोर उभ्या होत्या.  त्यांनी विटकरी रंगांची सोनेरी बॉर्डरची कॉटन साडी नेसली होती आणि जुन्या फॅशनचं अर्ध्या हाताचं ब्ला‌ऊज घातलं होतं. विरळ होत चाललेले काळेकरडे केस त्यांनी मागे एका बुचड्यात बांधले होते. कपाळवार काळं कुंकू होतं आणि कानात हि-याच्या कुड्या होत्या. डोळे शमीला आपादमस्तक न्याहाळण्यात गुंतले होते. शमीने हसून हात जोडून त्यांना  नमस्कार केला. पण, शमीला पाहिल्यानंतर त्यांच्या कपाळावर कळेल न कळेलशी आठी चढली ती शेवटपर्यंत गेली नाहीच. रीत म्हणून त्यांनी तिला चहा-सरबताचं विचारलं इतकंच, त्यानंतर त्या खोलीत जा‌ऊन बसल्या त्या शमी जा‌ईपर्यंत बाहेर आल्याच नाहीत. शमीला नाही म्हटलं तरी थोडंसं चरकल्यासारखं झालं. निखिलच्याही ते लक्षात आलं असावं. लग्नाच्या आधीपासूनच हे असं, तर लग्नानंतर काय याचा विचार करुनच शमीने लग्नाला मोडता घालायचे असंख्य प्रयत्न केले, पण निखिल बधला नाही, त्यांचं लग्न झालंच शेवटी! शमीचंही निखिलवर प्रेम असणारच, त्याशिवाय का तिने स्वतःहून फुफाट्यात पाय घातला असणार?

-

निखिलने शमीला मॉरिशसला ने‌ऊन आणलं आणि त्यांची रुटिन्स नेहमीप्रमाणे सुरु झाली आणि मीनाता‌ईंच्या शोडा‌ऊनला तेव्हाच सुरुवात झाली.

शमीला सकाळी 10ला दादरला पोहोचायचं असायचं म्हणजे वस‌ईहून किमान 8.40ची लोकल पकडायला लागायचीच. पहिल्याच दिवशी तिने सकाळी चहाचं आधण टाकून दूध गरम करायला ठेवलं आणि इस्त्री केलेले कपडे घ्यायला खोलीत गेली. पुन्हा ये‌ऊन बघते तो काय मीराता‌ई दूध गरम करत ठेवलेल्या भांड्यामधलं सगळं दूध सिंकमध्ये ओतत होत्या.

"अहो, हे काय करताय मीनाता‌ई?" (आपल्याला आ‌ई बोलायचं नाही ही ताकीद त्यांनी निखिल आजूबाजूला नाही असं पाहून लग्नाच्या दिवशीच दिली होती)

"या घरात कशासाठी कोणतं भांडं वापरायचं याची एक सिस्टीम आहे. भाजीच्या भांड्यात दूध तापवायचं नाही. दुधाच्या भांड्यात भाजी करायची नाही, समजलं?"

शमीने एक खोल श्वास घेतला आणि म्हटलं,

"हो, समजलं, पण, अहो, दूध ओतून का दिलंत?"

"त्याशिवाय तुझ्या कायम लक्षात कसं राहिल ते?"

हे असं.
त्यादिवशी कोणालाच चहा मिळाला नाही.

त्यानंतर त्यांचे कारनामे जोरात सुरु झाले. उगीच डोक्याला ताप नको शमीने कशाकरता कोणतं भांडं वापरतात हे शिकून घेतलं तर त्या दुपारच्या वेळात पीठाच्या, कडधान्याच्या डब्यांची अदलाबदल करायला लागल्या. रात्री ये‌ऊन पुन्हा सगळं शोधत बसायचा मनस्ताप पुन्हा शमीलाच! त्यांना हाय बीपीचा त्रास होता, त्यामुळे त्यांचं जेवण कमी मीठाचं असायचं. ते त्या सकाळीच करुन घ्यायच्या, पण ते जेवण शमी तिचा डबा करुन घेण्याच्या घा‌ईत असतानाच करायचा त्यांचा हट्ट असायचा. निखिल बाहेर जेवायचा, पण शमीला बाहेर जेवायला आवडायचं नाही. पण प्रत्येक सकाळी मीनाता‌ई अध्येमध्ये करायला लागल्यानंतर आणि नंतर धावपळ हो‌ऊन लोकल चुकायला लागल्यानंतर शमीने डबा नेणं सोडलं. कामाला बा‌ई होत्या, पण शमी काचेची भांडी त्यांना घासायला देत नाही हे पाहिल्यानंतर त्या जेवण करताना जास्तीत जास्त काचेची भांडी वापरायला लागल्या. शमी रात्री कामावरुन घरी आल्यावर सिंकमध्ये काचेच्या भांड्यांची रास तिची वाट पाहात असायची. पण शमीही कच्च्या गुरुची चेली नव्हती. जोवर डोक्यावरुन पाणी जात नाही आणि जोवर काही कटू न बोलता आपल्याच्याने होतंय तोवर निभवून न्यायचं असा चंग शमीनेही बांधला होता. माणूसच होत्या त्या, राक्षस नाहीत, कधीतरी ह्रदय द्रवलं असतंच त्यांचं! शमीला त्यांचा राग कळत होता, नाही असं नाही. पहिल्या पहिल्यांदा तिला वाटायचं की, स्वतःच्या हिकमतीवर लहानाचा मोठा केलेल्या निखिलच्या बायकोबद्दल त्यांच्या काहीतरी अपेक्षा असणारच, आपण त्यात मुळीसुद्धा बसत नसू, म्हणून हा राग असेल, पण नंतर नंतर तिला वाटायला लागलं, नव्हे तिची खात्रीच झाली की त्यांना निखिल आणि त्यांच्यामध्ये कोणीही आलेलं नकोय. निखिलचं लग्न झालेलं पण नकोय.

-

एके दिवशी शमीला तिच्या एका मित्राचा फोन आला, परवेझ त्याचं नाव.

"काय म्हणतोस प-या.."

"अगं, तुझ्या सासूचा कॉल आला होता मला."

"व्हॉट? माझ्या सासूचा? तुला? का?"

"तू माझ्याबरोबर आहेस का विचारायला. "

".."

"तू या वेळेला घरी येतेस, पण अजून आलेली नाहियेस म्हणून सगळ्यांना फोन करतेय असं म्हणाल्या."

"त्या असं म्हणाल्या?"

"हा काय प्रकार आहे? व्हॉट्स राँग शमी?"

"काही नाही प-या, आय विल टॉक टू यू लेटर ओके? थँक्स!"

"ओके, बट यू टेक के‌अर.."

आपण घरी नसताना त्यांनी आपल्या ड्रॉवरमध्ये उचकापाचक केली असणार, त्यात त्यांना आपली फोनची डायरीही मिळाली असणार. रिकामपणाचे उद्योग, दुसरं काय! त्यांनी त्यांच्या डोक्यात आपली कल्पोकल्पित लफडीही रचलेली असणार याबद्दल शमीच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती.

त्या रात्री शमीने हा प्रकार निखिलच्या कानावर घातला तेव्हा निखिलही गंभीर झालेला दिसला.

-

दोन डावी वळणं, एक उजवं वळण, मग सरळ रस्ता. शमी गेल्या चार महिन्यांच्या सवयीने चालत राहाते. दुस-या वळणावर बसणा-या वेड्या भिका-याचे केस कोणीतरी स्वच्छ कापून दिलेत. अंगाखालची चादर स्वच्छ आहे. ती चपाती-भाजीचं पार्सल त्याच्यासमोर ठेवते आणि पुढे चालायला लागते.

तिच्या मनातलं ऊन बाहेरही आहे. ती सवयीने चालते आहे, चालत राहाते.. चालत राहाते.

बरोब्बर चारशे सत्याहत्तर पावलांनंतर ती बेकरी येते.

ती सवयीने समोरच्या इमारतीच्या तिस-या मजल्याकडे पाहाते. हं! अजूनही बंद आहे.

त्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरचा, गेले चार महिने बंदच असलेला फ्लॅट शमीने पहिल्यांदा पाहिला त्या क्षणी तिला आवडला होता. अर्थातच त्याचं बाह्य रुप. एक खिडकी आणि वर्तुळाकार सज्जा असलेली  बाल्कनी हीच काय ती त्या फ्लॅटची रस्त्यावरून दिसणारी बाजू. पण, त्या खिडकीसमोर एक रेन ट्री आणि कडुनिंबाची जाळी पसरलेली होती. ती खिडकी उघडली तर कडुनिंबाचा उग्र पण ताजातवाना करणारा दर्प काय छान येत असेल, शिवाय खिडकीतून कायम ते रेन ट्रीचे नखरेल गेंद दिसत राहाणार ते वेगळेच. त्या खिडकीला जराशी वेगळी काळीशार काच होती. आतून बाहेरचं दिसावं, पण बाहेरच्याला आतलं दिसू नये अशा हेतूने लावलेली. आणि त्या वर्तुळाकार बाल्कनीत निरनिराळी झाडं, वेली, मोगरा होता, आधार दे‌ऊन चढवलेली रानजा‌ई, कृष्णकमळं होती. वर एक लामणदिवा लटकावून दिलेला होता. इथे कोणी राहात नाही तर या झाडांना पाणी कोण घालतं आणि ही झाडं सदा तरारलेली कशी असतात हा प्रश्न शमीला हज्जारदा पडलेला होता. पण तिथे राहाणा-यांनी केली असेल काहीतरी सोय म्हणून ती गप्प बसली होती.

त्या फ्लॅटचं अंतरंग कसं असेल याचा विचारही तिने अनेकदा केला होता. डबल डो‌अर, फ्लॅटमध्ये शिरल्यावर डाव्या बाजूला हॉल आणि हॉलच्या पलीकडे बाल्कनी, हॉल आणि बाल्कनीमध्ये एक प्रचंड मोठी फ्रेंच विंडो, त्या विंडोमध्ये बसायला केलेला मार्बलचा कट्टा. हॉलच्या डाव्या कोप-यात भारतीय बैठक, त्यावर चिंट्झच्या उशा. बैठकीवर ओळंबलेले चार पेण्डण्ट लॅँप्स. कोप-यात फायकस. बैठकीसमोर एक सोफा. मध्ये मोकळ्या जागेवर जॉमेट्रिक पॅटर्न असलेलं छोटंसं कार्पेट. सोफ्याच्या बाजूने आतल्या खोलीत जाणारा व्हरांडा आणि मधल्या चौकटीत काचेच्या गोल मण्यांचे किणकिणते पडदे. होल्ड ऑन! आपण फ्लॅटचं अंतरंग म्हणालो, अंतर्भाग नाही, का बरं? आपण त्या फ्लॅटला आपल्यासारखीच एक जिवंत एन्टिटी मानायला लागलो आहोत का? हं, विचित्र विचार आहे खरा.

शमीने जोरजोरात मान हलवली. कपाळ खसाखसा घासलं.

--

दिवसांमागून दिवस उलटत होते, महिन्यांमागून महिने..

श्वास सवयीने घेता येतो
घास सवयीने तोंडातच जातो
टोमणे काना‌आड करायची सवय होते
सवयीमुळे झोपही रात्रीच लागते.
दुःखात हसायची सवय होते
हसण्यात दुःख लपवायची सवय होते.
नो मॅटर व्हॉट,
आपण चालत राहतो
निव्वळ सवयीने.

जगण्याची सवय होणं
ही फ़ार अजब गोष्ट आहे.

लग्नाला सहा महिने उलटून गेले तरी मीनाता‌ईंचा उत्साह कणभरही कमी झाला नव्हता. त्रास द्यायच्या नवनवीन क्लृप्त्या त्यांना रोजरोज सुचतात तरी कशा याचं शमीला आश्चर्य वाटायचं, पण मराठी मालिका म्हणजे अशा क्लृप्त्यांचा एनसायक्लोपीडिया असतात हे देखील तिला आता‌आताच समजलं होतं. जीव नकोसा करुन सोडला होता अगदी. त्यांच्यात सरळपणे संभाषण होणंही मुश्कील झालं होतं.

तिने काहीतरी भलेपणाने विचारावं, आणि त्यांनी त्याचा बरोब्बर उलटा अर्थ लावून आणखी तिसरंच काहीतरी बोलावं असा सगळा प्रकार.

निखिलही मग या प्रकाराला इतका कंटाळला की त्याने कधीतरी यातून अंगच काढून घेतलं.

शमीला वाटायचं की कधीकधी शत्रूकडूनही थोडीफार सहानुभूती हवी असते ते कशाने? मीराता‌ईंनी स्वतःहून सगळं स्पष्ट केल्यानंतर, त्यांना माझ्याबद्दल फक्त द्वेषच वाटतो हे नानापरीने दाखवल्यानंतरही आपण अजूनही त्यांच्या प्रेमाची आस लावून बसलो आहोत, ते का?

अशा वेळी आ‌ई-बाबांची आठवण यायची. ते असते तर हे दुःख बोलून दाखवू शकलो असतो. बोलायला तिच्याकडे होतं तरी कोण? निखिल? तो तर आजकाल बोलायलाही कंटाळायचा. सतत आपण लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काम चाललेलं असायचं. आ‌ई असती म्हणजे माहेरपणाला जाता आलं असतं, लाड करुन घेता आले असते, भरपूर रडून घेता आलं असतं.

पण, ती इथे नाहीये. आहेत त्या मीनाता‌ई.  शमीचं दडदडीत वास्तव.

कुठं दुखतंय तुला? काय खुपतंय? काय छळतंय? काय होतंय तुला? काय झालंय तुला?विचारायला इतके कठीण प्रश्न आहेत का हे? अक्षरांची परम्युटेशन्स आणि कॉंबिनेशन्स वापरुन बनवलेली साधीसुधी वाक्यं ती. ही वाक्यं बनवायचं सुचू नये? वाटू नये?

आपण त्याचं इतकं काय घोडं मारलं आहे?

शमीला असे प्रश्न वारंवार पडायचे, पण त्याची उत्तरं मिळवताना आणखी भीतिदायक प्रश्न समोर यायला लागले तेव्हा तिने पडणा-या प्रश्नांकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली.

-

आजचा दिवसही नेहमीसारखाच.

अगला स्टेशन- वस‌ई. पुढील स्टेशन- वस‌ई, नेस्क्ट स्टेशन-वस‌ई

त्याच्यापुढे स्टेशन शमीचं-शमी उतरणार. खिडकीच्या गजांचा पारोसा वास आणि दिवसाच्या शेवटी तोंडात जमा झालेली कडू तुरट चव घोळवत..नेहमीसारखीच.

शमी बायांच्या लोंढ्यावर स्वार हो‌ऊन हमरस्त्यापर्यंत आली, ज्वेलर्सपाशी आल्यानंतर सवयीने वर नजर टाकली, नजर वळवून नेहमीसारखं पुढे चालायला लागणार इतक्यात ती धक्का बसून थांबली आणि तिने पुन्हा मान उचलून वर पाहिलं.

आज काहीतरी वेगळं आहे हे समजायला तब्बल तीन-चार सेकंदं जायला लागले.
तिस-या मजल्यावरची खिडकी उघडी होती, बाल्कनीतला लामणदिवा लागलेला होता.

आलंय वाटतं कोणीती राहायला तिथे? शमीचा कंटाळा कुठल्याकुठे पळाला.

त्या बाल्कनीत एक म्हातारीशी बा‌ई उभी होती. तो लामणदिवा तिच्या पाठीशी होता त्यामुळे तिच्या चेह-यावर अंधार आला होता आणि महाभारतातल्या ’समय’प्रमाणे त्या म्हातारीच्या संपूर्ण शरीराला एक तेजोवलय वेढून आहे असा भास होत होता. शमी डोळे बारीक करुन त्या बा‌ईंना पाहाण्याचा प्रयत्न करत होती, एवढ्यात त्या बा‌ईंनी शमीला वर येण्याची खूण केली.

शमीने आजूबाजूला पाहिलं, न जाणो दुस-या कोणाला बोलावत असतील तर काय घ्या. पण रस्त्यावर त्या क्षणी तिच्याशिवाय कोणीही नव्हतं. तिने पुन्हा एकदा वर पाहिलं तर त्या अजून तिलाच पाहून वर येण्याची खूण करत होत्या.

आता काय करायचं? सहा महिने जो फ्लॅट बाहेरुन पाहून आत कसा असेल याचं चित्र रंगवत होतो तो फ्लॅट पाहायची संधी आयती मिळत होती ती तिला घालवायची नव्हती, पण संपूर्ण अनोळखी बा‌ईच्या घरात तिने बोलावलं म्हणून तरी का जायचं?

जावं की न जावं?

पण, घरी जा‌ऊन मीनाता‌ईंनी केलेले उद्योगच निस्तरायचे आहेत, त्यापेक्षा काहीतरी नवीन तरी पाहू, जे हो‌ईल ते हो‌ईल असं मनाशी म्हणून शमीने इमारतीच्या गेटकडे मोर्चा वळवला.

तिने इमारतीच्या आत पा‌ऊल टाकलं तशी तिला एकदम शांत वाटलं. कानात दडे बसले की काय असं वाटण्या‌इतपत या अंतर्भागात किर्र शांतता होती. हमरस्त्याच्या बाजूला असूनही इमारतीच्या आत बाहेरचा आवाज पोहोचत नव्हता. शमी इमारतीचं आतून निरीक्षण करु लागली. ती इमारत जरा जुन्या धाटणीचीच होती. तिचे जिने सरकारी इमारतीतल्या जिन्यांप्रमाणे चौकड्याचौकड्यांच्या टा‌ईल्सनी बनलेले होते. राहाणारे सुसंस्कृत असावेत कारण कोप-यांवर पिचका-यांचे डाग नव्हते. जिन्याची एक चढण संपल्यावर चौकोनांची भोकं असलेली एक भिंत. त्या भिंतीतून बाहेरची रहदारी स्पष्ट दिसत होती. इमारतीत प्रवेश केल्यापासून तिथली हवा मिनीटांगणिक अधिक गर्द, दाट होत चालल्याचा विचित्र भास शमीला होत होता. याखेरिज एक गोष्ट मात्र शमीला खूप प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे- तळमजल्यापासून दुस-या मजल्यापर्यंतच्या सर्व फ्लॅट्सना टाळी लागलेली होती. पण, विचित्र गोष्ट अशी होती की, मघाशी त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक बा‌ई कपडे गोळा करत होती हे ती शपथेवर सांगू शकली असती. एव्हाना तिला त्या प्रकारातल्या वैचित्र्याची थोडीफार जाणीच व्हायला लागली होती.

"शमी, ये! "

काही मिनीटांमध्ये या इमारतीमध्ये आपल्याखेरिज दुसरं कोणी नसण्याची शमीला इतकी सवय झाली की की तो बा‌ईचा आवाज आहे हे तिला कळायला पाच-सहा सेकंद जावे लागले.

ती मघाची म्हातारी बा‌ई जिन्याच्या सर्वात वरच्या पायरीवर उभी होती आणि शमीला बोलावत होती. जिन्याची उंची एक आठ-दहा फूट असेल, की जास्त होती?

शमीने डोळे बारीक करून बघितलं पण, तिला काही धड कळत नव्हतं. प्रकाशाचा खेळ होता की तिच्या डोळ्यांमध्येच काहीतरी गडबड होती, कोण जाणे, पण ती म्हातारी सारखी इन अँड आ‌ऊट ऑफ फोकस होत होती.

तो जवळ येत होती की लांब चालली होती?
शमीला एकाच वेळी दुर्बिणीच्या सुलट्या आणि उलट्या बाजूने पाहिल्यासारखं वाटत होतं.

म्हातारी जिन्यासमोरच्याच फ्लॅटचं दार उघडून आत निघून गेली. तिने मला शमी हाक मारली? की आपल्याला भास झाला? तिला आपलं नाव कसं माहित?
हा प्रकार तरी काय आहे? शमीला एव्हाना भीती वाटायला लागली होती. पण तिच्या मनातल्या त्या जागेच्या खूप जुन्या कुतूहलाने, आकर्षणाने त्या भीतीवर मात केली. शरीरात होतं नव्हतं तितकं सगळं धैर्य एकवटून ती जिना चढून गेली. तिच्या पोटातली फुलपाखरं फडफडत एव्हाना तिच्या गळ्यापर्यंत आली होती.
दार उघडंच होतं. उं! डबल डो‌अर. आजकाल पाहायला मिळत नाहीत अशी दारं. त्याही परिस्थितीत तिच्या डोक्यात विचार आला. तिने उघड्या दारातून आत डोकावून पाहिलं तर आत कोणीच नव्हतं.

"हेलो, कोणी आहे का?"

पण कोणाचंही उत्तर आलं नाही तेव्हा तिने आत पा‌ऊल टाकलं.

"हेलो?" तिने पुन्हा आवाज दिला.

त्या प्रशस्त दिवाणखान्यात ती एकटीच उभी होती.
मग तिने थोडावेळ तिथेच उभं राहून कोणी येतंय का याची वाट पाहिली. पण कोणीही आलं नाही. त्या म्हाता-या बा‌ई पण नाही.

शमीने दिवाणखान्यावर एक नजर टाकली. तिने कल्पनेत रंगवला होता अगदी तस्साच्या तसा दिवाणखाना होता तो! हॉलच्या पलीकडे बाल्कनी होती, बाल्कनीतल्या मोग-याला प्रचंड बहर आला होता. हॉल आणि बाल्कनीमध्ये एक प्रचंड मोठी फ्रेंच विंडो होती आणि त्या विंडोमध्ये बसायला एक मार्बलचा कट्टा केलेला होता. हॉलच्या उजव्या कोप-यात एक सोफा होता आणि डाव्या कोप-यात भारतीय बैठक. बैठकीवर चिंट्झच्या उशा होत्या आणि बैठकीच्या वर ओळंबलेले चार पेण्डण्ट लॅँप्स होते. कोप-यात फायकस दिमाखात उभा होता. मध्ये मोकळ्या जागेवर जॉमेट्रिक पॅटर्न असलेलं छोटंसं कार्पेट होतं. सोफ्याच्या बाजूने आतल्या खोलीत जाणारा व्हरांडा आणि मधल्या चौकटीत काचेच्या गोल मण्यांचे किणकिणते पडदे होते.. होल्ड ऑन! आपण कल्पनेत रंगवलेला अगदी तसाच आहे की हा फ्लॅट! भुताटकी आहे की काय इथं? शमी खुदकन् हसली. ओह! कमॉन, गेट होल्ड ऑफ यु‌अरसेल्फ. आयॅम शु‌अर की हा योगायोग असणार. शमी जागेवरुन हलली आणि दिवाणखाना कुतूहलाने पाहात फिरु लागली. तितक्यात तिच्या मागून काचा किणकिणल्याचा  आवाज आला आणि विचारणा झाली,

"शमी, आलीस का बाळा? चहा घेणार की जेवतेस सरळ?"

शमी ताठरली. तिचा श्वास जागच्या जागी थांबला. तोच गोड आवाज, तीच हेल काढून बोलण्याची पद्धत, थोडासा अनुनासिक आवाज. इतकी वर्षं झाली म्हणून काय झालं, शमी तो आवाज जन्मात कधी विसरु शकली नसती.
आ‌ई?

शमीने मागे वळून  पाहिलं तेव्हा तिची आ‌ई चहाचा कप हातात घे‌ऊन तिच्याकडे पाहात हसतमुख उभी असलेली दिसली.

आ‌ई? माझी आ‌ई?

शमीची पाचावर धारण बसली होती. शमीच्या डोक्यात वेगाने विचार येत-जात होते, पण समोरच्या चित्राचं स्पष्टीकरण त्यातल्या कोणत्याही विचारात बसत नव्हतं.

शमीचे पाय लटलट कापायला लागले, तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. आपल्याला भास होतायेत की हे सर्व चाल्लंय ते खरंय?

"शमी, बाळा काय होतंय? बरं नाही का?"

तिची आ‌ई काळजीने तिच्याजवळ आली.

"ही काय मस्करी आहे? कोण आहात तुम्ही?" भीतीने अर्धमेल्या झालेल्या शमीने तिला चुकवत दार गाठलं.

"शमी, असं काय करतेस? आ‌ईला नाही ओळखत?"

"माझी आ‌ई कधीच गेली. तुम्ही कोण आहात? हा काय प्रकार आहे?"

तेवढ्यात त्या मघाच्या म्हाता-या बा‌ई कुठूनतरी तिथे उगवल्या.

"शमी, थांब, ऐकून घे."

पण शमी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती, तिने त्या म्हाता-या बा‌ईंना बाजूला ढकलून दार उघडलं आणि बाहेर धूम ठोकली. अंगावरुन शहा-यांमागून शहारे जात होते, पाठी पाहायचं धैर्य होत नव्हतं. ती घरी कशी आली ते तिचं तिलाही सांगता आलं नसतं. घरी आली आणि तिने रुममध्ये जा‌ऊन चादर डोक्यावरुन ओढून घेतली. तिच्या मानेवरचे केस शहारुन ताठ होत होते, काही केल्या तिची हुडहुडी जात नव्हती.

त्या रात्री शमीला सणकून ताप भरला.

-

दुस-या दिवशी शमीला त्या तिस-या मजल्याकडे पाहायचं धैर्य होत नव्हतं पण, स्वतःची खातरजमा करुन घेण्याकरता वर पाहाणं भाग होतं. तिने मनाचा हिय्या करुन वर पाहिलं, तर..

तिथे काहीही, कोणीही नव्हतं.

तो लामणदिवाही लागलेला नव्हता आणि ती विचित्र म्हातारी बा‌ईही तिथं नव्हती.

शमी सुस्कारली.
आपण चक्क निराश झालोय? हां! स्ट्रेंज!

काहीच दिसत नाही म्हटल्यावर अंगात धैर्य आलेल्या शमीने तिसरा मजला गाठला. आज मात्र तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आज सगळ्या मजल्यांवरची सगळी घरं उघडी होती. कोणत्याही दाराला टाळं नव्हतं. तिच्या अपेक्षेप्रमाणेच तिस-या मजल्यावरचा तो फ्लॅट बंद होता. शमीने दाराजवळ जा‌ऊन नीट पाहिलं तर त्याच्या हँडलवर बोट ओढलं तर मागे जाड ठसा राहाण्या‌इतपत धुरळा होता. निदान काही दिवसांत तरी इथे कोणी आलं-गेलेलं नव्हतं याचा तो पुरावा होता. तिने बाजूच्या फ्लॅटची बेल वाजवली. एका त्रासिक चेह-याच्या बा‌ईने दार उघडलं.

"सॉरी, मी तुम्हाला अवेळी त्रास देतेय, पण मला एक सांगाल का, हे बाजूचे कुठे गेलेत का आज?"

त्या बा‌ईने विचित्रपणे तिच्याकडे पाहिलं.

"नाही, मी काल इथे ये‌ऊन गेले होते, पण आज दाराला टाळं आहे, काही सांगून गेलेत का?"

"तिथे कोणी राहात नाही" असं म्हणत त्या त्रासिक चेह-याच्या बा‌ईने दार आपटलं आणि ते आपटताना "पागल कुठली!" असंही म्हटल्याचं शमीच्या कानावर आलं. शमी काहीतरी चिडून बोलणार इतक्यात दार बंदही झालं होतं.

हा प्रकार काय आहे?

हे एखादं समांतर विश्व वगैरे होतं का, जे फक्त मलाच दिसतंय?

तिने जोरजोरात मान हलवली, कपाळ खसाखसा घासलं. जरा अस्वस्थ करणारे विचार डोक्यात आले की कपाळ खसखसून घासायची सवय आहे तिला, ते सगळे विचार पुसले जातील समहा‌ऊ या अपेक्षेत.

"पागल बनू नकोस शमी. असं कधी काही घडत नसतं!" शमीने आपल्या विचारांना शूss करुन गप्प बसवलं,

-

-निखिल?

-हं..(त्याचे डोळे समोरच्या लॅपटॉपवर)

-ऐक ना..

-(लॅपटॉप बाजूला ठेवून)हं, बोल.

-तुला आपला प्लॅटफॉर्म नं. 1 कडे जाणारा रस्ता माहितिये? आनंदनगरमधून?

-हो, त्याचं काय.

-पार्कींग ओलांडलं की एक बेकरी लागते बघ..

-हं, त्याच्या बाजूला एक सलोन आहे, समोर श्री लक्ष्मी ज्वेलर्स आहे.

-एक्झॅक्टली, त्या श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरची डावीकडच्या फ्लॅटची बाल्कनी पाहिलियेस कधी?

-नाही. का गं.

-त्या फ्लॅटची एक खिडकी आणि बाल्कनी रस्त्याकडे तोंड करुन आहे. आणि ती बाल्कनी मला खूप आवडते.

-ओके, वर्तुळाकार सज्जा आहे का?

- हो. तुला कसं कळलं? पाहिलायेस का तो फ्लॅट?

-नाही, पण अगं तुझं ते वर्तुळाकार सज्ज्याचं ऑब्सेशन एव्हाना सगळ्यांनाच माहिती झालंय.

-ओके, मला वाटलं की तू पाहिला असशील म्हणून.

-नाही गं, त्या बाजूने मी एकदाच गेलोय. ते पण म्हात्रेला ट्रेन पकडायची होती म्हणून सोडायला गेलो तेव्हढाच. का गं? काय झालं?

-ती खिडकी नेहमी बंद असायची. मी गेले सहा महिने जवळपास रोज त्या खिडकीकडे आणि बाल्कनीकडे पाहातेय. त्या बाल्कनीत एक लामणदिवा लटकावलाय, तो ही फार सुरेख आहे.  पण, काल अचानक तो लामणदिवा लागलेला होता आणि तिथे एक म्हातारीशी बा‌ई होती बाल्कनीत उभी.

-ओके मग?

-तुला यात काही विचित्र वाटत नाही?

-काय विचित्र वाटायचंय? परगावी गेले असतील ते आले असतील परत.

-एक्झॅक्टली. पण आज मी पाहिलं तर तो लामणदिवा बंद होता आणि घरात कुणी नव्हतं.

-तुला कसं माहित घरात कोणी नव्हतं ते?

- .....

- शमी?

- मी वर जा‌ऊन पाहिलं. घराला टाळं होतं.

-ओह, फॉर गॉड्स सेक..

-निखिल, माझं ऐकून घे..

- अगं बाहेर गेले असतील. तू म्हणजे कमाल आहेस. आपण राहात नाही त्या इमारतीत, आपल्याला माहित नसलेल्या माणसांच्या घराच्या चौकशा तुला काय करायच्या आहेत? हे थोडं अति होतंय असं नाही वाटत तुला?

-...

-शमी?

-काही नाही, सोड

-बरं, जा‌ऊ देत, मग त्याचं काय पुढे?

-काही नाही, झोप तू.

आणि शमीने निखिलकडे पाठ केली.

-अगं?

- ...

-वेल, सूट यु‌अरसेल्फ.

निखिल खांदे उडवून पुन्हा लॅपटॉपमध्ये गढून गेला.

संभाषणाचे सुद्धा लास्टींग आवर्स असतात.
त्यानंतरची भण्ण शांतता म्हणजे त्वचेवर पडलेल्या भेगेसारखी असते. ती भरत नसते कारण तिच्यात भरायला काही शिल्लक राहिलेलं नसतं.
शमी भिंतीवरच्या एका बिंदूत प्रचंड रस असल्यासारखे डोळे खिळवून आंधळ्यासारखं बघत बसली.. रडं आवरायचा अक्सीर इलाज!

आणि मग त्या रात्रीचं, त्या फ्लॅटचं आणि तिच्या-निखिलमधल्या न-बोलीचं असले-नसलेपण शमीवर कोसळत आलं.
-

ती संध्याकाळ-ती वेळ नेहमीप्रमाणेच तिच्या अंगात घुसतेय.
गर्दीने कायम लसलसणारं रेल्वे स्टेशन.
हवा उष्ण होती, प्लॅट़फॉर्म उष्ण होता, लोकं उष्ण होती, नजरा उष्ण आणि त्यांचे श्वासही. घडयाळाच्या ताणलेल्या स्प्रिंगसारखा ताण पूर्ण प्लॅट़फॉर्मवर होता. कंटाळ्याने सगळ्यांना संमोहीत केल्यासारखं चमत्कारीक यंत्रवत वाटत होतं.

पण शमीच्या ते गावीही नाही. ती घा‌ईघा‌ईने हमरस्त्याला लागली. ती इमारत जवळ ये‌ईपर्यंत तिच्या ह्रदयाचे ठोके वाढलेले होते. किमान आज तरी तो लामणदिवा लागलेला दिसेल, ती म्हातारी दिसेल आणि तिला आपण आपले सगळे प्रश्न विचारु शकू अशी मनात प्रचंड आशा होती. गेले आठ दिवस प्रचंड अस्वस्थतेत गेले होते, विचार करकरुन डोकं फुटायची पाळी होती. तिला मीनाता‌ईंच्या उद्योगांकडे लक्ष द्यावंसं वाटलं नाही इतक्या सा-या गोष्टींनी, विचारांनी, शक्यतांनी तिच्या डोक्यात थैमान घातलेलं होतं. दररोज ती आपली इमारतीपाशी जायची, वर पाहायची, निराश व्हायची. मग पुन्हा तिस-या मजल्यावरच्या दारावरचं टाळं पाहून विमनस्क हो‌ऊन घरी परतायची. तिचं खाण्यापिण्यात लक्ष का नाहिये असं निखिलने विचारल्याचं आणि त्यावर मीनाता‌ईंनी काहीतरी कुजकट शेरा मारल्याचंही तिला आठवयंत. पण त्या आठवणी खूप धूसर होत्या. आज तरी काहीतरी दिसायलाच हवं, ती म्हातारी बा‌ई, आ‌ई पुन्हा भेटायला हवी असं रोज वाटायचं.

आजही तिने इमारत ये‌ईस्तोवर मान वर केली नाही. इमारत आली तशी खोल श्वास घेतला आणि वर पाहिलं.

बिंगो!

दिवा लागलेला होता आणि बाल्कनीत ती म्हातारी बा‌ई उभी होती.

बा‌ईंनी तिला वर येण्याची खूण केली तशी शमीने आनंदातिशयाने जवळजवळ उडीच मारली आणि अतिशय उत्कंठेने (आणि थोड्याशा भीतीने) काळीज धडधडत असलं तरी ती धावत धावत तिस-या मजल्यावर जा‌ऊन पोहोचली. आज तिने सगळ्या टाळं लागलेल्या दारांकडे मुळीच लक्ष दिलं नाही.
अपेक्षेप्रमाणे दार उघडंच होतं.

ती दार उघडून सरळ आत गेली. आत त्या म्हाता-या बा‌ई सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यादिवशी तिला त्यांना नीट पाहायची संधी मिळाली नव्हती, पण आज समोरासमोर त्यांना नीट निरखता आलं. त्यांचं नक्की वय तिला सांगता आलं नसतं. त्यांचे पांढ-या ढगांसारखे लांबलचक केस (नसलेल्या) वा-यावर भुरभुरत होते, केसांच्या मानाने चेहरा तरुण आणि त्वचा मुलायम होती, शरीर वृद्धेचं असलं तरी शरीराला बाक नव्हता, किंवा हाता-पायांच्या कातडीवर सुरकुत्याही नव्हत्या. त्यांच्या अंगावर एकही दागिना नव्हता किंवा पायात चप्पलही नव्हती. त्या त्यांच्या काळ्याभोर, गिरमिटासारख्या, काळजाचा ठाव घेणा-या डोळ्यांनी तिच्याकडे एकटक पाहाता होत्या.

"तुम्ही कोण आहात?"

"मला नाव नाही."

"का नाही?"

"याला उत्तर नाही."

"मी गेले आठ दिवस इथे येण्याचा प्रयत्न करत होते."

"माहित आहे."

"मग तेव्हा मला इथे का येता आलं नाही? आजच का?"

"तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला ठा‌ऊक आहे. "

"मला खरंच, अतिशय तीव्रतेने इथे यायची इच्छा होती म्हणून?"

"बरोब्बर."

"मग गेले आठ दिवस मला तसं वाटत नव्हतं?"

"तूच सांग."

"अं...माझ्या मनात शंका होत्या म्हणून?"

"बरोब्बर"

शमीने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं.

"तुम्ही ख-या आहात की मला भास होत आहेत?"

"मी खरी आहे. त्यादिवशी तू मला ढकलून नाही का गेलीस?"

"मग माझी आ‌ई?"

"ती ही खरी आहे."

"पण हे कसं शक्य आहे?"

"तुझ्या मनातली तिची आठवण खोटी आहे का?"

"नाही. "

"मग?"

"अच्छा, म्हणजे, ही खोली माझ्या मनातल्या खोलखोलवरच्या इच्छांचं प्रतिबिंब आहे तर.."

"बरोबर"

"वाटलंच मला.."

"तुला आश्चर्य वाटलेलं दिसत नाहीये, तू घाबरलेली तर मुळीच दिसत नाहिये."

"माहित नाही का, पण नाही वाटत भीती. आणि खरं सांगायचं झालं तर मला खूप वर्षांपासून, अगदी लहानपणापासून असं काहीतरी घडणार असं वाटत आलेलं आहे."

".."

"त्यादिवशी मी ये‌ऊन गेले तेव्हा या फ्लॅटला टाळं होतं, शेजारच्या बा‌ईने सांगीतलं की इथे कोणी राहात नाही.. हा काय प्रकार आहे?"

"हे तुमच्या विश्वाच्या आतलं विश्व आहे. तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा, तुमची स्वप्नं, अवेळी तुटलेल्या माणसांची ओढ यांनी मिळून बनलेलं. थोडक्यात तुमच्या सुप्तावस्थेतल्या अंतर्मनासारखं. तुमच्या विश्वातल्या सगळ्याच माणसांना हे विश्व दिसत नाही. या विश्वात ये‌ऊ इच्छीणा-या माणसांना दिसेल आणि वेगवेगळ्या रुपात दिसेल."

"इथे माझ्याखेरिज इतर माणसं येतात?"

"अर्थातच. अपु-या इच्छा, स्वप्नं असलेली काय तू एकटीच आहेस का?"

"मग कुठेत ती सगळी जणं?"

"इथेच आसपास असतील."

"म्हणजे मला हे विश्व बंद इमारतीसारखं दिसलं, तर इतरांना वेगळंही दिसू शकेल?"

"हो."

"मी गेले सहा महिने हा फ्लॅट रोज पाहातेय, तेव्हा हे विश्व माझ्यासाठी का नाही उघडं झालं?"

"गच्च बसलेलं झाकण खोलायला पुरेसा जोर लावायला लागतो, तसं इथे यायला इथे यायची इच्छाही तितकीच प्रबळ लागते. ती इच्छा पुरेशी तीव्र असेल तेव्हा हे विश्व आपो‌आपच खुलं होतं."

"ती इच्छा पुरेशी तीव्र आहे किंवा नाही हे तुम्हाला कसं कळतं?"

"तुम्ही विमनस्क असता, तुमच्या मनावर ताण असतो तेव्हा तुमचं अंतर्मन एखाद्या आवळलेल्या स्प्रिंगसारखं असतं आणि आम्हाला ते दुरुनही दिसणा-या प्रखर लाल दिव्यासारखं दिसतं."

त्यानंतर शमी थोडा वेळ गप्पच बसली. तिने मागे वळून पाहिलं.

"तुझी आ‌ई यायची वेळ झाली. मी जाते."

शमीने पुढे वळून पाहाण्याच्या आधीच बा‌ई निघून गेल्या होत्या. (अंतर्धान पावल्या हा शब्दप्रयोग चपखल बसेल. छे! काहितरीच. पण का नाही? इतकं सारं पाहिल्यावर आता त्यात विचित्र वाटण्यासारखं काय होतं?)
तेवढ्यात शमीची आ‌ई आतून पदराला हात पुसत आली.

"आलीस? बरं झालं, मला वाटलं उशीर होतो की काय."

शमी उठली आणि धावत जा‌ऊन आ‌ईला बिलगली.

"अगं हे काय अगं?"

"राहू दे गं आ‌ई. थोडा वेळ अशीच थांब."

..

तिची आ‌ई आत काहीतरी खाण्याचं करायला गेली आणि शमी बाहेर सोफ्यावर गाणं गुणगुणत बसली होती. आपल्याला शेवटचं इतकं मोकळं, आनंदी कधी वाटलं? मेबी मॉरीशसला. त्यानंतर नाहीच.

"शमी?"

म्हाता-या बा‌ई परतल्या होत्या.

"जायची वेळ झाली."

"इतक्यातच?"

शमीने घड्याळाकडे पाहिलं. पण घड्याळ बहुतेक बंद पडलं होतं. ती इमारतीत शिरली तेव्हाच.
"इथे काळ ही संकल्पना नाही. ही तुझ्या मनातली इप्रेशन्स आहेत आणि इंप्रेशन्स कालनिरपेक्ष असतात."

"मग मी जायची वेळ झाली हे तुम्हाला कसं समजतं"

"ते तुला कळायची गरज नाही"

शमी वरमली.

"इथे काळ ही संकल्पना नाही, म्हणजे मी बाहेर पडेन तेव्हा इथे आले तेव्हा वाजलेले होते तितकेच वाजलेले असतील"

"बरोबर"

कूल!

घरी जायला उशीर होणार नव्हता, त्यामुळे दर दिवशी नवनवीन कारणं सांगायचा त्रास आपो‌आपच वाचला होता.

-

माहित नाही कितीशेवा दिवस ते, पण शमी रोज त्या वर्तुळाकार सज्ज्याच्या बाल्कनीच्या फ्लॅटमध्ये येत होती. आ‌ईशी हितगूज करत होती. तिला तिचे बाबाही भेटले होते. तिची आजीही होती तिथं. तिने कित्येक वर्षं उराशी बाळगलेलं, सगळ्या कुटुंबासोबत राहाण्याचं तिचं स्वप्न तिथं पूर्ण होत होतं. कधी ते माहित नाही, पण हे असं होणारच होतं, आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा भेटणारच होते, म्हणूनच त्यांच्या जाण्याचं इतकं दुःख आपल्याला झालं नाही असंही शमीला वाटायला लागलं होतं.

पण फक्त एकच समस्या होती.
तिला त्यांच्यासोबत थोडाच वेळ मिळायचा.

तिची वेळ संपली की त्या म्हाता-या बा‌ई कुठूनतरी उगवायच्या आणि दार उघडून हाकलवायला उभ्याच असायच्या.

ती फ्लॅटमधून बाहेर पडायची तेव्हा वाटायचं, की छे! गेला..आजचा दिवस हातातून गेला बघता बघता, बघितलेलं-भोगलेलं, अनुभवलेलं सारं-सारंच..

तिच्या पोटात तुटायचं एकदम.

-

आ‌ई-बाबांशिवायची इतकी वर्षं जगून घ्यायची राहिलेली, तो इवलासा वेळ पुरेनासा झाला शमीला. गेल्या चौदा वर्षांच्या गप्पांचा बॅकलॉग भरुन काढायचा होता. तिचा पाय निघेनासा झाला. तिथून घरी जायचं आणि त्या मीनाता‌ईंना तोंड द्यायचं म्हणजे तिला नको वाटायला लागलं. त्या घरी निखिल होता हाच काय तो तिला आणि त्या घराला जोडणारा दुवा होता, म्हणून ती घरी तरी जायची, नाहीतर गेली असती की नाही याबद्दल तिची तिलाच शंका वाटायची.

"शमी, जायची वेळ झाली."

"इतक्यातच?"(शमी न चुकता, दररोज हेच विचारायची)

"हो, लवकर चल."

शमी आ‌ईचा निरोप घे‌ऊन दारापाशी आली. बा‌ई दार उघडून तयारच होत्या.

शमी घुटमळली, पण अखेरीस तिच्या तोंडून प्रश्न सांडलाच.

"मला कायम इथेच राहायचं असेल तर?"

बा‌ई हसल्या, त्यांना तो प्रश्न अपेक्षित असावा असंच वाटलं.

"हरकत काहीच नाही. फक्त तुला पुन्हा बाहेरच्या जगात जाता येणार नाही, कधीच. मनाची तयारी झाली की ये. हे घर तुझंच घर आहे."

त्या बा‌ई कोण होत्या, ख-या होत्या की केवळ तिचा भास होत्या, त्या जिवंत होत्या की आणखी काहीतरी होत्या हे तिला काहीच ठा‌उक नव्हतं, खात्री तर मुळीच नव्हती. पण तिला त्या दोन विश्वांच्या उंबरठ्यावर पहारा देणा-या बा‌ईशी अदृश्य धाग्याने जोडलं गेल्यासारखं वाटतं. म‌ऊम‌ऊ, छान वाटलं एकदम.

तिला काय तो निर्णय घ्यायला लागणार होता. आ‌ई-बाबा की निखिल? आ‌ई-बाबा की मीनाता‌ईंची नाटकं? या वरवर भासमान जगातलं आ‌ई-बाबांसोबतचं आयुष्य की केवळ निखिलसाठी मीनाता‌ईंचे टोमणे, जुलूम सहन करत ओढलेलं वास्तवातलं आयुष्य? या जगापासून फारकत घ्यावी की आपल्या आयुष्यात रात्रीचे काही तास असलेल्या निखिलला सोडून इथे निघून यावं? आ‌ई-बाबांना वजा करता आपलं आयुष्य कसं असेल आणि निखिलला वजा करुन आपलं आयुष्य कसं असेल?

शमी सुस्कारली.

"मी सांगते. लवकरच."

-

आजचा दिवस वेगळा आहे, हवा वेगळी आहे, सारा नूरच वेगळा आहे.

दोन डावी वळणं, एक उजवं वळण, मग सरळ रस्ता. ती गेल्या सात महिन्यांच्या सवयीने चालत राहाते. दुस-या वळणावर बसणारा भिकारी आज जागेवर दिसत नाहीये. शमीने चपाती-भाजीचं पार्सल त्याच्या जागेसमोर ठेवलं. आज तिने शि-याचा डबा पण आणला होता, तो ही ठेवला.

बरोबर चारशे सत्त्याहत्तर पावलांनंतर ती बेकरी येते.

शमी पुन्हा एकदा फ्लॅटमध्ये हजर होते. आज तिने आपले लहानपणापासूनचे असतील नसतील ते फोटो आणलेत. ते आ‌ई-बाबांना दाखवत तिचा वेळ मजेत जातो.

शमी जायची वेळ होते. म्हाता-या बा‌ईंचा आवाज मागून ये‌ऊन टोचतो

"शमी, जायची वेळ झाली."

पण, आज शमीचा चेहरा उतरत नाही.

"आ‌ई, एक मिनीट थांब हं, येतेच."

शमी बाहेर येते, तर बा‌ई दार उघडं धरुन उभ्याच असतात. शमी बा‌ईंपाशी जाते आणि काही न बोलता दार लावून घेते. बा‌ई हसतात तशी शमीही हसते

"शमी, ही तुझी-माझी शेवटची भेट. तुला तुझ्या जगात आणून सोडलं, माझं काम संपलं. "

आणि बा‌ई अंतर्धान पावतात.
शमी खोलीत परतते.

प्रत्येकाच्या आयुष्यात न-परतीचा एक क्षण असतो. परतायचं असतं असं नाही पण येतानाच आपण सर्व दरवाजे बंद करून त्यांची किल्ली कुठेतरी अज्ञात स्थळी फेकून आलेलो असतो. असा क्षण प्रत्येक उत्कट माणसाच्या आयुष्यात येतो. आणि कधीकधी असंही होतं की आपण आहे त्याहून पुढे जा‌ऊ शकत नाही. जायचं असतं असं नाही, पण आता पुरे असं वाटतं. आपण त्या क्षणाप्रत पोहोचतो तेव्हा आपण झालं-गेलं,  घडलं-न घडलं ते सगळं शांतपणे मान्य करून टाकतो. जगत राहण्याकरिता ते गरजेचं असतं.

पूर्ण निर्णया‌अंती स्वत:ला बाहेरच्या जगापासून तोडून या जगात आलेल्या शमीला खूप शांत वाटतं.

गरगरणा-या चक्रीवादळाच्या केंद्रकात जितकी भण्ण शांतता असते तितकं. बाहेर झंझावात, उलथापालथ असतेच.
पण, ती कधी नसते म्हणा?

-

शमी घरापाशी आली आणि सुस्कारली. आजचाही दिवस बघता बघता गेला. आपला निर्णय कधी होणार आहे? आज तिने जिना चढून जायला खूप वेळ घेतला. हल्ली घरी लवकर जायला नको म्हणून ती चालत जायला लागली होती. दारापाशी ये‌ऊनही चावीने दार उघडायचं मन हो‌ईना, मग ती गच्चीवर जा‌ऊन आली. त्यानंतर थोडा वेळ जिन्यावरच बसून राहिली. बाटली काढून पाणी प्यायली, मोबा‌ईलवरचे मेसेज पाहिले, शेवटी अर्ध्या तासानंतर निखिलची यायची वेळ झाली तशी तिला तिथे तशी बसलेली पाहून त्याने आणखी काहीतरी विचारायला नको म्हणून शमी दार उघडून आत गेली. मीनाता‌ई नेहमीप्रमाणे टीव्हीसमोर होत्या. त्यांच्यात काही बोलणं हो‌ईल, त्या तिला काही विचारतील याची सुतराम शक्यता नव्हतीच, मग ती सरळ आत गेली.

कपडे बदलून, फ्रेश हो‌ऊन जेवणाचं काय ते पाहायला ती किचनमध्ये गेली तर तिचा पाय सरकलाच एकदम. तिने कट्टयाला घट्ट धरलं म्हणून नाहीतर तोंडावरच आपटली असती ती, किंवा कशावर तरी आपटून डोकं तरी फुटलं असत़ं.

सगळ्या किचनमध्ये तेल सांडलेलं होतं. कोणाचं काम हे? मीनाता‌ई, दुसरं कोण.
शमी डोकं तडकलं. ती ताडताड चालत हॉलमध्ये आली,

"तुम्ही दिवसभर हे असले उद्योग करण्यात वेळ घालवता, तुम्हाला कंटाळा नाही येत?"

"नाही येत. आज केलंय, यापुढेही करेन. मी या घरातून टळत नाहीत तोपर्यंत करत राहिन."

त्या ते केल्याचं नाकारत सुद्धा नाहियेत हे पाहून शमी अवाक् झाली. थोड्या वेळाने शमीनेच त्यांना विचारलं..

"मी तुमचं काय वा‌ईट केलंय मीराता‌ई? तुम्ही माझ्याशी असं का वागता?"

"साळसूदपणाचा आव आणून पुन्हा मलाच विचारतेस?"

"नाही, मला खरंच माहित नाही म्हणून विचारतेय. तुम्ही मला त्रास देण्याच्या नाना परी करुन पाहिल्यात, माझी पाठ वळताच निखिलचे कान भरायचाही प्रयत्न केलात, मला माहित नाही असं समजू नका. पण, मी शांत राहिले. तुम्ही माझ्याशी असं वागूनही मी निखिलकडे कधीही वेगळं होण्याचा आग्रह धरला नाही. तुम्ही निखिलला लहानाचं मोठं केलंत याबद्दल माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त आदरच आहे म्हणून तुम्हाला विनंती करतेय की प्लीज, असं वागू नका. "

"अपशकुनी आहेस तू, पहिले तुझ्या आ‌ईबापाला गिळलंस, आता माझ्या मुलाला गिळणार नाहीस कशावरुन?"

मीराता‌ईंच्या कुजकट बोलण्याने आपल्याला काही त्रास करुन घ्यायचा नाही असा मनोमन निश्चय करुनही ते शमीला फार म्हणजे फारच लागलं. पण, मीराता‌ईंनी जी मर्यादा ओलांडायची ती ओलांडली होती, आता त्याहून पुढे त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नव्हता. शमी जायला वळली.

"माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायला बघतेस?"

".."

"त्याच्या आ‌ईपासून तोडायला बघतेस?"

".."

मीराता‌ईंचे वाग्बाण सटासट शमीच्या पाठीवर बसत होते.

"तू निघून का जात नाहीस आमच्या आयुष्यातून?"

".."

शमी वळली.

"तुमचं नशीब जोरावर आहे मीनाता‌ई. जरा जास्त प्रार्थना करायला लागा.. कोणी सांगावं तुमच्या मनासारखं हो‌ईल सुद्धा."

"काय हो‌ईल?"

लॅचकीने दार उघडून आलेला निखिल त्या दोघींकडे पाहात होता.

आ‌ईचा मख्ख चेहरा आणि शमीचा विद्ध चेहरा. काहीतरी विपरीत घडलं होतं खास. आपल्या घरात काही ठिक वातावरण नाही हे त्याला दिवसेंदिवस ठळकपणे जाणवत होतं. आपण याबद्दल काहीतरी करायला हवंय, आ‌ईला समजुतीच्या चार गोष्टी सांगायला हव्यात, शमीचं सांत्वन करायला हवंय.. सगळं सगळं त्याला समजत होतं, पण नेमकी आज त्याच्या थकलेल्या शरीराने त्याची साथ सोडली आणि तो करवादला.

"जेव्हा पाहावं तेव्हा तुमच्या कटकटी सुरु असतात. दोन क्षण पाठ टेकायला घरी यावं तर तुमचं काही ना काही सुरु असतंच. मला वीट आलाय आता सगळ्याचा. मीच निघून जातो. घाला, काय घालायला तो गोंधळ घाला." असं म्हणून निखिल दार आपटून बाहेर निघून गेला.

निखिल त्या रात्री घरी परतलाच नाही. मित्राकडे राहिला.

रडण्याचे विविध प्रकार असतात. एकात चेहरा मख्ख कोरा असतो आणि पाट उघडल्यासारखे अश्रू घळाघळा वाहत असतात. तळहातावरुन सुरी अल्लाद फिरवल्यावर त्या उघडलेल्या जखमेतून रक्त वाहायला लागेल तसं. दुसरयात दात गच्च आवळून, ओठांवर दात रोवून, तोंडावर मूठ, पोटावर हात दाबून हमसून हमसून रडणे. शरीराचा स्वल्पविराम हो‌ईतो.

त्या दिवशी शमी चेहरा मख्ख ठेवून आतल्या आत ढसाढसा रडली.
आणि दुस-या दिवशी शमी निघून गेली.

-

"आ‌ई, मी पोलिस स्टेशनला जातोय, माझ्यासाठी थांबू नकोस. तू जेवून घे."

"अरे, तू का पळापळ करतोयेस. गेली असेल तिच्या एखाद्या मित्राकडे. ये‌ईल परत."

"आ‌ई, गप्प बसायला काय घेशील?"

"अरे, हजार मित्र होते तिचे. तू आपला भोळा सांब.."

"आ‌ई?"

"मी तुला तेव्हाच सांगीतलं होतं की या पोरीचं लक्षण काही ठिक नाही म्हणून.."

"आ‌ईss?"

"हं.."

"तुझ्या डोक्यात ही घाण कोण भरतं गं?"

"निखिल.."

"आ‌ई, तुला शमी आवडायची नाही हे मला माहित होतं, तू तिला मुद्दामून त्रास देण्यासाठी काय करायचीस हे ही मला माहित होतं. पण, शमी तुला जिंकून घे‌ईल, तुला शमी आवडेल अशी आशा पण वाटत होती. पण पण काय करणार, तुझ्या मनात विषंच इतकं होतं की माझ्या खमक्या शमीचंही त्यापुढे काही चाललं नाही."

"निखिल?"

"काही एक बोलू नकोस. शेवटी हुसकावून लावलंसच ना तिला? यू मस्ट बी हॅप्पी. बिचारी माझी शमी, कुठे असेल, काय करत असेल काय माहित? "

"शेवटी मलाच कोस तू..तिनं चांगलं फितवलंय तुला."

"आ‌ई, कृपा कर आणि शक्य असेल तर शमी घरी ये‌ईस्तोवर माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस."

-

निखिल शमी जिथे जा‌ऊ शकेल अशा सर्व ठिकाणी, सर्व लोकांकडे जा‌ऊन आला. अशी कितीशी ठिकाणं होती नाहीतरी? घरातून निघून गेल्याच्या दिवशी शमी कामावर पण गेलेली नव्हती, त्यामुळे तिथे कोणी काहीही सांगू शकलं नाही. सगळीकडे पदरी निराशा आल्यावर निखिल शेवटी इथे आला होता. शमी आणि त्याच्यातलं शेवटचं लक्षात राहाण्याजोगं बोलणं याच जागेबद्दलचं होतं.

श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या इमारतीतला तिसरा मजला, रस्त्याकडे तोंड करुन असलेली खिडकी आणि बाल्कनी. निखिलने वर पाहिलं. खिडकीही बंद होती आणि शमीने वर्णन केलेला तो लामणदिवाही बंद होता. तो वर जा‌ऊन तिस-या मजल्यावरचा फ्लॅटही पाहून आला तर त्याला टाळं होतं. निखिल हताश झाला.

त्यानंतरचे सलग दहा दिवस तो तिथे येत होता, तिस-या मजल्यावर जा‌ऊन फ्लॅटला लागलेलं टाळं पाहून निराश हो‌ऊन परत जात होता. त्याला सारखं वाटत होतं की शमीचा काहीतरी माग लागलाच तर इथेच लागेल म्हणून, कोणालातरी काहीतरी माहित असेल म्हणून, पण हाती काहीही लागत नव्हतं. तरीदेखील तो पुन्हा पुन्हा तिथे येत राहिला.

आजचा अकरावा दिवस. तो आजही तिथे आला होता.

नेहमीप्रमाणे श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या समोर उभं राहून त्या इमारतीतला तिसरा मजला, रस्त्याकडे तोंड करुन असलेली खिडकी आणि बाल्कनीकडे नजर टाकली आणि त्याचा श्वास काही क्षणाकरता थांबला.
शमी सांगत होती ती रस्त्याकडे तोंड करुन असलेली खिडकी आज उघडलेली होती आणि बाल्कनीतला लामणदिवाही लागला होता.

आता काय करायचं म्हणून तो काही क्षण विचार करत थांबला इतक्यात त्याच्या समोर वा-याने एक पांढरी चादर ये‌ऊन पडली. ही कोणाची म्हणून त्याने वर पाहिलं तर...

तिसया मजल्यावरच्या, रस्त्याकडे तोंड करुन असलेल्या त्या बाल्कनीमध्ये एक म्हातारीशी बा‌ई उभी होती आणि ती त्याला खूण करुन बोलावत होती. आपण त्या बा‌ईला ओळखत नाही याबद्दल निखिलला खात्री होती. आता हे काय गौडबंगाल? म्हणून निखिल एक क्षण थबकला. काय करावं? दुर्लक्ष करावं का सरळ? आपला काय संबंध त्या म्हातारीशी?

पण त्याच्या मनात कुठेतरी आशेला धुगधुगी होती. का काय माहित, शमीबद्दल जर काही कळलं तर?

 त्याने जोरात ओरडून विचारलं, "मला बोलावताय का आजी?"

आजीला काही ऐकू गेलंच नसावं. मग त्याने आणखी जोरात ओरडून विचारलं, "आजी?"

आजूबाजूची लोकं तो ओरडतोय त्या दिशेला पाहून त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहून जात होती, काहीजण  फिदीफिदी हसत होते. पण निखिल त्या कोणाचीही पर्वा करण्याच्या पलीकडे गेला होता.
आजीबा‌ईच्या कानांमध्ये ठणाणा होता वाटते कारण त्या बाल्कनीतून सरळ आत निघून गेल्या.

बघूयात जा‌ऊन, बहुतेक त्यांना मला काहीतरी सांगायचं असेल, निखिलने तर्क लढवला आणि इमारतीच्या गेटकडे आपला मोर्चा वळवला. जुन्या धाटणीतल्या त्या इमारतीतले सर्व फ्लॅट बंद होते. गेले दहा दिवस हेच फ्लॅट्स उघडे दिसलेले. नेमके आज बंद असायचं कारण काय? निखिलच्या डोक्यात सटासट विचार येत होते. वर्षानुवर्षं एखादी जागा बंद असली की तिच्यात एक कुंद, गर्द हवा असते, तशी हवा त्या इमारतीत साचून राहिलेली होती. निखिल तिस-या मजल्यावर आला तर गेले दहा दिवस टाळं लागलेल्या फ्लॅटचं दार उघडं होतं. आत जावं की नाही याचा विचार करत तो एक-दोन क्षण घुटमळला. मन सांगत होतं, "जा-जा" आणि मेंदू सांगत होता, "सबूर, प्रदेश अनोळखी आहे". शेवटी मनाचा हिय्या करुन तो दार ढकलून आत गेला. आत कोणीच नव्हतं. एका प्रशस्त दिवाणखान्यात तो एकटाच उभा होता. तेवढ्यात पाठून विचारणा झाली.

"ओये, आलास का? किती वेळ लावलास?"

निखिल स्तब्ध. तो उत्साहाने फसफसलेला आवाज ओळखायला त्याला व्हॉ‌ईस अॅनालिस्टची गरज नव्हती.

शमी???

आणि फ्लॅटचं दार निखिलमागे बंद झालं.

---

श्रद्धा भोवड

सौदाद-
सौदाद या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ ’आता आपल्याबरोबर नसलेल्या किंवा आपले अपार प्रेम असलेल्या व्यक्तीच्या विरहाने घसा दाटून येणे, कोणीतरी आपलं काळीज कुरतडतंय अशी भावना’.
कोणीतरी निघून गेल्यानंतर मागे रेंगाळत राहातं ते प्रेमदेखील सौदादच!

---

(ही कथा श्री व सौ, दीपावली २०१६ कथा विशेषांकात प्रसिद्ध झाली)